कृत्रिम बुद्धिमत्तेचा आईन्स्टाईन

आज ताऱ्यांचे आणि तारकाविश्वांचे वर्गीकरण करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता वापरली जाते आहे. जनुकांमधील DNA च्या घटकक्रमानुसार कुठल्या आकाराची प्रथिने बनतील हे कृत्रिम बुद्धिमत्ता शोधते आहे. जगभरातील हवामानखात्यांच्या उपकरणांकडून, उपग्रहांकडून मिळणाऱ्या प्रचंड माहितीच्या आधारे हवामानाचा अंदाज बांधण्याचे काम कृत्रिम बुद्धिमत्ता करते आहे. ड्रोनने, उपग्रहांनी घेतलेल्या हजारो छायाचित्रांच्या आधारे स्थलांतर करणारे पक्षी, प्राणी यांच्या गणनेचे काम कृत्रिम बुद्धिमत्ता करते आहे. आकाशगंगेतील परग्रहांचे वर्गीकरण कृत्रिम बुद्धिमत्ता करते आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आणि त्याची क्षमता दिवसागणिक वाढते आहे. उद्याचा डार्विन किंवा आईन्स्टाईन कृत्रिम बुद्धिमत्तेचा असेल का? विज्ञानाच्या क्षेत्रातील अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे कृत्रिम बुद्धिमत्ता देईल का? या प्रश्नांचा उहापोह या लेखात केला आहे.

आईन्स्टाईन कसा बनतो?

उद्याचा डार्विन किंवा आईनस्टाईन कृत्रिम बुद्धिमत्ता बनेल का या प्रश्नाचे उत्तर शोधण्याआधी डार्विन आणि आईन्स्टाईन कसे बनतात, शास्त्रज्ञ शोध कसा लावतात हे समजून घेणे महत्त्वाचे ठरते. 

शोध लागण्याच्या प्रक्रियेची सुरुवात कुतूहलातून होते. कुतूहल हा उपजत मानवी गुणधर्म आहे. पण फक्त मानवप्राणीच कुतूहल दाखवतो असे नाही. कपींच्या, माकडांच्या प्रजाती, इतरही काही सस्तन प्राणी, उंदरांच्या, पक्षांच्या प्रजाती ठरावीक प्रमाणात कुतूहल दाखवतात. याचा अर्थ कुतूहलाची पाळेमुळे उत्क्रांतीच्या प्रवासात खोलवर असावी हे लक्षात येते. कुतूहल आणि त्यातून निर्माण होणारे विशिष्ट वर्तन हे प्राण्यांना बदलत्या परिस्थितीत टिकून राहण्यासाठी किंवा बदलत्या परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या मदत करत असावे. अर्थातच मानवप्राण्याचे कुतूहल हे इतर प्राण्यांच्या तुलनेत वेगळ्याच पातळीवर असते. विश्वाची उत्पत्ती कशी झाली किंवा जगण्याचा अर्थ काय असे प्रश्न कदाचित हुशार चिंपांझींनाही पडत नसावेत. हुशार माणसांना मात्र असे प्रश्न पडतात. अशाच अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याच्या प्रयत्नात धर्मचिंतन, तत्त्वज्ञान आणि विज्ञान जन्माला आले. नवे शोध लागण्याची बीजे कुतूहलापोटी जन्माला आलेल्या एखाद्या प्रश्नात सापडतात.

शोध लागण्यासाठी निरीक्षणे महत्त्वाची ठरतात. पृथ्वी गोल आहे हा अंदाजे अडीच हजार वर्षांपूर्वी माणसाने लावलेला पहिला महत्त्वाचा शोध. ग्रीक तत्त्वज्ञांनी पृथ्वी गोल आहे हा युक्तिवाद मांडण्यासाठी पुढील निरीक्षणांची मदत घेतली:

१. जेव्हा दूरवरून, क्षितीजाच्या पलीकडून एखादी बोट येताना दिसते तेव्हा सर्वप्रथम बोटीच्या शिडाच्या वरील भाग, शिडाच्या खांबाला लावलेला झेंडा इत्यादी दिसतात आणि त्यानंतर बोटीचा खालचा भाग दिसतो.

