नीतीचे मूळ

नीतीचे मूळ हे कुठल्याही गृहीतकाशिवाय सिद्ध करता येते असे माझे मत आहे. हा अर्थात तत्त्वज्ञानातील एक महत्त्वाचा विषय. पूर्वी यास ईश्वरी वा पारलौकिक गृहीतकांचा आधार लागतो असे कित्येकांना वाटायचे. पण हळूहळू तसा आधार न घेता नीतिनियमांची मांडणी करता येणे कसे शक्य आहे यावर विचार सुरू झाला. यावर ‘आजचा सुधारका’त अतिशय उत्तम लेखमाला प्रकाशित झाली होती. https://www.sudharak.in/2003/03/3320/

प्रत्येक जीवित प्राण्याला काही तरी स्वाभाविक प्रवृत्ती असतात. स्वतःचे संरक्षण करणे ही एक मूलभूत प्रवृत्ती! यात खाणे, तहान भागवणे, संरक्षित ठिकाणी राहणे इत्यादि प्रवृत्ती अंतर्भूत आहेत. याशिवाय आपल्या जीन्सचे संरक्षण करणे ही प्रवृत्तीही यात येते. यात आपल्या नात्यातील व्यक्तींचे संरक्षण करणे अंतर्भूत होते. संरक्षणानंतर सुखोपभोग (म्हणजे हवे तसे करणे) हीदेखील स्वाभाविक प्रवृत्ती असू शकते. याशिवाय अनेक प्रवृत्ती असू शकतात. अशाच एका प्रवृत्तीपासून नीतीचा जन्म होतो असे मानले जाते. ते कसे हे आपण पुढे पाहू. 

“माणसाची एक स्वाभाविक प्रवृत्ती आहे. इतरांच्या सुखामुळे माणसांना सुख मिळते. त्यामुळे ‘पुष्कळांचे पुष्कळ सुख’ या तत्त्वाचा उगम या स्वाभाविक प्रवृत्तीतून होतो. नीतिनियमांचा उगम ‘पुष्कळांचे पुष्कळ सुख’ (उपयोगितावाद) या तत्त्वातून होतो” असा उपयोगितावाद्यांचा दावा आहे. एखाद्या माणसाचे खूप वाईट झाले, तो किंवा त्याच्या जवळची व्यक्ती दुर्धर आजाराने ग्रस्त झाली तर आपल्याला सहानुभूति वाटते. बहुसंख्य लोक अशा व्यक्तींना मदत करण्यासही पुढे येतात. किंवा कुणी गरीब मुलगा/मुलगी अतिशय कठीण परिस्थितीतून चांगले यश मिळवता/ती झाला तर त्यास बक्षीस देणाऱ्यांचीपण संख्या कमी नसते. पण या दृश्य पुराव्यावर आपण उपयोगिता सिद्धांत सिद्ध करू शकतो का? यासाठी इतर गोष्टी पण पहाव्या लागतात.

जसे आपण दुसऱ्यांच्या अतीव दुःखात वा सुखात सहभागी असतो, तसेच आपण छोट्या छोट्या सुख-दुःखात असतो का? तर याचे उत्तर नाही असे मिळेल. म्हणून आपण रांगेत घुसून/कोणाच्या तरी ओळखीने कुठल्याशा कार्यक्रमात जातो, थोडे अधिक पैसे देऊन रेल्वे-बस प्रवास करतो. असे उद्योग करताना माझे सुख आणि दुसऱ्यांचे सुख यात भेदभाव होतो. अशा अनेक उदहरणांतून असे दिसते की हे दुसऱ्यांच्या सुखात सुख मानणे हे बहुतांशाने खरे नाही.

प्रत्यक्षात प्रत्येक माणसाच्या छोट्या छोट्या सुखात आपले सुख पाहणारी माणसे विरळाच असतात. शिवाय इतरांच्या दुःखात सुख मानणारी किंवा त्यांच्या सुखात दु:ख मानणारी, असूया बाळगणाऱ्याची संख्या कमी नाही. मग उपयोगिता सिद्धांत कसा तयार होतो? की ते धर्मकल्पनेसारखेच एक वेगळे गृहीतक आहे? या प्रश्नाकडे परत यावे लागते. 

