नास्तिकवादः एक अल्प परिचय

अगदी लहानपणापासूनच आपल्यावर संस्काराच्या नावाखाली देव-धर्म यांची शिकवण दिली जाते. पालकांना जरी देव-धर्माचे अवडंबर पसंद नसले तरी समाजात वावरताना त्यांच्या मुलां/मुलींची कळत-नकळत देव-धर्माची, पुसटशी का होईना ओळख होते. सण-उत्सव साजरा करत असताना देव-धर्माच्या उदात्तीकरणाला पर्याय नसतो. कुठल्याही गावातील वा शहरातील गल्लीबोळात एक फेरी मारली तरी कुठे ना कुठे देऊळ दिसते. या देवळाच्या गाभाऱ्यातील देवाच्या/देवीच्या मूर्तींची मनोभावे पूजा-अर्चा करणाऱ्यांची कधीच कमतरता नसते. 

परंतु एकविसाव्या शतकात वावरताना आजच्या पिढीतील विचार करू शकणाऱ्या तरुण/तरुणींच्या मनात देव-धर्म, पूजा-अर्चा, सण-उत्सव, जत्रा-यात्रा इत्यादींच्याबद्दल नक्कीच प्रश्न पडत असतील. त्या प्रश्नांना उत्तरे शोधत असताना विवेकवादी समाजसुधारकांनी सुचविलेले विचार त्यांच्या वाचनात आलेही असतील. आपापल्या बौद्धिक कुवतीप्रमाणे या गोष्टींचा ऊहापोह झाला असेल, मित्र-मैत्रिणीत चर्चाही झाली असेल. अशा (गंभीर) वाचनातून वा चर्चेतून आणखी प्रश्न, त्यांना उत्तर,परत प्रश्न व परत उत्तर…. अशा चक्रव्यूहात सापडलेलेले असताना कधीतरी नास्तिकवाद वा नास्तिकता असले शब्द नक्कीच त्यांच्या वाचण्यात/ऐकण्यात आले असतील.

गंमत म्हणजे नास्तिकवाद हा विषय नेहमीच वेगवेगळ्या मत-मतांतराच्या भोवऱ्यात सापडलेला असतो. कारण मत व्यक्त करणारी व्यक्ती जाणते–अजाणतेपणे आपल्यावरील देव-धर्माच्या संस्कारातूनच चर्चेत भाग घेत असते, व भविष्याकडे बघत असते. त्यामुळे नास्तिकवादावरील चर्चा बुद्धिनिष्ठतेच्या कसोटीला कधीच उतरत नाही. तरीसुद्धा या पार्श्वभूमीची जाण असलेले तत्त्वज्ञ, विचारवंत पुन:पुन्हा हा विषय ऐरणीवर आणतात व आपल्या ज्ञानात भर घालतात. 

मुळात देव मानणाऱ्यांच्या मनात नास्तिक माणसाबद्दलची एक ढोबळ प्रतिमा उभी असते. सामान्यपणे नास्तिक म्हणजे नकारात्मक विचार करणारे, बिनकामाचे, सगळ्या गोष्टीत (उगीचच) अडथळे आणणारे, अध्येमध्ये नाक खुपसणारे, मौजमजा न करणारे, संवेदनाविहीन असणारे, नैतिकतेची चाड नसणारे, मानवीयतेचे अंश नसणारे…. इ.इ. गुणदोष असणारे असे गृहीत धरले असते. नास्तिकतेची बाजू मांडणाऱ्यांना महाभयंकर वा मनोरुग्ण (स्क्रू ढिला असलेला) असेही समजणारे अनेक असतात. जनमनावर या मानसिकतेचा असलेला पगडा सहजासहजी पुसला जाणारा नाही. त्यांच्या पूर्वग्रहदूषित दृष्टीतही फरक पडणार नाही. त्यामुळे अशा लोकांच्या मताबद्दल दुर्लक्ष करून नास्तिकवाद म्हणजे नेमके काय, नास्तिकांच्या नैतिकतेच्या कल्पना काय असतात, नास्तिकतेची गरज का आहे, नास्तिकतेचा इतिहास, नास्तिकतेचा देव-धर्माला असलेला विरोध, इत्यादी गोष्टी समजून घेतल्यास त्यातून नास्तिकतेची व्यवस्थित ओळख होऊ शकेल.

