कृत्रिम बुद्धिमत्ता आणि धोरणात्मक आव्हाने

कृत्रिम बुद्धिमत्ता म्हटले की आजही एका पिढीला डोळ्यांसमोर येते ते टर्मिनेटर चित्रपटातले रोबोट्सचे दृश्य! स्वतःच्या अफाट ताकदीची जाणीव झाल्यानंतर मानवजातीचा संहार करायला निघालेला स्कायनेट आणि त्याने बनवलेले टर्मिनेटर हे आपल्या नेणिवेचा आणि संस्कृतीचा अविभाज्य भागच बनलेत जणू! भविष्यात कधीतरी वैज्ञानिक प्रगतीच्या एका टप्प्यावर संगणकांमध्ये स्वतंत्रपणे विचार करण्याची क्षमता विकसित होईल, ‘स्व’ची जाणीव झालेले यंत्रमानव निर्माण होतील, आणि ते मानवाकडे कसे पाहतील या मूळ कल्पनेचा आधार घेऊन अनेक कल्पित विज्ञानकथा-कादंबऱ्या जगभरात लिहिल्या गेल्या, असंख्य नाटके-चित्रपट बनवले गेले. अगदी डॉ. जयंत नारळीकरांसारख्या खऱ्याखुऱ्या आयुष्यात संशोधक असणाऱ्या, कल्पित विज्ञानकथा लिहिणाऱ्या लेखकालाही ‘वामन परत न आला’ या पुस्तकात ही कल्पना घेऊन कथा रचावी वाटली. अश्याप्रकारे स्वंत्रतपणे विचार करू शकणारी आणि मानवाइतकी किंबहुना मानवाहून अधिक बौद्धिक क्षमतेची संगणकप्रणाली आजच्या घडीला अस्तित्वात नसली तरीही ती जर अस्तित्वात आली तर तिला गणिती तर्काच्या आधारे बंद कशी पाडायची किंवा तिची उद्दिष्ट्ये माणसाच्या उद्दिष्टांशी विसंगत असता कामा नयेत यासाठी कोणता गणिती तर्क तिच्या विकसनात वापरायचा या दिशेने संशोधन सुरू आहे. अ‍ॅलन ट्युरिंगच्या नावाने चालवली जाणारी इंग्लंडमधील संस्था या प्रश्नांची उत्तरे शोधणाऱ्याला शिष्यवृत्ती देऊ करते आहे. मात्र अशा प्रकारची संगणकप्रणाली प्रत्यक्षात कधी अस्तित्वात येऊ शकेल की नाही यावरच संशोधकांमध्ये मतमतांतरे आहेत. कॉन्शियसनेस म्हणजे चेतना किंवा जाणीव म्हणजे तरी नेमके काय याचे उत्तरसुद्धा अद्यापही न्यूरोसायन्स वगैरे आधुनिक विज्ञानाला सापडलेले नाही. नेहमीच हातात काहीतरी सापडल्याची भावना निर्माण होते तेवढ्यात अजूनही बरेच बाकी आहे असे लक्षात येते असा हा संशोधनाचा प्रवास याघडीला सुरू आहे. मर्यादित आकलनाकरिता सुलभीकरणाची सोय म्हणून मानसशास्त्र आणि इतरांनी अनेक प्रारूपे मांडली असली तरीही ती सर्वच अपूर्ण आहेत आणि अनेक गृहीतकांवर आधारित आहेत. त्यामुळे ज्याचे आजच्या घडीला अस्तित्व नाही आणि अस्तित्वात येण्याच्या शक्यतेबाबतसुद्धा शंका आहे त्या कृत्रिम बुद्धिमत्तेबद्दल फारशी चर्चा करण्यात अर्थातच अर्थ नाही. त्यामुळे आपली चर्चा ही सध्या अस्तित्वात असलेल्या, वापरात असलेल्या आणि नजीकच्या भविष्यात येऊ घातलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेबद्दलच मर्यादित आहे हे उघड आहे. 

