नीतिशास्त्राची मुळे कोठे शोधावीत?

‘आजचा सुधारक’च्या संपादकांनी केलेल्या आवाहनात नीतिविषयक मुख्यत्वे तीन विधाने केली आहेत:

१. विवेकवादी, बुद्धिप्रामाण्यवादी लोक हा विषय विज्ञानात बसत नाही म्हणून वैयक्तिक किंवा फारतर कौटुंबिक स्वार्थ साधणे एवढ्या मर्यादित निकषावर नीती-अनीतीचा निर्णय करू बघतात.
२. बहुतांश लोकांचा धार्मिकता किंवा विशिष्ट विचारधारेशी संलग्नता म्हणजेच नैतिकता असा समज झालेला/करून दिला गेलेला आहे. 
३. काही लोक वाहतुकीचे नियम पाळण्याइतपत नैतिकतेला महत्त्व देतात.

वरील तिन्ही विधाने एका मर्यादेपर्यंत स्वतंत्रपणे खरी आहेत. पण सीमारेषेवर त्या कल्पना एकमेकींत मिसळतात. त्यामुळे काही प्रसंगी ‘सीमासंघर्ष’ही होताना दिसतो. 

विवेकवादी, बुद्धिप्रामाण्यवादी लोकांचा विज्ञानाच्या वस्तुनिष्ठतेवर (Objectivity) जेवढा विश्वास असतो तेवढा विज्ञानाच्या क्षेत्रात प्रत्यक्ष काम करणाऱ्या वैज्ञानिकांचा नसतो. त्यामुळे, बुद्धिप्रामाण्यवादी ज्या ‘धर्मपरायणते’ने बुद्धिप्रामाण्यावर श्रद्धा ठेवतात तेवढी वैज्ञानिक क्वचितच ठेवतात. प्रत्यक्ष-प्रमाणाच्या वस्तुनिष्ठतेवरही त्यांना जेथे नाइलाजास्तव विश्वास ठेवावा लागतो तेथे बुद्धिप्रामाण्यावर आंधळा विश्वास ठेवण्याचा प्रश्नही उद्भवत नाही. बुद्धिप्रामाण्य सुसंगती सांगते, सत्य नाही. नीतिविषयक प्रश्नांना धर्मही खात्रीपूर्वक उत्तरे देऊ शकत नाही. दुर्योधनाच्या राजसभेत जेव्हा “दुर्योधनाचे वर्तन नीतीला धरून आहे काय?” असा प्रश्न द्रौपदीने विचारला तेव्हा “धर्माची गती गहन आहे” असे सांगून भीष्मासह सर्वच धर्मज्ञांनी उत्तर देणे टाळले. त्यात दरबारी मुत्सद्देगिरीचा भाग असला तरी सत्याचाही अंश होता. धार्मिक माणसांचीही “किं कर्म किमकर्मेति” अशी अर्जुनासारखी किंवा “To be or not to be” अशी हॅम्लेटसारखी अवस्था होते. “रात्रंदिन आम्हां युद्धाचा प्रसंग” असे तुकारामासारखे संत म्हणतात ते याच अर्थाने. कारण नैतिकदृष्ट्या योग्य काय आणि अयोग्य काय हे सांगणे इतके सोपे नसते. आणि कित्येकदा तर दोन तुल्यबळ नैतिक कर्तव्यातून एकाची निवड करायची असते. प्रसिद्ध नोबेल पारितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. तुमच्याकडे एकच जागा आहे आणि तीन उमेदवार आहेत. तिघांपैकी कोणाचीही नेमणूक तुम्ही करू शकता. पण एकाचीच नेमणूक होऊ शकते. तिघेही सारख्याच पात्रतेचे आहेत. तिघेही अतिशय गरजू आहेत. कोणाला नेमायचे? सेन यांनी प्रश्नांची गुंतागुंत थोडी अधिक वाढवली. पहिला सगळ्यांत गरीब आहे. गरिबी हा निकष वापरला तर त्यालाच जागा देणे न्यायाचे ठरेल. पण दुसरा नुकताच दुर्दैवाच्या फेऱ्यात अडकला आहे. पहिल्याला दारिद्र्याचा अनुभव होता. दुसऱ्याला दारिद्र्याचा अनुभव नव्हता. त्याच्या मित्राने त्याला फसवले आणि तो दारिद्र्याच्या खाईत लोटला गेला. त्याचे दुःख मोठे आहे. ते निवारण करणे अधिक नैतिक होईल. तिसरा सर्वांत गरीबही नाही आणि सर्वांत दुःखीही नाही. पण त्याला जुनाट व्याधी आहे. नोकरी मिळाली, थोडा पैसा मिळाला, तर तो आपल्या आजारावर इलाज करू शकतो. अशा प्रश्नावर एकमेव आणि सर्वांचे समाधान करेल असे उत्तर असू शकत नाही. सामाजिक न्यायाचे बहुतेक प्रश्न असेच असतात. आज राखीव जागांच्या प्रश्नावर एकमत होऊ शकत नाही याचे प्रमुख कारण तेच आहे. सामाजिक क्षेत्रात तर दीर्घकालीन हित आणि वर्तमानकालीन गरज हे परस्परविरोधी असू शकतात. २००० साली दिल्लीमध्ये फार मोठी हिंसक निदर्शने झाली. शेकडो सार्वजनिक वाहने हिंसक जमावाच्या रागाची शिकार झाली. कारण? सर्वोच्च न्यायालयाचा एक निर्णय! दिल्ली हे जगातील एक सर्वांत प्रदूषित शहर आहे. २००० साली एका जनहित याचिकेवर निर्णय देताना न्यायालयाने सुमारे नव्वद हजार छोट्या उद्योगांना, ते हवा प्रदूषित करतात या कारणासाठी, बंद करण्याचे आदेश दिले. त्यामुळे सुमारे दहा लाख कामगार बेकार होणार होते. आता पुढील पिढ्यांवर परिणाम करणारे पर्यावरण महत्त्वाचे की, आज समोर असलेल्या दहा लाख कुटुंबांच्या पोटापाण्याचा प्रश्न महत्त्वाचा? असे प्रश्न व्यक्तीपुढेही उपस्थित असतात. मोठ्या मुलाला धंद्याला भांडवल द्यायचे की, छोट्या मुलाच्या शिक्षणाला पैसे द्यायचे? या प्रश्नाला सोपे उत्तर नसते. 

