पहिल्या पिढीतला नास्तिक

मी स्वतःला ‘पहिल्या पिढीतला नास्तिक’ म्हणत नाही आणि ही संज्ञा मी शोधलेली नाही, तरीही, ही संकल्पना मला इतकी भावली, की मी त्या विषयावर माझे विचार आणि आस्तिक-नास्तिक वाद-संवाद या संदर्भातले माझे अनुभव व्यक्त करायचे ठरवले.

लहानपणी घरचे वातावरण बुद्धिप्रामाण्यवादी होते, त्यामुळे घरात देवघर, पूजापाठ, व्रतवैकल्ये हे प्रकार अजिबात नव्हते, पण आजूबाजूला हे सर्वकाही भक्तिभावाने चालू असायचे. त्यामुळे वयाच्या पाचव्या वर्षीच मी वडिलांना देवाच्या अस्तित्वाबद्दल विचारल्याचे आठवते. तेव्हा त्यांनी दिलेले उत्तरही मला आठवते. “देव आहे की नाही हे आजवर खात्रीने कोणालाच समजलेले नाही. निदान मला तरी तसा काही अनुभव कधी आलेला नाही, त्यामुळे मी देवावर विश्वास ठेवत नाही. हा विचार ज्याचा त्याने करायचा असतो. सगळे करतात म्हणून एखादी गोष्ट करण्याऐवजी आपल्याला पटली तर करावी.” त्यामुळे मी सुरुवातीला काहीसा ‘खोडसाळ नास्तिक’ बनलो. वर्गात इतरांच्या देवभोळेपणाची टिंगल करणे, आरत्या आणि भजनांची विडंबने करणे हे सगळे प्रकार मी केले आहेत. रस्त्यात पडलेली ‘करणी उतरवण्यासाठी’ टाकलेला गुलाल आणि टाचण्यांनी सुशोभित केलेली लिंबे शाळेत नेऊन वर्गमित्रांना घाबरवणे हा माझा अंधश्रद्धा निर्मूलनाचा प्रयत्न असायचा. घरून नेहमी “दुसऱ्यांच्या भावना दुखवू नयेत” हा संदेश मिळायचा, पण काहीवेळा आजूबाजूला घडणारे प्रकार बघून चीडही यायची आणि वाद व्हायचे. हे सगळे असले तरी ‘आपला देश धर्म-निरपेक्ष आहे, अंधश्रद्धा मानणे हे अशिक्षितपणाचे लक्षण आहे’ हा दिलासा सतत होता आणि सर्वकाही आलबेल असल्याची भावना होती.

गेल्या काही वर्षांत मात्र हे सगळे वातावरण पुन्हा एकदा गढूळ होताना दिसत आहे. अंधश्रद्धांना मिथ्या-विज्ञानाचे ठिगळ लावून ती आपली थोर संस्कृती असल्याचा दावा केला जात आहे. आपले पूर्वज किती विचारी होते आणि आज लागणारे सगळे शोध आपल्या ऋषि-मुनींनी आधीच कसे लावले होते याची व्हॉट्सॲप विद्यापीठात तावातावाने चर्चा होत असते. हा हसण्यावारी नेण्याचा विषय नाही.

आजवर ज्या मित्रांना, नातेवाईकांना आणि परिचितांना सुशिक्षित समजत होतो ते पढतमूर्ख आहेत या जाणिवेने उद्विग्नता येते. संस्कृतीच्या नावाखाली धर्मांधता आणि अंधश्रद्धा जोमाने उफाळून वर येत आहेत. विचार कारायला कोणी तयार नाही. या विषयावर चर्चा करायची झाली, तर ‘सिक्युलर’ किंवा ‘स्यूडो- इंटेलेक्चुअल’ किंवा ‘कॉँग्रेसी’/ ‘कम्युनिस्ट’ वगैरे नावे चिकटवली जातात, पण विचार मांडायला कोणीच तयार नसतं. हळदीकुंकू- वटपौर्णिमा आदि सौभाग्याचा उदो उदो करणाऱ्या व्रत-वैकल्यांवर बोलायला गेल्यास स्त्रिया “आम्हाला आवडतं म्हणून आम्ही करतो” किंवा “ती आपली संस्कृती आहे” अशी उत्तरे देऊन गप्प बसवतात. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आजवर प्रगत समजला जाणारा महाराष्ट्र पुन्हा उलटा प्रवास करताना दिसतो आहे. नुकतेच आगरकरांचे निबंध वाचताना पुन्हा एकदा सव्वाशे वर्षांपूर्वीचा काळ फारसा वेगळा नव्हता अशी भीतीदायक जाणीव होते.

