प्रमोद सहस्रबुद्धे ह्यांचे भाषण

माझ्यावर मुख्य दोन जबाबदाऱ्या आहेत. एक म्हणजे आभार मानायचे. पण मी सुरुवातीला आजच्या सत्राबद्दल बोलणार आहे. शिवाय संघटनेला कशाची गरज आहे आणि तुम्ही त्यासाठी काय करू शकता, हेही सांगणार आहे.

तर आजचं सत्र मी खरोखर एन्जॉय केलं. मला वाटलं नव्हतं की या बाजूने एन्जॉय करणं मला कधी जमेल! पण खाली बसून एन्जॉय करण्यासारखंच हे सत्र होतं. प्रत्येक वक्ता खूपच इंटरेस्टिंग बोलला असं मला वाटलं. इथं मुख्यतः, मला फार चांगलं वाटलं की प्रसन्न इथे आलेत आणि त्यांनी एक वेगळी बाजू मांडली. आपल्याकडे कसं असतं, एक कुणी संशयवादी असतो. आपण वेगवेगळे शब्द वापरत असतो, संशयवादी असो मुक्त विचारवादी असो की नास्तिक असो. तर ज्या वेळेला आपण संशयवादी बनतो त्यावेळेला “आपण काही चुकलो का?” “आपली काही चूक होते आहे का?” असे प्रश्न भेडसावतात. जसे दहा वर्षांचे असताना नरेंद्र सर नास्तिक झाले. पण, दहा वर्षांचे असताना आपली तेवढी समज नसते. तर त्यावेळेला ”आपण काही चुकलो का?”, हे जाणून घेण्यासाठी ज्या लोकांना आपण चुकीचे वाटतो त्यांना आपण सतत प्रश्न विचारत राहतो. हे प्रश्न बऱ्याच लोकांना बरेचदा ऑफेन्सिव वाटतात. याचा मला अनुभव आलेला आहे. तरीदेखील आपली काही चूक झाली आहे का? आणि तसे असल्यास त्यावर काही उत्तरे मिळतात का? हे तपासण्याची एक उत्सुकता मला होती. आजची तरुण पिढी तलवार घेऊन बाहेर पडलेली आहे असं साधारणपणे वाटतं. माझ्या मते, ती तलवार घेऊन निघालेली नसून आपण कुठे कुठे चुकतो आहोत याच्या शोधात बाहेर पडली आहे. 

आपले ब्राइट्सचे सगळे जे व्हाट्सॲप ग्रुप्स आहेत त्यात कोणीही आस्तिक नाही आणि जवळपास हजार बाराशे माणसं आहेत. त्यांच्यातही अशीच तलवारबाजी चालू असलेली मी बघतो. मी केलेलं बरोबर की तू केलेलं बरोबर? या माणसाला आस्तिक म्हणायचं की त्या माणसाला? याला नास्तिक म्हणायचं का? त्याचे पुरावे आहेत की नाहीत? अशी सगळी तलवारबाजी चालू असते. आणि ही सगळी तलवारबाजी माझ्या दृष्टीने आपल्याला स्वतःला तपासण्यासाठी फार महत्त्वाची ठरते.

लोकांना असं वाटतं की वादातून काहीच मिळत नाही. पण, मी ह्या मताचा नाही. माझ्या मते, वादातून तत्काळ काही मिळत नाही. पण समजा एखाद्या माणसाने छोटासा प्रश्न विचारला आणि आपल्याकडे त्यावर उत्तर नसलं तर बरेचदा आपण त्याला त्यावेळी काहीतरी थातूरमातूर उत्तर देतो. पण तो प्रश्न आपल्याला सतावत राहतो. आपण त्याचे उत्तर शोधत राहतो. उत्तर शोधण्याच्या या प्रक्रियेला आपण तलवारबाजी समजू नये. लहान मुलं नाही का मोठ्या माणसांचे खेळ करतात? तरुण मुलं साहसी असतात. माझे केस आता पांढरे झाले. मी तरुण असताना जेवढे वाद करायचो तेवढे आता करत नाही. कारण, कितीतरी प्रश्नांवर विचार करून मी आपल्यापुरते काही निष्कर्ष काढलेले आहेत. तरीही ग्रुप्सवर चालत असलेल्या वादांतून काही निष्पन्न होतंय का, याकडे मात्र माझं लक्ष असतं.

