आवाहन

स्नेह

अमेरिकेतील सुप्रीम कोर्टाचा गर्भपातावर बंदी घालण्याचा निर्णय असो की बिल्किस बानो प्रकरणातून गुन्हेगारांना शिक्षेत मिळालेली माफी आणि बाहेर आल्यावर त्यांचे झालेले स्वागत असो, सामाजिक व्यवहारांमध्ये न्याय, अन्याय, नीति यांची संगती समजून घेणे गरजेचे झाले आहे.

नीतिनियम आपल्याला वाईटापासून परावृत्त करतात. तर न्याय किंवा कायदे वाईटासाठी शिक्षा देतात. पण शिक्षा भोगल्यावर माणूस खरोखर अन्तर्मुख होतो का? शिक्षांमुळे गुन्ह्यांच्या संख्येत फरक पडतो का? प्रत्यक्षात खरोखर ‘न्याय’ दिला किंवा केला जाऊ शकतो का? की न्याय म्हणून आकारलेल्या नुकसानभरपाईला किंवा ‘जशास तसे’ अश्या प्रकारच्या शिक्षेलाच न्याय म्हणायचे?

शिक्षेचे स्वरूप हे समाजाच्या त्या त्या काळच्या प्रगल्भतेवर अवलंबून असते. अन्याय हा जसा फक्त नैतिकतेशी जोडू शकत नाही तसेच न्यायही फक्त शिक्षेशी जोडता येणार नाही. शिक्षेने जर माणूस काही शिकतच नसेल तर समाजात शान्तता नांदावी ह्यासाठी अन्याय करण्याची इच्छा माणसाच्या मनांत उद्भवू नये असाच प्रयत्न करावा लागेल.

सद्यःपरिस्थितीत एकीकडे विवेकवादी, बुद्धिप्रामाण्यवादी लोक हा विषय विज्ञानात बसत नाही म्हणून वैयक्तिक किंवा फारतर कौटुंबिक स्वार्थ साधणे एवढ्या मर्यादित निकषावर नीती-अनीतीचा निर्णय करू बघतात तर दुसरीकडे बहुतांश लोकांचा धार्मिकता किंवा विशिष्ट विचारधारेशी संलग्नता म्हणजेच नैतिकता असा समज झालेला / करून दिला गेलेला आहे. उरलेले काही लोक वाहतुकीचे नियम पाळण्याइतपत नैतिकतेला महत्त्व देतात.

Photo by Sigmund on Unsplash

‘आजचा सुधारक’चा आगामी अंक ‘न्याय, अन्याय आणि नीती’ ह्या विषयावर घेतो आहोत. नीतिनियम काळानुरूप बदलावे कीं सार्वकालिक असावे? सार्वकालिक असल्यास त्या नियमांचे स्वरूप कसे असावे? काळानुरूप बदलणारे असल्यास त्या नीतिनियमांचा स्वीकार कसा असावा? मुळात ‘नीतिचे’ म्हणजे योग्य-अयोग्य, चांगलं-वाईट ठरवण्याचे ‘सार्विक’ (universal) निकष असू शकतात का? असतील तर कोणते? आणि का?

या विषयावरील आपले साहित्य लेख, निबंध, कविता, कथा, रेखाचित्रे, व्यंगचित्रे, ऑडिओ, व्हिडीओ अशा कुठल्याही स्वरूपात पाठवू शकता. शब्दमर्यादा नाही. आपले साहित्य २५ सप्टेंबरपर्यंत aajacha.sudharak@gmail.com यावर अथवा +91 9372204641 ह्या क्रमांकावर WhatsApp च्या माध्यमातून पाठवा.

– प्राजक्ता अतुल
समन्वयक, आजचा सुधारक

अभिप्राय 3

  • आपण निवडलेला विषय अत्यंत महत्त्वपूर्ण असा आहे.

  • आजचा सुधारक इतर मासिकांच्या भाऊगर्दीत वेगळे कसें? हे चर्चेला घेतलेल्या विषयावरून तात्काळ सुज्ञाच्या ध्यानी येईल. पण आजच्या एकारलेल्या समाजात व सुमार बौद्धिकक्षमता धारण करणाऱ्या लोकांना समजून सांगण्यासाठी जाणत्यांना अधिक परिश्रम घ्यावे लागतील.

  • न्याय, अन्याय आणि निती, या आजच्या ज्वलंत विषयावर आपल्या सूचनेनुसार लिहायचा प्रयत्न करतोय.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.