काश्मीरचे वर्तमान (भाग ३)

(प्रस्तुत लेखकाचे ‘काश्मीरचे वर्तमान’ ह्या लेखाचे दोन भाग आजचा सुधारक’ने डिसेंबर २०१५ व जानेवारी २०१६ या अंकांमध्ये प्रकाशित केले होते. ६ वर्षांनंतर पुन्हा एकदा काश्मीरला जाऊन आल्यानंतरचे त्यांचे अनुभव त्यांनी पुन्हा एकदा ‘आजचा सुधारक’मध्ये प्रकाशित करण्यासाठी पाठवले आहेत. ते भाग ३ व भाग ४ असे आपण प्रकाशित करतो आहोत. देशाच्या राजकीय पटलावरील बदलाचा काश्मीरच्या सामाजिक स्थितीवर किती आणि कसा प्रभाव पडला आहे याचे इत्थंभूत वर्णन त्यांनी येथे केले आहे.)

काश्मीरला बळाद्वारे कुणीही जिंकू शकत नाही, केवळ पुण्याने आणि प्रेमानेच जिंकू शकता. येथील रहिवासी फक्त परलोकाने भयभीत होतात, शस्त्रधारींमुळे नाही. – पंडित कल्हण
(राजतरंगिणी भारताचा प्रथम लिखित इतिहास, तोही काव्यात्मक शैलीत व संस्कृतमध्ये आहे. ११४८-५० या काळात त्यांनी लिहिलेल्या ग्रंथाचे विजयालक्ष्मी पंडितांचे यजमान श्री. रणजित पंडित यांनी जुलै १९३४ मध्ये इंग्रजी भाषांतर केले असून साहित्य अकादमीने १९६८ साली प्रकाशित केले. १९७७, १९९०, २००२ व माझ्याजवळील २००४ च्या  कॉपीमधून हे कोटेशन मी दिले आहे.)

५ ऑगस्ट २०१९ ला दुसर्‍यांदा निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर, नरेंद्र मोदी सरकारने जम्मू-काश्मीरचे कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय घेतला. १९५० मध्ये स्थापन केलेल्या जनसंघ या राजकीय पक्षाच्या धोरणाचाच हा भाग होता. हाच जनसंघ पक्ष १९८० नंतर भारतीय जनता पार्टी या नावाने ओळखला जातो. जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी ३७० कलम रद्द करण्यात यावे म्हणून १९५३ साली जम्मू येथे सत्याग्रह केला होता. त्यावेळी झालेल्या अटकेत जम्मू जेलमध्ये ह्रदयाच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले.

म्हणून, बीजेपी पूर्ण बहुमताने निवडून आल्यानंतर काश्मीरचे ३७० कलम रद्द करण्याची कारवाई करील हे उघडच होते. त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यातही ३७० कलम रद्द करण्याबद्दल समावेश होता. पण तत्पूर्वी, म्हणजे काश्मीरसंबंधित कराव्या लागणाऱ्या कुठल्याही बदलांआधी, संविधानानुसार तेथील विधानसभेत तसा प्रस्ताव पास करायचा असतो. ५ ऑगस्ट २०१९ च्या आधीच जम्मू आणि काश्मीर राज्यातील विधानसभा बरखास्त करण्यात आलेली होती. त्यामुळे जम्मू आणि काश्मीर व लद्दाख भाग वेगळा करून ते केंद्रशासित प्रदेश करताना, तसेच सर्वाधिक महत्त्वपूर्ण म्हणजे ३७० व ३५ ए ही कलमें रद्द करताना व जम्मू आणि काश्मीरचे भारतात विलीनीकरण करताना ऑक्टोबर १९४७ मध्ये केलेल्या घटनात्मक तरतुदींची पायमल्ली झाली आहे. 

याबद्दल ७० पेक्षा जास्त केसेस सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या आहेत. आणि या बदलाला ऑगस्टमध्ये तीन वर्षे पूर्ण झाली. तरीही आपल्या सर्वोच्च न्यायालयाला अद्याप ३७० विरोधीच्या व ३५ ए बद्दलच्या याचिकांवर विचार करायला वेळ मिळालेला नाही.