२. चंद्रग्रहणाच्या वेळी पृथ्वीची चंद्रावर पडणारी सावली नेहमी गोलाकार दिसते. 

३. उत्तर आणि दक्षिणेकडील भागातून निरीक्षण केल्यास आकाशातील ताऱ्यांचे स्थान आणि त्यांचे भ्रमण वेगळे दिसते. 

या निरीक्षणांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करताना पृथ्वी गोलाकार असावी या निष्कर्षापाशी ग्रीक तत्त्वज्ञ पोचले. डार्विनने १८३१ ते १८३६ या काळात बीगल नावाच्या जहाजातून जगप्रवास केला होता. या प्रवासात त्याने विविध बेटांवरील प्राणी, पक्षी, वनस्पती यांची निरीक्षणे केली. विविध बेटांवरील नैसर्गिक परिस्थिती वेगळी होती. या विविधतेचा प्रजातींवर काय परिणाम दिसतो हे डार्विनला त्याच्या निरीक्षणांतून लक्षात आले. भिन्न प्रजातींमधील समान दुवा आणि विशिष्ट परिस्थितीशी जुळवून घेणारे गुणधर्म डार्विनला दिसले. या सगळ्या निरीक्षणांच्या आधारे नंतर डार्विन उत्क्रांतीच्या सिद्धांतापाशी पोचला. आईन्स्टाईनच्या सापेक्षतावादाच्या सिद्धांताची पाळेमुळेदेखील एका निरीक्षणात सापडतात. ते निरीक्षण म्हणजे प्रकाशाचा वेग कायम स्थिर असतो. इतर कुठल्याही वस्तूसापेक्ष प्रकाशाचा वेग बदलत नाही. या निरीक्षणाचा अर्थ लावण्याची धडपड करताना आईन्स्टाईन काळ सापेक्ष असतो या निष्कर्षापाशी पोचला आणि त्यातून पुढे त्याने सापेक्षतावादाचा सिद्धांत मांडला. विज्ञानात निरीक्षणांना मध्यवर्ती स्थान आहे. 

