विश्वंभर चौधरी ह्यांचे भाषण

मित्र आणि मैत्रिणींनो, सगळ्यात आधी मी माझे मित्र कुमार नागे आणि ब्राइट्सच्या सगळ्या सदस्यांचे आभार मानतो. मी नास्तिक नसूनही त्यांनी मला आमंत्रण दिलं. हा सहिष्णुतेचा भाग आहे आणि ती तुमच्यात आहे त्याबाबत मला आनंद वाटला. आजकाल ‘माझी कोणती ओळख’ हे माझं मलाच कळत नाही. विचारधारांचा इतका गुंता झालेला आहे तरी, मी असं समजतो की मी काही भक्तांपैकी नाही. आणि मी असेही समजतो की त्यातल्यात्यात मला जवळची वैचारिक परंपरा रानडे, गोखले, गांधी, विनोबांची वाटते, वैचारिकदृष्ट्या! आणि ते जेवढे धार्मिक आहेत तेवढा मी धार्मिक आहे असेही मी मानतो. मी अज्ञेयवादी आहे असेही मी मानतो. आणि मी या निष्कर्षाला आलेलो आहे की अज्ञेयवादी लोकांना नास्तिक हे जास्त जवळचे असायला पाहिजे. त्याची कारणेही मी तुम्हाला सांगतो.

नास्तिकपण नाही आणि धार्मिकपण नाही असे अनेक लोक समोर दिसतील. माझ्यासारखे अनेक लोक आस्तिक आहेत-पण तेही राजकीय कारणांनी. त्या कारणांचाही उहापोह मी करणार आहे. पण असेही खूप मोठे गट आहेत की जे नास्तिक नसतील; पण ज्यांना आपण विवेकवादी म्हणतो, बुद्धिप्रामाण्यवादी म्हणतो. नास्तिकवाद हा एक सिंगल पॉईंट अजेंडा झाला की अस्तित्व नाकारणे हे नास्तिक्य झालं. पण, त्याच्यापुढे बुद्धिप्रामाण्यवाद आणि त्याच्यापुढे विवेकवाद. बुद्धिप्रामाण्यवादी माणूस विवेकी असेलच असं नाही. तो बुद्धिप्रमाणाला धरून म्हणेल की, आता या माणसाने जे काही केलं ते पाहता त्याला फाशी दिली पाहिजे. एक विवेकवादी मनुष्य म्हणेल की फाशीची शिक्षा ही रानटी शिक्षा आहे. ती नको! मग या वेगवेगळ्या छटा आपण नीट समजून घेतल्या पाहिजे. नास्तिक, बुद्धिप्रामाण्यवादी आणि विवेकवादी यामध्ये टॉलरन्ससुद्धा कदाचित चढत्या क्रमाने वाढतो की काय मला माहिती नाही. नास्तिकांच्या परिषदेत बोलतोय हे माहिती असूनही मी बोलतोय की तो टॉलरन्ससुद्धा नास्तिकांमध्ये आहे. त्यामुळे मला असं वाटतं की अज्ञेयवादी हे नास्तिकांच्या थोडे जास्त जवळचे आहे. 

भारतीय राज्यघटनेच्या कक्षेत जेवढे पाहिजे तेवढे पुरोगामी मी स्वतःला समजतो. भारतीय राज्यघटनेने उपासनेचे स्वातंत्र्य दिलं, व्यक्तिस्वातंत्र्य दिलं. त्या सगळ्या कक्षांमध्ये बसून भारतीय राज्यघटनेच्या कक्षेत मी स्वतःला पाहतो. आणि तेवढीच माझी ओळख असावी असं मला वाटतं. कुरुंदकरांच्या चालीवर मी असं म्हणणार की, नास्तिकांनी असं म्हणायला पाहिजे की, ‘तुम्ही आस्तिक असल्याचा हक्क मी मान्य करावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर, मी नास्तिक असल्याचा हक्क तुम्ही मान्य केला पाहिजे’. ही जी लिबरल राज्यघटना आहे, सगळ्यांना स्वातंत्र्य देते. त्या राज्यघटनेच्या कक्षेमध्ये नास्तिकांचे जे अधिकार आहेत, जे विचारस्वातंत्र्य आहे, अभिव्यक्तिस्वातंत्र्य आहे त्याच्या बाजूने मी उभा राहेन. वॉल्टेअर असं म्हणाला की, “भलेही तुमची मतं माझ्याविरुद्ध असतील पण ती तुम्हाला मांडता यावी यासाठी मी तुमच्या बाजूने उभा राहील.” माझी आणि नास्तिकांची मतं इतकीही भिन्न नाहीयेत. पण तरीही मी म्हणेन की, “नास्तिकांच्या बाजूने मी उभा राहेन. आज्ञेयवादी असलो तरी!” याचं कारण की तुमचा मतस्वातंत्र्याचा अधिकार हा मूलभूत अधिकार आहे आणि तो तुम्हाला बजावता आला पाहिजे असं मला वाटतं. 

