संविधान संस्कृती : विज्ञान व वैज्ञानिक

ईश्वर, अल्ला, गॉड ही मानवाने निर्माण केलेली एक सांस्कृतिक संकल्पना आहे. माणसावर संस्कार करून त्याला काही प्रमाणात सदाचारी बनवण्यात ही संकल्पना इतिहासकाळात उपयोगी पडलेली असू शकते. या संकल्पनेसाठी संक्षिप्तपणे ‘देव’ हा शब्द वापरूया. देव या संकल्पनेच्या आधारेच मानवाने बराचसा मनोमय सांस्कृतिक विकासही केला. परंतु नंतरच्या काळात स्वतःच निर्माण केलेल्या देवाच्या लोभात माणूस इतका अडकून पडला की तो देवाचा गुलामच झाला. त्यामुळे देवाला आपणच निर्माण केलेले आहे हेही तो विसरला. देवस्तुतीच्या घाण्याभोवती झापडबंद पद्धतीने बैलफेऱ्या मारत राहिला. या बैलफेऱ्यांची सवय लागल्यामुळे त्याला मानवी विकासाच्या नव्या दिशाच दिसू शकल्या नाहीत. त्यामुळे देवकल्पनेने सुरुवातीच्या काळात मानवी विकासाला काहीशी मदत केली असली तरी नंतरच्या काळामध्ये देवकल्पनेने मानवी विकासाला खुंटवण्याचेच काम केलेले आहे. 

सर्व काही कर्ता-करविता देव आहे आणि आपण त्याच्या इशाऱ्यावर चालणारे बाहुले आहोत ही भावना देवदैववाद्यांनी मानवी मनात दृढ केली. त्यामुळे दांभिक अशा ऐतखाऊ धर्ममार्तंडांनी मांडलेल्या ईश्वरीय ज्ञानाच्या पलीकडे दुसरे कुठलेही ज्ञान असू शकत नाही असा लोकांचा भ्रम झाला. या भ्रमामुळेच मानवी इतिहासातला खूप मोठा कालखंड ‘जैसे थे’ अवस्थेत राहण्यात फुकट वाया गेला. देवकेंद्री धर्मकल्पनेने खूप मोठ्या कालखंडापर्यंत निसर्गात दडलेल्या विविध वैश्विक शक्तींचा वास्तवाधिष्ठित पातळीवरून शोध घेण्यास प्रवृत्तच होऊ दिले नाही. जो माणूस, समाज व देश देवधर्माकडे स्वतःची बुद्धी गहाण ठेवतो त्याचा मुळीच विकास होत नाही आणि जो स्वतःची बुद्धी कुणाकडेही गहाण न ठेवता तिचा स्वतंत्रपणे वापर करून निसर्गातील शक्तींचा शोध घेऊन त्या शक्तींना मानवी हितासाठी राबवू शकतो, त्याचाच विकास होत असतो. याचा अनुभव जगाने घेतलेला आहे. आजही सर्वत्र असाच अनुभव येतो.

विश्वाच्या संदर्भामध्ये धर्ममार्तंड जे सांगत होते त्याहून विपरित असे सत्य जागतिक पातळीवरील बुद्धिवादी, चिकित्सक, प्रयोगशील, संशोधक माणसांना म्हणजेच वैज्ञानिकांना निसर्गामध्ये जाणवत होते, दिसत होते. म्हणून जगातील अनेक वैज्ञानिकांनी देवकेंद्रित अशा भाबड्या धर्मज्ञानाच्या विरोधात जाऊनच सत्यशोधनाअंती प्रत्ययाला आलेले नवे सिद्धान्त मांडले. असे सिद्धान्त मांडल्यामुळे त्यांना धर्ममार्तंडांकडून होणारा खूप मोठा छळ सोसावा लागला. परंतु असा छळ सोसूनही वैज्ञानिकांनी स्वतःस प्रत्ययाला आलेले सत्य मांडले आणि यामुळेच जगाचा वैज्ञानिक विकास होण्याची सुरुवात झाली. जागतिक पातळीवरील देवकेंद्रित धर्ममार्तंडांनी मांडलेले ईश्वर, पूर्वजन्म, स्वर्ग, नरक, नशीब यांसारखे कोणतेही कल्पित घटक वैज्ञानिक पुराव्याच्या कसोटीवर अजूनही सिद्ध होऊ शकलेले नाहीत. हे लोक सामान्यजणांना आपल्या कल्पित घटकांवर श्रद्धा ठेवायला सांगतात. त्यांचे तथाकथित कल्पिताधारित सिद्धान्त पुराव्याच्या आधारे ते सिद्धही करू शकत नाहीत आणि इतरांनाही तपासू देत नाहीत. कारण त्यांचा सिद्धांत निव्वळ फोलपट असतो. देव, दैव, नशीब, स्वर्ग, नरक इत्यादी फोलपट सिद्धान्त मात्र त्यांनी फार मोठ्या कौशल्याने सामान्य माणसांच्या मेंदूंमध्ये भिनवलेले आहेत. त्यामुळे नसलेल्या देवाचा नामजप करून पुण्य मिळवण्याचा बालिशपणा सामान्य माणसे करत राहतात. या लोकांचा असा स्पष्ट दावा असतो की देवाचे नाव घेऊन, त्याची स्तुती व भक्ती करून जो आनंद मिळतो तो कशानेच मिळत नाही आणि हाच आनंद सर्वश्रेष्ठ स्वरूपाचा असतो. असे लोक जगाला काहीही देऊ शकत नसतात. कारण, ते नवे काही निर्माणच करू शकत नसतात. तरीही देवकल्पनेच्या आड उभे राहून यांच्या सगळ्या गमज्या चालत असल्यामुळे ते जनमानसावर फार मोठा प्रभाव गाजवत राहतात. जिथे बौद्धिकदृष्ट्या मागासलेले जनमानस असते तिथेच हा प्रकार मोठ्या प्रमाणात चालत असतो. 