नीती-अनीतीचा निर्णय करणे एवढे गुंतागुंतीचे का आहे याचे उत्तर शोधण्यासाठी प्रश्नाच्या मुळाकडे वळावे लागते. नीतीच्या मुळाकडे वळणे म्हणजे माणसाच्याच मुळाकडे वळणे होय. माणूस हा इतर प्राण्यांहून फार वेगळा आहे, पण मुळात तो इतर अनेक प्राण्यांसारखा एक प्राणी आहे, हे विसरून चालत नाही. 

हा प्राणी एखाद्या निर्जन बेटावर एकटाच असेल तर नीती-अनीतीचा विचार तो फारसा करणार नाही. तो कळप करून राहतो म्हणून त्याला असले प्रश्न पडतात. म्हणजे नीतिमत्तेचा प्रश्न हा मुख्यत्वे कळप करून राहणाऱ्या प्राण्यांसमोरचा प्रश्न आहे. सर्व दुर्बळ प्राणी कळप करून राहतात. मनुष्य हा तर फारच दुर्बळ प्राणी आहे. आज मनुष्य फार सामर्थ्यवान दिसतो. पण एखाद्या निर्जन बेटावर आजही नैसर्गिक अवस्थेत एका माणसाला आणि एका उंदराला सोडले तर उंदीर वाचण्याची शक्यता माणूस वाचण्याच्या शक्यतेपेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे. १ वर्षाच्या मानवाला त्याच्याच वयाचे कुत्रेही खाऊन टाकू शकते. (जाता-जाता: माणूस विज्ञानाने सामर्थ्यशाली होत गेला, तशा त्याच्या व्यक्तिस्वातंत्र्याच्या मागण्या वाढत गेल्याचे दिसते. म्हणजे दुर्बळतेतून कळप, कळपातून सामर्थ्य, सामर्थ्यामुळे कळप नको, असा हा वर्तुळाकार प्रवास आहे. मोठ्या शहरांत शेजारच्या फ्लॅटमध्ये कोण राहते याची चौकशी कोणी करत नसते. काही वर्षांपूर्वी पुण्यामध्ये फ्लॅटमध्ये शिरून मोठी हत्याकांडे होऊ लागली. त्यानंतर फ्लॅटमधील लोक एकमेकांना पाहिल्यावर ‘हाय’ करू लागले.) दुर्बळ प्राणी कळप करून राहतात, कारण कळप करून राहण्यात त्यांचे हित असते. एकट्या-दुकट्या प्राण्यावर हिंस्र श्वापदांचा हल्ला होण्याची शक्यता जास्त असते. एकमेकांना मदत करणाऱ्या प्राण्यांच्या कळपावर हल्ला करणे हिंस्र श्वापदांना अडचणीचे जाते. कळपात कामेही वाटून घेता येतात. त्यामुळे प्राणी जेवढा दुर्बळ तेवढी त्याची कळप करून राहण्याची गरज आणि नैसर्गिक वृत्ती मोठी असल्याचे दिसेल. कळप सुसंघटित राहावा आणि तो वाढावा यासाठी काही नियमांची आवश्यकता अपरिहार्यपणे निर्माण होते. नैतिकतेचे मूळ तेथे आहे. मानवेतर सजीवांमध्ये हे नियम निसर्गदत्त असतात. ते पाळणे न पाळण्याचे