मेंदूचे अपहरण : निसर्गातील प्रभावी शस्त्र

उंदीर न घाबरता मांजरीकडे जाताना दिसला किंवा एखाद्या किड्याने पाण्यात उडी मारून जीव दिला तर आपल्याला नक्कीच आश्चर्य वाटेल. आपल्याला भास होतो आहे का असेही वाटू शकेल. पण निसर्गात सुरस आणि चमत्कारिक वाटणाऱ्या घटना घडत असतात, त्यात या आणि अशा अनेक आश्चर्यकारक गोष्टी खरोखरच घडतात. त्यांचा अभ्यास केला की दिसून येते की हीपण एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. मग लक्षात येते की स्वतःला किंवा स्वजातीच्या भाईबंदांना काहीही उपयोग नसलेली, किंबहुना अपायकारकच असलेल्या अश्या कृती हे सजीव स्वतःहून करत आहेत असे वाटले तरी त्यामागील बोलविता धनी इतर कोणी असतो. ‘हॅरी पॉटर’च्या प्रसिद्ध जादुई दुनियेवर आधारित अनेक पुस्तके आणि सिनेमे लोकप्रिय आहेत. यात imperius नावाच्या जादूला बळी पडणाऱ्या व्यक्ती जादूगार जे म्हणेल ते करू लागतात. तसाच प्रकार इथे होत असतो. 

निसर्गात प्रजातीय टिकून राहण्यासाठी प्रत्येक सजीवाला पुरेसे अन्न मिळवणे आणि सुदृढ संतती निर्माण करणे आवश्यक असते. नैसर्गिक घटनांपासून आणि शत्रूंपासून संरक्षण करण्यासाठी आडोसा किंवा ‘घर’ही शोधावे किंवा बांधावे लागते. प्रत्येक सजीवाला हे सर्व करताना संसाधनांसाठी इतर सजीवांशी स्पर्धा करावी लागते, याला कोणीही अपवाद नाही. कधी एकमेकांना मदत करून, संसाधनांची देवाण-घेवाण करून, कधी परोपकारामधून, कधी सरळसरळ युद्ध करून, तर कधी गनिमी काव्याने संसाधने मिळवली जातात. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. 

स्पर्धा अनेक प्रकारची, अनेक पातळ्यांवर असते. स्पर्धा एकाच प्रजातीच्या सजीवांमध्ये असू शकते; जसे साथीदारासाठी किंवा जागेसाठी एकाच जातीच्या प्राण्यांमध्ये भांडणे होतात. अन्नासाठी आणि निवाऱ्यासाठी वेगवेगळ्या प्रजातींमध्ये संघर्ष होऊ शकतो. त्याशिवाय प्रत्येक सजीवाचे शरीर म्हणजे तो सजीव आणि त्यामध्ये वास्तव्य करत असलेले असंख्य जीवजंतू (जीवाणू, विषाणू, अळ्या, एकपेशीय प्राणी) मिळून तयार झालेली एक संस्था असते. यात काही जीवजंतू सामोपचाराने राहणारे, तर काही निरुपद्रवी असतात. काही जंतू मात्र परोपजीवी आणि ज्या सजीवामध्ये राहतात त्याच्यासाठी, म्हणजे यजमानासाठी, अपायकारक असतात. मग जंतू आणि यजमान यांच्यात संघर्ष होतो. सर्व संघर्षामध्ये एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या वेगवेगळ्या युक्त्या प्रत्येक सजीव काढत राहतो तर त्याचे स्पर्धक त्यावर कुरघोडी करायचा प्रयत्न करत असतात. दुसऱ्या सजीवाच्या मेंदूवर, विचारप्रणालीवर नियंत्रण ठेऊन पहिल्या सजीवाकडून आपल्याला पाहिजे ते करून घेणे हा याच संघर्षाचा भाग आहे. 