आपल्या देशात तर आजच्या स्मार्टफोन, इंटरनेट, सोशल मीडिया, माहिती विस्फोटाच्या युगातही कोट्यवधी देवभोळे लोक आहेत. म्हणूनच आपला देश विकासासाठीच्या अनेकविध शक्ती उपलब्ध असूनही मागासलेलाच आहे. आपल्या देशातला देवभोळेपणाच आपल्याकडे चिकित्सक, प्रयोगक, संशोधक, वैज्ञानिक यांची फारशी दखल घेऊ देत नाही. ही गोष्ट राष्ट्रीय विकासाच्या दृष्टीने मारक आहे. म्हणूनच आपल्या देशात पुनःपुन्हा सांगण्याची गरज आहे की देव अस्तित्वातच नाही, त्यामुळे त्याने मानवाला काही देण्याचा प्रश्नच नाही. ज्या देवाला तुम्ही कनवाळू, कृपाळू, संकटसमयी मदतीसाठी धावून येणारा, दुःखितांचे दुःख नष्ट करणारा वगैरे म्हणता त्यापैकी एकही गोष्ट अद्यापपर्यंत त्याने केलेली नाही. तो फक्त तुम्हाला पुराणातल्या भाकडकथेत दिसतो. वर्तमानकालीन वास्तव जीवनात त्याचा कधीही प्रत्यय येत नसतो.

जागतिक पातळीवरील वैज्ञानिकांनी मात्र मानवाला भरभरून अनेक देणग्या दिलेल्या आहेत. देवाचे नाव घेऊन त्याची कितीही स्तुती केली तरी काहीही मिळत नाही. उलट वैज्ञानिकांच्या जीवनचरित्रांचे स्मरण केले तर देशातील नव्या पिढ्यांना नवे नवे संशोधन करण्याच्या प्रेरणा मिळतील. कारण वैज्ञानिकांचे जीवनचरित्र वस्तुनिष्ठ, चिकित्सक, प्रयोगशील व नवे संशोधन करण्यासाठी खूप मोठे काबाडकष्ट करणारे असते. नव्या पिढ्यांसमोर वैज्ञानिकांचे आदर्श ठेवण्याच्या प्रक्रियेतूनच भारतात अनेक वैज्ञानिक जन्माला येतील आणि असे वैज्ञानिक या देशाची खूप मोठी प्रगती घडवून आणतील. म्हणूनच भारतात सांविधानिक मूल्यांवर आधारलेली संस्कृती निर्माण करणे आवश्यक आहे. अशी संस्कृती कल्पित, अद्भुतरम्य व चमत्कारिक देवलीलांच्या नव्हे तर वैज्ञानिकांच्या नवनिर्माणक्षम चरित्राच्या स्मरणातूनच विकसित होऊ शकेल. 

समाजातील भोळ्याभाबड्या माणसांना अशी भीती वाटत असते की देव अस्तित्वातच नाही असे म्हटले तर लोकांना कुणाचीच भीती राहणार नाही. लोक कसेही स्वैरपणे वागायला लागतील. समाजात नंगा नाच माजेल. देवाला भिऊन तरी लोक जरा चांगले वागतात. मग देव अस्तित्वातच नाही असे सांगून मानवाला असलेली भीती संपवून स्वैर वर्तनाला कशाला प्रवृत्त करता? या प्रश्नाचे उत्तर हे आहे की, देवाला घाबरून लोक चांगले वागतात हे म्हणणेच खरे नाही. कारण प्रत्यक्ष देवाच्या मंदिरातच कायम भ्रष्ट व्यवहार चालत असतो. मंदिरात लोकश्रद्धेचा बाजार मांडलेला असतो. देवाचे पुजारीच देवाच्या मूर्तीसमोर दानरूपात भक्तांचे शोषण करतात. बऱ्याचदा असेही आढळते की गुंड, पुंड, बलात्कारी व खुनी लोक साधूचे सोंग घेऊन फिरतात. तुरुंगात असलेले आसाराम बापू आणि गुरमीत सिंग उर्फ रामरहीम हे त्याचे ढळढळीत उदाहरण आहेत. संत कबीर उगाच नाही म्हणाले की,

जतरा मे फतरा बिठाया । तिरथ बनाया पाणी । दुनिया भई दिवानी । पैसों की मूलधानी ।

देवाला घाबरून जर लोक चांगले वागत असते व देवधर्माच्याच नावाने जगाच्या इतिहासात जे प्रचंड मोठे शोषण व अन्याय-अत्याचार झाले ते झालेच नसते. जगातले जे जे देव मानणारे धर्म आहेत ते ते देवाची भक्ती, म्हणजेच स्तुती केली की देव प्रसन्न होतो आणि माणसाला पापातून मुक्त करतो, तसेच जिथे मोठे देवमंदिर आहे तिथल्या नदीत स्नान केले की सर्व पापे धुवून जातात अशी शिकवण देतात. मग लोक रोज पाप करतात, देवमूर्तीसमोर तोबा तोबा करून, गंगेत स्नान करून जुने पाप धुऊन टाकतात नि नवे पाप करायला मोकळे होतात. याउलट देवकल्पनेलाच नाकारणारा बुद्ध धम्म मात्र कुणाचीही स्तुती अथवा भक्ती करावयास न सांगता सदाचरणाची शिकवण देतो. आर्य अष्टांगिक मार्गांना अनुसरून आचरण करण्यास सांगतो. प्रज्ञा, शील, करुणा, प्रेम व मैत्री ही मूल्ये मानवी मनावर बिंबवतो. “तुम्ही नीट वागला नाहीत तर देव तुम्हाला शिक्षा करील” असे बुद्ध धम्म कधीही सांगत नाही. तर दुखःमुक्तीसाठी मध्यम आचरण मार्गाची आवश्यकता प्रतिपादन करतो. आजच्या सांविधानिक भारतात लोकांना वाईट वागू नका म्हणून देवाची भीती दाखवण्याची गरजच काय? आपल्या संविधानाच्या कायद्याने हे स्पष्टच केलेले आहे की तुम्ही वाईट वागलात तर देव तुम्हाला शिक्षा करो अथवा न करो, संविधानाचा कायदा हा तुम्हाला शिक्षा करेलच. म्हणून आजच्या काळात देवाला नव्हे तर संविधानाच्या कायद्याला घाबरून लोकांना चांगले वागावेच लागते, नाही तर संविधानाचा कायदा त्यांना कठोरात कठोर शिक्षा करतो. याचाच अर्थ आपल्या संविधानाने आज देव ही संकल्पना कालबाह्य करून टाकलेली आहे. आपल्या संविधानाने कोणत्याही देवाचा आधार घेतलेला नाही किंवा कुठेच त्याला वंदनही केलेले नाही. आपले संविधान देवाच्या जागी माणसाला ठेवते व म्हणूनच प्रास्ताविकात म्हणते की, “आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी, धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा आणि इथे सर्व प्रकारचे स्वातंत्र्य, समता, न्याय व बंधुता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करू.” कुठल्यातरी देवाच्या कृपेने किंवा आशिर्वादाने आम्ही हे करू असे आपले संविधान म्हणत नाही तर आम्ही भारतीय लोक हे सर्व करणार आहोत असे म्हणते. म्हणजेच आपले संविधान देवाला नव्हे, तर भारतीय माणसांना महान मानते. म्हणूनच इथे संविधान संस्कृती निर्माण करणे आवश्यक आहे.

