उत्तम निरौला ह्यांचे भाषण

नमस्कार, आणि आपणां सगळ्यांनाच धन्यवाद. विशेषकरून कुमारजींना, विशेष अतिथी अलकाजी, प्रसन्नजी, अविनाश पाटीलजी, असीमजी, प्रो. नायक-ज्यांच्याकडून मी बरंच काही शिकलो आहे आणि महाजनजी-यांनी मला अनेक प्रकारची मदत केली आहे. तसेच या नास्तिक परिषदेत आलेले सुज्ञ, विचारवंत यांचेही आभार. 

या परिषदेत सहभागी होणं ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. मी भारतात अनेकदा आलो आहे, परंतु अशाप्रकारे लोकांशी संवाद साधण्याची माझी ही पहिलीच वेळ! मी भारतात साधारणपणे ज्या कार्यक्रमांसाठी येतो, त्या कार्यक्रमांत लोक भरपूर असतात, पण तिथे संवाद कमी आणि भाषणं जास्त होतात. इथे मात्र संवादाला अधिक जागा दिलेली दिसते आहे. हे अतिशय महत्त्वाचं आहे, कारण यामुळे भारतात या विषयावर काय काम चाललं आहे याची कल्पना येईल आणि परस्परांच्या सहयोगाने काय करता येईल याचाही विचार होऊ शकेल. भारतात येण्याचा अभिमान वाटण्याचं कारण म्हणजे ही भूमी चार्वाकाची आहे, भगतसिंगांची आहे, आंबेडकरांची आहे आणि ही भूमी महावीर, बुद्ध ह्यांचीही आहे. हे लोक मानवतावादाचा आणि निरीश्वरवादाचा प्रसार करणारे म्हणून ओळखले जातात. जागतिक स्तरावर त्यांची एक वेगळी जागा आहे. जगातील इतर कोणत्याही देशाच्या प्राचीन इतिहासात बंधुता आणि मानवतावादी लोकांच्या अशा संमिश्रणाचे उदाहरण सापडणार नाही. आणि म्हणूनच अभिमान बाळगावा अशीच ही भूमी आहे.

अमेरिकन ह्युमनिस्ट इन्स्टिट्यूट नावाची एक संस्था आहे. ‘मानवतावाद’ या विषयाचा एक संक्षिप्त अभ्यासक्रम ही संस्था चालवते. आणि ह्याची सुरुवात जर ऐतिहासिक व्यक्तींपासून करायची झाली तर त्यात चार्वाक आणि गौतम बुद्ध असणारच/असायलाच हवेत. मानवतावाद, निरीश्वरवाद ह्या काही पाश्चात्य संकल्पना नाहीत. यांचा उगम इथून, या भूमीतूनच झाला आहे. आणि याचा आपल्याला अभिमान असायला हवा. जे ह्यांना पाश्चात्य संकल्पना समजतात, त्यांना स्वत:चं मूळ माहीत नाही, आपल्या पूर्वजांविषयी माहिती नाही. आपण आपल्या मूल्यांना, आपल्या नैतिकतेला व्यापक करतो आहोत आणि ह्याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. 

मी आता ह्युमनिस्ट इंटरनॅशनलविषयी संक्षेपात सांगतो. मी तिथे आंतरराष्ट्रीय राजदूत या नात्यानं काम करतो आणि मी त्यांच्या बोर्डाचा सदस्यही आहे. या बोर्डावर वेगवेगळ्या ९ देशांचे प्रतिनिधी आहेत आणि आम्ही २ आंतरराष्ट्रीय राजदूत आहोत. आम्ही अनेक देशांमध्ये ‘मानवता’ ह्या संकल्पनेविषयी बोलतो. ह्युमनिस्ट इंटरनॅशनल काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर काम करते आहे. जगभरातील मानवतावादी, बुद्धिप्रामाण्यवादी, मुक्तचिंतक, निरीश्वरवादी हे सगळेच खरं तर ‘ह्युमनिस्ट इंटरनॅशनल’ या बॅनरखाली येतात. ह्युमनिस्ट इंटरनॅशनल अधिकृतपणे ७२ हून अधिक देशांचं प्रतिनिधित्व करते, तर इतर अनेक संस्थांत, जिथे आम्ही अधिकृतपणे कार्य करू शकत नाही, जसे की पाकिस्तानातील काही, इराणमधील काही, रशियातील काही गट, अशा अनेक संस्थांसोबत अनधिकृतपणे काम करते आहे. आम्हीं, मानवतेचा आणि निरीश्वरवादाचा संदेश, या लोकांचे अधिकार, यांचा प्रसार करतो. जगभरात अनेक मानवतावाद्यांवर खटले भरले जातात, त्यांचा छळ केला जातो. अगदी जगातील सर्वांत मोठी लोकशाही मानल्या गेलेल्या भारतातही हे होत आहे! मला वाटतं, ह्युमनिस्ट इंटरनॅशनल या चळवळीचं लक्ष त्यामुळेच भारतावर केंद्रित झालं आहे. इथल्या काही ख्यातनाम नास्तिकांवर, बुद्धिप्रामाण्यवाद्यांवर खटले सुरू आहेत. काहींची निर्घृण हत्या केली गेली आहे, त्यांना अतिशय वाईटप्रकारे लक्ष्य केलं जात आहे.

