माझा ब्राइट्स सोसायटीसोबतचा अनुभव आणि अपेक्षा

१८ डिसेंबर २०२२ ची पुण्यातील नास्तिक परिषद पाहिली. त्यासाठी आलेल्या अनेक नामांकित व्यक्ती पाहिल्या, त्यांचे विचार ऐकले आणि थेट ७ वर्षे मागे गेलो. त्यावेळी मी १२वीला होतो. 

ऐकायला थोडं आश्चर्यकारक वाटेल पण, जेव्हा मी ब्राईट्स सोसायटी जॉईन केली तेव्हा मी नास्तिक नव्हतो. खरंतर नास्तिक ही संकल्पनादेखील मला माहीत नव्हती. ब्राइट्ससोबत माझी ओळख कुमार नागे यांच्यामुळे झाली अणि तेव्हा मी नुकताच बारावी झालो होतो आणि इंजिनीअरिंगला प्रेवश घेणार होतो. पण प्रवेश कुठे घ्यायचा (कारण त्यावेळी इंजिनीअरिंग हे खूप मोठं विश्व वाटायचं. इंजिनीअरिंग काय अस्त तेही नेमकं माहीत नव्हतं) म्हणून मार्गदर्शन घेण्यासाठी मी कुमार सरांकडे गेलो. माझे काका सतीश साळुंके मला त्यांच्याकडे घेऊन गेले. तेव्हा असंच बोलता बोलता विषय निघाला अणि काकांनी त्यांना सांगितले की हा गणपतीला खूप मानतो अणि पूजा वगैरे करतो. हे ऐकल्यावर कुमार सरांनी काय विचार केला माहीत नाही. पण ते काकांना म्हणाले, “ह्याला एका ग्रुपमध्ये ॲड करतो अणि बाकी शिक्षणाचं बघू पुढे.” असं म्हणून त्यांनी “अगदी बिनधास्तपणे Mechanical Engineering ला प्रवेश घे. काळजी करू नको. मी आहे ना..” असं बोलले. शिक्षण, पुढे करिअर आणि सामाजिक विचार यांची इतकी स्पष्ट दिशा एका मीटिंगमध्ये मिळाली. आत्मविश्वास वाढला. धुके दूर झाले.

काही वेळात कुमार सरांनी मला व्हाट्सॲप ग्रुपमध्ये ॲड केले. सुरुवातीला वाटलं, काहीतरी इंजिनीअरिंगसंबंधी ग्रुप असेल हा. त्यावेळी माझ्या माहितीनुसार ब्राइट्सचा एकच व्हाट्सॲप ग्रुप होता. सुरुवातीला मला काही कळेना. मला वाटलं, ठीक आहे. बघूया काय आहे ते. कुमार सरांनी त्यात माझी ओळख करून दिली. त्यानंतर हळूहळू अनेकांशी संवाद साधत गेलो. त्यात अंजली दासखेडेकर, चैताली, निखिल जोशी अणि असे बरेच लोक. थोड्या दिवसात अंजलीताईंसोबत ओळख वाढली. तिने मला ब्राइट्स ग्रुपबद्दल भरपूर काही शिकवले, समजावले. ग्रुपवर खूप चर्चा व्हायची अणि मला कळेना की नक्की हे लोक कशावर भांडत आहेत? खरंतर सगळे चर्चा करत होते, हे मला नंतर कळू लागले. नंतर अजून पुढे समजले की जरी ही शाब्दिक चर्चा टोकाची असली तरी त्यातून विचारांना दिशा मिळते आहे. तर्क करण्याची पद्धत स्वतःमध्ये विकसित होत आहे. (ज्याचा फायदा मला पुढे अभ्यास करताना झाला, काम करताना झाला.) पुढेपुढे ती चर्चा वाचण्यात मजा येऊ लागली. एका विषयाच्या वेगवेगळ्या बाजू समजायला लागल्या अणि मग मला त्यावरून खूप प्रश्न निर्माण होऊ लागले. आज ते प्रश्न आठवून स्वतःचे स्वतःच हसायला येते. एका गरीब कुटुंबातील मुलाला एवढं मोठं वैचारिक अवकाश झटकन मिळालं होतं. चर्चा घडत होत्या. देव, धर्म, धम्म अश्या अनेक विषयांवरील मते स्पष्ट होत होती. देव, धर्म ह्या सगळ्या गोष्टी माणसाने स्वतःच्या सोयीसाठी केल्या आहेत, आणि त्यात भीती व अज्ञान अधिक आहे हे लक्षात आले . याचसुमारास देवपूजा आणि इतर कर्मकांडे मी नाकारू लागलो. जगात ईश्वर नाही याची खात्री पटली. मी माझ्या काही नातेवाईकांना ग्रुपमध्ये सामील करून घेतले, तेव्हा कुमार सर गमतीने म्हणाले की ब्राइट्स ग्रुप हा तुझा फॅमिली ग्रुप आहे का? पण माझे अनेक नातेवाईकसुद्धा या विचारांनी प्रभावित होत होते. हा चांगला बदल होत होता. आता माझे नातेवाईक हळूहळू नास्तिकतेकडे प्रवास करू लागले. त्यांनासुद्धा एक व्यासपीठ मिळाले.

