प्रसन्न जोशी ह्यांचे भाषण

नास्तिकांच्या परिषदेत सगळ्यांना नमस्कार केला तर चालतो का? बरं मला लँग्वेज ऑफ इंस्ट्र्क्शन काय आहे? नाही, म्हणजे सगळे बहुतांश कोण आहेत? मराठी चालेल ना? Ok. तसेही, महाराष्ट्रामध्ये अखिल भारतीय गोष्टी वस्तुतः पुणे, लोणावळा, ठाणे, कल्याण, डोंबिवली याच लेव्हलला असतात त्यामुळे मराठीच बोलावं लागतं. मी फार वेळ घेत नाही कारण वस्तुतः शेड्यूलनुसार आता लंचटाईम होणं अपेक्षित होतं. त्यामुळे मी जास्तीत जास्त पंधरा मिनिटं घेईन. आणि त्यानंतर आपण परब्रह्माच्या आराधनेसाठी बाहेर जाऊ. तर मी विचारपीठावरील-नास्तिक परिषदेमध्ये व्यासपीठ म्हणायचे नसते, विचारपीठ म्हणायचे असते. विचारपीठावरील सगळे मान्यवर, आणि पुरस्कारार्थी, त्यामध्ये अलकासुद्धा आहे. नायक सर आहेत. असीम सरोदे वगैरे सगळी घरचीच मंडळी आहेत. आणि, समोरसुद्धा बसलेले सगळे मान्यवर.

मी काही मुद्दे घेतलेले आहेत त्यानुसार मी जाईन. मी सुरुवात अशी करेन, एकदा मी दापोलीला होतो आणि मुक्ता दाभोलकरांकडे गेलो होतो. मुक्ताची मुलगी मितवा हिने मला प्रश्न विचारला की मी नास्तिक आहे की आस्तिक आहे? तेव्हा मी म्हणालो की मी नास्तिक नाही. ती म्हणे, “मग तुम्ही आस्तिक आहात का?” हा काँप्लिकेटेड भाग होता. म्हणजे याचं काय उत्तर द्यायचं? आणि तिचं बरोबर आहे. ती तेव्हा लहान असल्यामुळे तिचा प्रश्न मग नास्तिक नाही तर तुम्ही आस्तिक आहात. आणि हा इश्यू नंतर अनेकदा माझ्यापुढे आला, की मी नास्तिक नाही. आता पुढचं काय? तर हे काँप्लिकेटेड आहे. मी एकदा हृषिकेश गुप्ते-फार चांगला लेखक आहे मराठीतला, आणि सगळ्या भयकथा अतिशय उत्तम लिहितो तो, त्यामुळे त्याला मी विचारलं की तू याच्यावरती विश्वास ठेवतो का? भूत, प्रेत, अमुक, तमुक, सगळं पारलौकिक वगैरे. तर त्याचं छान उत्तर होतं की हे नाही हे मला माहिती आहे. पण असतं तर मजा आली असती. जरा असायला पाहिजे होतं. आणि मला असं वाटतं की खरं म्हणजे मीदेखील असंच उत्तर देईन. जेव्हा मला असं विचारलं जातं कधी की तुम्ही नास्तिक नाही तर तुम्ही कोण आहात? तर मी म्हणेन या सगळ्या पारलौकिक गोष्टी असायला हव्या होत्या, त्याच्यामुळे आयुष्य जरा अधिक इंटरेस्टिंग झालं असतं. मला माहिती आहे आजूबाजूची परिस्थिती फार गुंतागुंतीने सोडवावी लागते. त्याच्यासाठी संपूर्ण एक राजकारण असतं, एक अख्खा प्रवाह जातो, पिढ्या जातात, तर यामध्ये जर या गोष्टी असत्या, लव्हक्राफ्टिअन आयुष्य सगळं खरंच असतं तर जरा मजा आली असती. तर मी एक असा भाबडा, लहान माणूस आहे, लहान मुलगा आहे की ज्याला हे हवं आहे, त्या परिकथा हव्या आहेत. Having said that मी त्याच्या डीटेल्समध्ये जात नाही कारण तो काही भाग नाही आहे. पण मी शक्यतांना माझ्या मनाची दारं खुली ठेवलेली आहेत. आणि त्यासाठी अगदी छोटंसं सांगतो, पुन्हा एकदा आस्तिक-नास्तिकचं काही ते करत बसत नाही, पण, तर्क, कार्यकारणभाव, परिणाम, occurences, मग ते किती प्रमाणात आले, ते सगळ्या जगामध्ये सगळ्या ठिकाणी एक आहेत का नॅचरल पद्धतीने, विचार करण्याची एकमेव पद्धतच असू शकते असं नाही. कारण ही मुळात आपण ज्या मितीमध्ये जन्मलेलो आहोत आणि ज्याप्रकारे आपण काम करतो त्याच्याने डेव्हलप झालेली ही मेजरमेंट्स आहेत आणि त्याद्वारे आपण सगळे मापदंड विवेकाने, म्हणजे नॉट विवेक पुन्हा, तर्कनिष्ठतेने आपण बघायचा प्रयत्न करतो. बघण्याची ती एकमेव दृष्टी आहे का याबद्दल मला शंका आहे. मी ती नाकारत नाही. मी मानव विजयसारखा बेडेकरांचा अतिशय उत्तम कॉलमसुद्धा वाचला होता, म्हणजे माझ्यावरती दाभोलकरांनंतर जर कशाचा प्रभाव असेल तर त्या नास्तिक मानव विजयने माझ्यावरती प्रभाव टाकला आहे, माझ्या विचारांना अधिक चांगली दिशा दिली आहे.

