नरेन्द्र नायक ह्यांचे भाषण

नमस्कार मित्रांनो. आज या नास्तिक परिषदेसाठी तुम्ही मला आमंत्रण दिले, याबद्दल धन्यवाद. हा माझा व्यक्तिगत सन्मान नाही, तर हा मला आमच्या चळवळीचा सन्मान वाटतो. गेली अनेक वर्षे जवळजवळ ८० संस्थांचे मिळून FIRA हे संघटन आम्ही चालवतो आहोत. या माध्यमातून आम्ही खूप लोकांपर्यंत पोहोचतो. त्या कामाचाच हा सन्मान आहे असे मी समजतो.

मी गेले ६० वर्षांपासून नास्तिक आहे. मी नास्तिक म्हणून दोनदा जन्माला आलो. जन्माला येणारं प्रत्येक मूल नास्तिक म्हणून जन्माला येतं. वाढत्या वयात देव, धर्म या निरर्थक गोष्टी त्याच्या मेंदूत कोंबल्या जातात. कुटुंब, समाज, समूह सगळे मिळून या कल्पना त्याच्या डोक्यात भरत असतात. पुढे जाऊन या कल्पनांना विचारपूर्वक तिलांजली देणं सगळ्यांना जमत नाही. पण आपल्यासारख्या काहीजणांना ते जमतं. हे करू शकणारे आपण एकटे नाही, अल्पसंख्यही नाही. जगभरात नास्तिकांची संख्या एकूण लोकसंख्येच्या १८% एवढी आहे. लक्षात घ्या, १८ टक्के! याचा अर्थ जगातील सर्वांत मोठ्या समूहांच्या यादीत निरीश्वरवादी तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

पहिला समूह आहे ख्रिश्चनिटी मानणाऱ्यांचा-अर्थात जीझस क्राइस्टने जे, जसे सांगितले त्याचे तसे अनुसरण करणाऱ्यांचा. दुसऱ्या क्रमांकावर मुस्लिम-अर्थात मोहम्मदने जे जे, जसे सांगितले त्याचे तसेच्या तसे पालन करणारे. तिसऱ्या क्रमांकावर आपण आहोत, कुठलीही श्रद्धा न बाळगणारे. आपण देवा-धर्माचे कुठलेही ओझे बाळगत नाही. आपल्या डोक्यात भरले गेलेले हे ओझे झुगारूनच आपण जगतो आहोत.

मी नास्तिक्याशी माझ्या वाढत्या वयातच कधीतरी भिडलो. तोपर्यंत मी कुणा निरीश्वरवाद्याला भेटलो नव्हतो. हे मी मुद्दाम सांगतो आहे कारण निरीश्वरवादी होण्यासाठी कुणा निरीश्वरवाद्याला भेटण्याची गरज नसते. पारलौकिक शक्ती अस्तित्वात नाहीत याचे भान मला वयाच्या साधारण दहाव्या-अकराव्या वर्षी आले. मी माझ्या डोक्यातले देव-धर्माचे भूत तेव्हाच काढून फेकले. माझी शाळा, हा समाज, माझे पालक या सगळ्यांनी माझ्या मनात ठासून भरलेल्या पारलौकिकाच्या कल्पनांना मी अक्षरश: बाहेर फेकले. लहान वयात ‘देव’ या कल्पनेवर माझी श्रद्धा होती. मी पूजा करायचो. आमच्या घरात देवाचे फोटो होते. ते नेमके कोणच्या देवाचे हे तेव्हाही मला ठाऊक नव्हते. पुढे कधीतरी कळाले की ते शिर्डीच्या साईबाबांचे फोटो होते. मला वाटायचे कुणीतरी प्रत्यक्ष स्वर्गात जाऊन देवाचा हा फोटो काढून आणला आहे. त्या फोटोसमोर मी हात जोडायचो. प्रार्थना करायचो. आई सांगायची, “परीक्षेला जाताना देवाला नमस्कार करून जा.” आणि मी तसे करायचो. मला वाटायचे, देवाला नमस्कार केला की परीक्षेत चांगले गुण मिळतील. 

