इतिहासाला राजसत्तेच्या परिघातून बाहेर काढता येईल का?

 • इतिहासाचे पुनर्लेखन निसर्ग संवर्धंनासाठी आणि लोकराज्य आणण्यासाठी आवश्यक

सध्या आपल्या देशात आपल्या इतिहासलेखनाच्या इतिहासाचा समाचार घेणे सुरू आहे. राजभक्तांची आणि राष्ट्रभक्तांचीसुद्धा अशी मागणी अनेक वर्षांपासून होती, त्यावर कामही सुरू होते. विशिष्ट समुदायांमध्ये लोकप्रिय असलेल्या दूरचित्रवाणीवरच्या मालिकांमधून निवडक राजघराण्यांच्या इतिहासाला बदलून कशी वळणे दिली पाहिजेत, कसे उदात्तीकरण केले पाहिजे ह्याचे ‘प्रयोग’ करण्याचाही एक प्रघात झाला आहे. ह्या प्रयत्नांना ‘राजाश्रय’सुद्धा मिळाला आहे आणि त्यातून एक नवा उन्माद निर्माण होतो आहे असेही जाणवत होते; पण आता ही प्रक्रिया अधिकृत असल्याचे स्पष्ट संकेत नुकतेच देशाच्या गृहमंत्र्यांनी दिले. सध्या पाठ्यक्रमात सम्मिलित केलेला इतिहास खोडकर पद्धतीने जाणूनबुजून दिशाभूल करणारा आणि देशाला अपाय होईल अश्या उद्दिष्टांनी लिहिला होता असा त्यावर आक्षेप आहे. हा आक्षेप बर्‍याच प्रमाणात खराही असला तरीही ज्याप्रकारे त्यात बदल सुचविले जात आहेत त्यामुळे इतिहासाच्या पाठ्यक्रमाला वेगळ्याच दिशेने नेऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न होईल असे सध्या वातावरण आहे.

राजस्थानच्या महाराणांच्या परंपरेसंदर्भात लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी उपस्थित राहून गृहमंत्री त्याप्रसंगी साधारणतः असे म्हणाले होते की अनेक योद्धे, राजेमहाराजे देशाची प्रतिष्ठा आणि गौरव राखण्यासाठी आणि भारतभूमीच्या संरक्षणासाठी बाहेर देशांमधून आलेल्या आक्रमकांविरुद्ध लढले. पंड्या, चोला, अहोम, सातवाहन, मौर्य, गुप्त इत्यादी हिंदू राजघराण्यांनी शतकानुशतके मोठमोठ्या प्रदेशांवर राज्य केले. त्यांचा इतिहास लिहून भारतीयांचे मनोबल वाढवण्याऐवजी इतिहासकारांनी मोगलांचा इतिहास लिहून देशातील लोकांचे खच्चीकरण करण्याचाच प्रयत्न केला; परंतु त्याबद्दल तक्रार करत बसण्यापेक्षा इतिहास नव्याने लिहूनकाढणेच अधिक श्रेयस्कर.

गृहमंत्र्यांनी केलेल्या विधानांमध्ये थोडेफार तथ्य आहे, पण त्यावर त्यांनी सुचवलेला उपाय म्हणजे पूर्वी ज्याप्रकारे बखरी लिहिल्या जात होत्या त्या पठडीत इतिहासाचे पुनर्लेखन करावे असा त्यांचा संदेश किंवा आदेश असावा असे वाटते. हे वाटण्याचे कारण की इंग्रजांनी इतिहासाचा हेतुपुरस्सर विपर्यास केल्यामुळे आजही अतोनात नुकसान भोगावे लागत आहे. इतिहासाच्या त्या सदोष इंग्रजी मांडणीचा त्यांनी साधा उल्लेखही आपल्या भाषणात केला नाही. 

गृहमंत्र्यांनी उल्लेख टाळला असला तरी आपल्याला इंग्रजी मांडणीचा आढावा घेणे अत्यावश्यक आहे, कारण ह्याचा वाईट परिणाम आपल्या देशावर रोज होतो आहे. केवळ इतिहासाची नव्हे तर सगळ्याच शिक्षणाची एक पद्धत इंग्रजांनी घालून दिली, आणि इतिहासाची खोटी मांडणी करून आणि परिस्थितीचे मुद्दामच विकृतीकरण करून इंग्रजांनी आपल्या देशासाठी राज्यकर्त्यांच्या सोयीच्या पण लोकांसाठी जाचक आणि अन्यायकारक व्यवस्था निर्माण केल्या. ह्या व्यवस्था स्थापित राज्यकर्त्यांचे हितसंबंध सांभाळण्याकरिता आजतागायत कायम ठेवलेल्या आहेत. 

ह्यातील काही प्रमुख बाबींचा उल्लेख खाली दिलेल्या यादीत केला आहे…

१) इंग्रजांनी आर्यांच्या आक्रमणाची एक खोटीच कहाणी मोठ्या लबाडीने एका सिद्धांतासारखी त्यांच्या नेहमीच्याच शैलीत छद्मी विद्वानांमार्फत मांडली. ह्यात त्यांची दोन उद्दिष्टे होती. पहिली ही, की पूर्वीच्या काळी आर्यांना उत्तरेकडून येऊन भारत देशातील संस्कृतीत बदल घडवावा लागला, तशीच जबाबदारी निभावण्यासाठी इंग्रज पुन्हा एकदा उत्तरेकडून भारतात आले आहेत, आणि ह्यात गैर असे काहीच नाही असे ठसविणे. दुसरे कारस्थान असे, की ह्यातून दक्षिणेकडील तामिळ आधारित भाषासमूह वापरणारे द्रविड आणि उत्तरेकडील संस्कृत आधारित प्रोटो-इंडो-युरोपियन भाषासमूहाचा उपयोग करणारे आर्य असा भाषिक आणि वांशिक भेद निर्माण केला. ह्यामुळे निर्माण झालेला तणाव कमी करण्याचा आजही पुरेसा प्रयत्न केला जात नाही. 