दुसरी गोष्ट इकडच्या सगळ्या उपस्थितांचं, ब्राइट्सच्या सगळ्या सदस्यांचं, अंनिसचं तर अर्थातच त्याच्यामध्ये आलं, या सगळ्यांचं मला एका वेगळ्या कारणासाठी अभिनंदन करायचं आहे, की किमान हे हॅंडफुल लोक का होईना, हे स्वतःच्या प्राक्तनाची ओझी स्वतः वाहतात. म्हणजे जर का खरोखरच देव, परमेश्वर वगैरे असेल तर किमान या लोकांबद्दल त्याला चिंता करायची गरज नाही कारण ते स्वतःची ओझी स्वतः वाहतात. किती चांगली गोष्ट आहे ही! माझे वडील वारले पण ते मला असं सांगायचे की, आमच्याकडे तेव्हा गणपती बसायचे, की “बाबा, देवा, आमचं सोड. पण तुझं कसं चालू आहे सगळं?” सो किमान ही माणसं अशी आहेत जी स्वतःची ओझी स्वतः वाहतात. म्हणून ते बाकीचं सगळं सोडून दे, नास्तिक-आस्तिक वाद, पण हे काय कमी आहे का की ही माणसं स्वतःची ओझी त्याच्यावर टाकत नाहीत, तो जो अस्तित्वात असेल किंवा नसेल. किती चांगली गोष्ट आहे ही. त्यामुळे माझ्या मते नास्तिक आणि आस्तिक आज दुर्दैवाने जेव्हा-आता पुन्हा ‘दुर्दैव’ हा शब्द इकडे वापरायचा नसतो नाही का-असा वाद निर्माण केला जातो असं नास्तिक-आस्तिक. मग नास्तिकांची एखादी परिषद उधळण्याचे प्रयत्न होतात, त्यावेळी हा बंध किती चांगला असू शकतो की असे तुमच्या देवावरती स्वतःची ओझी न टाकणारी ही मंडळी आहेत, किती चांगली गोष्ट आहे, किमान संवादाचा एक सेतू तिकडून तयार होऊ शकतो.

