5G वायरलेस तंत्रज्ञान – दुष्परिणाम आणि उपाय – भाग १

(मिलिंद बेंबळकर यांचे ‘5G वायरलेस तंत्रज्ञान: दुष्परिणाम आणि उपाय‘ हे ई-पुस्तक Bronato.com तर्फे amazon.in व ‘किंडल’ वर नुकतेच प्रकाशित झाले आहे. या पुस्तकात त्यांनी सर्वसामान्य जनतेसाठी वायरलेस सेवेमागचे तंत्रज्ञान, त्याचे दुष्परिणाम, त्यात असलेली गुंतवणूक, फायबर ऑप्टिक केबलचे जाळे पसरवण्यामागची उद्दिष्टे आणि वस्तुस्थिती, तसेच भारतात फायबरायझेशनची अंमलबजावणी होत असतानाची त्यांची निरीक्षणे ससंदर्भ मांडली आहेत. या पुस्तकातील काही निवडक प्रकरणे आपण लेखमालिकेच्या स्वरूपात प्रकाशित करतो आहोत. याचा पहिला भाग इथे प्रकाशित होतो आहे. उर्वरित लेख विशिष्ट कालावधीत प्रकाशित होतील.)

अवकाशातील 5G

एलन मस्क (जन्म १९७१) या व्यावसायिकाने इ.स. २००२ मध्ये हाथर्न, कॅलिफोर्निया येथे स्पेस एक्स (Space X-Space Exploration Technologies Corp.) या कंपनीची स्थापना केली. अवकाशात उपग्रह सोडण्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री तयार करणे, अवकाश प्रवासासाठी आवश्यक साधने तयार करणे, अवकाशात दूरसंचारासाठी (telecommunication equipment) आवश्यक साधने सोडणे ही या कंपनीची मुख्य उद्दिष्टे होती. इ.स. २०१८ मध्ये या कंपनीची उलाढाल २०० बिलियन डॉलर (१३,९२८ कोटी रुपये) होती.

उपग्रह
उपग्रह

जानेवारी २०१५ मध्ये स्पेस एक्स कंपनीने दूरसंचारासाठी अवकाशात उपग्रह सोडणे आणि त्यांची अवकाशात साखळी (constellation) तयार करण्याचा निर्णय घेतला. या प्रकल्पाचे नाव ‘स्टारलिंक’ असे ठेवण्यात आले. फेब्रुवारी २०१८ ते जून २०२१ या कालावधीत २६० किलो वजनाचे १७४० उपग्रह अवकाशात सोडण्यात आले. स्टारलिंकला FCC (Federal Communications Commission) ने १२,००० उपग्रह अवकाशात सोडण्यासाठी परवानगी दिलेली आहे. तर स्टारलिंकने अजून ३०,००० उपग्रह अवकाशात सोडण्यासाठी परवानगी मागितलेली आहे. हे उपग्रह पृथ्वीपासून केवळ ३४० किमी उंचीवरून फिरत आहेत. (त्यापैकी केवळ १७२ उपग्रह ५६० किमी अंतरावरून फिरत आहेत.)