नास्तिकतेची व्याख्या
नास्तिकतेची व्याख्या करणे फारच सोपी व सरळ अशी बाब आहे. देव-देवतांसारख्या अमूर्त गोष्टीवर विश्वास नसणाऱ्यांना आपण ढोबळमानाने नास्तिक असे म्हणू शकतो व त्यांच्या वैचारिकतेला नास्तिकता असे संबोधू शकतो. नास्तिकता म्हणजे केवळ परमेश्वराचे अस्तित्व नाकारणे एवढेच नसून त्याही पलीकडे जाणारी ही संकल्पना आहे. याच व्याख्येची व्याप्ती थोडी वाढविली; तर या जगात अतींद्रिय व/वा अलौकिक शक्तींना नकार देणे हेसुद्धा नास्तिकतेच्या परिप्रेक्ष्यात येते. याचाच अर्थ आत्म्याचे अस्तित्व, पाप-पुण्य, पवित्र-अपवित्र, पुनर्जन्म, भूत, पिशाच योनीचे अस्तित्व, कर्मविपाकसिद्धांत, दैवी शक्ती, चमत्कार, मुहूर्त, ज्योतिष, भाकिते, इत्यादींना अमान्य करणे असाही अर्थ त्यातून ध्वनित होतो. खरे पाहता नास्तिकतेच्या प्रारंभीच्या काळात ईश्वराचे अस्तित्व नाकारून वर उल्लेखितपैकी दुसऱ्या एखाद्या बाबीवर विश्वास ठेवण्याची शक्यता असते. त्यांनाही आपण नास्तिक म्हणू शकतो. परंतु नास्तिकतेबद्दलची जाण जसजशी वाढत जाते तसतसे या दुय्यम दर्जाच्या समजुतीही आपोआप गळून पडतात व काही काळानंतर आपली अशी समजूतच किती हास्यास्पद होती व किती क्षुल्लक होती याची जाणीव होऊ लागते. 

अज्ञेयवादी
नास्तिकवाद फक्त ईश्वर वा ईश्वराची अनेक रूपे यांनाच विरोध करणारा नसून अज्ञेयवाद्यासारख्या कुंपणावरील, ना इकडे ना तिकडे याचाही विरोध करणारा आहे. नास्तिकता फक्त आस्तिकांच्या परमेश्वरावरील विश्वासाचा विरोध करत नसून परमेश्वर असूही शकेल वा नसेलही या डोलायमान अवस्थेलासुद्धा पूर्णपणे नाकारते. अज्ञेयवादी मात्र परमेश्वराच्या अस्तित्वाबद्दल साशंक असतात, म्हणून या शंकेचा अर्थात परमेश्वराच्या अस्तित्वाचा सोक्षमोक्ष लागेपर्यंत “देव-देवस्की करायला काय हरकत आहे” यावर किंवा “हेच विवेकी आहे” यावर भर देत असतात. अज्ञेयवाद ही एक मध्यममार्गी भूमिका असून ईश्वर आहे किंवा नाही ही टोकाची गृहिते सिद्ध करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे फुकाची डोकेफोड आहे असे आपल्या भूमिकेचे समर्थन अनेक अज्ञेयवादी करत असतात. केवळ ईश्वरावर विश्वास असणारे वा नसणारे यापेक्षा अज्ञेयवादी वा नास्तिक फार वेगळे असतात, हे मान्य करायला हवे. 

इहवादी
नास्तिकांच्याविषयी विधान करत असताना ते पूर्णपणे इहवादी असतात असा त्यांच्याबद्दल अजून एक दावा केला जातो. इहवाद म्हणजे जे अस्तित्वात आहे त्याच्यावरच भर देणे. त्यामुळे नास्तिक भौतिकी, रसायनशास्त्र, जीवशास्त्र इत्यादी विज्ञानशाखांच्या आधारावरून प्रत्येक संकल्पनेचा शोध घेत असतात. या विज्ञानशाखेतील काही सिद्धांत वा नियम त्या अर्थाने अस्तित्वात आहेत असे वाटत नसले तरी त्यांना ते कधीच अव्हेरत नाहीत.