स्वातंत्र्य त्यांना नसते. ते प्रतिक्षिप्त क्रियेनेच पाळले जातात. दुसऱ्या शब्दांत, नैतिकता बऱ्याच अंशी निसर्गदत्त आहे. आकलनक्रांतीपूर्वी (Cognitive Revolution, जी सुमारे चाळीस हजार ते सत्तर हजार वर्षांपूर्वीच्या काळात कधीतरी झाली असण्याची शक्यता आहे.) आणि त्यानंतरही बराच काळ माणसाची अवस्था अन्य पशूंपेक्षा फार वेगळी नव्हती. त्यावेळी तो हे निसर्गदत्त नीतिनियमच पाळत असणार. हे नियम काय होते? हे नियम पाळण्याची आवश्यकता काय होती? त्यात माणसाने किती बदल केले? काय बदल केले? ते केले असल्यास का केले? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधू लागलो तर आपल्याला संपादकांनी विचारलेल्या बहुतेक प्रश्नांची उत्तरे मिळू शकतील. या उत्तरांचा शोध आपल्याला सजीवांच्या जगण्याच्या उद्दिष्टाकडे घेऊन जातो.

सर्व प्राणिमात्रांत एकच एक साधारण उद्दिष्ट शोधायचे असेल तर स्वतःची प्रजा वाढवणे, त्याचा विस्तार म्हणजे स्वतःची टोळी वाढवणे आणि त्यापलीकडे जाऊन स्वतःची प्रजाती वाढवणे हेच आहे. आज सुसंस्कृत मानवाच्या जगण्याचा अर्थ सांगणारे मोठेमोठे ग्रन्थ दिसतील. पण आदिमानवाच्या जगण्याची उद्दिष्टे आणि अन्य प्राण्यांच्या जगण्याची उद्दिष्टे यांत काहीही फरक असण्याचे कारण नाही. संस्कृतीच्या पुढील टप्प्यावर त्याचे काही अंशी सुशोभीकरण होत गेले. सुरुवातीच्या काळात ही उद्दिष्टे साधण्यासाठी तो काही नियम निसर्गतः पाळत गेला. आकलनक्रांतीनंतर जसजसा त्याचा वैचारिक विकास होत गेला तसतसे हे नीतिनियम उत्क्रांत होत गेले. त्यामुळे आजच्या माणसाच्या नीतिनियमांचे, रूढींचे, धर्माचे मूळ आपल्याला कळप करून राहणाऱ्या प्राण्यांच्या ‘पशुधर्मा’त शोधावे लागेल. 

“धारणात् धर्म:।” हे पशुधर्मालाही लागू आहे. समाजाला म्हणजेच येथे पशूंच्या कळपाला धारण करतो तो धर्म. अगदी प्राथमिक स्तरावरील सजीवातील नर संभोग करताच मरून जात असत. कारण प्रजोत्पादनाची कृती केल्यावर त्याच्या जगण्याचा उद्देशच संपलेला असतो. उत्क्रांतीच्या पुढील टप्प्यावर हेच उद्दिष्ट साधण्याचे अधिक विकसित मार्ग अवलंबलेले आढळतात. त्याच्या पुढची पायरी म्हणजे आपली टोळी वाढवणे आणि त्यानंतरची पायरी म्हणजे आपली प्रजाती वाढवणे. 