जेव्हा जेव्हा मी प्रो. नरेन्द्र नायकांशी बोलतो, तेव्हा तेव्हा ते मला म्हणतात, “मी आणखीन काही दिवस जगू शकेन, माझ्या इतर काही सहकाऱ्यांप्रमाणे ते लोक मलाही निर्घृणपणे मारून टाकणार नाहीत, अशी आशा आहे.” ही भीतीची भावना आज सर्वत्र दिसते. मला वाटतं की ही भीती आज अनेकांच्या अंतर्मनात आहे. ही समस्या सार्वत्रिक आहे, ही वेदना सार्वत्रिक आहे. त्यामुळे आम्ही ह्युमनिस्ट इंटरनॅशनलमध्ये एक विशेष पथक बनवलं आहे, जे लोकांच्या अधिकारांसाठी/हक्कांसाठी काम करतं. याचे प्रतिनिधी UN, युरोपीअन युनियनसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांत अशा लोकांचं प्रतिनिधित्व करतात. हे पथक सातत्याने मानवतावाद्यांच्या संरक्षणासाठी काम करते.

यापुढची पायरी म्हणजे, धर्मापासून वा पंथापासून मुक्ती. याबद्दल उपस्थितांपैकी किती जणांना माहिती असेल ठाऊक नाही. केवळ तुमचा धर्म वेगळा आहे, तुमच्या श्रद्धा वेगळ्या आहेत किंवा तुम्ही कुठलाच धर्म, पंथ मानत नाही, म्हणून काय तुम्हांला व्यक्त होण्याचा अधिकारच नाही? एकमेकांत, समविचारी लोकांत समन्वय साधण्याचा, सहयोग करण्याचा, संस्थांशी संलग्न होण्याचा, संस्था नोंदणीचा, अधिकार नाही का? ब्राइट्ससारख्या सोसायटीला या देशात त्यांच्या संस्थेची नोंदणी करण्यासाठी केवढा संघर्ष करावा लागतो! हा मुद्दा आपण उचलला पाहिजे. एकमेकांसोबत, संस्थात्मक स्वरूपात काम करण्याचा अधिकार सगळ्यांना असायला हवा. कारण तुम्ही निरीश्वरवादी म्हणून ओळख प्रस्थापित करत असाल, तर जागतिक पातळीवर निरीश्वरवाद्यांची एक संस्था बनवण्याचा अधिकार तुम्हाला आहेच. मानवी हक्कांतर्गत तुम्हाला तो अधिकार आहे. याच हक्कांचा प्रचार आम्ही करतो. आम्ही मानवतावादी संघटनांसोबत त्यांच्या कार्यक्षमता वाढवण्यासाठी काम करतो. कारण तसंही आपण एक समूह म्हणून समाजापासून फार वेगळे पडतो. जसे एका बाजूला ब्राइट्स सोसायटी भारतात काम करते, तिकडे कुठे दुसरीकडे नेपाळला दुसरी संस्था काम करते. यांचे आपसात नेटवर्क असायला हवे. आपली कार्यक्षमता वाढायला हवी. हे सहकार्य, हा समन्वयच आपल्या चळवळीला पुढे नेईल. यावर आम्ही काम करतो. आमच्याकडे यासाठी विशेष पथक आहे आणि युनायटेड नेशनमध्ये एक समितीदेखील आहे. उपस्थितांना या समितीविषयी माहिती असेलच. धर्म किंवा श्रद्धा बाळगण्याविषयीच्या प्रत्येकाच्या स्वातंत्र्याचा ही समिती पुरस्कार करते. परंतु आपण जेव्हा वेगवेगळ्या श्रद्धा बाळगण्याच्या प्रत्येकाच्या अधिकाराबाबत बोलतो तेव्हा आपण कोणतीही श्रद्धा न बाळगणाऱ्यांच्या अधिकाराबद्दलही बोलत असतो. हे समजावून सांगण्यासाठी, ह्याचा प्रसार करण्यासाठी, मानवतावादी संघटनांना प्रशिक्षण देण्यासाठी, युनायटेड नेशनसोबत आम्ही एक विशेष अभ्यासक्रम तयार केला आहे आणि नेटवर्किंग हा त्याचा केन्द्रबिन्दू आहे. जगभरातील सगळ्या मानवतावादी संघटनांना एकत्र आणून त्यांचे विचार सामायिक करण्याच्या प्रक्रियेतून हे नेटवर्क अधिक प्रभावी बनेल.

