न्यायाची सावली आणि त्यामुळे होणारे अनाठायी रद्दीकरण

भारतीय दर्शने सहा. त्यातील न्याय अर्थात logic याच्या अंतर्गत येते कारणमीमांसा. या न्यायाचा न्यायालयातील न्याय-अन्यायाशी रूढ अर्थाने संबंध वाटत नसला तरी तो आहे. जे ग्राह्य ते न्याय्य. ते मानवतेच्या अनुषंगाने असो वा कायद्याच्या.

वेगवेगळ्या समूहांची मानवतेची व्याख्या कधीकधी वेगळी असू शकते. त्यामुळे कधीकधी कायदेदेखील अमानवी ठरू शकतात.  इतक्यातलंच एक उदाहरण घ्यायचं झालं तर अमेरिकेत गर्भपातावर सर्वोच्च न्यायालयाने आणलेली बंदी.  काहींच्या मते गर्भधारणा झाली की लगेच त्या जीवाला संपूर्ण आयुष्य जगण्याचा हक्क मिळतो. परंतु हे लोक ती गर्भधारणा जबरीने झाली असल्याचे विचारातही घेत नाहीत. त्याचप्रमाणे त्यांच्या कुत्र्या-मांजरांची नसबंदी करताना पुढचा-मागचा विचार करत नाहीत. जाचक कायदे हानिकारकच. ते नवे असोत व जुने. एखादी गोष्ट केवळ कायदा आहे म्हणून ती कोणाच्या मानेवरची तलवार बनायला नको.

न्यायदर्शनात प्रमाणांचे चार प्रकार दिले आहेत: (१) प्रत्यक्ष, (२) अनुमान, (३) उपमान, (४) शब्द.

यातील प्रत्यक्षाला सर्वाधिक महत्त्व आहे. जे इंद्रियगोचर आहे ते प्रत्यक्ष आणि त्यामुळे प्रमाण.

अनुमान (inference) योग्य प्रकारे वापरले नाही तर सुतावरून स्वर्ग गाठणे शक्य आहे.

उपमान (comparison) यामुळे तर आणखीनच तार्किक उड्या शक्य आहेत.

पण न्यायसूत्रांमध्ये या बाबींचा अनेक अंगांनी सखोल विचार केला गेला आणि ते केंव्हा प्रमाणयोग्य आहेत याचा उहापोह झाला. यासाठी प्रयोजन, तर्क, वितंड (destructive criticism), वाद, हेत्वाभास (fallacy) इत्यादिंचा वापर केला गेला. काही लोक अनुमान आणि उपमान हवे तसे वापरत असले (उदाहरणार्थ, शिवलिंगासारखे काही दिसले म्हणजे ते शिवलिंग आहे) तरी बहुतांश लोक त्यांचा वापर योग्य प्रकारे करतात.

चौथे प्रमाणग्राह्य सूत्र मात्र मोठे धर्मसंकट बनले. शब्दाचे दोन प्रकार आहेत: लौकिक आणि वैदिक. यातील लौकिकार्थाबद्दल वेगळं काही सांगायची गरज नाही. पण वेदांमधील शब्दांना (आणि यात स्मृतीदेखील अध्याह्रृत आहेत) थेट प्रमाण मानण्याचा प्रघात पडला. यामुळे त्या शब्दांविरूद्ध ब्र काढणेसुद्धा धर्मबाह्य ठरले. मुख्य म्हणजे त्यानंतर प्राप्त ज्ञानाने (प्रत्यक्ष, अनुमानित किंवा उपमानित) वैदिक शब्दाला खोडून काढणे आजही कर्मकठीण आहे. 

याची सांगड धर्माशी, आणि गाठ अवास्तव, अतार्किक, आणि अनाठायी कट्टरतेशी असल्याने ज्ञानार्जनाऐवजी सामान्यजन अज्ञानाच्या धुम्रास्त्रात स्वत:ला अधिकाधिक अडकवून घेताना दिसतात. सोशलमीडिया फॉर्वर्ड्समुळे हा प्रकार आणखीनच बोकाळतो. याचे इतक्यातलेच एक उदाहरण इथे देतो.

*** मीडियावर प्रसारित होणारी माहिती ***

आज आपण उपनिषदांमध्ये वर्णन केलेल्या सूर्याच्या पृष्ठभागाची माहिती घेऊ.