जडवादी
बहुतेक नास्तिक एका अर्थाने जडवादी (भौतिकवादी) असतात. यावरून नास्तिकवादाची कल्पना बहुतांशपणे नैसर्गिकवादावर आधारित आहे असे म्हणता येईल. लौकिकात जे अस्तित्वात आहे त्यावर विश्वास ठेवणे हा नैसर्गिकवादाचा मुख्य गाभा असतो. यात अलौकिक व अनैसर्गिक गोष्टीवर विश्वास न ठेवणे अंतर्भूत असते. त्याचप्रमाणे आपण भौतिक जगात वावरतो हे स्पष्टपणे स्वीकारणे अपरिहार्य ठरते. त्यामुळे नास्तिक जडवादी असतात परंतु जडवादी नास्तिकच असू शकतील असे म्हणता येणार नाही. एक मात्र खरे की जडवाद्यांना अभिप्रेत असलेल्या जगातील यच्चावत वस्तूंची निर्मिती इतर वस्तूंमधूनच झालेली असते व त्या वस्तू जगात कुठेतरी किंवा कुठल्यातरी स्वरूपात अस्तित्वात असतात. त्यामुळे आत्मा, भूत, पिशाच्च, वा त्याबद्दलच्या कल्पना यांना या अस्तित्वात असलेल्या जगात वाव नसतो. जडवादाबद्दलचे हे स्वरूप बहुतेक नास्तिकांना मान्य असावे. 

टोकाच्या जडवादात जे प्रत्यक्षात नाही ते अस्तित्वातच नाही हे विधान अंतर्भूत झालेले असते. त्यामुळे विचार व कल्पनासुद्धा बाद ठरतात. कारण विचार वा कल्पना आपण मूर्त स्वरूपात अनुभवू शकत नाही. त्यामुळे टोकाचा जडवाद पचायला फार कठीण असू शकतो. कारण विचार, कल्पना, इत्यादी गोष्टी मनाशी संबंधित असतात व आपण सहजपणे त्यांचे अस्तित्व नाकारू शकत नाही. जडवादातील टोकाची भूमिका नाकारल्यास सर्व जडवादी इंद्रियगम्य वास्तवात असलेल्या वस्तूंना मान्यता देत असतात. याचा अर्थ जडवादी मनाचे अस्तित्व नाकारतात असे नव्हे. 

इंद्रियगम्य वस्तू
खरे पाहता मन (माइंड) व वस्तू (मॅटर) हे दोन्ही एकाच गोष्टीची दोन रूपे आहेत हे गृहितक चुकीचे ठरेल. मन हे मेंदू या वस्तूतून उद्भवले असून जगात मनाला अनुभवाला येणाऱ्या वस्तू व इंद्रियगम्य वस्तू असे काहीही वेगळे नसते. उदाहरण म्हणून प्रेम ही कल्पना विचारात घेता येईल. प्रेम ही काही दाखवता, ऐकता वा स्पर्श करून कळणारी गोष्ट नव्हे. तरीसुद्धा प्रेमाची नेमकी संकल्पना बहुतेकांनी आपापल्या अनुभवावरून बनवली असते. प्रेमाला अस्तित्व आहे. परंतु प्रेम वस्तूच्या स्वरूपात नाही. या विचाराशी आपण सहमत असल्यास मनोनिर्मित गोष्टींबद्दल तक्रार करण्यास वाव नाही. पण अशा गोष्टींना अतींद्रिय या सदरात समाविष्ट करणे चुकीचे ठरेल. 

