विश्वंभर चौधरी ह्यांच्या भाषणावरील खुलासा

विश्वंभर चौधरी यांनी ब्राइट्सच्या नास्तिक परिषदेत आपल्या भाषणाची सुरुवात “तुम्हाला जगण्याचा सांवैधानिक हक्क आहे, पण देशाच्या प्राचीन संस्कृतीला घेऊन चालावे लागेल” असे सांगून केली. उजवे लोक मुस्लिम लोकांना देतात तेवढी जगण्याची मुभा विश्वंभर यांनी आम्हा नास्तिक लोकांना दिली. अर्थातच, “हिंदुस्थान मे रहना होगा तो जय श्रीराम कहना होगा”. पण आपल्या खांद्यावर मृत इतिहासाचे ओझे वाहत आपण पुरोगामी कसे होणार?

चौधरी यांनी सुरुवातीलाच हे नमूद केले की politically correct असण्यासाठी धर्म गरजेचा असतो. पूर्ण भाषण politically correct पद्धतीने केल्यावर शेवटी मानाचा तुरा म्हणजे त्यांचे स्वतःला गांधी आणि आंबेडकर या दोघांचे अनुयायी आहे हे सांगणे. गांधी आणि आंबेडकर या दोघांच्या अनुयायांना असे एकत्र खुश करणे ही साधी गोष्ट नाही.

चौधरींनी संविधानाचा लावलेला अर्थ हा समावेशकतेपुरता सीमित वाटतो. जेव्हा ते असे म्हणतात की संविधान कोणत्याही धर्माला मान्यता देत नाहीत, तेव्हा ते सर्व धर्मांना मान्यता देते असे प्रतीत होते. संविधानाने भारताला धर्मनिरपेक्ष राष्ट्र घोषित केले आहे याच्याशी हे म्हणणे सुसंगत नाही.

ते असेही म्हणतात की ते आस्तिकही नाहीत आणि नास्तिकही नाहीत. अशा लोकांना संबोधायला एक उत्तम शब्द आहे: कुंपणावरचे. ज्या बाजूने वाऱ्याचा जोर असेल, जी बाजू जिंकत असेल, त्या बाजूने हे लोक कलतात. एखाद्या महत्त्वाच्या नैतिक दुविधेबाबत अशा लोकांकडून सल्ला घेणे चूक ठरते.

त्यांनी संविधानाच्या प्रास्ताविकाचा संकुचित अर्थ काढल्यावर “मी संविधानाच्या चौकटीत पुरोगामी आहे” असे त्यांच्या स्वत:बद्दल म्हणण्याला अर्थ उरत नाही. ११:२० मिनिटे स्वतःबद्दल बोलून हे सांगणे की धार्मिक कार्यक्रम रस्त्यावर साजरे होऊ नये, हे म्हणणे आम्हाला पटते. पण त्यापुढे लगेच लाटलेल्या सार्वजनिक जागांमध्ये आज उभी असलेली मंदिरे मात्र त्यांना खटकत नाहीत हे ऐकून थोडे वाईट वाटले.

नास्तिक्य ही क्रांती असण्याची गरज नाही. ती राजकीय महत्त्वाकांक्षा असण्याचीही गरज नाही. ती एक वैचारिक भूमिका आहे आणि अशी भूमिका अंगिकारणाऱ्या अनेकांना उघडपणे तिचा स्वीकार आणि पुरस्कार करताना संकोच वाटू नये हे महत्त्वाचे. दररोजच्या आयुष्यात इतरांसोबत मिसळताना देवा-धर्माचा overdose आपण टाळू शकतो. त्यामुळे कोण्या एका शहरी प्रवचनकाराने नास्तिकांना ब्राइट्सच्या कार्यक्रमात ज्ञानेश्वरीतले “गुरू कोण चांगला” हे सांगणारे उपदेशाचे डोस देणे मला एक नास्तिक म्हणून क्षुल्लक वाटते.

चौधरी नास्तिकांना “देवाचे आणि धर्मग्रंथांचे टीकाकार व्हा” असे आवाहन करतात. धार्मिक लोकांना त्यांच्याच शास्त्राबद्दल चितपट करणे हा जुना शास्त्रार्थाचा खेळ आहे. नास्तिकांनी हे करणे म्हणजे आपला विवेकवाद (चौधरींचा शब्द) वापरून त्यांनी फार मागे सोडून दिलेल्या धर्माला पुन्हा मान्यता देत धर्माच्या सापळ्यात अडकण्यासारखे आहे.

चौधरी धर्माशी लढण्याचे काही मार्ग सांगतात, पण ते हे विसरतात की नास्तिक फक्त आस्तिकांना विरोध करण्यातच धन्यता मानत नाहीत. जरी आम्ही अनेक वादविवादांमध्ये ओढले जात असू तरी आम्ही बुद्धिप्रामाण्यवाद आणि व्यावहारिकतावादाचा पुरस्कार करतो. ते सीतेच्या बाजूला बसलेल्या कुटुंबवत्सल रामाला स्वीकारतात तर योद्ध्या आक्रमक रामाला नाकारतात. ते हे विसरतात की ह्या दोन्ही रामांनीच आपले राज्य वाचवण्यासाठी गर्भवती सीतेला हाकलले होते.

होय विश्वंभर, धर्म सगळीकडे दिसतो. तर काय? आणि आपले इहवादी कला व गायन-वादन समृद्ध नाही. या उणिवेतून नास्तिकांना त्यांच्या संस्कृतीचा अर्थ उमगतो. आम्ही धार्मिक कला व संगीत एक समृद्ध संस्कृती म्हणून मान्य करतो, त्यात दैवी असे काही नाही. गेले हजारो वर्षे जेव्हा समाज धार्मिक आणि देवभोळा होता त्या प्रवासात धार्मिक संस्कृती उदयाला आलेली आहे. विज्ञान मात्र गेली दोन शतकेच अस्तित्वात आहे. ह्याचा अर्थ असा मुळीच नाही की इहवादी कला आणि संगीताचा विकास होत नाही आणि होणार नाही. आपण कधी एखाद्या आधुनिक स्थापत्याच्या नमुन्याचे, उदा. मॉलची सुंदरता न्याहाळली आहे का? छतावरून कुठलेही देव डोकावत नाहीत, तरी त्यांची सुंदरता कमी होते असे वाटत नाही. पाश्चात्य संगीतातली मुक्तविचार साजरा करणारी गाणी ही तरुण पिढीतील लोकांसाठी प्रिय आहेत. हे सगळे वैभव धर्माच्या सान्निध्यात निर्माण झालेल्या कलेसमोर डावे असेल, पण आपण त्या दोघांमधल्या काळाच्या फरकालाही लक्षात घ्यायला हवे. 

मुद्दा असा आहे की नास्तिक लोक कुठलाही कलेचा नमुना तो केवळ धर्मावर आधारलेला आहे म्हणून नाकारणार नाहीत. ते नाकारतील तर फक्त आणि फक्त कलात्मक मूल्यामुळे, किंबहुना तसे मूल्य नसल्यामुळे. सगळ्या सुंदर मंदिरांसमोरचे उथळ बाजार उलथून जाऊ द्या, आणि बघा नास्तिक त्या सुंदरतेचा आस्वाद घ्यायला पुढे येतात की नाही ते, अगदी पुण्याच्या दगडूशेठ हलवाई मंदिरातही.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.