या निमित्तानं मला-मी असं नाही म्हणत फार उपदेशाचे डोस वगैरे, पण काही नम्र अपेक्षा आहेत माझ्या. असं अनेकदा होतं की नवनास्तिक्यदीक्षित असा मी शब्द वापरतो-इकडे दीक्षित आहे का by the way?-तर नवनास्तिक्यदीक्षित झाल्यानंतर, चला आपण आपल्या तर्क-विवेकाच्या अशा तलवारी काढायच्या आणि सपासप चालवायला लागायच्या. तर आपण थोडंसं त्याची काळजी घेतली पाहिजे. म्हणजे मी अगदी जाहीरपणेसुद्धा सांगायला हरकत नाही-मी तेव्हा खासगीतसुद्धा म्हणालो होतो-एकदा बातमी आली होती, की अंनिसने काय केलं, चला स्मशानात वाढदिवस साजरा करा. ते कुठलं कुटुंब होतं… ते आपल्या मुलीला घेऊन.. सगळ्या गोतावळ्याला घेऊन स्मशानात गेलं… आणि-ते काय असतील अंनिसचे कार्यकर्ते… असतील की नाही मला माहिती नाही, पण बातमी तेव्हा तशी आली-तर असल्या गोष्टी… मला असं इंप्रेशन आहे, समजा मी नास्तिक असेन, तर माझ्या नास्तिकतेचा प्रीमाईस हा कोणीतरी भोंदूबाबा कसा खोटा आहे, हे सांगण्यापुरता मर्यादित नाही. तो एक फार मोठा इथॉस आहे. तो एक फार मोठ्या विवेकाचा अख्खा विचारव्यूह आहे. मी नास्तिक आहे. का? तर बघा तो कसा भोंदूबाबा आहे, तो कशी धूप आणि कायकाय काढतो, तो कसा खोटा आहे. तो नसता तरी माझा एक विचारव्यूह मोठा आहे. त्यामुळे अल्टिमेटली आपण जर का-म्हणजे तुम्ही लक्षात घ्या तुम्ही ज्या पातळीला आहात, तो विचारव्यूह इतका मोठा, प्रगल्भ, आणि प्रशस्त आहे त्याची दरवेळी तुलना भोंदूबाबा, जोगरे, ते हे कायतरी जादू उदी काढणारे, यांच्याच लेव्हलला करणार असाल तर सगळा डिस्कोर्स त्या लेव्हलला जाईल. नास्तिक्य ही सुरुवात आहे, अल्टिमेटली त्याची पुढची अगदी अल्टिमेट पायरी ही प्रगल्भ राजकारणापर्यंत जाते. आणि त्याच्यापुढे गेल्यानंतर ती सगळ्या प्रस्थापित चौकटींना धक्का देणारी आहे. अशा वेळी या भोंदूबाबा हे-आपल्याला करावं लागणार आहे कारण जगामध्ये आहेत ते, त्यांना त्याच्यापुढे माझं एक उदाहरणपण येणार आहे-पण ते करत असताना नास्तिक-भोंदूबाबा या लेव्हलला ते बायनरी आणू नये. नाहीतर तुम्ही स्वतःला लहान करून घेताय. तुम्ही म्हणजे तुम्ही जर का पहेलवान WWF चे असाल तर तुम्ही कुठल्यातरी छोट्या फडातील कुस्तीपुरतं स्वतःला आणू नका. तो तुमचा एक भाग आहे.

रवि आमले यांच्या कालच एक-आता योगायोग आहे, रवि आमले आहे का?-त्यांनी फ्रंक झापा यांचं एक कोटेशन इकडे टाकलेलं आहे “एक दिवस नास्तिक हा शब्दच अस्तित्वात राहणार नाही, त्याऐवजी ज्यांना नास्तिक म्हणतात त्यांना सामान्य लोक म्हणून ओळखलं जाईल, कुठलीतरी दैवी शक्ती अस्तित्वात आहे असं मानणार्‍यांना विक्षिप्त म्हणून ओळखलं जाईल.” मी जे-नाही, नाही! टाळ्या आत्ता नाही वाजवायच्यात, शिव्या घालायच्यात-तर आता या विधानाचा प्रॉब्लेम कसा आहे, मी जे म्हणतो ना, नवनास्तिक्यदीक्षित, चला तलवारी काढायच्या आणि सपासप वार सुरू करायचे. हे खरं आहे, आतापर्यंतचा इतिहास हा स्वाभाविकपणे श्रद्धावान आस्तिकांचा होता. आणि नंतर एक काळ येईलसुद्धा, पूर्ण विवेकी नास्तिक सगळी मंडळी येतील. म्हणजे, प्रामुख्याने नास्तिक आपण म्हणूया. ते जेव्हा होईल तेव्हा लगेच उरलेले विक्षिप्त आहेत ही जेव्हा भाषा सुरू होते तेव्हा डेंजर आहे. कारण, माझ्या माहितीनुसार, मी अमिताभची ती फिल्म बघितली आहे, ज्याच्यामध्ये तो, शशीकपूर आणि-दीवार फिल्ममधला सीन आहे तो-अमिताभ खाली थांबलेला असतो आणि ते वरती जातात, वगैरे. अमिताभची आई किंवा शशीकपूर अमिताभला विक्षिप्त नाही म्हणत. त्याची श्रद्धा