आता स्पेस एक्सच्या स्पर्धेत इतर कंपन्याही उतरलेल्या आहेत. त्या याप्रमाणे: (१) वनवेब (युनायटेड किंगडम) – सध्या कार्यरत दूरसंचार उपग्रह १४८, नियोजित उपग्रह ७०८८, ग्राहक – विमानकंपन्या, सरकार, व्यापारी प्रतिष्ठापने. (२) टेलिसॅट ( कॅनडा) – सध्या कार्यरत दूरसंचार उपग्रह ११७, नियोजित उपग्रह १६७१, ग्राहक – विमानकंपन्या, क्रुझ/जहाजकंपन्या, सरकार, प्रतिष्ठापने. (३) एएसटी अँड सायन्स (युएसए) – उपग्रह आणि सेलफोन यांच्यामध्ये थेट संपर्क व्हावा अशा पद्धतीने उपग्रहामधील यंत्रणा विकसित करण्यात आलेली आहे. ही सुविधा मोबाईल सेवा पुरविणार्‍या कंपन्यांमार्फत ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. ज्या भागांमध्ये सेलफोनला सेलटॉवरमार्फत सिग्नल मिळत नाहीत त्यावेळेस सेलफोनला हे सिग्नल आपोआप उपग्रहामार्फत उपलब्ध होतील आणि सेलफोन चालूच राहतील अशी ही सुविधा आहे.  उपग्रहामार्फत जे सिग्नल सोडले जातील त्याची Effective Radiating Power (EIRP) मात्र प्रचंड जास्त आहे. FCCला केलेल्या अर्जात ती 79.2 dBW (=109.2 dBm = ८ कोटी ३१ लाख ७६ हजार ३७७ वॅट) प्रति बीम नमूद केलेली आहे! या रेडिएशनची फ्रीक्वेन्सी ४० ते ७५ GHz आहे (V – Band).[१] (४) ओम्नीस्पेस (युएसए) – या कंपनीची लॉकहीड मार्टिन आणि अमेरिकेतील लष्करी विभाग यांच्याशी भागीदारी आहे. IOT (internet of Things) – इंटरनेटने जोडलेल्या विविध वस्तूंचा समूह किंवा नेटवर्क जे डेटा गोळा करण्यास आणि विनिमय (Exchange) करण्यास सक्षम आहे. याचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यासाठी प्रचंड क्षमतेने, वेगवान आणि विनाव्यत्यय संपर्कयंत्रणेची गरज असते. त्यासाठी अवकाशातून उपग्रहामार्फत 5Gचे सिग्नल (RFR- Radio Frequency Radiation) सोडले जाणार आहेत. या उपक्रमासाठी प्रायोगिक तत्त्वावर FCCने परवानगी दिलेली आहे. (५) ॲमेझॉन – जुलै २०२०मध्ये FCCने ॲमेझॉन कंपनीस ३२३६ उपग्रह अवकाशात सोडण्यासाठी परवानगी दिलेली आहे. स्पेस एक्सप्रमाणेच ॲमेझॉनसुद्धा ग्राहकांना छतावरील आणि वाहनांवरील टर्मिनल (डिश ॲंटेना) मार्फत आपल्या सेवा देणार आहे. (६) लिंक – एएसटी अँड सायन्स आणि ओम्नीस्पेस या कंपन्यांप्रमाणेच लिंक ही कंपनीसुद्धा उपग्रहामार्फत सेलफोनशी थेट संपर्कयंत्रणा प्रस्थापित करून देणार आहे. त्यासंबंधीचा प्रायोगिक परवाना FCCने लिंकला दिलेला आहे. (७) फेसबुक – या कंपनीचा इरादा ६८.५ किलो वजनाचे उपग्रह अवकाशात सोडणे आणि त्याची साखळी तयार करण्याचा आहे. त्यासंबंधीचा प्रायोगिक परवाना FCCने फेसबुकला दिलेला आहे. कंपनीने किती उपग्रह अवकाशात सोडायचे आहेत याविषयीची माहिती जाहीर केलेली नाही. 

ज्याप्रमाणे सर्वसामान्य नागरिकांना वीज सहजगत्या उपलब्ध आहे त्याचप्रमाणे FCCने इ.स.२०१०मध्ये सर्वसामान्य नागरिकांना ब्रॉडबॅंड उपलब्ध व्हावे असे धोरण जाहीर केले. परंतु इ.स. २०२०पर्यंत त्याची अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. मुख्यवस्तीपासून दूर अंतरावरील घरे, हमरस्त्यापासून दूर अंतरावरील घरे, या दूर अंतरामुळे फायबर केबल्स (FTTH Cables – Fiber To The Home) टाकणे न परवडणे या कारणांमुळे अमेरिकेत सुमारे ४ कोटी नागरिक (जुलै २०२१च्या आकडेवारीनुसार एकूण लोकसंख्या ३३.२९ कोटी) ब्रॉडबॅंड सेवेपासून वंचित आहेत (१०% नागरिक ब्रॉडबॅंड सेवेपासून वंचित). तर मायक्रोसॉफ्टने जाहीर केलेल्या माहितीनुसार १२ कोटी नागरिकांना (लोकसंख्येच्या ३६%) ही सेवा परवडत नाही.[२]

डिश ॲंटेना
डिश ॲंटेना

प्रायोगिक तत्त्वावर वॉशिंग्टन राज्याच्या पश्चिम भागातील पॅसिफिक महासागराच्या किनारपट्टीवर राहणार्‍या ‘हो’ जमातीच्या (अमेरिकेतील मूळ रहिवासी) नागरिकांसह १०,००० लोकांना ब्रॉडबॅंड सेवा (5G High Speed Internet Service from Space- Download Speed more than 25 Mbps and 3 Mbps for upload) देण्याचे स्पेस एक्स कंपनीने जून २०२१ मध्ये ठरविले. ही सेवा महाग आहे. डिश ॲंटेनाची किंमत रु. ३७,००० ($ 500) आहे.[३] महिन्याचे भाडे रु. ७४०० ($ 100) आहे. कंपनीचा जोडणीखर्च प्रति ग्राहक रु. ७३,७०० ($ 1000) आहे. पण कंपनी प्रति जोडणीसाठी रु. ३७,००० ($ 500) आकारते. 