संविधान संस्कृतीचा ज्या अनेक अंगांनी विकास होऊ शकतो त्यातील विज्ञानसंस्कृती हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण असा भाग आहे. भारतीय संविधानाचा अनुच्छेद ५१(ज) असे म्हणते की ‘विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद आणि शोधकबुद्धी, सुधारणावाद यांचा विकास करणे हे भारतीय नागरिकांचे मूलभूत कर्तव्य आहे.’ संविधानातील या भूमिकेचा आधार घेऊन आपल्या देशात विज्ञानसंस्कृतीचा फार मोठा विकास करता येऊ शकतो. वैज्ञानिक संशोधनांकडे आजवर आपण केवळ उपभोगाचे साधन म्हणून पाहात आलो. अलीकडे तर आपणाला अनेक आश्चर्यकारक अशा वैज्ञानिक संशोधनाचे काहीही कुतूहल किंवा आश्चर्य वाटत नाही. आम्ही विज्ञान-तंत्रज्ञानाच्या विकासातून निर्माण झालेल्या विविध गोष्टींचा फक्त उपभोग घेतो. नवनवे शोध लावण्यासाठी प्रचंड काबाडकष्ट करणाऱ्या वैज्ञानिकांचा साधा विचारही करत नाही. त्यामुळे मानवी जीवनावर खूप मोठे उपकार करणाऱ्या वैज्ञानिकांबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे ही गोष्ट कधीच आपल्या डोक्यात येत नाही. कृतज्ञता हे मानवी संस्कृतीमधील अत्यंत मोलाचे मूल्य असते. ज्या घटकांनी आपल्या जीवनातील दुःख-कष्ट नाहीसे करून आपले जीवन आनंदमय बनवले त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केलीच पाहिजे. आईवडिलांनी आपणाला जन्म दिला, आपले पालनपोषण केले म्हणून आपण त्यांच्याबद्दल नेहमीच कृतज्ञ राहतो. निसर्ग आपणाला जगण्यासाठी हवा, पाणी, सूर्यप्रकाश व अन्न देतो म्हणून निसर्गाबद्दलही आपण कृतज्ञता व्यक्त केलीच पाहिजे. निसर्गाचे संतुलन बिघडणार नाही असे पर्यावरणसंरक्षणाचे वर्तन केले पाहिजे. त्याशिवाय ज्यांनी आपणास भरभरून काहीतरी दिले त्या घटकांबद्दल कृतज्ञता व्यक्त न करता आपण, ज्याची निर्मिती आपण केलेली आहे अशा देवाबद्दल मात्र फार मोठी कृतज्ञता व्यक्त करत आलो आहोत. ज्याने आपणास काहीच दिले नाही पण आपण मात्र त्याला भरपूर दिले, त्याच्या मूर्ती केल्या, त्या मूर्तींसाठी देवळे बांधली, त्या मूर्तींना दुधाचा अभिषेक केला, कपडे घातले, सुवर्णालंकरांनी सजवले, मूर्तींचा गौरव करणाऱ्या आरत्या लिहिल्या, गायिल्या, ओवाळल्या. त्या आरत्यांमध्ये आपण म्हणतो तरी काय? तर, “तू फार सुंदर दिसतोस, तुझ्या सर्वांगाला शेंदराची उटी लावलेली आहे, तुझे लांब मोठे पोटसुद्धा फार सुंदर दिसते, तुझा पितांबरही फार छान, तुझ्या केवळ दर्शनाने आमच्या मनातल्या कामना पूर्ण होतात, तू फार महान आहेस, तू आमच्यावर कृपा कर…” मग ती मूर्ती लाल, काळीबेंदरी कशीही का असेना; ती पाहिली की भाबड्या लोकांना अलौकिक आनंद होतो. अगदी नित्यनेमाने आपण आरत्या गात आलो आहोत. आजही मोठ्या प्रमाणावर हेच करतो आहोत. ज्याची आरती आपण करत असतो ती मूर्तीही आपणच बनवलेली असते. तिला अंघोळ आपणच घालतो, कपडेही आपणच नेसवतो आणि जिला कपडेही घालता येत नाहीत अशा मूर्तीने आपल्यावर कृपा करावी असे म्हणत राहतो. असला हा भोळसटपणा ज्या देशात मोठ्या प्रमाणावर चालतो त्या देशात बुद्धिवादाचा नि विज्ञानवादाचा विकास तरी कसा होणार? अशा भोळसट प्रकारांवर धार्मिक व सांस्कृतिक गोष्टींच्या नावाखाली आपण आपली बुद्धी तर गहाण ठेवत आलो आहोतच पण आपला अमूल्य वेळ आणि कोटयावधी रुपयेही खर्च करत आलोत. खरे तर म्हणूनच संविधानकेंद्रित अशी नवी विज्ञानसंस्कृती आपणाला निर्माण करायला हवी. राष्ट्रहितासाठी आता भारतीय समाजाला बुद्धी गहाण टाकण्याच्या या भयाण रोगातून मुक्त केले पाहिजे आणि संविधानमूल्य केंद्रित विज्ञानसंस्कृतीचा विकास केला पाहिजे.

