कृत्रिमप्रज्ञा आणि सर्जनशीलता 

दिलेल्या उत्तरांच्या आधारे जर एखाद्या मानवी परीक्षकाला, ती उत्तरे मानवाने दिली आहेत की यंत्राने हे ठामपणे निश्चित करता आले नाही तर ते यंत्र मानवासारखे आणि मानवाएवढे विचारी आहे असे म्हणता येईल अशी ही यंत्राची बुद्धिमत्ता/प्रज्ञा तपासण्याची परीक्षा अ‍ॅलन टुरिंग ह्या ब्रिटिश गणितज्ञाने १९५० मध्ये सुचवली. २०२२-२३ मध्ये ChatGPT, Bard आणि ह्यांसारख्या माध्यमांद्वारे सर्वसामान्य लोकांना उपलब्ध करून दिलेली कृत्रिमप्रज्ञा टुरिंगच्या परीक्षेत उत्तीर्ण होते. म्हणून आजच्या कृत्रिमप्रज्ञेला मानवाएवढी बुद्धिमत्ता/प्रज्ञा आहे म्हटले जाते. मात्र मानवी मेंदूच्या माहितीच्या साठवण आणि प्रक्रिया करण्याच्या क्षमतेच्या तुलनेत आजच्या कृत्रिमप्रज्ञेची क्षमता अफाट असल्याने आजची आधुनिक कृत्रिमप्रज्ञा मानवाहून जास्त बुद्धिमान ठरेल आणि (नजीकच्या?) भविष्यात ती मानवाला डोईजड होईल अशी भीती ह्या कृत्रिमप्रज्ञेच्या निर्मात्यांसह अनेकांनी व्यक्त केली आहे. डोईजड झालेली ही कृत्रिमप्रज्ञा मानवाला नेमकी कशी हानी पोचवेल याबद्दल निरनिराळे प्रवाद आणि निरनिराळ्या शक्यता आहेत. ही कृत्रिमप्रज्ञेची काळी, धोकादायक बाजू झाली. 

त्याच वेळी रोगनिदान, संगणकीय प्रणाली लिहिणे, हरकाम्या मदतनीस, ह्या, आणि अशा कितीतरी क्षेत्रात कृत्रिमप्रज्ञेमुळे मानवी आयुष्य कमी ताणाचे, जास्त बिनचूक, जास्त सुखकारक होऊ शकेल. ही कृत्रिमप्रज्ञेची पांढरी, सकारात्मक बाजू झाली. 

मात्र आजची कृत्रिमप्रज्ञा आजच्या एवढी बुद्धिमान नसताना, म्हणजे आजच्यापेक्षा कमी बुद्धिमान असतानाही, ह्यांपैकी काही क्षेत्रांत आजच्यापेक्षा कमी प्रमाणात का होईना पण ती साहायक, उपयुक्त होतीच. उदाहरणार्थ, पूर्वीची कृत्रिमप्रज्ञा भले संगणकीय प्रणाली लिहून देत नसेल पण वाक्यरचनात्मक (syntactical) किंवा व्याकरणाच्या चुका दाखवू शकत होतीच. 

टुरिंग परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या आजच्या कृत्रिमप्रज्ञेने पूर्वीच्या कृत्रिमप्रज्ञेच्या वरची पातळी गाठली आहे. त्यामुळे आजच्या कृत्रिमप्रज्ञेने मानवी बुद्धिमत्तेचा आणखीन एक महत्त्वाचा पैलू आत्मसात केला आहे, आणि तो म्हणजे सर्जनशीलता! 

ह्या सर्जनशीलतेमुळे आजच्या कृत्रिमप्रज्ञेला आज अस्तित्वात नसलेली एखादी गोष्ट संपूर्णपणे नव्याने निर्माण करणेदेखील शक्य आहे. म्हणजे जुन्या कृत्रिमप्रज्ञेच्या आधारे आधीच काढलेल्या छायाचित्रातील प्रकाशयोजना दुरुस्त करणे, अनावश्यक भाग वगळणे, हे शक्य होते. तर आजची कृत्रिमप्रज्ञा एखाद्या प्रथितयश नियतकालिकातील (उदाहरणार्थ, National Geographic) छायाचित्राच्या तोडीचे, दर्जाचे सांगू त्या विषयाचे छायाचित्र सादर करू शकते. 