एकदा मनात विचार आला की नमस्कार न करताच जावे. तर मी त्या फोटोपुढे नुसता उभा राहिलो. हात जोडले नाहीत की प्रार्थना केली नाही. तरी परीक्षेत चांगले गुण मिळाले. मग मी आणखी एक प्रयोग केला. पुढच्या परीक्षेच्या वेळी फोटोसमोर उभा झालो आणि म्हटले, “देवा, मला या परीक्षेत चांगले गुण नको देऊस.” त्या परीक्षेतही मला चांगले गुण मिळाले. एवढेच नाही, तर मी पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालो. तेव्हा मला कळाले की देव मुळी अस्तित्वात नाहीच. या वास्तवाचे भान मला असे आले. त्यानंतर परीक्षेला जाताना जेव्हा जेव्हा आईने देवाला नमस्कार करून जायला सांगितले, मी नाकारले. देव अस्तित्वात नाही या निष्कर्षाप्रत येण्यासाठी हा प्रयोग काही फारसा योग्य नाही याची मला कल्पना आहे. 

मी पूर्वी देवाची प्रार्थना करायचो, त्यामागे आणखी एक कारण होतं. माझ्या वडिलांचे गडबडलेले आर्थिक आणि इतर व्यवहार! मी रोज झोपायच्या आधी देवाला विनवायचो की दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे काही आलबेल कर. माझा भाऊ तेव्हा आणखी लहान होता. त्याला यातले काहीही कळत नसल्याने तो प्रार्थना करत नसे. मला थोडेबहुत कळत होते. म्हणून मी विनवायचो की देवा, जे काही विस्कळीत झाले आहे, ते सारे सावरून घे. मला विश्वास होता की देव आपलं भलं करेल. पण सकाळी बघावं तर ‘जैसे थे’. मी पुन्हा ‘देव अस्तित्वात नाही’ ह्या निष्कर्षाप्रत पोहोचलो. यावेळी माझ्या पालकांनीदेखील बळजबरी केली नाही. माझी आई मुळात निरीश्वरवादी होती. पण ती तसं उघडपणे बोलत नव्हती. एक तर ब्राह्मण कुटुंब, पदरी चार-चार मुलं, भोवतालचा समाज सनातनी विचारांचा. तिला भीती वाटायची की देवाचं अस्तित्व न मानल्यामुळे याला काही वाईट परिणाम तर भोगावे लागणार नाहीत ना? पुढे आम्ही मोठे झाल्यावर नास्तिक असल्याचा उच्चार करण्याचं बळ तिच्यात आलं. ती आता पूजा-अर्चना करीत नाही. आम्हीदेखील या प्रसंगांनंतर कधी ते केलं नाही.