निरीक्षणे गोळा केल्यानंतर पुढील पाऊल म्हणजे या निरीक्षणांचे स्पष्टीकरण देऊ शकेल असा सिद्धांत मांडणे. सिद्धांताने दिलेले उत्तर हे प्रत्यक्ष निरीक्षणांबरोबर जितके अचूक जुळेल तितका त्या सिद्धांतावरील शास्त्रज्ञांचा आणि लोकांचा विश्वास वाढतो. शिवाय नवा सिद्धांत हा भविष्यात सापडणारी निरीक्षणे कशी असतील याचेदेखील भाकीत करतो. जर हे भाकीत खरे ठरले तर सिद्धांत वास्तववादी म्हणून स्वीकारला जातो. आईन्स्टाईनच्या सापेक्षतावादाच्या सिद्धांताने सूर्यमालेतील ग्रहांच्या कक्षा कशा असतील याचे उत्तर दिले होते. सापेक्षतावादाचे उत्तर आणि प्रत्यक्ष निरीक्षणातून मिळालेले उत्तर एकमेकांबरोबर हुबेहूब जुळून आले. गुरुत्वाकर्षणाची क्रिया ही अवकाशकाळातील वक्रतेमुळे होते असे आईन्स्टाईनने मांडले होते. ताऱ्याजवळ निर्माण झालेल्या वक्रतेमुळे ताऱ्याजवळून प्रवास करणाऱ्या प्रकाशकिरणांचा मार्ग बदलेल असा निष्कर्ष सापेक्षतावादातून निघत होता. असे खरेच घडताना दिसते हे १९१९ साली सूर्यग्रहणाच्या निरीक्षणातून सिद्ध झाले आणि आईन्स्टाईनचा सिद्धांत स्वीकारला गेला. इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. एखादा सिद्धांत जे काही निष्कर्ष मांडतो ते शोधण्यासाठी अनेकदा दुर्बिणी, उपकरणे, प्रयोगशाळा इत्यादींची गरज असते. अनेकदा असे घडते की एखादा सिद्धांत मांडल्या जातो पण त्याला निरीक्षणांचे पुरावे मिळण्यासाठीचे तंत्रज्ञान त्या काळी विकसित झाले नसते. आईन्स्टाईनने गुरुत्वीय लहरींच्या अस्तित्वाचे भाकीत १९१६ साली केले होते. पण या लहरी शोधू शकेल असे तंत्रज्ञान त्या काळात नव्हते. २०१५ साली जेव्हा अत्याधुनिक लिगो प्रयोगशाळा बांधण्यात आली तेव्हा या गुरुत्वीय लहरींचे पुरावे मिळाले. विज्ञानाच्या इतिहासात अशी अनेक उदाहरणे सापडतात. नवे शोध लागण्यासाठी तंत्रज्ञानही अनुकूल असावे लागते. तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे नवी निरीक्षणे मिळतात. या निरीक्षणांमुळे आधी मांडलेल्या सिद्धांतांचे नवे पुरावे मिळतात. कधी मात्र असेही घडते की नवीन निरीक्षणे सिद्धांताच्या निष्कर्षांबरोबर जुळून येत नाहीत. सिद्धांताचा निष्कर्ष आणि नवीन निरीक्षणे यांच्यात तफावत आढळते. अशा घटनांना विज्ञानाच्या इतिहासात खूप महत्त्वाचे स्थान आहे. कारण या घटनांमधून अनेकदा मूलभूत बदल घडतात किंवा ‘पॅरॅडाईम शिफ्ट’ होते. 

थॉमस कुन्ह हे विसाव्या शतकातील महत्त्वाचे विज्ञान तत्त्वज्ञ मानले जातात. त्यांचे ‘दि स्ट्रक्चर ऑफ सायंटिफिक रिव्होल्यूशन’ नावाचे पुस्तक विज्ञानातील शोधप्रक्रियेतील महत्त्वाचे टप्पे उलगडून सांगते. त्याच्यात असे दिले आहे की जेव्हा नवीन निरीक्षणे प्रचलित सिद्धांताबरोबर जुळून येत नाहीत तेव्हा शास्त्रज्ञांसमोर दोन पर्याय असतात. एक तर प्रचलित सिद्धांतामध्ये सुधारणा करणे किंवा एखाद्या नवीन सिद्धांताची मांडणी करणे. काही काळासाठी शास्त्रज्ञ या वेगवेगळ्या मार्गांवर चालत असतात – काही जण प्रचलित सिद्धांतामध्ये सुधारणा करण्याचे प्रयत्न करतात, काही लोक नवे सिद्धांत मांडण्याचा प्रयत्न करतात. यातून निरीक्षणांचे स्पष्टीकरण देणारे दोन समांतर मार्ग बनतात. मात्र जशी जशी नवी निरीक्षणे मिळतात तशी या दोन सिद्धांतांपैकी एका सिद्धांताला साजेशा पुराव्यांचे पारडे जड होते आणि तो सिद्धांत स्वीकारल्या जातो. जुना सिद्धांत मागे पडतो. याला थॉमस कुन्ह यांनी पॅरॅडाईम शिफ्ट होणे असा वाक्प्रचार वापरला होता. तो नंतर खूप प्रचलित झाला. विश्व स्थिर आहे यावर सुरुवातीच्या काळात आईन्स्टाईनचा विश्वास होता. सापेक्षतावादातून स्थिर विश्वाचे चित्र उभे राहावे यासाठी त्याने सिद्धांतामध्ये बदलदेखील केले (जिज्ञासूंनी या इतिहासासाठी ‘कॉस्मोलॉजिकल कॉन्स्टंट’चा इतिहास वाचावा). मात्र नंतर हबलच्या निरीक्षणांतून विश्व विस्तारित होत आहे हे लक्षात आले. तेव्हा आईन्स्टाईनने महास्फोटाच्या सिद्धांताचा स्वीकार केला. हळूहळू स्थिर विश्वाचा सिद्धांत मागे पडला. हे पॅरॅडाईम शिफ्ट होण्याचे उदाहरण आहे. 