मी थोडी वर्गवारी करतो. आजकाल भक्तांचे दिवस आहेत आणि भक्तांचा आपल्याला रोज त्रास होतो. तर थोडी वर्गवारी मी करतो. उपद्रवमूल्य असलेले भक्त आणि उपद्रवमूल्य नसलेले भक्त अशी मी माझ्या दृष्टीने वर्गवारी करतो. म्हणजे एखादा माणूस बाहेर कोणालाही त्रास होणार नाही, शेजाऱ्याला त्रास होणार नाही अशी काहीतरी घरात पुटपुटत देवपूजा करत असेल किंवा प्रकृती चांगली राहावी म्हणून सकाळी सूर्यनमस्कार घालत असेल. आता त्याचा उपद्रव नाही. भलेही तो सूर्याला देव समजत असेल तरी, त्याचं उपद्रवमूल्य नाही. ते एक. आपण ही वर्गवारी समजून घ्यायला पाहिजे. उपद्रवमूल्य असलेले भक्त आणि उपद्रवमूल्य नसलेले भक्त अशी वर्गवारी करून उपद्रव नसलेल्यांबद्दल आपण अधिक समजुतीने घ्यायला काही हरकत नाही असं मला वाटतं. माझं आणि देवाचं भांडण कुठे? घरी देवपूजा करत असाल तर माझं काही भांडण नाही, मंदिरात करत असाल माझं भांडण नाही, नमाज पढत असाल मशिदीत जाऊन, माझं भांडण नाही. पण, तुम्ही जेव्हा रस्त्यावर याल-गणपतीच्या मिरवणुका काढाल, तेव्हा माझं आणि तुमचं भांडण आहे. कारण ती जी स्पेस आहे ती कायद्याची, सुव्यवस्थेची स्पेस आहे, ती एक्झिक्यूशनची स्पेस आहे. ती एका अर्थाने पाहिलं तर राज्यघटनेची जागा आहे. ती तुमची जागा नाही, सार्वजनिक जागा आहे. आणि म्हणून माझं भक्तांशी जे भांडण आहे ते या मर्यादित मुद्द्यांवर आहे. नास्तिक जवळचे का वाटतात? त्याचे एक कारण आहे. एकतर नास्तिक मिरवणुका काढत नाही कारण त्यांचा देव नसतो. आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा नास्तिक आणि आस्तिकांचे भांडण असेल, आहे. त्याच्यापेक्षाही फार मोठे भांडण हे आस्तिक-आस्तिकांमध्येच आहे. हिंदू परंपरांमध्ये तर त्या परंपरा एकमेकींशी जेवढ्या भांडलल्या आहेत तेवढ्या अन्य कुठेही भांडलेल्या नाहीत. शैव आणि वैष्णव हे फार मोठे भांडण आहे. नास्तिक-आस्तिकांच्या फार पुढचे. हे भांडण इतकं प्रबळ आहे की, वैष्णव शिवरात्रीला मुद्दाम उपवास करतात शिवाचे आणि मुद्दाम पुरणपोळी खातात, इतकं ते भांडण आहे. परंपरांचे हे द्वंद्व आपल्याला पाहावं लागेल. त्यामानाने नास्तिक कमी भांडताना दिसतात. नास्तिक मिरवणुका काढत नाहीत, भोंगे लावत नाहीत त्यामुळे ते जास्त श्रेयस्कर आहेत असं मला वाटतं. पण नास्तिकांना देवाशी झुंजत असताना धर्माशीसुद्धा झुंजावे लागेल. त्याचं कारण असं की देव हा धर्माचे अधिष्ठान आहे, असा एक लोकसमज आहे. त्या धर्माशी झुंजताना नास्तिकांच्या ज्या स्ट्रॅटेजीज् आहेत त्याबद्दलही बोललं पाहिजे.

