कृत्रिम बुद्धिमत्ता आणि माणूस

माझ्यासारख्या १९७० च्या दशकात जन्मलेल्या अनेक लोकांसाठी आजच्या तंत्रज्ञानाची झेप भंजाळून टाकणारी आहे. १९८५ च्या काळात दुसऱ्या गावातल्या नातेवाईकांना फोन करण्यासाठी सार्वजनिक टेलिफोन कार्यालयात रांगेत एक-दोन तास उभे राहून वाट बघावी लागायची. आता आपण आपल्या हातातल्या वैयक्तिक फोनवरून जगात कुठेही क्षणात फोन लावू शकतो आणि त्या व्यक्तीला प्रत्यक्ष बघू शकतो, बोलू शकतो, तसेच एकाच वेळी अनेक लोक एकत्र गप्पा मारू शकतात. 

हे फक्त एक क्षेत्र आहे. आपल्या जगण्यातल्या प्रत्येकच क्षेत्रात कल्पनातीत बदल झाले आहेत. आमच्या पिढीचेच लोक काय पण आजच्या पिढीचे लोकही या बदलाच्या प्रपाताला सामोरे जाताना गडबडून जात आहेत. 

याची सुरुवात ऑटोमेशनने झाली. आम्हाला सी.ए. च्या परीक्षेत कॅल्क्युलेटर वापरायला परवानगी नव्हती. मोठमोठ्या आकड्यांचा ताळेबंद करतानाची गणिते बेरजा करत सोडवताना दमछाक व्हायची. नंतर साधे कॅल्क्युलेटर वापरायला परवानगी मिळाली आणि बेरजेचा बाऊ वाटेनासा झाला.

तीच गोष्ट आर्टिकलशिपमध्ये काम करतानाची होती. आता अविश्वसनीय वाटते, पण त्या काळात आम्ही दुसऱ्या कार्यालयांमध्ये ऑडिटच्या कामाला जात असू तेव्हा त्या कार्यालयातील लोकांकडे कॅल्क्युलेटर्स मागावे लागत. मग २-३ जणांच्या चमूसाठी एखादा कॅल्क्युलेटर मिळे आणि तो आळीपाळीने वापरावा लागे.

त्या काळात असेही काहीजण आमच्यात होते जे वेगाने अचूक बेरजा करत. त्यांचे आम्हाला खूप कौतुक वाटे. आता लक्षात येते की ते एक कौशल्य होते. त्या काळात त्याची गरज होती. आता अश्या बेरजा, आकडेमोड स्वतः करणे हा वेळेचा अपव्यय मानला जाईल. 

ऑटोमेशनमध्ये विशिष्ट गोष्टी करण्यासाठी यंत्रे असतात. त्यात भरलेल्या माहितीनुसार ती कामे करतात. त्या दिलेल्या माहितीच्या पलिकडे ती जाऊ शकत नाहीत किंवा निर्णय घेऊ शकत नाहीत. 

आता त्याच्या पुढची खूप मोठी झेप घेणारी पायरी आली आहे. आता अशी यंत्रे आहेत जी स्वतः निर्णय घेऊ शकतात. त्यांच्यामध्ये जेवढी अचूक माहिती भरलेली असेल तेवढे अचूक निर्णय ती यंत्रे घेतात.

आपले आता रोजचे उदाहरण आहे ते म्हणजे जीपीएस प्रणाली. पूर्वी अनोळखी गावात गाडीने गेल्यावर प्रत्येक चौकात वळताना तिथल्या लोकांना रस्ता विचारावा लागे. आता गाडीत जीपीएस असला की आपण अगदी व्यवस्थित पाहिजे त्या ठिकाणी पोचतो. जीपीएसने सुचवलेला एखादा रस्ता आपण घेतला नाही तर आपण घेतलेल्या रस्त्यावरून जीपीएस नवा मार्ग शोधून काढते आणि पुन्हा आपल्याला रस्ता सुचवत राहते. म्हणजे नवीन वेगळा रस्ता सुचवण्याचा निर्णय ते स्वतः घेते आणि पर्यायी रस्ता शोधून काढते.

अलेक्सा, सिरी या अशाच प्रकारच्या मदतनीस प्रणाली आहेत. ह्या संवादी मदतनीस त्यांना विचारलेल्या प्रश्नांना योग्य ती उत्तरे आणि माहिती संवादातून देत असतात. विचारलेला प्रश्न नीट समजून घेऊन त्याच्या जास्तीतजास्त अचूक उत्तरापर्यंत जायचा प्रयत्न या प्रणाली करतात. 

ही जी उदाहरणे आहेत ती अगदी घरगुती, साधी आपल्या रोजच्या जगण्याचा भाग असणारी. पण कृत्रिम बुद्धिमत्ता अशा लहान-सहान कामांसाठी नसून तिचा व्याप सर्वसामान्यांच्या आकलनाच्या खूप पलिकडचा आहे. 