पुढल्या वर्षी डेन्मार्क येथे आम्ही वर्ल्ड कॉंग्रेसचे आयोजन करतो आहोत. तुमच्यापैकी अनेकांनी याविषयी ऐकले असेलच. तुम्हा सर्वांचे तेथे स्वागत असेल. जगभरातून हजारो मानवतावादी एकत्र येऊन आपापले विचार तेथे मांडतील/सामायिक करतील. मी ह्या कार्यक्रमाची लिंक ब्राइट्सच्या ईमेलवर पाठवतो किंवा तुम्हीं ह्युमनिस्ट इंटरनॅशनलच्या वेबसाईटला भेट द्या. तेथे तुम्हाला सगळी माहिती मिळेल. आम्ही करीत असलेलं दुसरं एक महत्त्वाचं काम म्हणजे जगभरातील मानवतावाद्यांचे संरक्षण! ही खरं तर राज्याची जबाबदारी आहे, परंतु शासनयंत्रणा जनतेला सुरक्षा देण्यात कमी पडत आहे. त्यामुळे आम्ही लोकसभा सदस्यांसोबत यासाठी काम करतो आहोत. या मुद्द्याकडे त्यांचं लक्ष केन्द्रित करण्याचे प्रयत्न करतो आहोत, विशेषत: साऊथ एशियन देशांसोबत. इतर देशांतदेखील आम्ही जातो आणि ३-४ दिवस चर्चा करतो. मानवतावाद्यांच्या सुरक्षेबाबत किमान वकिलीतरी करावी असं सांगतो. तसेच निरीश्वरवाद्यांच्या सुरक्षेबाबतही बोलतो. हा एक महत्त्वाचा कृतिकार्यक्रम आम्ही चालवतो. भारतातील काही लोकसभा सदस्यांशी आम्ही याबाबत बोललो. ते म्हणतात, ते आम्हांला मदत करतील, परंतु त्यांची नावे उघड न करण्याच्या अटीवर. आम्ही भारत, पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका येथील अशा काही लोकसभा सदस्यांना आमंत्रित केलं आहे. तेव्हा हे सदस्यही आमच्यासाठी पडद्यामागे राहून कामं करतील. ही आमच्यासाठी मोठी उपलब्धी आहे. ह्युमनिस्ट इंटरनॅशनल अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने करत असते. तुमच्याकडेही काही नव्या कल्पना असतील, काही सूचना असतील तर आम्हांला सांगा, आमच्याशी सहकार्य करा. आम्ही त्यावरही काम करू. भारतातील सगळ्याच मानवतावादी, निरीश्वरवादी संघटनांना, मुक्तचिंतकांना, बुद्धिप्रामाण्यवादी समूहांना मी विनंती करतो की त्यांना इथे दिल्या जाणाऱ्या धमक्यांचे, आव्हानांचे पुरावे गोळा करा, डॉक्युमेंटेशन करा. ते पुरावे आम्ही युनायटेड नेशनसारख्या जागतिक संस्थांसोबत सामायिक करू. हे करणे आवश्यक आहे कारण प्राणाची धमकी ही साधीसुधी धमकी नाही. आपल्यावर एकेक जीव वाचवण्याची जबाबदारी आहे, कारण आपण मानवतेच्या मूलभूत तत्त्वांवरच काम करतो आहोत. मी याआधीही उल्लेख केला तसे भारताला मानवतेची खूप खोलवर रुजलेली संस्कृती आहे. पण या विषयाचे एकत्रित संकलन कुठे सापडत नाही. केरळात मानवतेची चळवळ खूप प्रभावशाली आहे. महाराष्ट्रालाही अशा प्रकारच्या चळवळींचा इतिहास असणार. आपण भारतातील कुठल्याही छोट्या भागात गेलो तर, तेथील संस्कृतीतही मानवता खोलपर्यंत रुजलेली दिसेल. ती व्यवहारात आणि विचारांत रुजलेली दिसेल. पण या विचारांचं लिखित स्वरूपात संकलन नाही. कदाचित भाषेच्या विविधतेमुळे अडथळा येत असेल, कारण भारत देश आमच्याठी तर एका खंडासमानच आहे.