मी स्वतः धार्मिक नाही पण राज्यघटनेच्या परिघांमध्ये असलेल्या उपासनास्वातंत्र्याला माझा विरोध नाही. मी स्वतः नास्तिक नाही पण लोकांच्या बिलीफला-राज्यघटनेच्या कक्षेत-माझा विरोध नाही. त्यामुळे हा मुद्दा थोडा क्रिटिकल मुद्दा येतो. खासकरून तरुणांनी नीट समजून घेतला पाहिजे. भारतात धर्माशिवाय काहीच होत नाही. धर्माशिवाय राजकारण पुढे जात नाही आणि धार्मिक राजकारणाला उत्तर हे हिंदू धर्माला विरोध नसून सहिष्णू हिंदू धर्म हे आहे. जय श्रीरामला जर विरोध करायचा असेल तर राम राम म्हणावं लागेल. तर राम राम म्हणणारा हिंदू आणि जय श्रीराम म्हणणारा संघी हिंदू यातला हा भेद आहे आणि म्हणून हे भेद नीट समजून घेतले पाहिजे. 

महात्मा गांधी धर्मनिरपेक्ष होते, पण गांधींनाही नास्तिक होता आलं असतं, आंबेडकरांनाही नास्तिक होता आलं असतं. कित्येकदा तुम्हाला वाटूनही राजकारण तसं होऊ देत नसतं. त्याचं कारण असं की, तुम्हाला ज्या मुख्य प्रवाहात राहायचं आहे तिथं धर्म ही फार मोठी गोष्ट आहे. त्याला सोडून चालत नाही. गांधींना म्हणता आलं असतं, त्यापेक्षाही आंबेडकरांना नक्कीच म्हणता आलं असतं की मी नास्तिक आहे, उद्यापासून माझा कोणताही धर्म नाही, मला कोणताही देव नाही. पण आंबेडकरांनाही धर्म घ्यावा लागला, देव घ्यावा लागला. त्याचं कारण इथली इंडियन इथॉस आणि इथला धर्म एकमेकांत इतके मिसळले आहेत की त्यापासून वेगळं होणं अवघड आहे. आणि म्हणून ज्यांना राजकारण करायचं आहे, मतं मिळवायची आहेत आणि ज्यांना लोकांची मत बदलवायची आहेत, वोट आणि ओपिनियन दोन्हीसाठी, तुम्हाला त्या परिघाच्या फार बाहेर जाता येईल अशी परिस्थिती नाही. रिफॉर्मिस्ट म्हणून ते काम गांधींनी केलं. त्याच्याकडे नास्तिकांनी डोळसपणे पाहिलं पाहिजे. केवळ गांधी “हे राम” म्हणाले म्हणून त्यांना ‘त्यातले’ ठरवून उपयोगाचे नाही. गांधींनी हिंदू धर्म मंदिराच्या बाहेर आणला, पुजाऱ्याच्या बाहेर आणला, गांधींनी हिंदू धर्म देवापासून लांब आणला हे लक्षात घ्या. नास्तिक म्हणून देवाच्या बाबतीत जर आपण बोलत असलो तर गांधींनी हिंदू धर्म हा देवापासून लांब आणला हे लक्षात घ्या. गांधी म्हणाले, “सार्वजनिक प्रार्थना करू. काय गरज आहे मंदिरात जाऊन पुजाऱ्याला दक्षिणा देण्याची?” गांधींनी हिंदूंमधून ब्राह्मणत्व दूर केलं आणि ती सार्वजनिक प्रार्थनासभा केली. गांधींचा राम हा हिंदू परंपरेतला राम आहे, तो सिंधुत्ववाद्यांचा राम नाही. तो भ्रूकुटी, ताशे लावलेला राम नाही. गांधींचा राम सीतेसोबत नांदणारा गोड राम आहे, छान, चांगला! नास्तिकांना राम मान्य आहे की नाही या गोष्टी पुढच्या झाल्या. पण हा प्रवाह आपण समजून घेतला पाहिजे.

