विवाहबाह्य संबंध

सर्वांत प्रसिद्ध असं उच्चवर्गीयातलं विवाहबाह्य प्रेमप्रकरण होतं, अमिताभ व रेखा यांचं. पण अखेरीस त्यांनाही थांबावं लागलंच … कुटुंबासाठी, समाजासाठी. 

नियम कितीही केले तरी माणूस हा चुकतमाकतच जगत असतो. मोहमाया त्याला जाळ्यात ओढायचं काम करत असते. त्यात तो नकळतही सापडू शकतो. 

आवडता पदार्थ नाही का जरा जास्तच खाल्ला जातो आणि मग अपचनावरचं औषध घ्यावं लागतं. तसं कधीतरी एखादी परस्त्री किंवा परपुरुष आवडतो. योगायोगाने तिकडून सिग्नल मिळालाच तर सुरू होतो भेटीगाठींचा सिलसिला. संबंध पुढे जातात, वाढतात, प्रेमाची पूर्तता होते. 

ती झाली तरी चोरटेपणाचे अपराधगंड निर्माण होऊ शकतात. भीतीपायी मन अस्थिर होतं. रोजच्या कामात चुका होऊ लागतात. जोडीदाराला संशय आलाच तर भांडणेही होतात. संसारात खळबळ माजते.

माणूस चुकू शकतो, मोह टाळू शकत नाही, या पद्धतीने विचार केला तर सर्वोच्च न्यायालयाने “विवाहबाह्य संबंधां”विषयीचा दिलेला निर्णय यथार्थ वाटतो. पण जोडीदाराला जर निष्ठा महत्त्वाची वाटत असेल तर संसार तुटणारच. अगदी क्वचित एखादीच समजूतदार पत्नी शांत राहील. पण अशा नवऱ्याला सोडून देऊन पायांवर उभ्या राहून स्वतंत्र घर करणाऱ्या अनेकजणी कनिष्ठ-मध्यमवर्गीयांमध्ये सर्रास दिसतात. सहसा त्या कोर्टात फिर्याद दाखल करीत नाहीत. याउलट नवरा मात्र बायकोचे संबंध मुळीच चालवून घेत नाही, लगेच काडीमोड मागतो. 

चुकून पाय घसरलेल्या प्रेमळ नवऱ्याला एक अत्यंत स्वाभिमानी व मिळवती बायको  कोर्टात खेचते, पण अखेर त्यांच्यात समेट होतो असे “कळत नकळत” या चित्रपटात दाखवले होते. 

आदर्श स्थिती म्हणजे दोघांनीही बाहेर संबंध न ठेवता लग्नसंबंध शेवटपर्यंत टिकवणे हीच होय. याचे प्रमाण बहुधा मध्यम व उच्चमध्यमवर्गीयांमध्ये जास्त आहे. कारण त्यावर त्यांची प्रतिष्ठा अवलंबून असते.

आर्थिक स्तरावरूनच उच्च, मध्यम, कनिष्ठ असे वर्ग समाजात तयार झालेले दिसतात. वैचारिकतेचा मुद्दा काही मूठभर मंडळींपुरताच मर्यादित राहतो. प्रतिष्ठेची संकल्पना सर्व समाजासाठी एकच नाही, कारण आपला समाज एकजिनसी नाही. आपल्या देशात एकाच काळात वेगवेगळ्या शतकातल्या मानसिकतेची माणसे राहतात. प्रत्येकासाठी प्रतिष्ठा ही वेगळ्या परिमाणाने मोजली जाते. आता राहिले शिक्षण. शिक्षणाचे महत्त्व समाजाला पटले आहे, पण संधींची समानता अजूनही नाही. शिक्षणामुळे विचार परिपक्व होतीलच असे नाही. अनुभव आणि ज्ञान यांची योग्य सांगड घातली गेली पाहिजे. तरच आधुनिक व उदार दृष्टिकोन तयार होऊ शकतो. खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण यांच्या एकत्रित परिणामांची परिणती म्हणजे एकविसाव्या शतकातला हा आपला भारतीय समाज आहे. आर्थिक परिस्थितीच्या दृष्टिकोनातूनच त्याचा विचार आपल्याला करता येईल आणि करावा लागतो. 