आज मी बायोकेमिस्ट आहे. माझी अनेक संशोधनपत्रे प्रकाशित झाली आहेत. मला संशोधनाची प्रक्रिया कळते आणि निष्कर्ष कसे काढायचे तेही कळतं. तेव्हा मी खात्रीने सांगतो की निरीश्वरवाद हा निष्कर्ष आहे, प्रक्रिया नव्हे. ती जीवनशैली असू शकते. बुद्धिप्रामाण्यवाद ही त्यापुढची पायरी आहे. विवेकवाद! यात आपण प्रत्येक गोष्ट तर्काच्या कसोटीवर जोखतो आणि यातून जे प्रमाणित होतं, सिद्ध होतं, त्याचा सत्य म्हणून स्वीकार करतो. विवेकवादाचा माझा प्रवास वयाच्या सतरा-अठराव्या वर्षांपासून सुरू झाला. प्रत्येक गोष्ट तर्काच्या कसोटीवर पारखायची सुरुवात झाली. आणि हा प्रवास दर दिवशी समृद्ध होत गेला. पंचविसाव्या वर्षी मी माझे औपचारिक शिक्षण (मेडिकल बायोकेमिस्ट्रीत) पूर्ण केले. कस्तुरबा मेडिकल कॉलेज, मणिपाल येथून स्नातक आणि स्नानकोत्तर पदवी घेतली. त्याच सुमारास मी चळवळीत पडलो. हे आंदोलन अब्राहम कोवूर यांनी सुरू केले होते. याला आम्ही म्हणतो ‘डिव्हाईन मिरॅकल एक्स्पोजर कॅम्पेन’-दैवी चमत्कारांमागील सत्य उघड करणारी मोहीम. अशा आंदोलनांची समाजात गरज का पडते? कारण आपली सर्वसामान्य जनता. या लोकांची खात्री पटवून द्यावी लागते. केवळ नास्तिकांच्या सभेत किंवा परिषदेत आक्रमक चर्चा करून काहीही फायदा नसतो. या अश्या सभांमध्ये समविचारी लोकांच्या टाळ्या तर मिळणारंच. पण सर्वसामान्यांपर्यंत आपले विचार पोहोचवणं अधिक महत्त्वाचं आहे. जास्तीत जास्त लोकांना विवेकवादी विचारांपर्यंत घेऊन जायचं, त्यांना तर्कशुद्ध विचार करायला लावायचे, तर लोक आपल्यापर्यंत येतील हा विचार सोडून देऊन आपल्याला लोकांपर्यंत पोहोचायला हवं. असं केलं तरच आपली संख्या वाढेल. 

आम्ही जेव्हा लोकांपर्यंत जायचो, तेव्हा लोक विचारायचे, “हे विश्व कशापासून बनले आहे?” आम्ही सांगत असू, “बिग बॅंग थिओरी”. मग ते विचारायचे, “जीवन कुठून आले?” आम्ही सांगायचो, “उत्क्रांतीतून… जीवाणुंच्या उत्क्रांतीतून, पेशींच्या उत्क्रांतीतून..” मग ते विचारायचे, “हे सगळं ठीक आहे. पण आमच्या गल्लीत एक चमत्कारी बाबा आहेत. ते हवेत हात फिरवून कुठलीही वस्तू काढून दाखवतात. हे ते कंस करत असतील?” आम्ही त्यांना सांगायचो की तो असं असं करतो… ही सगळी हातचलाखी आहे. ते पुन्हा विचारायचे, “हे जर इतकं सोपं आहे तर तुम्ही करून दाखवा.” हे सगळं इतक्या विस्तारानं सांगायचं कारण की लोकांपर्यंत जायचं तर या सगळ्या पायऱ्या ओलांडाव्या लागतात. आम्ही ते करतो. हवेत हात फिरवून चेन काढून दाखवतो. मी मागे NDTV वरील एका कार्यक्रमात होतो. बरखा दत्तने वारंवार मला तसं करायला लावलं. माझ्या हातात काही नाही याची वारंवार ती खात्री करून घेत होती. आणि शेवटी तिलादेखील ती हातचलाखी असल्याचं पटलं.

हे आम्ही कसं करतो? सुरुवातीला आम्ही एक चमत्कार म्हणूनच हे लोकांसमोर प्रस्तुत करतो. पुढे हा चमत्कार कसा घडवता येतो ते उघड करतो. वेगवेगळ्या तऱ्हेने लोकांचं प्रबोधन करतो. त्यांना सांगतो की आज तुम्ही अंधश्रद्धेच्या पिरॅमिडच्या अगदी तळाशी आहात. यात चमत्कारांवर विश्वास बसणं, ज्योतिष मानणं, भूत-प्रेतांच्या अस्तित्वाला मानणं हे सगळं येतं. जसजसे तुम्ही या पिरॅमिडच्या वरच्या पायऱ्यांवर पोहोचता, तसतसे तुमचे प्रत्यक्ष अनुभव आणि तुमची श्रद्धा यांमधली तफावत वाढत जाते. तुम्हाला कळत जाते की हे चमत्कार नसून निव्वळ हातचलाखी किंवा नजरेचे भ्रम आहेत. तुम्हाला ज्योतिषामागच्या थोतांडाचा अनुभव येतो. भूत-प्रेतांवरील तुमचा विश्वास उडत जातो. 