सुरुवातीला उल्लेख केला त्या, पाण्यात जीव देणाऱ्या किड्यांना विशिष्ट जंतूचा संसर्ग झालेला असतो. रातकिडे आणि इतर काही किड्यांना हेअरवर्म (hairworm) नावाच्या जंतूचा संसर्ग झाल्यास त्याचे पर्यावसन किड्याच्या ‘आत्महत्ये’मध्ये होऊ शकते. यजमानाला संसर्ग केल्यानंतर कुठल्याही जंतूचा हेतू असतो पोषण मिळवणे, आपली प्रजा वाढवणे आणि वाढलेली प्रजा नवीन यजमानामध्ये जाण्याची सोय करणे. रातकिड्यांमधून पोषण घेऊन या जंतूंची वाढ होते खरी; पण प्रजननासाठी त्यांना पाण्यात जाणे आवश्यक असते. पाण्यापर्यंत पोचण्यासाठी ते किड्यांच्या मेंदूमध्ये काही असे रासायनिक बदल घडवतात की त्यामुळे किडे पाण्याकडे आकर्षित हातात. किड्यांनी पाण्यात उडी मारली की वाढ झालेले जंतू बाहेर पडतात. जंतू पाण्यात आपले जीवनचक्र सुरू करतात. किड्याच्या मेंदूमधील बदलही योग्यवेळी, म्हणजे जंतूंची वाढ झाल्यानंतर होतात, वाढ अपूर्ण असताना होत नाहीत. याचे ‘टायमिंग’ एकदम जमून येते आणि जंतूला हवे असेल तेव्हाच किडे पाण्यात उडी घेतात. पाण्यात उडी मारल्यावर किडे कधी मरतात तर कधी पाण्यातून परत बाहेर येतात. सध्याच्या संशोधनावरून असे दिसते की हेअरवर्ममुळे तयार होणाऱ्या रसायनांमुळे किड्यांच्या मेंदूमध्ये बदल घडून किडे दिव्याकडे आकर्षित होऊ लागतात. अश्यावेळी पाण्यामध्ये जेव्हा दिव्याचे किंवा चंद्राचे प्रतिबिंब पडते तेव्हा त्याला दिवा समजून किडे पाण्यात जात असावेत. हेअरवर्मची लागण झालेले आणि लागण न झालेले किडे अशा दोन गटांचा अभ्यास केल्यावर लागण झालेल्या किड्यांमध्ये दृष्टीसंबंधित प्रथिनांच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

मुंग्याही अशा प्रकारच्या मानसिक नियंत्रणाला बळी पडताना दिसून आल्या आहेत. मुंग्यांना Cordyceps प्रकारच्या बुरशीचा संसर्ग होऊ शकतो. मुंगीच्या शरीरामधून पोषण घेऊन बुरशी वाढते आणि वाढ पूर्ण झाल्यावर बुरशीचे बीजाणू (spore- म्हणजे ज्यापासून नवीन बुरशी निर्माण होते त्या पेशी) तयार होतात. तयार झालेले बीजाणू जेव्हा नवीन जागी पसरवण्याची वेळ येते तेव्हा बुरशी मुंगीच्या मेंदूवर परिणाम करणारी विशिष्ट रसायने निर्माण करते. या रसायनांमुळे मुंगी झुडुपाच्या किंवा झाडाच्या टोकाला जाऊन बसते आणि आपल्या तोंडाने पानांना घट्ट धरून ठेवते. त्यानंतर बुरशी मुंगीचा मेंदू खाऊन टाकते आणि त्यानंतर मेलेल्या मुंगीमधून बीजाणू बाहेर पाडतात. झुडुपाच्या वरच्या बाजूला असल्यामुळे हे बीजाणू हवेमधून सहजपणे आजूबाजूला पसरू शकतात. 

मुंग्यांना उंच जागी चढायला लावून आपला फायदा करून घ्यायची युक्ती लिव्हर फ्लूक (liver fluke) प्रकारामधील एक जंतूही वापरतो. मुंगी, गोगलगाय, आणि गवत खाणारे प्राणी असे तीन यजमान आपले जीवनचक्र पूर्ण करण्यासाठी या जंतूला (Dicrocoelium dendriticum) लागतात. चरणाऱ्या प्राण्यांमध्ये हे जंतू अंडी तयार करतात आणि त्यांच्या शेणावाटे ही अंडी बाहेर पडतात. तिथून अंडी गोगलगाईमध्ये जाऊन त्यापासून अळ्या तयार होतात. गोगलगाईमधील चिकट द्रवाच्या गोळ्यांमधून या वाढ झालेल्या अळ्या परत बाहेर टाकल्या जातात. हे गोळे मुंगी खाते आणि मुंगीच्या शरीरात या अळ्यांची पुढील वाढ होते. 

