विवेक

आस्तिक विरूद्ध नास्तिक हा वाद अनेक वर्षांपासूनचा आहे. पूर्वी आपण नास्तिक आहोत हे सांगायला माणूस घाबरायचा, पण आता तो एवढा धीट झालाय की नास्तिकांचे मेळावे भरवून, व्यासपिठावर उभा राहून “मी नास्तिक आहे” असे तो निर्भीडपणे सांगू शकतोय. एवढेच नाही तर शंतनू अभ्यंकरांसारखा डॅाक्टर ‘असला कुणी नास्तिक तर बिघडलं कुठे?’ असा लेखही लिहू शकतोय (संदर्भ : लोकसत्ता, १८ डिसेंबर २०२२ चा अंक)

देवाला मानले, कर्मकांडे केली, उपवास धरले (साग्रसंगीत उपासाचे पदार्थ खाऊन) तर तो आस्तिक व ह्यातले काहीसुद्धा केले नाही तर तो नास्तिक ठरतो का? ‘आहे’ अशी ज्याची मती आहे, तो आस्तिक आणि ‘नाही’ अशी ज्याची मती आहे, तो नास्तिक होतो का? पण हा आस्तिक कोणत्या भावनेने देवाला पूजतो हेही बघणे जरूरीचे आहे.

हिन्दुंच्या घरात देव्हारा नसला तरी कोणत्यातरी देवाची तसबीर तरी असतेच. लहानपणापासून त्या घरातल्या लहानग्याला देवाला नमस्कार करायला शिकविले जाते. त्यानंतर तो जसजसा मोठा होत जातो तसे त्याला अनेक देवांचा परिचय करून दिला जातो. प्रत्येक देवांचे वार सांगितले जातात. त्या त्या वाराला त्या त्या देवळात जायला शिकविले जाते. त्या दिवशी उपवास करायला सांगितले जाते. घरातल्या अनेक व्रतवैकल्ये करणाऱ्या मोठ्यांचे अनुकरण मग छोटे करतात. एखाद्याने “असे का करायचे” असे विचारल्यास त्याच्याकडे दुर्लक्ष तरी केले जाते किंवा “बाप्पा शिक्षा करतो” असे सांगून त्याला गप्प केले जाते किंवा असे केल्याने “बाप्पा प्रसन्न होऊन हवे ते देतो” असं तरी सांगितले जाते. म्हणजे लहानपणापासून आपल्याला हवे ते देणारा म्हणून त्याला पूजले पाहिजे हेच मनांत भरविले जाते आणि त्यालाच भक्ती म्हटले जाते. परीक्षेला जाताना देवाच्या पाया पडून “पेपर चांगला जाऊ दे. मी चांगल्या मार्काने पास होऊ दे” असे म्हणायला सांगितले जाते. म्हणजे अभ्यास केला तर चांगले मार्क पडतील हे मनावर ठसविण्यापेक्षा देवाला नमस्कार करून पास होता येते असे ठसविले जाते. त्यानंतर अभ्यास करण्यापेक्षा जसा गाईडवर जास्त भरोसा असतो तसा देवावर जास्त भरोसा ठेवला जातो. त्यापुढची पायरी म्हणजे देवाला लाच देण्याची सुरुवात होते, “मला पास कर मी तुला अमुक अमुक देईन” वगैरे. ह्यालाच नवस म्हटले जाते. हीच आयुष्यातली भ्रष्टाचाराची सुरुवात…

घरातून बाहेर जातांना देवाच्या फोटोला हात जोडले जातात. पण “हात का जोडायचे?” तर सवय झाल्यामुळे ते यंत्रवत जोडले जातात की नाही जोडले तर काही वाईट घडेल या भितीपायी जोडले जातात हे सांगता येणार नाही. भक्तांना पावणाऱ्या देवांच्या देवळासमोर त्या त्या दिवशी गंमत म्हणून उभे राहून नमस्कार करणाऱ्यांना बघा. वेळ छान जातो. कोणी देवळासमोरून जाताना चालता चालता हात जोडतात. कोणी थांबून चपला काढून हात जोडतात. कोणी उजव्या हाताचे पहिले बोट कपाळाला लावून तेच बोट छातीला लावून तेच बोट ओठावर ठेवतात. हा सर्व प्रकार चालता चालता होत असतो. कोणी उजव्या हाताची पहिली दोन बोट दोन्ही गालाला दोन तीन वेळा लावून नमस्कार करतात. कोणी रस्त्यातच साष्टांग दंडवत घालतात. कोणी स्वत:भोवती प्रदक्षिणा घालतात, तर कोणी स्वत:च्याच मुस्कटात मारून घेतात. म्हणजे नमस्कार कसा करावा याला नियम नाही. ज्याला जसा पाहिजे तसा त्याने करावा, देव सगळ्यांचे सगळ्या तऱ्हेचे नमस्कार मान्य करून घेतो. मग जर एखाद्याने नमस्कार केलाच नाही तर बिघडले कोठे? देवाला नमस्कार केला नाही तर तो कोपेल म्हणून त्याला नमस्कार करणे ह्यात आस्तिकता कोठे आहे? हा भ्याडपणा आहे. मग जर एखाद्या नास्तिकाने नमस्कार नाही केला तर त्याचे काय चुकले? “देखल्या देवा दंडवत” असेच याला म्हणावे लागेल. अमुक दिवशी शाकाहार करावा, तमुक दिवशी उपवास करावा ह्यामागचे कारण काय? आरोग्यासाठी असेल तर ठीक, पण तब्येतीला झेपत नसतानासुद्धा का करावा? 