विज्ञानाने निर्माण करून दिलेल्या अनेक गोष्टींचा उपभोग आपण घेतला परंतु विज्ञान संस्कृतीच्या विकासाच्या दिशेने मात्र आपण कुठलीही समाधानकारक पाऊले टाकलेली नाहीत. केवळ कुणीतरी निर्माण केलेल्या वैज्ञानिक उपकरणांचा उपभोग घेत राहणे म्हणजे वैज्ञानिक संस्कृती नसते. तर वैज्ञानिक संस्कृती हीसुद्धा मूल्याधिष्ठित असते. विज्ञानाचा वापर हा मानवाच्या व समग्र सृष्टीच्या विकासासाठीच झाला पाहिजे हा संविधान संस्कृतीतील विज्ञानसंस्कृतीचा केंद्रीभूत नियम असेल. या संस्कृतीमध्ये बुद्धिवाद, जिज्ञासू वृत्ती, संशोधक वृत्ती, विराट विश्वाबद्दलचे, विश्वातील प्रत्येक घटकाबाबतचे सत्य शोधून काढण्याबद्दलची तळमळ, सृष्टीतील सर्व शक्ती विनाकारण वाया न जाता त्या सजीव सृष्टीच्या कल्याणार्थ वापरून घेण्याची धडपड, मानवी नैतिकतेला, मूल्यात्मकतेला बाधा पोहोचू शकणाऱ्या वैज्ञानिक शोधांबाबतची सावधानता, वैज्ञानिक शोधाच्या साह्याने कुठलाही विध्वंस न होता सजीव सृष्टीच्या जीवनात उपकारक ठरेल अशा नवनव्या रचनेची दक्षता, जागतिक पातळीवरील वैज्ञानिकांबद्दलचा खूप मोठा आदर व त्यांच्या जीवनकार्यातील आदर्शांच्या प्रेरणा घेऊन नवनव्या संशोधनास प्रवृत्त होणे, मानवाला अशक्यप्राय वाटणाऱ्या गोष्टी शक्य करण्यासाठी धडपडत राहणे, समग्र प्राणीसृष्टीला विविध शारीरिक व मानसिक रोगांपासून मुक्त करणे, मानवाचे काबाडकष्ट कमी करणे इत्यादी पायाभूत घटकांच्या आधारे विज्ञानसंस्कृतीचा विकास करता येऊ शकतो. जागतिक पातळीवरील वैज्ञानिकांच्या जीवनकार्यांचे विविध पद्धतींनी स्मरण केल्यानेच भारतात विज्ञानसंस्कृती विकसित होऊ शकते.

विज्ञानसंस्कृती विकसित तरी का करायची? तर मूल्याधिष्ठित अशी विज्ञानसंस्कृतीच मानवी जीवन अधिकात अधिक सुखी व संपन्न बनवू शकते. जगामध्ये एकोणीसाव्या-विसाव्या शतकात जेवढी वैज्ञानिक प्रगती झाली तेवढी त्या आधीच्या हजारो वर्षांत कधीही झालेली नाही. भोळसट धर्मकल्पनांच्या प्रभावातून मुक्त होऊन स्वतंत्र बुद्धीने सृष्टीचा नवा शोध घेण्याचे धाडस अलीकडच्या काळातील काही वैज्ञानिकांनी केले म्हणून जगात वैज्ञानिक प्रगतीचा मार्ग उशिरा का होईना खुला झाला. देव-धर्म या कल्पनांनी व त्याच्या आड बसून आयते खाणाऱ्या धर्ममार्तंडांनी आपल्या खोट्या विचारांचे दडपण टाकून मानवाचा बौद्धिक विकास व वैज्ञानिक विकास रोखून धरण्याचा खूप मोठा गुन्हा हजारो वर्षे पुन:पुन्हा केलेला आहे. म्हणून असत्य व प्रगतीतील धोंड ठरणाऱ्या देव-धर्म कल्पनांना आतातरी प्रभावीपणे आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याची गरज आहे. 

धर्ममार्तंडांनी मानवजातीला काय दिले आणि वैज्ञानिकांनी मानवजातीला काय दिले याचा हिशोब जर आपण मांडू लागलो तर धर्ममार्तंडांचा संताप आल्याशिवाय राहणार नाही आणि वैज्ञानिकांच्या कर्तृत्वासमोर आपली मान झुकल्याशिवाय राहणार नाही. धर्ममार्तंडांनी समाजाला काहीही दिले नाही, ते फक्त दान-दक्षिणेच्या रूपात समाजाकडून भरपूर काही घेतच आले, उलट वैज्ञानिकांनी समाजाकडून काहीही घेतले नाही ते मानवजातीला भरभरून अनेक वरदाने देतच राहिले.

