मनोगत

‘आजचा सुधारक’ विवेकवादी चिंतनाला वाहिलेले आहे असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा विवेकाधीष्ठित विचारांना यात प्राधान्य असणे साहजिकच आहे. १८ डिसेंबरला ब्राइट्स सोसायटीने पुणे येथे ‘राष्ट्रीय नास्तिक परिषद’ आयोजित केली होती. परिषदेच्या पहिल्या भागात नास्तिकता, विवेकवाद, विज्ञाननिष्ठा आणि या सगळ्याला मिळणारे आणि मिळायला हवे असणारे कायद्याचे संरक्षण यावर आमंत्रितांची भाषणे झाली. तर दुसऱ्या भागात काही चर्चासत्रे त्यांनी घेतली. या साऱ्याचे समालोचन वाचकांपर्यंत पोहोचावे असे आम्हाला वाटले. ब्राइट्स सोसायटीचे सचिव कुमार नागे यांनी या अंकाच्या संपादनाची जबाबदारी घ्यावी असे आम्ही सुचवले. कुठलेही चांगले काम हे एकेकट्याने केले तर मोठे होत नसते. समविचारी लोक एकत्रित आले तरच त्यांच्या कामाचे परिणाम व्यापक होऊ शकतात. कुमार ह्यांनी विशेष प्रयत्न घेऊन हा अंक तयार केला आहे. भाषणांचे प्रतिलेखन करणे आणि त्याला संपादित करणे हा या प्रयत्नांचा एक मोठा भाग होता. शिवाय परिषदेत झालेली भाषणे आणि त्यातील काही विरोधाभासी मुद्द्यांवर ब्राइट्सची असणारी भूमिका असे सारेदेखील ह्या अंकात आपण घेतले आहे. यातून विचारांची घुसळण होईल आणि विवेकवादी विचारसरणीला बळ मिळेल असे वाटते.

साभार.
समन्वयक, आजचा सुधारक

नास्तिक परिषदेच्या निमित्ताने : सूचना, दक्षता आणि सिद्धता
– कुमार नागे

रविवार; दि. १८ डिसेंबरला, पुणे येथील गोखले इंस्टिट्युटमध्ये ब्राइट्स सोसायटीची ‘राष्ट्रीय नास्तिक परिषद’ झाली. परिषदेला उत्तम प्रतिसाद मिळाला. अश्या परिषदा, मेळावे, अन्य जाहीर उपक्रम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात झाले पाहिजेत, देशभर झाले पाहिजेत. ईश्वर/धर्म/धम्म/दीन/रीलिजन/जातीयवाद/अंधश्रद्धा इत्यादी कालबाह्य घटक स्पष्टपणे नाकारून मानवी समाज विवेकाधीष्ठित झाला पाहिजे, बुद्धिप्रामाण्यवादी झाला पाहिजे. अशी जाहीर भूमिका घेणाऱ्या मुक्तचिंतकांना अशी परिषद म्हणजे हक्काचे व्यासपीठ असते.

वैज्ञानिक दृष्टिकोनातून समाजाचे शैक्षणिक प्रबोधन करणे, बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिकांमध्ये साहचर्य, सुसंवाद निर्माण करणे, त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे, इत्यादी उद्दिष्ट्ये पूर्ण करण्यासाठी ब्राइट्स सोसायटीची स्थापना करण्यात आली. २०१४ पासून ब्राइट्स सोसायटीने अनेक सभा, नास्तिक संमेलने, भाषणे, चर्चासत्रे आयोजित केली. या उपक्रमांना उत्तम प्रतिसाद मिळाला.

