शिवप्रसाद महाजन ह्यांचे भाषण

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो, आजच्या या ब्राइट्स सोसायटीच्या परिषदेत तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. रविवारची सकाळ असूनदेखील सर्वांनी उत्साह दाखवला त्याबद्दल सर्वांचे आभार आणि अभिनंदन. ब्राइट्स सोसायटीच्या आजपर्यंतच्या प्रवासाबद्दल थोडक्यात सांगण्यासाठी मी आपल्यासमोर उभा आहे. जे अनेक विचारवंत, लेखक, मान्यवर यांची भाषणं ऐकत आणि व्हिडीओ पहात मी इथपर्यंत आलो आहे, ते बरेच मान्यवर समोर बसलेले पाहून थोडं दडपण येतं. तसचं दडपण मलाही आलेलं आहे. ब्राइट्स सोसायटीने आजपर्यंत अनेक परिषदा-मेळावे केलेले आहेत, अजूनही चालू आहेत. त्यांनी अनेक विचारवंतांच्या मुलाखती घेतल्या, त्या प्रकाशित केल्या, पुस्तकसुद्धा प्रकाशित केलेलं आहे. असे अनेक उपक्रम गेले काही वर्ष ब्राइट्स सातत्याने करत आहे. तरी आजच्या परिषदेला एक वेगळे महत्त्व आहे, कारण ब्राइट्स सोसायटी रजिस्टर झाल्यानंतरची ही पहिली परिषद आहे. ब्राइट्स सोसायटीचे सोसायटी रजिस्ट्रेशन ॲक्ट १८६० आणि महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ॲक्ट १९५० अंतर्गत रजिस्ट्रेशन झाले आहे. त्याचबरोबर इन्कम टॅक्स कायद्याअंतर्गत 12A, 80G अंतर्गतसुद्धा रजिस्ट्रेशन झालेले आहे. त्यामुळे ब्राइट्सच्या प्रवासातला हा महत्त्वाचा टप्पा पूर्ण झालेला आहे.

निरीश्वरवादी, बुद्धिप्रामाण्यवादी, समाजवादी नास्तिक मंडळी समाजामध्ये असतात असं ज्यांना मान्य नाही किंवा असं काही असतं हे काहींना पटतही नाही, अशा शासकीय यंत्रणेकडे अशी कोणती संस्था रजिस्टर करून घेणं हे खूप मोठं दिव्य असतं. काही गोष्टी बऱ्याच अंशी आपल्या अंगवळणी पडलेल्या असतात, तसेच त्या शासकीय यंत्रणांच्यासुद्धा अंगवळणी पडलेल्या असतात. चॅरिटी कमिशन ऑफिसमध्ये जेव्हा आपण आपल्या संस्थेचा ड्राफ्ट रजिस्ट्रेशनसाठी घेऊन गेलो, तर तो न वाचता त्यांनी आपल्याला सांगितलं की, “खाली चौकात जा! तिथे टायपिंग करणारे बसले असतील. तिथं तुमच्या संस्थेचं नाव सांगा, पदाधिकाऱ्यांची नावं किंवा किमान काहीतरी कागदपत्रं द्या. ते तुमचा ड्राफ्ट बनवतील. ती कागदपत्रं घेऊन आमच्याकडे या. संस्था आठ दिवसात रजिस्टर होईल.” त्यांना आपली ध्येय, उद्दिष्ट्ये काही वेगळी आहेत हे वाचण्यातसुद्धा इंटरेस्ट नव्हता. इतकी ही प्रक्रिया त्यांच्या अंगवळणी पडली आहे. 