कनिष्ठवर्गीय समाजात विवाहबाह्य संबंध मोठ्या प्रमाणात आढळतात. कारण ते अशा प्रतिष्ठेला फारसे महत्त्व देत नाहीत. पोटासाठी कष्ट करताना शारीरिक गरजा पुऱ्या करून घेण्यासाठी कुठलीही वाकडी वाट किंवा आडवाट धरणे त्यांना चालते व जमतेही. त्यांना नैतिक वा अनैतिक असे विचारभेद समजतही नाहीत व त्याचे त्यांना काही सोयरसुतकही नसते.

काही अतिश्रीमंत कुटुंबातले स्त्री-पुरुष पैशांच्या जोरावर (एकमेकांना माहीत असलेले) विवाहबाह्य संबंध ठेवून असतात. त्यांची प्रतिष्ठा केवळ संपत्तीवर असते. त्यांच्या नीती, चारित्र्य यांच्या कल्पना दिखाऊ असतात.

मध्यमवर्गीय मात्र प्रतिष्ठा, चारित्र्य, नीतिमत्ता यांना जपण्याचा प्रयत्न करत जगतात. त्यांची आयुष्ये एकसुरी, सरळसाधी, सपक अनुभवांनी भरलेली असतात. पापभीरूपणा हा त्यांच्यात असलेला ठळक गुण. अशा एका कुटुंबातल्या स्त्रीने जाणतेपणी बाह्यसंबंध केला तर भांडणे, अबोला होऊनही दोहो बाजूंचे प्रेम व समजूतदारपणा यांच्या बळावर संसार टिकतो, ही कथा “समुद्र” या मिलिंद बोकील यांच्या कादंबरीत ( व नाटकातही ) घडते. इतके समंजस आणि परिपक्व प्रेम अगदीच विरळा. 

या सर्व पार्श्वभूमीवर “विवाहबाह्य संबंध गुन्हा नाही” हा निकाल प्रथमदर्शनी तरी अनीतीला प्रोत्साहन देणाराच आहे असे वाटते. चोहो बाजूंनी आणि खोलात जाऊन विचार केला तर लक्षात येईल की वरील विधानात अनेक मुद्दे संभवतात. नोकरीनिमित्त, कामानिमित्त परगावी/दूर परदेशी असणे, जोडीदाराच्या आजारपणामुळे वा मृत्यूमुळे सहवाससुखाला वंचित असणे, पतीपत्नींच्या कामांच्या वेळा व सुट्या वेगवेगळ्या असणे, कामानिमित्त सतत बाहेर फिरणे अशा अनेक कारणांपायी जोडीदार बाह्यसंबंध जुळवून परिस्थितीवर उपायच शोधत असतो. या प्रकारच्या संबंधांना विवेकाने समजून घेऊन संसार टिकवून धरावेत आणि मुलांचे भविष्यही सुरक्षित असू द्यावे हादेखील अर्थ या निर्णयात गृहीत असेल! अखेर समाज एकसंध राहण्यासाठी कुटुंबसंस्था सामंजस्यावर टिकून राहणे व पर्यायाने नवीन पिढीच्या निकोप वाढीसाठी संरक्षित व प्रेमळ वातावरण मिळणे महत्त्वाचे आहे. प्रसंगी जोडीदाराची अशी “अनैतिक चूक” पदरात घेऊनही प्रपंच नेटका होऊ शकतोच. अन्यथा घटस्फोटाचा मार्ग मोकळा आहेच की! निर्णय विचारीपणे घ्यावा, अविचारी घाईने नको एवढेच!!