तर हा एक भाग झाला. 

दुसरं, उत्तम निरौला यांच्याशी जे बोलणं झालं, त्याबद्दल मला सांगायचं आहे. यापूर्वी बाबू गोगिनानि आमच्या दुसऱ्या नास्तिक परिषदेला मुंबईला आले होते. मला त्यांचं आणि ह्युमनिस्ट ऑर्गनायझेशनचं खूप कौतुक वाटतं. हे सर्वजण आपले विचार अतिशय शांतपणे मांडत असतात. त्यात कुठेही आक्रमकता नसते. आपण पॉझिटिव्हली काय करू शकू, यावरच त्यांचा जास्त भर असतो. 

माझी पिढी, त्याआधीची पिढी यांचा एक खूप मोठा प्रॉब्लेम होता, तो आता जवळपास बंद झाला आहे. म्हणजे, कोणीतरी चमत्कार दाखवायचे आणि इतर त्यावर विश्वास ठेवायचे. कोणीतरी जाहीरपणे म्हणायचे की मी चमत्कार करतो आणि त्याचा एक चॅलेंज घेतो. आज अशी माणसं शिल्लक नाहीयेत ही माझ्यामते खूप मोठी प्रगती आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं २१ लाखांचं बक्षीस लोकांना माहीत आहे पण जगभरात रँडीचं जे बक्षीस आहे, याच गोष्टीसाठी, ते मला वाटतं कित्येक कोटी रुपयांचं आहे. पण त्याचे कोणीही टेकर्स नसतात. माझ्या माहितीप्रमाणे रँडीला जवळपास फेक टेकर्स घ्यावे लागतात. यातून मी आजच्या पिढीकडे बघायला लागलो आहे. त्यात एक तर इंटरनेट रेवोल्युशन आलेलं आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावर ज्ञान/माहिती उपलब्ध आहे. या ज्ञानाची वर्गवारी केली तर त्यात खूप मोठं फसवं ज्ञान आहे. फक्त ज्ञानच कशाला, फेक न्यूज आहेत. सगळीकडेच पसरलेल्या! पण सोबतच कित्येक अशा वेबसाइट्स आहेत जिथे कसदार ज्ञान आहे. जे आपण विश्वकोशात बघतो. कुठलाही विश्वकोश बघितला, म्हणजे मराठी विश्वकोश जरी बघितला तरी त्यात कसदार ज्ञान असतं. तेथेही काहीबाबतीत लोक चॅलेंज करू शकतातच. त्यातून जे उरलेले ज्ञान असतं ते अनचॅलेंज्ड ज्ञान असतं. ते उरलेलं ज्ञान आज उपलब्ध आहे. तरीदेखील फेक न्यूजचा एक खूप मोठा बाजार चालतो. आणि लोकांना ते आवडतं. कारण त्यात मनोरंजकता आहे. मनोरंजक म्हणून मला भुताच्या गोष्टी आवडतात, हॅरी पॉटर आवडतो किंवा अजूनही काय काय खूप आवडतं. मला असं नाही वाटत की त्या हॅरी पॉटरनं अस्तित्वात यावं आणि जादूच्या कांड्या फिरवून कोणालातरी, वॉल्डर मॉन्टला मारून टाकावं. कारण असे चमत्कार करणारे लोक जेव्हा कल्पनाविश्वात जन्माला येतात तेव्हा त्यांना तेवढेच चमत्कार करणारे काल्पनिक दुष्ट लोकही आणावे लागतात, तरच ते मनोरंजन ठरतं. खरं मनोरंजन कुठे आहे? तर ते या दोघांच्या संघर्षात आहे. त्यातला कोणीतरी एक माणूस सुष्ट समजला जातो. त्या माणसाचा विजय बघण्यात खरं मनोरंजन आहे. पण हे सारं प्रत्यक्षात यावं असं मला तरी नाही वाटत. म्हणजे प्रसन्नला वाटत असेल तरी मला नाही वाटत. 

