आवाहन

स्नेह.

कम्प्युटर्सच्या सुरुवातीच्या काळापासून अगदी आत्ता आत्तापर्यंत म्हटले जायचे की Computer is a tool which is as intelligent as the person using it. कृत्रिमप्रज्ञेमुळे आता तो समोरच्या माणसाच्या बुद्धीहून ‘अधिक बुद्धिमत्ते’ची कामे करू शकतो असे भासू लागले आहे. ‘एआय’ला खाद्य म्हणून खूप जास्त डेटा पुरवला जातो. शिवाय या डिजिटल प्रणालींकडे एकमेकींकडून माहिती सामायिक करण्याची क्षमताही असतेच. डेटावर प्रक्रिया करण्याचा या प्रणालींचा वेग मानवी मेंदूपेक्षा कितीतरी पटींनी अधिक असतो. या सगळ्यामुळे मिळणारे परिणाम स्तिमित करणारे आहेत. कृत्रिमप्रज्ञेच्या वापरातून बनलेली ChatGPT सारखी Language Model Toolही आता सामान्यांच्या आवाक्यात आली आहेत.

परंतु या अनुषंगाने अनेक प्रश्न ऐरणीवर मात्र आले आहेत. जसे, भविष्यात मानवी बुद्धिमत्तेचा वापर कमी कमी होत गेला तर तिचा नित्य नूतन विकास कसा होत राहणार? कृत्रिमप्रज्ञेचा वापर देश/समाजविघातक शक्तीही करू शकतील, त्यामुळे काय परिस्थिती ओढवेल? कृत्रिमप्रज्ञा स्वतःहून विकसित होऊ शकत असल्यामुळे ती मानवाच्या कह्यात राहील का? कृत्रिमप्रज्ञेच्या वापराने अस्सल-नक्कल, सत्य-असत्यातील भेदच कळेनासा होईल का? जसे, ‘एआय’मुळे शक्य होत असलेले deepfake फोटो किंवा videos. आणि जर असं असेल तर कृत्रिमप्रज्ञेची विश्वासार्हता काय? तिच्या वापराविषयी नीती ठरवणे आणि ती अमलात आणणे शक्य आहे का? कृत्रिमप्रज्ञेचा वापर करून बनलेली ChatGPT सारखी यंत्रणा हवामानबदलाच्या संकटापेक्षा भयानक आहे का?

डेटा विश्लेषणाचे अनंत पॅरॅमीटर्स आपणच ह्या प्रणालीला पुरवले आहेत. त्यामुळे येथेही ‘नीतिमत्ता’ पाळणे ही एक खूप मोठी जबाबदारी आपल्यावरच आहे. कृत्रिमप्रज्ञा माणसातील सर्जनशीलतेला मारक ठरेल का किंवा स्वतःपुढे असणारी आणि भविष्यात येणारी आव्हाने समर्थपणे पेलू शकेल का हेही प्रश्न आहेतच.

आगामी अंकात या विषयावर अनेक बाजूंनी विचार व्हावे आणि ते वाचकांसमोर यावे असे वाटते.

आपले साहित्य लेख, निबंध, कविता, कथा, रेखाचित्रे, व्यंगचित्रे, ऑडिओ, व्हिडीओ अशा कुठल्याही स्वरूपात पाठवू शकता. शब्दमर्यादा नाही. आपले साहित्य २५ जूनपर्यंत aajacha.sudharak@gmail.com यावर पाठवा अथवा +91 9372204641 ह्या क्रमांकावर WhatsApp च्या माध्यमातून पाठवा.

– प्राजक्ता अतुल
समन्वयक, आजचा सुधारक

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.