काश्मीरमध्ये काय परिस्थिती निर्माण झाली असेल हे पाहण्यासाठी मी स्वत: दोनदा (सप्टेंबर २०१९ व डिसेंबर २०१९)  काश्मीरला जायचा प्रयत्न केला होता. पण दिल्ली विमानतळावरून मला परत पाठवण्यात आले. आदल्याच दिवशी राहुल गांधीलादेखील परत पाठवले असल्याचे मला अडवणारे आई.बी.चे लोक म्हणाले. त्यानंतर कोरोनामुळे दोन वर्षे लॉकडाऊन असल्याने जाता आले नाही. 

पण काश्मीरच्या मित्रांचे सारखे फोन येत होते की काश्मीरच्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेच पाहिजे. म्हणून मग मी स्वतः आणि भागलपूर दंगलीनंतर करत असलेल्या कामातील सहकारी मैत्रीण, शांतिनिकेतनवासी श्रीमती मनीषा बॅनर्जीं १ जून २०२२ रोजी कोलकाता-जम्मूतवी एक्सप्रेसने निघून, जवळपास पन्नास तासांचा अत्यंत कंटाळवाणा प्रवास करून, ३ जून रोजी दुपारी दोन वाजता जम्मू स्टेशनवर पोहोचलो. तेथूनच स्टेशन परिसरातील वाहतूकव्यवस्थेमधून श्रीनगरसाठी एक टाटा सुमो शेअर गाडी मिळाली. तिच्यात ड्रायव्हरशेजारच्या जागेवर पंचवीसेक वर्षे वयाचा एक शीख तरूण आधीच बसलेला होता. ट्रेनमध्ये आमच्याच डब्यातील वरच्या बर्थवर बसलेली कोलकाता येथील पंचवीस-तीस वर्षे वयाची एक तरूणी लद्दाखला पर्वतारोहण कॅंपसाठी चालली होती. मी तिला विचारले, “तुला कुणी स्टेशनवर घ्यायला येणार आहेत का?” तर ती म्हणाली, “नाही. मला श्रीनगर येथील यूथ होस्टेलवर, आमच्या गटात सामील व्हायला जम्मू येथून एकटीनेच जायचे आहे.” तर आम्ही तिला “आमच्यासोबत चल” म्हटले. ड्रायव्हरमागे असलेल्या जागेवर मग मी, मनिषा व ती युवती असे तीन प्रवासी, तर ड्रायव्हरच्या सोबतीला समोरच्या जागेवर एक मदतनीस व तो शीख तरूण, असे सहा जण गाडीत होतो. मागील जागेत बरेच सामान भरून होते. 

जवळपास साडेतीन वाजता आम्ही जम्मू सोडून, श्रीनगर रस्त्यावर येऊन फक्त पाच किलोमीटर अंतरावर पोहोचलो असू, तर तेथे असलेल्या नाकाबंदीमध्ये आमची गाडी अर्धा तास थांबवून ठेवली. शेवटी गाडीखाली उतरून तेथील पोलिसाला कारण विचारले असता तो म्हणाला, “समोरच्या रस्त्यावर दरड कोसळल्यामुळे रस्ता बंद करण्यात आला आहे.” मी म्हणालो, “इतर वाहतूक तर सुरूच आहे.” तर तो म्हणाला, “ते लोक उधमपूर, कटरापर्यंतच प्रवास करत आहेत.” हे ऐकून मी गाडीत येऊन बसलो, तर दुसरा पोलीस माझ्यासोबत बोलणार्‍या पोलिसाशी काहीतरी बोलत असल्याचे पाहिले. त्यांनी आम्हाला पुढे जाण्यासाठी इशारा दिला. पहिल्या तासातच जम्मू आणि काश्मीर राज्यातील पोलीसांची वा सुरक्षारक्षकांची झलक आम्हांला दिसली. कारण तेथून निघून रात्री दहा वाजता श्रीनगर येथे पोहचेपर्यंत कुठेही दरड कोसळून पडलेली आम्हांला दिसली नाही. हा नवा रस्ता बनत असल्याने जागोजागी अडथळे येत होते व त्यामुळे तीन-साडेतीनशे किलोमीटर अंतरावरील प्रवासाला सात ते आठ तास लागले.