कदाचित ब्राइट्स सोसायटीच्या सदस्यांपैकी कोणीतरी ही सगळी माहिती, हा डेटा गोळा करू शकतील. पुस्तकं, चरित्रग्रंथ अशा स्वरूपात जर या लोकांबद्दलची माहिती आपल्याला डिजिटल व्यासपीठांवर टाकता आली तर येणाऱ्या पिढ्यांना त्यातून बरंच काही शिकता येईल. मला वाटतं अशा माहितीचा सध्या अभाव आहे. ब्राइट्स जर हा पुढाकार घेणार असेल तर ह्युमनिस्ट इंटरनॅशनल त्यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे. शिवाय ह्युमनिस्ट इंटरनॅशनल अशा कामांसाठी जागतिक व्यासपीठदेखील उपलब्ध करून देईल. तुमचं तिथे स्वागत असेल. मानवतेची संकल्पना खोलवर समजून घेण्यासाठी जर कुणी वेगवेगळ्या देशांमध्ये प्रवास करू इच्छित असेल तर त्यांच्यासाठी आम्ही शिष्यवृत्तीही देऊ करतो. तरुणांना येथे प्राधान्य असेल. यात आपणही सहभागी होऊ शकता. अधिकाधिक तरुणांनी यात सहभागी व्हायला हवं. आम्ही नागरी संघटनांना UPR (Universal Public Review) च्या दस्तावेजीकरणात सहभागी करून घेतो. तुम्हाला भारतातील काही विशिष्ट घटनेविषयी सांगायचं असेल तर आम्ही ते Universal Public Review मध्ये टाकू शकतो आणि त्यानंतर तुमच्यासोबत विदेशमंत्री किंवा भारतसरकारचे सचिव यांची चर्चा घडवून आणू शकतो. यात पुरावे सादर केले जातात. आणि म्हणूनच हे व्यासपीठ अतिशय महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. अशा काही गोष्टी आहेत जिथे आपण मिळून काम करू शकतो. आपण एकत्रितपणे करू शकणाऱ्या कृतिकार्यक्रमांची सूची करण्याचे कुमार म्हणाला, त्यानुसार मला सुचलेल्या काही गोष्टी मी सांगितल्या.

विद्यमान परिस्थितीत उजव्या विचारांना पाठिंबा देणाऱ्या चळवळी वाढत आहेत. फक्त भारतातच नव्हे, तर जागतिक पातळीवर हे दिसून येतं. ब्रिटनमध्ये, युनायटेड किंगडममध्ये काय होतं आहे? उजव्या विचारसरणीच्या राजकारणाचं वर्चस्व पसरतं आहे. पण नायक यांनी थोड्या वेळापूर्वीच सांगितल्याप्रमाणे मानवतावाद्यांची संख्या त्याहून अधिक वेगाने वाढते आहे. युनायटेड किंगडमच्या जनगणनेप्रमाणे ब्रिटनमधील ३७% जनता निरीश्वरवादी आहे. ब्रिटनमध्ये ख्रिश्चनधर्माचे लोक अल्पमतात/अल्पसंख्यक असण्याची ही पहिलीच वेळ आहे. आणि ह्याचा त्यांना धक्का बसला आहे. तुम्हाला माहीतच असेल की ब्रिटनमध्ये धार्मिक संघटना, इतकेच कशाला तर स्वत: राणीदेखील धर्माची प्रतिनिधी आहे. राजाही धर्माचे प्रतिनिधित्व करतो. संसद राजानेच सुरू केली आहे, तो लॉर्ड्सची नेमणूक करतो, पण आता ह्या लॉर्ड्सना प्रश्न विचारण्याची सुरुवात आम्ही केली आहे. कारण ते जनतेचे प्रतिनिधी नाहीत. प्रजेत तर अनेक निरीश्वरवादी आहेत. आता लॉर्ड्स जर जनतेचा आवाज बनू शकत नसतील, तर हे कसचे प्रतिनिधित्व? मला वाटतं निरीश्वरवाद्यांचा हा आवाज अधिक प्रभावी होतो आहे आणि ख्रिश्चनिटीचा संसदेवरील पगडा सैलावतो आहे. जागतिक पातळीवर सध्या ही अशी सगळी परिस्थिती आहे.