या कारणामुळे अमेरिकेत FCC ने एक नवीन योजना जाहीर केलेली आहे. या योजनेअंतर्गत ब्रॉडबॅंड सेवा देणार्‍या कंपन्यांना Rural Digital Opportunity Fund मधून अर्थसहाय्य (अनुदान) देण्यात येणार आहे. एकूण रक्कम १ लाख ४८ हजार कोटी रुपये आहे ($20 Billion). ही रक्कम १० वर्षांत खर्च करावयाची आहे. देशातील ३५ राज्यांमध्ये, ज्या भागात ब्रॉडबॅंड सेवा उपलब्ध नाही तेथे ही सेवा उपलब्ध करून देण्यासाठी रक्कम वापरण्यात येणार आहे. सुमारे ८५० ब्रॉडबॅंड सेवा पुरविणार्‍या कंपन्यांना हे अनुदान देण्यात येणार आहे. त्यामध्ये सर्वांत मोठा वाटा स्पेस एक्स या कंपनीचा आहे. त्यांना ६ हजार ६६० कोटी रुपये ($ 900 million) देण्यात येणार आहेत (सप्टेंबर २०२१ पर्यंत या अनुदानाचे वाटप झालेले नाही). 

आता अनुदानाच्या मुद्द्यावरून वादाला सुरुवात झालेली आहे.[४] फ्री प्रेस[५] चे संशोधन संचालक, एस.डेरेक म्हणतात, “स्टारलिंकने या अनुदान योजनेचा म्हणजेच करदात्यांच्या पैशांचा गैरवापर केलेला आहे. ज्या भागात इंटरनेट, ब्रॉडबॅंड सेवा उपलब्ध नाहीत त्या भागात सेवा देण्याऐवजी शिकागो, वॉशिंग्टन डी सी, विविध महामार्ग, औद्योगिक क्षेत्रे, मोठमोठी वाहनतळे, आंतरराराष्ट्रीय विमानतळे, अमेरिकेतील पूर्वेकडील गजबजलेले समुद्रकिनारे, नेवार्क – जे एफ के – हार्ट्सफिल्ड – मियामी – न्यू जर्सी या शहरांमधील विमानतळे, जेथे उत्तम दर्जाच्या सेवा उपलब्ध आहेत, तेथेच स्टारलिंक परत सेवा देत आहे. केवळ स्टारलिंक नव्हे तर अनुदान मंजूर कंपन्यांपैकी केवळ १०% कंपन्याच ग्रामीण भागात सेवा देत आहेत.” याचे दुसरे महत्त्वाचे कारण असे आहे, FCC (Federal Communications Commission) ने ब्रॉडबॅंड सेवा देणार्‍या कंपन्यांना दिलेले नकाशे सदोष आहेत. आता नवीन नकाशे सादर करण्यात यावेत अशी मागणी माइक डॉयल या पेन्सिल्व्हानियाच्या लोकप्रतिनिधींनी संसदेत केलेली आहे. 

ताजा कलम – दि.२८ जुलै २०२१ रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बिडेन यांनी BipartisanInfrastructure Deal (द्विपक्षीय पायाभूत सुविधा विधेयक) अनुसार गतिमान इंटरनेटसेवा पुरविण्यासाठी रु. ४ लाख ८१ हजार कोटी ($ 65 Billion) ची गुंतवणूक करण्याचे जाहीर केलेले आहे. यामुळे अमेरिकेत सर्व सामान्य नागरिकांना कमी दरात दर्जेदार इंटरनेट सेवा पुरविणे शक्य होईल. तसेच सुदूर भागात राहणार्‍या नागरिकांनाही उत्तम दर्जाची इंटरनेट सेवा देणे शक्य होणार आहे. 

