मला भेटलेले गांधीजी

गांधीजींची माझी पहिली आठवण ३० जानेवारीची आहे. वर्ष १९८८. मी शाळेत होतो. प्राथमिक चौथीचा वर्ग. आईनं शाळेत जाण्यापूर्वी सांगितलं, “आज हुतात्मा दिन आहे. सकाळी अकरा वाजता भोंगा वाजेल. रस्त्यावर, जिथे कुठे असशील तिथे तसाच उभा राहा.” “कशासाठी?” मी विचारलं. “गांधीजींची स्मृती म्हणून,” तिनं सांगितलं. अकरा वाजता भोंगा वाजला. मी होतो तिथे रस्त्यात उभा राहिलो. ही गांधीजींची पहिली आठवण. गांधीजी यानंतर लवकर भेटले नाहीत. आता तीस जानेवारीला अकरा वाजता भोंगा वाजतो का? माहीत नाही. बऱ्याच वर्षांत ऐकला नाही. गांधीजी नाहीत. आईही नाही.

गांधीजयंतीची चर्चा ऐकली अन् हे सारं आठवलं. आईला गांधीजींविषयी एवढा जिव्हाळा का असावा? तिने काही गांधीजींना पाहिले नव्हते. तिच्या शाळेत पंडित नेहरू, राधाकृष्णन् आले होते. त्या आठवणी ती सांगत असे. गांधीजी गेल्यावर तिचा जन्म झाला. तरीही तेव्हा पन्नास वर्षांनंतर तिने एक संस्कार कायमचा केला. आज मागे वळून पाहतो तेव्हा गांधीजींनी तिच्यावरच नव्हे, देशातील असंख्य स्त्री-पुरुषांवर कायमचा ठसा निर्माण केला आहे हे जाणवते. माझी आजी, ती तर अल्पशिक्षित. ती टकळीवर सूत कातत असे. आजूबाजूच्या बायकांना भगवद्गीता शिकवत असे. हे गांधीजींकडून आले होते असे काही मी म्हणणार नाही. तसे काही होते का, हे काही मी आजीला विचारलेले नाही. तेवढे विचारायची माझी अक्कलही नव्हती. पण टकळी आणि गीता हे दोन्ही आपल्या परंपरेतून आले आहे हे नक्की. तसेच गांधीजीनी परंपरेला अहिंसात्मक अस्त्रात बदलवले हेही नक्की.

यानंतर गांधीजी भेटले ते शालेय इतिहासाच्या पुस्तकात. पण विशेष वेगळे लक्षात राहिले नाहीत. लक्षात राहावेत असे कष्टही कुणी घेतल्याचे आठवत नाही. इतिहासाच्या पुस्तकात रेघोट्या मारण्यासाठी गांधीजी विद्यार्थ्यांमध्ये सर्वांत प्रिय होते. तेव्हा शाळेत गांधीजयंती साजरी होत नव्हती. कधी तरी स्वातंत्र्यचळवळीत गांधीजींइतकेच भगतसिंग महत्त्वाचे होते असे एखादे शिक्षक सांगायचे. आज काही प्रमाणात गांधीजींच्या सत्याग्रहाचा मार्ग अवलंबून सत्तेवर येणाऱ्या आम आदमी पक्षाने भगतसिंग हे आपले आयकॉन बनवले आहे. अण्णा हजारेंना मात्र ते विसरले आहेत. मोदीही गांधीजींची आठवण काढतात. भारताच्या पंतप्रधानांनी, राष्ट्रपतींनी परदेशात भेट दिली आणि गांधीजींचा छोटा पुतळा, त्याचे अनावरण, एखाद्या चौकाचे ‘महात्मा गांधी चौक’ असे नामकरण, गांधीजींची एखादी वस्तू, परदेशी विद्यापीठात गांधीजींविषयी एखादे भाषण, गांधीजींच्या एखाद्या पुस्तकाचे आदानप्रदान, याची छोटी का होईना बातमी आली नाही असे होत नाही. 

माझे आजोबा केसरी वाचत असत. हाच पेपर ते का वाचत असावेत हा प्रश्न तेव्हाही पडत असे. ते टिळक पक्षाचे होते का? माहीत नाही. मुळात असा प्रश्न विचारण्याइतके ज्ञान तेव्हा नव्हते. कदाचित केसरी ‘टिळकांचा’ म्हणून टिळक गेल्यावरही साठ वर्षांनी ते केसरी वाचत असावेत. गांधीजी असा कुठला पेपर काढत असत? ‘जनरल नॉलेज’चा प्रश्न म्हणून उत्तर देता येईल. पण असा कुठला पेपर सध्या तरी रोज वाचायला मिळत नाही. त्यांचा पेपर काही ‘राष्ट्रीय ठेवा’ नाही म्हणून असे असेल का? नॅशनल हेरॉल्डचे वाद सुरू आहेत. त्यापेक्षा गांधीजींनी सुरू केलेले पेपर आजवर सुरू नाहीत हेच बरे असावे.