त्यामुळे नास्तिक हा फक्त इंद्रियगम्य वस्तूंनाच मान्यता देतो व इतर गोष्टींना नाकारतो हे तितकेसे खरे नाही. त्याचा इंद्रियगम्य वस्तूंवर विश्वास नक्कीच आहे. त्याचप्रमाणे मनातून उद्भवलेल्या सौंदर्य, भावना, नैतिकता इत्यादी गोष्टींवरही – ज्यामुळे मानवी जीवनाला अर्थ प्राप्त होतो अशा सर्व गोष्टींवरही त्याचा विश्वास असतो. यावरून नास्तिकता केवळ जडवाद नसून त्याची व्यापकता निसर्गवादापर्यंत पोचते. या निसर्गात जडवस्तूबरोबरच भावना, सौंदर्य, जाणिवा, स्वयंप्रेरणा, राग, लोभ इत्यादी गोष्टीसुद्धा आहेत याची कल्पना नास्तिकांना पूर्णपणे असते. म्हणूनच नास्तिक परमेश्वराचे अस्तित्व नाकारत असतानाच निसर्गाच्या सर्व व्यवहाराशी संबंध ठेवतो. त्यामुळे तो केवळ नकारात्मक असतो हा आरोप पूर्णपणे खोटा ठरतो. 

नास्तिकतेतील सकारात्मक गोष्टी अधोरेखित करणे वा धार्मिक श्रद्धांचे विडंबन करणे हा काही नास्तिकांचा उद्देश नाही. मात्र आस्तिक होण्यापेक्षा नास्तिक होणे किती कालसुसंगत आहे हे अधोरेखित करता येईल. काही टीकाकारांना हेही कदाचित पटणार नाही. त्यांच्या मते नास्तिकता हे धर्माचे बांडगुळ आहे. कारण याच्या नावातच न-आस्तिक म्हणजेच धर्म-देव यांना नकार. त्यामुळे यातून सकारात्मक काही मिळू शकेल याबद्दल त्यांच्या मनात शंका असते.

परंतु हे मत तितकेसे योग्य नाही. शब्दावरून आशयाचे निष्कर्ष काढणे किंवा त्याच्या मुळाशी जाऊन शब्दाचा अर्थ काढणे हे मुळातच चुकीचे असते. उदाहरणार्थ, इंग्रजी शब्द, ‘फिलॉसॉफी’. हा शब्द मुळात ग्रीक भाषेतील असून ‘ज्ञानावरील प्रेम’ या अर्थाने तो वापरला जात होता. आज मात्र हा अर्थ विसंगत वाटतो. ‘मिसळ’ या शब्दाचा अर्थ एकाच ठिकाणी जमा केलेल्या वेगवेगळ्या वस्तू. परंतु तो महाराष्ट्रातील एक खाद्यपदार्थ आहे, याची कल्पना केवळ शब्दावरून येत नाही. त्यामुळे ‘नास्तिक’ शब्दात आस्तिकतेला नकार हा अर्थ दडलेला असल्यामुळे नास्तिकतेच्या सर्व गोष्टीत नकार आहेत असे म्हणणे चुकीचे ठरेल. 

विज्ञानाचा चुकीचा अर्थ
काही धार्मिकांना आपल्या धार्मिकतेच्या व आस्तिकतेच्या पुष्ट्यर्थ विज्ञानाची ओढाताण करण्यात स्वारस्य असते. त्यामुळे विज्ञानजगतात काही नवीन शोधांची वा सिद्धांतांची मांडणी होत असल्यास त्यात त्यांना त्यांच्या देवाचे अस्तित्व दिसू लागते. विशेष म्हणजे हे सर्व नवीन शोध २-४ हजार वर्षापूर्वीच्या आपापल्या धर्मग्रंथात अगोदरच आहेत अशी शेखीही मिरवली जाते. डार्विनच्या उत्क्रांतीच्या संकल्पनेला न मानणाऱ्या काही व्यक्ती वा समूह, हे विश्व म्हणजे देवाची ‘बुद्धिमान संरचना’ (इंटेलिजन्ट डिझाईन) आहे, असा खोटा प्रचार करतात. त्यामुळे त्यांचा हा खोटा प्रचार खोडून काढण्याचे काम, नास्तिक म्हणविणाऱ्यांना करावे लागते. आपण माणूस म्हणजे जैविक गुणसूत्रांचे वाहक आहोत; निसर्ग हाच यातील सर्वश्रेष्ठ कारागीर आहे आणि कोणतीही दैवी शक्ती यामागे नाही. उत्क्रांती अतिशय सावकाशपणे होणारी प्रक्रिया आहे आणि त्यातील सूक्ष्म वैज्ञानिक बदल हे दैवी सिद्धांत मांडणाऱ्या लोकांतर्फे कधीच सांगितले जात नाहीत. धर्मग्रंथ हे तर्काच्या पलीकडे जाणारी विधाने करतात आणि ती विधाने सर्वसामान्य माणसाच्या सदसद्विवेकालासुद्धा बऱ्याच वेळा पटणारी नसतात. पुंजवादाची (क्वांटम सिद्धांत) मोडतोड करून परमेश्वराच्या अस्तित्वाला पुरावा आहे, असे ते बिनदिक्कत ठोकून देत असतात. 