वैज्ञानिकांनी मानवजातीला नेमके काय दिले? (१) मानवाला विविध रोगांमुळे होणाऱ्या दुःखातून व ओढवणाऱ्या मृत्यूच्या संकटातून मुक्त केले. (२) मानवाचे शारीरिक व बौद्धिक काबाडकष्ट कमी केले. (३) मानवाला अशक्यप्राय वाटणाऱ्या अनेक गोष्टी वैज्ञानिकांनी शक्य करून दाखवल्या. मानवाला विशिष्ट अशा सूक्ष्म जंतूंमुळे रोग होतात हे सत्य प्रथम फ्रान्सच्या लुई पाश्चर (सन १८२२ ते १८९५) या शास्त्रज्ञाने सांगितले. तोपर्यंत रोग हे जंतूंपासून होतात हेच जगाला माहीत नव्हते. यापूर्वी ज्याला सर्वसाक्षी मानले जायचे त्या देवानेही रोग जंतूंपासून होतात हे सांगितले नव्हते नि त्याच्या ठेकेदारांनीही सांगितले नव्हते. कनवाळू कृपाळू देव रोगजंतू निर्माणच का करतो, असा प्रश्नही इथे विचारता येईल. रोग हे जंतूपासून होतात हे लुई पाश्चरने सांगण्यापूर्वी लोक “रोग हे परमेश्वराच्या अवकृपेने होतात” असे म्हणत होते. “पूर्वजन्मीच्या पापाचे फळ म्हणून रोग होतात” असेही म्हटले जायचे. आपल्याकडे मरिबाईचा फेरा येतो म्हणून साथीचे रोग येतात. देव, देवी किंवा भूत माणसाला लागतं म्हणून रोग होतात असे मानले जाई. आजही अशा वेडगळ कल्पना आपल्या देशातून पूर्णपणे नष्ट झालेल्या नाहीत. लुई पाश्चरच्याच कालखंडात जर्मनीचा रॉबर्ट लौक (सन १८४३ ते १९१०) ह्या शास्त्रज्ञाने मोठे कष्ट घेऊन कॉलरा व क्षय या मानवजातीचा संहार करणाऱ्या रोगांचे जंतू शोधून काढले. क्षयरोगाचे जंतू श्वासाद्वारे मानवी शरीरात जातात हेही त्याने सांगितले. पाश्चरने असे सांगितले की विशिष्ट रोगाचे कमजोर जंतू प्राण्यांच्या शरीरात टोचले तर त्यांच्याठिकाणी रोगाचा प्रतिकार करण्याची क्षमता निर्माण होते व त्यांना तो रोग होत नाही. त्याच्या या प्रयत्नातूनच नंतर १८८५ साली कुत्रे चावल्यावर होणाऱ्या रोगावरची लस शोधून काढली. वैद्यकशास्त्रामध्ये आधुनिकतेची सुरुवात ब्रुसेल्स येथे जन्मलेल्या अ‍ॅन्ड्रयूज व्हेसॅलिअस (सन १५१४-१५६४) याने केली. त्याने माणूस व इतर प्राण्यांच्या शरीराचे विच्छेदन करून पाहिले. १५४३ साली ‘On the Fabric of the Human Body’ हा ग्रंथ लिहिला. प्राचीन रोमन वैद्य गालेन याच्या ग्रंथातल्या २०० चुका काढून दाखवल्या. व्हेलिअसची मानवी शरीराचे विच्छेदन करण्याची कृती तत्कालीन धर्मगुरुंना आवडली नाही म्हणून त्यांनी त्याचा खूप छळ केला. त्याच्या संशोधनाची कागदपत्रे नष्ट केली. त्याला सक्तीने जेरुसलेमच्या तीर्थयात्रेस पाठवले. मानवी शरीरातील सत्यांचा शोध घेण्यासाठी व्हिसॅलिअस शरीरविच्छेदन करून पहात होता त्या काळात आपले महाराष्ट्रातील बहुतांश संत लोक चौऱ्याऐंशी लक्ष योनीच्या फेऱ्यातून मुक्तता व्हावी म्हणून हरी हरी म्हणत टाळ कुटत बसलेले होते. यांच्या बुद्धीला असल्या काही नव्या सत्याचा शोध घेण्याचे प्रश्नच पडत नव्हते. इंग्लंडच्या एडवर्ड जेन्नर (सन १७४९-१८२३) याने तर मानवी जीवनावर फारच मोठे उपकार केलेले आहेत. या शास्त्रज्ञाने भयानक अशा देवी या रोगावरची लस शोधून काढली. ज्या रोगामुळे लाखो लोक मरत होते त्यांना जीवदान देणारा आणि देवीमुळे विद्रुप होऊ शकणाऱ्यांचे सौंदर्य कायम राखणारा शास्त्रज्ञ फार महान असतो. त्याचे स्मरण हे फार प्रेरणादायी असते, हे आपल्या पौराणिक दंतकथेत अडकणाऱ्या आंधळ्या संस्कृतीला कधी कळणार? स्कॉटलंड इथल्या जेम्स सिम्पसन (सन १८११-१९७०) याने १८४७ च्या सुमारास क्लोरोफॉर्म हे गुंगीचे औषध शोधून काढले आणि शस्त्रक्रियेच्या वेळी रोग्यांना होणाऱ्या मरणयातनेतून मुक्त केले. स्कॉटलंडच्या डॉ. जेसेफ लिस्टर (सन १८२७-१९१२) याने शस्त्रक्रियेने होणारी जखम निर्जंतुक करणाऱ्या कार्बालिक ॲसिडचा शोध लावला. या अॅसिडमुळे शस्त्रक्रियेच्या जखमेत पू होणे बंद झाले आणि हजारो रोगी मृत्यूपासून बचावू लागले. जर्मन प्राध्यापक विल्टेम कॉन्राड रोन्टजेन (१८४५-१९२३) याने ‘क्ष’ किरणांचा शोध लावला. या किरणांमुळे माणसाच्या मोडलेल्या हाडांची छायाचित्रे घेणे आणि क्षयरोगाची तपासणी करणे शक्य झाले. साल्क (१९५३) या शास्त्रज्ञाने माणसाला पांगळे व करुणाजन्य करणाऱ्या रोगापासून मुक्त करणारी पोलिओची लस शोधून काढली. १९६७ साली डॉ. किचन बर्नार्ड यांनी हृदयरोपणाची शस्त्रक्रिया केली. वैद्यकशास्त्रात मादाम मेरी क्युरीचे नावही महत्त्वाचे आहे. वैद्यकशास्त्रामध्ये नवनवे शोध लावून मानवाला दुःखमुक्त करणारे असे कितीतरी वैज्ञानिक आहेत. वैद्यकशास्त्रामध्ये अत्यंत मूलगामी अशी कामगिरी करणाऱ्या शास्त्रज्ञांमध्ये भारतीयांची संख्या मात्र नगण्य आहे. भारतीय वैद्यकशास्त्राचा इतिहास हा आयुर्वेदाचा इतिहास आहे. सुश्रूत हा पहिला महान भारतीय वैद्यकशास्त्रज्ञ इ.स. पूर्व पाचव्या शतकात होऊन गेला. हा ऋषी विश्वामित्रांचा पुत्र होता. याने ‘सुश्रूतसंहिता’ हा ग्रंथ लिहून निरनिराळी औषधे, पथ्यापथ्य, इत्यादी आरोग्यविज्ञानाची माहिती दिली. मोतीबिंदू, हर्निया यांसारख्या अवघड शस्त्रक्रियाही तो करू शकत होता असे म्हणतात. जीवक हा शास्त्रज्ञही भारतात होऊन गेला. तो पोटातील व मस्तकातील रोगांचे निराकरण करणाऱ्या शस्त्रक्रियेत पारंगत होता. तो बिंबिसार राजाचा दासीपुत्र होता. तक्षशिला विद्यापीठातले आयुर्वेदाचार्य आत्रेय हे त्याचे गुरु होते. त्याने खुद्द भगवान बुद्धांना जडलेला पोटाचा विकार पूर्णपणे बरा केल्याची नोंद आहे. हा नंतर बुद्धांचा निष्ठावंत शिष्य बनला होता. चरकसंहिता लिहिणारा चरक हा इ.स. च्या दुसऱ्या शतकात होऊन गेला. तो सम्राट कनिष्काच्या दरबारातील राजवैद्य होता. नागार्जुन हा भारतीय रसायनशास्त्राचा जनक मानला जातो. पाऱ्याचे व इतर धातूंचे सरस (संयुक्त धातू) नागार्जुनाने निर्माण केले. त्याने ‘रसरत्नाकर’ हा ग्रंथ लिहिला. नागार्जुन हा सुप्रसिद्ध नालंदा विद्यापीठाचा कुलगुरु होता. वागभट हा भारताचा शेवटचा वैद्यकशास्त्रज्ञ मानला जातो. त्याचा ‘अष्टांगहृदय’ हा ग्रंथ श्रेष्ठ मानला जातो. आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कोणत्याही देवादिकापेक्षा व भोंदू साधूपेक्षा अशा वैज्ञानिकांचेच मानवी जीवनावर फार मोठे उपकार आहेत. मग त्यांच्याकडून संशोधनाची व नवनिर्माणाची प्रेरणा घेण्यासाठी त्यांचे स्मरण का करू नये?

