बदलते नीतिनियम

माझ्यासाठी जिव्हाळ्याचा असलेला हा विषय गेली दोन वर्षे माझ्या दैनंदिन जीवनाचा भाग बनला आहे. मर्चंट नेव्हीमध्ये जहाजावरचे अधिकारी म्हणून काम करण्यासाठी १९ ते २५ या वयोगटातल्या तरुण-तरुणींना व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या एका संस्थेचा प्राचार्य म्हणून मी सध्या काम करतो आहे. या कामाच्या निमित्ताने विद्यार्थी-विद्यार्थिनींमध्ये शिस्तीचे वातावरण प्रस्थापित करणे ही माझी जबाबदारी आहे. यासंदर्भात मला अनेकवेळा नीतिमूल्यांविषयी काही प्रश्न पडतात आणि मी माझ्या सहकार्यांबरोबर या विषयावर सतत चर्चा करीत असतो. आमची ही संस्था निमलष्करी प्रकारचे शिक्षण देत असल्यामुळे तेथे शिस्तही तशाच प्रकारची कडक असावी अशी पारंपरिक विचारधारा आहे. संस्थेच्या आवारातली शिस्त नौदलातून निवृत्त झालेले वॉर्डन्स सांभाळतात. शिस्त लावण्याची त्यांची पद्धत मला नेहमीच पटते असे नाही. एखाद्या विद्यार्थ्याला उशिरा आल्याबद्दल एखादी शारीरिक शिक्षा देणे ही पद्धत त्यांना नैसर्गिक वाटत असली तरी, मला ती पटत नाही. मला लहानपणी आई-वडिलांनी जी शिस्त लावली तिच्यामुळे मी सागरी जीवनात सर्व प्रकारच्या व्यसनांपासून दूर राहून एक शिस्तबद्ध आयुष्य जगलो. आज आपल्या विद्यार्थ्यांना शिस्त लावताना मी मागे वळून पाहतो आणि आई-वडिलांनी आम्हाला शिस्त लावताना कोणत्या पद्धती वापरल्या होत्या ते आठवून पाहतो. मला शिस्त लावताना त्यांनी कधीही शारीरिक शिक्षा केली नव्हती, धमक्या दिल्या नव्हत्या आणि भीती घातली नव्हती. घरचे वातावरण बुद्धिप्रामाण्यवादी आणि नास्तिकतेकडे झुकणारे असल्याने देवा-धर्माची भीती घालण्याचा प्रश्नच नव्हता. प्रत्येक गोष्ट समजावून सांगण्यावर भर होता. एखादी चांगली सवय लावून घेण्यामध्ये काय फायदे आहेत, वाईट सवयींचे परिणाम काय होतात यावर चर्चा होत असे आणि ते भांडवल मला आयुष्यभर पुरले. 

आज माझ्या संस्थेतल्या विद्यार्थ्यांना शिस्त लावताना मी शिक्षेऐवजी ‘सेल्फ रेग्युलेशन’चा म्हणजेच आत्मनियमनाचा पुरस्कार करतो. यामध्ये चूक आणि अपराध यातला फरक समजावून सांगितला जातो. एखादी गोष्ट अज्ञानापायी किंवा विस्मृतीमुळे चुकीच्या पद्धतीने करणे ही चूक झाली पण स्वार्थापायी किंवा दुसऱ्याला नुकसान किंवा इजा पोचवण्यासाठी केलेली कृती अपराध आहे हे स्पष्ट केले जाते. कडक शिस्तीच्या पुरस्कर्त्यांना हा प्रकार कदाचित हास्यास्पद वाटतही असेल पण माझा या विषयातला दीर्घ अनुभव मला असे सांगतो छडीच्या जोरावर लावलेली शिस्त छडी आहे तोवरच टिकून राहते. पण आत्मनियमनामुळे लागलेली शिस्त आयुष्यभर टिकून राहते. माझा हा विश्वास पक्का असल्यामुळे मी कडक शिस्तीच्या पुरस्कर्त्यांच्या कुरबुरीला न जुमानता माझे प्रयत्न करीत आहे आणि या प्रयत्नात मला यश मिळेल याची मला खात्री आहे.