नंतर गांधीजी भेटले ते कॉलेजला आल्यावर. तेही शेवटी शेवटी. एमएच्या सेकंड पार्टला असताना. पहिल्यांदा ‘भारतीय राजकीय विचारवंत’ या पेपरमध्ये एक विचारवंत म्हणून आणि ते कमी होते म्हणून की काय, पुढच्या सेमिस्टरला थिअरीच्या पेपरमध्ये. या पेपरमध्ये गांधींचा गांधीवाद झाला होता. गांधीवाद असा कुठलाही वाद नाही, असे गांधीजींनी सांगितले होते, असे त्या प्रकरणात शेवटचे वाक्य होते.

गांधीजी हे ‘भारतीय’ एवढ्याच चौकटीपुरते मर्यादित बसणारे विचारवंत होते का, असे वाटून आणखी एक पेपर होता, ‘पाश्चिमात्य विचारवंत’ नावाचा. गांधीजी त्या पेपरमध्ये का नव्हते? केवळ भारतात जन्मले या कारणामुळे त्यांना ‘पाश्चिमात्य विचारवंत’ या पेपरमध्ये टाकणे शक्य नसावे. खरे तर पश्चिमेत गेले नसते तर मोहनदास करमचंद गांधी हे ‘गांधीजी’ तरी झाले असते का? एरवी तर ते फक्त पोरबंदरचे दीवाणपुत्र म्हणून मुंबईमध्ये एखादी नामवंत वकिली फर्म चालवत राहिले असते. 

खरे तर गांधीजी हे जागतिक विचारवंत होते आणि आहेत. पण असा काही पेपर तेव्हा तरी नव्हता म्हणून गांधीजी त्या नसलेल्या पेपरमध्ये नव्हते. ते तर पूर्व आणि पश्चिम यापलीकडे गेलेले होते. अभ्यासक्रमनिर्मितीची ‘नई तालीम’ तोवर आपण स्वीकारलेली नव्हती.

“कस्तुरबा साकारल्यामुळे तुमच्या आयुष्यात काय फरक पडला?” असे रोहिणी हट्टंगडी यांना कोणी विचारले होते. “Third Chance” असे रोहिणी म्हणाल्या. “पूर्वी काही वेळेला, समोरची व्यक्ती समजून घेण्याचा मी दुसरा प्रयत्न करत असे. आता आणखी एक संधी देते. उदारमतवाद अंगी बाणला” असे काहीसे रोहिणी म्हणाल्या होत्या.

‘गांधी’ सिनेमा टीव्हीवर अनेकदा पाहिला. पण जास्त लक्षात राहिला तो शाम बेनेगल यांचा ‘मेकिंग ऑफ महात्मा’ हा चित्रपट. आफ्रिकेत जुलमी कायद्याची कागदपत्रे जाळण्याचा प्रसंग, पोलिसांचा छडी हल्ला, रेल्वेतून उतरवून देण्याचा प्रसंग, घोडागाडीत दाटीवाटीने बसण्याचा प्रसंग. हे प्रसंग पाहताना डॉ आंबेडकरांची तितक्याच प्रकर्षाने आठवण येते.

मी एमएला असताना दिलीपराव धारूरकर यांनी “वर्गात सध्या कोणते राजकीय विचारवंत शिकतो आहेस?” असे विचारले होते. मी “महात्मा गांधी” असे सांगितले. त्यावर त्यांनी “गांधीजींविषयी तुम्हाला वर्गात काय शिकविले?” असे विचारले. मग गांधीजींचे आंतरराष्ट्रीय योगदान स्पष्ट करण्यास सांगितले. मला हा पेपर शिकविणारे शिक्षक फारसे बहुश्रुत म्हणून प्रसिद्ध नव्हते. मीही फारसे समाधानकारक उत्तर देऊ शकलो नाही. त्यावर त्यांनी गांधीजींचा काळ,पहिले आणि दुसरे महायुद्ध, जगातील अनेक देशात भांडवली हुकुमशाहीचा झालेला उदय याचा प्रवास घडवून आणला. शेवटी ते म्हणाले, “गांधीजी नसते तर भारतात त्यावेळी एखादा हिटलर, मुसोलिनी जन्माला आला नसताच असे नाही. एवढेच नव्हे तर गांधीजींमुळे, गांधीवादी तत्त्वज्ञानामुळे दोन महायुद्धाच्या दरम्यान जगातील अनेक देशात भांडवली हुकुमशाहीचा उदय होण्यापासून थांबला.” राज्यशास्त्राचा विद्यार्थी म्हणून एक वेगळा दृष्टिकोन मला मिळाला. 