संदर्भ आणि स्पष्टीकरणे – 

१) भारतात 4G च्या मोबाइल टॉवर ॲंटेनामधून 20 Watt ते 200 Watt ( = 13.01 ते 23.01 DBw = 43.01 ते 53.01 dBm) पॉवरने रेडिएशन केले जाते . रेडिएशनची फ्रीक्वेन्सी 2.1 GHz आहे. तुलनात्मकदृष्ट्या 5G चे रेडिएशन किती पटीने तीव्र आहे याचा अंदाज येईल. 
२) भारताची लोकसंख्या १३९ कोटी ६३ लाख असून (जुलै २०२१, World meter नुसार) वायरलेस सेलफोन द्वारे ब्रॉडबॅंडचे वापरकर्ते ७२.४४ कोटी आहेत (लोकसंख्येच्या ५२% वापरकर्ते नागरिक). ही संख्या एकूण ब्रॉडबॅंड वापरकर्त्यांच्या ९७% आहे (वायरलेस आणि वायर्ड सेवेचे एकूण ग्राहक). त्यापैकी ग्रामीण भागातील वापरकर्ते ३८% असून त्यांचा डेटा वापर हा एकूण डेटा वापराच्या ४५% आहे. म्हणजेच लक्षणीय वापर आहे (Nokia MBiT 2021 Report आणि TRAI Report 31.08.2021).
३) १ डॉलर = रु. ७४ (ऑगस्ट २०२१ मधील विनिमय दर).
४) “Star link, Elon Musk and the promise (and perils) of internet from space” by Scientific America, Video on YouTube. 
५) फ्री प्रेसया सेवाभावी संस्थेची स्थापना इ.स. २००३ मध्ये समाजवादी विचाराचे लेखक रॉबर्ट मॅकचेस्नी, प्रागतिक विचारांचे पत्रकार जॉन निकोलस, चळवळीतील कार्यकर्ते जोश सिल्व्हर यांनी वॉशिंग्टन डी सी येथे केली. ही संस्था दबावगट या नात्याने काम करते. इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये (रेडिओ, टीव्ही इ.) पुरेशी पारदर्शकता निर्माण करणे आणि जबाबदार माहितीच्या प्रसाराद्वारे सर्वसामान्य नागरिकांमध्ये लोकशाही मूल्ये रुजविणे हे या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

दुसरे या संस्थेचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे, “नेट न्यूट्रॅलिटी” (इंटरनेट तटस्थता/समानता) या सिद्धांताचा सरकारकडे आग्रह धरणे. या सिद्धांतानुसार, इंटरनेट सेवा देणार्‍या कंपन्या, टेलिकॉम ऑपरेटर्स यांनी वेगवेगळ्या प्रकाराच्या डेटासाठी वेगवेगळे दर लावू नयेत. समान दर लावावेत. या कंपन्यांनी इंटरनेटविषयक कोणत्याही सेवा जाणीवपूर्वक बंद करू नयेत, त्यामध्ये अडथळे आणू नयेत, त्याचा वेग कमी करू नये अथवा काही सेवांसाठी वेगळे दर लावू नयेत. रस्त्यावरून वाहतूक करणार्‍या वाहनांना ज्याप्रमाणे समान नियाम लागू केले जातात तेच तत्त्व इंटरनेट सेवा देणार्‍या कंपन्याना, टेलिकॉम ऑपरेटर्सना लागू करावे. 

5G आणि प्रदूषण

एलन मस्कच्या स्टारलिंक कंपनीने फेब्रुवारी २०१८ ते जून २०२१ पर्यंत २६० किलोग्रॅम वजनाचे १७४० उपग्रह 5G संदेशवहनासाठी अवकाशात सोडलेले आहेत. या व्यतिरिक्त १२००० उपग्रहांना अवकाशात प्रक्षेपणासाठी FCC (Federal Communications Commission) ने परवानगी दिलेली आहे. तर स्टारलिंकला संदेशवहनासाठी अजून ३०,००० उपग्रह अवकाशात सोडायचे आहेत. याव्यतिरिक्त इतर विविध कंपन्यांनी काही हजार उपग्रह संदेशवहनासाठी अवकाशात सोडण्याची परवानगी मागितलेली आहे. 