त्यापैकी एक अळी मुंगीच्या मेंदूमध्ये जाते आणि विशिष्ट रसायने बाहेर टाकते. सर्वसाधारणपणे रात्र झाली की मुंग्या आपल्या घरट्याकडे परततात, पण या रसायनाच्या प्रभावाखालील मुंगी घरट्यात परतण्याऐवजी गवताच्या पात्याच्या टोकाला, फुलाच्या पाकळीवर किंवा झुडुपाच्या टोकाला जाऊन बसते. मुंगी असलेले गवत प्राण्यांनी खाल्ले की जंतू परत प्राण्याच्या पोटात पोचतो आणि अंडी तयार करण्याच्या कामाला लागतो. लिव्हर फ्लूकचे जीवनचक्र असे पूर्ण होते. सकाळ होईपर्यंत गवत कोणीच खाल्ले नाही तर मुंगी जमिनीवर परत येते, दिवसभर रोजचे आयुष्य जगते, आणि रात्री परत गवताच्या पात्यावर जाऊन बसते. मुंगी खाल्ली जाईपर्यंत हे चालू राहते. माणसाचे जसे सीटी स्कॅन करतात, तशा प्रकारचे स्कॅन्स लिव्हर फ्लूकचा संसर्ग झालेल्या आणि संसर्ग न झालेल्या मुंग्यांमध्ये करण्यात आले. त्यात मुंगीच्या मेंदूमधील sub-oesophageal ganglion नावाच्या भागात अळी जाते असे दिसून आले आहे. मेंदूचा हा भाग मुंगीच्या चालीवर (locomotion) आणि जबड्याच्या स्नायूंवर नियंत्रण ठेवतो. या भागात विशिष्ट रसायने सोडून अळी मुंगीच्या हालचालींवर नियंत्रण ठेवते असे दिसते. ही रसायने कोणती हे मात्र अजून माहीत नाही.

एकूण मुंग्या बऱ्याच प्रकारच्या मानसिक नियंत्रणांना बळी पडतात असे दिसते. एका विशिष्ट प्रकारच्या मुंगीच्या (Myrmica schenki) घरट्यात काही सुरवंट (Maculina rebeli) घुसू शकतात. मुंग्यांचे स्वतःचे वास आणि त्या एकेमकांशी संवाद साधताना करतात ते आवाज ‘कॉपी’ करून सुरवंट मुंग्यांच्या घरट्यात शिरतात. राणी मुंगीमध्ये रूपांतर होण्यासाठी मुंग्यांच्या अळ्यांना जे खास अन्न दिले जाते त्यावर हे सुरवंट ताव मारतात. पण वास्प प्रकारातील एका किड्याला (Icheumon eumerus) सुरवंटांची ही युक्ती माहीत असते आणि हा किडा या पोसलेल्या सुरवंटांचा अंडी घालण्यासाठी वापर करून घेतो. त्यासाठी हा किडा आपल्या शरीरामधून विशिष्ट रसायने बाहेर टाकतो. या रसायनांमुळे मुंग्या अचानक आक्रमक होऊन एकमेकींवर हल्ला करू लागतात. या भांडणाचा फायदा घेऊन किडा मुंग्यांच्या घरट्यात शिरतो आणि सुरवंटामध्ये आपली अंडी घालतो. एकूण “फोडा आणि राज्य करा” हे धोरण निसर्गामध्येही वापरले जाते. 

सुरुवातीला लिहिल्याप्रमाणे आपणहून मांजरीकडे जाण्याच्या उंदराच्या वागणुकीमागेही मानसिक नियंत्रण करणारा टॉक्झोप्लाझ्मा (Toxoplasma gondii) नावाचा जंतू आहे. या जंतूंचा संसर्ग झालेल्या उंदरामधील मानसिक बदलांमुळे त्यांना मांजराची आणि इतरही प्राण्यांची भीती वाटेनाशी होते. टॉक्झोप्लाझ्मा मुख्यतः मांजरींना संसर्ग करतो पण त्याचबरोबर माणसाला आणि इतर अनेक प्राण्यांना संसर्ग करून अलैंगिक प्रकारे वाढू शकतो. पण या जंतूचे लैंगिक प्रजनन फक्त मांजरवर्गाच्या प्राण्यांच्या आतड्यामध्ये होऊ शकते, त्यामुळे उंदरासारख्या प्राण्यामधून मांजरामध्ये येणे या जंतूसाठी फायद्याचे असते. संसर्ग झालेल्या उंदरांची मांजरांजवळ जाण्याची शक्यता वाढवण्यासाठी उंदरांना भीतीच कमी वाटेल याची व्यवस्था हा जंतू करतो आणि निसर्गात आपली संतती टिकून राहण्याची सोय करतो. 