मात्र ही चर्चा तशी न राहता ती बहुतांशी करून कपोलकल्पित ‘साधारण कृत्रिमप्रज्ञे’भोवतीच घुटमळत रहावी यात काही मंडळींचे, संस्थांचे आणि कंपन्यांचे हित दडलेले आहे आणि ते हित जपण्यासाठी अशी मंडळी, संस्था आणि कंपन्या या ना त्या प्रकारे प्रयत्नशील असतात. वास्तवातील समस्यांवर चर्चा करायची झाली तर त्यांचे आर्थिक-सामाजिक-राजकीय हितसंबंध धोक्यात येतील याची त्यांना भीती वाटते. याचा परिणाम म्हणून कृत्रिम बुद्धिमत्ता आणि त्यातून उद्भवणारी धोरणात्मक आव्हाने या संबंधित होणारे बहुतेक संशोधन आणि चर्चा वास्तवापासून दूर जाणाऱ्याच कशा असतील यासाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हे सगळे प्रयत्न होतात. २२ मार्च २०२३ ला ॲलॉन मस्क आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातील तज्ज्ञांनी लिहिलेले खुले पत्र हे अशाच एका प्रयत्नाचे उदाहरण म्हणून पहायला हवे. कारण सदर पत्रात भविष्यात मानवाला पर्याय ठरू शकतील आणि मानवाहून अधिक बुद्धिमान असतील अशा कृत्रिम बुद्धिमत्तेवर आक्षेप नोंदवण्यावरच भर आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या तंत्रज्ञानामुळे घडत असलेले बदल आणि त्यांचा सामाजिक-आर्थिक-राजकीय परिणाम मात्र सोयीस्करपणे दुर्लक्षिला आहे. हा सत्तासंघर्ष दुर्लक्षून यावर केलेली कोणतीही चर्चा व्यर्थ असेल म्हणूनच नमनाला घडाभर तेल ओतण्याचा हा प्रपंच केला. कारण कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आनुषंगिक धोरणात्मक आव्हाने यांची ओळख मराठी भाषिक वाचकांना करून देणे तसेच विषयाशी संबंधित काही दर्जेदार माहितीस्रोत सहप्रचीत करणे हा या लेखाच्या निमित्ताने केलेला अल्पसा प्रयत्न होय.