आता प्रश्न राहिला नीतिमत्तेचा. स्त्री-पुरुष २४ तास एकत्र राहत असल्यानंतर त्यांच्यावर नैतिकतेची कोणती आणि किती बंधने घालावीत याबद्दलही सतत चर्चा चालू असते. आधी सांगितल्याप्रमाणे या संस्थेचे स्वरूप निमलष्करी असल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांचा गणवेश समान असतो. त्यामुळे स्त्रियांच्या पेहरावावरून त्यांच्या नीतिमत्तेचे मोजमाप करणाऱ्यांची तोंडे सामान्यत: बंदच असतात. तरीही खेळताना मुलींनी शॉर्ट्स घालाव्यात की नाही, त्यांची लांबी किती असावी यावरही कधी कधी चर्चा होते आणि या बाबींचा आपल्या संस्कृतीशी संबंध जोडला जातो. याशिवाय स्त्री-पुरुषांमधल्या मैत्रीवर अनेकांच्या नजरा रोखलेल्या असतात आणि समाजातील नीतिमूल्ये किती ढासळली आहेत यावरही चर्चा ऐकायला मिळते. अशावेळी ‘राखी भाऊ-बहीण’सारखी कृत्रिम नाती निर्माण न करता स्त्री-पुरुष मैत्रीच्या नात्याला योग्य तो सन्मान मिळावा हा माझा आग्रह असतो.

लिंगसमानतेविषयी वेळोवेळी स्वतःचे विचार आणि मला पटणारी तत्त्वे माझ्या अखत्यारीत असणाऱ्या तरुण-तरुणींवर मी लादतोय का? मी इतरांचा सल्ला घ्यावा का? की संस्थेची धोरणे आहेत तशीच पाळावीत? हे प्रश्न मी सतत स्वतःला विचारत असतो. इतरांना ते विचारताना मला असे अनुभव आले आहेत की माझे समवयस्क (पन्नास-साठ वयोगटातले) सहकारी याबाबतीत सामान्यतः अतिशय कडक आणि जाचक नियम लावायला निघतात आणि तथाकथित संस्कृतीरक्षकांच्या तोंडी असलेली भाषा बोलतात. संस्थेची धोरणेही अशाच विचारप्रवृत्तीच्या लोकांनी बनवलेली आहेत. पण सुदैवाने ती अतिशय मोघम आहेत; त्यामुळे मला माझे विचार प्रत्यक्षात आणण्याची संधी लाभलेली आहे. आणि त्या प्रयत्नात मी माझ्या जीवनानुभवाचा आणि काही समविचारी व्यक्तींच्या मतांचा उपयोग करून घेतो. 

माझी पत्नी, कन्या आणि सून यांच्याशी मी सतत चर्चा करीत असतो. त्यांच्याकडून मला स्त्री-स्वातंत्र्य, समान हक्क, त्याबद्दलचे गैरसमज, त्याचा गैरफायदा घेणारे स्त्री-पुरुष या विविध बाबींबद्दलचे विचार आणि अनुभव ऐकायला मिळतात. त्याशिवाय एक सहकारी मानसशास्त्रज्ञ आणि काही विद्यार्थी-विद्यार्थिनींशी परिसंवादातून किंवा वादस्पर्धांच्या स्वरूपात संवाद साधून त्यांची मतेही ऐकून घेतो. शिवाय या विषयावर विचारवंतांनी केलेली वक्तव्ये (टेड टॉक इत्यादी ), लेख यांमधूनही आजमितीला जगात काय ग्राह्य आहे आणि काय नाही ही समजून घेत असतो. 

काही दशकांपूर्वी कुटुंबांची आणि समाजाची इतकी बंधने असायची की मान खाली घालून सरळ रेषेने जाणाऱ्या मुली आणि त्यांच्याशी सहजपणे संवाद साधता येणार नाही म्हणून येन-केन-प्रकारेण त्यांचे लक्ष वेधण्यासाठी आटापिटा करणारे ‘सडक-सख्याहरी’ हे दृश्य सगळीकडे दिसत असे. मुलांबरोबर ज्या मुली मुक्तपणे वावरताना दिसायच्या, त्यांना ‘चालू’सारखी विशेषणे चिकटवली जायची आणि यांच्यापासून जरा दूरच राहावे म्हणून ‘चांगल्या घरची’ मुले स्त्री-द्वेष्टे, बालब्रह्मचारी बनायची. चित्रपटातील नायकांप्रमाणे, दिसेल त्या सुंदरीच्या मागे तळहातावर दिल घेऊन फिरणे काहींना कमीपणाचे वाटायचे. दुर्दैवाने इतर अनेकांचे आदर्श ते नायकच असायचे. 