सर्वसाधारणपणे मांजरीचा किंवा मांजरीच्या लघवीचा जिथे वास असेल, तिथून उंदीर दूर जातात. उंदरांमध्ये मांजरीबद्दलची ही भीती जन्मजात असते. पण जंतूंचा संसर्ग झालेल्या उंदरांमध्ये ही भीती नाहीशी होते. त्याउलट काही नर उंदीर या वासाकडे आकर्षित होतात, म्हणजे काही उंदरांना हा वास मांजरीऐवजी संभाव्य जोडीदाराचा आहे असे वाटू लागते. टॉक्झोप्लाझ्माचा संसर्ग झालेले उंदीर नवीन जागांमध्ये जायलाही कमी बिचकतात, ते मोठ्या प्रमाणात नवीन जागांमध्ये फिरतात आणि जास्त अंतरही फिरतात. ‘जोखीम’ उचलण्याकडे त्यांचा जास्त कल असतो. संसर्ग झालेले आणि न झालेले उंदीर मांजरीच्या लघवीच्या वासाला प्रयोगशाळेमध्ये कशा प्रकारचा प्रतिसाद देतात आणि तेव्हा त्यांच्या मेंदूमधील कोणते भाग त्याला प्रतिसाद देत असतात याचा अभ्यास करून ही माहिती मिळाली आहे. 

या बदलांमुळे निसर्गात त्यांचा मांजराशी आणि इतरही प्राण्यांशी संबंध येण्याची शक्यता वाढत असावी. त्यामुळे मांजर आणि इतरही प्राण्यांमध्येही हा जंतू उंदरामार्फत पसरायची शक्यतासुद्धा वाढत असावी. टॉक्झोप्लाझ्मामुळे भीतीच्या भावनेवर नियंत्रित ठेवणाऱ्या मेंदूमधील amygdala या भागावर परिणाम होतो असे दिसून आले आहे. त्याचबरोबर या भागाचे नियंत्रण करणाऱ्या vasopressin आणि dopamine या रसायनांचे प्रमाणही संसर्ग झालेल्या उंदरांमध्ये जास्त असते. पण हे नेमके कसे होते आणि त्याचे नक्की काय परिणाम होतात याबद्दल संशोधन चालू आहे. टॉक्झोप्लाझ्माचा माणसालाही संसर्ग होतो पण बहुतांश लोकांमध्ये काहीही लक्षणे दिसून येत नाहीत. माणसामध्ये दिसणारे डिप्रेशन, बायपोलर डिसॉर्डर यासारखे मानसिक आजार कदाचित या जंतूमुळे होऊ शकतील असे एक गृहीतक गेल्या काही वर्षांमध्ये मांडण्यात आले आहे. पण त्यासंबंधी अजून विशेष संशोधन झालेले नाही, त्यामुळे मांजरे पाळणाऱ्यांनी घाबरायचे कारण नाही. मात्र मांजरीला हात लावल्यानंतर, विशेषतः मांजरीच्या पिल्लांना हात लावल्यावर किंवा पिल्ले राहत असलेली जागा साफ केल्यानंतर हात स्वच्छ धुतले पाहिजेत. टॉक्झोप्लाझ्मामुळे मानसिक आजार होतात की नाही हे माहीत नसले; तरी त्याचा संसर्ग रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्यांना किंवा गर्भवती स्त्रियांना झाल्यास त्या आजारी पडू शकतात, गर्भावर विपरीत परिणामही होऊ शकतो. 

मेंदूचे असे नियंत्रण फक्त जंतूच करतात असे नाही. जगण्याच्या शर्यतीत असलेले इतर भाईबंदही ही पद्धत वापरतात. Crypt gall wasp हा एक प्रकारचा किडा ओक झाडाचे खोड पोखरून त्यात अंडी घालतो. झाडाच्या वाढीमुळे पोखरलेला भाग आपोआप बंद होतो आणि त्यात किड्याची अंडी आणि अंड्यामधून बाहेर येणाऱ्या अळ्या सुरक्षित राहतात. अळ्या वाढून बाहेर पडण्याची वेळ झाली की त्या खोड पोखरून बाहेर येतात. कधी याच भोकात दुसरे crypt-keeper wasp नावाचे किडेही अंडी घालतात. स्वतःच्या फायद्यासाठी crypt-keeper wasp च्या अळ्या पहिल्या अळ्यांच्या मेंदूमध्ये बदल घडवतात. या बदलांमुळे खोड पोखरून बनवलेले भोक छोटे असतानाच अळ्या भोक पाडायचे काम थांबवतात. इतकेच नाही तर पोखरणारी अळी या भोकात डोके घालते, पण डोके त्यात अडकून राहते आणि अळी मरून जाते. आता crypt-keeper wasp च्या अळ्यांना वाढीसाठी बंद आणि सुरक्षित जागा मिळते आणि मेलेल्या अळीमधून पोषणही मिळत राहते. वाढ पूर्ण झाल्यानंतर कडक खोड पोखरण्यापेक्षा मेलेल्या अळीचे मऊ डोके पोखरून बाहेर येणे सहज शक्य होते. एकूण crypt-keeper wasp चे संरक्षण, पोषण आणि खोडामधून सुटका हे सर्व प्रश्न सुटतात. Crypt gall wasp चा असा फायदा घेण्यासाठी crypt-keeper wasp च्या अळ्या त्यांचे भोक पाडण्याचे काम योग्य त्या वेळी कसे काय थांबवतात याचे उत्तर आज माहीत नाही. 