हे सगळं का? हा सोशिओ-पॉलिटिकल डिस्कोर्स का? गांधीजी राम म्हणत होते, मरतानाही राम म्हणाले पण गांधीजींनी “कर्मकांड करू नका” हेही सांगितलं. आंबेडकरांच्या बाबतीत मी बोललो.. धर्महीन.. का नसतील झाले ते? उद्यापासून माझा कोणताही धर्म नाही असं का नाही म्हटलं त्यांनी? भारतीय परंपरेतील बौद्ध धर्म त्यांना घ्यावा लागला. तो का घ्यावा लागला? तो त्यांनी मजबुरीने घेतला असं मी म्हणणार नाही. कारण ती त्यांची निवड होती, अत्यंत डोळस निवड! पण, जोपर्यंत आपण धर्म आणि समाज, देव आणि समाज यातील वीण नीट लक्षात घेणार नाही, तोपर्यंत गोष्टी पुढे जाणार नाहीत. पण म्हणून आंबेडकर आणि गांधी हे कोणतातरी धर्म घेणारे आणि देवाच्या बाजूने बोलणारे असा गैरसमज निदान आपल्यात नको. आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे की, ह्या दोघा राष्ट्रीय पुरुषांनी आपापली कामं सांभाळत कडक धर्मचिकित्सासुद्धा केली आहे. 

‘रिडल्स इन हिंदुइजम’ वाचलं असेल, आता बंदी आली आहे त्यावर, पण वाचलं असेल आपल्यापैकी बऱ्याचजणांनी. तीच धर्मचिकित्सा गांधींनी केली, तीच धर्मचिकित्सा आंबेडकरांनी केली. तर्कतीर्थांनंतर, कुरुंदकरांनंतर आपल्या पुरोगामी वर्तुळातूनदेखील धर्मचिकित्सा कोणी गंभीरपणे करत आहे असं वाटत नाही.