कुणाचीही असूया नसणारी माणसे कदाचित अल्पसंख्य असतील. असे असले तरी ही सांख्यिकी माहिती वेगळ्या नजरेतून पाहता येते. म्हणजे कुठल्याही माणसाला विचारले की तुझ्या महितीतील माणसे किती? आणि ज्यांच्याबद्दल तुला असूया वाटते अशी माणसे किती? तर हे प्रमाण कदाचित एक टक्क्यापेक्षा कमी आढळेल. तेव्हा असूया असणे हे बरेच वेळा आढळेल; पण एकंदर असूया मात्र नगण्य असू शकते.

याविरुद्ध अजून एक सांख्यिकी प्रमाण आहे. म्हणजे आपल्या ओळखीच्या माणसांपैकी किती माणसांमध्ये आपल्याला आप्त आढळतात? ओळखीचे आणि आप्त यात असा फरक करता येईल की आप्त म्हणजे ज्यांच्या सुखदुःखात आपला सहभाग जास्त असतो. तर हा सहभाग नाममात्र असणे हे आप्त नसण्याचे लक्षण आहे. तर असे आप्त आणि ओळखीचे यांचे प्रमाणही बघायला हवे. तर हे प्रमाणदेखील फारसे आशादायक नाही असे मला वाटते. 

याशिवाय एक गंभीर मुद्दा दिसतो. तो म्हणजे समूहांमधील असूया. म्हणजे ओळखीच्या माणसांपलीकडे जी असतात त्यांना त्यांच्या नावाने एक गट करून द्वेष केला जातो. हेदेखील खूप मोठ्या प्रमाणात आढळते. त्यामानाने दोन भिन्न समूहांमध्ये आस्था जास्त असते की द्वेष जास्त असतो असा प्रश्न विचारला तर कदाचित द्वेष जास्त आढळेल. असे असल्यावर माणसांच्या मुळात दुसऱ्या माणसाबाबत आपुलकी वाटणाऱ्या सहजप्रवृत्तीवर मोठे प्रश्नचिन्ह तयार होते. यातील टक्केवारीविषयी कदाचित वेगवेगळी मते असू शकतात. पण माझ्या मते या सिद्धांतावर प्रश्नचिन्ह कायम राहील. 

मग नीतीचे मूळ कुठे शोधायचे? 

असे म्हटले जाते की चार लाख वर्षांपूर्वी नीतीचा उगम झाला. म्हणजे होमो सेपियन ज्यावेळेस उदयास आला नव्हता तेव्हादेखील नीतिमत्ता बाळगायला सुरुवात झाली होती. (https://www.scientificamerican.com/article/the-origins-of-human-morality/#:~:text=In%20Brief,fairness%20for%20other%20group%20members.) एकमेकांत सहकार्य असले तर आपले हित जास्त जपले जाते हे कळल्याने ते झाले. तर नीतीचे मूळ माणसाच्या हुशारीत असावे. सहकार आणि परस्पर हक्क हे मानले तर त्यात आपला फायदा आहे हे काही प्राणिमात्रांना कळते. त्यात मानवपूर्व आणि मानवप्राणीदेखील सहभागी आहे. पण मानवप्राण्याने आपल्या हुशारीने पुढपुढची पावले टाकली असावीत. याचे कारण म्हणजे वैयक्तिक हित आणि सामायिक हित यात संघर्ष होऊ शकतो. तसेच तात्कालिक हित आणि दीर्घकालीन हित वेगळे असल्याने संघर्ष घडू शकतो. हा संघर्ष टाळण्यासाठी आपल्या गटात ‘नियम बनणे’ आणि ‘नियमपालन व्यवस्था बनणे’ म्हणजेच कायदा आणि न्याय तयार होणे हे आले. आपला समूह जेवढा मोठा, तेवढा जास्त फायदा असे करत मोठाल्या राष्ट्रांचा आणि त्यांच्या घटना, कायदा आणि न्याय अशा संस्थांचा उदय झाला.

तेव्हा माझ्या मते नीतिनियमांचा जन्म हा केवळ माणसाच्या स्वार्थातून निर्माण झाला आणि मग त्याला धार्मिक वा शासकीय आवरण चढले. 

हे एवढे सगळे असले तरी एकमेकांत एकमेकांचे सुख पाहणे या प्रवृत्तीला एकदम नाकारता येत नाही. आणि ही प्रवृत्ती खूप जणांमध्ये असल्याने कदाचित नीतिनियम, कायदा, आणि न्याय प्रक्रियेस स्थैर्य मिळाले असावे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.