Jewel wasp प्रकारचे किडे संततीच्या वाढीसाठी मानसिक नियंत्रणाची अजून वेगळीच पद्धत वापरतात. या किड्याची मादी एका विशिष्ट प्रकारच्या कोळ्यामध्ये (Cyclosa argenteoalba) अंडे घालते. कोळ्यामध्ये अंडे उबते, अळी बाहेर येते, आणि कोळ्याच्या शरीरामधून पोषण घेऊ लागते. यजमानांचा असा फायदा घेणारे अनेक किडे असतात पण Jewel Wasp कोळ्याला अजून एक कृती करायला भाग पाडतात. ह्या अळीची वाढ होऊन कोशात जायची वेळ आली की अळी कोळ्याला विशिष्ट प्रकारचे धागे तयार करायला भाग पडते. कोळी सर्वसाधारणपणे दोन प्रकारचे धागे बनवतो; एक प्रकारच्या धाग्यांच्या जाळ्यामध्ये कोळी किडे पकडतो आणि दुसऱ्या प्रकारचे धागे वापरून कात टाकण्याच्या वेळी स्वतःसाठी कोष तयार करतो. Jewel wasp ची अळी कोळ्याला दुसऱ्या प्रकारचे पण मूळ धाग्यापेक्षाही जास्त मजबूत धागे तयार करायला भाग पाडते. असे धागे तयार झाले की अळी कोळ्यामधून उरलेसुरले पोषण घेते आणि कोळी मरून जातो. मग तयार धागे आपल्याभोवती गुंडाळून अळी आपल्या कोशामध्ये जाऊन बसते, आपले जीवनचक्र पूर्ण करू पाहते. ही माहिती मिळवण्यासाठी संशोधकांनी jewel wasp चा संसर्ग झालेले कोळी पकडून प्रयोगशाळेत आणले, त्यांचे जाळे तयार करतानाचे व्हिडीओ घेतले, आणि तयार होणाऱ्या धाग्यांवर संशीधन केले. 

सुदैवाने माणसामध्ये जंतूंमुळे मानसिक परिणाम होताना फारसे आढळलेले नाहीत. वर लिहिल्यापणाने टॉक्झोप्लाझ्माच्या संसर्गामुळे कदाचित थोड्या प्रमाणात मानसिक आजार होऊ शकतात असे गृहीतक आहे. कुत्रा आणि इतर प्राणी चावल्यामुळे होणाऱ्या रेबीज या आजारात मात्र आजार झालेल्या रुग्णांच्या मेंदूमधील काही रसायनांच्या पातळीबदलामुळे या रुग्णांमध्ये अनेक मानसिक बदल दिसून येतात आणि त्यांचे गंभीर परिणाम होतात. मेंदूवरील परिणामांमुळे या रुग्णांना खूप भीती वाटू लागते. साधा पाण्याचा आवाज आणि हवेची झुळूक आल्यासही या रुग्णांना खूप भीती वाटते आणि या भीतीपायी ते इतरांनाही इजा करू शकतात, त्यातून विषाणू पसरू शकतात. सुदैवाने हा आजार योग्यवेळी लस घेतल्यास पूर्णपणे टाळता येऊ शकतो. रेबीज सोडून माणसांमध्ये मोठ्या प्रमाणावर मानसिक परिणाम करणारे विषाणू आज तरी खात्रीपूर्वक माहीत नाहीत . 