फाल्कन उपग्रह
फ़ाल्कन उपग्रह

इंधन ज्वलनामुळे होणारे प्रदूषण – स्टारलिंक कंपनीने फाल्कन-९ हे पुनर्वापर करता येण्याजोगे रॉकेट तयार केलेले आहे. या रॉकेटच्या सहाय्याने ६० उपग्रह एका वेळेस अवकाशात सोडण्यात येतात. या रॉकेटच्या उड्डाणासाठी ४०० मेट्रिक टन रॉकेल एका वेळेस लागते. तुलना करावयाची झाल्यास बोइंग ७४७ च्या १८ विमानांना उड्डाणासाठी जेवढे इंधन लागते अथवा एक मोटार २०० वर्षे चालविण्यासाठी जेवढे इंधन लागते तेवढे इंधन काही मिनिटांत जाळले जाते आणि अवकाशात ते कार्बन डायऑक्साईडच्या स्वरूपात सोडले जाते. दरवर्षी साधारणतः अशा प्रकारच्या रॉकेटची १००० उड्डाणे अवकाशात होतील असा अंदाज आहे. 

ओझोन वायूचा होणारा र्‍हास – पृथ्वीभोवती ८ ते १४.५ किमी अंतरावर ट्रोपोस्फीअरचा (Troposphere) पट्टा आहे. त्याच्यावर १४.५ ते ५० किमी अंतरावर स्ट्रॅटोस्फीअरचा (Stratosphere) पट्टा आहे.[१] ५० ते ८० किमी अंतरावरील पट्टा हा मेसोस्फीअरचा (Mesosphere) आहे. तर समताप मंडल – स्ट्रॅटोस्फीअर पट्ट्यामध्ये ओझोन वायू (९०% ओझोन केवळ याच पट्ट्यात आढळतो) असतो. हा वायू पृथ्वीवरील सजीवांचे सूर्यापासून निघणार्‍या अतिनील किरणांपासून संरक्षण करीत असतो.[२] प्रचंड प्रमाणात रॉकेलच्या ज्वलनामुळे कार्बन डायऑक्साईड तयार होतो. तो स्ट्रॅटोस्फीअर पट्ट्यामध्ये जमा होतो. त्यामुळे ओझोन वायूचा र्‍हास होण्यास सुरुवात होते. मोठ्या प्रमाणातील कार्बन डायऑक्साईड निर्मितीमुळे पृथ्वीवरील तापमानवाढ, परिसरात ॲसिडचा पाऊस पडणे आणि त्यामुळे जमीन नापीक होणे हे इतर तोटे आहेतच. पुढील काळात अवकाशात फाल्कन-९ आणि त्यासारख्या इतर रॉकेट्सची दरवर्षी १००० उड्डाणे होतील असा अंदाज आहे. 

अवकाश निरीक्षणात अडथळे – अवकाशातील 5G च्या वाढत्या उपग्रहांमुळे अवकाश निरीक्षणात, संशोधन कार्यात अडथळे निर्माण होत आहेत अशी खगोलशास्त्रज्ञांची (Astronomers) तक्रार आहे. हे अडथळे विविध प्रकारचे असतात. उपग्रहांवरून सतत प्रकाश परावर्तीत होत असतो त्यास प्रकाश प्रदूषण (Light Pollution) असे म्हणतात. आणि दुसरा अडथळा आहे 5G च्या रेडिओ वेव्ह रेडिएशनचा. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे, आकाशात दिसणार्‍या ग्रह-तार्‍यांपेक्षा 5G च्या दृश्य उपग्रहांची संख्या वाढत चाललेली आहे. हे उपग्रह आपली कक्षा बदलत असतात. त्यामुळे अवकाश निरीक्षणात, संशोधनकार्यात अडथळे निर्माण होत असतात. यासंबंधी The International Astronomical Union (IAU), National Radio Astronomy Observatory (NRAO), Square Kilometer Array (SKA) या संघटनांनी तीव्र चिंता व्यक्त केलेली आहे. 

अवकाशातील भंगार सामानाची समस्या – स्टारलिंकने मोठ्या प्रमाणात 5G चे उपग्रह अवकाशात सोडलेले आहेत. दीर्घ काळानंतर हे उपग्रह निकामी होतील. त्याचे आयुष्य संपेल. अशावेळेस या उपग्रहाचा कचरा, भंगार याची विल्हेवाट लावणे ही मोठी समस्या होणार आहे. कारण ती अतिशय महागडी प्रक्रिया आहे. जानेवारी २०१९ पर्यंतच्या US Space Surveillance Network च्या अहवालानुसार ज्याचा मागोवा घेता येतो अशा २०,००० विविध वस्तू अवकाशात परिभ्रमण करीत आहेत; तर १ सेमीपेक्षा कमी आकाराचे १२ कोटी ८० लक्ष भंगाराचे तुकडे, १ सेमी ते १० सेमी आकाराचे ९ लक्ष तुकडे आणि १० सेमीपेक्षा मोठ्या आकाराचे ३४००० तुकडे अवकाशात परिभ्रमण करीत आहेत. यावरून अवकाशातील कचर्‍याच्या प्रदूषणाचे गांभीर्य लक्षात यावे.