मानवाला विविध रोगांमधून मुक्त करणाऱ्या वैज्ञानिकाइतकेच निसर्गातील विविध शक्तींच्या शोधातून विविध यंत्रांचा शोध लावून मानवी जीवनातील काबाडकष्ट कमी करणारे वैज्ञानिकही महानच असतात. जेम्स वॅट या शास्त्रज्ञाने बाष्पशक्तीचा शोध लावून बाष्पयंत्र तयार केले. ग्रे, डके, कॅव्हेनडिश, कुलंब, हॅन्सेन, मशेनब्रोक या शास्त्रज्ञांनी विजेसंबंधीची मूलतत्त्वे उजेडात आणली. बेंजामिन फ्रैंकलिन यांनी विजेचे घन व ऋण हे गुणधर्म सांगितले व अवकाशातल्या विजेसंबंधीची तत्त्वेही मांडली. मानवी जीवनात विजेचे किती महत्त्व आहे हे आपण जाणतोच. आज माणसाला विजेशिवाय स्वस्थपणे जगणेच अशक्य होते. पण वीजशक्ती शोधण्याचे काबाडकष्ट करणाऱ्या वैज्ञानिकांची आठवण मात्र आपण कधी करत नाही. जर्मनीच्या मॅक्सप्लॅक याने १९०० साली शक्तिकुंजवादाचा सिद्धान्त मांडला. होल्टाने पहिला विद्युतघट तयार केला, तर मायकेल रॅडे याने पहिली विद्युत मोटार बनवली. यंत्रांच्या क्रियाशीलतेत विद्युत मोटारीला कितीतरी महत्त्व आहे. विद्युत मोटारीशिवाय यंत्रे चालूच शकत नाहीत. आपल्या जीवनातील बहुतांश शारीरिक काबाडकष्ट कमी झाले ते या विद्युत मोटारीमुळेच. यासारख्या शोधांबरोबरच डार्विनचा उत्क्रांतीवाद, अल्बर्ट आइन्स्टाईनचा सापेक्षतावाद, आयझॅक न्यूटनचा गुरुत्वाकर्षण सिद्धान्त यांसारखे सिद्धान्तही मानवी विकासासाठी फार महत्त्वपूर्ण ठरलेले आहेत.

ज्या मानवाला विविध धर्ममार्तंडांनी “तू दुबळा आहेस, परमेश्वराच्या हातातील बाहुले आहेस, तुला स्वतंत्र अस्तित्व नाही, तुझे हे जीवनच दुःखमय आहे, संसारपाशातून, त्याच्या दुःखातून मुक्त व्हायचे असेल तर तू परमेश्वराला शरण जा, सतत त्याचे भजनपूजन करत जा, भूदेवांना सतत दानदक्षिणा देत जा, तरच तुझी मुक्ती होऊ शकेल” असे सांगितले, तोच मानव संपूर्ण विश्वामध्ये आज स्वतःचे कर्तृत्व गाजवतो आहे. निसर्गातील सर्व नियम व शक्ती स्वतःच्या हितासाठी राबवून घेतो आहे. मला आता या विश्वात कोणतीही गोष्ट करणे अशक्य नाही ही गोष्ट तो स्वतःच्या एकाहून एक वरचढ अशा आश्चर्यकार कृतींवरून सिद्ध करून दाखवतो आहे. मार्कोनी या इटालियन शास्त्रज्ञाने रेडिओचा शोध लावला आणि कितीही दूरचे संदेश एक मानव दुसऱ्या मानवाला ताबडतोब देऊ लागला. याच धर्तीवर दूरचित्रवाणीचा शोध लावला गेला आणि संपूर्ण विश्वातील घडामोडी घरात बसून टी.व्ही. संचावर बघता येऊ लागल्या. ज्या चंद्राला देव मानून त्याची पूजा केली जात होती त्या चंद्रावर २० जुलै, १९६९ साली नील आर्मस्ट्राँगने पहिले पाऊल टाकले. आज माणूस मंगळावरही जाऊ पहातो आहे. असे एक एक करत माणूस संपूर्ण विश्वभरच स्वत:चा संचार करणार आहे. ज्या प्रवासाला महिनोमहिने लागत होते, वर्षानुवर्षे लागत होती तो प्रवास आज माणूस विमानाच्या साहाय्याने काही तासात करू लागला आहे. अलीकडची संगणकक्रांती तर मानवाला फार प्रगत बनवणारी आहे. अशा अनेक स्वरूपाच्या आश्चर्यकारक गोष्टी जागतिक पातळीवरील वैज्ञानिकांच्या जिद्दीमुळे व काबाडकष्टामुळेच घडून येत आहेत म्हणून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी तेवढी कमीच आहे. अर्थात वैज्ञानिकांनी लावलेला अणुशक्तीचा शोध, त्यातून बनवले गेलेले अणुबाँब, या अणुबाँबनी केलेला हिरोशिमा-नागासाकी शहरांचा विनाश, आज जगामध्ये सुरू असलेली प्रचंड अशी विनाशक शस्त्रस्पर्धा, वैज्ञानिक प्रगतीद्वारे लोकांमध्ये, विशेषतः ‘आहे-रे’ वर्गामध्ये बोकाळलेला प्रचंड मोठा चंगळवाद, मानवी मूल्यांना पायदळी तुडवण्याची वाढत जाणारी वृत्ती, मागे राहिलेल्या समाजगटांच्या जगण्यासाठीच्याच मूलभूत प्रश्नांकडे होणारे दुर्लक्ष, अन्नपाणी महाग आणि टी.व्ही. मोबाईल स्वस्त अशा स्वरुपाची निर्माण झालेली स्थिती यांसारख्या गोष्टीही वैज्ञानिक प्रगतीबरोबरच आल्या ही खेदाची गोष्ट आहे. म्हणून वैज्ञानिक प्रगतीबद्दलचा आनंद व्यक्त करत असताना, वैज्ञानिकांबद्दलची कृतज्ञता व्यक्त करत असताना विज्ञान हे दुधारी शस्त्र आहे, विज्ञानाला स्वतःला कुठल्याच संवेदना अथवा भावना नसतात, ते विधायक गोष्टी करू शकते तसे विनाशक गोष्टीही करू शकते हे सतत लक्षात ठेवणे आवश्यक आहे. विज्ञानाच्या विनाशकारी वापराला जागतिक पातळीवरील सामान्य माणसांनी सतत कठोर असा विरोध केलाच पाहिजे. विज्ञानाच्या जोडीला कायम शांतता, अहिंसा, कल्याणकारकता, नवरचनात्मकता ही मूल्ये असली पाहिजेत. यासंदर्भात जनतेने सतत जागरूक राहिले पाहिजे.