२) इंग्रजांच्या काळात भाषेच्या आणि धर्माच्या आधारावर देशाचे तुकडे केले, फाळण्या केल्या. परंतु हा इतिहास लक्षात न घेता आजही राष्ट्रभाषेसोबत दक्षिण भारतातील भाषांना योग्य तो दर्जा देण्याऐवजी हिन्दीचे कृत्रिम वर्चस्व लादून अनेकांना इंग्रजी भाषेकडे ढकलण्याची वाटचाल सुरू आहे. राजकीय पक्षांसाठी सोयीचे असल्यामुळे देशावर होणार्‍या दुष्परिणामांचा विचार न करता असे वाद मुद्दामच उकळत ठेवलेले असतात.

३) इंग्रजांना स्पष्टपणे माहीत होते की ते भारत देशाची लूट करीत आहेत आणि त्यावर संपूर्ण जगाची, मुख्यतः युरोपियन स्पर्धकांची, नजर आहे. त्यामुळे ह्या लुटीवर वैधतेचे आवरण चढविण्यासाठी व्यवस्थापनाचे गोंडस नाव देऊन सगळ्याच संसाधनांच्या पद्धतशीर लुटीला कायद्यांमार्फत कृत्रिम मान्यता निर्माण केली आणि स्थानिक लोकांचे परंपरागत आणि नैसर्गिक हक्क संपुष्टात आणले. तीच व्यवस्था आणि तशीच लूट त्याच अप्रामाणिक ‘कायदेशीर’ वैधतेच्या विरविरीत (fig leaf) आवरणाखाली आजतागायत सुरू आहे.

४) इंग्रज येण्यापूर्वी वेगवेगळ्या जातींचे लोक परंपरागत पद्धतीने, आपापल्या कौशल्यांचा, वेगवेगळ्या नैसर्गिक संसाधनांचा उपयोग करून पिढ्यानुपिढ्या आपला चरितार्थ चालवत असत. ही बारा-बलुतेदारपद्धत खेड्यांना स्वयंपूर्ण करण्यासाठी फार उपयोगाची आणि महत्त्वाची होती. इंग्रजांनी ही पद्धत संपवली आणि सगळ्या नैसर्गिक संपत्तीच्या शोषणासाठी वेगवेगळी ‘खाती’ निर्माण केली आणि कंत्राटीपद्धत सुरू केली जी आजतागायत सुरू आहे.

५) परिसरात आढळणार्‍या संसाधनांचा (commons) उपयोग करून स्वयंपूर्ण जीवनशैलीची पद्धत संपवून लोकांना दरिद्री करूनही इंग्रजांचे समाधान झाले नाही. व्यवसायाधारित जातिव्यवस्थेचे एका उतरंडीत वर्गीकरणकरून आणि काही चुकीच्या रूढींनुसार आधीपासूनच समाजात असलेल्या अन्यायांना खतपाणी मिळेल अश्याप्रकारे सामाजिक वातावरण निर्माणकरून समाजाची अनेक शकले करण्याचा कार्यक्रम त्यांनी राबविला. आजच्याही पक्षीय राजकरणाचा मूळ आधार लोकांमधील फूट हाच असल्यामुळे, इंग्रजांनी घालून दिलेल्या ‘divide and rule’ ह्या ‘तत्त्वप्रणाली’नुसार जातीपातींवर आधारित घाणेरड्या सत्ताकारणाला सगळेच राजकीय पक्ष उत्साहाने प्रोत्साहन देतात. 

६) १८५७चे स्वातंत्र्ययुद्ध संपल्यानंतर लगेचच, १८६०मध्ये इंग्रजांनी पोलिस खाते निर्माण केले. हे खाते इंग्रजांच्या काळापासून आजपर्यंत सत्ताधारी वर्गासाठी खाजगी सेनेचे (private militia) आणि नागरिकांवर अंकुश ठेवण्याचे अशी दुहेरी कामे बजावते आहे, आणि त्याच्या स्वरूपात मुद्दामच काहीही लोकाभिमुख बदल केले गेलेले नाहीत.

७) परंपरागत रीतीने राज्य करणार्‍या राजेमहाराजांना संपविल्यानंतर इंग्रजांनी ‘राज्यकर्ते’ आणि ‘रयत’ किंवा ‘प्रजा’ असे द्वंद्व अबाधित ठेवण्यासाठी काही पावले उचलली. सत्ताधारी वर्गाला (राजकारणी, अधिकारी, न्यायाधीश ह्यांना) बेलगाम अधिकार, प्रसंगी त्यांच्या लोकविरोधी अक्षम्य अन्यायांवरही पांघरूण घालण्याची ‘कायदेशीर’ व्यवस्था, समाजातील इतर घटकांवर दडपण आणणारी प्राथमिकता आणि संरक्षणव्यवस्था देऊन त्यांचा एक अतिविशिष्ट (VIP) वर्ग आणि बाकी सगळे दुय्यम दर्जाचे नागरिक अशी श्रेणीबद्ध विभागणी केली. हाच सत्ताधारी वर्ग म्हणजे ‘लोकशाहीचे स्तंभ’ आहेत असे आता निर्लज्जपणे मांडले जाते. लोकशाहीच्या इमारतीचे हे ‘स्तंभ’ (ज्यात प्रसार माध्यमे आणि पोलिस आवश्यकतेनुसार सामील असतात) मुख्यतः डोक्यावर बसलेल्या निवडक धनदांडग्यांना आधार देण्यासाठी असतात आणि बहुधा त्यांच्या संपूर्ण ताब्यात असतात. ह्या लोकद्रोही व्यवस्थेला पोसण्याचा भार ऐतिहासिक काळापासून सगळ्याच समाजांत कायम असलेल्या ‘रीतीप्रमाणे’ जोत्यात चिणलेल्या मध्यमवर्गीय आणि पायव्यात तुडविलेल्या पददलित गुलाम प्रजेने वाहायचा आणि सोसायचा असतो. 