या सगळ्या परिस्थितीत एका ‘पहिल्या पिढीतल्या नास्तिका’शी गाठ पडली. घरी देवभोळेपणा मुबलक, तरीही चिकित्सक स्वभावामुळे प्रत्येक गोष्ट तर्काच्या निकषावर घासून पाहिली असता आस्तिकतेतला फोलपणा लक्षात आला आणि स्वतःपुरते नास्तिकत्व स्वीकारले, पण कुटुंबीयांसामोर हात टेकले. अशा विचारांचे अनेक ‘नवनास्तिक’ मोठ्यांचे मन राखण्यासाठी देवधर्म, पूजापाठ, कुलाचार चालू ठेवतात आणि ते ‘मोठे’ आपल्या प्रस्थानापूर्वी नातवंडांच्या कोऱ्या पाट्यांवर कायमच्या रेघोट्या मारून जातात. यात बहुतेकवेळा ‘अफेकटिव्ह (भावनेला हात घालून केलेलं) लर्निंग’ तर्कापेक्षा अधिक परिणामकारक असल्याचे दिसून येते. ‘अफेकटिव्ह लर्निंग’ हे तंत्र राजकीय नेत्यांना उत्तम प्रकारे अवगत असते. ज्ञान हे “ये पानी लेकर क्या करोगे, इसमेसे सारी बिजली निकाल दी गयी है” अश्यासारखे चविष्ट आणि पचायला हलके असल्यासामुळे ते सहज पसरते पण तर्कशुद्ध विचार मात्र “नवसा-सायासाने काही होणार नाही” सारखे कटुसत्य उघडे पाडत असल्याने नाकारले जातात.

तेव्हा नास्तिकतेच्या सहा दशकांच्या अनुभावातून मी या निष्कर्षाप्रत येऊन पोहोचलो आहे, की शिक्षणाचा आणि तर्कशुद्ध विचारांचा फारसा संबंध नाही. ‘अफेकटिव्ह (भावनेला हात घालून केलेले) लर्निंग’ तर्कापेक्षा अधिक परिणामकारक असल्यामुळे सुमार बुद्धिमत्तेच्या लोकांचे मन वळवण्याचे कार्य गाडगे बाबांसारखे संत एकवेळ करू शकतील, पण ते सामान्यजनांच्या कुवती पलिकडले काम आहे आणि त्यातून कटुता आणि वैर निर्माण होऊ शकते. ‘नवनास्तिक’ स्वयंभू असतील तरच परिवर्तनाची शक्यता संभवते, परंतु ‘भक्ताचे हृदय धरवेना क्षणभरी’ हेच खरे. त्यामुळे आस्तिकांना “तुझा ईश्वर तुला सद्बुद्धी देवो” अश्या खोचक शुभेच्छा देऊन विषयांतर करावे हेच उत्तम!

अभिप्राय 5

 • लेख फार आवडला . उच्य सामाजिक स्तर असणाऱ्या व्यक्तींना scientific temper आणि logical thinking बहुदा असतो . मात्र गरीब आणि खालच्या स्तर असणाऱ्या व्यक्तीना तो कमी असतो . तो विकसित झालेला नसतो . पण अंधश्रद्धेवर बोललो कि मार खावा लागतो . त्यामुळे काय करणार ?

 • काही शब्दप्रयोग आवडले. उदा. नवनास्तिक किंवा नास्तिकांचे पिढ्यांन पिढ्यामधील मोजमाप इ. नास्तिकांमध्येही कट्टरतावादी अपवादेनच असतात. आमच्यासारखे ‘नवनास्तिक’च अधिक. हा आस्तिक-नास्तिकचा प्रवाससुध्दा पिढ्यांन पिढ्या कमी-अधिक फरकाने राहणार हे ही तितकेच खरे.

 • “आजवर ज्या मित्रांना, नातेवाईकांना आणि परिचितांना सुशिक्षित समजत होतो ते पढतमूर्ख आहेत या जाणिवेने उद्विग्नता येते.” हे वाक्य पावलोपावली रोजच्या जीवनात तीव्रपणे अनुभवास येते आणि मन निराश होते.अनेक सायन्स पदवीधर मित्रांचे वैचारिक मागासलेपण पाहून फार वाईट वाटते,यावर कोणाकडे काही मार्ग असल्यास सुचवावा.

 • नास्तिक वाद प्रसार करण्याचे सोपे उपाय हे अप्रत्यक्ष आहेत
  १ शाळेपासून विज्ञान प्रसार करणे
  २ शाळेत तर्कशुद्ध विचार पद्धती शिकवणे
  ३. स्त्री पुरुष समता प्रोत्साहन देणे व जातीभेद कमी करणे. यामुळं आर्थिक विषमता कमी होईल. दारिद्रय हे गतानुगतिक व नियतीवादी विचार निर्माण होण्याचे प्रमुख कारण आहे
  ४ वाचनालये व विज्ञान प्रयोग प्रदर्शने वाढवणे
  ५. विज्ञान संमेलन संख्या वाढवणे
  ६ दूरदर्शन वर विज्ञान कार्यक्रम घेण्यासाठी दडपण आणणे
  ७ उद्योगपती व श्रीमंत लोकांनी विज्ञान प्रयोगशाळा व वाचनालये यांना आर्थिक मदत देणे. पू ल देशपांडे यांनी अशा प्रकारची भरघोस मदत केली होती याची आठवण येते
  ८ मराठीमध्ये विज्ञान मासिक संख्या वाढवणे व सरकारने त्यासाठी अनुदान देणे

  • लेख आवडला. अभिनिवेश नसल्याने साधासरळ उतरला आहे. ‘….नुकतेच आगरकरांचे निबंध वाचताना पुन्हा एकदा सव्वाशे वर्षांपूर्वीचा काळ फारसा वेगळा नव्हता अशी भीतीदायक जाणीव होते.’ हे शब्दशः खरे आहे. ‘शिक्षणाचा आणि तर्कशुद्ध विचारांचा फारसा संबंध नाही’, हेही खरेच. आजच्या काळात आपले विचार अशाच संयत आणि सोप्या भाषेत मांडत राहिले पाहिजेत. परिवर्तन एका दिवसात घडत नाही, पण घडते, हे मात्र खरे..

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.