आहे, त्याचा विचार आहे-तो देव मानत नाही, तो तिकडे खाली थांबलेला आहे. ते त्याला विक्षिप्त नाही म्हणत. एकदा हे सुरू झालं आपलं की आम्ही नास्तिक आहोत, उरलेले विक्षिप्त आहेत, तर प्रॉब्लेम आहे. त्यामुळे मला जे उदाहरण सांगायचं होतं तर ते खास करून नास्तिक्य हा नुसता विचारव्यूह नाही तर ते एका पातळीला पॉलिटिक्ससुद्धा आहे, ते पॉलिटिक्स तुम्हाला ज्या भूमीमध्ये करायचं आहे त्या भूमीतील इन्हेरिटेड मर्यादा, त्याच्यामधल्या तुमच्या जागा आणि स्पेसेस आणि गॅप्स लक्षात घेऊन पुढे जायचं असेल आणि त्यावेळी तुमची जर का मांडणीच ही असेल “एकदा आम्हाला नास्तिक होऊ द्या, उरलेले तुम्ही विक्षिप्त” तर प्रॉब्लेम होईल त्यावेळी पुढे. मी अशा विभागणीच्या आणि त्याच्यानंतर एकमेकांना कनिष्ठ ठरवण्याच्या विरोधात आहे. त्यामुळे मगाशी नरेन्द्र नायक म्हणाले की “सगळे इक्वल आहेत” तर तसे ते इक्वल नाही राहणार. म्हणजे झापाजी तुम्ही जे-म्हणजे नायक जे मगाशी म्हणत होते त्यात-तुमचा एकदा तो डॉमिनन्स तयार झाला, की तुम्ही त्या सश्रद्धांना विक्षिप्त म्हणणार आहात. हे खरं आहे, की या श्रद्धावानांकडनं-आत्तापर्यंतचा इतिहास पाहिलात तर-मोठी हत्याकांडंसुद्धा घडली. ते म्हणतात ते अगदी चूक नाही, की श्रद्धावानांच्या देशांमध्ये किती क्राईम्स आहेत वगैरे त्यांनी सांगितले. आता यावेळी स्टालिन आणि माओच्या चीन आणि रशिआबद्दल बोलायचं की नाही मला माहीत नाही. मग स्टॅलिनबद्दल बोललं की तो एक प्रचार, प्रपोगंडा होता, स्टॅलिनने काहीच केलं नव्हतं, असं काही आहे तेही मला माहिती नाही. पण आपण असं नको बायनरीमध्ये जायला.. की पुन्हा समजा ती बायनरी चर्चा होईल, मग बघा, भोंदूबाबा विरूद्ध नास्तिक असं नको करायला. सो हा एक मुद्दा मला मांडायचा होता. त्यामुळे फार मोठी जबाबदारी आपल्यावर आहे. कारण आपण मुळात कमी आहात. हे रोपटं आहे आता आणि ते पुढे जायचं असेल तर आपल्याला काळजी घ्यायची आहे. कारण भूमीसाठीची पोषकद्रव्ये तुम्हाला याच जमिनीतून घ्यायची आहेत. त्यामुळे माझ्या बोलण्यामधला जो लेअर्ड अर्थ आहे तो तुम्ही समजून घ्या. 

नास्तिक आणि “हिंदूंना सुधारूया” हा एक मुद्दा असतो आणि त्याची मांडणी नेहमी अशी केली जाते-दाभोलकरसुद्धा करायचे-“आधी आपलं घर आपण स्वच्छ करूया” अशी साधारणपणे मांडणी करायची. तर, हे जे घर, माझं-माझं सासर सगळं नास्तिकांचंच आहे-माझं लग्न रजिस्टर्ड मॅरेज झालेलं आहे-कोणताही दिवस न बघता. माझे वडील आस्तिक होते पण त्यांनी देहदान केलेलं आहे. आता इथे पुन्हा ‘द ब्यूटिफुल केऑस ऑफ हिंदुइजम’ असं म्हणून बघता येईल. माझे वडील हिंदू, पुन्हा धार्मिक सगळं करणारे. पण देहदान मात्र त्यांनी आवर्जून केलं. आणि ते त्यांच्या पातळीला छोटे छोटे का होईना आयुष्यभर बंड करत आलेले. ज्या विविध कारणांनी असेल तसं. सो “आपलं घर साफ करूया” याच्यामध्ये एक पॉलिटिक्स आहे आणि ते नास्तिकांच्या बाबतीत थोडंसं त्रासदायक ठरतं. कारण की दरवेळी मांडणी केली जाते, हिंदू-हिंदू-प्रामुख्याने हिंदुत्ववाद्यांवर. याच्यात एक अडचण अशी आहे, “आपलं घर साफ करूया” ही जर का मांडणी असेल तर मग तुम्ही हिंदू आहात का? मग तुम्ही हिंदू नास्तिक आहात का? आणि म्हणून तुम्ही म्हणताय का आपलं घर? हा पहिला मुद्दा येतो. त्याच्यात तुम्हाला काहीतरी म्हणावं लागेल. की मी हिंदू आहे, नास्तिक आहे, आणि माझं घर साफ करतो आहे. जी मगाशी ज्याचं नाव घेतलं त्याची ती मांडणी आहे. मग तुम्हाला त्या विचारव्यूहाला उत्तर द्यावं लागेल.