लोकशाहीचा मंत्र जपत स्वतःची घरे भरणे आणि लोकांवर अधिकार गाजविणे ही सत्तापिपासू लोकांची अंतःप्रेरणा आणि स्वप्न असते; त्यामुळे वर वर्णन केलेल्या इंग्रजी परंपरा बिनबोभाटपणे टिकवणे गृहमंत्र्यांच्या पक्षासकट सगळ्याच राज्यकर्त्यांना फार आवश्यक असते. त्यावर इतिहासाच्या खर्‍या शिक्षणातून प्रश्नचिह्न उभे करणे राज्यकर्त्या जमातीला परवडणारे नाही.

ह्या लोकद्रोही व्यवस्था लुटारू इंग्रजांनी निर्माण केल्या, मोगलांनी नव्हे. मुस्लिम आक्रमकांचाच विचार केला आणि इतिहास तपासून पाहिला तर असे लक्षात येते की मोगलांबरोबर आलेल्या मुस्लिमांपेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात त्यांना भारतात आणण्याचे श्रेय हिंदू राजेमहाराजांना जाते. हे राजे आपल्याच प्रजेला लुटून आपला खजिना भरीत. दुसर्‍या देशात जाण्याचे सोडा, दुसर्‍या प्रांतात देखील जाण्याची त्यांची कुवत आणि हिम्मत नव्हती. ह्या परिस्थितीत राजांच्या बाजूने उभे राहून आपल्याच बांधवांना, आयाबहिणींना लुटण्यासाठी मदत करेल अशी नीच पातळी इथल्या रयतेने कधीच गाठली नाही. शिवाजी महाराजांचे उदाहरण इथे अगदी वेगळे आणि अपवादात्मक समजायला हरकत नाही. बहुतकरून लुटालुटीची नीच कामे करण्यासाठी ह्या प्रकारचे व्यावसायिक काम करणार्‍यांची आवश्यकता असे. हे भाडोत्री लुटारूंचे ‘सैन्य’ मुख्यत्वेकरून अरबी, अफगाणी, पठाणी, तुर्की आणि कधीकधी युरोपियन यांचे असे. शहरांपासून दूर छावण्यांमध्ये ह्यांची व्यवस्था असे आणि दसर्‍याला बळी दिला की ह्यांच्या स्वार्‍या लुटालुटीसाठी निघत. थोडक्यात असे, की ह्या सगळ्यासाठी हिंदू राजांना सोडून केवळ मोगलांना कसे जबाबदार धरता येईल?

इतिहास कशा प्रकारे लिहिला आणि कसा पाठ्यक्रमात समाविष्ट केला ह्याचा अनुकूल किंवा प्रतिकूल परिणाम समाजमनावर होत असतो हे गृहमंत्र्यांनीच मांडले आहे. आपल्या मांडणीत गृहमंत्र्यांनी जरी आवर्जून मोगलांची आठवण काढली असली तरी हेही लक्षात घेतले पाहिजे की ते ज्यांना विसरले त्या इंग्रजांच्या काळात इतिहासासकट सगळ्या विषयांच्या पाठ्यक्रमिक शिक्षणाची सुरुवात झाली आणि तीच इंग्रजी ‘परंपरा’ आजही सुरू आहे. साचेबद्ध शिक्षणातल्या इतिहासासकट सगळ्याच विषयांच्या अभ्यासाचा विद्यार्थ्यांवर आणि पर्यायाने समाजावर दूरगामी परिणाम होत असतो. विज्ञान आणि तंत्रज्ञान ह्यांचा अभ्यास विद्यार्थ्याला विषयांचे पृथक्करण करून अधिकाधिक खोल पण विशिष्ट आणि मर्यादित चाकोरीत एकांडा विचार करायला शिकवतो. शिवाय शहरी-औद्योगिक जागतिक संस्कृतीच्या प्रभावामुळे हे विषय बहुधा इंग्रजीतूनच शिकवले जातात. ह्याच प्रभावामुळे भाषा, संस्कृती, सामाजिक मूल्ये ह्यासारख्या विषयांना विज्ञान आणि तंत्रज्ञान किंवा वाणिज्य ह्यासारख्या ‘व्यावसायिक’ विषयांपुढे इतके गौण स्थान असते की मुले आपल्या मातृभाषेकडेसुद्धा दुर्लक्ष करतात आणि गेल्या काही पिढ्यांच्या संतत प्रयत्नांमुळे सध्या मातृभाषा नीट न येणार्‍या युवकांची एक पिढीच निर्माण झाली आहे. ज्या भाषेतून शिक्षण दिले जाते, आणि जी भाषा त्यातल्या त्यात नीट येते, त्या भाषेच्या स्वरूपामुळे विचारांची सुद्धा प्रवृत्ती बदलते. एकही भाषा नीट येत नसेल तर विचार करण्यावरच मर्यादा येतात. अशी मर्यादा असणे किंवा मूळ प्रवृत्ती इंग्रजी भाषेच्या प्रभावामुळे बदललेली असणे ही आज असंख्य लोकांची स्थिती आहे. 