धर्मचिकित्सा ही एकदाच करायची गोष्ट नाही. कारण, तात्कालिक संबंध, संदर्भ हे सतत बदलत असतात. जे संदर्भ तर्कतीर्थ, कुरुंदकर यांच्यावेळेस होते त्याच्यापेक्षा आज वेगळे आहेत. त्यामुळे धर्मचिकित्सा सतत व्हायला पाहिजे. धर्मचिकित्सा, ईश्वरचिकित्सा आणि ग्रंथचिकित्सा झालीच पाहिजे. यासाठी अभ्यासमंडळे सुरू करायला हवी, काही लोक जमायला हवे आणि सतत चिकित्सा झाली पाहिजे. धर्मचिकित्सा बंद पडता कामा नये. कारण धर्माशी लढायचं असेल तर धर्मचिकित्सा झाली पाहिजे. धर्मचिकित्सेचा अजून एक फायदा होतो. तो मलाही झालेला आहे म्हणून शेअर करतो. धर्मचिकित्सेतून होतं असं की, धर्माच्या तंगड्या धर्माच्याच गळ्यात घालता येतात. म्हणून धर्मचिकित्सा महत्त्वाची! काबरे सरांनी सांगितलं की कुरुंदकरांनी म्हटलं आहे, “आपल्या लोकांना धर्मग्रंथांचा फार अभिमान असतो कारण त्यांनी ते वाचलेले नसतात.” मला शंकराचार्य आणि माझी चर्चा आठवते, ‘झी २४ तास’वर झालेली. शंकराचार्यांना म्हणालो, “शंकराचार्य महाराज, मी सर्व पुरोगामित्वाचे जोडे बाहेर ठेवून एक सश्रद्ध हिंदू म्हणून तुमच्यासमोर बसलेलो आहे. तुम्ही मला मनुस्मृतिमधला भेदभाव सांगावा-मी मनुस्मृतिप्रमाणे वागावं की भगवद्गीतेत
ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः।
मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति।।
कृष्णानं सांगितलं त्याप्रमाणे वागावं का? त्याचं तुम्ही मला उत्तर द्यावं.” पण शंकराचार्य वेगळंच बोलत राहिले. तुम्हाला माहिती नसलेले हे वेद आहेत वगैरे. पण प्रश्न असा असतो की, धर्माच्या परंपरेत आणि ग्रंथांच्या बाबतीत अभ्यास केला तर धर्माच्या तंगड्या धर्माच्या गळ्यात अडकवता येतात. विरोधाभास दाखवता येतात. हे म्हणता येतं आपल्याला की, भगवद्गीतेत एका बाजूला श्रीकृष्ण म्हणतो, “हे चातुर्वर्ण मीच निर्माण केले” आणि दुसरीकडे तोच म्हणतो, “या सर्व जीवांमध्ये माझा अंश आहे.” सगळ्या जीवांमध्ये तुझाच अंश आहे तर मग तू चातुर्वर्ण का निर्माण केलेस? हा प्रश्न विचारण्यासाठी गीता वाचावी लागते. आपल्या राष्ट्रीय नेत्यांनी गीतेची चिकित्सा केली. भगवद्गीता हा “उत्तरकालीन प्रक्षेप” असं लोक म्हणतात. ती श्रीकृष्णानेच सांगितली का? यावर काही लोकांचं म्हणणं “हो” आहे तर काहींचं म्हणणं आहे “व्यासांनी सांगितली, पण कृष्णाच्या नावाने सांगितली”. पण मुद्दा असा आहे की जोपर्यंत धर्मचिकित्सा होत नाही, आपण जोपर्यंत धर्मग्रंथ वाचत नाही, आपण चिकित्सा करत नाही तोपर्यंत हिंदुत्व नावाचं जे काही चाललेल आहे, ‘त्व’ लागलेलं, त्याला आपण उत्तर देऊ शकत नाही. तोपर्यंत आपल्यावरचे हल्ले बंद होणार नाही. म्हणून हे थोडं पेचींदा आहे, हेच वापरून आपल्याला त्याच्याविरुद्ध लढायचं आहे. ते होऊ शकतं असं निर्माण केलं तर ते कुरुंदकरांमध्ये होतं. मनुस्मृती हे पुस्तक सर्वांनी वाचलं असेल. ते कसं आपल्यात निर्माण होऊ शकतं आणि कसं करावं असं मला वाटतं. 

नास्तिक म्हणून भारतातल्या काही परंपरा मात्र आपल्याला नाकारून चालणार नाही, अजिबात दुर्लक्ष करून चालणार नाही. बुद्ध-महावीर ही एक परंपरा आहे. ती आपल्याला नाकारता येत नाही. त्यातली धर्माची गंमत बघा. हिंदू धर्मातून जे धर्म बाहेर पडले, इकडे विषमता आहे म्हणून, तर तिकडेही क्रमाने तेच झालं. जैनांमध्ये श्वेतांबर-दिगंबर हे पंथ पडले. बौद्धांमध्येही हिनयान आणि महायान हे पंथ निर्माण झाले. तर धर्माची ही मूलभूत गोष्ट आहे-धर्म हा भेदच करतो. भेदाला नेहमी प्रोत्साहन देत असतो. तर बुद्ध, महावीर इथपासून ते ज्ञानोबा, तुकोबापर्यंत ही जी परंपरा आहे, त्याला नाकारून नास्तिकांत फार विचारवंत होतील असं मला काही वाटत नाही. कारण ती आपलीच परंपरा आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. नावांवरून ते काहीतरी संतसाहित्य आहे म्हणून आपण दुर्लक्ष करतो. पण तसं नाहीये. मी ज्ञानेश्वरीच्या तीन तरी ओळी सांगू शकतो, ज्या अत्यंत पुरोगामी आहेत. आता आपण पुरोगामित्वाबद्दल बोलतच आहोत तर,

मज हृदयी सद्गुरू | तेणे तारिलो हा संसारपूरु।
म्हणऊनि विशेष अत्यादरू | विवेकावरी॥२२॥

गुरु कोणता चांगला आहे? जो विवेकावरचा आदर वाढवतो. हीच आपली भूमिका आहे आणि आपला विवेकवादही तेच सांगतो.

