द मॅजिशियन – पुस्तक परिचय

कॉम टॉईबिन या आयरिश लेखकाची थॉमस मान याच्या चरित्राचा व वाङ्मयाचा वेध घेणारी ‘द मॅजिशियन’ ही कादंबरी नुकतीच वाचली. नोबेल पारितोषिक विजेत्या थॉमस मान या जर्मन लेखकाने लिहिलेले काहीही मी वाचलेले नाही तरीही ही कादंबरी मला अतिशय आवडली हे विशेष. मला ते ललित-चरित्र आहे असे म्हणावेसे वाटते. एका बहुप्रसवू लेखकाने कल्पनेच्या, अभ्यासाच्या आणि उपलब्ध सर्व साहित्याच्या साहाय्याने दुसऱ्या लेखकाच्या अंतरंगात शिरून ते वाचकांना उलगडून दाखवावे असा अनुभव देणारे हे पुस्तक सर्वांनी अवश्य वाचावे.

मान जर्मनीमध्ये जन्मला. वडील श्रीमंत व्यापारी आणि सिनेटर. आई कलासक्त. ब्राझिलमध्ये जन्मलेली आणि तेथील वातावरण न विसरू शकलेली, मनाने अजून ब्राझीलमध्येच जगणारी. त्यामुळे नवऱ्याच्या नातेवाईकांना परकी, नकोशी वाटणारी. वडिलांच्या मृत्यूनंतर श्रीमंती ओसरली. थॉमस आणि त्याचा भाऊ दोघांनाही लेखक होण्याची इच्छा होती. थोमासला आईचा म्हणावा तसा पाठींबा मिळाला नाही पण त्याला सुरुवातीपासून प्रसिद्धी, यश मिळाले. त्यातूनच त्याचे लग्न जुळले. ज्यू, पण जवळजवळ निधर्मी अशा कुटुंबात जन्मलेली त्याची बायको आणि तिचा जुळा भाऊ क्लॉज यांच्यात जगावेगळी वाटावी अशी जवळीक असते. लग्नानंतर मानची पहिली प्रसिद्ध झालेली आणि गाजलेली कथा जुळ्या बहीण-भावांच्या अशाच जोडीवर होती. 

हिटलरच्या उदयानंतर आणि नोबेल पारितोषिक मिळाल्यानंतर मानला जर्मनी सोडावा लागला. रुझवेल्ट अध्यक्ष असतांना अमेरिकेत त्याला प्रथम आश्रय आणि नंतर नागरिकत्व मिळाले. याबद्दलची त्याची कथा विलक्षण गुंतागुंत असलेली आणि रंजक आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीला अमेरिकन जनतेचा युद्धात पडण्यास विरोध होता. नंतर मात्र ते चित्र बदलले. हा बदल होत असताना मानला अमेरिकन जनतेच्या मूडशी जुळवून घेण्यात ‘वॉशिंग्टन पोस्ट’चे मालक युजिन मेअर आणि त्यापेक्षाही त्यांच्या बायकोची मदत आणि मार्गदर्शन कसे झाले ते वाचावेच असे आहे. महायुद्ध संपल्यावर पूर्व जर्मनीला मानने भेट देऊ नये म्हणून अमेरिकन सरकारच्या दबावाला न जुमानल्यामुळे अमेरिकेला त्याच्याविषयी वाटणारे प्रेम आटले. शेवटी त्याने स्विट्झरलंडला स्थाईक होण्याचे ठरवले. येथे पुस्तक संपते.

दोन भावांमधील वैचारिक मतभेद, लेखक म्हणून परस्परांशी चाललेली स्पर्धा, युरोपातले राजकारण, यशस्वी बापाची तितकीशी यशस्वी नसलेली आणि काहीशी बेजबाबदार मुले, सुखी-समाधानी वैवाहिक आयुष्य वाट्याला येऊनही मानला असणारे समलैंगिक संबंधांचे आकर्षण हे आणि सोबतीनेच त्याच्या महत्त्वाच्या पुस्तकांची निर्मितीप्रक्रिया या सर्व गोष्टी योग्य प्रमाणात एकजीव झाल्यामुळे रसदार बनलेली ही कथा प्रत्येकाने चवीने वाचावी अशी झाली आहे.

409, रोहन सहनिवास, दहिसर (पश्चिम)

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.