सध्याच्या शिक्षणाचे मुख्य (आणि एकमेव) उद्दिष्ट स्वतंत्र विचार करण्याची कुवत वाढू न देता, अर्जुनाच्या एकाग्रतेने ‘नोकरी’ ह्या लक्ष्यावर आयुष्याची उद्दिष्टे केन्द्रित करणे असा आहे. ह्या शिक्षणपद्धतीतून यंत्रमानवी (robotic) पद्धतीने स्वतःहून जन्मभर काम करणारे गुलाम सैन्य तयार होते, जे सगळ्या व्यवस्थेच्या शिरोस्थानी असलेल्या मालक वर्गासाठी आवश्यक असते. 

अश्याप्रकारे केवळ उपजीविकेवर लक्ष्य केन्द्रित करून ‘पॅकेज-निष्ठ’ जीवनक्रम लहानपणीच निश्चित केल्यावर, ‘जीविका’ (म्हणजे मानवजन्म मिळाल्यामुळे गाठू शकत असलेली उपजीविकेच्या पलीकडली उद्दिष्टे ज्यात व्यष्टि, समष्टि, सृष्टि, परमेष्टि ह्यांचा सर्वसमावेशक विचार अपेक्षित असतो) ह्या भारतदेशात अधिष्ठान असलेल्या पण सध्या संपुष्टात येऊ घातलेल्या संकल्पनांशी जन्मभर दूरान्वयानेही संबंध येत नाही. त्याउलट विषयाचे पृथक्करण करून त्याच्या एका छोट्या भागाचा झापडे लावल्यासारखा मर्यादित विचार करण्याचा ‘संस्कार’ होतो. निसर्गापासून आणि समाजापासून दूर नेण्यासाठी अशा शिक्षणाचा ‘उपयोग’ होतो आणि आपसूकच ह्या संवेदनाच नष्ट होतात की विज्ञानाचा वापर मुख्यतः निसर्गाचा विनाश करण्यासाठी आणि खालच्या स्तरातील लोकांवर अन्याय करण्यासाठी केला जातो आहे. तात्पर्य असे, की सध्याच्या औपचारिक शिक्षणातील विषय आणि शिक्षणपद्धतीचा व्यक्तींवर, समाजावर आणि निसर्गावर दूरगामी अपायकारक परिणाम होतो आहे. 

सामाजिक आणि राजकीय वातावरण आणि स्थित्यंतरे ह्यांच्याशी इतिहासाच्या शिक्षणाचा जवळचा संबंध असतो. हे शिक्षण कौटुंबिक आणि सामाजिक संस्कारांच्या स्वरूपात अगदी लहान वयात सुरू होते. एक राजा होता,.. त्याला दोन राण्या होत्या,..- एक आवडती तर दुसरी नावडती -… असे संस्कार नातवांवर शाळेत जाण्याच्या वया आधीच होत असतात. हे ‘संस्कार’ बिंबवल्यामुळे काही नुकसान होते हे ह्या गोष्टी सांगणार्‍यांच्या ध्यानी-मनीही नसते. अशाच प्रकारे देवधर्माचेही बाळकडू देणे सुरू होते आणि त्यातूनही संपूर्ण जीवनात पुरून उरेल अशा दृष्टिकोणाची आणि एकांगी ताठरपणाची पार्श्वभूमी निर्माण होते. देवधर्माच्या संस्कारात भक्तिभाव ही एक सकारात्मक भावना आहे असे मनात रुजावे ह्यावर भर असतो. भक्तिभावाच्या आवश्यकतेचे बारकाईने विश्लेषण केले तर सहज लक्षात येते की लोकांना बालवयापासून उच्च-नीच, मालक-गुलाम अश्या श्रेणीबद्धतेची (hierarchy) सवय लावली जाते. पिढ्यानुपिढ्या गुलामगिरीच्या मानसिकतेत ठेवण्याकरिता बुद्धी भ्रष्ट (ब्रेनवॉशिंग / कंडिशनिंग) करण्यासाठी घराघरातून ही ‘महत्त्वाची’ कामगिरी बजावली जाते. भक्तिमार्गाला लागण्याचा परिणाम, स्वतःची बुद्धी गहाण ठेवण्यात, प्रश्न विचारण्याची कुवत संपण्यात आणि व्यक्ती पूर्णपणे परिस्थितीशरण होण्यात होतो.

घरातून मिळालेल्या ह्या बाळकडूचे पुढे आपोआपच सामाजिक स्तरावर रूपांतरण आणि प्रसारण होते. इतिहासाच्या पाठ्यक्रमाप्रमाणेच कथा-कादंबर्‍यांत आणि सिनेमांत, राजा-राणी, जमीनदार, ठाकुर, बाहुबली, उद्योगपती घराणे आणि आता माफिया डॉन, ड्रग लॉर्ड, ह्या पात्रांशिवाय कथानक निर्माणच होऊ शकत नाही अशी सर्वसामान्य धारणा असते. भक्तिपंथी गुलामीच्या मानसिकतेमुळे नायक-खलनायक, ह्यांच्याभोवतीच कथानक फिरत असते. चित्रपटात खलनायकाने पूर्णवेळ धुमाकूळ घातल्यावर शेवटी कुणीतरी एकटा नायक येऊन त्यावर कुरघोडी करणार आणि तोपर्यंत ‘सामान्य’ लोक हताश बघ्यांची भूमिका घेऊन अन्याय सहन करणार असे पुनःपुन्हा पाहण्यात लोकांना काहीच चुकीचे वाटत नाही. त्याचबरोबर स्थापितांच्या व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी सामाजिक पायंड्यांच्या आणि कौटुंबिक अंतःप्रेरणेच्या पूर्णतः विरोधात जाऊन Mother India आपल्या अन्यायाविरुद्ध एकाकी लढणार्‍या मुलाला किंवा एखादा पोलिस भाऊ स्वतःच्या परिस्थितीमुळे चोर झालेल्या भावाला कसे गोळी घालून ठार करतात हे मनावर ठसवण्याचा प्रभावी प्रयत्न केला जातो. तसेच बखर लिहिल्यासारखेच आसिफ ‘मुग़ल-ए-आज़म’, फाळके ‘राजा हरिश्चंद्र’ निर्माण करणार हे ही ओघाने आलेच. 