इथे वालावलकर सर आणि जगदीश काबरे हे पूर्वीचे चार्वाक पुरस्कारप्राप्ती उपस्थित आहेत. वालावलकर सरांशी माझा नेटवरच जास्त संबंध आहे. प्रत्यक्षात तसा फारसा नाही. तर त्यांनी त्यांच्या वेगवेगळ्या लेखातून जे विचार मांडले आहेत, ते खूप मोठ्या प्रमाणावर मनोरंजनात्मक आणि प्रश्न उभे करणारे आहेत. माझा साधारणत: असा अनुभव आहे की एखादा माणूस जेव्हा कुठेतरी आपले विचार मांडतो आणि त्याला विरोध होत नाही, म्हणजे फेक न्यूज असावी असा विरोध होत नाही, जर त्या विचाराकडे सरळसरळ दुर्लक्ष करून बाजूला सारलं जातं, तेव्हा समजावं की हा कुठेतरी सॉलिड विचार मांडलेला आहे, अतिशय उत्तम विचार मांडलेला आहे.

माझ्या आठवणीत काबरे यांची ज्योतिषावर अशी पुस्तके आहेत, ज्यावर कोणत्याही ज्योतिष्याने प्रतिक्रिया दिलेली नाही. तर हे जेव्हा घडतं आणि त्यांनी विचारलेले प्रश्न तुम्हाला निरुत्तर करतात, तुम्ही त्यांना भिडत नाही तर, त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करता. हे अगदी स्पष्टपणे कळतं. तरुण पिढी काहीतरी टोकदार घेऊन सतत आपल्याला टोचत राहील आणि माझ्या मते हे टोचणंदेखील गरजेचं आहे. पण त्यांच्या पुढे जे उभे आहेत, तेदेखील असेच टोकदार भाले घेऊन उभे असतात. भांडणांची ही मजा तरुणांमध्ये असली तरी ती त्यांना बळही देते. मला वाटतं की जसे आपण हॅरी पॉटरची लढाई बघतो, तसेच ही लढाईसुद्धा आपण तितक्याच आनंदाने अनुभवावी. त्यासाठी गोळ्या घालणारी माणसं येऊ देऊ नयेत. विचारांची लढाई विचारांनीच करावी. कदाचित लोक एकमेकांना फार वाईटसाईट बोलत असतील. पण ते होऊ द्यावं. तरुणांत, एकमेकांना थोड्याफार शिव्या देणं चालतं. त्यांना यात फारसं वावगं वाटत नाही. 

आता आम्हाला, ब्राइट्स संघटनेला, काय करायचं आहे ते सांगतो. उत्तमने जे सांगितलं त्यातली एक गोष्ट मला फार महत्त्वाची वाटली, ती म्हणजे डॉक्युमेंटेशन! मी पूर्वी नरेंद्र दाभोळकरांनाही म्हणायचो की, आपण डॉक्युमेंटेशन केलं पाहिजे. कुठलंही छोटसं जरी आपण काही केलं तरी त्याविषयी आपण काही लिहिलं पाहिजे. त्यात या दिवशी, अशा ठिकाणी, अमुक वेळी ही गोष्ट घडली. अमक्या तमक्याचा त्यात सहभाग होता. अणि त्याचा प्रत्यक्षात अमका तमका परिणाम घडला. हेच डॉक्युमेंटेशन. जो माणूस लढा देत असतो तो हे करत नाही. आपण पूर्वीच्या काळातले लोकसुद्धा पाहिले आहेत. जो माणूस लढत होता तो डॉक्युमेंटेशन करत नव्हता. त्याचं कारण असं की, त्याला पुढचा लढा दिसत असतो. पूर्वीच्या काळातले, म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळातले इतिहासकार पाहिले तर ते प्रत्यक्ष त्या काळाच्या बऱ्याच नंतरचे होते. औरंगजेबाच्या बाजूचा जो इतिहासकार आहे तोही कित्येक वर्षांनी आलेला आहे. त्यामुळे इतिहासकार आपली नोंदवही घेऊन मागून लिहीत असतात. ही जबाबदारी माझ्यासारख्या लोकांना आवडते. कदाचित आम्हाला लढायला आवडत नाही, पण अशी जबाबदारी पार पाडायला आवडते. तर ही जबाबदारी घेणारे आणि त्या वृत्तीचे लोक आम्हाला हवे आहेत. 