हे सगळे लिंग-भिन्नतेच्या आधारावर केलेल्या समाजाच्या ध्रुवीकरणाचे परिणाम! हे अशा प्रकारचे ध्रुवीकरण आपल्या संस्थेत होऊ नये आणि तरुण-तरुणींना दोन व्यावसायिक आणि जबाबदार नागरिक या नात्याने एकमेकांशी सन्मानपूर्वक आणि सौजन्यपूर्वक वागण्याची शिकवण मिळावी यासाठी मी प्रयत्नशील असतो. अभ्यास, खेळ, काम किंवा करमणूक यांपैकी कोणत्याही बाबतीत स्त्री-पुरुष या तत्त्वावर वेगळे गट केले जात नाहीत. कोणत्याही स्पर्धेत, संगीत-नृत्य, वक्तृत्व असो वा फूटबॉल, जर मिश्र-संघाला प्रवेश नसेल तर आमचा संघ त्या स्पर्धेत भाग घ्यायला हे कारण सांगून नकार देतो. आजमितीला तरुण-तरुणींची वसतीगृहे देशातल्या कायद्यानुसार वेगळी आहेत, पण काही देशात मिश्र स्वरूपाची वसतीगृहे असतात याची आम्हाला माहिती आहे. अशा वसतीगृहांमध्ये राहाण्याचे फायदे-तोटे काय असतात यावर चर्चा करण्याचीदेखील आमची तयारी आहे. आज समाजात जे काही ग्राह्य आहे ते संस्थेमध्येही स्विकारायला काही हरकत नसावी हा माझा विचार असतो. तरीही आपल्यामधील स्नेहाचे जगासमोर ‘अश्लाघ्य प्रदर्शन (PDA) करू नये’ हे बंधन मात्र सर्वांनाच पाळावे लागते.

हे सगळं असलं तरीही ज्या देशात रोजच्या रोज स्त्रियांवर अत्याचार होतात त्याच देशात जन्मलेले आणि वाढलेले विद्यार्थी आमच्या संस्थेत आहेत; आणि त्यात एखादा ‘सडका आंबा‘ असू शकेल याची आम्हाला जाणीव आहे. त्यामुळे ‘बेशिस्त’ आणि ‘बेकायदेशीर’ वर्तनाला क्षमा नाही याची आठवण प्रत्येकाला पुनःपुन्हा करून दिली जाते. यावेळी ‘नीतिनियम हे पोथ्या पुराणे वाचून आणि संस्कृतीच्या नावाखाली हास्यास्पद बंधने घालून न ठरवता, ज्या आचारणामुळे समाजाला काही हानी होत असेल, ते टाळावे आणि आपल्या सदसद्विवेक बुद्धीला पटेल अशा सभ्य पद्धतीने वागावे’ एवढे एकच मार्गदर्शक तत्त्व पुरेसे वाटते.

अभिप्राय 2

  • I really appreciate your research on hypocrisy and superstitions . It should be totally finished from |India if we want to see progress and powerful India .

    thanks
    Er Ghanshyam Das Ahirwar AGM BSNL New Delhi . 9868175650
    email gd.ahirwar123@gmail.com . the literature must send in HINDI languages .

  • समजावून सांगण्यात बह्वंशी बुद्धीला आवाहन असते आणि काही थोड्या बाबतीत ते बदल घडवू शकते.पण अनेकवेळा कळते पण वळत नाही अशा गोष्टीत ते निष्प्रभ ठरते. I know what is right but I invariably do what is wrong हे एका ख्रिश्चन सासूचे वाक्य मार्मिक आहे. नीतिनियमांची चर्चा स्त्रीपुरुषसंबंधांशी येतेच आणि भोवऱ्यात सापडल्यासारखी गत होते हे नाकारता येणार नाही.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.