ह्याप्रकारे सामाजिक आणि सांस्कृतिक स्तरावरील विचारधारा आणि कल्पनाशक्ती मुख्यत्वेकरून श्रेणीबद्धतेचीच उजळणी करताना आढळतात. ह्या परिस्थितीत इतिहासाच्या शिक्षणाचा गैरवापर राजकारण्यांचे अकारण आणि अवास्तव महत्त्व वाढवण्यासाठी केला गेला नाही तरच आश्चर्य. ह्याची परिणती शेवटी रोजच्या जीवनात राजकारणाच्या भोवती बातम्या फिरण्यात आणि सगळ्यांनी मिळून हिरीरीने वातावरण तापविण्यात होते.

परंतु राजघराण्यांच्या कंटाळवाण्या जन्मकुंडल्यांमध्ये न अडकता त्यांच्या ऐतिहासिक ‘कामगिरीचा’ थोडक्यात आढावा घेतला तर हे दिसते की बहुतांश राजे-रजवड्यांनी मुख्यतः काय केले?… तर प्रजेवर अन्याय केला. ते परकीयांच्या आक्रमणाला थोपवू शकले नाहीत, कारण त्यांनी सगळ्यांनी मिळून देशाचा कधी विचारच केला नाही. त्यांनी आपसात युद्धे आणि ठकबाजी केली, स्वतःच्या भावंडांचे खून पाडले आणि अनेकवेळा देशाला विकले. इंग्रजांविरुद्ध लोकांनी छेडलेल्या स्वातंत्र्ययुद्धांत हे लोकांसोबत उभे राहिले असते तर वेगळा इतिहास लिहिला गेला असता, पण स्वतःची गादी टिकविण्याकरिता त्यावेळी त्यांनी देशाशी गद्दारीचाच स्पष्ट पुरावा दिला. स्वतःच्या अहंकाराला आणि शौकांना शमविण्याकरिता केलेल्या कामांच्या पलीकडे लोकांच्या फायद्याचे कुठलेही उद्योग, तंत्रज्ञान विकसित करण्यात, लोकांचे कल्याण करण्यात त्यांचे योगदान अभावानेच आढळते. हाच राजे-राजवड्यांचा थोडक्यात इतिहास आहे आणि तो थोडक्यातच संपवणे अधिक योग्य.

असंख्य सामान्य लोकांनी मात्र राजे-राजवड्यांच्या चुका आणि त्यांचे अत्याचार ह्यावर मात करून देशाला टिकवून ठेवले आणि त्यामुळेच देश अखंड राहिला आणि देशाची प्रगती झाली. अगदी GDP चा निकष लावला तर कधीकाळी संपूर्ण जगाच्या २५ टक्के GDP भारताचा होता असे इतिहासाच्या अभ्यासाने दिसते, जो केवळ राज्यकर्त्यांच्या मूर्खपणामुळे आणि नाकर्तेपणामुळे आज २ टक्क्यांपेक्षा कमी झाला आहे. भारतात सुख-शांती असती आणि प्रगती करण्याची मोकळीक मिळाली असती तर लोकांनी देशाला बरेच पुढे नेले असते; पण असे इतिहासात अपवादानेच घडले. आजही राज’नैतिक’ कुव्यवस्थेवर मात करीत आणि सरकारी अडथळयांना पार करून स्वतःचे घरदार कसेबसे चालविणे आणि जसे शक्य होईल तसे पुढे जाणे ह्याशिवाय लोकांना पर्याय नाही. 

अशी वस्तुस्थिती असतानाही राजघराण्यांनी एकमेकांवर कधी आणि कशी कुरघोडी केली, कश्या देशाच्या वाटण्या केल्या, कशी फितुरी केली, हे इतिहासाचे शिक्षण देऊन समाजाला काय मिळणार? राजघराण्यांच्या कंटाळवाण्या जन्मकुंडल्या पाठ केल्यामुळे काय साध्य होणार? पण हे शिकल्यावर लोकांचे शोषण करणार्‍या राज’नैतिक’ कुव्यवस्थेला पर्याय नाही, अशा निर्णयाप्रत मात्र विद्यार्थी पोहोचतो. एकदा मनावर असे ठसले, की कधी महाराणा प्रताप, कधी शिवाजी महाराज अशा प्रतापी लोकांची नावे घेऊन त्यांचेच उत्तराधिकारी असल्याचा आव आणणे आणि परंपरा मात्र लुटारूंचीच चालविणे असा डाव वर्षानुवर्षे चालविण्यासाठी इतिहासाच्या विकृत आणि विपर्यस्त स्वरूपाचा वापर केला जातो.

पण असे असले तरीही इतिहासाचे शिक्षण ह्यापेक्षा काय वेगळे असू शकते आणि पाठ्यक्रमात बदल करताना काय उद्दिष्टे ठेवावी?…; ह्या प्रश्नांचे उत्तर आपल्याला शोधावे लागेल,… आणि ह्याबाबतची धोरणे आणि उद्दिष्टे (नीयत) चांगली असतील तर ते काही फार कठीण जाणार नाही. 

भारतात आजही तीन संस्कृती सोबत नांदतात. १) आदिवासी संस्कृती (संस्कृतशी संबंध नसलेली), २) कृषिप्रधान संस्कृती (जिच्याशी बहुतांश लोक आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या आजही जुळले आहेत) आणि ३) नव्याने निर्माण झालेली शहरी-उद्योगप्रधान (urban-industrial) संस्कृती. अशा तीन संस्कृती असणे हे भारताचे फार महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे, ज्याकडे इतिहासाच्या शिक्षणात जाणूनबूजून दुर्लक्ष केले जाते. 