भारतात उजव्यांचं वर्चस्व वाढतं आहे असं मलाही दिसतं आहे. इथले आमचे मानवतावादी मित्र दहशतीखाली आहेत. पण सोबतच मानवतावादी मूल्येदेखील अधिक प्रखरपणे समोर येत आहेत. लोक निरीश्वरवाद, बुद्धिप्रामाण्यवाद, मुक्तचिंतन यांविषयी बोलू लागले आहेत. संस्था अधिक सुसंघटित झाल्या आहेत. आता ब्राइट्सचंच उदाहरण घ्या. मला कोणीतरी असं सांगितलं की ब्राइट्सचे ३०% ते ४०% सदस्य तरुण, म्हणजे साधारण ३० वर्षांहून कमी वयाचे आहेत. ही खूप मोठी उपलब्धी आहे. भारताला तसाही या विचारांचा खूप मोठा इतिहास आणि वारसा लाभलेला आहे. उजव्यांची कट्टरता जितकी वाढत जाईल, तशी त्या विचारांपासून मुक्तीची गरज लोकांना अधिक प्रकर्षाने जाणवत जाईल. समाजाला हवे ते वैचारिक स्वातंत्र्य मिळावे यासाठीच आपले प्रयत्न असणार आहेत. याचे उदाहरण आपल्यासमोर आहे. एक मोठी क्रांती झाली आणि त्यामुळेच तर भारताला सर्वश्रेष्ठ असं संविधान लाभलं. जगभरातील कुठल्याच देशाच्या संविधानात जनतेने वैज्ञानिक विचारांचा प्रसार करावा असं म्हटलेलं नाही. मला वाटतं आपले वकील मित्र असीमजींनीदेखील हा उल्लेख केला. मला मराठी भाषा कळत नाही, पण मला वाटतं की त्यांच्या भाषणातून मी हे जे समजलो ते बरोबर असावं. तर भारताजवळ असलेली ही खूपच महत्त्वाची ठेव आहे आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या प्रसाराचं काम आपण करायलाच हवं. ते संविधानातच आहे, त्यामुळे उजव्यांच्या वर्चस्वाला घाबरण्याचं काहीही कारण नाही. संविधान आपल्या बाजूने आहे आणि ते बदलण्याइतकी शक्ती किंवा बहुमत त्यांच्याकडे नक्कीच नाही. जगात इतरत्र मात्र अशी परिस्थिती नाही.

भारताच्या संदर्भात एक गोष्ट मात्र मला खटकते. भारतात निरीश्वरवाद्यांची संख्या भरपूर आहे. मी इतक्यातच एका कुठल्या अहवालात निरीश्वरवाद्यांची टक्केवारी बघत होतो. असं असताना जनगणनेत ही वेगळी श्रेणी का नसावी? हा आकडा आपल्याला माहीत असायला हवा. तो १ टक्का असो की १० टक्के! अगदी वाईटातवाईट परिस्थितीत एकच जण असेल! पण निश्चितपणे कळू तर द्या तो आकडा! अशी अगदी एकच व्यक्ती असली तरीही तिला अल्पसंख्यक म्हणून वर्गीकृत करावं लागेल. त्या आधारावर आपण या विचारांचा पुरस्कार तर करू शकतो. तर जनगणनेत असा प्रश्न असायला हवा की तुमचा देवावर विश्वास आहे का? किंवा धर्मावर तुमची श्रद्धा आहे का? आपली चळवळ अधिकृतरित्या मजबूत करण्यास हे उपयुक्त ठरेल. मानवतावाद्यांना ओळखण्यास मदत करेल. हा कळीचा मुद्दा आहे असे मी उद्धृत करू इच्छितो.

