कृत्रिमप्रज्ञा! वरदान की आपत्ती!!

या विश्वात मनुष्य हा सर्वांत हुशार किंवा बुद्धिमान प्राणी म्हणून ओळखला जातो. मानवाच्या उत्पत्तीपासून आजवरचा त्याने केलेला प्रवास व विकास हा स्तिमीत करणारा आहे. जगण्याच्या दुर्दम्य आत्मविश्वासाच्या बळावर मानवाने अनेकविध शोध लावले. काही समाजाच्या दृष्टीने हितकारक तर काही अत्यंत हानिकारक व विध्वंसक. भूतकाळात लावलेल्या अनेक शोधांच्या आधारावर नवे तंत्रज्ञान बेतलेले आहे. वर्तमानकाळातही अधिकाधिक संशोधन करून नवनवीन शोध लावण्याचा माणसाचा ध्यास अजूनही कमी झालेला नाही. भविष्यातील पिढीच्या कल्याणासाठी आजची त्याची मेहनत, त्याची तपस्या खरोखरच कौतुकास्पद म्हणावी अशी आहे. अणूंचा शोध लागल्यावर अनेक वर्षांनंतर जर कोणता महत्त्वाचा शोध लागला असेल तर तो संगणकाचा शोध. संगणकामुळे एक क्रांतीच झाली. जग अधिक जवळ आले. आपल्याकडे संगणकयुग तसे थोडे विलंबानेच आले. तरीही त्या क्षेत्रात आपण केलेली प्रगती थक्क करणारी आहे. 

या सर्व पार्श्वभूमिवर जगात आता ‘कृत्रिमप्रज्ञा’ नावाची एक नवीन प्रणाली विकसित होताना दिसते आहे. पाश्चात्त्य देशात यावर बरेच संशोधन, प्रयोग झाले आहेत. याचा शोध हा १९५० साली जॉन मॅकार्थी याने लावला. त्याच्या शब्दात सांगायचे तर: ‘Every aspect of learning or any other feature of intelligence can in principle be so precisely described that a machine can be made to simulate it. An attempt will be made to find how to make machines use language, form abstractions, and concepts, solve kinds of problems now reserved for humans, and improve themselves.’ आपल्याला हे सर्व जरा नवीन आहे. पण भविष्यात आपल्याकडे हे तंत्रज्ञान विकसित होईल व व्यावसायिक पातळीवर त्याचा प्रसार होईल हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नाही. 

प्रथम हे सर्व प्रकरण काय आहे हे वाचणे मनोवेधक ठरेल. कृत्रिम वस्तूने दर्शविलेल्या बुद्धिमान वर्तनास कृत्रिम बुद्धिमत्ता (artificial intelligence, AI) असे म्हणतात. ही कृत्रिम वस्तू साधरणत: संगणकच असते. कृत्रिम बुद्धिमत्ता हा विषय विज्ञानामध्ये जास्त आढळत असला तरी, ही संगणकशास्त्रातील एक महत्त्वाची शाखा आहे. या शाखेमध्ये यंत्रशिक्षण (machine learning), त्यांचे बुद्धिमान वर्तन व परिस्थितीला जुळवून घेण्याची क्षमता आदींचा अभ्यास केला जातो. या शाखेतील संशोधन मुख्यत: स्वयंचलित कार्य करण्यासाठी आवश्यक असलेली बुद्धिमान वर्तणूक करू शकतील अशा यंत्रांशी निगडीत आहे; उदाहरणादाखल नियोजन (planning), संयोजन (joining), निदान-विषयक प्रश्नांची उत्तरे शोधण्याची क्षमता, हस्ताक्षर, आवाज आणि चेहरा ओळखण्याची क्षमता इत्यादी. अशा प्रकारे कृत्रिम बुद्धिमत्ता दैनंदिन जीवनातील समस्या सोडविणारी विज्ञानातील एक शाखा आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता असणाऱ्या प्रणाली अर्थशास्त्र, आरोग्यविज्ञान, अभियांत्रिकी, संरक्षण, कम्प्युटर गेम्स (बुद्धिबळ इत्यादी) आणि संगणकप्रणाली यांमध्ये वापरल्या जातात. 

कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये दोन मुख्य प्रवाह आहेत. रूढ (Conventional AI) आणि संगणकीय (Computational Intelligence).

रूढ कृत्रिम बुद्धिमत्ता ही यंत्राचे शिक्षण व सांख्यिकी यांमध्ये विभागली जाते. यालाच चिह्नांवर आधारित, तर्काधारित, सुयोजित (neat AI) आणि परंपरागत कृत्रिम बुद्धिमत्ता (Good Old Fashioned AI) असेही म्हणतात. यामध्ये खालील पद्धती येतात: 

१. निष्णात प्रणाली (Expert system) – ही प्रणाली कार्यकारणभाव वापरून निष्कर्ष काढते. ही प्रणाली प्रचंड प्रमाणातील माहितीचे विश्लेषण करून निष्कर्षाप्रत पोहोचते.