ह्याचे महत्त्व समजून घ्यायचे असेल तर इतर खंडांमध्ये आणि देशांमध्ये काय परिस्थिती आहे त्यावर एक नजर टाकावी लागेल. ख्रिस्ती धर्म आणि “व्हाइट मॅन’स् बर्डन” (ईश्वराने गोर्‍या वंशावर इतरांना सुसंस्कृत करण्यासाठी टाकलेला भार आणि त्याकरिता दिलेली अत्याचार करण्याची मुभा) ह्या भयानक संयोगाने एकानंतर एक मोठमोठ्या खंडांमध्ये नरसंहार आणि सृष्टिसंहार झाला. मानवी इतिहासात इतके निर्घृण वागणुकीचे काळे पर्व आढळत नाही, पण ‘जिंकणारेच इतिहास लिहितात’ ह्या दंडकाप्रमाणे इतिहासाच्या पुस्तकांमध्ये आणि विशेषतः पाठ्यक्रमांमध्ये ह्याचा उल्लेख टाळलेला असतो. ह्या नरसंहारांनंतर गोर्‍यांनी हडपलेल्या खंडांमध्ये नावालाच आदिवासी लोक उरले आणि त्यांची संस्कृती तर पूर्णपणे लयाला गेली. कृषिसंस्कृती निर्माण होण्याचीही इथे काहीच शक्यता नव्हती. ह्या खंडप्राय देशांमध्ये केवळ एकाच ‘जागतिक’ छापाची शहरी-उद्योगप्रधान (urban-industrial) संस्कृती आहे. भारतात शतकानुशतके आदिवासी आणि कृषिसंस्कृती सोबत राहू शकली, पण भारतातल्या शहरी-उद्योगप्रधान ‘संस्कृतीला’ मात्र हे मानवत नाही, ही सुद्धा ऐतिहासिक वस्तुस्थिती पुढे येते आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया येथे केले तसे आदिवासींचे समूळ उच्चाटन करणे किंवा त्यांची संस्कृती पूर्णतः पुसून काढणे इंग्रजांना भारतात शक्य झाले नाही. ते काम त्यांनी स्थानिक राज्यकर्त्यांसाठी शिल्लक ठेवले आहे अशा प्रकारे जणू सध्याची व्यवस्था वागते आहे. इतर संस्कृतींच्यासारखे पूर्णतः शहरी-उद्योगप्रधान होण्याच्या नादात (म्हणजेच सगळ्या जमिनी आणि नैसर्गिक संपत्ती बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या घशात घालून पूर्णतः गुलाम होण्याच्या चढाओढीत) शेतकर्‍यांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहणार नाही आणि आदिवासींना नक्षल्यांचे लेबल लावून त्यांचे समूळ उच्चाटन करून किंवा दोन्ही वर्गांचे पूर्ण विस्थापन करून झाल्याशिवाय दम घेणार नाही अशी धोरणे राबविणे हे सध्या होताना दिसते. ऐतिहासिक परिप्रेक्ष्यात (perspective) हे मांडले तर नव्याने उदय झालेली शहरी-औद्योगिक व्यवस्था एकप्रकारे परंपरागत राजवंशिक आणि वसाहतवादी पराभक्षीपणा (predator) ह्या दोघांचेही घातक मिश्रण बनून पुढे आली आहे असे लक्षात येते.

औद्योगिकीकरण आणि शहरीकरण ह्यापेक्षा वेगळा काही विकास म्हणून असू शकतो ह्याबद्दल सरकारे आणि त्यांचे समर्थक ह्यांमध्ये कल्पकताच नाही. तसेच, पक्षाला पैसे पुरविणार्‍या उद्योजकांची नजर ज्या संसाधनांवर असते ती बहुधा आदिवासी राहत असलेल्या जंगलांमध्ये शिल्लक आहेत, त्यामुळे त्यांचे हितसंबंध सांभाळणार्‍या राजकीय पक्षांचा नाईलाज आहे. आणि मुख्य म्हणजे आदिवासींच्या जीवनपद्धतीला सुसंगत संकल्पनांनुसारच त्यांचे भले व्हावे अशी भावना दूरान्वयानेही राजकीय पक्ष आणि त्यांच्या घोषित किंवा अघोषित प्रवक्त्यांमध्ये नाही. किंबहुना अशी मांडणी आणि मागणी करणार्‍यांची urban naxal / commy अश्या उपाध्या लावून हेटाळणी करणे ह्यापलीकडे त्यांच्या बुद्धीची आणि कल्पनाशक्तीची मजल जात नाही. 

हे सुद्धा ऐतिहासिक परिप्रेक्ष्यातच लक्षात घेण्याची आवश्यकता आहे की अनियंत्रित शहरीकरण, औद्योगीकीकरण आणि अशाश्वत विकासाची धोरणे राबविल्यामुळे त्या ओघात संपूर्ण मनुष्यजातच नष्ट होण्याची परिस्थिती निर्माण होते आहे. ह्या धोरणांना पर्याय आपल्याला आदिवासी आणि कृषिप्रधान जीवनपद्धतींमध्ये शोधता येईल. हे तर त्रिकालाबाधित सत्य आहे की ह्या दोन संस्कृती आपल्या देशात हजारो वर्षांपासून शाश्वत प्रगती करीत टिकल्या आहेत. असे उदाहरण जगात इतर कुठेही आढळत नाही. पण ह्या लक्षणीय वास्तविकतेचा आपल्याला काहीच अभिमान असल्याचे जाणवत नाही. सैद्धांतिकदृष्ट्या पाहिले तर कदाचित ह्या संस्कृतींचा शाश्वत विकास अजून काही हजार वर्षे सहज टिकू शकला असता असे म्हणायला नक्कीच जागा होती; पण शहरी-उद्योगप्रधान संस्कृतीचे वेडेपण न थोपवू शकल्यामुळे सगळ्यांच्याच अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. 