भारताने या संदर्भात महत्त्वपूर्ण कामगिरी केलेली आहे, याचीही आपण विनम्र अभिमानाने नोंद केली पाहिजे. या संदर्भात डॉ. होमी भाभा व डॉ. विक्रम साराभाई यांची नावे आदराने घ्यावी लागतात. डॉ. होमी भाभांनी अणुशक्तीचा वापर विध्वंसासाठी नाही, तर मानवी कल्याणासाठी केला गेला पाहिजे, अशी आग्रही भूमिका घेतली. भाभा हे भारतीय अणुशक्ती मंडळाचे पहिले प्रमुख होते. अणुशक्तीपासून विद्युतनिर्मिती करण्यासाठी त्यांनी ४ ऑगस्ट, १९५६ रोजी ट्रॉम्बे इथे पहिली अणुभट्टी कार्यान्वित केली. अवकाश संशोधन करणाऱ्या डॉ. विक्रम साराभाईंनी भाभांचाच वारसा पुढे चालवला. भारतात आज वैज्ञानिक व तांत्रिक संशोधन करणाऱ्या बऱ्याच संस्था कार्यरत आहेत. उदा. भाभा अणुसंशोधन केंद्र, ट्रॉम्बे, टाटा मूलभूत संशोधन संस्था मुंबई, हाफकिन इन्स्टिट्युट मुंबई, भारतीय कृषी संशोधन संस्था दिल्ली, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे, डॉ. विक्रम साराभाई अवकाश संशोधन केंद्र, थुंबा त्रिवेंद्रम, भारतीय सर्वेक्षण विभाग डेहराडून, राष्ट्रीय सागर संशोधन संस्था पणजी, राष्ट्रीय दूरसंवेदन संस्था हैद्राबाद, विज्ञान संस्कृतीच्या निर्मितीमध्ये वैज्ञानिकांबरोबरच यांसारख्या मूलभूत संशोधन करू पाहणाऱ्या संस्थांनाही फार मोलाचे स्थान आहे.

अस्तित्वात नसलेल्या देवाच्या विविध काल्पनिक रूपांच्या व अवतारांच्या स्मरणापेक्षा वैज्ञानिकांचे स्मरण हे मानवी प्रगतीच्या व कल्याणाच्या दृष्टीने शतपटीने महत्त्वाचे आहे ही गोष्ट आता तरी भारतीयांनी गांभीर्याने लक्षात घेतली पाहिजे. आणि देवधर्म संस्कृतीच्या नावाखाली चालणाऱ्या तीर्थयात्रा, कुंभमेळे, हजारो मंदिरांमधील हजारो अभिषेक, महोत्सव, गणेशोत्सव, पौराणिकतेवर आधारलेले विविध सण यासारख्या गोष्टींमध्ये आंधळेपणाने गुंग होणे आणि त्यासाठी कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी करणे थांबवले पाहिजे. आपली भूमिका केवळ नकारवादी नाही तर नवी विधायक संस्कृती मांडण्याची आहे.

