मनोगत

ऑक्टोबरच्या अंकाचा विषय – नीतिनियम, न्याय-अन्याय – आम्हाला महत्त्वाचा वाटला होता. सोबतच वाचकांना आणि लिहिणाऱ्यांनादेखील तो तितकाच महत्त्वाचा वाटावा याचा अनुभव या अंकाच्या प्रकाशनानंतर आला. नीतिनियम, न्याय, अन्याय यांसारख्या विषयावर मूळ लेख भरपूर आले आणि प्रकाशित झालेल्या लेखांवर अभिप्रायही भरपूर आले. लोकांना या विषयावर बोलते व्हावेसे वाटले यासाठी हे उदाहरण पुरेसे आहे.

ह्या अंकासाठी लेख पाठवायला दिलेल्या मुदतीनंतरही अनेक लेख आमच्याकडे येत राहिले. तेव्हा या विषयावरील उर्वरित लेख काही काळानंतर परंतु ऑक्टोबर अंकाचाच भाग म्हणून प्रकाशित करावे असे ठरवले होते. ते लेख आता प्रकाशित करतो आहोत. या निमित्ताने एक चांगला विषय हाताळला गेला याचे समाधान आहे.

भारताचे आर्थिक धोरण, आर्थिक नीती, अर्थकारण आणि त्याचे राजकारण हा विषय ‘सुधारक’ने घ्यावा असे अनेकांनी अनेकदा सुचवले आहे. स्त्री-पुरुष संबंधातील वाढता मोकळेपणा आणि त्याचा स्वीकार या विषयावरही अतिशय परखडपणे लिहिण्याची आणि याविषयी समाजाची मनोवृत्ती तयार करण्याची गरज अतिशय प्रकर्षाने जाणवत राहते. हा विषयही ‘सुधारक’मध्ये घ्यावा असेही सुचवले जाते.

अशा काही महत्त्वाच्या वाटणाऱ्या विषयांचा ‘आजचा सुधारक’मध्ये समावेश करावा म्हणून पुढील अंकासाठी हेच आवाहन असेल. पुढच्या काही दिवसात त्याची यथायोग्य ईमेल तुम्हाला मिळेलच. हे फक्त सूतोवाच.

समन्वयक
आजचा सुधारक

अभिप्राय 2

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.