हवामानाचा अंदाज वर्तविणेस निर्माण होणारे अडथळे – अमेरिकेतील कॉंग्रेससमोर साक्ष देताना २० जुलै २०२१ रोजी विलियम महोनी (Director of National Center for Atmospheric Research) यांनी सांगितले, “5G साठी 24 GHz फ्रीक्वेन्सीचा वापर वाढत आहे. 5G च्या टॉवरवरील अॅंटेनापासून होणार्‍या रेडिएशनमुळे हवामानाचा अंदाज वर्तविणे, हवामानाची माहिती गोळा करणे, यामध्ये अडथळे निर्माण होत आहेत. हवामानविषयक माहिती गोळा करण्याची अचूकता कमी होत चालली आहे. हे गंभीर आहे.”

हवामानाचा अंदाज वर्तविणे, हवामानाची माहिती गोळा करणे यासाठी जे उपग्रह अवकाशात सोडलेले आहेत ते मायक्रोवेव्ह रेडिओमीटरमार्फत हवेतील बाष्पाचे (Water Vapour) प्रमाण, त्याचे विविध उंचीवरील प्रमाण, त्यांचे प्रवाह यांविषयी माहिती गोळा करीत असतात. एकूण हवामान अंदाजामध्ये सुमारे ३३% अंदाज हे हवेतील बाष्पावरून बांधले जातात. आता समस्या अशी निर्माण झालेली आहे की या मायक्रोवेव्ह रेडिओमीटरसाठी 24 GHz फ्रीक्वेन्सीचा पट्टा (Spectrum) वापरला जातो; तर 5G साठी 24 GHz फ्रीक्वेन्सीचा वापर वाढत आहे. समान रेडिओ फ्रीक्वेन्सीमुळे मायक्रोवेव्ह रेडिओमीटरच्या कामात अडथळे निर्माण होत आहेत. हवामान अंदाजाची अचूकता कमी होत आहे. कृषीविभाग, हवाईविभाग (Aviation), जलव्यवस्थापन, वनव्यवस्थापन, जंगलातील आगीवर देखरेख ठेवणे, उर्जानिर्मिती व्यवस्थापन, संरक्षणविभाग या क्षेत्रात अचूक हवामान अंदाजाची सतत गरज भासते. ही गरज पूर्ण करणे अवघड होत आहे. 

अमेरिकेतील हवामान विभागात 16 GHz फ्रीक्वेन्सीचा दुसरा पट्टा (Spectrum) मोठ्या प्रमाणात वापरला जातो. विविध प्रकारचे पाण्याचे प्रवाह, नद्यांमधील पाण्याची पातळी, वार्‍याचा वेग मोजण्यासाठी स्वयंचलित गेजेस वापरले जातात. हे गेजेस अवकाशातील उपग्रहांना जोडलेले असतात. हे गेजेस आणि उपग्रह यांमधील संदेशवहनासाठी 16 GHz फ्रीक्वेन्सीचा पट्टा वापरला जातो. हवामानविभागाला संभावित चक्रीवादळे, हानिकारक वावटळ, जंगलांना लागणारे वणवे यांविषय़ी अचूक माहिती त्वरेने नागरिकांना कळविणे गरजेचे असते. 5G च्या रेडिओ वेव्ह्जमुळे उपरोक्त गेजेस आणि उपग्रह यांमधील संवादवहनात अडथळे निर्माण होतात आणि त्यामुळे हवामान अंदाजाची अचूकता कमी होते. यासंदर्भात स्टीव्हन रूट (President, American Weather and Climate Industry Association) यांनी 5G च्या रेडिओ वेव्हमुळे हवामानअंदाजामध्ये जे अडथळे निर्माण होत आहेत त्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त केलेली आहे.[३] 

यामधील नाट्यपूर्ण भाग असा की या हवामानविभागाच्या विरोधास न जुमानता 5G साठी अमेरिकेतील २९ कंपन्यांना FCC ने 24 GHz फ्रीक्वेन्सीचा पट्टा रु.१४,८०० कोटीला ($ 2 Billion) सार्वजनिक लिलावात विकला. 