या वेळी मुद्दामच जम्मूपर्यंतचा प्रवास रेल्वेने, तर त्यानंतर जम्मूहून शेअर सुमो गाडीने प्रवास केला. यात जाताना तीन दिवस लागले व येतानाही तेवढाच वेळ लागला. असा जवळपास एक आठवडा फक्त प्रवासातच गेला. हातात फक्त चार दिवस शिल्लक होते. तरीही या चार दिवसांपैकी एक दिवस श्रीनगर ,एक दिवस  बांदीपोरा व उर्वरित दोन दिवस बडगाम, नेसबल, वाहकपोरा, हिलाल आबाद आरागम, हुश्रु, खान सराय, चादोरा, चरारेशरिफ इत्यादी ग्रामीण भागांतील काही ठिकाणी भेटी देण्यात गेले.

चादोरा हे बडगाम जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण आहे. तेथील तहसील कार्यालयात भर दिवसा १२ मे रोजी राहुल भट्ट नावाच्या लिपिक असलेल्या काश्मिरी पंडिताचा खून करण्यात आला होता. आमचा मुक्काम असलेल्या बादीपोरा गावाला, श्रीनगरहून जाताना रस्त्यावर आधीच चादोरा लागते. आम्ही रस्त्यावर असलेल्या तहसीलदार कार्यालयात जाऊन आलो. पण कुणीही राहुल भट्ट प्रकरणी बोलायला तयार नव्हते. तेथील लोक स्पष्ट बोलणे टाळत असल्याचे दिसले. फक्त Unidentified Gun एवढे म्हणून ते थांबले. हा वाक्यप्रयोग मी काश्मीरला गेलो की बहुसंख्य खूनांनंतर ऐकत असतो.   १२ मे नंतर एका बॅंकेचा मॅनेजर, जो नुकताच राजस्थानहून बदलून आला होता, त्याचा बॅंकेतच खून करण्यात आला होता. तसेच एका शिक्षिकेला शाळा सुरू असतानाच मारल्याचे वृत्तही अगदी ताजे होते (३० मे). याबद्दल निषेध म्हणून जम्मू व श्रीनगर येथे काश्मीरी पंडितांनी केलेल्या निदर्शनांच्या बातम्या वाचून होतो. 

२००६ मध्येही मेच्या पहिल्या आठवड्यात (पुनुन काश्मीर व मिरवाईज उमर फारुखच्या नेतृत्वाखाली असलेल्या हुर्रियतच्या निमंत्रणावरून) गेलो असताना, श्रीनगर मेडिकल कॉलेजच्या गायनॅकॉलॉजिस्ट डॉ. शमिमा बद्रू यांच्या यजमानांना १९९० मध्ये गोळ्या घालून ठार मारले असल्याचे त्यांनी स्वतः सांगितले. “माझ्या यजमानांना Unidentified Gun ने मारले आहे.” असा शब्दप्रयोग तेव्हा मी प्रथमच ऐकला होतो. आता हा शब्द काश्मीरचा ‘तकियाकलाम ‘ झाला आहे. यातून तुम्ही तुमच्या सोयीचे अर्थ लावू शकता. निश्चित कुणीच बोलत नाही. 

३७० कलम रद्द केल्यानंतर काश्मीरला जायची माझी ही पहिलीच वेळ होती. काश्मीरचे लोक स्पष्ट बोलणे टाळत आहेत असे मला या भेटीत जाणवले. सगळेजण एकमेकांकडे संशयाने बघत आहेत. वातावरणात अत्यंत संदिग्धता निर्माण झाली आहे, जी याआधीच्या कुठल्याही भेटीत दिसली नव्हती. लोकांच्या चेहर्‍यावर असहाय्य भावनांचा भीषण कल्लोळ दिसला. ही परिस्थिती फार चिंताजनक आहे. पूर्वी लोक मनमोकळ्या गप्पा करत असलेलेपण अनुभवले आहे. पण आज त्यांचे बहुसंख्य नेते तुरुंगात आहेत व जे बाहेर आहेत तेदेखील नजरबंदीमध्ये आहेत.