पत्रकार अलकानं सांगितलं की, तथ्य महत्त्वाची आहेत. एखाद्याचा पराजय झाला असेल, तरी तेदेखील वास्तवच आहे. यातूनच हा पराभव का झाला याचं विवेचन करून, ते समजून घेऊन पुढची पिढी त्यातून पुढे कसं जायचं ते ठरवू शकते. त्यामुळे पराभवाचीदेखील बातमी असणं, त्याचंदेखील डॉक्युमेंटेशन असणं महत्त्वाचं आहे. हे करण्यासाठी इंटर्नशिप हवी असेल, मुख्यतः तरुणांना किंवा निवृत्त झालेल्यांना, तर त्यांनी ते इंटर्नशिपच्या माध्यमातून का होईना, पण जरूर करावं. 

माझं अजून एक ध्येय होतं की, आज आपण २६० लोक जमा झालेले आहोत. यूट्युबनुसार तर बाराशे-पंधराशे हा आकडा अगदी कमी समजला जातो. आज यूट्युबवरील व्हिडीओ पाच हजार, दहा हजार, कित्येक लाख या प्रमाणात बघितला जातो आहे आणि पुढे कितीतरी वर्षे तो बघितला जाईल. पुस्तक वाचणाऱ्यांची संख्या हळूहळू कमी होत चालली आहे. जुन्या पिढीने खूप पुस्तकं निर्माण केली, पण ती पुस्तकं नवीन पिढी किती वाचेल हे मला सांगता येणार नाही. तर त्या जुन्या पुस्तकांचे ऑडिओ करणं, वेगवेगळ्या व्यक्तींच्या मुलाखती घेऊन यूट्युब व्हिडीओज् तयार करणं हा उपक्रम आम्ही सुरू केला आहे. आमचे तरुण मित्र चिराग, सुकृत आणि मोठ्या प्रमाणात मयूर यांचेसोबत आम्ही आत्तापर्यंत पाच व्हिडीओज् तयार केले आहेत. तुम्हा सर्वांना विनंती आहे की तुम्ही ते व्हिडीओज् बघून त्याला लाईक करा, फॉरवर्ड करा वगैरे वगैरे. हे केल्यामुळे ह्या कामाला मोठी चालना मिळेल. तसेच ऑडिओ बुक्सनादेखील टेक्निकली सपोर्ट करा. जे कार्यकर्ते इतरत्र कुठे सक्रिय नसतात, त्यांनी निदान हे तरी बघावे. ज्यांना खरोखरीच काही करायचं असेल त्यांनी यात प्रत्यक्ष सहभाग घ्या, नवीन विषय सुचवा. 

साध्या गोष्टी असतात. कधी कधी विषय सुचत नाही. या सगळ्यासाठी कोणीतरी एखादी योजना घेऊन काम करणारा, एकदम जास्त नाही पण छोटं छोटं काम करणारा शोधायला हवा. एक एक पायरी चढावी पण एखादी योजना घेऊन ती तडीस नेली अश्या पद्धतीचं काम करता आलं तर, ते पुढील लोकांसाठी प्रेरणादायी ठरेल. जसं आधीच्या लोकांनी पुस्तकं तयार केलीत, तसं आजच्या पिढीने व्हिडीओज, ऑडिओज् तयार करणं गरजेचं आहे. जेणेकरून आपले विचार खूप जास्त काळपर्यंत आणि खूप जास्त लोकांपर्यंत पोहोचतील. 

आमच्या संघटनेच्या मुख्य उद्दिष्टांबद्दलची एक गमतीदार गोष्ट सांगतो. म्हणजे ते वाक्य वाचून दाखवतो. “मुख्यत्वे सदरची संस्था वैज्ञानिक दृष्टिकोनातून, समाजाचे शैक्षणिक प्रबोधन करण्याच्या दृष्टिकोनातून स्थापन करण्यात आली आहे. तिची इतर उद्दिष्ट्ये नंतर आहेत. पण मुख्य उद्दिष्ट वैज्ञानिक दृष्टिकोनातून समाजाचे प्रबोधन करणे हे आहे.” त्यासाठी आजची इलेक्ट्रॉनिक्स साधने वापरायला हवीत. आजच्या तरुणांना व्हाट्सॲपवर बोलायला खूप आवडतं. आपली तेथे सक्रिय उपस्थिती असायला हवी. 