सर्व प्राणी आपल्या पिलांचे ते स्वत:चे रक्षण करण्यास सक्षम होईपर्यंत पालन करतात. ते करताना प्रसंगी आपल्या जिवाचीही पर्वा करत नाही. 

हरिणांचा कळप चरत असताना काही हरिणे पहारा देत असतात. वाघ-सिंहाचा वास आला तर ते चरणाऱ्या हरिणांना सावध करतात. हे काम आळीपाळीने चालते. परस्पर सामाजिक विश्वास असल्याशिवाय असे सहकार्य शक्य असत नाही. 

गरुड दिसल्यावर खार गुपचूप सुरक्षित ठिकाणी पळून जाऊन आपला जीव वाचवू शकते. पण ती तसे करत नाही. ती चित्कार करून अन्य खारींना सावध करत असते. हे ‘समाजकार्य’ धोका पत्करूनच केलेले असते. कारण चित्कार करणारी खार एक प्रकारे गरुडाचे लक्ष आपल्याकडे वेधून आपला जीव विनाकारण(?) धोक्यात घालत असते. 

कुत्रा तसा छोटा प्राणी. त्याचा वेग आणि स्टॅमिनाही बेताचाच. पण कुत्रीं एकत्र काम करतात. रानटी कुत्र्यांच्या टोळीत चारपासून साठपर्यंत कुत्री असतात. ते श्रमविभागणी करतात. शिकारीच्या वेळी मोठी कुत्री पिलांची काळजी घेण्यासाठी मागे राहतात. ताज्या दमाची तरुण कुत्री शिकारीवर जातात. सावजाचा पाठलाग व्यूहरचना करून केला जातो. एक जण पाठलाग करतो. तो दमला की त्याची जागा दुसरा घेतो. शेवटी सावज दमते आणि सापडते. श्रमविभागणीमुळे कुत्री तितकीशी दमत नाहीत. त्यांच्या मोठ्या टोळीपुढे सिंहही टिकाव धरू शकत नाही. काही प्राथमिक नीतितत्त्वे पाळल्याशिवाय असे सहकार्य शक्य नसते.

मधमाशीने जर मध आणला नाही तर तिला पोळ्यातून हाकलून लावले जाते. हिवाळ्यात पुरेसा मध मिळेनासा झाला की, नर-माशीला (Drone) पोळ्याबाहेर हाकलून दिले जाते. ड्रोनना केवळ समागमासाठीच पोळ्यात पोसलेले असते. मध मिळणे दुरापास्त झाले की, मधमाश्याची संख्या वाढवण्याचे प्रयोजन नसते. त्यामुळे ड्रोन जगविण्याचा उद्देश संपलेला असतो. ड्रोनची शरीररचना मध मिळवण्याला अनुकूल नसते. ते पोळ्यातील अन्नावरच सर्वस्वी अवलंबून असतात. त्यामुळे पोळ्याबाहेर जाणे म्हणजे मृत्यूला कवटाळणेच होय.

