डॉ. दाभोलकर आणि अधंश्रद्धा निर्मूलनाचे भावनिक अंतरंग

अंधश्रद्धांची मुळे कुठपर्यंत गेली आहेत याचा शोध घेऊन ती मुळापासून उखडून टाकली तरच अंधश्रद्धांचे खरे निर्मूलन होईल. ह्या मुळांचा शोध आपल्याला धर्मग्रंथांपर्यंत आणि धार्मिक संस्कृतीपर्यंत नेतो. या धार्मिक पायावरच घाव घालून अंधश्रद्धा निर्मूलन समितीने एक बुद्धिप्रामाण्यवादी चळवळ सुरू करावी असा सल्ला शहाजोगपणे बरेचजण देतात. त्यांचे हे विश्लेषण बरोबर आहे. परंतु त्यांनी सुचविलेला उपाय अव्यवहारी आणि चळवळीची व्याप्ती मर्यादित करणारा आहे. इ.स.पू. १००० वर्षांच्या लोकायतवादापासनूच्या विवेकवादी चळवळींचा ज्ञात इतिहास बघता बुद्धिप्रामाण्यवादी चळवळी क्वचितच जनचळवळी झालेल्या दिसतात. ह्या वास्तवापासनू बोध घेणे आवश्यक ठरते. 

धार्मिक ग्रंथ आणि धार्मिक संस्कार हे त्या त्या काळाच्या ज्ञानाचे आणि अज्ञानाचे चिरेबंद, चिरंतन करून ठेवलेले अस्थीस्थिर (fossilized) स्वरूप असते असे स्वा.सावरकर म्हणत. साडेतीन हजार वर्षांपूर्वीच्या ऋग्वेदात ‘हे विश्व केव्हा, कुणी व कसे निर्माण केले? की हे आपोआप निपजले? देव विश्वनिर्मितीनंतर आले का? अशा मूलगामी प्रश्नांचा उहापोह आढळतो. तर एकीकडे श्रद्धादेवीची प्रार्थनाही चालू असते. ‘आ नो भद्रा: क्रतवः यन्तु विश्वत:’ (सर्व विश्वातून चांगले विचार आम्हाकडे येवोत.) ‘तेन त्यक्तेन भुंजित:। मा गृध कस्यचित्धनम्।’ (दान हाच खरा उपभोग आणि कुणाच्या धनाचा लोभ धरू नका.) अशा अर्थाची नीतितत्वे ऋग्वेदात आणि ईशावास्योपनिषदात आढळतात. तसेच कर्मकांड, जारणमारण, जादूटोणा अशा विविध प्रकारच्या अंधश्रद्धाही धर्मग्रंथांच्या पानोपानी विराजमान झालेल्या दिसतात. धर्माची सुरुवात ही सत्याचा शोध घेण्यासाठी आणि पीडितांना दिलासा देण्यासाठी झालेली दिसते तर स्वार्थी राजकारणी आणि धर्ममार्तंड धर्माच्या नावाखाली रक्तपात करतात, शोषण करतात. तेव्हा देवधर्माबाबत नीरक्षीरविवेक बाळगणे उचित आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीची देवधर्माबाबतची भूमिका प्रगल्भ आहे. डॉ.दाभोलकर अंधश्रद्धेची एक सुटसुटीत व्याख्या उद्धृत करतात ती अशी, ‘माणसाचा मूल्यविवेक उन्नत करते ती श्रद्धा. आणि मूल्यविवेक अवनत करते ती अंधश्रद्धा.’ श्रद्धा विवेकशक्तीला उत्कटपणे कृतिशील बनविते. श्रद्धावान माणसाची कृती ही भावनेपोटी घेतलेल्या विवेकपूर्ण निर्णयाची अंमलबजावणी असते. भावना आणि बुद्धी ही माणसाच्या व्यक्तिमत्वाची दोन महत्त्वपूर्ण अंगे आहेत. तेथे भावना मालक असते तर बुद्धी नोकर असते. या भावनिक वर्चस्वामुळेच वैज्ञानिक दृष्टिकोन मागे पडतो आणि उच्चशिक्षित व्यक्ती वाहनाला लिंबूमिरची बांधताना दिसते किंवा वास्तुशांत करताना आढळते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम हे समाजबदलाचे काम आहे. येथे समाजाला समजेल, रुचेल अशा भाषेत संवाद साधणे आवश्यक ठरते. महात्मा गांधींनी धर्माच्या आधारे आपली चळवळ देशव्यापी केली. त्यात सर्वसमावेशकता आणली. त्यासाठी त्यांनी देवाचे ‘ईश्वर-अल्ला तेरो नाम’ असे नामकरण केले. संत नरसी मेहेतांनी दिलेली ‘वैष्णव जनाची’ व्याख्या स्वीकारून त्यांनी व्यवहारात, आचारात नीतीमत्तेचा, अहिंसेचा आग्रह धरला. डॉ. नरेन्द्र दाभोलकर महात्मा गांधींचे, त्यांच्या सत्य-अहिंसा तत्त्वाचे खरे वारस आहेत. हे सर्व समजून घेतले तर ‘स्वतःच्या थोबाडीत मारणे’, ‘स्वत:च्या रक्ताने सही करणे’, ‘स्वतःच्या तोंडाला काळे फासणे’ इत्यादी कायदा मंजूर करण्यास शासन करीत असलेल्या दिरंगाईचा निषेध करण्याचे हे मार्ग काहीजणांना वाटतात तसे ‘हास्यास्पद’ वाटणार नाहीत. तसे पहाता देशातील गरिबाशी नाळ जोडू पहाणारा म. गांधींचा ‘अर्धवस्त्र पेहराव’ही काहींनी चेष्टेचा विषय केला होता. 

