न्यायाच्या दाराशी

एक रस्ता.. आणि त्या रस्त्यावरून एक चिमणी उडत आली.. तिला माहीत आहे की हा रस्ता न्यायाचा रस्ता आहे.. तिने खूप ऐकले होते या रस्त्याबाबत, खूप अवघड वाटचाल असते म्हणे त्याची. आज मनाचा हिय्या करून चिमणी निघाली त्या रस्त्यावर..

पण हे काय? थोडेच अंतर कापून झाले, रस्ता सरळसरळ आलेला. मात्र आता समोर वळण दिसत आहे आणि नेमके त्याच ठिकाणी एक चेक पोस्ट.. एक रखवालदार कावळा तिथं बॅरिकेड्स लावून आणि हातात काठी घेऊन बसलेला. काळा कोट घातलेला, धारदार चोच असलेला कावळा.. 

चिमणी उडत बागडत बॅरिकेड्स जवळ येते..

“अग ए चिमणे, कुठं चालली आहेस?”

“मला ना, त्या न्यायाच्या रस्त्यावर जायचे आहे. न्याय मिळवायचा आहे.. जाऊ द्या ना मला” 

“अग हो! पण या रस्त्यावर तुला मी जाऊ देणार नाही. वरून ऑर्डर आहे तुला सोडायचे नाही म्हणून”

“ते काही नाही. मला जायचे म्हणजे जायचे म्हणजे जायचेच आहे.”

“नाही म्हणजे नाही म्हणजे नाही.”

“मी काही लेचीपेची नाही. नव्या युगातील चिमणी आहे. माझा हक्क मी मिळवणारच. पाहतेच मी कोण अडवतंय मला.”

हातातील दांडुका आपटत कावळा म्हणतो, “तुला एकदा सांगितले ना, तुला पुढं जाऊ देण्याची ऑर्डर नाहीये.”

चिमणी काठीकडे पाहते, त्याच्या धारदार चोचीकडे पाहते आणि विचार करते की इथे संघर्ष करून काहीच फायदा नाही. आपली शक्ती खूपच कमी आहे. ती तिथंच थबकते. मात्र वळणापुढचा रस्ता कसा असेल याचे तिला कुतूहल आहे. ती थोडी मान वाकडी करून पुढं काय दिसतं का हे पाहण्याच्या प्रयत्न करते. 

कावळा जेव्हा हे पाहतो, तेव्हा तो हसतो. आणि म्हणतो, “जर एवढे कुतूहल वाटतं आहे, एवढी इच्छा आहे तुला पुढं जायची, तर मग कर ना प्रयत्न.. माझ्या परवानगीशिवाय पुढं जाण्याचा प्रयत्न करून बघ. पण एक लक्षात ठेव. मी खूप शक्तिशाली आहे. आणि मी तर नुसता या पहिल्या चेकपोस्टचा रखवालदार आहे. पुढे एकामागून एक अनेक चेकपोस्ट, असंख्य रखवालदार.. माझ्यापेक्षाही शक्तिशाली.. तिसऱ्या चेकपोस्टवर तर जो रखवालदार आहे ना, तो खूपच अक्राळविक्राळ आहे… मलासुद्धा भीती वाटते त्याची.” 

न्यायाच्या रस्त्यावर अडथळे असतात हे चिमणीला माहीत होतं, पण एवढं अवघड असेल याची कल्पना तिने केली नव्हती. मात्र तिचा निश्चय ठाम होता. न्यायाचा रस्ता सर्वांसाठी खुला हवा ना! तिथं सर्वांना प्रवेश मिळायला हवा ना! संविधान तर हेच सांगते. याचा अर्थ आपली मागणी रास्त आहे. त्याला सांविधानिक अधिष्ठान आहे. पण म्हणून दांडगाई करून कशी चालेल?.. कावळ्याची चोच किती धारदार.. केवढी मोठी त्याची काठी.. कुठं याच्याशी हाणामारी करता! तसेही हाणामारी करायचा आपला पिंडच नाही. परवानगी मिळाल्याशिवाय आपण नको पुढं जायला.. पण परतदेखील नको फिरायला.. आपण इथेच ठिय्या देऊन उभे राहू. सनदशीर मार्गाचा अवलंब करत राहू. आपल्या मागण्यांची दखल त्यांना घ्यावीच लागेल..