माणसावर परिणाम करणारे विशेष जीवजंतू नसले तरी स्वतःवर मानसिक परिणाम करवून घ्यायची सोय माणसाने स्वतःच केलेली आहे. मानवनिर्मित अंमली किंवा मादक पदार्थांमुळे माणसाच्या विचारशक्तीवर परिणाम होऊन त्याची सारासार विचार करण्याची क्षमता बदलते, अनेकवेळा स्वतःवरील नियंत्रण जाते. यात दारू, सिगरेट, बिडी, तंबाखू, अफू, भांग, गांजा, हेरॉईन, आणि इतर अनेक पदार्थ येतात. हे पदार्थ घेतल्यामुळे या व्यक्तींना जे ‘चांगले वाटते’ ते मेंदूमधील काही रसायनांचे प्रमाण बदलल्यामुळे वाटते. एकूण मानवजातीमध्ये मानसिक परिणाम करणाऱ्या जंतूंची जागा या मानवनिर्मित पदार्थांनी घेतली आहे. अशा पदार्थांचे व्यसन लागल्यास त्या व्यक्तीला आणि तिच्या कुटुंबियांना, आणि समाजाला व्यसनाधीनतेची मोठी किंमत मोजावी लागते. व्यसन लागणे एक मानसिक आजारच आहे आणि तो बरा करण्यासाठी योग्य ते उपचार घेणे आवश्यक आहे. 

त्याशिवाय स्वतःच्या विचारांमधून इतरांची विचारशक्ती नियंत्रित करणे हा मानसिक परिणाम करण्याचा सर्वांत परिणामकारक मार्ग माणसाकडे आहेच. भारावून टाकणाऱ्या भाषणांमधून, लिखाणांमधून दुसऱ्यांना प्रभावित करून त्यांना विचार बदलायला लावणे हे दुधारी शस्त्र चांगल्या-वाईट दोन्ही कामांसाठी वापरता येते. पण प्रक्षोभक विचारांच्या प्रभावाखाली येऊन माणसे खून, दंगे, अत्याचार, किंवा आत्महत्याही करू शकतात. त्यात या घटनांचे समर्थन केले जाते, त्याला प्रोत्साहन आणि प्रतिष्ठा मिळताना दिसते तेव्हा या शस्त्राचे किती टोकाचे वाईट परिणाम होऊ शकतात हे लक्षात येते. इतर जीवजंतूंच्या प्रभावाखाली येऊन स्वतःला बळी देण्यासाठी गवताच्या टोकावर बसणाऱ्या किंवा एकमेकींवर हल्ला करणाऱ्या मुंग्या आणि विचारांच्या, अफवांच्या आहारी जाऊन इतरांवर, स्वतःवर अत्याचार करणारी माणसे यात काहीच फरक नाही. फरक तेव्हा असतो जेव्हा माणसे चिथावणीकडे दुर्लक्ष्य करून, त्यामागे खरा फायदा कोणाचा आहे याचा विचार करून सारासार विचार करू शकतात.

पूर्वप्रसिद्धी : प्रेरक ललकारी, अंक: डिसेंबर २०२२

अभिप्राय 3

  • प्राणी -जीव जंतूंची एवढी सगळी गुंतागुंत प्रथमच लेख वाचल्यामुळे कळली. खूप मजा वाटली. धन्यवाद.

  • आयुष्याची पन्नास वर्ष निसर्ग पाहतो आहे निसर्गात वावरतो आहे पण एवढी कपाट माहिती मिळाली नव्हती लेखकाला धन्यवाद.

  • माणसाच्या मेंदूचे अपहरण आता समाज माध्यमांकरवी होतच आहे असे वाटते. रशिया सारखा देश याद्वारे अमेरिकेमधील निवडणुकांच्या वर देखील प्रभाव टाकू शकतो. किंवा ट्रम्प सारखा माणूस रिपब्लिकनांच्या मेंदूवर ताबा मिळू शकतो. टीव्हीच्या माध्यमातून ठराविक प्रकारच्या बातम्या देऊन व काही गोष्टींच्या बातम्या दडवून ठेवून देखील हे काम होऊ शकते. जाहिरात कंपन्यांच्या प्रभावाखाली किंवा देशातील राज्यकर्त्या व्यक्तींच्या आदेशाने देखील हे काम होऊ शकते. टीव्हीवर आपल्याला म्हणजे आपल्या जागृत मनाला लक्षात येणार नाही इतक्या कमी वेळ (सब लिमिनिमल) काही शब्द किंवा वाक्य झळकवून जाहिरात कंपन्या हेच काम करू शकतात. किंवा तुमच्या मेंदूमध्ये एखादी चीप बसवून देखील मेंदूवर ताबा मिळवता येईल.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.