समाजात सर्वच थरांत कमीजास्त प्रमाणात विवाहबाह्य संबंध पूर्वकाळापासून चालत आहेत, लपून वा उघड! त्यांचे प्रमाण या निर्णयाने वाढेल असे वाटत नाही. मात्र अपराधी वाटणे, तंटे-बखेडे, मालमत्तेवरून होणारी भांडणे, खटले यांचे कारण या निर्णयाने कमी होईल. जोडीदाराची शारीरिक व मानसिक गरज म्हणून या संबंधाकडे पाहायला शिकल्यास कुटुंबाची आर्थिक व सामाजिक घडी नीट बसलेली राहण्यास मदत होईल. जोडीदाराच्या शरीरावर मालकीहक्क गाजवणे हा मुद्दा विचारांती सोडणेच शहाणपणाचे ठरेल. सामाजिक व कौटुंबिक आरोग्य आणि व्यवहार सुरळीत राहावे यांसाठी जोडीदाराचे ‘असे’ संबंध दुर्लक्षिणे हाही एक प्रकारचा त्यागच असेल आणि एकंदर जीवनप्रवासाला तो फायदेशीर ठरू शकतो हीही बाजू ध्यानात घ्यावी. उदाहरणच हवे असेल तर “उत्सव” सिनेमा आठवा. त्यातल्या “मन क्यूँ बहका रे….” गाण्याचा प्रसंग काय सांगतो? वसंतसेना भेटल्यामुळे चारुदत्त बदलला, आणखी रोमँटिक झाला, असे त्याची पत्नी सूचकपणे उद्गारते. हे तिचे बोलणे केवढे सकारात्मक आहे, नाही? अर्थात, अशा संबंधांना उत्तेजन देण्यासाठी हे उदाहरण दिलेले नाही. परंतु, जर असे काही सामोरे आलेच तर जोडीदाराची गरज जाणून घेऊन तारतम्याने मार्ग काढावा. 

जेव्हा स्त्रीलाही माणूस म्हणून तिचा जोडीदार सकारात्मकतेने अशा परिस्थितीत समजून घेईल, तिलाही तिच्या शारीरिक व मानसिक गरजा पूर्ण व्हाव्यात असे वाटले, दुसरा विश्वासू मित्र मिळून तिच्या व्यक्तिमत्त्वाची समृद्धी हाही परिणाम घडून आला तर त्यांचे सहजीवन अधिक सुंदर होईल, तेव्हा या निर्णयाचा खरा अर्थ समाजाला कळला असे म्हणता येईल.

मो. 9850018610

अभिप्राय 20

 • कई बार युंही देखा है, मन तोडने लगता है
  अन्जान राह के पिछे
  खरं तर असं आकर्षण वाटणं हे नैसर्गिक आहे.
  केवळ परिस्थितीनुरूपच असावे असं म्हणता येत नाही.
  सामाजिक प्रतिष्ठेच्या नावाखाली नैसर्गिक इच्छा दडपून टाकणे हे क्रूर असते.
  यासाठी अशा आकर्षणाचा कुटूंबावर जास्त परिणाम होणार नाही हे बघून त्याचा स्वीकार करावा.

 • सद्यस्थितीवरील छान लेख.

 • खूप छान लेख. याविषयावर मी अनेकदा लिहिले. यावर चिंतनही करते. माझ्याकडे येणाऱ्या केसेस मधून स्त्रिया नव ऱ्याची मैत्रीचं काय प्रेयसी ही अनेकदा नाईलाजास्तव का होईना, स्वीकारते. कधी मुलांसाठी, कधी माहेर साठी, प्रतिष्ठेसाठी, पण पुरुष स्त्रीचा प्रियकर सोडा, मित्रही स्वीकारत नाही. पुरुषांनी आधी स्वत:ची मानसिकता बदलण्याची गरज आहे. लेखाचा शेवट खूप आवडला नंदिनिताई.
  Aruna sabane
  9970095562