व्हाट्सॲपला आयुष्य नाहीये असं मला वाटतं. कारण त्यावरील मेसेजेस विसरले जातात. म्हणून मी जास्तीत जास्त लोकांना आवाहन करतो की त्यांनी ब्लॉग लिहावे. चार ओळींचा ब्लॉग लिहा किंवा ब्लॉगवरच एकमेकांशी चर्चा करा. त्याला आपण नंतर पुस्तकाचे स्वरूप देऊ, त्याचा जास्तीत जास्त प्रचार करू. आपण व्हाट्सॲपवर जे वादविवाद करतो ते स्मृतीतून हद्दपार होतात. परत सहा महिन्यांनी तोच वाद परत रंगतो. यामुळे वाद करताना तुम्ही आधीच स्थायी असलेली कोणतीतरी गोष्ट घ्या.

आजच्या या कार्यक्रमाबद्दल कोणालाही प्रतिक्रिया द्यायची असेल, ज्यांना चांगली प्रतिक्रिया द्यायची आहे त्यांचं तर स्वागतच आहे. कुणाला वाईट प्रतिक्रिया द्यायची असेल तर त्यांनीही ती अवश्य द्यावी. आपले नाव अज्ञात ठेवायचे असेल, तर तसेही करावे. पण प्रतिक्रिया द्यावी. कारण वाईट प्रतिक्रियांमधूनसुद्धा आम्ही काहीतरी शिकू आणि हे शिकणं आमच्यासाठी गरजेचं आहे. 

आता शेवटचं म्हणजे आभार प्रदर्शन! तुम्ही सर्व आलात, एवढ्या मोठ्या संख्येने आलात, आमच्या सर्व कार्यक्रमांना जवळपास अशी संख्या असते. आजपर्यंत पाच ते सहा कार्यक्रम झाले. प्रत्येकवेळी आम्ही साधारण अशीच संख्या बघतो आहोत. आमचे बरेचसे कार्यक्रम मुंबईत झाले आणि आम्ही हेही पाहिलं की लोकांना जुने कार्यक्रम आठवत असतात. आज बरेच नवीन चेहरेदेखील आहेत. अशा कार्यक्रमांमध्ये तरुण मंडळी साधारणतया दिसत नाहीत किंवा येत नाहीत. याचं कारण असं की, आयुष्याचा संघर्ष खूप कठीण असतो. त्यामुळे कदाचित त्यांना अशा ठिकाणी येणं शक्य होत नाही. इथे येण्यासाठी पैसा लागतो, आल्यावर वेळ द्यावा लागतो. तरी आम्ही या सर्व कार्यक्रमाचे चित्रीकरण सर्वांसाठी उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सातत्याने करत राहू. तुम्ही आलात त्यासाठी मनापासून धन्यवाद. आजचे सर्व वक्ते आणि सहकारी यांचेदेखील मी आभार मानतो.

अभिप्राय 1

  • प्रमोद सहस्त्रबुद्धे बोलतात तेव्हा मला नेहमीच मन लावून ऐकावसं वाटतं. समोरचा माणूस बोलतो तेव्हा ते योग्य आहे की नाही हे मी नेहमी तपासत असतो. प्रमोद सहस्त्रबुद्धे हे असे एकमेव व्यक्तिमत्व आहेत की त्यांनी एखादा मुद्दा मांडल्यावर माझ्या मनात हा मुद्दा स्वीकारारह आहे की नाही याचे विचार फार येत नाहीत.
    जीवनातला संघर्ष कठीण असतो म्हणून लोकांना अनेकदा कार्यक्रमांना उपस्थित राहता येत नाही हे सत्य आहे. ते मी अनुभवतोय. नोकरीमुळे अनेकदा कार्यक्रमांना उपस्थित राहण्यावर मर्यादा येतात.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.