अशा शाश्वत विकासाच्या प्रतिमानांचा अभ्यासकरून अजूनही आपल्याला बरेच काही शिकता येईल. पण त्यासाठी आदिवासी आणि कृषी, दोन्ही संस्कृतींचा इतिहास आणि त्यांचे विज्ञान, तंत्रज्ञान, भाषा ह्यांचा अभ्यासक्रमामध्ये समावेश करावा लागेल. इंग्रज येण्याआधी आदिवासींनी जंगले राखली, आणि त्यांच्या जीवनपद्धतीसाठी हे आवश्यकच होते. इंग्रजांनी त्यांच्यावर टाच आणल्यामुळे त्यांच्या काही प्रवृत्ती बदलल्या हा ही इतिहास आहे, ज्यामुळे त्यांनीच राखलेल्या जंगलांमधून त्यांना विस्थापित करण्याची सरकारी मोहीम सतत ‘कार्यरत’ असते. आदिवासींचे एक स्वच्छ आणि मोकळे समाजजीवनही होते ज्यात स्त्री-पुरुषांना सारखे हक्क होते; जे शहरी संस्कृतीने स्वीकार केलेल्या समाजाचा संकोच करणार्‍या नियमांपेक्षा (Victorian morality) उच्च दर्जाचे होते. कृषी संस्कृतीचा अभ्यास केला तर राजेमहाराजांनी एक-दोन वर्षांआड लुटालूट केल्यामुळे होणारा अपरिहार्य अस्थिर काळ सोडला, तर बाकी वेळात कोणावरही अवलंबून न राहता लोक भारतातील खेड्याखेड्यांमध्ये संपूर्ण आणि सुंदर जीवन जगू शकत. राजेमहाराजांचे वागणे अन्यायकारक होतेच, पण इंग्रजांनी तर जमीनदारांमार्फत अखंड लूट आणि अन्याय सुरू रहावा हे निश्चित केले आणि चांगले जीवन जगण्याचे सर्वच मार्ग बंद केले; आणि हे आजही थोडेफार स्वरूप बदलून सुरूच आहे.

सारांश असा की
(१) राजेमहाराजांच्या वंशावळींच्या विपर्यस्त वागणुकीवर पांघरूण टाकून अवास्तव उदात्तीकरण करण्यामुळे प्रस्थापितांचा उन्माद वाढायला काही दिवस मदत होईल, पण सोबतच त्यांच्या सरंजामशाहीच्या काळातील जाचाला आणि लुटीलाही मान्यता मिळत राहील.
(२) इंग्रजांनी घालून दिलेल्या व्यवस्थेमधेच चालत राहिलो तर इंग्रजी परंपरेत प्रजेचे प्रस्थापित व्यवस्थेकडून शोषण होत राहणार हेही निश्चित.
(३) ह्या दोन्ही ऐतिहासिक टप्प्यांचा इतिहास त्या टप्प्यांमध्ये देशावर झालेल्या दुष्परिणामांच्या अभ्यासासाठी योग्य मांडणी करून पुढे आणला, तरी पुढल्या दिशादर्शनासाठी, लोकशाहीचे खरे स्वरूप समजून घेऊन बदल घडवून आणण्यासाठी, आणि सोबतच निसर्गाच्या संगोपनासाठीसुद्धा आदिवासी आणि कृषिसंस्कृतींच्या इतिहासाचा तपशीलवार अभ्यासच खरा उपयोगाचा. 

अभिप्राय 8

 • आपल्या लेखात अनेक विचारणीय मुद्दे आहेत. भारतातील इंग्रज इतिहासाचे दुष्परिणाम नीट मांडले आहेत. पण जाती व्यवस्था भारतांत महाभारत काळापासून रुजलेली, तिला त्यांनी केवळ खतपाणी घातले.
  गतवर्षीपर्यंत प्रसिद्ध झालेल्या संशोधनावरून आर्य भारतात आले हे मान्य करायला हरकत नसावी. त्याच बरोबर द्रविड संस्कृती सुद्धा संपन्न होती हे लक्षात ठेवायला हवे.
  इंग्रजांमुळे भारताला एकदेशीयता आली. लोकशाही मूल्ये त्यानी रुजूं दिली. ती राबवताना आपणच तिच्यात भ्रष्टाचार येऊ दिला. कोणत्याच देशात चार पाच वर्षात एक मत देऊन स्वस्थ बसून चालत नाही.

  भक्तिमार्गात इतर कोणत्याही मार्गासारख्याच विकृती येऊ शकतात. गीतेत अनेक दोष असले तरी भक्ती आणि विभक्ती यांची फार सुंदर व्याख्या केली आहे. विश्वासामागे एक अनाकलनीय शक्ती आहे, हे बुद्धाने सुद्धा मान्य केले होते.

  हे मान्य असो वा नसो, “जगापासून, समष्टीपासून स्वतःला विभक्त पाहणे हा व्यभिचार आहे” हा गीतेतील आणि ज्ञानेश्वर यानी अमृतानुभव मधे अधिक विस्तृत मांडलेला विचार सर्वानाच पटण्यासारखा आहे.
  भांडवलशाही आणि सरंजामशाही आर्थिक विषमतेवर आधारीत असल्याने ती वाट धरणाऱ्या समाजात जगापासून फटकून वागणे आणि आपले उखळ पांढरे करणे प्रतिष्ठा पावतात आणि ते समाज अधिकाधिक विषम होत जातात.