धर्माची विधायक चिकित्सा करणे हे अंनिसच्या चळवळीचे एक महत्त्वाचे सूत्र आहे. कालबाह्य, अनिष्ट, जाचक अथवा पर्यावरणघातक धर्मप्रथांमध्ये समुचित बदल सुचविणे किंवा त्या बंद करणे हे त्यात मोडते. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे अंनिसची ‘पर्यावरणपूरक गणेशोत्सव’ ही मोहीम. नाशिक, पुणे, कोल्हापूर यांसारख्या मोठ्या शहरातून जेथे जेथे गणेश विसर्जनाने नद्या दूषित होण्याचा मोठा धोका असतो, अंनिस कार्यकर्त्यांनी सनातन्यांच्या विरोधाला तोंड देत ही मोहीम मोठ्या प्रमाणावर राबविली. विसर्जित मूर्ती गोळा करून त्या एखाद्या पडीक खाणीत व अन्य जागी गोळा करणे ज्यायोगे पाणीप्रदूषण होणार नाही, असा तो उपक्रम असे. “विसर्जित मूर्ती आम्हाला दान करा” असे आवाहन करीत कार्यकर्ते जेंव्हा नदीच्या घाटावर जमत तेंव्हा त्यांचा आवाज बुडवून टाकण्यासाठी थाळ्यांचा ठणठणाट करणारे सनातनी पुणेकरांनी पाहिले आहेत. इतकी वर्षे चळवळ केल्यानंतर आता मोठी जनजागृती झाली आहे. “निर्माल्य पाण्यात टाकल्याने पाणी शुद्ध होते. हा आमच्या धर्माचा प्रश्न आहे.” असे म्हणणाऱ्या भगव्या संघटना आता निर्माल्यापासनू जैविक खत बनविण्यासाठी सरसावल्या आहेत. नगरपालिका स्वत:हून विसर्जनासाठी हौद, कृत्रिम तलाव बांधीत आहेत. यावर्षी तर केन्द्रातील पर्यावरण, वन आणि हवामानबदल खात्याच्या राज्यमंत्र्याने गणेशमूर्ती विसर्जनासाठी मार्गदर्शक तत्त्वे सांगणारी जनहितार्थ जाहिरात प्रमुख वृत्तपत्रातून अर्धा पानभर एवढी दिली आहे. आता या मोहिमेची गरज संपली. ती सर्वांनी उचलून घेतली आहे. आपण त्यातनू ‘रिटायर’ व्हायला हरकत नाही असे डॉ. दाभोलकरांनी सांगितले. ह्यातील खासियत म्हणजे डॉ. दाभोलकरांनी गणेशमूर्ती पार्थिवाची (शाडूची) असावी यासाठी संस्कृत धर्मग्रंथातून संदर्भ शोधायचा प्रयत्न केला होता. लोकांच्या धर्मभावनांचा आदर करण्याकडे त्यांची प्रवृत्ती होती. गणेश बुद्धीची देवता आहे तेंव्हा गणेशोत्सवासाठी जमलेल्या पैशातील कमीत कमी २% रक्कम जवळच्या शाळेसाठी वा शैक्षणिक कार्यासाठी वापरावी असे खास कळकळीचे आवाहन ते करीत. आज सरकारी जाहिरातीत सजावटीसाठी वापरलेली कापडे जाळू नका, अनाथालयातील मुलांसाठी वापरा असे आवाहन करण्यात आले आहे. अंनिसच्या या मोहिमेला एक यशस्वी ‘रचनात्मक कामधंदा’’ म्हणून गौरवण्यास कुणाची हरकत आहे का? 

सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी न्यायव्यवस्था व शासन ह्यांच्यावरच अवलंबून रहाणे बरोबर नाही. बालविवाह, भ्रूणहत्या, हुंडापद्धती याबाबत कायदे असूनही हे प्रकार थांबले नाहीत. “अंधश्रद्धा निर्मूलनासाठी केवळ कायदा पुरेसा नाही. त्यात लोकांची मनोधारणा आणि दृष्टिकोन बदलणेही मुख्य बाब असते” हे म्हणणे पूर्णपर्ण संयुक्तिक आहे. अंधश्रद्धेचे प्रकार कमी करण्यात सामाजिक दबाव प्रभावी ठरतो. कायद्यामुळे हा सामाजिक दबाव वाढतो. कार्यकर्त्यांनी जीव धोक्यात घालून भांडाफोड केलेले बाबाबुवा आणि मांत्रिक कायद्याअभावी सहीसलामत सुटत. उदाहरणार्थ सोलापुरात पकडलेला हाताने हृदयाची शस्त्रक्रिया करणारा अस्लमबाबा. कायद्याचे पाठबळ अशावेळी पूरक ठरते. आजमितीस शेकडो गुन्हे ह्या कायद्याखाली नोंदविले गेले आहेत. असे म्हटले जाते की ‘लक्ष्याकडे जाण्याचा प्रवास हा लक्ष्य गाठण्याइतकाच किंवा त्याहूनही अधिक महत्त्वाचा असतो.’ त्यामुळे कायदा संमत होणे आणि त्यासाठी दिलेला लढा हे दोन्ही महत्त्वाचे आहेत. २० वर्षांहून अधिक काळ चाललेल्या या लढ्यात, निषेध म्हणनू सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे (वाहने जाळा वगैरे), जनसामान्यांचे जीवन कठीण करणे (रास्ता रोको वगैरे) असे लोकप्रिय आणि लक्षवेधी प्रकार कार्यकर्त्यांनी चुकूनही अनुसरले नाहीत. ‘कुठलीही चळवळ ही लोकशाहीला मंजूर अशा सनदशीर मार्गानेच चालविली पाहिजे’ हा महत्त्वाचा धडा कार्यकर्ते शिकले. डॉ. दाभोलकरांची पुण्यात दिवसाढवळ्या निघृण हत्या झाली. परंतु महाराष्ट्रभर सर्वदूर पसरलेल्या त्यांच्या हजारो कार्यकर्त्यांपैकी एकानेही एकही दगड फेकला नाही. आजच्या खळ्ळमखट्टच्या जमान्यात ही अंनिससंबंधी एक अत्यंत उल्लेखनीय बाब आहे. चळवळीत भाग घेत असताना डॉ. दाभोलकरांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांची जी जडणघडण झाली त्याला ह्याचे श्रेय जाते. 

समाज परिवर्तनाचे काम छंद म्हणून जोपासणे, चळवळीचा आनंद लुटणे, अंनिसमध्ये काम करताना गंमत, कुतूहल आणि रोमांच वाटणे ह्या गोष्टी कुणाला आक्षेपार्ह का वाटाव्या हे समजत नाही. डॉ.दाभोलकर नेहमी सांगत की जोवर काम करण्यात आनंद वाटतो आहे तोवरच काम करा. अंधश्रद्धांचा इतिहास पाच हजार वर्षांचा जुना आहे तर वैज्ञानिक दृष्टीकोनाचा विचार फक्त गेली पाच-सहाशे वर्षे सलगपणे मांडला जात आहे. तेव्हा आपल्या हयातीत अंधश्रद्धा नाहीशा होतील अश्या भ्रमात राहू नका. “इथे शतकांचा विचार करावा लागेल” असे डॉ.दाभोलकर म्हणत. 

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीत काही प्रखर बुद्धिवादीपण आहेत. परंतु समितीच्या व्यासपीठावरून ते अंनिसची देवधर्मासंबंधीची अधिकृत भूमिकाच मांडतात. हा जगन्नाथाचा रथ आहे. सर्वांनी ओढावा.