२. उदाहरणावरून तर्क करणे (Case based reasoning) 

३. बेसियन नेटवर्क 

४. वर्तनाधारित बुद्धिमत्ता (Behaviour based intelligence) – मानवनिर्मीत कृत्रिम बुद्धिमत्ता तयार करण्याची विभागीय पद्धत. 

संगणकीय बुद्धिमत्ता पद्धतीमध्ये, वारंवार होणारी क्रमशः निर्मिती किंवा शिक्षण यांचा समावेश होतो. 

शिक्षण हे गृहीत माहितीवर आधारित असून ते चिह्नविरहित, स्कृफी (scruffy AI) आणि सॉफ्ट कम्प्युटिंगशी निगडीत आहे. यामध्ये खालील पद्धती येतात:

१. ज्ञानतंतूजाल (Neural Network) – या प्रणाल्यांची रचना ओळखण्याची क्षमता अत्यंत चांगली असते. 

२. फझी सिस्टीम्स (Fuzzy systems) – या प्रणाल्या अनिश्चित किंवा संदिग्ध माहितीवरून कार्यकारणभाव शोधतात. यांचा उपयोग अनेक औद्योगिक व ग्राहकोपयोगी वस्तूंच्या निर्मितीमध्ये नियंत्रण करण्यासाठी करतात. 

३. उत्क्रांतीशील संगणन प्रणाली (Evolutionary Computation) – या प्रणाल्या गणसंख्या, जनुकीय बदल आणि “सक्षम तेच टिकेल” या जीवशास्त्रीय संकल्पनांचा उपयोग करून दरवेळी आणखी अचूक उत्तर शोधतात. 

या दोन मुख्य गटांना एकत्र करून संकरित बुद्धिमत्ता बनविण्याचा प्रयत्नही सतत चालू आहे. अत्यंत निष्णात असे सिद्धतेचे नियम हे ज्ञानतंतूजाल वापरून तयार करता येऊ शकतात किंवा निर्मितीचे नियम हे सांख्यिकी वापरून शिक्षित केलेल्या प्रणाल्या उपयोगात आणून तयार करता येऊ शकतात. कृत्रिम बुद्धिमत्ता वर्धन (Intelligence Amplification) हा मार्ग तंत्रज्ञानाने मानवी बुद्धिमत्ता वाढविताना होणाऱ्या परिणामांपासून कृत्रिम बुद्धिमत्ता कशी निर्माण करता येईल ते सुचवितो. ही झाली सर्वसाधारण ओळख. याच प्रणालीतून तयार झालेली चॅटजीपीटीसारखी प्रणाली ही तुमच्या-आमच्या हातात किंवा आवाक्यात आल्याने अनेक प्रश्न मात्र निर्माण होत आहेत. नाण्याला जशा दोन बाजू असतात व कोणताही निर्णय, उपयोग वगैरे करण्याआधी त्या दोन्ही बाजू बघणे जसे अनिवार्य असते, तद्वतच याबाबतीतही हे बघणे गरजेचे आहेच. प्रत्येक गोष्टीला जशी चांगली बाजू असते तशीच वाईट बाजूही असते. 

म्हणूनच जितके प्रगत शोध लागतील त्याचे समाजजीवनावर होणारे सकारात्मक तसेच नकारात्मक परिणाम तपासणे हे अनिवार्य ठरते. 

या प्रणालीचा धोका हा सर्वांत जास्त मानवाला बसेल. मनुष्य हा तिचा गुलाम बनेल. त्याचा बौद्धिक विकास खुंटेल. औद्योगिक क्षेत्रात, व्यावसायिक आस्थापनांमध्ये व प्रशासकीय पातळीवर कामे करण्यासाठी माणसांची गरजच पडणार नाही. परिणामी बेकारी प्रचंड प्रमाणात वाढेल. मनुष्याची क्रयशक्ती नष्ट होईल. कोविड संक्रमणाच्या काळानंतर अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. अजूनही आपल्याकडे व इतर देशांत नोकरकपात करण्यात येत आहेच. कोविडकाळात ‘Work from Home’ ही कामाची एक नवीन पद्धत अथवा कार्यशैली उदयाला आली. तिच्या उपयुक्ततेबाबत तोटेच अधिक प्रकर्षाने सामोरे आले. हा झाला एक भाग. बौद्धिक विकास खुंटल्यामुळे मनुष्य ऐदी बनेल. समाजाच्या व पर्यायाने देशाच्या विकासाला मोठी खीळ बसेल. सत्य-असत्यामधील रेषा अधिक पुसट होईल. अस्सल काय व नक्कल काय, हे समजायला अडचणीचे होईल. याचा फटका समाजमाध्यमावर जे लोक दिवसाचे अनेक तास व्यस्त असतात, विशेषकरून महिलावर्ग, त्यांच्याबाबत तर ते अधिक घातक ठरेल. याचे दूरगामी परिणाम दिसून येतील. 