आतापर्यंत आपण शोध लागण्याच्या प्रक्रियेतील महत्त्वाचे टप्पे समजून घेतले. आता या पार्श्वभूमीवर कृत्रिम बुद्धिमत्ता काय करू शकते याबद्दल पाहू. 

कृत्रिम बुद्धिमत्तेची गोळाबेरीज 

आज आपण माहितीतंत्रज्ञानाच्या युगात राहतो. जगभरात प्रत्येक दिवशी इतकी प्रचंड माहिती गोळा होते जी वरवर समजून घेण्यासाठी आयुष्य अपुरे पडेल. अर्थातच यातील बहुतांश माहिती खूप संकुचित किंवा मर्यादित स्वरूपाची असते. उदाहरणार्थ लोकांनी इंटरनेटवर एकमेकांना पाठवलेले संदेश, ईमेल्स इत्यादी, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम यांसारख्या सामाजिक माध्यमांवरील नोंदी, स्टेटस, त्यावर नवीन अपलोड केलेले फोटो, चलचित्रे इत्यादी. दररोज नवीन निर्माण होणाऱ्या एकूण माहितीचा छोटासा भाग हा माणसाच्या ज्ञानात भर पाडणारा असतो. उदाहणार्थ अवकाश दुर्बिणींनी केलेली नवी निरीक्षणे, मंगळावर माणसाने सोडलेल्या उपकरणांनी नवीन गोळा केलेली माहिती इत्यादी. ही नवी निरीक्षणे विज्ञानाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरतात. आज या नव्या निरीक्षणांचा अर्थ लावण्यास मानवी क्षमता अपुरी ठरते आहे. याचे एक उदाहरण पाहू:

जेम्स वेब ही अवकाशातील सध्याची सर्वांत प्रभावी दुर्बीण आहे. या दुर्बिणीच्या मदतीने विश्वाचे एक छायाचित्र घेतले होते. हातभर अंतरावर वाळूचा कण धरला तर तो जितकी जागा व्यापेल तितक्या जागेतील अवकाशाचे ह्या जेम्स बेव दुर्बिणीने निरीक्षण केले आणि त्याचे छायाचित्र घेतले. ह्या छायाचित्रात हजारो तारकाविश्वे दिसतात. यातील प्रत्येक तारकाविश्वात शेकडो ते हजारो अब्जावधी तारे आहेत. हा आपल्या विश्वाचा एक सूक्ष्म तुकडा. यावरून आपल्या विश्वाच्या महाप्रचंड आकाराची कल्पना येते. फक्त आपल्या आकाशगंगेमधे १०० अब्जाहून अधिक तारे आहेत. माणसाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बनवलेल्या दुर्बिणी नव्या तारकाविश्वांची, ताऱ्यांची, परग्रहांची निरीक्षणे गोळा करत आहेत. प्रश्न आहे या प्रचंड निरीक्षणांचा अर्थ लावण्याचा, ज्यासाठी मानवी क्षमता अपुरी आहे. इथे आपल्याला कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत मिळते आहे. नव्या गोळा झालेल्या प्रचंड माहितीचे वर्गीकरण करणे, त्यातून अनावश्यक माहिती गाळून उपयुक्त माहितीला अधोरेखित करणे, उपलब्ध माहितीच्या आधारे बहिर्वेशन (extrapolation) करणे हे काम कृत्रिम बुद्धिमत्ता करते. त्यातून गोळा केलेल्या माहितीचा दर्जा वाढतो आणि त्या आधारे शास्त्रज्ञांना निष्कर्ष काढता येतात. अशा प्रकारे कृत्रिम बुद्धिमत्ता शास्त्रज्ञांच्या सहाय्यकाचे काम करते. कृत्रिम बुद्धिमत्ता कधी थकत नाही. तिला एकसारखे काम वारंवार करताना कंटाळा येत नाही. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता महत्त्वाची ठरते आहे, शास्त्रज्ञांना मदत करते आहे. 