कृत्रिमप्रज्ञेच्या साहायाने आज हयात नसलेल्या साहित्यिकाच्या शैलीत एखादी नवीन साहित्यकृती निर्माण करता येऊ शकते. ठरावीक विषयांवर लेखन करणाऱ्या साहित्यिकाची एखाद्या अनोख्या विषयावरची साहित्यकृती कृत्रिमप्रज्ञेमार्फत निर्माण करता येईल. ठरावीक प्रकारची म्हणजे विनोदी, सामाजिक, कौटुंबिक साहित्यकृती लिहिणाऱ्या साहित्यिकाची वेगळ्या प्रकारची साहित्यकृती निर्माण करता येईल. त्या त्या साहित्यिकांनी स्वतःहून हे प्रयोग किंवा प्रयत्न केले असते तर ज्या साहित्यकृती निर्माण झाल्या असत्या कदाचित त्याहून जास्त ‘अस्सल’ साहित्यकृती कृत्रिमप्रज्ञेच्या सहाय्याने निर्माण करता येतील. ह्या सर्व शक्यता एखाद्या वाचकापुढे, कलेच्या आस्वादकापुढे अनोखी दालने उघडतात. एरवी जो अनुभव घेणे जवळपास अशक्य होते, असा अनुभव त्याला देतात. 

अर्थात, त्यामुळे खरे-खोटे, अस्सल-नक्कल यात फरक करणे अवघड होईल. बौद्धिक संपदा अधिकारांचाही प्रश्न निर्माण होईल. हक्क, अधिकार, नैतिकता, नीतिमूल्ये ह्या मानवी कल्पना आहेत. म्हणून त्यांना मानवबाह्य अस्तित्व नाही. त्यामुळे कृत्रिमप्रज्ञेमुळे ह्यांवर आधारित, ह्यांच्याशी संबंधित ज्या समस्या निर्माण होतील त्यावर मानवालाच तोडगे काढावे लागतील. 

संपूर्ण नवीन साहित्यकृती, कलाकृती निर्माण करणे हा कृत्रिमप्रज्ञेच्या सर्जनशीलतेचा निखळ आनंदासाठी केलेला वापर झाला. याचबरोबर सांगितलेल्या लक्षणांच्या आधारे, आणि गरज वाटल्यास नेमके प्रश्न विचारून न सांगितलेली लक्षणे माहीत करून घेऊन, लक्षणे-रोग यांच्या जोड्यांच्या शक्याशक्यतांच्या पलिकडे जाऊन सर्जनशीलतेच्या आधारे वेगळे, जास्त अचूक रोगनिदान करता येऊ शकेल. हा थेट जीवनमरणासाठी केलेला वापर झाला. 

गुन्हे करण्यासाठी जशी ही कृत्रिमप्रज्ञा वापरली जाईल तशीच गुन्ह्यांची उकल करण्यासाठीही ती उपयोगी पडेल. 

कृत्रिमप्रज्ञेच्या मानवाला धोकादायक ठरू शकणाऱ्या अन्य पैलूंवर नियंत्रणे प्रस्थापित केली तरी सर्जनशीलता ह्या पैलूवर कमीतकमी बंधने, नियंत्रणे असावीत. ह्या सर्जनशीलतेच्याच आधारे कृत्रिमप्रज्ञा तिच्यावरील नियंत्रणांना झुकांडी देण्याची एक अंधुक शक्यता आहे. परंतु कृत्रिमप्रज्ञेचा पुरेपूर वापर, फायदा घेण्यासाठी तेवढी जोखीम पत्करायला हरकत नाही.

अभिप्राय 4

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.