छांदोग्य उपनिषदांमध्ये (अंदाजे इ. स. पू. ८ वे किंवा ६ वे शतक) सूर्याच्या पृष्ठभागाचे वर्णन करण्यात आले आहे. तृतीय प्रपाठक, खंड पहिला (सूर्याची देवमधु संकल्पना) ह्यात खालीलप्रमाणे श्लोक उपलब्ध आहे. 

🚩 *ॐ असौ वा आदित्यो देवमधु तस्य द्यौरेव
तिरश्चीनवंशो अंतरिक्षपूपो मरिचयः पुत्रा:* 🚩

ह्याचा अर्थ असा की आदित्य भगवान ह्याची भक्ती जरूर करावी कारण आदित्य हा देवांचा मध (देवमधु) आहे. ह्याचा द्यौ लोक आणि आदित्य लोक असा आहे कि जिथे ह्या मधाचे पोळे आहे. अंतराळातील सूर्याची किरणे मध गोळा करण्याचे काम करतात.

त्याच उपनिषदांमध्ये पुढे काही श्लोक दिले आहेत. त्याचा फक्त अर्थ इथे देतो.

🚩 *तस्य ये प्राञ्चो रश्मयस्ता एवास्य प्राच्यो मधुनाड्यः |
ऋच एव मधुकृत ऋग्वेद एव पुष्प ता अमृता आपस्ता वा एता ऋचः ||* 🚩

ह्याच सूर्याचे पूर्व दिशेकडून येणारे किरण मध उत्पन्न करतात. ऋग्वेद हे सुगंधित पुष्प आहे आणि त्यातील ऋचा ह्या मध गोळा करणार्‍या मधमाशा आहेत. ह्या ऋग्वेदरूपी फुलाचे अध्ययन केल्याने आपल्याला यश, तेज, ऐश्वर्य आणि अन्न प्राप्त झाले आहे.

म्हणजेच छांदोग्य उपनिषदांमध्ये सूर्याचा पृष्ठभाग हा मधमाशांच्या पोळ्यासारखा (honeycomb) आहे असे उदाहरण देऊन सांगितले आहे. इथे फक्त आणि फक्त मधमाश्यांच्या पोळ्याचाच उल्लेख केला आहे. इतर कोणतीही उपमा दिलेली नाही. हे प्रत्यक्ष जाण्याशिवाय शक्य नाही. आता आधुनिक विज्ञान ह्याबाबत काय म्हणते ते पाहू.

Danial K. Inouye Solar Telescope ह्या दुर्बिणीद्वारे आधुनिक विज्ञानाने सूर्याच्या पृष्ठभागाचा शोध घेतला आणि त्यावर खालील मुद्दा मांडला आहे:

The surface of the Sun is like honeycomb. The honeycomb like pattern is made up of of cells of plasma that roil over the Sun’s entire surface and draw heat from the center of the Sun

म्हणजेच आधुनिक वैज्ञानिक टेलिस्कोपद्वारा सूर्याचा अभ्यास केल्यावर सूर्याचा पृष्ठभाग हा मधमाशीच्या पोळ्यासारखा आहे असे शास्त्रज्ञांना आढळून आले. मग हाच मुद्दा आजपासून हजारो वर्षे आधी लिहिलेल्या छांदोग्य उपनिषदांमध्ये मांडण्यात आला होता ह्या गोष्टीकडे आपले दुर्लक्ष होते. त्या काळी telescope सारखी अत्याधुनिक साधने नव्हती असे जर मानले तर मग इतका अचूक मुद्दा उपनिषदांमध्ये कसा काय मांडला?

ह्याचा अर्थ काढता येईल की हजारो वर्षांपूर्वी उत्तम प्रतीच्या दुर्बिणी म्हणजेच telescope तयार करण्याचे तंत्रज्ञान भारतीय ऋषींना अवगत होते किंवा योगबळावर, ध्यानात जाऊन त्यांनी सूर्याचा पृष्ठभाग जाणून घेतला असावा. खगोलशास्त्राचा (astronomy ) अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की त्यांनी भारतीय वेदांतील खगोलशास्त्रसुद्धा अभ्यासावे.