मी आधी सांगितल्याप्रमाणे, ह्युमनिस्ट इंटरनॅशनल ही निरीश्वरवादी, मानवतावादी विचारांचा पुरस्कार आणि प्रचार करणारी एक मजबूत, समर्थ अशी संघटना आहे. आम्ही दरवर्षी एक अहवाल प्रकाशित करतो-फ्रीडम ऑफ थॉट रिपोर्ट. ह्यावर्षी, हा अहवाल प्रकाशित करण्यासाठी, युएसएच्या स्टेट डिपार्टमेन्टने आम्हाला अधिकृत आमंत्रण दिले. ही आमच्यासाठी एक उल्लेखनीय कामगिरी आहे. तसंच, युरोपीअन युनियनही हा अहवाल संयुक्तपणे प्रकाशित करण्यासाठी आम्हाला आमंत्रित करते. यावरून हे दिसून येतं की जागतिक पातळीवरील समुदाय आणि काही लोकतांत्रिक देश आमच्यासोबत येण्यास, आमच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहेत. कारण आम्ही मानवी हक्कांचा, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करतो, जो लोकशाही आणि विज्ञानाच्या पुरस्कारातला गाभा आहे. लोकांना यातून सुरक्षितता मिळते. कोरोनाकाळात इतर सर्व धार्मिक स्थळे काही काळासाठी बंद असतानाही आमचं काम सुरू होतं. आम्ही घरोघरी जाऊन अनेकांचे प्राण वाचवले. अशा प्रकारच्या चमत्कारांची क्षमता आमच्यात आहे. आमचे प्रो.नायक यांचा चमत्कारांवर विश्वास नाही, पण कोरोनासारख्या महामारीवर लस शोधण्याचा चमत्कार याच मानवतावादी शास्त्रज्ञांनी केला आहे. कोरोनाकाळात लोक जर मंदिर, चर्च, मशीद किंवा अशा कुठल्याही धार्मिक ठिकाणी जात राहिले असते, तर मला वाटतं, तिथे गेल्यामुळे त्यांचे आयुष्य वाचण्याऐवजी उलट संपण्याचीच शक्यता वाढली असती. त्या काळात आम्हींच प्रत्यक्ष जमिनीवर काम करत होतो. मी WHO करितादेखील काम करतो आणि त्यांच्याकडे भारत, नेपाळ किंवा आफ्रिकेतील काही धार्मिक देशांच्या संदर्भातील डेटा उपलब्ध आहे. येथील धार्मिक स्थळांवर कोरोना विषाणूचा प्रसार सर्वाधिक झाला. त्यामुळेच आम्ही सरकारांशी बोलत होतो. कोरोनाची महामारी असेपर्यंत किंवा किमान त्यावरील लस निघेपर्यंत ही धार्मिक स्थळं बंद करण्यासंबंधात बोलत होतो. येथून फक्त विषाणूच पसरला नाही तर मूर्खपणाही पसरला. लोकांना अर्थात मंदिरात किंवा चर्चमध्ये जाण्याचा अधिकार असतोच. त्यांना आपण त्यापासून परावृत्त करू शकत नाही.परंतु जोवर आणीबाणीची वेळ आहे, तोवर तरी, आपण मानवतावाद्यांनी, श्रद्धाळू लोकांना थांबवलेच पाहिजे. मंदिरे बंद झालीच पाहिजेत. लोकांकडे विज्ञानाचे शस्त्र घेऊन गेले पाहिजे. जगभरात हे शस्त्र केवळ आणि केवळ बुद्धिप्रामाण्यवादी आणि मानवतावादीच योग्य प्रकारे वापरू शकतात.

म्हणूनच आम्ही तुम्हां सर्वांसोबत संयुक्तपणे काम करू इच्छितो. विशेषत: जगातील सर्व वैज्ञानिक समुदाय, पत्रकार, वकील आणि आमचे मित्रगण, आमच्या नेटवर्कचे सदस्य या सगळ्यांसोबत काम करायला आम्हीं उत्सुक आहोत.

मला वेळ दिल्याबद्दल मन:पूर्वक आभार आणि लवकरच, पुढच्या वर्षात, आपण परत भेटूया.

धन्यवाद.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.