निसर्गात आढळणाऱ्या या उदाहरणांचा मनुष्यप्राण्याच्या संदर्भात अर्थ काय? पाल्याच्या संगोपनासाठी स्वतःला त्रास करून घेऊन, प्रसंगी स्वतःची सुखे नाकारून आईबाप झटत असतात. मनुष्याच्या बाबतीत संगोपनाचा काळ अनेक वर्षांचा असतो. कळप वाचवण्यासाठी पहारा करणे, स्वतःचा जीव धोक्यात घालून कळपातील इतरांना वाचवणे, या कळप करून राहणाऱ्या प्राण्यात आढळणाऱ्या प्रवृत्ती माणसांतही आढळतात. अन्य प्राणी जे निसर्गतः करतात ते मनुष्यप्राणी जाणिवपूर्वक करतो. अन्नतुटवडा झाल्यावर बिनकामाच्या ड्रोनला मरण्यासाठी हाकलून दिले जाते. एस्कीमो जमातीत अन्नाचा नेहमीच तुटवडा असतो. त्यामुळे म्हातारा झाल्यावर एस्कीमो घराबाहेर पडतो आणि मृत्यू येईपर्यंत बर्फात चालत राहतो. एस्कीमोंची मजबूरी असेल; पण सर्व सुबत्ता असतानाही सनातन धर्मात विशिष्ट वयानंतर वानप्रस्थाश्रम आणि त्यानंतर संन्यासाश्रम सांगितला आहे. संन्यासाश्रमात मृत्यूला कवटाळल्याची अनेक उदाहरणे पोथ्यापुराणात सापडतील. युधिष्ठिर राज्यावर आल्यावर धृतराष्ट्र, गांधारी, कुंती, विदुर हे अरण्यात जातात आणि शेवटी वणवा लागलेल्या जंगलात जाणीवपूर्वक प्रवेश करतात असा उल्लेख आहे. परीक्षिताला राज्यावर बसवल्यावर पांडव हिमालयात ‘स्वर्गारोहण’ करतात. लवकुशांना राज्यावर बसवल्यावर प्रभू रामचंद्र ‘शरयू-प्रवेश’ करतात. आदिशंकराचार्य जीवितकार्य संपल्यावर हिमालयात अंतर्धान पावतात. ज्ञानेश्वर समाधी घेतात. जैन मुनी सल्लेखना करतात. आज आपण वृद्धाश्रम बांधतो. स्वेच्छामरणाची मागणी करतो. म्हणजे ड्रोनच्या बाबतीत जे वर्तन प्रतिक्षिप्तरीत्या घडते त्याचे मानवी संस्कृतीत उदात्तीकरण होत जाते असे दिसते. हे तत्त्व मान्य केल्यास त्याच्या प्रकाशात लेखाच्या सुरुवातीला दिलेल्या विधानांचा उलगडा होईल. 

आकलनक्रांती केवळ होमोसेपियन प्रजातीतच झाली. या क्रांतीनंतर माणूस अमूर्त विचार करू लागला. अमूर्त विचार करण्याच्या क्षमतेने त्याला कार्यकारणाचा बोध होऊ लागला. मनुष्यप्राण्याला आपले प्रश्न सोडवण्यासाठी निसर्गावर अवलंबून राहण्याची गरज नाही असे वाटू लागले. आपले प्रश्न सोडवण्यासाठी तो बुद्धीचा वापर करू लागला, कार्यकारणभाव शोधू लागला. ईश्वराची निर्मिती ही याच कार्यकारणांची निष्पत्ती आहे. किंबहुना आजचे सारे धर्म, सर्व ईश्वरविषयक संकल्पना, सामाजिक आणि राजकीय तत्त्वप्रणाल्या, विज्ञान, नीती-अनीती विवेक, किंबहुना प्रत्येक मानवी व्यवहार त्या कार्यकारणबोधाची अपत्ये आहे. प्रत्यक्षात हे इतके सरळ निर्माण झाले नाही. पण मागे वळून पाहता हे असेच होऊ शकत होते असे दाखवता येईल इतकी त्यात सुसूत्रता आहे.

आकलनक्रांतीनंतर जरी मानवी संस्कृती उत्क्रांत होत गेली तरी आपल्या जनुकांचा प्रसार व्हावा, आपली टोळी वाढावी, आपली प्रजाती वाढवावी ही मूळ पशूची उद्दिष्टे कायमच राहिली. फक्त या गोष्टी अधिक जाणीवपूर्वक, अधिक सुसूत्रतेने, अधिक सुसंघटितपणे आणि त्यामुळेच, कदाचित काही बाबतीत अधिक कठोरपणे होऊ लागल्या. त्यासाठी (१) जो पशूंचा निसर्गदत्त नीतिधर्म होता तो, जसाच्या तसा अथवा त्यात योग्य त्या सुधारणा करून, टिकला. (२) काही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी मनुष्यनिर्मित नियम करण्यात आले. (३) मनुष्यनिर्मित नियमांमुळेही काही प्रश्न निर्माण झाले आणि त्यांचे निराकारण करण्यासाठी काही संस्था (उदाहरणार्थ विवाहसंस्था, राज्यसंस्था इत्यादी) निर्माण करण्यात आल्या आणि त्या सुचारुरूप चालाव्यात म्हणून काही नीतिनियम करण्यात आले असे दिसेल. 