अभिप्राय 3

 • वरील लेखातील ‘ डॉ. नरेन्द्र दाभोलकर महात्मा गांधींचे, त्यांच्या सत्य-अहिंसा तत्त्वाचे खरे वारस आहेत.’ हे वाक्य.

  गांधीजींनी राजकारणात खरोखरच सत्य आणि अहिंसा यांचे पालन केले का ते पाहू या.*
  अ) ७ मार्च १९२० ला गांधीनीं असहकार कृती आंदोलनाची योजना जाहीर केली. त्या सबंधीत पत्रकात संपूर्ण राष्ट्रांला उद्देशून पुढील वचन दिले होते,

  *”जोपर्यंत मुसलमान मित्र आपल्या न्याय मागण्या प्राप्त करून घेण्यासाठी आवश्यक त्या संयमाने वागतील आणि जोपर्यंत माझी खात्री पटेल की त्यांना अत्याचार करण्याची इच्छा नाही तोपर्यंत मी त्यांना सहकार्य देणार आहे. ज्याक्षणी प्रत्यक्ष अत्याचार केला जाईल त्याक्षणी मी सहकार्य करण्याचे थांबवीन आणि प्रत्येक हिंदूला सहकार्य करण्याचे थांबवा म्हणून सांगेन.”* ( स.वा.१७/५४)

  पुढे असहकार चळवळीत मलबारमध्ये मोपल्यांनी १आँगस्ट १९२१ ला खिलाफत राज्य सुरू झाल्याचे जाहीर केले व हिंदूवर अनन्वित अत्याचार केले. हजारो हिंदूचीं कत्तल झाली, ४००० सक्तीने बाटवले गेले. इंग्रजी लष्कराने केलेल्या गोळीबारात २४०० मोपले ठार झाले व १७०० जखमी झाले. गांधीनीं जाहीर केल्याप्रमाणे या चळवळीतून अंग काढून घेऊन सर्व हिंदूनां सहकार्य करण्याचे थांबवा म्हणून सांगायला पाहिजे होते. *पण गांधीनीं हे केले नाही आणि वचनभंग केला.* *मोपल्यांच्या बंडात गांधीनीं आपल्या ‘अहिंसा , शांतता, विश्वास इत्यादी सत्याग्रहाच्या मुलतत्वांचा बळी पडलेला उघड्या डोळ्यांनी पाहिला, एवढेच नव्हे तर त्यावर कडी करून वचनभंग करून स्वहस्ते ‘सत्याचा’ आणि ‘नितिचा’ बळी दिला. त्यांच्या ‘महात्मा’पदाशी हे कितपत सुसंगत होते?*

  ( ब) पुढे १९ मार्च १९२० ला खिलाफतवाद्याच्यां सभेत भाग घेताना त्यांच्या रक्तमय क्रांतीच्या ठरावालाही पाठिंबा देऊन गांधीनीं अहिंसेचा गळा घोटला. या सभेत गांधी म्हणतात,
  *” हा लढा चालू असताना अनत्याचाराच्या धोरणाने त्या संयुक्त चळवळीत भाग घेणाऱ्यानां बांधून घेतले आहे; पण मुसलमानांवर खास जबाबदाऱ्या आहेत. न्याय मिळवण्याकरीता अनत्याचारी असहकारिताही जर यशस्वी झाली नाही तर मुसलमानांनीं इस्लाम धर्मग्रंथाप्रमाणे जे मार्ग सांगितले आहेत ते अनुसरण्याचा हक्क त्यांनी राखून ठेवला आहे. या ठरावाला माझा अंतःकरणपूर्वक पाठिंबा आहे.”* (स.वा. १७/७३)