वेद संपन्नु इये ठायी| परी कृपणु ऐसा आनु नाही।
कानी लागला तिही| वर्णाच्याची॥

तुमचा वेद फार संपन्न असेल, मोठा असेल पण आता तो कृपण झालेला आहे. संकुचित झालेला आहे. आता तो फक्त तीन वर्णांचं ऐकतो. चौथ्या वर्णाचं, शूद्रांचं तो ऐकत नाही. यापेक्षा वेगळी कोणती क्रांतिकारी भूमिका असू शकते असं मला वाटत नाही. कर्मकांडांवरची भूमिका बघा.

तुम्ही व्रत नियमो न करावे।

काही गरज नाही व्रतनियम करायची. हे इथपासून ते तुकारामांपर्यंत त्यांची ओवी, 

सत्य असत्याशी मन केले ग्वाही
मानियेले नाही बहुमता… 

आपण सगळे बहुमताला न मानणारेच आहोत. ही परंपरा सोडून नास्तिकांचा, नास्तिक्याचा विचार भारतात होऊ शकत नाही हे मला आवर्जून सांगायचं आहे आणि यासाठी सांगायचं आहे की, भारतीय इथॉस जो आहे त्याला सांभाळून, त्याच्याशी सामना करून, त्याच्याशी चार हात करून हे नास्तिक्य पुढे जाईल. त्याशिवाय मला वाटत नाही की ते पूर्णत्वास जाईल. 

दुसरा भाग ईश्वराच्या चिकित्सेचा भाग आहे. ईशनिंदेचं कलम काढलं पाहिजे का? तर त्यावर आपल्या सर्वांचं स्पष्ट उत्तर आहे, “हो! काढलं पाहिजे.” ईश्वर हा चिकित्सेच्या बाहेरची गोष्ट नाही. ईश्वराची चिकित्सा व्हायला पाहिजे, धर्माची व्हायला पाहिजे, धर्मग्रंथांची व्हायला पाहिजे आणि धर्मातील बाबींची व्हायला पाहिजे. त्यानंतर कोणाला काय वाटलं त्याचे तो निष्कर्ष काढायला मोकळा. परंतु चिकित्सेला विरोध करता कामा नये. ईश्वराची उत्पत्ती हा एक वेगळाच भाग आहे. वेदकाळात फक्त वरुण असतो, इंद्र असतो वगैरे वगैरे. राम आणि कृष्ण कसे होतात ही इंटरेस्टिंग गोष्ट आहे. कुरुंदकरांचे एक व्याख्यान आहे ते तुम्ही सर्वजण नक्की ऐका. भारतात देव बनण्याची एक प्रक्रिया आहे. जे राष्ट्रपुरुष होते, पराक्रमी होते त्यांना आपण देव बनवलं आहे. कृष्ण पराक्रमी होता. कृष्ण हा भारतातला पहिला रिमोट कंट्रोल राज्यकर्ता आहे. आता तर तसंही रिमोट कंट्रोल आहे, पदावर असून रिमोट कंट्रोल! तो भाग वेगळा. पण तो पदावर नसताना रिमोट कंट्रोल होता. तर ही ती प्रक्रिया आहे. आधी कोणीतरी पराक्रमी असतं आणि त्यांचं लोकांच्या मनातील स्थान पक्कं होतं. मग हळूहळू त्यांच्याभोवती दंतकथा विणल्या जातात. मग रासलीला आली, गोपी आल्या, अमुक-तमुक सगळं आलं आणि होत होत ते देव बनतात. माझा जो काही थोडाफार अभ्यास आहे त्यानुसार मला असं वाटतं की कृष्ण आणि राम असे देव बनले असावेत. तर देव बनवण्याची प्रक्रिया आजही चालू आहे. आज आपल्या हयातीत जन्माला आलेला लोकांना आपण महापुरुष म्हणतो. वीस वर्षांनी आपण त्यांना देव म्हणू. सध्या भक्तांचा जो सगळा छंद चाललेला आहे, तो बघून गांधी सोडून सगळेच देव होतील असं मला वाटतं. देवत्वाकडे त्यांची वाटचाल ऑलरेडी चालू आहे. गांधी देव होणार नाहीत कारण ‘मी माणूस आहे’ याची गांधींनी खूप तयारी करून ठेवली आहे. ‘माझ्या चुका काय, मी काय केलं’ वगैरे. तर देवाचा जन्म होण्याची जी प्रक्रिया आहे, त्यावरही चिंतन व्हायला पाहिजे, चिकित्सा व्हायला पाहिजे.