विमानातील रडार यंत्रणेत अडथळे – FCC (Federal Communications Commission) ने ऑक्टोबर २०२० मध्ये 5G साठी 3.7 ते 3.98 GHz च्या पट्ट्याचा लिलाव केला. आणि अमेरिकेतील हवाई दळणवळण क्षेत्रात एकच गदारोळ उठला. RTCA (Radio Technical Commission for Aeronautics – बिगरसरकारी सेवाभावी संस्था, स्थापना १९३५) ने तातडीने श्वेतपत्रिका काढली. त्यांनी FCC ला बजावले, “5G मुळे विमानांमध्ये ज्या रडारयंत्रणा बसविल्या जातात त्यांना धोका निर्माण होऊ शकतो.” याचे कारण असे आहे की विमानांमध्ये जी रडारयंत्रणा बसविलेली असते त्यामध्ये अल्टीमीटर हे उपकरण असते. जमिनीपासून, आजूबाजूच्या परिसरापासून विमान किती उंचीवरून प्रवास करीत आहे हे त्यावरून समजते. त्यामध्ये सेन्सर असतो. या सेन्सरसाठी 4.2 ते 4.4 GHz हा पट्टा हवाई खात्याने १९७० पासून निश्चित केलेला आहे. FCC ने लिलाव केलेल्या 5G साठी 3.7 ते 3.98 GHz चा पट्टा आणि अल्टीमीटर साठी 4.2 ते 4.4 GHz हा हवाईखात्याने मंजूर केलेला पट्टा यामध्ये खूपच कमी अंतर आहे. त्यामुळे विमानातील रडारयंत्रणेमध्ये अडथळे (Interference) निर्माण होऊ शकतात. अल्टीमीटरची रेडिएशनची क्षमता (पॉवर) केवळ 1 Watt असते. तुलनेने 5G ची रेडिएशनची क्षमता कितीही जास्त असू शकते. त्यामुळे अल्टीमीटरची अचूकता कमी होऊ शकते. मोठ्या प्रमाणात अपघात होऊ शकतात. या संकटास कसे तोंड द्यायचे यासाठी हवाईक्षेत्रात काम करणार्‍या विविध अभ्यासगटांनी आता संशोधन करण्यास सुरुवात केलेली आहे.[४] 

विजेचा वाढता वापर आणि त्यामुळे होणारे प्रदूषण – ABI Research Data Centre Forum ने आपल्या अहवालात म्हटले आहे की इ.स. २०२० ते २०३० या कालावधीत 5G मुळे विजेची गरज ६१ पटीने वाढण्याची शक्यता आहे. अहवालात पुढे म्हटले आहे की सध्याच्या आधुनिक काळात मोबाईलसेवा प्रदान करणार्‍या कंपन्या सर्वाधिक नफा मिळवणार्‍या आहेत. त्यांची एकूण वार्षिक उलाढाल १०२.१२ ट्रिलियन रुपयांची ($1.38Trillion) आहे.[५] सध्या मोबाईलकंपन्यांचे सुमारे ७५० ते ८०० कोटी ग्राहक आहेत. इ.स. २०२४ मध्ये ही संख्या ८९० कोटीपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. इ.स. २०२० मध्ये वायरलेस, मोबाईलउद्योगाची उर्जेची गरज 19.8Mtoe होती. ती इ.स. २०३० मध्ये 51.3 Mtoe पर्यंत वाढणार आहे.[६] तुलना करायची झाल्यास, संपूर्णं स्वीडन देशास जेवढी वीज लागते तेवढी वीज फक्त वायरलेस उद्योगाला इ.स. २०३० मध्ये लागेल. दुसर्‍या अर्थाने संपूर्ण युनायटेड किंगडमला घरगुती वापरासाठी जेवढी वीज लागते तेवढी वीज वायरलेस उद्योगाला इ.स. २०३० मध्ये लागेल.

समस्या अशी आहे, 4G च्या बेस स्टेशनला जेवढी वीज लागते तेवढे क्षेत्र व्यापण्यासाठी 5G च्या बेस स्टेशनला तिप्पट वीज लागते (5G च्या एका बेस स्टेशनसाठी 11.5 KW वीज लागते). कारण 5G च्या बेस स्टेशनमधील अंतर कमी असते. इ.स. २०२५ पर्यंत साधारणतः ५०,००० कोटी लहान मोठी उपकरणे, साधने (Devices, Gadgets, Peripherals) इंटरनेटला जोडली जाणार आहेत. तर इ.स. २०२२ पर्यंत जागतिक पातळीवर मोबाईल डेटाची वाहतूक ७ पटीने वाढणार आहे. ज्यावेळेस 5G ची सेवा पुरविणार्‍या कंपन्या 4G पेक्षा १००० पट डेटा पाठविण्याची भाषा करतात त्याच वेळेस १००० पट अधिक वीज त्यासाठी लागणार आहे हे लक्षात घेतले पाहिजे. 