आजकाल ChatGPT हे एक माध्यम खूप चर्चेत आहे. गूगल हे एक सर्च इंजिन आहे जे आपण विचारतो त्या विषयाची भरपूर माहिती/पर्याय आपल्यासमोर ठेवते. पण ChatGPT याच्याही पुढे जाते. त्याला स्वत:ची बुद्धिमत्ता आहे. आपण विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर ते त्याला मिळालेल्या बुद्धिमत्तेनुसार, स्वतः तयार करून आपल्यासमोर ठेवते. आपला प्रश्न जेवढा नेमका असेल तेवढे उत्तर जास्त नेमके मिळत जाते. हा त्याचा कृत्रिम बुद्धिमत्तेचा भाग. आपण जसजसे विचारत जातो तसतसे ते जास्त समजत जाते, संदर्भ लक्षात घेत जाते आणि आपल्याला अपेक्षित अशा उत्तरांच्या अगदी जवळची उत्तरे मिळतात. अर्थात् आपण संदर्भ चुकीचे दिले असतील तर उत्तरही चुकीचे येऊ शकते; किंवा एखादा प्रश्न त्याला मिळालेल्या बुद्धिमत्तेच्या पलिकडला असेल तरी उत्तर चुकीचे असू शकते. 

नेमके काही संदर्भ दिले तर त्यावर एखादा लेखही लिहून देण्याची ChatGPT ची भाषिक आणि बौद्धिक क्षमता आहे. 

याचप्रमाणे जगातल्या अनेक क्षेत्रांवर आधारित कृत्रिम बुद्धिमत्ता असलेली वेगवेगळी साधने तयार होत आहेत. त्यांना त्यांची स्वत:ची बुद्धिमत्ता दिली जात आहे. त्यामुळे त्यांची क्षमता आपल्या आकलनाच्या खूप पलिकडे विकसित होत आहे. 

माणूस ज्या वेगाने काम करतो त्याच्यापेक्षा शेकडो-हजारो पट वेगाने ही कृत्रिम बुद्धिमत्ता असलेली यंत्रे काम करतात. त्यात काही बदल करावयाचे असतील तर ते स्वत: करण्याची क्षमता त्यांच्या निर्मात्यांनी त्यांना दिलेली असते. 

मात्र यातून काही मूलभूत प्रश्न उभे राहत आहेत. एक महत्त्वाचा म्हणजे यंत्रे अशी कामे करायला लागली तर मग माणसांना कामे कशी मिळतील? त्यांच्या वेगामुळे आणि कामातल्या कौशल्यामुळे माणसांची जागा यंत्रे घेतील आणि बेरोजगारी वाढेल. 

यावर काही जणांचे म्हणणे असे आहे की सुरुवातीला काही लोकांच्या नोकऱ्या जातील. पण नव्या यंत्रांमुळे अनेक वैविध्यपूर्ण रोजगार निर्माण होऊ शकतील. त्याचप्रमाणे साध्या सोप्या कामांमध्ये अश्या यंत्रांची मदत घेतल्यामुळे काम करणाऱ्यांची कार्यक्षमता वाढेल. त्यातूनही वेगळे रोजगार उपलब्ध होतील. 

मनुष्यप्राण्याचे सगळ्यांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे तो आपल्या भोवतालच्या परिस्थितीनुसार सतत बदलत असतो, शिकत असतो. यातूनही तो बदलेल, शिकेल आणि जास्त उत्पादक होईल. जे लोक या बदलांचा बाऊ करून थांबतील त्यांना मात्र स्वतःवर खूप काम करून या बदलांशी जोडून घ्यावेच लागेल. त्याला पर्याय नाही. 

या रोजगार असण्या-नसण्यापेक्षा वेगळा आणि पूर्ण जगाला चिंतेत पाडणारा प्रश्न म्हणजे या यंत्रांना देण्यात आलेली कृत्रिम बुद्धिमत्ता!

माणसाने स्वसंरक्षणासाठी शस्त्रे बनवली आहेत. त्याचाही विस्तार भयानक मोठा झालेला आहे. त्यातल्या यंत्रांमध्येही कृत्रिम बुद्धिमत्तेचा अर्थातच उपयोग केला जात आहे. 

माणूस हा पृथ्वीवरील सगळ्यात बुद्धिमान प्राणी आहे हे निर्विवादच आहे. त्यामुळे माणसाने जी क्षमता या यंत्रांना दिली आहे तेवढ्याच क्षमतेने ती यंत्रे काम करतील. याची दुसरी काळजी करण्यासारखी बाजू म्हणजे माणूस कितीही बुद्धिमान असला तरी तो या प्रणालींसारखा एकमेकांशी जोडलेला नाही. प्रत्येक माणसाची स्वतंत्र बुद्धिमत्ता आहे. पण या प्रणाली कामासाठी एकमेकांशी जोडलेल्या असतात. त्यामुळे काही शास्त्रज्ञांना चिंता वाटते की या सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या प्रणाली जर एका विचाराने काम करायला लागल्या तर त्यांना आवरणे माणसाच्या आवाक्याबाहेर जाऊ शकेल. 