 • एक गंभीर विषय या लेखात हाताळला आहे. अभिनंदन. विचार करायला भाग पाडणारा असा विचार प्रवर्तक लेखाबद्दल धन्यवाद.
  एक पत्नीत्व ही रामाची प्रतिमा आदर्शवत मानण्याची परंपरा चालू राहाते. मुळात मानवाच्या विविध गरजा या एकाच नात्यात पुऱ्या होण्याची शक्यता असते का? याच अंकातल्या एका लेखात वर्णन केल्याप्रमाणे विवाहा मागच्या प्रेरणा लक्षात घेता त्या सर्व प्रेरणांची पूर्तता एका नात्यात होणे अशक्य आहे. त्यामुळे विवाहबाह्य सबंध ठेवण्याला पुरूषप्रधान संस्कृतीमध्ये मान्यता आहे. स्त्रियांना कायम तडजोड करण्याचा सल्ला दिला जातो. आणि स्त्रियांची एक निष्ठता स्त्रियांच्या गरजेमध्ये एक उपजिवीकेचे साधन, आसरा मिळणे त्यांची यौनिकता आणि शारिरीक गरजा पुरवणे असे विविध पैलू त्या नात्यात असतात. पुरूषाला ही बंधने नसतात.

 • अनावर लैंगिक आकर्षण आणि भिन्नलिंगीय व्यक्तिविषयीषयी कुतूहल या वास्तवाची नोंद घेणे आवश्यक आहे.पुरुषांमध्येच ते असते या कल्पनेचा प्रभाव आतापर्यंत अगदी विज्ञानावर सुद्धा होता.हळूहळू धीटपणे आपले अनुभव मांडणार्या कविता महाजन, गौरी देशपांडे, मेघना पेठे यांच्या सारख्या स्त्रीलेखिका या समजूतीला धक्का देत आहेत.

 • नवा विचार . पण अजून सर्व बाजूंचा विचार करावा लागेल.

 • लेख छान आहे, विवाहविषयक बदलणार्‍या नीति अनीति च्या कल्पना, स्त्री पुरुष संबंध ह्याच्यावर थोडक्यात पन चान्गला प्रकाश टाकायचा प्रयत्न केला आहे. अश्या संबंधांकडे माणूस म्हणुन बघितल पाहिजे अस लेखात म्हंटल आहे,आणि ते योग्यच आहे. पण मुळात विवाहबाह्य संबंध पुरुषाने करू देत किंवा स्त्री ने, प्रश्न त्यांच्या संबंधाचा नाही आहे, प्रश्न आहे त्या विवाहबाह्य संबंधामागचा असणार्‍या हेतूचा, त्यांच्या त्या संबंधाच्या भूमिकेचा,विचाराचा त्यांच्या जीवनविषयक दृष्टीकोनाचा.ह्या उलट जर ह्या संबंधांत जर दोघांपैकी एकाची भावना भोगाची, फसवण्याची असल तर त्याचा शेवट हा दोघांच आयुष्य नाश होण्यात होतो, तेव्हा प्रेमाची जागा द्वेष, सूड आणि हिंसा ह्यांनी घेतली जाते.आणि निव्वळ लैंगिक भोगापोटी केले जाणारे संबंध हे खूप क्षणिक, अल्पकालिक असतात.त्यामुळे प्रश्न ह्या विवाहबाह्य संबंधांचा नाही आहे तर आहे त्याचा शेवट कसा आणि का होतो, करणार्‍यांचा अंतस्थ हेतू काय आहे हा खरा प्रश्न आहे. ह्या मुद्द्यावर लेखात अधिक सविस्तर लिहायला हव होत कारण ह्या संबंधांकडे जरा अधिक व्यापक खोलात पाहता येईल, नाहीतर रोज अश्या संबंधामुळे खून, अत्याचार ह्या गोष्टींमुळे वृत्तपत्र भरलेली असतातच.