भारतीय वेद, उपनिषदे ही ऋषिमुनींचा वेळ जात नव्हता म्हणून काहीतरी बिनबुडाच्या कल्पना करून आणि फक्त देवांची स्तुती करण्यासाठी लिहिलेली नसून वैज्ञानिक सिद्धांत त्यात ठासून भरले आहेत. हेच सांगायचा माझा प्रयत्न आहे.

*** मीडियावर प्रसारित होणारी माहिती इथे संपते ***

WhatsApp Universityच्या वरील धड्यात प्रत्यक्ष, अनुमान, उपमान कुठे आणि कसे वापरले आहे ते तुम्हीच पहा.

मधाच्या पोळ्यांच्या कप्प्यांचा षटकोनी आकार एकमेवाद्वितिय असतो. सूर्यावरील ‘षटकोन’ मात्र बदलत असतात आणि शेकडो किलोमीटर आकाराचे असतात (सूर्याच्या मधमाशांचा आकार काय असेल?) बिनबुडाच्या फॉर्वर्ड्ससाठी इकडचं एखादं वाक्य आणि तिकडचं एखादं वाक्य उचललं आणि हवं तसं जुळवलं की झालं. षटकोनांच्या आकाराशी देणंघेणं नाही, त्या पृष्ठभागाच्या तापमानाबद्दल विचारणा नाही, ते क्षणभंगूर असतात की वर्षानुवर्ष टिकतात यात स्वारस्य नाही. कोणत्यातरी एखाद्या वाक्याशी विज्ञानाच्या मदतीने लागलेल्या शोधाशी मेळ बसला की पूर्वजांच्या ज्ञानाचा उदोउदो करायचा. ते खरेच आपले(च) पूर्वज होते का? त्यांच्या ज्ञानापैकी आपल्याला किती अवगत आहे? आपल्यात असे काय आहे की आपण त्याचा गर्व बाळगण्याच्या योग्यतेचे आहोत? ते करत होते (असे म्हणले जाते) तशी साधना आपण करतो का? असे विचार शिवतदेखील नाहीत. मला तर गर्वाऐवजी लाजच वाटली असती (स्वत:बद्दल – त्यांना ते ज्ञान खरेच असेल तर आपल्याकडे ते सध्या नसल्याने).

केवळ पूर्वजांच्या ज्ञानाचा उदोउदो केला असता आणि आजच्या ज्ञानाला नावे नसती ठेवली तर एक वेळ चालेलही. मात्र अनेकदा लोक त्यापुढे जाऊन पूर्वजांचे ज्ञान आजच्या ज्ञानापेक्षा पुढारलेले होते आणि आपण त्याच दिशेने जायला हवे असे म्हणताना दिसतात. त्याविरुद्ध काही ऐकून घेण्याची त्यांची मुळीच तयारी नसते. अनेकदा प्रगत विज्ञानाची पायमल्ली होते, सामान्यीकरण होते. त्यामुळे अनेक लोक विज्ञानाच्या कसोटीतून तावून सुलाखून निघालेले शोध आणि केवळ व्हाट्सॲपमधून तयार होणारे आणि प्रसारित होणारे शोध यात फारकत करू शकत नाहीत.

न्यायशास्त्राच्या या वैदिक शब्दप्रामाण्याच्या सावलीत बहुतांश लोक वावरत असल्यामुळे प्रत्यक्षप्रामाण्याला प्राधान्य देणाऱ्या सामान्यजनांच्या मार्गात अनन्य विघ्ने येतात. न्यायबद्ध आणि तर्कशुद्ध विचार करून जुने काही खोडून काढणाऱ्यांना सिक्युलर, कम्युनिस्ट यांसारखी वाट्टेल ती अतार्किक विशेषणे वापरून त्यांच्या मतांचे आणि अनुषंगाने त्यांचे रद्दीकरण (cancellation) होते. आपल्या पाल्यांना आणि वंशजांना आपल्याठायी गर्व वाटावा असे वाटत असल्यास भारतीय तत्त्वज्ञानात वर्णिलेल्या आत्मचिंतनाची नितांत गरज आहे.

अभिप्राय 1

  • छानच आणि सुटसुटीत सोप्या शब्दात मांडणी केली आहे. मला आवडला.
    या लेखाच्या सुरुवातीला उल्लेख केलेला”न्याय” आणि “न्यायालयाची न्यायव्यवस्था” यात गल्लत होऊ नये यासाठी काही स्पष्टीकरण उपयुक्त ठरेल.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.