हे टिपण वाचल्यावर माझे वडील म्हणाले, “एक गांधीबाबा मी पाहिले होते.” मी म्हटले, “कधी? कुठे?” “चासमध्ये”, ते म्हणाले. गावातले कार्ले नावाचे वयोवृद्ध गृहस्थ स्वातंत्र्यसैनिक होते. शेवटपर्यंत गांधीवादी तत्त्वाने जगले. सगळा गाव त्यांना आदराने गांधीबाबा असेच म्हणत असे. ते स्वतः विणलेली जाडी भरडी खादी वापरत. चहा घेत नसत. त्यांनी कुठलीही पेन्शन घेतली नाही. पुढे वडील म्हणाले, “अभ्यासाचा भाग म्हणून शाळेत मीही सूत कातत असे. शाळेत आणि घरातही हातमागावर कापड विणत असे. कालांतराने बाजारातून आयते सूत आणून शाळेत जमा करण्याची चोरवाट राजमान्य झाली. नंतर हा मूलोद्योगही हद्दपार झाला.”

Thank U गांधीजी. तुमच्यामुळे मला माझ्या गावाविषयी आणि माझ्या वडिलांविषयी अधिक काही कळले.

आज इटलीमध्ये मुसोलिनीचे कौतुक करणाऱ्या महिला नेत्या आणि त्यांच्या पक्षाची बहुमताकडे वाटचाल सुरू असल्याचे वाचले. आणि गांधीजी पुन्हा आठवले. बस इतकंच. बाकी शून्य.

(लेखक राज्यशास्त्राचे संगमनेर महाविद्यालयात राज्यशास्त्राचे सहाय्यक प्राध्यापक आहेत)
९४२३७८३२३५

अभिप्राय 5

  • लेख छान आहे, आणि गांधीजींच्या विविध पैलूंचा उल्लेख आहे. परंतु सगळ्याच थोर महापुरुषांच्या आयुष्यात असे अनेक प्रसंग असतात कि त्यांनी त्या त्या वेळेला घेतलेल्या निर्णयामुळे किंवा धोरणांमुळे समाजाचे हित किंवा अहित दोन्ही होते. गांधीजींच्या बाबतीत ही तसेच आहे. गांधीजींनी आपल्या देशाला खूप काही चांगले दिले आहे ,पण त्याच बरोबर त्यांच्या काही निर्णयांमुळे किंवा धोरणांमुळे प्रचंड नुकसान ही झाले आहे उदाहरणार्थ खिलाफत चळवळीला पाठिंबा आणि देशाच्या फाळणीच्या वेळेस त्यांनी घेतलेली भूमिका.

  • खूपच छान व वेगळ.

  • राष्ट्र म्हणजे नेमकं काय हे गाँधीच जाणत होते.राष्ट्र म्हणजे फक्त ज़मीनीचा तुकडा नसुन त्यात राहणारा प्रत्येक देशवासीचं अस्तित्व पण राष्ट्रच आहे.त्याच्या मूलभूत गरजा ज़र तुम्ही पुरवु शकला नाहीं तर तुम्हाला राज्य करायचा अधिकार नाहीं हेच त्यांनी ब्रिटिश सरकारला फक्त निक्षुन सांगितलच नाहीं तर आपल्या कर्तत्वाने त्यांना करायला लावलं.कोणत्या मूलभूत गरजा आणि कोणाच्या?इंग्रज शासनाने आपल्या देशाच्या गरजा भागनण्यासाठी भरमसाट पैसा कमवण्यासाठी टिंबर करता रेल्वेचं जाळं पसरवलं.मीठावर अन्यायकारी कर बसवुन ८०% पैसा गरीब जनतेकडुन घेवुन त्यांना नागवलच नाहीं तर अक्षरशः लाखो गोर गरीबांना मीठाच्या अभावी मारलं.मैन्चेस्टरच्या कापड गिरण्यासाठी आमच्या गरीब शेतकर्यांना अन्नाजागी कापुस व कपडा रंगवायला नीळची शेती करायला लावली व अन्न सुरक्षेच्या अभावी चंपारनमधेपण लाखो गरीब शेतकरी मृत्युमुखी पडले दोनी अन्यायकारी कायदे गाँधीमुळे सरकारला रद्द करावे लागले.खाद्यान्ना बरोबर सामान्य देशवासी स्वतंत्र व्हावा म्हणुन विवेकानंदापासुन प्रेरणा घेत त्यांच्या हातात चरखा दिला.

  • गांधीजींची प्रत्यक्ष भेट न होता त्यांच्या अस्तित्वाची जाणीव अनेकवेळा झाली हे काहीसे आस्तिकाला येणाऱ्या गूढ अनुभवांसारखे छान वाटले.

  • खूप छान लेख

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.