ह्या लोकांना आम्ही सांगतो की ‘देव नाही’ असे मानणारे आम्ही, तुमच्याहून खूप काही वेगळे नाही. एक लक्षात घ्या, सगळे धर्म सांगतात की आपला धर्म सोडून इतर धर्मांचे देव अस्तित्वात नाहीत. कोणत्याच धर्मातील लोकांचा इतर धर्मातील देवांवर विश्वास नसतो. आम्ही आमच्या धर्मातील देवालाही मानत नाही. याचा अर्थ आम्ही तुमच्यापेक्षा फक्त एकच देव कमी मानतो. तर मी म्हणतो की आपण सगळेच नास्तिक आहोत. तुम्ही इतर धर्मातील देव मानत नाही. तुम्ही हिंदू असाल, तर ख्रिश्चन आणि मुस्लिमांच्या देवाला तुम्ही नाकारता. हीच भूमिका मुस्लिमांची हिंदू व ख्रिश्चनांच्या देवा-धर्माबाबत असते, तर ख्रिश्चनांची हिंदू व मुस्लिमांच्या देवा-धर्माबाबत असते. नास्तिकांच्या विरोधात मात्र हे सगळे एकत्रित होतात. हा विरोधाभास आहे. माझा एक मित्र-हा नास्तिकांचा स्वामी आहे-दहा वर्षांपूर्वी त्यानं वृंदावन येथे नास्तिक सम्मेलन भरवलं. तिथले पंडित आणि मौलवींनी एकत्र येऊन आपला विरोध प्रदर्शित केला. हे भन्नाटच झालं. त्या मित्रानं या दोन धर्मियांना असं एकत्र आणलं. तिथे ख्रिश्चनांचं फारसं प्रस्थ नसल्याने पाद्री नव्हते एवढेच.

२००१ मध्ये संदेश ॲकेडेमी नावाच्या एका कॅथोलिक संस्थेनं मला सामाजिक कार्यासाठी एक पुरस्कार देऊ केला. मला आश्चर्य वाटलं. सामाजिक कार्यासाठी पुरस्कार? तोदेखील मला? मी हा प्रश्न त्यांच्यापुढेही उपस्थित केला. परंतु तो पुरस्कार मलाच द्यावा असं त्यांनी पक्कं केलं होतं. मी तिथे गेलो तेव्हा पाच-सहा लोक त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. माझी मतं सर्वांना ठाऊक आहेत का? तसेच हा पुरस्कार मला का देता आहात? अशी मी तिथेही विचारणा केली. तर त्यांनी दिलेलं उत्तर मार्मिक होतं. ते म्हणाले, “तुमचे विचार आम्हाला पटणारे नाहीत. पण तुम्ही समाजातील सर्वसाधारण लोकांच्या विचारपद्धतीत बदल घडवून आणता आहात हे आम्हाला स्पष्ट दिसते आहे. तेव्हा तुमच्या टीकेचा स्वीकार करण्याचे आमचे प्रयत्न असतील.”

अंधश्रद्धेविरोधातील माझी पहिली सार्वजनिक मोहीम मी १९७४ मध्ये राबवली होती. त्यावेळी, कुणी एक बाबा, “बहिरा ऐकू शकेल, आंधळा बघू शकेल” असे दावे करत होता. आम्ही त्याच्याविरोधात खूप मोठी मोहीम चालवली. त्यावेळी आरएसएसने याचा फायदा उचलला. आम्ही नास्तिक समविचारी अगदी अल्पसंख्य होतो. असो. आरएसएसचा भरपूर प्रचार आणि प्रसार झाला. आज आपण सगळे जाणतो हे किती धोकादायक ठरलं आहे. 

