स्वतंत्र विदर्भ राज्य : एक कटू-वस्तुस्थिती

मी ऐतिहासिक, भौगोलिक, सांस्कृतिक, तार्किक, आर्थिक आणि तद्विषयक संयुक्तिक/साधार दृष्टिकोनातून कट्टर विदर्भवादी असून तद्विषयक तथ्यात्मक वस्तुस्थितीचे पुनरावलोकन करून उद्विग्न होत असतो. विदर्भ राज्यविषयक संदर्भ असलेला १९५३ च्या नागपूर कराराचा आणि संविधानातील अनुच्छेद ३७१(२) मधील तरतुदींचा महाराष्ट्रातील आजवरच्या सर्वच राज्यकर्त्यांनी केलेला विश्वासघात तद्जनित बट्ट्याबोळासह संख्याशास्त्रीय संख्यात्मक आकडेवारी देऊन थकल्यावरही राज्यकर्त्यांच्याच नव्हे तर आम्हां तथाकथित वैदर्भियांच्याही कानावर अजूनही जूं रेंगू शकलेली नाही ही कटू वस्तुस्थिती आहे.

१९६० नंतरच्या गेल्या सुमारे ६२ वर्षांत सर्वाधिक कालावधीसाठी विदर्भाकडेच मुख्यमंत्रीपद राहूनही मुंबई नावाच्या मेनका, रंभा, उर्वशी यांनी आपल्या विश्वामित्रीकरणाच्या जाळ्यातून आमच्या वैदर्भीय मुख्यमंत्र्यांचीही सुटका होऊ दिली नाही. त्यामुळेच कदाचित संपूर्ण भारतात एकमेव अपवाद असलेले, पूर्वाश्रमीचे/स्वातंत्र्यपूर्व काळापासूनचे राजधानीचे शहर, प्रशासनिक व्यवस्थेच्या दृष्टीने सर्व सोयीसुविधांनी संपृक्त असलेले हे शहर तथाकथित उपराजधानी पदावर पदावनत झाले. आणि दुय्यमपेक्षाही खालच्या पायरीवर ढकलले गेले. ही कटू वस्तुस्थिती ऐतिहासिक तथ्य होऊन बसली आहे. १९५३ च्या नागपूर कराराचा विश्वासघात अजूनही कुतर्काधारित युक्तिवादांनी सजवला जातच आहे. आम्हा वैदर्भियांचा हा दुखरा कोपरा सक्षम व साधार संख्याशास्त्रीय आकडेवारीने मांडूनही परिणाम मात्र शून्यच नव्हे तर ऋणात्मकही दिसू लागला आहे. 

या संदर्भात हेसुद्धा नमूद करणे आवश्यक वाटते की, भारतीय हवामानशास्त्र विभागाने त्या त्या प्रदेशाची भौगोलिक वस्तुस्थिती व तेथे पडणारा पाऊस या विज्ञानाधारित पर्यावरणीय निकषांवर नैसर्गिकरित्याच देशाचे ३६ उपविभाग केले/कल्पिले आहेत. त्यानुसार तेलंगण, छत्तीसगड, झारखंड या नवीन राज्यांची निर्मितीसुद्धा करण्यात आली आहे. महाराष्ट्रातसुद्धा याच निकषाधारित चार उपविभाग (कोकण, मध्य/पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ) पडतात. पाऊस आणि भौगोलिक रचना यांनुसार त्या त्या उपविभागाचे जलचक्र निश्चित झाले आहे. पिके, पीकपद्धती, पशुपालन, पशुपालकांचे स्थलांतराचे मार्ग, मासेमारीचे हंगाम व विविध प्रकार, समाजजीवन, सांस्कृतिक जीवन – सण, उत्सव इत्यादी बाबी त्या त्या उपविभागाचे जलचक्र निश्चित करत असून या बाबींच्या मुळाशी मान्सून हा हवामानाधारित नैसर्गिक घटक आहे. पर्यायाने भौगोलिक वस्तुस्थिती अथवा हवामानशास्त्राची व तद्जनित मान्सूनची नैसर्गिक वस्तुस्थितीसुद्धा विदर्भाच्या ‘स्वतंत्र राज्य मागणी’ला एका अर्थाने पूरकच ठरते हे स्पष्ट आहे.*