कृत्रिम बुद्धिमत्तेमधील सध्या उठून दिसणारी प्रगती ही काही इतर पूरक तंत्रज्ञानाचा विकास आणि संलग्न सामाजिक-राजकीय-आर्थिक वास्तवापासून अलिप्त नाही. यासाठी दोन महत्त्वाचे घटक कारणीभूत ठरवता येतील. लहान आकाराच्या नॅनो चिप्स (सूक्ष्म चकत्या) ज्यांवर अधिकाधिक ट्रान्सिस्टर्स बसवता येतील आणि त्यामुळे विकसित झालेले शक्तिशाली प्रोसेसर्स, विशेषतः ग्राफिक्स प्रोसेसर्सचा अलिकडच्या काळात झपाट्याने विकास झाला. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रगतीला याचा हातभार लागला आहे. उत्तमोत्तम हार्डवेअर उपलब्ध झाल्यामुळेच अधिक किचकट आणि प्रचंड गणिती क्षमता लागणारी यंत्रप्रशिक्षण प्रारूपे (machine learning models) प्रशिक्षित करता येणे शक्य झाले आहे. हे सगळे शक्य होण्यासाठी आवश्यक हार्डवेअर बनवणाऱ्या कंपन्या, त्यासाठी लागणाऱ्या सिलिकॉन चकत्या आणि इतर भाग, त्यांसाठी लागणारे मौल्यवान, दुर्मिळ धातू आणि इतर नैसर्गिक संसाधने आणि त्यामागचे आर्थिक गणित; तसेच यांमधील दुवा म्हणजे खाणींपासून ते हार्डवेअर कंपन्यांमध्ये काम करणारे कामगार आणि इतर नोकरदारवर्ग हे सगळे जुळून येणे गरजेचे होते. जागतिकीकरणाच्या युगात चिप्स निर्माण करणारे उद्योग युरोप-अमेरिकेबाहेर चीन आणि तैवानमध्ये असल्याने आंतरराष्ट्रीय राजकारणावर पडणारा त्याचा प्रभाव वगैरेचीही दखल कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आनुषंगिक धोरणात्मक आव्हाने या विषयाची चर्चा करतांना घ्यावी लागते. दुसरा महत्त्वाचा घटक जो कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रगतीला कारणीभूत ठरला तो म्हणजे डेटा (विदा हा त्याच्या संस्कृताळलेल्या मराठीत भाषांतराचा प्रयत्न)! ही विदा गोळा करण्याच्या आणि त्यावर प्रक्रिया करण्याच्या पद्धती झपाट्याने बदलत गेल्याने तंत्रज्ञान ही मजल गाठू शकले. ही प्रक्रिया समजून घेण्यासाठी वापरकर्त्याला फुकटात प्लॅटफॉर्म्स वापरायला देऊन बदल्यात विदा गोळा करणाऱ्या गूगल, फेसबुक वगैरे कंपन्यांचा उदय कसा झाला हे पहावे लागेल. यासंबंधी निक श्रींसेक ह्या कॅनेडियन लेखकाचे ‘प्लॅटफॉर्म कॅपिटलिझम’ आणि शोशाना झुबोफ या अमेरिकी लेखिकेचे ‘दि एज ऑफ सर्व्हेलन्स कॅपिटलिझम’ ही दोन पुस्तके वाचनीय आहेत. तर https://anatomyof.ai या संकेतस्थळावर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केलेल्या उत्पादनासाठी आवश्यक असणारी संसाधने, श्रम आणि विदा नेमके कुठून आणि कसे येतात, त्यामागचे अर्थकारण-राजकारण काय असते याचे उत्तम विश्लेषण केले आहे. उपलब्ध संशोधन हे दाखवते की विदा गोळा करून त्यावर प्रक्रिया करण्याचे किचकट आणि वेळखाऊ काम करणाऱ्या कामगारांना तुलनेने खूप कमी मोबदला मिळतो आणि कंपन्या त्याचा वापर करून बक्कळ नफा कमवतात. बरेचदा कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणून बाजारात खपवली जाणारी उत्पादने ही प्रत्यक्षात पडद्याआड अशाच तुटपुंज्या मोबदल्याच्या बदल्यात काम करणाऱ्या लोकांकडून चालवली जातात. ॲमेझॉन मेकॅनिकल टर्क्स, टास्क-रॅबिट यांसारख्या क्लाऊड वर्क प्लॅटफॉर्म्समुळे हे शक्य होते. सगळा कारभार ऑनलाईन असल्यामुळे या प्लॅटफॉर्म्सवर कोणाचेही नियंत्रण नाही. किमान वेतन अर्थातच दिले जात नाही, दाद मागायची सोय नाही. अशा अनेक समस्या या ‘विदा कामगारांना’ भेडसावत असतात. 