  हे वाचल्यावर कोणीही ‘हतबध्द’ होईल. *या ठरावाला गांधीनीं विरोध करणे आवश्यक होते. कारण तो त्यांच्या अहिंसेच्या तत्वाच्या पूर्णपणे विरोधात होता.* मुसलमानांना त्यांच्या मागण्या प्रथम अनत्याचारी मार्गाने व त्याने नाही जमले तर अखेरीस कुराणात सांगितलेल्या मार्गाने म्हणजे *रक्तपातानेही मान्य करून घेण्याचा मुसलमानांना पूर्ण हक्क आहे,* असे मत गांधीनीं वरील परिषदेत स्पष्टपणे मांडले. *कुराणाप्रमाणे गांधी हे ‘काफिर’ होते व मुसलमानांचीं कोणती मागणी न्याय व नैतिक आहे हे ठरवण्याचा अधिकार एखाद्या काफराला नसतो तर फक्त मुसलमानाला असतो, हे गांधी विसरले असावेत.* कुराणाला एकदा प्रमाण मानल्यावर व कुराणाने दिलेले अधिकार वापरण्यास गांधीनीं स्वतःच पाठिंबा दिल्यानंतर कुराणाच्या आज्ञांतून निर्माण होणारी परिस्थिती (व त्यातून निर्माण होणाऱ्या मागण्या) गांधीनां व गांधीवाद्यानांही गांधीवाद जोपर्यंत अस्तित्वात आहे तोपर्यंत कश्या नाकारता येईल? *भविष्यात हिंदूस्थानच्या फाळणीला कोणत्या तत्त्वाच्या आधारे विरोध करता आला असता? कुराणप्रणीत मध्ययुगीन तत्त्व मान्य करून गांधीनीं त्यांच्या अहिंसेच्या तत्वाचीच कत्तल केली.*

  खिलाफत आंदोलनातील हिंसेचे स्वरूप पाहून भारत सेवक समाजाने खालील प्रतिक्रिया दिली. *’प्रेमाच्या व शांततेच्या निशाणाखाली द्वेषाच्या व हिंसेच्या शक्ती गोळा करणे, एका साध्या तत्त्वाने प्रत्येकाचे अंतकरण शुद्ध सोन्याचे बनेल अशी आशा धरणे, गवताच्या गंजीवर पेटलेली विडी फेकून देऊन त्याच्या परिणामाची सारी जबाबदारी वरकरणी साळसूदपणे अंगाबाहेर झुगारून देणे- हे वर्तन साधूच्या ठिकाणी सुद्धा विस्मयकारक आहे.’* (संकलित वाङ्मय खंड १९ लेख १८०)

  संजय लडगे 9354437258
  (सं.वा.- गांधीजींचे संकलित वांड्मय)

 • लेख चांगला आहे पण एक विधान पटले नाही. अंधश्रद्धा कमी करण्यासाठी शतके लागतील असे दाभोळकर म्हणतात. हा विज्ञान व तंत्रज्ञान,बुद्धिवाद व चिकित्सक विचारपद्धती यांच्यावर अविश्वास दाखवला आहे. वैज्ञानिक आणि विचारवंत यांनी विज्ञान प्रसाराचे पुरेसे प्रयत्नच केले नाहीत हेच खर यामागच कारण आहे.आपल्याकडे देवळांची जी संख्या आहे त्या प्रमाणात वाचनालय आणि विज्ञानालयं बांधली गेली आहेत का? केवळ विज्ञानाचे भौतिक फायदे हवेत असे म्हणून चालत नाही तर वैज्ञानिक विचारसरणी समाजात पसरते आहे का हे बघायला हवं. विज्ञानाचे स्वयंभू मूल्य आहे, तात्त्विक बैठक आहे. वैज्ञानिकांनी त्यांच्या प्रयोगशाळेतून बाहेर येऊन समाजात मिसळायला हवे ,लेखन करायला हवे, भाषणे द्यायला हवीत, प्रयोग
  करायला हवेत तरच त्यांच्या संशोधनाला पाठिंबा व निधी मिळेल. या सर्व गोष्टी केल्या तर अंधश्रद्धा आपोआप कमी होतील. असे सर्वांगीण प्रयत्न केले तर विज्ञानमय महाराष्ट्र व भारत निर्माण करण्यासाठी एक दशक पुरेसे आहे.
  “आजचा सुधारक” चे वाचक वाढवणे, मासिकाचा आकार वाढवणे, दर्जा सुधारणे,लेखक वाढवणे हे पहिले पाऊल टाकता येईल.

 • जमिनीतले धन मिळवण्यासाठी केलेल्या मानव हत्या, लिंबूमिरची वगैरे वापरून केलेले अघोरी कर्म इत्यादी हे सर्व “विकृत”श्रद्धे मध्ये येते व हे बंद व्हायलाच हवे.
  अंधश्रद्धा, ही जगात 90% ते 95% पसरली आहे व ती अजिबात जाणार नाही (अंनिस ने कितीही आपटले तरीही!😜).
  श्रद्धा ही मुळात अंधच असते. डोळस असते ती “निष्ठा”

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.