मानवी मूल्य वाढविणारी मानसिकता 
आस्तिकांसोबत वितंडवाद करून आपला वेळ, श्रम व्यर्थ करण्यात हशील नाही. नास्तिकता ही एक मानवी मूल्यांचा आदर करणारी, त्या मूल्यांना वर्धिष्णू करणारी मानसिकता किंवा प्रवृत्ती (ॲटिट्यूड) आहे. आपण त्याला एक गुणविशेष (कॅरेक्टरिस्टिक) म्हणून दर्जा देण्याचीही गरज नाही. आपण फार वेगळे आहोत असेही समजण्याची गरज नाही. इतर धार्मिकांप्रमाणे आपण आपला पंथ वाढावा म्हणून प्रयत्न करण्याचीसुद्धा गरज नाही. ही एक हळूहळू वाढत जाणारी आणि स्वतःतच आमूलाग्र बदल घडवू शकणारी मानसिकता आहे. कुणीतरी सांगितले म्हणून वा कुणाचे तरी अनुकरण करणार म्हणून वा त्यातून काही फार मोठा फायदा मिळणार आहे म्हणून कुणीही नास्तिक होत नाही. ही मानसिकता कशामुळे तयार होते; ती कशी वाढते; वाढलेल्या मानसिकतेला जपण्यासाठी नेमके काय काय करावे लागेल; हे समजण्याचा प्रत्येकाचा वैयक्तिक मार्ग असू शकतो. आपापल्या क्षमतेप्रमाणे या प्रश्नांची उत्तरे सापडत जातील, मानसिकता वर्धिष्णू होत राहील.

एक मात्र खरे की माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. चार-चौघांत रमणारा आहे. नातेवाईकांत-मित्रमंडळीत सुख-दुःख, आनंद-समाधान वाटून घेण्यात त्याला रस असतो. एकमेकांना काही ना काही सांगावेसे वाटते, इतरांचे ऐकावेसे वाटते. आपण एकलकोंडे राहू शकत नाही. त्यामुळे आपल्या विचाराचे कुणी सापडल्यास मनाला बरे वाटते. समविचारी मान्यवरांच्या अनुभवाचे बोल ऐकून आपण परत आपापल्या कामाला लागतो. परंतु हे एवढे पुरेसे आहे का? आपल्या विचारांच्या बांधिलकीसाठी यापेक्षा जास्त काही आपण करू शकतो का? याचाही विचार करणे गरजेचे आहे असे वाटते. कारण आपण ज्या खडतर मार्गावरून जात नास्तिकतेची धुरा सांभाळली, त्याच खाचखळग्यांतून पुढच्या पिढीनेही जावे ही अपेक्षा योग्य ठरणार नाही.

त्यामुळे तर्क, बुद्धिवाद व वैज्ञानिक ज्ञान यांच्या आधारे जगू पाहणाऱ्या सर्वांनी मोठ्या आवाजात आम्ही निरीश्वरवादी आहोत, असे निर्भयपणे सांगितले पाहिजे. 

अभिप्राय 8

  • बहुतेक सर्व देवस्थाने, बाबा, बुवा आणि महाराज मंडळी काही ना काही सामाजिक उपक्रम आयोजित करून स्वतःला समाजाशी जोडून घेतात आणि आपल्या विचारधारेचा प्रसार करतात. नास्तिकांनी सुद्धा प्रसंगोचित पणे रक्तदान, अवयवदान, वृक्ष रोपण, लहान मुलांच्या स्पर्धा, पर्यावरण विषयक जागृती असे कार्यक्रम आयोजित करून स्वतःला समाजाशी जोडून घेतले पाहिजे. ह्यामुळे नास्तिकांचा मानवी चेहरा जगापुढे येईल आणि ही मंडळी अगदीच काही वाईट नसतात हा समज समाजात पसरू लागेल.