“हे बघा कावळेदादा, मी काही मागे फिरणार नाही. तुम्ही मला परवानगी देत नाही तोवर मी इथेच तळ ठोकणार आहे.”

“मला काय बाई.. थांब तुला थांबायचे आहे तोवर.. पण उभी किती वेळ राहणार..”

कावळा तिला एक स्टूल देतो, आणि चेकपोस्टच्या बाजूला बसायला साांगतो. चिमणी तिथेच बसून राहते.. दिवसामागून दिवस जातात मात्र परवानगी काही मिळत नाही. रोज विनंत्या करून चिमणी कावळ्याला बेजार करू पाहते, मात्र कावळा अगदी निर्ढावलेला. तो काही दाद देत नाही. नाही म्हणायला तिला पाणी वगैरे देतो प्यायला. थोड्या गप्पादेखील मारतो, मात्र अगदी अलिप्तपणे. उगाच चिमणीने आपल्या चांगुलपणाचा फायदा नको घ्यायला या धास्तीने. 

चिमणी रोज त्याला काही वस्तू देऊ पाहायची. एकदा तर तिनं एक मूल्यवान मोती देऊ केला. कावळ्याने चक्क तो घेतलादेखील. तो म्हणाला, “मी हा मोती घेतोय, जेणेकरून तुला असं वाटू नये, की आपलं काहीतरी करायचं राहिलं. सर्व प्रयत्न करून पाहिले नाहीत. मात्र ही लाच घेऊन मी तुला सोडेन अशी अपेक्षा तू बाळगू नको. मी तसा खूप सरळमार्गी आहे. सरळ मार्ग असताना का वळा हा प्रश्न मला पडतो, म्हणून तर मला कावळा म्हणतात. आणि म्हणूनच मी कधी वाकडा मार्ग धरत नाही. हा मोती स्वीकारला म्हणजे मी भ्रष्टाचार केला असे तू समजू नको, आणि बाहेर कुठं बोलू नको. ”

वर्षांमागून वर्षे जातात. मात्र परवानगी काही मिळत नाही. आता तर चिमणीला पुढील चेकपोस्टचादेखील विसर पडला आहे. केवळ हाच रखवालदार आणि हीच चेकपोस्ट कशी पार करता येईल या चिंतेने तिला ग्रासले आहे. ती स्वतःच्या नशिबाला शिव्या देऊ लागते. तिच्या मनावर परिमाण होतो. ती काठीशी आणि खुर्चीशी बोलू लागते. त्यांना विनंती करते की तुम्ही तरी कावळेदादांना सांगा. त्याचे मन वळवून मला पुढं जाऊ द्या.

तिची दृष्टी अधू होऊ लागते. डोळ्यापुढे अंधारी येऊ लागते. अंत जवळ आला आहे असं समजू लागतं. तिला भास होऊ लागतात.. पुढचा रस्ता दिसू लागतो.. अरे, हे काय?.. पुढं वळणानंतर तर रस्ता सरळ सरळ दिसतो आहे. कावळेदादाने सांगितलेल्या चेकपोस्ट तर दूरपर्यंत दिसत नाहीत. जाऊ का तिथं.. विचार सुरूच आहे.. तोवर ती भानावर येते आणि समोर कावळ्याला पाहून तिला रडू कोसळतं.

ती अवस्था पाहून कावळ्यालादेखील वाईट वाटतं. तो म्हणतो, “नको त्या गोष्टीचा तू का अट्टाहास घेतलास चिमणे? काय मिळणार होतं या रस्त्यावर तुला पुढे जाऊन? मस्तपैकी इतर चिमण्यांसारखी भातुकली खेळायची, सणावाराला, लग्नामध्ये नटून थटून मिरवायचं! बसमध्ये, लोकलमध्ये प्रवास करताना मस्त गॉसिपिंग करायचं! चिमण्यांचे नेहमीचे खेळ सोडून तू का इथं आलीस आणि आयुष्याचे वाटोळे करून घेतलेस?”

“नाही रे.. मला असं टीपिकल जगायचं नव्हतंच.. म्हणून जेव्हा मला या रस्त्याबाबत समजलं, तेव्हा मी तडक तिथं आले. पण तू काही मला जाऊ दिलं नाहीस.”