पुढचा भाग असा आहे, की नास्तिक्याचा बेस प्रामुख्याने तर्कवाद आहे ना? त्याच्यामध्ये तर्क आहे, कारणपरंपरा आहे, मग तो सेक्युलर आहे, म्हणजे त्याची विचारसरणी तार्किक आहे, ती कुठल्याही धर्म, जातीच्या परोक्ष (निरपेक्ष) त्याला लागून असणार नाही आहे. म्हणजे समजा मला गणित शिकवायचं आहे, तर गणित-मी पहिलीपासूनचं बीजगणित असेल, अंकगणित असेल-तर आधी आपण या गटाला शिकवूया, नंतर उरलेल्यांना शिकवूया असं होणार नाही. त्याचप्रमाणे, आधी “मी माझं घर साफ करतो” हे म्हणणं थोडं पटण्यासारखं वाटतं पण ते तसं असू शकत नाही. त्याबाबतीत तुम्हाला स्पष्ट भूमिका घेऊन जावं लागेल की कोणी का असेना, आम्हाला त्याची उत्तरं द्यावी लागतील. त्यामुळे, या विचारव्यूहाच्या बाबतीत आपल्याला अधिक स्पष्टता आणावी लागणार आहे. म्हणून म्हणालो की शेवटी हे आता रोपटं आहे-ते वृक्ष व्हायचं असेल तर पोषणमूल्यं याच जमिनीतून आणायची आहेत, ती अंगभूत मर्यादा या राजकारणाची सगळीकडे असणार आहे.

आणि शेवटचा मुद्दा, की नास्तिक्य, विवेकी धारणा आणि राजकारण, या गोष्टी मला इथे जाणीवपूर्वक सांगाव्या लागतील. त्यामुळे मी त्यातल्यात्यात स्वतःला म्हणायचं असेल तर मी विवेकी म्हणेन, तेसुद्धा मी होण्याचा प्रयत्न करतो आहे. माझं असं नाही की मी ‘विवेकी’ आहे. फार मोठा शब्द आहे, ‘नास्तिक्य’ काय, ‘विवेक’ तर आणखी अवघड आणि मोठा शब्द आहे. कारण सश्रद्ध अविवेकी असू शकतो, नास्तिक विवेकी असू शकतो, आणि याचं पूर्ण उलटसुद्धा असू शकतं. त्यामुळे मी विवेकी होण्याचा प्रयत्न करणारा माणूस आहे. तर विवेकाची बेरीज करत गेलं पाहिजे, जे जे जवळ येऊ शकतात त्यांना आपण सोबत घेऊन पुढे गेलं पाहिजे. ती भिंत जर का म्हणजे ब्राइट्स सोसायटीची-तिचा तो प्रकाश सगळीकडे पसरायला हरकत नाही आहे. त्याच्यामध्ये या सीमारेषा बांधून घ्यायला नको, कारण मग ते थोडंसं-मी पक्षाचं नाव नाही घेणार-पण म्हणजे आमचीच विशिष्ट चौकट-मग आम्हाला इतर कोणाशीच संवाद साधायचा नाही, असं व्हायला नको, हा मुद्दा आहे.