आजघटकेला जीवशास्त्रीयदृष्ट्या माणसाला, कदाचित, सर्वांत जवळचे कोणी प्राणी असतील तर चिंपांझी. चिंपांझी कळप करून राहतात. यांच्या कळपात सुमारे वीस ते पन्नासच्या आसपास चिंपांझी असतात. क्वचित शंभर चिंपांझींचे कळपही आढळले आहेत. कळपातले चिंपांझी एकत्र काम करतात. ते अन्न वाटून घेतात. शत्रूशी लढतात. ते कळपातल्या एकमेकांना चांगले ओळखतात. कळपाच्या म्होरक्याला जीवशास्त्रज्ञ अल्फा-मेल म्हणतात. कळप एकत्र ठेवण्यासाठी हा म्होरक्या कळपातल्या सर्वांना भेटत असतो, आलिंगन देत असतो. आमच्या राजकीय नेत्यांप्रमाणे कळपातल्या बछड्यांचे चुंबन घेऊन आपली लोकप्रियता बरकरार ठेवत असतो (की आमचे राजकीय नेते त्याचे अनुकरण करत असतात?) आणि आपला कळप एकत्र ठेवत असतो. पण कळप मोठा होत गेला की हे नाटक चालू ठेवणे कठीण जाते. कळपाची ताकद जशी कळपातील प्राण्यांच्या संख्येवर अवलंबून असते तशी त्याच्या सभासदांमध्ये असलेल्या सहकार्याच्या भावनेवरही अवलंबून असते. ही सहकार्याची भावना आपसातील घनिष्ठतेवर म्हणजेच एकमेकांच्या ओळखीवर अवलंबून असते. जेव्हा सभासदांची संख्या वाढते तेव्हा ही घनिष्ठता कमी होते आणि कळप फुटतो. मग त्यातील आणखी एक जण अल्फा-मेल बनून दुसरा कळप तयार करतो. 

भाषा विकसित होण्यापूर्वी सेपियन्सचे कळप चिंपांझीच्या कळपासारखेच होते. भाषा निर्माण झाल्यावर एक गोष्ट झाली. लोक एकमेकांशी गप्पा मारू लागले. आपले विचार, आपली सुख-दुःखे एकमेकांना सांगू लागले. युवाल हरारी म्हणतो, “इतिहासाचे प्राध्यापक एकत्र जमले तर दुसऱ्या जागतिक युद्धावर चर्चा करताना आढळत नाहीत. किंवा भौतिकशास्त्राचे प्राध्यापक क्वार्कवर चर्चा क्वचितच करतात. ते बऱ्याचवेळा कुटाळक्याच करत असतात. ते तिथे नसलेल्या प्राध्यापकांच्या खाजगी आयुष्याबद्दल बोलत असतात. अशा गप्पा मारताना कल्पनेचा वारू चौखूर उधळत असतो.” विचारांच्या पातळीवर अनेक असंभाव्य गोष्टींची  निर्मिती होत असते. भाषा विकसित झाली नसती तर गप्पिष्टपणा निर्माण झाला नसता. पण, तो म्हणतो, “अशा गप्पांमुळे एकमेकात घनिष्ठ संबंध तयार होतात. कोण खरे बोलतो, कोण थापा मारतो, कुणावर विश्वास ठेवायचा, कुणावर नाही, हे अशा गप्पांतूनच कळत जाते. आणि त्यातूनच मैत्री दृढ होत जाते.” माणसांच्या संघटना अशातूनच तयार होत जातात.

पण अशाप्रकारे केवढी मोठी संघटना तयार होईल यालाही मर्यादा आहे. जर पन्नास माणसे एकत्र आली आणि त्यांनी एकमेकांना केवळ ‘हॅलो’ म्हणायचे ठरवले तरी एक हजार दोनशे पंचवीस वेळा ‘हॅलो’ म्हणावे लागेल. जर प्रत्येकाशी संवाद साधायचा म्हटले तर तो आकडा आणखीनच मोठा होईल. प्रयोगांती असे आढळून आले आहे की, माणूस एकावेळी जास्तीत जास्त दीडशे व्यक्तींना व्यक्तिगत पातळीवर ओळखू शकतो. म्हणजे अन्य होमोंच्या टोळ्या पन्नासच्या असतील तर भाषा विकसित असलेले सेपियन्स आपल्या टोळ्या दीडशे इतक्या मोठ्या करू शकतात. त्यापेक्षा मोठ्या टोळ्यांत आपसांतील सामंजस्य, सहकार्य आणि व्यवस्थापन टिकवणे उत्तरोत्तर कठीण होत जाते. संशोधनात असे निष्पन्न झाले आहे की, निअँडर्थलशी एक लाख वर्षांपूर्वी झालेल्या लढाईत सेपियन्सची हार झाली होती. पण सत्तर हजार ते तीस हजार वर्षांपूर्वीच्या काळात केव्हातरी सेपियन्सनी त्यांना मात दिली. निअँडर्थल मनुष्याचा मेंदू आपल्यापेक्षा मोठा होता आणि शारीरिकदृष्ट्याही ते आपल्यापेक्षा सुदृढ होते. पण त्यांची भाषा विकसित झाली नव्हती. आपली भाषा बरीच विकसित होती. 