अशा विविध दृष्टीकोनीय वस्तुस्थितीच्या प्रकाशात शंभर टक्के (कटू) वस्तुस्थिती स्पष्ट करणारे विदर्भवाद्यांचे विविध लेख, युक्तिवाद इत्यादी वाचून व ‘राज्य सरकारचा विदर्भाबाबत दुजाभाव’ प्रत्यक्ष अनुभवून महाराष्ट्रातील सर्वपक्षीय राजकारण्यांच्याच नव्हे तर राजकीय, आर्थिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक, साहित्यिक, वगैरे सर्वच क्षेत्रातील बहुतांश घटकांच्या/व्यक्तिंच्या विदर्भद्वेषी भूमिकेबद्दल माझा स्वानुभवसुद्धा सादर करण्याची इच्छा होत आहे, म्हणूनच हा लेखनप्रपंच.

‘लोकसत्ता’च्या नागपूर आवृत्तीचे निवासी संपादक मित्रवर्य देवेंद्र गावंडे यांनी त्यांच्या एका लेखात वापरलेली वाक्ये, ”…. (आम्ही विदर्भाचे लोक…) राजांच्या काळात जहागीरदारीच्या माध्यमातून कुणाचे तरी बटीक म्हणून वावरण्यात आम्ही धन्यता मानली. नंतर इंग्रजांनी अक्षरशः लुटले तरी तोंडातून ‘ब्र’ निघाला नाही व आता अन्यायाचा रतीब सुरू असूनसुद्धा शांतच. हे किती काळ चालणार? जाब विचारण्याची वृत्ती (आम्हां वैदर्भीय) लोकांमध्ये केव्हा मूळ धरणार? प्रश्नच प्रश्न आहेत राव. काय करणार? आम्ही विदर्भाचे लोक असेच, प्रगतीच्या पाउलखुणा न जाणणारे!” अशी असून हे निदान कटू असले तरी वस्तुस्थितीनिदर्शकच आहे, असे मला स्वानुभवाने वाटते. आणि म्हणूनच, या विषयाचा एक अल्पस्वल्प अभ्यासक या नात्याने, मी या निदानाशीसुद्धा पूर्णतः सहमती व्यक्त करतोय. 

वस्तूतः महाराष्ट्रातील सारेच राजकीय पक्ष आणि राजकीय क्षेत्र हे मूलतः विदर्भद्वेषी नसले तरी आम्हां बहुतांश वैदर्भियांच्या सर्वच बाबतीतील भयंकर न्यूनगंडाबद्दल त्या सर्वच (विदर्भाबाहेरील) राजकीय पक्ष/क्षेत्र/धूरीणांना सुस्पष्ट जाणीव झाल्याने/असल्याने ते विदर्भाला अगदी सहजतेने व नेहमीच्या पद्धतीने डावलतात/अन्यायपूर्ण वागणूक देतात. आमच्या विदर्भावर आर्थिकच नव्हे तर राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक, साहित्यिक, शैक्षणिक, औद्योगिक, ऐतिहासिक, आदि सर्वच क्षेत्रविषयांत दुय्यम-तिय्यमपणाची वागणूक/अन्याय व अन्याय्य प्राधान्यक्रम लादूनही आम्हां बहुतांश वैदर्भियांना त्याचे जरासेही वैषम्य वा वाईट वाटत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि या कटू वस्तुस्थितीची संपूर्ण जाणीव विदर्भाबाहेरील वर नमूद सर्वच क्षेत्रविषयांतील कम-अस्सल/लहान-थोर सर्वच घटकांना असल्यानेच तशी हिंमत ते विदर्भद्वेषी आपल्या आचरणाने परिपूर्ण करतात. 