अशा विषयांवर जाहीर उपक्रम घेण्यासाठी नेमके कोणते प्रयत्न केले पाहिजेत, कोणती दक्षता घेतली पाहिजे याविषयी संवाद करण्याचा इथे प्रयत्न करीत आहे. या प्रवासात हमखास एक सल्ला मिळतो. तो म्हणजे,” नास्तिकांच्या संघटनेची गरज नाही. तुम्ही ईश्वर नाकारता ही तुमची खाजगी बाब आहे. हे असे जाहीर उपक्रम घेऊन ते सांगायची गरजच नाही.” तेव्हा अशा परिषदांतून नेमके काय साध्य होते? किंवा पुण्यात झालेल्या नास्तिक परिषदेतून नेमके काय साध्य झाले? अशा काही मुद्यांवर आपण स्पष्टता करून घेऊ. ‘आजचा सुधारक’चा (आ.सु.) वाचक प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सामाजिक परिवर्तनाचा भाग आहे. त्यामुळे वरील प्रश्नांचा ऊहापोह करण्याचे हे एक उत्तम व्यासपीठ आहे असे मी समजतो.

अशा विषयांवर परिषद घेणे म्हणजे संवेदनशील क्षेत्रातील सक्रियता अधोरेखित करणे. विषय तर संवेदनशील परंतु सक्रियता नसेल तर संघटनात्मक पातळीवर मनोधैर्य खचते. म्हणून पुरेशी सक्रियता हवी आणि त्यात समतोलसुद्धा हवा.

ब्राइट्स सोसायटीची नोंदणी झाल्यानंतर एक पंजीकृत संस्था म्हणून अधिक स्पष्ट, अधिक व्यापक आणि कृतिशील कार्यक्रमांची जोड देणारी परिषद घेणे गरजेचे होते. सोसायटीची नोंदणी झाल्यावरची पहिली परिषद पुण्यात झाली. परिषदेचे नेमके ध्येय काय असावे?, विविध क्षेत्रातील वक्त्यांची निवड कशी करावी?, असा क्रमशः प्रवास सुरू झाला. पाठीशी अनुभव होताच. संस्था नोंदणीकृत तर झाली होतीच, Federation of Indian Rationalist Associations (FIRA) चे सदस्यत्वदेखील संस्थेला मिळाले होते. त्यामुळे आयोजकांची जबाबदारी अधिक वाढली होती.

परिषदेच्या आयोजकांच्या व संस्थेच्या संबंधित सदस्यांसोबतच्या चर्चेतून परिषदेची ४ प्रमुख उद्दिष्ट्ये ठरवण्यात आली :

१. संवाद : सदस्यांनी एकमेकांना प्रत्यक्ष भेटून एकमेकांशी ‘सविस्तर परिचय’ करून घ्यावा. यातून एकटेपणाची भावना दूर होते.

२. सत्कार : कर्तृत्ववान व्यक्तींचा सत्कार करणे.

३. नेतृत्व : आपल्या समूहातील प्रतिभावान व्यक्तींना नेतृत्वाची संधी उपलब्ध करून देणे.

४. कृतिकार्यक्रम : नवीन प्रकल्पांसाठी कृतिकार्यक्रम तयार करणे.

वक्ते : संघटन म्हणून काम करताना समाजातील अनेक घटकांशी आपल्याला जोडून घ्यावे लागते. यावेळी निमंत्रित वक्त्यांमध्ये शिक्षणतज्ज्ञ, कलाकार, लेखक, संपादक, स्तंभलेखक, कायदेतज्ज्ञ, राजकारणी, अभ्यासक, शास्त्रज्ञ, सामाजिक कार्यकर्ते इत्यादी होते. महाराष्ट्राचे माजीमुख्यमंत्री मा. पृथ्विराज चव्हाण यांनी याआधी ब्राइट्सच्या झूम मीटिंगवर मार्गदर्शन केले होते. त्यांनी परिषदेला येण्याची तयारी दर्शवली होती. परंतु नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या गडबडीत त्यांना येणे जमले नाही. सदर परिषदेमध्ये Federation of Indian Rationalist Associations (FIRA) चे अध्यक्ष नरेंद्र नायक, टाईम्स ऑफ इंडिया प्लसच्या साहायक संपादिका अलका धुपकर, ह्युमनिस्ट्स इंटरनॅशनलचे उत्तम निरौला, कायदेतज्ज्ञ असीम सरोदे, महाराष्ट्र अंनिसचे अविनाश पाटील, पर्यावरणवादी डॉ. विश्वंभर चौधरी, शास्त्रज्ञ डॉ. अनिकेत सुळे, साम टीव्हीचे प्रसन्ना जोशी, पत्रकार अभिजित चंदा, विचारवेधचे डॉ. आनंद करंदीकर, साहित्यिक जगदीश काबरे आणि प्रा. य. ना. वालावलकर इत्यादी वक्ते उपस्थित होते. शिवाय महाराष्ट्रातील बहुतेक जिल्ह्यांचे प्रतिनिधी तसेच दिल्ली, विशाखापट्टनम, उडपी, मंगलोर, बंगलोर इत्यादी ठिकाणांवरून सदस्य आले होते. या परिषदेत FIRAचे अध्यक्ष नरेंद्र नायक आणि टाईम्स ऑफ इंडिया प्लसच्या साहायक संपादिका अलका धुपकर यांना अनुक्रमे ‘चार्वाक’ आणि ‘मधुरजग’ हे पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. भारतातसुद्धा बुद्धिप्रामाण्यवादाची दीर्घ परंपरा होती हे चार्वाक पुरस्काराद्वारे नमूद होते.