उदाहरणार्थ, ताऱ्यांचे निरीक्षण करून त्यांचा आकार, प्रकार, तारे त्यांच्या जीवनक्रमातील कुठल्या टप्प्यावर आहेत हे कृत्रिम बुद्धिमत्ता शोधू शकते. त्याशिवाय ताऱ्याच्या विशिष्ट गुणधर्मांमध्ये बदल घडला तर तारा कसा दिसेल, जीवनक्रमातील वेगळ्या टप्प्यावर तारा कसा दिसेल हेदेखील कृत्रिम बुद्धिमत्ता दाखवू शकते. ताऱ्याच्या वर्तमानकाळातील निरीक्षणाच्या आधारे तो भूतकाळात कसा दिसायचा आणि भविष्यात कसा दिसेल हे कृत्रिम बुद्धिमत्ता दाखवू शकते. एखाद्या तारकाविश्वाचे गुणधर्म काय आहेत, तारकाविश्व किती गतीने दूर जाते आहे हे कृत्रिम बुद्धिमत्ता शोधू शकते. शिवाय तारकाविश्वाचे गुणधर्म किंवा गती बदलली तर निरीक्षणात काय बदल घडतील हेदेखील कृत्रिम बुद्धिमत्ता दाखवू शकते.

शास्त्रज्ञांना ज्या माहितीचे विश्लेषण करायला अनेक वर्षे लागतील ते विश्लेषण काही दिवसांमध्ये किंवा काही तासांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता करू शकते. पण कृत्रिम बुद्धिमत्ता परिपूर्ण नाही. माहितीचा जो अर्थ कृत्रिम बुद्धिमत्ता लावते तो काही नियमांवर आधारित असतो. एखादे अपवादात्मक किंवा नियमावलीच्या चौकटीत न बसणारे निरीक्षण आले तर कृत्रिम बुद्धिमत्ता चुकीचा निष्कर्ष काढू शकते. उदाहरणार्थ, कोविड महामारीच्या काळात जगभरातील रुग्णालयांमध्ये प्रचंड प्रमाणात रुग्ण येत होते. त्यांचे निदान करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याचे प्रयत्न केले गेले. पण कृत्रिम बुद्धिमत्तेने अनेक वेळा चुकीचे निदान केले. असे आढळून आले की कृत्रिम बुद्धिमत्तेला रुग्ण झोपवलेल्या स्थितीत असताना त्याचे निदान करण्याचे शिकवले गेले होते. कोविड असलेले रुग्ण झोपवलेल्या स्थितीत असतात असा चुकीचा निष्कर्ष कृत्रिम बुद्धिमत्तेने काढला. त्यामुळे रुग्ण उभे असतील तर ते आजारी नाहीत असे कृत्रिम बुद्धिमत्तेला वाटले. अशा विचित्र चुका कृत्रिम बुद्धिमत्ता करू शकते. त्यामुळे सध्या तरी कृत्रिम बुद्धिमत्तेला योग्य दिशा दाखवण्यासाठी मानवी हस्तक्षेप आवश्यक ठरतो. कृत्रिम बुद्धिमत्ता चुकली तर माणसांना त्यांच्या नियमावलीमध्ये, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रशिक्षणाच्या परिस्थितीमध्ये सुधारणा कराव्या लागतात. दुसरीकडे कृत्रिम बुद्धिमत्ता ही यंत्रशिक्षण (machine learning) पद्धतीचा वापर करून स्वतःहून शिकू शकते. चांगला बुद्धिबळपटू हा जसा प्रत्येक खेळातील चाली लक्षात ठेवून खेळात सुधारणा करतो तसे कृत्रिम बुद्धिमत्ता अनुभवातून शिकत जाते आणि तिच्या चुका कमी होतात. 