यातील एक फार महत्त्वाचा व दुर्लक्षित न करता येण्यासारखा धोका म्हणजे समाजविघातक शक्ती, अतिरेकी-नक्षली संघटना व हॅकर्स यांच्यापासून आपल्या समाजाला व पर्यायाने देशाच्या स्वातंत्र्याला व सार्वभौमत्वाला असणारा धोका. आज संपूर्ण विश्वात अतिरेकी कारवाया वाढल्या आहेत, व ती एक मोठीच वैश्विक डोकेदुखी झाली आहे. त्यांच्या हाती जर ही प्रणाली लागली तर काय हाहाकार होईल याची कल्पनाच करवत नाही. आपल्या अर्थव्यवस्थेवरही याचा गंभीर असा परिणाम होण्याचा धोका आहेच. देशातील संरक्षणदृष्ट्या महत्त्वाची आस्थापने, कार्यालये व इतर अनेक गोपनीय गोष्टींनाही याची झळ पोहोचून अतोनात नुकसान होईल. 

या प्रणालीचा जसे तोटे आहेत तसेच याचे फायदेही अनेक आहेत. यातील पहिला फायदा हा की, या प्रणालीमुळे मानवी चुकांना पायबंद बसायला मदत होईल. नुकताच बालासोर येथील झालेला भीषण रेल्वे अपघात हा मानवी चुकीमुळे झाल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. हवामानाचा अचूक अंदाज, जलदगतीने निर्णय घेण्याची व जोखीम उचलण्याची क्षमता, अहोरात्र (२४X७) काम व विश्लेषण करण्याची क्षमता वगैरे अनेक फायदे यामुळे होतील. कामाला प्रचंड गती प्राप्त होईल. त्याचबरोबर मात्र ‘चौकटीबाहेरचा विचार’ ही प्रक्रिया जी मानव करू शकतो ती ही प्रणाली करू शकणार नाही. मनुष्याला जशा विविध भावभावना असतात, व तो त्या वेळोवेळी व्यक्त करत असतो  तशा या प्रणालीला नाहीत. हा फार मोठा दोष आहे. 

एकंदरीतच हे सर्व प्रकरण फार खर्चिकही आहे. वेळोवेळी नवीन माहितीचा स्रोत संकलित करणे, संगणकांचा व इतर उपकरणांच्या देखभालीचा खर्च, हे खूप अफाट असल्याने याचा प्रसार व उपयोग किती वेगाने होईल हे आत्ताच ठरवणे तसे कठीण आहे. परवाच गूगलचे सर्वेसर्वा सुंदर पिचाई यांनी अमेरिकेत हजारो लोकांपुढे कृत्रिमप्रज्ञेबाबत सादरीकरण केले. त्यातील अनेक मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केले. भविष्यात वैद्यकीय क्षेत्राचा अविभाज्य घटक असलेले क्ष-किरण, सिटी स्कॅन व एमआरआय या गोष्टी इतिहासजमा होतील. काही वैद्यकीय आस्थापनांमध्ये रोबोट् सर्व कामे करतात. आपल्याकडेपण काही मोठ्या रुग्णालयांमध्ये रोबोटिक्स शस्त्रक्रिया होत आहेतच. याने त्या क्षेत्रात क्रान्ती झाली तरी शेवटी त्या ठिकाणी काम करणाऱ्यांवर बेकारीची टांगती तलवार असणारच आहे. परवाच यू-ट्युबवर एक चलचित्र बघितले. त्यात कृत्रिमप्रज्ञा प्रणाली वापरून चालण्याचे बूट घालून त्याचे प्रात्यक्षिक बघायला मिळाले. एखाद्या ठिकाणी चालत जायला जर अर्धा तास लागणार असेल तर तेच अंतर काही मिनिटांत पार करता येणे यामुळे शक्य आहे. गंमत म्हणजे भारतात १९६० सालात प्रोफेसर श्री. महाबळा (H.N.Mahabala) यांनी यावर प्रथम संशोधन व कार्य केले होते. नंतर माहिती आधारभूत संगणकीय प्रणाली (KBCS) १९८६ च्या आसपास कार्यान्वित करण्यात आली. 

एकूणच या सर्व पार्श्वभूमीवर अमेरिकेने या शास्त्रात बाजी मारून बरेच संशोधन व त्याचा उपयोग करायला सुरुवात केली आहे. मग ते अर्थशास्त्र असो वा शैक्षणिक, संरक्षण, वैद्यकीय वगैरे वगैरे. तेथे व इतरही प्रगत देशात कृत्रिमप्रज्ञेचा व्यापक स्तरावर उपयोग होत आहे. त्यामुळेच येणारे युग हे कृत्रिमप्रज्ञा अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे असेल हे वेगळे सांगायला नको. फक्त या पार्श्वभूमीवर मानव या सर्व घडामोडींवर कितपत नियंत्रण ठेवू शकतो, स्पर्धेत टिकून राहू शकतो हे येणारा काळच ठरवेल. म्हटले तर हे सर्व तंत्रज्ञान समाजाच्या हिताचा विचार केला तर वरदानच आहे. पण, चुकीच्या हातात गेले तर सर्व विश्वाचा विनाश अटळ आहे. म्हणूनच यात मानवाची भूमिका महत्त्वपूर्ण व निर्णायक ठरेल. 

कल्याण (प). जि. ठाणे. महाराष्ट्र 

अभिप्राय 1

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.