संघटनात्मक काम करताना समाजातील इतर मुक्तचिंतकाना जोडून घ्यावे लागते. त्यात बुद्धिप्रामाण्यवादी, विवेकवादी, संशयवादी, जडवादी, इहवादी, मानवतावादी, अज्ञेयवादी, निधर्मी असे अनेक घटक आहेत. दीर्घकालीन ध्येयासाठी असे बेरजेचे गणित आपल्या सामूहिक हिताचे असते एवढाच हा तपशील लिहिण्यामागचा उद्देश.

साध्य काय : अनेक तरुण नव्याने जोडले गेले. मदतीचे अनेक हात पुढे आले. महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांत तसेच भारतातील इतर शहरांत पुढील परिषदा घेता येतील याची खात्री मिळाली.

दक्षता : हा प्रवास लांबचा आहे. नाक खाजवून कुणाला डिवचणे हे ध्येय असूच नये. परिषद घेणे हे ध्येय नसून ते एक साधन आहे. त्यामुळे ज्या इतर संस्थांसोबत कार्यक्रम घेत आहोत त्यांना विश्वासात घेऊन परिषदेची तपशीलवार माहिती सामायिक केली पाहिजे. परिषद घेत आहोत त्या क्षेत्रातील पोलीस व इतर सन्माननीय अधिकारी यांनादेखील कार्यक्रमाचे तपशील कळवायला हवेत. तसेच त्यांना परिषदेसाठी आमंत्रित करायला हवे. ढोबळ पद्धतीने मेळावे घेण्यापेक्षा विशिष्ट ध्येय ठेवून नेमकेपणाने परिषद घ्यायला हवी. परिषद म्हटली की येणारे सदस्य परिचित असतात. त्यांचेसोबत जोडून कृतिकार्यक्रम आखता येतात.

जबाबदारी: अशा कार्यक्रमांचे यश सांघिक असते. कोअर कमिटीचे पदाधिकारी आणि सोसायटीच्या सदस्यांचे योगदान या आधारावरच असे जाहीर उप्रक्रम यशस्वी होत असतात. ही माणसे म्हणजे एकेक स्वतंत्र संस्था असतात. एवढे प्रगल्भ आणि उमदे सहकारी हे सशक्त संघटनेचे महत्त्वाचे अंग आहे. परिषदेत जवळपास ३०० ची उपस्थिती होती. त्यामुळे व्यवस्थापन चोख असणे अत्यंत गरजेचे असते. समविचारी लोकांच्या पाठिंब्यामुळे आत्मविश्वास वाढतो. अधिक जोमाने काम करायची उर्मी निर्माण होते.

असे काम उभे राहत असताना त्या कामाची सूत्रबद्ध मांडणी प्रकाशित होणे महत्त्वाचे असते. महाराष्ट्रातील अन्य समविचारी संघटनांना, व्यक्तींना हा अंक मार्गदर्शक ठरेल अशी अशा वाटते. ज्यांना यापुढे अशा प्रकारची नास्तिक परिषद आपल्या शहरात घ्यायची असेल त्यांचे स्वागत.

कुमार नागे
+91 86920 22255
kumar.nage1@gmail.com

अभिप्राय 4

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.