वर नमूद राजकीय ते साहित्यिक, शैक्षणिक क्षेत्रातील, विदर्भाबाहेरील कोणत्याही अगदी क्षुल्लकतम घटकालासुद्धा आम्ही बहुतांश वैदर्भीय महनीय, आदरणीय, विचक्षण, विद्वान, प्रबुद्ध, सुप्रसिद्ध, नामांकित, इष्टतम, आदि विशेषणांनी अगदी मढवून टाकतो व पर्यायाने त्यांना आपल्या डोक्यावर घेऊन नाचू लागतो, त्यांच्यासमोर बिनशर्त नतमस्तक होतो. याउलट विदर्भातील त्याच क्षेत्रातील व्यक्ती कितीही विद्वान, थोर, महनीय, इष्टतम वगैरे असली तरी ती व्यक्ती मात्र ‘घरकी मुर्गी दाल से भी बदतर’ या नात्याने आमच्याद्वारे सहज डावलली जाते. आणि तरीही आमच्या न्यूनगंडापायी आम्हाला याची काहीच लाज-शरम न वाटता, उलट आम्ही आमच्या या न्यूनगंडाला आणखी-आणखी कवटाळू लागतो, आमच्या या न्यूनगंडीय गंडालाच साष्टांग दंडवत वगैरे करून ‘त्यांचे’ अंध समर्थनसुद्धा करू लागतो व आपल्याच बांधवांशी ‘त्यांच्या’ वतीने भांडूही लागतो. किंवा न्यूनगंडापायी मूक-बधीर होऊन जातो.

याच संदर्भात आणखी एक कटू वस्तुस्थिती मांडावीशी वाटते की, आपला महाराष्ट्र हा ‘दगडांच्या देशा’ असला तरी याच शब्द-संकल्पनेत लिहायचे/बोलायचे झाल्यास आपला आजचा संपूर्ण महाराष्ट्र हा कितीतरी क्षेत्रात ‘हिमालयाच्या देशा’ सुद्धा आहे. ही अतिशयोक्ती नसून अकाट्य अशी सर्वार्थाने सत्य वस्तुस्थिती आहे, हे कोणालाही नाकारता येत नाही. पण म्हणून आम्ही वैदर्भियांनी आपले वेगळे वैशिष्ट्य, वैभव व अस्तित्व आजच्या या महाराष्ट्रात विलीन करून दुय्यम-तिय्यम दर्जाची वागणूक अंगिकारावी, हे मात्र शक्य होऊ शकत नाही.

साहित्य या क्षेत्राबद्दलच बोलायचे झाल्यास मी निवृत्तीपर्यंत आधाशी वाचक व निवृत्तीनंतर पूर्ण वेळ वाचक असल्याने मला मराठी साहित्यक्षेत्रातील महाराष्ट्रीय ‘हिमालयां’चा स्वाभाविक अभिमान आहे. परंतु हे मराठी ‘साहित्य-हिमालय’ महाराष्ट्राच्या कोणत्यातरी एखाद्या ‘भागात’च (विदर्भ वगळून उर्वरित भागातच) एकवटले असल्याची मांडणी मात्र मला मान्य करता येत नाही. वस्तूतः मराठी साहित्यक्षेत्रातील कितीतरी ‘हिमालय’, महाराष्ट्राच्या पूर्व (विदर्भ) ते पश्चिम (मुंबई) आणि उत्तर (नाशिक-धुळे) ते दक्षिण (कोल्हापूर) या संपूर्ण ‘भागां’त वास्तव्य करीत असले तरी काही मुंबई-पुणे येथील दीर्घ/दूरदृष्टीदोषाने ग्रस्त असलेल्यांना आमच्या विदर्भातील असे ‘हिमालय’ दिसतच नाहीत. हीसुद्धा एक कटू वस्तुस्थिती (शोकांतिका) आहे. 

आम्ही बहुतेक वैदर्भीयसुद्धा, आमच्या दुर्दैवाने, अशाच निकटदृष्टीदोषजनित न्यूनगंडाने ग्रसित असून आम्हाला विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रातील सच्च्या ‘हिमालयां’सोबतच तेथील काही ‘छोट्या छोट्या, नकली/छद्मी/प्रच्छन्न टेकड्या’सुद्धा ‘हिमालय’च वाटतात आणि आमचे वैदर्भीय ‘हिमालय’ मात्र ‘छोट्या छोट्या व क्षुल्लक टेकड्या’च वाटतात. पुणे, मुंबई, कोल्हापूर, वगैरे तर सोडाच पण औरंगाबाद, नांदेड, धुळे, नाशिक, रत्नागिरी, वगैरे भागातीलही काही ‘टेकडी-साहित्यिक’सुद्धा आम्हां काही वैदर्भियांना ‘हिमालय-साहित्यिक’ वाटतात व पर्यायाने आम्ही आमच्या ‘वैदर्भीय-हिमालयां’ना अशा ‘टेकडी-साहित्यिका’च्या मांडणीद्वारे टाळून/वगळून आपल्याच पायावर धोंडा मारू लागतो. हे सर्व आमच्या वैदर्भियांतील बहुतेकांच्या निकटदृष्टी-दोषजनित न्यूनगंडाच्या भयग्रस्ततेतूनच घडत जाते. ही कटू वस्तुस्थिती असून अजूनतरी ही दुर्दैवी वस्तुस्थिती नाकारता येत नाही. 