‘काश्मीर टाईम्स’सारख्या सर्वांत जुन्या वर्तमानपत्राला ६ ऑगस्ट २०१९ पासून बंद करून ठेवले असून त्या वर्तमानपत्राची याचिका सुनावणीला घ्यायला सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायधीशांना तीन वर्षे झाली तरी वेळ मिळत नाहीये. आम्ही गेलो तेंव्हा (८ जून २०२२ रोजी) संपादक व प्रबंधकद्वय श्रीमती अनुराधा व प्रबोध जमवाल आपल्या वर्तमानपत्राची याचिकासुनावणी होणार या आशेवर दिल्लीमध्ये तळ ठोकून होते. म्हणून आम्ही त्यांच्या जम्मू व श्रीनगर येथील दोन्ही कार्यालयांची फक्त सीलबंद कुलुपे पाहून आलो.

बीजेपीचा व संघाचा ढोंगीपणा
२५-२६ जून रोजी आणीबाणीला ४७ वर्षे झाली म्हणून सत्ताधारी बीजेपीने अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली गळा काढलेला पाहून अत्यंत किळस आली. ह्या पार्श्वभूमीवर काश्मीरचे वर्तमानचित्र डोळ्यांसमोर दिसत आहे. ५ ऑगस्टनंतर कित्येक दिवस वर्तमानपत्रे, इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती व त्यावेळी बंद करण्यात आलेली कैक वर्तमानपत्रे व पत्रिका बंद करून टाकल्या आहेत. अन् आणीबाणीच्या काळातील सेन्सरशिपच्या नावाने समस्त बीजेपी मारे खडे फोडत होती! ३७० कलम रद्द करण्याला आता तीन वर्षे होत आली आहेत. पण काश्मीरचे लोक, मग ते हिंदू असोत की मुसलमान, भयग्रस्त दिसत आहेत. हे नेमके काय आहे?

पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी विशेष प्रोत्साहन दिलेल्या ‘काश्मीर फाईल्स’ नावाच्या अतिशयोक्त व भडक, विविध प्रकारच्या घटनांची मोडतोड करून बनवलेल्या. हिंदी सिनेमाने उरलीसुरली कसर भरून काढली आहे. कारण काश्मीरचा प्रश्न धार्मिक नसूनही या सिनेमात त्याला धार्मिक रंग द्यायचाच प्रयत्न केला आहे. त्यामुळे येथील जनतेच्या भयग्रस्ततेत आणखी भर पडली आहे. आजच्या घडीला जम्मू व श्रीनगर येथील काश्मीरी पंडित असुरक्षेच्या भावनेमुळे बदल्या कराव्या म्हणून आंदोलन करत आहेत. ३७० नंतर काश्मीरमधील दहशतवादी हल्ले कसे कमी झाले आहेत याचे गृहमंत्रालयाचे दावे आणि तेथील प्रत्यक्ष परिस्थितीत यात केवढे अंतर आहे!

ह्या दोन्ही कृती काश्मीरच्या ९०% पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या मुसलमानांना व काही प्रमाणात हिंदू व शीख जे काश्मीरमध्ये अजूनही राहिले आहेत, त्यांना असुरक्षित करण्यासाठी केलेल्या आहेत. उर्वरित भारतात ध्रुवीकरण करण्यासाठी उपयोग होईल हाच एकमेव विचार ठेवून केलेली ही कृती आहे. त्यामुळे तेथील हिंदू-शीखांचे काहीही होवो. काश्मीरच्या प्रश्नांची मुद्दामच अतिशयोक्ती करून हिंदू-मुसलमानांमधील दरी वाढवण्यासाठी बीजेपी त्याचा वापर करत आहे.

काश्मीरी मुसलमानांवर सुरुवातीपासूनच उदारमतवादी सुफी संतांचा प्रभाव आहे. जे हिंदू वा शीख शेकडो वर्षांपासून तेथे रहात आहेत, त्यांच्यापैकी काहींशी मी संवाद साधला. मुगलसराय या ऐतिहासिक ठिकाणापासून चार-पाच किलोमीटर अंतरावरील खानसराय या गावात पन्नास ते साठ घरे शीखांची आहेत आणि चारशेच्या वर वर्षे झाली, ते तेथे गुण्यागोविंदाने राहत आहेत. तेथील गुरुद्वारापण सुस्थितीत आहे. काश्मीरमध्ये शीखांची एकूण संख्या पस्तीस ते चाळीस हजार असून ते शेती, फळांच्या बागा व काही दुकाने, हॉटेल्स अशा व्यवसायात आहेत. तसेही भारतात शीख सर्वत्र आहेत व जगातील बहुसंख्य देशातही ते आपापल्या व्यवसायात दंग आहेत. 