सेपियन्सची भाषा आणि बुद्धी आता एकमेकींचा विकास करत होती. त्याला आपल्या क्षमता वाढवण्यासाठी उत्क्रांतीची वाट पाहायचे काहीच कारण नव्हते. पण जगात फक्त सेपियन्सच उरल्यावर त्यांच्यात आपसात संघर्ष होणे क्रमप्राप्त होते. आता दीडशे सेपियन्सच्या एका टोळीला मात द्यायची असेल तर दुसरी टोळी दीडशेहून मोठी करणे हाच उपाय होता. आणि संघर्ष नसला तरी संघटना मोठी असण्यात फायदे होतेच. पण, टोळी मोठी झाली तर व्यक्तिगत जवळीक निर्माण होत नाही. छोट्या संघटनेचा नेता नावापुरता असला तरी चालते. तो First among equals असतो. पण एकदा दीडशेची मर्यादा ओलांडली की मग नेत्याचा वैयक्तिक ओळखीचा धागा क्षीण होतो आणि व्यवस्थापन फिस्कटते. ती झुंड होते. झुंडीतले लोक एकाच हेतूने एकत्र आले तरी एकदिलाने काम करू शकत नाहीत. अन्य गोष्टी समान असतील तर ज्या टोळीची संख्या मोठी, ती बलवान ठरते. पण एकजूट असलेली छोटी टोळीही एकजूट नसलेल्या मोठ्या टोळीला वरचढ ठरते (हे भारताच्या इतिहासाकडे वरवर दृष्टिक्षेप टाकणाऱ्यांच्याही लक्षात येईल.) मग दीडशेहून अधिक व्यक्तींची सुसंघटित टोळी कशी बनवायची? हा प्रश्न आकलनक्रांतीने सोडवला. आकलनक्रांतीने परमेश्वर निर्माण केला होता. परमेश्वराच्या संकल्पनेला शब्दांशिवाय अस्तित्व नाही. पण त्या शब्दाभोवती संघटना उभारता येते. या संघटनेच्या आकाराला दीडशेची मर्यादा नाही. ती कितीही मोठी असू शकते. या संघटनेतील लोकांनी एकमेकांना व्यक्तिगतरीत्या ओळखण्याची गरज नाही. पण ती माणसे एकमेकांसाठी कोणत्याही त्यागाला तयार होतात. “आत्ता तुझ्या हातातले केळे तू मला दे, देव तुला केळीच्या बागांचा स्वामी करेल” असे एखाद्या चिंपांझीला किंवा गोरिलाला कोणी सांगितले तर तो हे कधीही मान्य करणार नाही, पण माणूस असा सौदा करायला तयार असतो. 

गरीबोंकी सुनो ‘वो’ तुम्हारी सुनेगा 
तुम एक पैसा दे दो, ‘वो’ दसलाख देगा ।। 

या गाण्यावर माणसाचा विश्वास असतो. 