माझ्यासारखे काही ‘वाचक/अभ्यासक’(?) अशा प्रवृत्तीला विरोध दर्शवितात, तेव्हा आमच्या विदर्भातील हे न्यूनगंडाचे रोगी मूळव्याधीने ग्रसित होऊन त्यावरील औषधासाठी विदर्भाबाहेरील त्या तथाकथित ‘वैद्यां’च्या द्वेषमूलक व अहंग्रस्त उपचारांचीच मदत घेऊ लागतात. आणि त्या निर्लज्ज औषधाची मात्रा घेऊन माझ्यासारख्या वाचकांना/अभ्यासकांना दाबून टाकण्याचे प्रयत्नच नव्हे तर षडयंत्र करू/रचू लागतात. 

माझ्या दुर्दैवाने म्हणा किंवा सुदैवाने, मी माझ्या सहकार पणन विभागातील राजपत्रित पदाच्या नोकरीनिमित्ताने (कोंकण व खान्देश वगळता) जवळपास महाराष्ट्रभर (३० वर्षे) विविध ठिकाणी वास्तव्य करून राहिल्याने मला आम्हां वैदर्भियांची सर्वच बाबतीतील भयंकर न्यूनगंडाची जाणीव प्रकर्षाने छळत राहते. विशेषतः साहित्यिक, सांस्कृतिक, औद्योगिक आणि राजकीय क्षेत्रातील अतिभयंकर न्यूनगंड आम्हां वैदर्भियांची जणू ओळखच होऊन बसलाय, याचे मला खूप वैषम्य वाटते. आम्ही निदान भवभूतीला तरी आठवले पाहिजे, असे वाटून जाते. (विशेषतः राजकीय, सांस्कृतिक, औद्योगिक व साहित्यिक क्षेत्रातील आमचे भयंकर न्यूनगंड पाहून मला वाटते की आम्ही गैर-वैदर्भियांद्वारे खरोखरच डावलण्याच्याच व त्यांच्याद्वारे अन्याय सहन करण्याच्याच लायकीचे आहोत/असावेत की काय?) असो.

या संदर्भात मला मार्शल मॉकलुहान यांच्या एका प्रसिद्ध वचनाचे स्मरण होते. ते वचन असे – “The medium is the message.” – आम्हाला नेहमी ‘आशया’ची चिंता असते पण ज्या ‘माध्यमा’तून हा ‘आशय’ आमच्यापर्यंत येतो, त्याचे ‘गुणधर्म’ हादेखील एक ‘आशय’ असतो, असे मार्शल मॉकलुहान यांनी १९६४ सालीच म्हटले आहे. आणि आम्ही वैदर्भीय मात्र अजूनही नेमक्या या ‘माध्यमा’चीच अवहेलना करून आपल्याच पायावर धोंडा मारून घेत असतो, असे हे दुष्टचक्र आहे. 

एकंदरीत राजकीय ते साहित्यिक, सांस्कृतिक, औद्योगिक, आर्थिक आदि क्षेत्रातील प्रभावशाली घटक मूलतः/स्वभावतः विदर्भद्वेषी नसते/नसले तरी आम्हां बहुतांश वैदर्भियांचे सर्वच बाबतीतील भयंकर न्यूनगंड पाहून/जाणून ‘ते’ आमच्यावर धडधडीत अन्याय करण्याचे, आम्हाला डावलण्याचे, आम्हाला दुय्यम/तिय्यम समजण्याचे, वगैरे साहस सहजप्रेरणेनेच करतात व विदर्भद्वेषी होऊन बसतात, ही कटू वस्तुस्थिती विसरता येत नाही. 

(*या परिच्छेदात नमूद काही विचार ‘सर्वंकष’ (एमेजू-२०२२) मध्ये प्रकाशित सुनील तांबे यांच्या ‘केंद्रित आणि विकेंद्रित’ या दीर्घ लेखातील काही तत्सम विचारांवर आधारित आहेत.)

बोरकन्हार-441902, जि.गोंदिया (विदर्भ-महाराष्ट्र)

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.