मनात आले की “१९९० मध्ये खूप मोठ्या प्रमाणात पंडितांना काश्मीर खोऱ्यातील आपल्या पिढीजात इस्टेटी व घरे-दारे सोडून अंगावरील कपड्यांतच निघून जावे लागले आहे. प्रदीर्घ काळ संघप्रमुखपदी राहिलेले श्री. माधव सदाशिव गोळवलकर कायम म्हणत की हिंदू धर्माच्या रक्षणासाठी पाचशे वर्षांपूर्वी शीख संप्रदायाची स्थापना करण्यात आली आहे. शीख काश्मीरमध्ये चारशेच्या वर वर्षांपासून राहत आहेत. त्यांच्या गुरूद्वारांना साधा ओरखडापण पडलेला पाहिला नाही. पण पंडितांना मात्र निवडून-निवडून काढून टाकले. याचे कारण काय असावे?” 

एनडीएच्या सरकारने वीस वर्षांपूर्वी, अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली सहा वर्षे सत्ता मिळाली असताना, पंडितांना काश्मीरमध्ये नेण्यासाठी काय केले? आत्तादेखील ३७० रद्द होऊन तीन वर्षे झाली आहेत. पण पंडितांना त्यांच्या मूळ ठिकाणी नेण्यासाठी कोणत्याही प्रकारची तयारी चाललेली आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितली नाही. 

३ जून रोजी जम्मू स्टेशनवरून श्रीनगरला जाताना सुमोत असलेल्या पंचविशीच्या शीख युवकासोबत गप्पा करत असता तो म्हणाला, “पंजाबमधील गुरदासपूर शहरातील इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये मी चार वर्षे शिक्षण घेत होतो. ते पूर्ण करून घरी आलो. काश्मीरच्या सर्वांत जास्त आतंकवादी क्षेत्रात गणना होते त्या अनंतनाग जिल्ह्यातील त्राल गावाचा मी रहिवासी असून माझे वडील वारले आहेत. घरी आई एकटी असून आमचे सेबचे व इतर फळांचे बगीचे आहेत; आणि तुम्ही म्हणता की आमचा त्राल हा भाग आतंकवादी क्षेत्र म्हणून बदनाम आहे! चार वर्षे मी शिकत असताना फक्त सुट्ट्यांमध्ये घरी येत होतो. आमची शेती, तीही फळबाग असलेली, माझी आई व्यवस्थित करते आहे. आज माझ्याकडे मुक्काम करून स्वतःच्या डोळ्यांनी बघूनच जा” असा आग्रहही त्याने केला होता. आम्ही त्या शीख तरूणाचे आभार मानले व पुढील भेटीत येऊ म्हणून निरोप घेतला.  आज ९०% पेक्षाही जास्त लोकसंख्या असलेल्या काश्मीरच्या मुसलमानांनी हिंदू धर्माचा त्याग करून हजार-अकराशे वर्षे झाली. हिंदू धर्मातील जातिव्यवस्था या धर्मांतरास मुख्य कारणीभूत आहे. स्वामी विवेकानंद यांनीदेखील असे सांगितले आहे आणि ६६ वर्षांपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीदेखील हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्म स्वीकारण्यामागचे कारण जातिभेदच असल्याचे स्पष्ट केले आहे.

भारतातील बहुसंख्य धर्मांतराचे खरे कारण हिन्दू धर्मातील जातिव्यवस्था आहे. हे लक्षात घेऊन जातिनिर्मूलनाचे काम करायचे सोडून संघाच्या मंडळींना हिंदूंमध्ये मुसलमान, ख्रिश्चन धर्माच्या लोकांबद्दल द्वेष पसरवणे महत्त्वाचे वाटते. 

काश्मीरच्या पंडितांना काश्मीर सोडून इतरत्र राहावे लागत आहे. तरीही ते मुसलमानांना अस्पृश्य समजतात. आम्ही मुसलमान मित्रांच्या घरी उतरलो आहोत व त्यांनी केलेले जेवण जेवतो आहोत याबद्दल जागती व नगरौटा कॅम्पमध्ये राहणारे पंडित पुन्हा- पुन्हा आश्चर्य व्यक्त करत असलेले पाहून परतीच्या प्रवासात मनात एक सल घेऊन आलो आहे.