आणखी एक रोचक माहिती तुम्हाला सांगतो. मी उत्तराखंडात एक कार्यक्रम घेतला. तो एबीव्हीपीचा राज्यस्तरीय कार्यक्रम होता. चमत्कारांमागचं वैज्ञानिक स्पष्टीकरण द्यावं यासाठी त्यांनी मला बोलावलं होतं. मी त्यावेळी तिथे ‘नास्तिक’ या नात्यानं गेलो नव्हतो. पण मला वाटतं, विज्ञानाच्या मार्गाने केलेली आस्तिक्यावरील सौम्य टीकादेखील लोकांना अखेरीस नास्तिक्याकडे घेऊन जाऊ शकते. हा कार्यक्रम भारतसरकारने आयोजित केला होता. देशभरात अशा शंभरहून अधिक कार्यशाळा भारतसरकारने त्यासुमारास आयोजित केल्या होत्या. २०१४ नंतरच्या सरकारला मात्र सत्य काय ते वैज्ञानिक पद्धतीने समजणं मान्य नसावं. कारण त्यानंतर असा एकही कार्यक्रम घेतला गेला नाही. असो. ‘नॅशनल सेन्टर फॉर सायन्स ॲण्ड सिव्हिक एन्गेजमेन्ट’ ही संस्था आजही असे कार्यक्रम घेते आणि त्यांच्या कार्यक्रमांचं मला आमंत्रण असतं. “तुम्हाला नेमकं काय म्हणायचं असतं ते आम्हाला ठाऊक आहे. पण आम्ही तुम्हाला हे व्यासपीठ दिलं आहे. येथून तुम्ही जे बोलाल ती आमची जबाबदारी नाही.” इतक्या स्पष्ट शब्दात ते त्यांची भूमिका माझ्यापुढे मांडतात. अशा अनेक सौम्य पण चिकाटीने आणि सातत्याने कराव्या लागणाऱ्या प्रयत्नांतून नास्तिक्याविषयीची चळवळ आम्ही पुढे नेतो आहे.

सुरुवातीच्या दिवसात अशा कार्यक्रमांना प्रेमानंदांना बोलावत असत. त्यांना भाषेची थोडी अडचण होती. ते फक्त इंग्रजी वा मल्याळम् भाषा बोलत. मग त्यांनी माझं नाव सुचवलं. मला नऊ भाषा बोलता येतात. त्यामुळे मला त्या व्यासपीठावर संधी मिळाली. आता मला सगळीकडे आमंत्रण असतं आणि मीही जिथे जिथे जातो तिथली स्थानिक भाषा बोलण्याचा प्रयत्न करतो. लोकांना विचार करायला फक्त प्रवृत्त करण्याचंच तर हे काम आहे. कुठल्याही संकल्पनेवर विश्वास वा अविश्वास दाखवायचा तर ती तर्काच्या तराजूवर तोलायलाच हवी. सुरुवातीला एखादी गोष्ट चमत्कार वाटू शकते. जसे साईबाबा विभूती देत असत, कुणी हवेत हात फिरवून चेन काढून दाखवत असत. पण हे सारं आता जुनं झालं आहे. आजचे चमत्कार काय आहेत? आज कुणी आयआयटी कानपूरला जातं, कुणाचा हात पकडून म्हणतं, “या हातात शक्ती आहे. हा हात मी पकडून ठेवल्यानं प्रदूषण संपेल.” दुसरा एक जग्गी, स्वत:ला सद्गुरु म्हणवतो, तो रुद्राक्षमाळा हलवत म्हणतो, “मी सात्विक गोष्टीला तामसी आणि तामसी गोष्टीला सात्विक बनवू शकतो.” एक नित्यानंद, जो आता देश सोडून पलायन करता झाला आहे, तो डोळ्यांवर पट्टी बांधून सांगतो, “मुलांच्या रेटिनावर प्रकाश पडला नाही तरी त्यांना दिसू शकतं.” आणि लोक यावर विश्वास ठेवतात. या महाभागांना समाजात सन्मान मिळतो. मला हे मान्यच होत नाही. अमिताभ बच्चन यांचा सोनी टीव्हीवर एक कार्यक्रम चालतो, ‘कौन बनेगा इडियट’. यात एक दहा वर्षांची मुलगी येते आणि डोळ्यांवर पट्टी बांधून वाचन करते. हा भाग काढून टाकावा असे आम्ही प्रयत्न केले. सोनी टीव्हीने त्यांच्या व्हिडीओमधील हा भाग काढून टाकला. हे असं प्रथमच झालं असावं.