माणसाला पडणाऱ्या अनेक, किंबहुना सर्वच प्रश्नांची उत्तरे देव देत होता. ही उत्तरे सत्य आहेत का हा प्रश्न निरर्थक आहे. कारण जोपर्यंत त्या उत्तरावर संबंधित व्यक्तीचा विश्वास असतो तोपर्यंत ते उत्तर त्याच्यासाठी खरेच असते. पण त्याची चर्चा येथे अभिप्रेत नाही. आपल्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट म्हणजे या संकल्पनेला केंद्रस्थानी ठेवून कितीही मोठी टोळी वाढवता येत होती. आजचे बहुतेक धर्मपंथ (Religions) याची उदाहरणे आहेत. हे धर्मपंथ नीती-अनीती ठरवतात. आणि या नीतिनियमांचे प्रयोजन संघटना बलवान करण्यात शोधतात. मोझसला ईश्वराने सांगितलेल्या दहा आज्ञा पहा. कोणत्याही धर्मपंथाने सांगितलेली नीती ही त्या पंथाची संघटना बळकट व्हावी म्हणूनच असते. जेव्हा नेता आणि अनुयायी यांच्या सामर्थ्यात फार फरक नव्हता, त्यावेळी मृत्यूनंतर स्वर्गाचे प्रलोभन आणि नरकाची भीती दाखवून समाजधुरिणांना अभिप्रेत असलेली या लोकीची नीतिमत्ता समाजात टिकवली जायची. धर्म सांगतो, “तुम्ही इहलोकात आपल्या इच्छांवर काबू ठेवा, स्वर्गात कल्पवृक्षाखाली तुम्ही मागाल ते मिळेल. या जगात पत्नीशी एकनिष्ठ राहा, मृत्यूनंतर स्वर्गात अनेक सुंदर स्त्रिया तुमच्यावर फिदा होतील. येथे दारू पिऊ नका; स्वर्गात मद्याच्या नद्यात डुंबायला मिळेल.” ज्या समाजात समलिंगी संबंध प्रचलित होते, त्या समाजातील धर्मांनी तर स्वर्गात चौदा-पंधरा वर्षाच्या मुलांची पण ‘सोय’ केली आहे. स्वर्गाची ही वर्णने वाचली तर, धर्मांचा नैतिकतेचा दावा विवादास्पद ठरावा. पण त्यावेळच्या समाजधुरिणांनी इहलोकीचा समाज नीतिमान राहावा या सद्हेतूनेच हे केले होते. जसजशा जाणिवा विकसित होत गेल्या तसतशा धर्माच्या जागा निरनिराळ्या ‘इझम्स’नी, तत्त्वज्ञानानी आणि त्यावर आधारलेल्या मानवनिर्मित सामाजिक संस्थांनी घेतल्या. मानवाच्या सांस्कृतिक, बौद्धिक, वैज्ञानिक विकासाबरोबर या नीतिमत्तेचे स्वरूप बदलत गेले. आजच्या सर्व प्रगत समाजात समाजनियमनाचे आणि नीतिमत्ता टिकवण्याचे काम शासनसंस्थेकडे सोपवलेले असते. धर्मग्रंथाचे काम लिखित अथवा अलिखित राज्यघटना करते. जेथे राज्ययंत्रणा लोकाभिमुख, न्यायाधिष्ठित, प्रामाणिक आणि कार्यक्षम असते, तेथे समाजधारणेसाठी पारंपरिक धर्माची आवश्यकता उरत नाही. (तरीही धर्म टिकून आहे याचे कारण धर्म मनोवैज्ञानिक प्रश्न सोडवतो एवढेच आहे.) पण ही राज्ययंत्रणा ज्या विचारप्रणालीवर आधारलेली असते तिचे स्वरूप तत्त्वतः धर्मापंथाहून वेगळे नसते आणि या विचारप्रणालीवर आधारलेली राज्यघटना तत्त्वतः धर्मग्रंथाहून वेगळी असत नाही. 

यावर अधिक सखोल विचार करून हे सारे अधिक सुसंगत रीतीने मांडण्यासाठी प्राणिशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, राज्यशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, इतिहासतज्ज्ञ, धर्मज्ञ आणि नीतिशास्त्रज्ञ यांना एकत्र यावे लागेल.

पण हा सगळा वरवरचा डोलारा आहे. बहुतेक सर्व नीतितत्त्वाचे मूळ कळप करून राहणाऱ्या प्राण्यांच्या आपली प्रजाती वाढवण्याच्या नैसर्गिक प्रवृत्तीत शोधावे लागेल. मग प्रश्न आत्महत्या अनैतिक ठरवण्याचा असो अथवा इच्छामरणाचा अधिकार मागण्याचा. या दोन्हींत वरकरणी विरोध आढळेल. पण त्याचे कारण आकलनक्रांतीने निर्माण केलेल्या मानवनिर्मित नीतिकल्पनेत शोधावे लागेल. 

अभिप्राय 1

  • राज्ययंत्रणा ज्या विचारप्रणालीवर आधारलेली असते तिचे स्वरूप तत्त्वतः धर्मापंथाहून वेगळे नसते आणि या विचारप्रणालीवर आधारलेली राज्यघटना तत्त्वतः धर्मग्रंथाहून वेगळी असत नाही.

    खर आहे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.