आज, या घडीला एका काश्मीरी कुटुंबामागे एक सेनेचा नौजवान उभा आहे. उद्या प्रत्येक काश्मीरीमागे एक जवान नेमला तरीही, काश्मीरात हिंदूंचे परतणे कठीण वाटते. काश्मीरच्या पंडितांना काश्मीरी मुसलमानांसोबत जोपर्यंत बरोबरीने राहणे जमणार नाही, तोपर्यंत तरी मला हे कठीण वाटते. रेल्वेप्रवासाच्या काही तासांत एखाद्या सहप्रवाश्यासोबत काही कारणाने भांडण झाले तर संपूर्ण प्रवासात आपली मन:स्थिती बिघडते. इथे तर पिढ्यानुपिढ्या सोबत राहणाऱ्या लोकांबद्दल मनात तुच्छतेची भावना मनात ठेवून साहचर्याने राहणे कसे शक्य होईल? 

जम्मूहून श्रीनगरला जाताना काश्मीर खोऱ्यात प्रवेश करण्यासाठी आता नव्याने बोगदा तयार करण्यात आला असून त्याचे नाव डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी आहे. बोगद्यात प्रवेश करण्याआधी सुरक्षारक्षक वाहनांची कसून तपासणी करतात. आमच्या शेयर गाडीत मागे मी व इतर दोन स्त्रिया बंगाल राज्यातील होत्या व समोर गुरदासपुरच्या कॉलेजातील शिक्षण संपवून घरी परत निघालेला शीख तरूण होता. आम्ही कोण, कुठून आलो ह्या चौकशीला आम्ही दिलेल्या उत्तराने सुरक्षारक्षकांनी पुढे काही  विचारले नाही. पण ड्रायव्हर व त्याच्या शेजारील शीख तरूणाला गाडीखाली उतरवून त्यांची ओळखपत्रे व इतर तपासणी करून मगच गाडी बोगद्यातून जाऊ दिली. काश्मीरबाहेरच्या आम्हां तिघा नागरिकांना सहज परवानगी देण्यात आली व स्थानिक नागरिकांना तपासणी केल्याशिवाय सोडले नाही हा प्रकार काश्मीरच्या रहिवाश्यांना अपमानास्पद वागणूक देणारा आहे. आणि म्हणूनच स्थानिक लोकांना एकूणच भारतीय सेनेबद्दल वा इतर पॅरामिलिटरीबद्दल राग आहे. कारण हे सैनिक रात्री-अपरात्री स्थानिकांच्या घरात घुसून, धाडी टाकून त्यांच्या सामानाची नासधूस करून व बायका-मुलींसोबत धसमुसळेपणा करून, कुटुंबात तरुण मुलगा असेल तर त्याला सोबत घेऊन जातात.

अशाप्रकारे चाळीस वर्षांच्या खालील वयाचे तीस ते पन्नास हजार तरूण सध्या बेपत्ता आहेत. त्यांना शोधून काढण्यासाठी परवेज इमरोज नावाचे वकील, काश्मीर पीयूसीएलचे अध्यक्ष, ‘मिसिंग परसन्स् क्साड’ नावाच्या संस्थेच्या माध्यमातून त्यांना शोधण्याचा प्रयत्न गेल्या पंचवीस वर्षांपासून करत आहेत. एक कोटीपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या या भागातील चाळीस वर्षांपेक्षा कमी वयाचे, पन्नास हजारपेक्षा जास्त तरूण बेपत्ता असल्याचे ऐकून माझी झोप उडाली आहे.

आपापल्या भागात सुरक्षितपणे राहणाऱ्या नागरिकांना काश्मीरचे निसर्गसौंदर्य तेवढे पाहिजे आहे. पण जेव्हा काश्मीरचे एक कोटी लोक डोळ्यांत पाणी आणून विचारतात की स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्षे झाली तरी तुम्ही आमची मने जिंकली नाहीत, उलट आर्मीच्या टाचेखाली आमच्यावर अन्याय अत्याचारच करत आहात. हे ऐकून मी निरूत्तर होतो व शरमेने माझी मान खाली होते.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.