संस्थेच्या उद्दिष्टांमध्ये रक्तदान, शालेय विद्यार्थ्यांना पुस्तकांचं, साहित्याचं वाटप असं काही नसेल तर संस्थेची नोंदणीतरी कशाला हवी? अशा पातळीवर चर्चा सुरू झाल्या होत्या. शेवटी त्यांना आपली उद्दिष्ट्ये समजावून सांगावी लागली. त्यासाठी कित्येक फेऱ्या मारल्या. कित्येक जिल्ह्यांमध्ये काम सुरू होतं.  या चर्चा, वैज्ञानिक दृष्टिकोन, रॅशनल थिंकिंगची उद्दिष्ट्ये असणाऱ्या संस्थेची नोंदणी करायची होती आणि त्या पातळीवर त्यांना घेऊन येणं मोठं जिकीरीचं होतं. शेवटी एकानं त्यावर पर्याय असा दिला की, “तुमची उद्दिष्ट्ये तशीच ठेवा; परंतु काही दानधर्म करणार आहात असं एखादं उद्दिष्ट त्यात टाका आणि तो ड्राफ्ट आमच्याकडे पाठवून द्या.” संस्थेचे अध्यक्ष प्रमोद सहस्त्रबुद्धे, विनय खातू आणि फाऊंडर मेंबर समीर शिंदे यांनी मात्र खूप चिकाटी लावून धरली. एक वर्ष त्यांच्यासोबत निगोसिएशन्स चालू होती, चर्चा चालू होत्या. अखेर एक वर्षानंतर असिस्टंट चॅरिटी कमिशनर, अलिबाग, रायगड जिल्हा येथे संस्था रजिस्टर झाली आणि आज आपण या नोंदणीकृत संस्थेचा पहिला कार्यक्रम ‘नास्तिक परिषद’ करत आहोत. संस्थेची सगळीच ध्येय, उद्दिष्ट्ये सांगून मी काही आपला वेळ घेणार नाही. तरीपण काही महत्त्वाच्या गोष्टी मी सांगतो, विशेषतः तरुणांसाठी.

ब्राइट्स सोसायटीमध्ये कोणीही पूर्णवेळ कार्यकर्ता असणार नाही. त्याने संस्थेसाठी पूर्णवेळ काम करणं अजिबात अपेक्षित नाही. तसंच संस्था त्याला नियमित मानधन देण्यास बांधील नाही. त्याने आपली आर्थिक, कौटुंबिक, सामाजिक जबाबदारी पूर्ण करीत असताना जसा, जेव्हा वेळ मिळेल तसं संस्थेसाठी काम करायचं आहे. जेव्हा तो संस्थेला पुरेसा वेळ देईल तेव्हा संस्था त्याच्या मानधनाचा विचार करेल. जाहीरनामा वाचायला लावून त्यावर सह्या घेऊन दरवर्षी दहा नास्तिक तयार करणे, त्यांना सभासद करून घेणे हेसुद्धा अपेक्षित नाही. बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक तयार होणं ही विचारांती प्रक्रिया आहे, त्यामुळे, ह्यासाठी जो तो आपापला वेळ घेईल आणि जो नास्तिक आहे/झालेला आहे त्यासाठी ब्राइट्स सोसायटीचा प्लॅटफॉर्म सदैव उपलब्ध राहील. पाणी शिंपडायला लावून किंवा मंत्र म्हणवून जसा धर्मप्रसार करतात तसा नास्तिक्याचा प्रचार, प्रसार करणे अजिबात अपेक्षित नाही. त्यामुळे तरुण सभासदांना विशेष विनंती आहे की त्यांनी संस्थेची जबाबदारी स्वीकारताना आपल्या दैनंदिन जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घ्यावी. संस्था नवीन आहे, संस्थेची ध्येये, उद्दिष्ट्येसुद्धा वेगळी आहेत. अशा संस्थेचा कारभार चालवताना सर्व सभासद, पदाधिकाऱ्यांकडून काही त्रुटी राहू शकतात, काही चुका होऊ शकतात. त्यामुळे उपस्थित मान्यवरांना विनंती आहे की असं काही आपल्या निदर्शनास आल्यास वेळेत सूचना करा, मार्गदर्शन करा. त्याचं नेहमी स्वागत केलं जाईल. आपल्याला अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे त्यामुळे आपल्या सहकार्याची गरज आहे. असंच सहकार्य करत रहा, आपली ध्येय, उद्दिष्ट्ये आपण गाठत राहू. एवढं बोलून मी माझं मनोगत पूर्ण करतो. धन्यवाद!

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.