असे अनुमान आहे की आयसीटी उद्योगास (Information and Computer Technology Sector) इ.स. २०२५ मध्ये जगातील एकूण वीजेच्या उत्पादनाच्या ३४% वीज लागेल. त्यापैकी स्मार्टफोनसाठी १५%, नेटवर्कसाठी १०% आणि टीव्हीसाठी ९% वीज लागेल. 

5G साठीचे मोबाईलफोन, ॲंटेना, लहान मोठी साधने, उपकरणे (Devices, Gadgets, Peripherals) नव्याने तयार करावी लागणार आहेत. त्यासाठी मोठ्या प्रमाणात खाणींमधून खनिजांचे उत्खनन करावे लागणार आहे. त्यावर प्रक्रिया करून ते शुद्ध रूपात वेगळे करावे लागेल. त्यासाठी मोठ्या प्रमाणात वीज लागणार आहे. ही वीज तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कोळसा, खनिज तेल लागेल. वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणावर खनिज तेलाचा वापर होईल तो वेगळाच! या सर्वांचा एकत्रित परिणाम असा होणार आहे, सध्या जागतिक डिजिटल प्रणालीचा कार्बन फूटप्रिंट ( कार्बन पदचिन्ह)[७] ४% पर्यंत पोहोचलेला आहे आणि ९% ने प्रति वर्षी ऊर्जेची गरज वाढते आहे. 

हा सर्व द्राविडी प्राणायाम कशासाठी? तर 5G साठी. ज्याच्या सुरक्षाविषयक कोणत्याही चाचण्या आजपर्यंत प्रयोगशाळेमध्ये झालेल्या नाहीत. तरीही हे उत्पादन बाजारात उपलब्ध आहे. 

संदर्भ आणि स्पष्टीकरणे – 

१) स्ट्रॅटोस्फीअरचा (Stratosphere) खालील पट्टा पृथ्वीपासून १० किमी (सुमारे ३३,००० फूट) अंतरावर सुरू होतो असे गृहीत धरले जाते. या पट्ट्यात प्रमुख्याने जेट विमाने प्रवास करतात. कारण या पट्ट्यातील वातावरण वादळी नसते. शांत असते. त्यामुळे इंधनाचीपण बचत होते तर राजहंस, क्रेन, गिधाडे इ. पक्षी या पट्ट्यात सहजतेने विहार करतात. 
२) अतिनील किरणांची (Ultraviolet rays) पातळी वाढली तर मानवी आरोग्यच धोक्यात येईल. त्वचेचे विकार होणे, त्वचेचा कॅन्सर होणे, डोळ्यांचे आजार होणे, रोगप्रतिकारकशक्ती कमी होणे इ. गंभीर आजारांना सामोरे जावे लागेल. 
३) Weather, E & E News, Scientific American.
४) Flight Safety Foundation.
५) १ ट्रिलियन = १ लाख कोटी ( १ वर १२ शून्य).
६) 1 Mtoe = १ दशलक्ष अथवा १ मेगाटन क्रुड ऑईल जाळल्यानंतर निर्माण होणारी ऊर्जा. 
1 Mtoe = १ कोटी १६ लक्ष ३० हजार MWh 
1 MWh = 1 Megawatt Hour = 1000 Kilowatt Hour = 1000 Kilowatts of electricity used continuously for 1 Hour.
७) कार्बन फूटप्रिंट ( कार्बन पदचिन्ह) – एखादी व्यक्ती, संस्था, घटना किंवा वस्तू यांमुळे उत्सर्जित होणार्‍या हरितवायूचे कार्बन डायऑक्साईड समतुल्य प्रमाण. जागतिक सरासरी तापमानवाढ आणि कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन याचा थेट संबंध आहे. गेल्या १५० वर्षात सरासरी तापमान ०.८ अंश सेल्सिअसने वाढले होते ते आता दर दशकास ०.२ अंश सेल्सिअस या दराने वाढत आहे. ही वाढ नियंत्रित करण्यासाठी कार्बन उत्सर्जन कमी करणे हाच उपाय आहे. 
८) www.ehtrust.org

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.