आता देव कुठे आहे? आकाशात आहे का? माहिती नाही. नास्तिक लोक म्हणतील की, कुठेच नाहीये! पण व्यवहारात देव दिसतो. तो धर्मात दिसतो, जन्मापासून मरणापर्यंत दिसतो. जन्मल्यावरही देवाची पूजा आणि मरतानाही देवाची पूजा आहे. भारतीय एथॉस देवाने पूर्ण भरलेला आहे. चित्रकलेच्या चार शैली होत्या. त्यातली मुगल सोडली तर तिन्हींमध्ये ७५ टक्के चित्रे श्रीकृष्णाची आहे. शास्त्रीय संगीतामध्ये श्रीकृष्ण आणि रामावरच्या बंदिशी ७० ते ७५ टक्के आहे. मला कधी कधी असं वाटतं की आपण त्यातच का घोळत राहिलो? ते “सैया.. दैया..” तेच “कृष्ण राधा”! अशी बंदिश बनायला हवी जी ग्रहण समजावून सांगेल की “राहू बघा… ह्या कोनातून आला” वगैरे. 

तर देव आणि धर्म सोडून इंडियन एथॉस नाही. यात जर बदल करायचा असेल तर त्यांच्याशी जरा वेगळ्या पद्धतीने पंगा घ्यावा लागेल. गांधीजी म्हणाले की, “देवाला धर्म नसतो.” हे फार सुंदर वाक्य आहे. पण, धर्मात मात्र देव असतो. ही मोठी अडचण आहे. भारतीय राज्यघटनेचा जो उल्लेख आला त्यात पाहिलं तर नास्तिकांना काही युक्तिवादाचे मुद्दे देणे हे मी माझं कर्तव्य मानतो. राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये असं म्हटलं आहे की, Faith, विश्वास, उपासना वगैरे. तर Faith हा कॉन्स्टिट्यूशनली गॅरेंटेड आहे. यात असंसुद्धा म्हटलं आहे की, Not to keep faith is also a faith. Belief, Not to belief is also a right. 

आता मतदानाचंच बघा. मतदानाचा हक्क आहे पण मतदान न करण्याचासुद्धा हक्क आहे. तसं याला बघायचं. नास्तिकांबद्दल जर कोणी चॅलेंज करत असेल तर हे सांगायला पाहिजे की right to belief जसा आहे तसा right to not belief सुद्धा आहे. तो त्यात अंगिभूतच येतो. मुळात तो एकत्रच येतो. 