या प्रवासाची सुरुवात नास्तिकतेपासून होणार. अतिशय धैर्याने आणि खंबीरपणे आपण ही सुरुवात केली पाहिजे. पुढे हळूहळू आपण तर्कनिष्ठतेकडे जातो. मी जेव्हा मानवतावाद समजून घेतला तेव्हा मला जाणवलं की आपण सारेच मानवतावादी आहोत. आपण सगळ्यांना समान मानतो. कोण कोणती भाषा बोलतं, कोणाचं कूळ कोणतं, कोण कोणत्या राष्ट्राचे, कोणाचं लिंग काय, कोणाचे लैंगिक ओरिएन्टेशन काय, कशानेच फरक पडत नाही. सगळे समान आहेत. कुणी श्रेष्ठ, कुणी कनिष्ठ असं आपण समजत नाही. विशेषत: देवाची आज्ञा, देवाचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कुणाचा अवतार वगैर झाला आहे असं आपण मुळीच मानत नाही. देव जर निर्मिक असेल तर तो आपल्या निर्मितीकडे उच्च-नीच भावनेने कसा बघेल? अमका कुणी श्रेष्ठ आहे, तोच माझा संदेश सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकतो, लोकांच्या प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचवू शकतो असं तो कुणाला का म्हणेल? त्यामुळे मग पंडित, पाद्री, मौलवी हे लोक रद्द होतील. अस्तित्वात नसलेल्या कल्पिताशी त्यांचे थेट संबंध आहे असे म्हणणारे सगळे बाबा, बुवा रद्द होतील. खरंतर असे कुणी नाहीतच. तरीदेखील तुमचा मेसेज मी ‘त्या’च्यापर्यंत पोहोचवतो असा दावा ते करतात. ‘त्या’च्यापर्यंत, म्हणजे कोणापर्यंत? आणि कुठे पोहोचवणार संदेश? तिथे तर नाहीच कुणी. ‘सर्वशक्तिमान’, ‘सर्वज्ञानी’ मुळात कुणी नाहीच. 

तर्कशुद्ध विचार करायला गेलो तर हे वास्तव समजुतीत उतरत जातं. कुणी म्हणतं, “देवावर, धर्मावर श्रद्धा नसेल तर नैतिकतेचा ऱ्हास होईल, अपराध वाढतील.” एक लक्षात घ्या, आज ज्या ज्या देशात सर्वांत अधिक आणि सर्वांत हिंसक अपराध होत आहेत, तिथे आस्तिकांची, धर्माचे अनुसरण करणाऱ्यांची, श्रद्धाळूंची संख्या जास्त आहे आणि जिथे निधर्मी, निरीश्वरवादी, विज्ञाननिष्ठ, तर्कशुद्ध लोक आहेत, तेथे अपराधांची संख्या कमी आहे. नास्तिकांची संख्या जास्त असणाऱ्या देशांचा डेटा बघा आणि तुम्हाला आढळेल की तिथे अपराधांची संख्या कमी आहे. याउलट कट्टर धार्मिक असणारे अफगाणिस्तानसारखे देश बघा, इस्लामला मानणारे देश बघा, एवढंच कशाला नेपाळ, भारत येथेही बघा. अपराध, शोषण यांची टक्केवारी बघा. अमेरिकेतील डेटा बघा. आणि मग तुमच्या लक्षात येईल की देव अस्तित्वात नाही. देव, धर्म तुम्हाला कुठलाही आधार देत नाही. पारलौकिक शक्ती हा फक्त कल्पनेचा खेळ आहे. त्यामुळे ती तुमचं संरक्षण करू शकत नाही. नैतिकता आणि तर्कनिष्ठता यावर भरपूर काम झाले पाहिजे. 