इथे विज्ञानाच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरातील पेच लक्षात येतो. विज्ञानाच्या क्षेत्रात प्रचलित सिद्धांताच्या चौकटीत न बसणारी, अपवादात्मक निरीक्षणे महत्त्वाची ठरतात कारण या निरीक्षणांमध्ये ‘पॅरॅडाईम शिफ्ट’ करण्याची बीजे असतात. पण कृत्रिम बुद्धिमत्ता ही अपवादात्मक परिस्थितीमध्ये चुकीचे निष्कर्ष काढू शकते. अशा वेळी मानवी हस्तक्षेप आवश्यक ठरतो. म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता एकाच वेळी शेकडो तारकाविश्वांचे गुणधर्म सहज शोधू शकत असली तरी कृत्रिम बुद्धिमत्तेचा ‘आईन्स्टाईन’ होणे वाटते तितके सोपे नाही. 

आईन्स्टाईन होण्यामागे निरीक्षणांचा चौकटीबाहेर विचार करता येणे हा गुणधर्म महत्त्वाचा आहेच पण त्याशिवाय वास्तव समजून घेण्याचे कुतूहलही आवश्यक आहे. सगळ्या शास्त्रज्ञांना वास्तव समजून घेण्याचे कुतूहल असते. 

सध्या तरी कृत्रिम बुद्धिमत्ता फक्त तिला सांगितलेले काम करते. त्यामागे विश्वाचे वास्तव समजून घेणे वगैरे उदात्त विचार नसतात. असे म्हणतात की जेव्हा आईन्स्टाईनने सापेक्षतावादाचा शोध लावला आणि त्यानुसार बुध ग्रहाची सैद्धांतिक कक्षा प्रत्यक्ष निरीक्षणांशी अचूक जुळून आली तेव्हा आईन्स्टाईनच्या हृदयाची धडधड वाढली होती. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बाबतीत असे काही घडण्याची शक्यता नाही. कुतूहलाशिवाय विज्ञान होऊ शकेल का हा प्रश्न आहे. हा प्रश्न वास्तवाशी संबंध नसलेला तत्त्वज्ञानातील प्रश्न वाटू शकतो. पण उद्याच्या विज्ञानाच्या दिशेचा विचार करताना हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो.