शेवटचा मुद्दा आहें भारतीय राज्यघटनेतील सायंटिफिक टेम्परामेंटचा. याचा उल्लेख इतर कोणाच्याही राज्यघटनेत नाही. त्याचबरोबर मला जे महत्त्वाचे वैशिष्ट्य वाटतं, खासकरून नास्तिक मित्रांसाठी-की भारतीय राज्यघटना कोणत्याही एका धर्माला ओळख देत नाही. कोणत्याही एका धर्माचं नाव भारतीय राज्यघटनेत नाही आणि भारतीय राज्यघटना कोणत्याही एका देवाला ओळख देत नाही. ३३ कोटी आहेत. ओळख द्यायची तरी कोणाला? मुद्दा असा आहे की भारतीय राज्यघटना देव आणि धर्म या कोणालाही ओळख देत नाही. राज्यघटना सायंटिफिक टेम्परामेंट जे सांगते त्याचा धागा थेट याच्याशी जोडतो. सायंटिफिक टेम्परामेंट ही फार वेगळी गोष्ट आहे. ती मी सतत लावून धरतो आणि तुम्हीही सतत लावून धरा असं मी म्हणेन. सायंटिफिक टेम्परामेंटसाठी चांगले नागरिक तयार व्हावे लागतात आणि चांगले नागरिक तयार होण्यासाठी सिलॅबसमध्ये नागरिकशास्त्र २० मार्कांचा नसून १०० मार्कांचा असावा लागेल. माझा तर प्रस्ताव असा आहे, मी तीन-चार मुख्यमंत्र्यांचे पत्र फॉलो-अप घेतले. पत्र लिहिण्याशिवाय आपण दुसरं काही करू शकत नाही हे तर सर्वांनाच माहिती आहे. तर प्रस्ताव असा होता की, राज्यघटना पन्नास मार्कांची असावी. हा जो इतिहास आपण निव्वळ पुतळ्यांवरील मारामाऱ्यांचा शिकवतो ८० मार्कांचा, महापुरुषांवरील आणि उद्याचं नागरिकशास्त्र २० मार्कांना शिकवतो. विवेकवादी चळवळींनी हा मुद्दा उचलून धरायला पाहिजे. तुम्हाला या देशातून धर्म ही गोष्ट जितकी कमी करायची असेल तर त्या जागी विज्ञान जितकं शक्य असेल तितकं आणावं लागेल. युरोपमध्ये तेच झालं की विज्ञानाने ती स्पेस इतक्या पटकन occupy केली की चर्चेस बघता बघता irrelavent झाली. मला दिलासा वाटला की ३८ टक्के लोक नास्तिक आहे म्हणून. पण मुद्दा असा आहे की तुम्हाला जर ते करायचं असेल तर तुम्हाला विज्ञानाची प्रतिष्ठा शक्य तितक्या लवकर वाढवावी लागले आणि ती करण्याचा मार्ग नागरिकशास्त्र १०० मार्कांचा करणं. मागे कोणीतरी म्हणाला होतं की आमच्याकडे प्लास्टिक सर्जरी होते-गणपतीचे उदाहरण दिलं होतं. मुंडकं उडालं होतं. प्लास्टिक सर्जरीने लावलं. मग बाळकडू साहेबांनी प्रश्न विचारला की, “प्लास्टिक सर्जरी उपलब्ध होती तर हत्ती कशाला मारला? जे मुंडकं उडालं होतं तेच लावलं असतं.” लॉजिकल प्रश्न आहे. काहीकाहीवेळा फार लॉजिकल प्रश्न असतात. हे सायंटिफिक टेम्परामेंट आलं पाहिजे. भारतातला कुठलाही पक्ष हे करेल असं वाटत नाही. कारण त्यांनाच मुळात ते नको अस्त. काँग्रेसवाले निदान येतो म्हणून व्हिडीओ पाठवतील, पण राष्ट्रवादीवाले म्हणतील नास्तिक शब्द काढा आणि भाजपावाले म्हणतील कशी घेता परीक्षा बघतो. तीन पक्षातला फरक सांगितला. पण मुद्दा असा आहे की राजकीय व्यवस्था हे करणार नाहीत. त्यासाठी पुन्हा तुम्हाला, मला यावं लागेल. आंदोलन वगैरे करण्याचं चित्र मला आता फारसं दिसत नाही. पण जिथे जिथे जाऊ विवेकवादी लोकांमध्ये, बुद्धिप्रामाण्यवादी लोकांमध्ये तिथे तिथे या विषयाची चर्चा करू आणि सायंटिफिक टेम्परामेंट जे राज्यघटनेचं देणं आहे त्यावरच पुढची कमाई करू शकतो असा विश्वास मला वाटतो.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.