विशेषत: संहारक शस्त्रे वापरण्याचे नियंत्रण सध्या फक्त माणसाकडेच आहे. ते या कृत्रिम बुद्धिमत्ता असलेल्या यंत्रांकडे गेले तर एका थांबवता न येणाऱ्या संहाराकडे ती आपल्याला नेऊ शकतील अशी एक रास्त चिंता आता काही शास्त्रज्ञांना वाटू लागली आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचे संशोधक असणारे काही शास्त्रज्ञ (उदा. Geoffrey Hinton) स्वत: आता याबद्दल शंका व्यक्त करत आहेत. हिन्टन म्हणतात की माणसाच्या बुद्धीला जे जमणार नाही अशा गोष्टी आता संगणक करत आहेत. ChatGPT आता जवळपास माणसाच्या मेंदूसारखेच काम करत आहे आणि आता माणूस जसा तर्क करेल त्याच पद्धतीने त्याचे तर्क करणे आहे. 

ही यंत्रे स्वत:च्या बुद्धीनुसार स्वत:ला आणखी अद्ययावत करत आहेत. त्याचबरोबर त्यांना निर्माण करणारी माणसेही त्यांच्यात बदल करत आहेत. म्हणजे ती सततच विकसित होत आहेत. त्यामुळे कधीतरी ती माणसांच्या आवरण्याच्या पलिकडे जातील का? 

दुसरा धोका म्हणजे ही यंत्रे तयार करणाऱ्या माणसांचा वेगळा काही छुपा अजेंडा असू शकतो. उदा. एका विशिष्ट देशाबद्दल, विशिष्ट जमातीबद्दल, धर्माबद्दल कलुषित मते, विचार या यंत्रांच्या बुद्धिमत्तेमध्ये टाकत राहणे. त्यानुसार त्या यंत्रांची बुद्धी कलुषित मतांची बनत जाईल. या यंत्रांचा उपयोग मग त्या देशा-धर्माविरुद्ध प्रचार करण्यासाठी केला जाऊ शकतो. ही यंत्रे कोणत्याही आधीच्या फोटोंमध्ये, कागदपत्रामध्ये बेमालूम बदल करू शकतात, खोटी माहिती खरी म्हणून पुढे पाठवू शकतात. 

हे चित्र भयावह आहेच. तरी त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता वापरायचीच नाही हा पर्याय होऊ शकत नाही. कारण एक तर ते तंत्रज्ञान बरेच पुढे गेले आहे आणि त्याचे खूप महत्त्वाचे सकारात्मक उपयोगही आहेत. 

या संशोधनामध्ये आता काही नैतिक निर्बंध घातले पाहिजेत याबद्दल चर्चा होत आहेत. यासाठी राष्ट्रांनी, कंपन्यांनी आणि उद्योगसमूहांनी एकत्र येणे आणि माणसाच्या हितासाठीचे काही नियम, निर्बंध तयार करणे आणि ते पाळण्याची जबाबदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे. थोडी आश्वासक गोष्ट अशी की यासाठी आधीच काम सुरू झालेले आहे. 

प्रत्येक सजीवाप्रमाणे माणसाचीसुद्धा नैसर्गिक ऊर्मी स्वत:चा वंश वाढता आणि सुरक्षित ठेवणे ही आहेच. ही नैसर्गिक ऊर्मी माणसाला याही संकटांचा विचार करायला लावेल. 

माणसाचा आणि एकंदर जगाचा प्रवास शांततेकडे, समृद्ध आणि परिपूर्ण जगण्याकडे कसा होईल हे बघण्याचे काम आणि जबाबदारी आता या सुबुद्ध माणसाच्याच हातात आहे. 

अभिप्राय 2

  • रंजनाबेटी, तूं या लेखात साधक बाधक विचार करून चांगले मुद्दे मांडले आहेस. पण माणूस हा अत्यंत स्वार्थी प्राणी आहे. अटोमिक एनर्जीचा शोध लागल्यावर त्या ज्ञानाचा विधायक कामासाठी उपयोग न करता अत्यंत विध्वंसक आणूबांब बनवण्यासाठी वापर केला. तूं म्हटल्या प्रमाणे आता जगातील सर्व शास्त्रज्ञांनी एकत्र येऊन कृत्रिम बुध्दिमत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी काम करून माणसाचा आणि एकंदर जगाचा प्रवास शांततेने परिपूर्ण जगण्यासाठी कसा होईल हे बघण्याचे काम करणे आवश्यक आहे. पण या स्वार्थी जगात त्यांच्यातिल एखादा दुष्टबुध्दी शास्त्रज्ञ वेगळा विचार करून संपूर्ण जगाला धोक्यात आणू शकतो, हे नाकारति येणार नाही. आपण आज एकविसाव्या शतकातील विज्ञान युगात जगत आहोत. पण आजही रशिया, चीन सारखी विस्तारवादी राष्ट्र मध्ययुगीन मानसिकता दाखवून युक्रेनवर आणि आपल्या देशाच्या सीमेवर आक्रमण करण्याचे मनसुबे रचत आहेतच की.

  • आवडला लेख. खूप महत्वाचे मुद्दे छान माडले आहेत

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.