हजारो वर्षांपासून माणसाला वास्तव समजून घेण्याची ओढ आहे. तत्त्वज्ञान आणि विज्ञान यांचा तो गाभा आहे. सुरुवातीला वास्तव समजून घेणे सामान्य लोकांच्या आवाक्यात होते. पृथ्वी दृष्टीला सपाट दिसत असली तरी ती प्रत्यक्षात गोलाकार आहे, पृथ्वी स्थिर आहे असे वाटत असले तरी प्रत्यक्षात ती सूर्याभोवती फिरते हे थोडा प्रयत्न केल्यावर सामान्य लोक समजून घेऊ शकले. पण हळूहळू विज्ञान गुंतागुंतीचे होत गेले. सापेक्षतावाद आणि पुंजवाद हे सिद्धांत इतके क्लिष्ट आहेत की सामान्य लोकच नाही तर, शास्त्रज्ञदेखील कधीकधी त्यांचा अर्थ समजून घेताना गोंधळात पडतात. काळ सापेक्ष असणे, दोन घटनांचा क्रम वेगवेगळ्या निरीक्षकांसाठी वेगवेगळा असणे हे चक्रावून टाकणारे आहे. पुंजवादामध्ये दूरवर असलेल्या दोन कणांमध्ये अदृश्य नाते असू शकते. याला क्वांटम इंटेंगलमेन्ट म्हणतात. हे नेमके कसे घडते ते अजून कळालेले नाही. स्ट्रिंग सिद्धांत अजून सिद्ध झालेला नाही. पण हा सिद्धांत बरोबर असेल तर आपल्या विश्वात ४ मिती (लांबी, रुंदी, उंची आणि काळ) नसून १० पेक्षा अधिक मिती असू शकतात. स्ट्रिंग सिद्धांताच्या १० पेक्षा अधिक मितींचे गणित सोडवणे मानवी क्षमतेच्या बाहेरचे आहे. त्यासाठी ताकदवान संगणक आणि प्रोग्रामिंगची मदत घ्यावी लागते. इथे एका पेचाला सामोरे जावे लागते. असे शक्य आहे की उद्या कृत्रिम बुद्धिमत्ता वास्तवाबद्दल नवे सिद्धांत मांडेल आणि त्यांचे पुरावेही देईल. पण तो सिद्धांत इतका गुंतागुंतीचा असेल की तो शास्त्रज्ञांनादेखील नीट कळणार नाही. आज अनुत्तरित असलेल्या काही प्रश्नांची उत्तरे कृत्रिम बुद्धिमत्तेने शोधली तरी कदाचित ती उत्तरे इतकी क्लिष्ट असतील की ती मानवी मेंदूला कळणार नाहीत. 

इथे असा विचार येऊ शकतो की उत्क्रांतीमुळे मानवी मेंदूदेखील अधिक प्रगत होऊ शकतो. त्यामुळे येणाऱ्या पिढीच्या लोकांची बुद्धिमत्ता आजच्या पिढीपेक्षा जास्त असेल. असे घडले तरी उत्क्रांती खूप संथ गतीने घडते. माणसाची एक नवी पिढी जन्माला यायला २० वर्षे लागतात आणि प्रत्येक पिढीमध्ये सूक्ष्म बदल घडतात. कृत्रिम बुद्धिमत्तेची क्षमता मात्र प्रत्येक वर्षी झपाट्याने वाढते आहे. त्याची बरोबरी करणे मानवी मेंदूला शक्य होणार नाही. कृत्रिम बुद्धिमत्तेशिवाय वास्तवाचे कोडे उलगडता येत नाही आणि कृत्रिम बुद्धिमत्तेने वास्तवाचे कोडे उलगडले तरी ते मानवी मेंदूच्या आवाक्यात येत नाही अशी स्थिती उद्या येऊ शकते. अशा वेळी आपण काय करू? जर एका पातळीपलीकडील वास्तव मानवी बुद्धीच्या क्षमतेच्या पलीकडे असेल तर शास्त्रज्ञांना शोध लावण्याची प्रेरणा कुठून मिळेल? येणाऱ्या काळात या प्रश्नांना सामोरे जावे लागणार आहे. अर्थात जागतिक तापमानवाढ, प्रदूषण इत्यादी संकटाना तोंड देऊन मानवजात शिल्लक राहिली तर! भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्ता प्रगत होत जाऊन तिला आत्मभान (consciousness) मिळाले तर उद्याचा आईन्स्टाईन आणि सॉक्रेटिस दोन्हीही कृत्रिम बुद्धिमत्तेचे असतील. अशा जगात माणसाचे तेच स्थान असेल जे स्थान माणसांच्या जगात चिंपांझींचे आहे. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराच्या बाबतीत सावध असणे आपल्या हिताचे आहे.

sukalp.karanjekar@gmail.com

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.