https://oecd.ai या संकेतस्थळावर जगभरातल्या विविध देशांमध्ये त्या त्या देशांच्या सरकारांनी कृत्रिम बुद्धिमत्तेसंबंधित कोणकोणत्या योजना, कायदे, धोरणे, चर्चा वगैरे केल्या आहेत याचे एकत्रित संकलन केले आहे. तसेच या देशांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेसंबंधित संशोधन आणि तंत्रज्ञान विकसनात होत असलेली गुंतवणूक, संशोधनातून प्रकाशित होणारे निबंध, पेटंट्स, नव्या स्टार्टअप कंपन्या वगैरे कोणत्या दिशेने जात आहेत याचे कलसुद्धा दिले आहेत. भारताच्या बाबतीत बोलायचे झाले तर ऑगस्ट २०१७ मध्ये वाणिज्य मंत्रालयाने कृत्रिम बुद्धिमत्तेवर धोरण बनविण्यासाठी मार्गदर्शन करण्याहेतूने एका टास्क फोर्सची स्थापना केली. मार्च २०१८ मध्ये या टास्क फोर्सने आपला अहवाल सादर केला. जून २०१८ मध्ये नीति-आयोगाने कृत्रिम बुद्धिमत्तेसंबंधित राष्ट्रीय धोरण दिशा ठरविण्याच्या हेतूने #AIForALL नावाने एक चर्चा करणारा प्रबंध प्रकाशित केला. ऑगस्ट २०१८ मध्ये प्रधानमंत्र्यांच्या मुख्य वैज्ञानिक सल्लागारांच्या नियंत्रणाखाली प्रधानमंत्री विज्ञान, तंत्रज्ञान आणि संशोधन सल्लागार समितीची स्थापना केली गेली. ऑक्टोबर २०१८ ते जानेवारी २०१९ दरम्यान झालेल्या या समितीच्या चार बैठकांमधून एकूण नऊ तंत्रज्ञान कार्यमंडळांची स्थापना केली. त्यांपैकी एक कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी होते. फेब्रुवारी २०१८ मध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन मंत्रालयाने गठित केलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेसंदर्भातल्या चार समित्यांनी जुलै २०१९ ला त्यांचे अहवाल सादर केले. नीति-आयोगाने ‘रिस्पॉन्सिबल एआय’ या विषयावर २०२१ मध्ये दोन प्रबंध प्रकाशित केले. डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन्सनी २०२० साली कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मानकांच्या प्रमाणीकरणावर अहवाल सादर केला आहे. पुट्टस्वामी विरुद्ध केंद्रसरकार या गाजलेल्या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने खाजगी विदेच्या गोपनीयतेचा अधिकार मूलभूत अधिकार असल्याचा निर्वाळा दिल्यानंतर, त्यासंबंधी कायदा तयार करण्यासाठी नि.न्या. श्रीकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली. त्या समितीने २०१८ सालीच अहवाल दिला असला तरीही अद्याप त्यासंबंधित प्रस्ताव संसदेत प्रलंबित आहे. त्या प्रस्तावातही अनेक त्रुटी आहेत. 

भारताच्या एकंदरीत धोरणदृष्टीकडे पाहता कृत्रिम बुद्धिमत्तेसंबंधित कायदे करण्यास भारतसरकार टाळाटाळ करत आहे. कारण कायद्यामुळे तंत्रज्ञानाच्या विकासात आणि प्रसारात अडचणी येतील अशीच त्यांची समजूत दिसते. मात्र त्यांची ही समजूत चुकीच्या गृहीतकांवर आधारित आहे, कारण कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या अमेरिकेत आणि युरोपियन देशांमधली धोरणे कृत्रिम बुद्धिमत्तेचे योग्य नियमन व्हावे यादृष्टीने प्रयत्नशील असलेली आपल्याला दिसतात. तसेच युरोपियन युनियनच्या विदा संरक्षण कायद्यामुळे उलट ‘फेडरेट लर्निंग’ किंवा ‘स्मॉल डेटा लर्निंग’सारखे नवीन तंत्रज्ञान विकसित होऊ शकले, ज्यामुळे विदा इतरत्र न नेता जिथे गोळा केला जातो तिथेच त्यावर प्रक्रिया करून त्यातून मिळालेले मर्मज्ञान वापरणे शक्य होत आहे. तसेच भारतामध्ये सर्व दुखण्यांवरचा रामबाण इलाज म्हणून कृत्रिम बुद्धिमत्तेकडे पाहिले जात आहे. उदाहरणार्थ, ज्या दुर्गम ठिकाणी दवाखाने नाहीत, पुरेसे तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नाहीत त्या ठिकाणी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्यानं वैद्यकीय सुविधा पुरवता येतील असा विचार धोरणांविषयीच्या सरकारच्या अंतर्गत चर्चांमधून दिसतो. म्हणजेच पायाभूत सोयीसुविधांना पर्याय म्हणून कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करता येईल अशी चुकीची समजूत धोरणकर्त्यांची झालेली दिसते. 