    • ज्यास्त काही आपण करू शकतो का ? हा प्रश्न अंतर्मुख करणारा आहे. गोपाळ गणेश आगरकरानी आपला इहवाद आचार, विचार,पोशाख,वैवाहिक जीवन, व्यापार इत्यादी प्रत्येक क्षेत्रात प्रभावित केला.

  • होय मी निरीश्वरवादी आहे. सुंदर लेख. माझ्या मनातील याचं भावना आहेत असा प्रत्यय देणारा

  • Ok

  • खूप विचार प्रवर्तक लेख आहे

    • लेखासाठी आभार!
      “तर्क, बुद्धिवाद व वैज्ञानिक ज्ञान यांच्या आधारे जगू पाहणाऱ्या सर्वांनी मोठ्या आवाजात आम्ही निरीश्वरवादी आहोत, असे निर्भयपणे सांगितले पाहिजे. ” या निष्कर्षाच्या विधानात ‘ तर्क,बुद्धिवाद व वैज्ञानिक ज्ञान यांच्या आधारे जगू पाहणारे’ या वर्णनाला विशेष महत्त्व आहे. हे वर्णन ज्या जीवनपध्दतीचे वर्णन आहे,ते जीवन ,अर्थात बुद्धिप्रामाण्यवादी अथवा नास्तिकवादी जीवन,कसे असते व त्या जीवनाची ‘विधायक’ बाजू कशी असते? असे विचारता येईल.
      पुढे असाही प्रश्न निर्माण होतो की,जगणे म्हणजे मानवी नीतीविषयी काही संकल्पना आत्मसात करून जगणे, नैतिक साध्ये व त्यांना अनुसरून साधने कार्यान्वित करत ‘मानवी श्रेय’ साधत जगणे.आता ,असे विचारता येईल की, मानवाने कसे जगावे? याविषयी बुध्दिवादाची,नास्तिकवादाची नेमकी भूमिका कोणती? आणि त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे,ती जगण्याची रीत नास्तिकाला कशी अवगत होते? तात्पर्य, बुद्धिप्रामाण्यवादी नीती म्हणून काही असेल तर तिच्यातील नैतिक तत्वांचे वा मूल्यांचे –स्वातंत्र्य,समता किंवा प्रेम ,मैत्री इ. यांचे –प्रामाण्य कशावर आधारलेले असते?
      एकूणच, नैतिक तत्वे सिध्द करण्याची बुद्धिप्रामाण्यवादी,नास्तिकवादी पध्दत आहे का? असेल तर ती कोणती?

    • 💯💯💯👌👌👌👌💐💐💐

  • लेख चांगला आहे. परंतु यात अज्ञेय वादी बद्दल चे विवेचन फारच वर वरचे आहे. मी स्वतःला अद्नेयावादी समजतो, आणि त्यामुळेच मी निरीश्वरवादी पण आहे. नास्तिकता हि विज्ञाना प्रमाणे खुली open असावी , म्हणजे विज्ञान जसे पुढे काही सध्याच्या पेक्षा वागले नजरेस आले तर ते तपासण्याची तयारी ठेवते, तशी मानसिकता सदैव असावी. पण आतापर्यंत च्या सर्व ज्ञानावरून जे निष्कर्ष आले आहेत ते ठाम पणे अवलंबून पुढे जावे. म्हणून मला निरीश्वर वाडी व अज्ञेय वाडी यात जास्त फरक वाटत नाही. अज्ञेय वादी व्रत विधी वगैरे करतात हे चूक आहे कारण आतापर्यंतच्या ज्ञानावर ते निरर्थक आहे हे सिद्ध झाल्यावर ते तसे करणार नाहीत. त्यांना कुंपणावर बसणारे म्हणणे बरोबर नाही. ते अर्थातच नास्तिक असतात, पण फक्त देवावर विश्वास असणे वा नसणे हाच आस्तिक नास्तिक चा निकष नसावा. याच्या वरच्या पातळीवर , सदैव विचारातील खुलेपण जसे विज्ञान ठेवते, तसे agnostic ठेवत असतो , निदान सैद्धांतिक पातळीवर.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.