“अरे, मी काय तुझा शत्रू होतो का? पण मला वरून तसे आदेश आले नाहीत, तर मी तरी काय करणार?”

साक्षात्कार व्हावा तसा एक दिवस मरणासन्न चिमणीला अचानक प्रश्न पडतो. हे वरून आदेश देणारे कोण? आणि ते असे आदेश का देत असतात? अर्थातच स्वतःची सत्ता अबाधित राखण्यासाठी ते न्यायाच्या रस्त्यावर अडथळे निर्माण करतात. मात्र इथे न्यायासाठी मी एकटीच का धडपडत आहे? इतर कुणाला न्याय नको आहे का? तिला नवल वाटते की हे प्रश्न आपल्याला यापूर्वी कधीच का पडले नाहीत?

चिमणी उठून बसण्याचा प्रयत्न करते पण तिला उठता येत नाही. ती बसल्याजागीच क्षीण आवाजात कावळ्याला हाक मारते. खूपच अस्पष्ट आवाज… जो कावळ्याला ऐकू जाणे एरवी अशक्य. मात्र त्याचं लक्ष तिच्याकडेच असतं. तिला काहीतरी सांगायचे आहे पण बोलता येत नाही हे त्याला समजतं. 

कावळ्याला तिची दया येते. तो तिच्यापाशी जातो. म्हणतो, “तुझ्या चिकाटीचे खरंच कौतुक बाबा!.. एवढी मरणाच्या दारात आहेस, तरी तुझे मन भरले नाही. बोल, तुला अजून काय विचारायचे आहे?” 

“का रे कावळेदादा, न्याय तर सगळ्यांनाच हवा असेल. मात्र मी अनेक वर्षे इथे बसले आहे. मग इतर कोणती चिमणी या रस्त्यावर का नाही आली? न्यायाच्या रस्त्यावर जाण्याचा इतर कुणीच प्रयत्न का केला नाही?”

“चिमणे, या क्षणी तरी तुझ्याशी मी खोटं बोलू शकत नाही. ही चेकपोस्ट केवळ तुझ्यासाठीच होती. प्रत्येकासाठी वेगळी चेकपोस्ट असते. प्रत्येकाचा न्यायाचा मार्ग वेगळा असतो. तू बॅरिकेड्स पाहून थांबली, परंतु तुझ्या पंखांमध्ये एवढं बळ निश्चित होतं की तू बॅरिकेड्स ओलांडून जाऊ शकली असतीस. तू काठीला घाबरलीस, मात्र काठीचा मारदेखील तू चुकवू शकली असतीस” 

“खरंच का रे मी पुढं जाऊ शकले असते?”

“हो!!.. जर तू असं केलं असतं तर माझीदेखील कायमची सुट्टी झाली असती. मी पहिल्याच दिवशी तसे तुला सुचवलेदेखील होते.”

“ते ठीक. पहिल्या दिवशी तू पुढच्या चेकपोस्टचे भीतीदायक वर्णन केलं होतं. त्या चेकपोस्टवर तर माझी वाट लागली असतीच ना!”

“चिमणे, खरं सांगू? पुढं कोणतीही चेकपोस्ट नसेलही कदाचित… मी आजवर केवळ ऐकले आहे, पाहिले नाही कधीच. ऐकले, तेच तुला सांगितले. तू पुढं जायचं प्रयत्न करायला हवा होतास.. तू इथेच थांबलीस कारण कदाचित तुझ्याही मनामध्ये पुरेसा विश्वास नव्हता, संघर्षाला सामोरे जायची हिम्मत नव्हती. इतिहास अशा अर्धवट प्रयत्नांची नोंद कधीच घेत नाही… अर्धवट संघर्षाला कधीच फळ येत नाही.. कधीच फळ येत नाही.”

(काफ्काच्या कथेवरून प्रेरित) 
जमीर कांबळे आणि मृण्मयी शिवापूरकर यांनी भाषांतरित केलेली काफ्काची “न्यायाच्या दाराशी” ही गोष्ट वाचली. तिचे हे स्वैर रूपांतर
.

अभिप्राय 1

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.