वेगवेगळे सामाजिक उपक्रम करत असताना माईंसोबत (वंदना शिंदे) ओळख झाली. माई म्हणजे असे व्यक्तिमत्त्व ज्यांनी त्यांचं आयुष्य अंनिससाठी समर्पित केलं आहे अणि आज ह्या वृद्ध वयातदेखील त्या सातत्याने अंनिससाठी कामगिरी बजावत आहे. माई म्हणतात की अंनिस ही नास्तिकतेकडे वळण्याची पहिली पायरी आहे. नंतर हेच लोक ब्राइट्समध्ये सामील होऊ शकतात. मला तर थेट ब्राइट्ससोबत जायची संधी मिळाली अणि आता मी ब्राइट्सचा अविभाज्य घटक झालो आहे.

असा योग्य सल्ला, करीअरसाठी मार्गदर्शन आणि आपुलकीची माणसे असतील तर सामाजिक परिवर्तन सुलभ बनते याचं मी स्वतः एक उदाहरण आहे. 

— 

ब्राइट्स आणि अन्य बुद्धिप्रामाण्यवादी संस्थांकडून माझ्या अपेक्षा :
आस्तिक्याकडून नास्तिक्याकडे हा प्रवास खूप वेगळा होता. हा प्रवास सहज होता, गमतीशीर होता. असाच प्रवास जगातील किमान भारतीय माणसांसाठी झाला पाहिजे. आस्तिक आहे म्हणून मला कुमार सरांनी जवळच केले नसते तर पुढील गोष्टी घडल्याच नसत्या. आपल्या काही उपक्रमात आस्तिकांना सहभागी करून घेणे, त्यांच्यासोबतसुद्धा संवाद निर्माण करणे ही माझी पहिली अपेक्षा. 

तरुण वयात सामाजिक मार्गदर्शनासोबतच त्या सदस्यांच्या करीअरसाठी मार्गदर्शन करणे शक्य असेल तर तेही करावे. PK सारखा एखादा चित्रपट, एखादी वेब सीरिज अश्या लाखो लोकांपर्यंत पोहोचणाऱ्या, त्यांना आकर्षित करणाऱ्या ॲक्टिव्हिटिज् ब्राइट्सने केल्यास ते तरुणांना विचार करायला भाग पाडतील. 

आपल्या कामाची योग्य ती जाहिरात करणे गरजेचे आहे. 

माझा हा प्रवास ज्या सुलभतेने झाला तसा प्रवास इतर भारतीय नागरिकांना देशभर कसा उपलब्ध होईल याचे नेतृत्व ब्राइट्सने करावे. ही माझी अपेक्षा आहे . 

‘आजचा सुधारक’मार्फ़त मी ही विनंती करत आहे, जेणेकरून इतर समविचारी संस्था, व्यक्ती याकडे लक्ष देतील.

अभिप्राय 2

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.