पण लोकांना तिथवर कसं पोहोचवणार? तर यासाठी आपल्याला लोकांपर्यंत पोहोचावे लागेल. आता हे साधायचं कसं? आपल्याला लोकांचं लक्ष आपल्याकडे आकर्षित करायचं आहे. अगदी तसंच, जसं देवाचे दूत, चमत्कारी बाबा, पारलौकिक शक्ती लोकांना त्यांच्या जाळ्यात ओढतात. आम्ही आमच्या संघटनेअंतर्गत हेच केलं आणि आमचे कार्यक्रम यशस्वीही झाले. ह्या यशस्वीतेसाठी रोजच्या जगण्यात अनुसरता येतील असे कृतिकार्यक्रम आखायला हवे. आपले विचार वैज्ञानिक आणि तार्किक युक्तिवादाने लोकांपर्यंत पोहोचायला हवे. मी आज बहात्तराव्या वर्षी इथे, तुमच्यासमोर उभा आहे आणि खात्रीने सांगतो की आजपर्यंत माझ्यासाठी कुठल्याही प्रकारची कर्मकांडे झालेली नाहीत. मी कुठलेही धार्मिक विधी केले नाहीत. माझ्या आईचा किंवा वडिलांचा आत्मा मी स्वर्गाकडे धाडला नाही. मृत्युनंतर काय? ही भीती अनेकांच्या मनात असते. मृत्युशय्येवर असणाऱ्या एका रूग्णाने डॉक्टरला विचारले, “मृत्युनंतर काय ते कुणालाच ठाऊक नसते, नाही का?” तर डॉक्टर उत्तरला, “आम्हाला ठाऊक असते. तुमच्या मृत्युनंतर याच बेडवर आम्ही पुढचा पेशंट घेऊ.” मला माझ्या शरीराबद्दलचे वास्तव शंभर टक्के माहीत आहे. मी माझे शरीर कस्तुरबा मेडिकल कॉलेज, मणिपाल यांच्या शरीरशास्त्रविभागाला दान केले आहे. मी शिकत असताना कुणाच्यातरी शरीरावर प्रयोग केले होते. त्यातून महत्त्वाचे असे कितीतरी शिकलो. माझ्या शरीरावर प्रयोग करून नवे कुणी विद्यार्थी शिकतील. तर फलित हे आहे की जोवर आयुष्य आहे, मी चालत राहीन, बोलत राहीन. मला ठाऊक नाही, पण बऱ्याच लोकांना मी शेषांहून वेगळा, विशेष वाटतो. मग हे शरीररक्षक सतत जवळ बाळगावे लागतात. त्यामुळे बरेचदा मी सामान्यांहून वेगळा पडतो. एक सांगतो, लक्ष देऊन ऐका-पीटर प्रश्न विचारतो तेव्हा ते म्हणतात, “जीझसला विचारा.”, मोहम्मद प्रश्न करतो तेव्हा ते म्हणतात, “प्रॉफेटला विचारा.” पण जेव्हा नरेन्द्र, मग तो दाभोलकर असो, की नायक प्रश्न विचारतो तेव्हा “चार्वाकला विचारा” असे नाही सांगत ते. कारण चार्वाक जीवित नाही. आपण प्रश्न फक्त जीवित मनुष्यालाच विचारू शकतो. यातून आजच्या संवादाचा काय निष्कर्ष काढायचा तो काढा. ते मी तुमच्यावर सोपवतो आणि इथे थांबतो.

आभार.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.