या सगळ्याचा परिपाक म्हणून कृत्रिम बुद्धिमत्तेचा अनिर्बंध आणि बेजबाबदार वापर सर्वत्र सुरू आहे. पंचकुला नगरपालिकेने त्यांच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना हातात घालायला एक प्रकारचे चित्रण करणारे उपकरण दिले होते. याच्यामार्फत ते कितीवेळ काम करतात वगैरे बाबींवर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने देखरेख ठेवली जाणार होती, ज्यामुळे म्हणे त्यांची कार्यक्षमता वाढवायला मदत होणार होती. हे उपकरण घरी गेल्यानंतर किंवा खाजगी वेळेतही काढून ठेवायला परवानगी नव्हती. त्या उपकरणाद्वारे आजूबाजूचा आवाजसुद्धा ध्वनिमुद्रित होणार होता. नगरपालिकांमध्ये आजही सफाई कामगार हे बहुतांशी पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य मानलेल्या अनुसूचित जाती-जमातींमधून भरती होतात. हे सामाजिक वास्तव पाहता या प्रकरणाचे गांभीर्य आपल्या लक्षात येईल. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणून बाजारात असलेली अनेक उत्पादने चक्क फसवी आहेत. https://aisnakeoil.substack.com या संकेतस्थळावर याविषयी इत्थंभूत माहिती मिळेल. 

याव्यतिरिक्त कृत्रिम बुद्धिमत्ता ज्या यंत्रप्रशिक्षणाच्या गणिती प्रारूपांवर आधारित आहे आणि ती ज्या पद्धतीने ज्या विदेच्या मदतीने प्रशिक्षित केली जातात त्यातूनही अनेक धोरणात्मक समस्या निर्माण होतात. उदाहरणार्थ, “वह एक डॉक्टर है” आणि “वह एक नर्स है” या वाक्यांचे गूगल अनुवादाद्वारे केलेले भाषांतर अनुक्रमे “He is a doctor” आणि “She is a nurse ” असेच होते. स्त्रीसुद्धा डॉक्टर असू शकते आणि पुरुषसुद्धा नर्सचे काम करू शकतो हे त्या अल्गोरिदमला समजत नाही. हे अल्गोरिदम नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग (नैसर्गिक भाषा प्रक्रिया) या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या एका प्रकारात मोडते. या दोषाला पूर्वग्रह किंवा बायस असे म्हणतात. कृत्रिम बुद्धिमत्ता ह्या विदेमध्ये पडलेले लिंगभेदी सामाजिक वास्तवाचे  प्रतिबिंब यंत्रप्रशिक्षणातून शिकून घेते, म्हणून हा प्रकार घडतो. समाजात असलेले इतर भेदही म्हणजे जाती, धर्म, वंश, वर्ण वगैरेसुद्धा कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये दिसून येतात. उदाहरणार्थ, कृष्णवर्णीय स्त्रियांचे चेहरे ओळखताना कॉम्प्युटर व्हिजन किंवा फेस डिटेक्शन नावाचा कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रकार बरेचदा चुकतो. यावर गणितीय प्रारूपांमध्ये सुधारणा करून मात करण्याचा प्रयत्न केला जात आहे, पण त्याला अनेक मर्यादा आहेत. दुसरी समस्या येते की कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने घेतलेला एखादा निर्णय चुकला तर त्याची जबाबदारी नेमकी कोणाची? कारण वरती सांगितल्याप्रमाणे बरेचदा विदा गोळा करणारे कामगार हे अदृश्य असतात, त्यांची नेमकी ओळख माहीत नसते. प्रारूपे विकसित करणारे आणि त्याला प्रमाणित करणारे सर्वच शक्यतांचा विचार करू शकत नाहीत. वापरणारे ते योग्य पद्धतीने वापरतीलच याचीही खात्री देता येत नाही. कारण सध्याची एकूणच प्रक्रिया कमालीची अपारदर्शी आहे. एवढेच काय अधिकाधिक गुंतागुंतीचे अल्गोरिदम्स विशेषतः डीप न्यूरल नेटवर्क्स एखाद्या निर्णयाप्रत नेमके कसे पोहचतात हे सांगणे कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील तज्ज्ञांनाही प्रचंड अवघड आहे, किंबहुना अशक्य आहे. कमी गुंतागुंतीची प्रारूपे अचूक निष्कर्षाप्रत येतीलच याची खात्री नसते. त्यामुळे दिवसेंदिवस गुंता वाढतोच आहे. तसेच एखाद्या अल्गोरिदमला फसवून त्याच्याकडून मूळ उद्देशांशी विसंगत कृती करवून घेतली जाण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. या सगळ्या समस्यांना वाजवी (फेअर), जबाबदार (अकाऊंटेबल), स्पष्टीकरणाची क्षमता असलेल्या (एक्स्प्लेनेबल) आणि मजबूत (रोबस्ट) समस्या म्हणून ओळखले जाते.