 • विचार प्रवर्तक पण एककल्ली असा हा लेख आहे. सर्व दोष इंग्रजांवर टाकून आपली सुटका होऊ शकतनाही. ७५वर्षाच्या स्वातंत्र्योत्तर काळात केलेले प्रयत्न अपुरे होते हे देखील नोंदवणे गरजेचे आहे तरच आपण काळची गरज ओळखून पावले टाकू शकू. चातुर्वर्ण व्यवस्थेचे जोखड आपणकायम राखून आहोत.
  जागतिकिकरणाच्या नव्या स्वरुपाचे परिणाम देखील लक्षात घ्यायाला हवेत.

 • मांडणी आणि लेख आवडला. चर्चेचा एक प्रश्न विचारतो.

  इंग्रजांनी हेतुपुरस्सर इतिहासाची मोडतोड केली असे मी खूपदा वाचले होते. पण ते नेमके कुठल्या पुस्तकात केले असे कुठेच वाचले नाही. ग्रँड डफचे पुस्तक त्यासाठी वाचायला घेतले पण हेतुपुरस्सर काही आढळले नाही.

  असे कुठले पुस्तक (इंग्रजांनी लिहिलेले) मला वाचायला आवडेल. सांगाल का?

  • माझा लेख मुख्यतः आपण ज्या व्यवस्थेत आज राहतो आणि शाळांमध्ये जे शिकतो त्यावर आधारित आहे. अनेक वेगवेगळ्या पुस्तकांचा आणि लेखांचाप्रभावही त्यात आहेच पण इंग्रजांनी लिहिलेल एक पुस्तक सांगणं कठीण आहे. शोधल्यास अनेक संदर्भ सापडू शकतील. उदाहरणार्थ, भारतात इंग्रजांनी हेतुपुरस्सर इतिहासाची का आणि कशी मोडतोड केली ह्याचं एक उदाहरण प्रतीक चक्रबर्ती ह्यांनी Gondwana and the politics of deep past ह्या शोध निबंधात चांगलं मांडलेलं आहे.

   Christianity मुळे झालेल्या निसर्गावरील आणि समजाणवरील अन्यायांबद्दल यूरोपियनांनीच बरेच लिहिलेले आहे, जे इंटरनेट वर उपलब्ध आहे.

 • खूप छान!
  नवीन संदर्भ कळाले.

 • अभ्यासपूर्ण लेख.
  सध्याच्या यंगिस्ताला स्वातंत्र्य आणि स्वतंत्रता लढा जाणून घेण्यात मागील पिढी इतकेही स्वारस्य नाही.
  वर्तमानाने भूतकाळा कडून अनुभवांधारीत काही धडे घेऊन भविष्यकाळासाठी “खर्या” पाऊलखुणा सोडणे यासाठी सामान्यांनी सुद्धा लेखणी हातात घेण्याची सवय लावून घ्यावी.
  – शाम पंधरकर

 • अतिशय सखोल, अभ्यास पूर्ण मांडणी. लेखकाचे अभिनंदन.
  आदिवासी, कृषी आणि उद्योग प्रधान संस्कृतीमध्ये मेळ साधून त्यांचे जतन होणे हेच भावी विकासाचे योग्य प्रारूप ठरू शकते. त्यासाठी राजकीय.. लढाया… सुंदोपसुंदी.. वैयक्तिक शौर्य… यांचा इतिहास शिकवण्यापेक्षा सामाजिक स्थिती आणि( राजे राजवाडे नव्हे तर) सामान्य माणसांमधील परस्पर सौहार्द तथा सहकार्याचा इतिहास शिकविला जाणे गरजेचे आहे असे वाटते.
  अर्थात राजकारणी लोक हे होऊ देणार नाहीत. त्यामुळे त्यांना वटणीवर आणण्यासाठी, निवडणुका जिंकण्यासाठी सातत्याने ही मंडळी जे जुगाड घडवून आणतात ते यशस्वी होऊ देता कामा नये. हे जनतेचे काम आहे. पण जनताच जाणती नसेल तर भव्य आणि दिव्य इतिहास ही उज्ज्वल भविष्याची हमी देऊ शकत नाही.
  असो.

 • लेखाचे शीर्षक वाचून वेगळ्या चर्चेची अपेक्षा होती. ती पूर्ण झाली नाही पण लेखाची मांडणी अभ्यासपूर्ण आहे.

  आपल्या उपखंडाचा इतिहास म्हणजे पूर्णपणे मागास , बुरसटलेल्या आणि अवैज्ञानिक संस्कृतीचा होता असा अपप्रचार इंग्रजांनी जाणीवपूर्वक केला. इंग्रज किंवा इतर युरोपियन कंपन्यांनी आपल्या देशात पाऊल ठेवण्याआधी आपल्या देशात किती प्रगती ( तंत्रज्ञान, विज्ञान, कला, राज्यशास्त्र , समाजशास्त्र सर्वच बाबतीत ) झाली होती ते जाणीवपूर्वक लपवून ठेवले गेले. ( याबद्दल भरपूर माहिती उपलब्ध आहे ). इंग्रज येण्याआधी आपल्या देशात शिक्षण ही किती व्यापक झाले होते याबद्दलही अनेक दाखले उपलब्ध आहेत. इंग्रजांनी हे सत्य दडवून ठेवले यामागील करण तर उघडच आहे. पण १५ ऑगस्ट १९४७ नंतर आजतागायत आपल्या देशातील सत्ताधाऱ्यांनीही तेच सुरु ठेवले आहे , तसे का हे समजून घेणे आवश्यक आहे. “गोऱ्या इंग्रजांची जागा काळ्या इंग्रजांनी घेतली का” याचा विचार करावा.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.