एक मुद्दा जो मगाशी मला मांडायचा होता जो मगाशी नायकांनीपण सांगितला. मला आठवतंय म्हणजे याचा संदर्भ असा आत्ताचाच. आत्ता एका पुस्तकाच्या बाबतीत, ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’च्या बाबतीत वाद सुरू आहे. हो हो मी संपवतोय.. you can conclude नाही you must conclude असं तुला म्हणायचं असतं. हे बघ, can असेल ना, तर can चा अर्थ ‘तुम्ही कधीही करू शकता’ असा होतो. मग ‘शकता’ला मी कितीही वेळ घेईन. तर I must conclude. आता १२:५७ झालेत, तिसर्‍या मिनिटाला माझं संपलेलं असेल. तर ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’च्या नंतर आता आणखी एका पुस्तकाचा वाद येतोय की कुणीतरी तथाकथित ख्रिश्चन असलेल्याने लिहिलेलं आणि त्याने इव्होल्युशनरी थिअरीला चॅलेंज केलेलं-त्या पुस्तकाचा पुरस्कार परत घ्यावा असं माजी खासदार प्रदीप रावत यांनी मागणी केली वगैरे. आता त्यावरनंही कदाचित सुरू होईल वाद. त्यावरून मला हे आठवलं की मी एक पोस्ट लिहिली, एकदा मटामध्ये लेख आला होता, दिब्रिटोंचा होता तो-की एका महिलेला संत जाहीर केलं होतं, आणि व्हॅटिकननं कसं काटेकोर शास्त्रोक्त निकष लावून सिद्ध केलं की त्या संत आहेत आणि म्हणून त्यांना संतत्व दिलं आहे. त्यावेळी मी लेख लिहिला होता मटामध्ये की अंनिसने आता पंधरा लाख रुपये व्हॅटिकनलातरी द्यावेत नाहीतर दिब्रिटोंनातरी द्यावेत. लक्षात घ्या, व्हॅटिकन ही राज्यसंस्था आहे, ते सरकार आहे, पोप त्याचा प्रमुख असतो. ती श्रद्धा नाही. तुम्ही प्लीज लक्षात घ्या हं, त्याच्याबद्दल काही फिल्म्सपण मी बघितलेल्या आहेत. त्यांचे तीन मापदंड असतात चमत्कार मानायचे. एक, जो आजार असेल तो जुना असावा. दोन, तो एका झटक्यात पूर्ण व्हावा, आणि तीन तो पूर्ण बरा होऊन नंतर कधीही परत येऊ नये. या तीन कसोट्यांवरती जे टिकतं त्याला ते चमत्कार मानतात. म्हणजे बर्‍यापैकी, त्यांच्या अर्थानं बर्‍यापैकी टेक्निकल आणि शास्त्रोक्त असा निकष आहे. तर व्हॅटिकन शास्त्रोक्त अर्थ काढून म्हणतात की हा चमत्कार आहे. आता जर का अशा निकषावरती एक सरकार मान्य करत असेल तर आपण त्याला पंधरा लाख दिले पाहिजे. पंधरा लाख नाही का होईना पण किमान त्यांना साहित्यसंमेलनात अध्यक्ष घेतो आणि त्यांच्या बाजूने उभे राहतो त्यावेळी आपल्याला आपला हाही विवेक जपला पाहिजे की आपण प्रश्न करणार आहोत का सगळ्यांना? इथे प्रॉब्लेम येतो, आणि मग इथे बाकीच्यांना उलट उत्तर, म्हणजे बोट दाखवायला वेळ मिळतो की यांना तुम्ही प्रश्न का विचारत नाही? मी दोघांनाही प्रश्न विचारले. त्यासाठी दोघांकडनं शिव्याही खाल्लेल्या आहेत. तर, हा विवेक आपण ठेवूया. एक अतिशय चांगलं असं आहे की ही परिषद भरते आहे, त्या निमित्ताने एक नवीन वाट चोखाळली जाते आहे. या असल्या गोष्टी पुण्यातून सुरू होतात, त्यामुळे त्यांना शुभेच्छा, आय ॲम सॉरी, सदिच्छा. कारण शुभेच्छा म्हणायचं नसतं, शुभ-अशुभ वगैरे, त्यामुळे सदिच्छा. त्यामुळे या ब्राइट्सना माझ्या भरपूर सदिच्छा. इकडच्या मान्यवरांनाही माझं अभिवादन, आणि विशेषतः ज्यांना पुरस्कार मिळालेले आहेत त्यांचं पुन्हा एकदा कौतुक आणि अभिनंदन. मला मगाशी नायक सरांना थोडं ऐकता आलं. आणि एक शेवटचं. मी दिलगिरी व्यक्त करून थांबतो. सकाळच्या सत्रामध्ये मी येऊ शकलो नाही. त्याबद्दल आयोजकांची जी गैरसोय झाली असेल त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो. धन्यवाद.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.