संविधानकेंद्रित संस्कृतीचा एक महत्त्वपूर्ण घटक असलेल्या विज्ञानसंस्कृतीचा विकास करण्यासाठी वैज्ञानिकांचे स्मरण कशाप्रकारे केले जावे? या प्रश्नाचे उत्तर देणे आवश्यक आहे. वैज्ञानिकांचे स्मरण करणे म्हणजे त्यांचा अंध पद्धतीने गुणगौरव करणे किंवा पूजा करणे नव्हे तर वैचारिक भूमिकेतूनच आपण वैज्ञानिकांचे स्मरण केले पाहिजे. त्यात वैज्ञानिकांचे जीवनचरित्र समजून घेणे, त्यांनी जो मूलगामी शोध लावला त्यासाठी किती व कसे कष्ट घेतले ते लक्षात घेणे. हे सर्व करताना वैज्ञानिकांबद्दलची कृतज्ञता तर व्यक्त होईल; परंतु त्यातील महत्त्वाची गोष्ट ही की, देशाच्या उगवत्या पिढ्यांना यातून नवनव्या संशोधनाच्या प्रेरणा मिळतील. या देशात नवेनवे शास्त्रज्ञ जन्माला येण्याची शक्यता वाढेल. या देशात खूप मोठी बौद्धिक संपदा आहे. ही बौद्धिक संपदा आजवर विनाकारण वाया गेलेली आहे. ती इथून पुढे तरी वाया जाता कामा नये म्हणून वैज्ञानिकांच्या जीवनकार्याला संस्कृतिबद्ध करणे फार आवश्यक आहे. आपण एखाद्या वैज्ञानिकाची जयंती अनेकविध उपक्रम राबवून मोठ्या प्रमाणात साजरी करावी हे अजूनही आपल्या डोक्यात येत नाही, हे पुराणगुंगेपणातून आलेल्या मागासलेपणाचे लक्षण आहे. कुठल्या देवादिकाची जयंती साजरी करण्यापेक्षा राष्ट्रीय महामानवांची जयंत साजरी करणे जसे चांगले असते तसेच वैज्ञानिकांची जयंती साजरी करणेही चांगले असते. कोणत्याही वैज्ञानिकाला धर्माची अथवा देशाची बंधने नसतात, प्रत्येक वैज्ञानिक हा सर्व जगाचा असतो. कारण त्याने जो शोध लावलेला असतो तो समग्र मानवजातीसाठीचा असतो. म्हणून जर्मनी, फ्रान्स, इटली किंवा अमेरिका कुठेही जन्मलेल्या महान वैज्ञानिकांची जयंती आपण साजरी करायला काहीच हरकत नाही. जो देश वैज्ञानिकाची जयंती साजरी करतो तो कोणत्याही दृष्टीने मागे राहूच शकत नाही ही गोष्ट लक्षात घेऊन ही प्रक्रिया आपल्या देशात सुरू झाली पाहिजे. आपण वैज्ञानिकाच्या प्रतिमेची मिरवणूक काढली पाहिजे. त्याच्या जीवनकार्याचे विश्लेषण करणारी सभासंमेलने व चर्चासत्रे आयोजित केली पाहिजेत. वैज्ञानिकांनी लावलेल्या शोधाचा प्रत्येक माणूस त्याच्या नित्याच्या जीवनामध्ये भरपूर उपयोग करून घेतो; परंतु मानवी जीवनावर फार मोठा उपकार करणाऱ्या एखाद्या वैज्ञानिकाचा फोटो आपल्या घरात लावावा असे अजूनही कुणालाच वाटत नाही. घरातला हा फोटो आपल्या मुलीला किंवा मुलाला वैज्ञानिक होण्याच्या प्रेरणा देऊ शकेल असे, घरामध्ये भाराभर देवादिकांचे फोटो लावणाऱ्या लोकांच्या ज्या दिवशी लक्षात येईल तो दिवस सुवर्ण दिवस असेल. मला वैज्ञानिकांचे फोटो फक्त वैद्यकीय महाविद्यालयात व विज्ञान महाविद्यालयात दिसले. कुठल्याही शासकीय कार्यालयात मला वैज्ञानिकांचे फोटो लावलेले दिसले नाहीत. उलट सरस्वती, गणपती आदी प्रतिमा मात्र धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वाला छेद देऊन शासकीय कार्यालयात लावलेल्या दिसतात. हे आपल्या दरिद्री जीवनदृष्टीचे लक्षण आहे.

भारतात विज्ञानसंस्कृती निर्माण करण्यासाठी आता सर्वच परिवर्तनवादी चळवळींनी पुढे येण्याची गरज आहे. समतावादी चळवळीतील मंडळी म. फुले, सावित्रीबाई व बाबासाहेब आदींचा फोटो शासकीय कार्यालयात लावण्याचा जसा आग्रह धरते त्याप्रमाणे काही वैज्ञानिक नक्की करून त्यांचे फोटो शासकीय कार्यालयात लावण्याचा आग्रह धरला पाहिजे. बाबासाहेबांच्या जयंतीप्रमाणेच आपण काही वैज्ञानिकांची जयंती साजरी करण्याचीही सुरुवात केली पाहिजे. कारण समतावादी, बुद्धिवादी चळवळीतील लोकांनाच आता या देशाला नव्या वैज्ञानिक दिशा द्यायच्या आहेत.

विज्ञानसंस्कृती निर्माण करण्यासाठी इथे शासनालाही काही सूचना करणे आवश्यक आहे. शासनाने जागतिक पातळीवरील महत्त्वपूर्ण वैज्ञानिकांची चरित्रे प्रसिद्ध करून ती स्वस्त दरात उपलब्ध करून दिली पाहिजेत. शालांत परीक्षेनंतरसुद्धा सर्व विद्याशाखांमध्ये वैज्ञानिकांच्या चरित्राचा व वैज्ञानिक प्रगतीच्या इतिहासाचा समावेश अभ्यासक्रमात केला पाहिजे. वैज्ञानिकांच्या जीवनचरित्रावर आधारलेल्या दूरदर्शन मालिका तयार करून त्या लोकांना दाखवल्या पाहिजेत. वैज्ञानिकांच्या संशोधकीय प्रेरणा देण्यासाठी जी जी साधने उपलब्ध आहेत त्या सर्व सांस्कृतिक साधनांच्याद्वारे या देशात वैज्ञानिकांचे स्मरण केले गेले पाहिजे. अशा प्रक्रियेमधूनच आपल्या प्रजासत्ताक लोकशाही भारताला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाणारी विज्ञानसंस्कृती विकसित होऊ शकेल.

प्रमुख, मराठी विभाग 
पीपल्स कॉलेज नांदेड.
भ्रमणध्वनी क्र. 9860525588

अभिप्राय 2

  • Loved this article! It is very well written and timely as a new debate on different branches of medicine is brewing.

  • मला येथे पु. ल. देशपांडे यांनी मांडलेले जळजळीत विचार आठवले
    “पंढरपूरच्या यात्रेत हजारो माणसं कॉलऱ्यान मरत होती. ते मरण लाखो लोकांनी केलेल्या नामाच्या गजराने थांबल नाही.ते थांबवलं, कॉलऱ्याची रस शोधून काढणाऱ्या वैज्ञानिकांनी.”
    “महाराष्ट्रात इतके संत होऊन गेले, त्याऐवजी निसर्गाची रहस्य उलगडून दाखवणारे शास्त्रज्ञ निर्माण झाले असते, तर मला अधिक आनंद झाला असता.”
    “शस्त्रक्रिया वेदनारहित व्हावी म्हणून ऍनेस्थेसिआचा शोध लावणारा शास्त्रज्ञ मला कोणत्याही संतापेक्षा श्रेष्ठ वाटतो.”

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.