धर्मग्रंथामध्ये लिहिले आहे, ‘तुम्ही जो मंत्र म्हणता त्याचे ज्ञान तुम्हाला असणे गरजेचे आहे.’ मग लग्नविधीत किंवा पूजेत पुरोहित जे मंत्रोच्चार करतात त्याबद्दल पुरोहिताचे ज्ञान किती आहे हे यजमान किंवा इतरांना माहीत असते का? केवळ काही अघटित घडू नये या अंधविश्वासापायी हे सर्व केले जाते व उच्चशिक्षित मंडळीही परंपरा म्हणून त्यात भाग घेतात. म्हणूनच बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड महाराजांनी कायदा केला होता की, ज्या पुजाऱ्याला संस्कृत मंत्राचा अर्थ सांगता येत नसेल त्याला नोकरीतून काढावे.

‘पान पडलं आभाळ कोसळलं‘ अशी भित्र्या सश्यासारखी सध्या माणसाची गत झाली आहे. ह्या परिस्थितीतून देवच तुम्हाला सोडवेल असे सांगणाऱ्या पुरोहितवर्गाच्या, बाबा-बुवांच्या नादी लोक लागले आहेत. त्यामुळे कर्मकांडांत लक्षणीय वाढ झाली आहे. यज्ञ केले जात आहेत, कसल्या ना कसल्या दिंड्या सतत निघत आहेत. काही दिवसांपूर्वी रस्त्यात एक दिंडी भेटली. त्यातल्या एकाला विचारले असता कळले की ही इच्छापूर्ती दिंडी असुन अक्कलकोटला निघालेली आहे. काही महिन्यांपूर्वी एका शहरातून ही तरूण मुले कपाळावर टिळा लावून दिंडी घेऊन निघाली होती. ज्या वयात शिकायचे, कामधंदे करायचे त्या वयात ही मुले कर्मकांडांत गुंतून पडत आहेत, आणि पोरं देव-देव करीत आहेत म्हणून आई-बापही खूष आहेत. ही भक्ती वगैरे काही नसून हे नैराश्य आहे. सतत देवाकडे काही ना काही मागत रहायचे. मिळाले तर देव नवसाला पावला म्हणायचे व इच्छापूर्ती दिंडीत सामील व्हायचे.

देशातील प्रदूषण, घाण आस्तिकांमुळेच वाढते आहे. देवाचे निर्माल्य कचऱ्यात टाकले तर पाप लागेल म्हणून ते नदीत किंवा समुद्रात टाकायचे. गणपतीत व नवरात्रीत देवांच्या मूर्त्या नदीत किंवा समुद्रात शिरवायच्या. त्यांच्या रंगांमुळे पाणी प्रदूषित झाले तरी भक्तांना त्याची फिकीर नसते. माणूस मेल्यावर त्याच्या अस्थींची राख नदीत शिरवायची कारण त्यामुळे त्याला मोक्ष मिळतो. कुंभमेळ्यात स्नान केल्याने पापे धुतली जातात म्हणून गंगेत, गोदावरीत हजारो, लाखो लोक स्नान करतात आणि पाणी प्रदूषित करतात. आपण पापे केली आहेत हे ज्यांना माहीत असते तेच कुंभमेळ्यात जाऊन स्नान करत असावेत व नवी पापे करण्यासाठी पुनःश्च तयार होत असावेत. पाप-पुण्य, स्वर्ग-नरक- मोक्ष ह्यासारख्या गोष्टी पुरोहितांचे खिसे भरतात तर आस्तिकांचे खिसे रिकामे करतात. ज्याला हे पटत नाही तोसुद्धा काहीवेळेस कुटुंबियांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत म्हणून मनाविरूद्ध ही कर्म-कांडे करीत असेलही. परंतु त्यात धार्मिकता अजिबात नसते.

कोणत्याही धर्मात जन्मलेल्या तान्हुल्याला लहानपणापासून देवाची किंवा धर्माची ओळखच करून दिली नाही तर ते निर्भयपणे आयुष्यातल्या कठीण प्रसंगाला तोंड देऊ शकेल.

अभिप्राय 3

  • “कोणत्याही धर्मात जन्मलेल्या तान्हुल्याला लहानपणापासून देवाची किंवा धर्माची ओळखच करून दिली नाही तर ते निर्भयपणे आयुष्यातल्या कठीण प्रसंगाला तोंड देऊ शकेल.” हा विचार पटला. लहान मुलांना देवभोळेपणा शिकवणं हे त्यांना कमकुवत बनवायला कारणीभूत ठरतं आणि त्यात काही वावगं आहे हेच बहुतेकांना समजत नाही.

  • अतिशय छान लेख लिहिलाय कुष्टे मॅडम तुम्ही.खरच पूर्वी नास्तिक म्हणून घ्यायला घाबरायची लोक.कारण बहुसंख्य आस्तिक असायची. आणि एखादा नास्तिक म्हणजे परग्रहावरून आलाय की काय इतका परका समजायचीत.पण हळूहळू बदल घडतोय.नास्तिक माणसाचा पण वेगळा दृष्टिकोन असू शकतो याबाबतीत थोडीशी सहिष्णुता निर्माण व्हायला लागली आहे समाजात.जो देवधर्माचे करतो तो चांगला आणि जो करत नाही तो वाईट ही मानसिकता बदलेल तो सुदिन. मॅडम तुमच्या लेखन धारिष्ट्याला सलाम

  • नास्तिक वादाचे मानसशास्त्र व समाजशास्त्र छान उलगडले आहे. पण अधिक विस्ताराने लिहायला पाहिजे होते.देव मानणे हा तात्त्विक व वैज्ञानिक विषय न होता अनेक लोक केवळ मानसिक कारणांमुळे देवावर विश्वास ठेवतात.
    सत्याचा शोध घ्यायचा असेल तर आता धर्माच्या ऐवजी विज्ञानाची कास धरायला हवी.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.