 • अशी कुठली गोष्ट आहे ज्यानी पुरुष स्त्रीला गुलाम करतो.आणि अशी कुठली गोष्ट आहे ज्यानी स्त्री स्वतःला नेहमीच पुरुषाच्या अंकित करत असते,ती गोष्ट आहे मालकी हक्क, आता आपला समाज हा सामुदायिक मालकी हक्कावर आधारलेला आहे का तर त्याच उत्तर आहे नाही. मालकी ही सर्वार्थाने कुणाकडे असती तर पुरुषाकडे.त्यामुळे विरोध नुसता पुरुषांच्या मानसिकतेला करून काही अर्थ नाही, विरोध करायचाच झाला तर अश्या समाजाची,स्त्री आणि पुरूषाची मानसिकता घडवणार्‍या मालकीहक्कला केला पाहिजे, विरोध आणि निषेध त्या व्यक्तीचा झालाच पाहिजे जी व्यक्ती नालायक आहे तिचा, ह्याबद्दल तिळमात्र शंका नाय. पण ही व्यवस्था टिकवण्याचा प्रयत्न करणार्‍या धर्माचा, संपत्तीच्या मूठभर वर्चस्वाला, व्यवस्थेचा जी माणसाला पशु करते ह्या सगळ्या गोष्टींचा विरोध झाला पाहिजे.

 • खूपच चांगला लेख आहे. येथे मलाही एका चित्रपटाची आठवण येते. हा चित्रपट 2003 साली अमोल पालेकरांनी काढला होता आणि त्याचे नाव होते ‘अनाहत.’ त्यात दीड दोन हजार वर्षांपूर्वीच्या काळातील एक काल्पनिक घटना दाखवली होती. राजा (अनंत नाग) हा पुत्रसंभवासाठी सक्षम नाही आणि राज्याला तर वारस हवाच. म्हणून मंत्रीमंडळ राजाला आदेश देते की त्याने राणीला नियोगाने पुत्रसंभवाची परवानगी द्यावी. राणी (सोनाली बेंद्रे) आपल्या निवडीचा पुरुष निवडून त्याच्यासोबत रात्र घालविण्यासाठी गेलेली असतांना तिच्यावर जिवापाड प्रेम करणार्‍या राजाची घालमेल आपल्याला बघायला मिळते. त्यावेळी राजाची जिवलग सखी (दीप्ती नवल) त्याला साथ देत सावरून घेत असते. राणी पहाटे परतल्यावर आपला अनुभव राजाला सांगते की तो किती अनोखा, सुंंदर आणि कधीच न अनुभवलेला असा होता. राजाचे तिच्यावरील प्रेम जराही कमी होत नाही उलट ती आनंदित झाली यातच त्याला सुद्धा आनंद होतो.
  त्यामुळे जोडीदाराने डोक्यात राख घालून न घेता विवेकाने विचार करावा हा सल्ला योग्यच म्हणावा लागेल.

 • सर्वांना धन्यवाद.

 • दोन व्यक्तींमध्ये असलेल्या विशेषतः लैंगिक संबंधांचा भाग हा सर्वात गुंतागुंत असलेला , त्या दोघांनाही पूर्णपणे आकलन होणे कठीण असलेला असा भाग असतो.त्यात आनुवंशिकता , परिस्थितीने घडवलेले संस्कार इ. अनेक गोष्टींची सरमिसळ झालेली असते.समाजाच्या प्रस्थापित नियमांचे उल्लंघन त्यात होत असल्याने त्या व्यक्ती समाजाच्या रोषाचा विषय बनतात आणि त्यासाठी त्या कळतनकळत एकमेकांना दोष देतात.या सगळ्या गोष्टींमुळे असे संबध बहुधा शोकांत ठरतात. व्यभिचार, अनाचार , दुराचार या नावांनी त्यांना निंद्य ठरवले जाते.साहित्यात, चित्रपटात त्यांचे समर्थन ,गौरवीकरणच जास्त केलेले आढळते त्यामुळे forbidden apple प्रमाणे त्याचे आकर्षण पुरेसे प्रगल्भ नसलेल्यांना वाटू शकते आणि त्यातूनच हा विषय मधूनमधून पुढे येत राहतो.समाजाचे नियम आपण पाळणार नाही आणि तरीही समाजाने आपल्याला समजून घ्यावे ही अपेक्षा मी कायदे मोडीन पण मला शिक्षा
  होऊ नये असे म्हणण्यासारखे आहे.

 • वरील लेखाचे माझ्या आवाजातील अभिवाचन आपण येथे ऐकू शकाल.
  https://youtu.be/hVRl7oT6l24

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.