एखाद्या तंत्रज्ञानाला अपरिहार्य समजून त्याच्या वापरावर आणि प्रसारावर नियंत्रण शक्य नाही असे समजणे, किंवा जे जे होईल ते ते समाजाच्या भल्यासाठीच होत आहे हा विचार तर्कहीन, दैववादी-नियतीवादी म्हणूनच मूलतः चुकीचा आहे. समाजाच्या अधिकाधिक फायद्यासाठी, तंत्रज्ञानाच्या विकासात आणि वापरात, धोरणांच्या रूपाने मानवी हस्तक्षेप शक्य आहे हे जाणून घेऊन या नव्या तंत्रज्ञानाला आपण सामोरे गेले पाहिजे.

लेखक आयआयटी बॉम्बे इथं कृत्रिम बुद्धिमत्ता आणि धोरणे या विषयात पीएचडी करत आहेत, तसेच सामरिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय विषयांचे अभ्यासक आहेत. 

अभिप्राय 1

  • श्री. माळीयांचा कृत्रिम बुध्दीमत्ता आणि धोरणात्मक आव्हाने हा लेख कृत्रिम बुध्दीमत्तेचा मानवी जीवनावर आणि समाजावर होऊ शकणाय्रा परिणामांची यथायोग्य जाणीव करून देणारा आहे. जगात होत असलेल्या या संबंधित चर्चेबरोबरच आपल्या विद्यमान सरकारने या संबंधात घेतलेल्या दखलीसंबंधात सविस्तर उहापोह केलेला असल्याने आपणास काहीसा दिलासाही मिळाला आहे. हा विषय सर्वसामान्य माणसाच्या आकलनापलिकचा असल्याने आपण सतर्क होण्यापलीकडे काही करू शकत नाही. आपण स्मार्ट फोन आणि संगणकाचा वापर टाळू तर शकत नाही; कारण या गोष्टी आज आपल्या जीवनशैलीचा भाग झाल्या आहेत. कृत्रिम प्रज्ञेचे संशोधन टाळणे शक्य नसले, तरी वैज्ञानिकांनी या संबंधात काळजी घेऊन कृत्रिम बुध्दीमत्तेचा मानवी जीवनावर विपरित परिणाम होणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच समाजकंटकांकडून याचा दुरुपयोग होणार नाही याची काळजी घेणे अनिवार्य आहे. सर्व राष्ट्रांनी या तंत्रज्ञानाचा उपयोग मानवी संहारासाठी करणे टाळण्याची नैतिकता अनुसरणे आवश्यक आहे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.