कृत्रिमप्रज्ञा आणि सर्जनशीलता

अवघ्या सात-आठ महिन्यांपूर्वी लाँच झालेले चॅटजीपीटी आणि पर्यायाने कृत्रिमप्रज्ञा हे क्षेत्र आज जगभरात सर्वांत मोठा चर्चेचा विषय ठरत आहे. माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात बेरोजगारीची सर्वात मोठी लाट येणार, तब्बल तीस कोटी रोजगार यातून बाधित होऊ शकतील असे काही अहवाल सांगत आहेत. मानवी सर्जनशीलतेवर कृत्रिमप्रज्ञेचा हा हल्ला आहे असे काही चिंतातूर जंतू ओरडत आहेत, तर तंत्रज्ञानाचे बहुतेक जाणकार, तज्ज्ञ तिचे स्वागतही करत आहेत. चॅटजीपीटीमार्फत ओपनएआय कंपनीने जगभरातील भाषा आणि सर्जनशीलता क्षेत्रात आघाडी घेतली आहे. त्यांनी असे एक चॅटबॉट बनवले आहे जे तुमच्यासाठी लेखनिकाचे काम करते. म्हणजेच आता तुमच्या दिमतीला चोवीस तास एक लेखनिक असणार आहे, तुमच्या मनातील विचारांना तो शब्दांमध्ये उतरवणार आहे. तुम्हाला निबंध लिहायचा आहे, कथा लिहायची आहे किंवा नाटक… एखाद्या सिनेमाची पटकथा, संवाद लिहायचे किंवा मोठी कादंबरी… अगदी महाकाव्य लिहायचे जरी तुम्ही ठरवले तरी तुम्ही चॅटजीपीटीची मदत घेऊ शकता. अर्थात त्यासाठी तुम्हाला सभासदत्व घेऊन, त्याचे शुल्क भरून विशेष सेवेचे टाळे उघडावे लागेल. आता मी हा लेख लिहीत असताना माझी मुले यू-ट्युबवर चलचित्र पाहत आहेत, ज्यामध्ये चॅटजीपीटीद्वारे लिहिली गेलेली भयकथा दाखवली जात आहे.

पूर्वी वीस वर्षांनी पिढी बदलायची. दोन पिढ्यांच्या राहणीमानात, विचारांमध्ये हे वीस-पंचवीस वर्षांचे अंतर स्पष्ट दिसायचे. काही वर्षांपूर्वी हे अंतर पाच वर्षांवर आले होते. आता हा कालखंड अधिक कमी होण्याची शक्यता आहे. खूपच लवकर “हालात बदल जाते है.. जज्बात बदल जाते है..” ओपनएआयला या सात-आठ महिन्यांतच अनेक स्पर्धकांना सामोरे जावे लागले, कारण कृत्रिमप्रज्ञेची बाजारपेठ काबीज करण्याची गूगलसह इतर सर्व मोठ्या जागतिक कंपन्यांची इच्छा आहेच. बार्ड एआय, लॅमडा, चॅटसोनिक, बिंग एआय यांसारखे अनेक पर्याय समोर येत आहेत. कृत्रिमप्रज्ञेचा वापर करून काय काय करणे शक्य आहे या सर्व शक्यतांची चाचपणी अगदी वेगाने सुरू आहे.

समजा तुम्हाला ‘मराठी भाषेची पीछेहाट’ या विषयावर निबंध लिहायचा आहे. तुम्ही कृत्रिमप्रज्ञेला विषय सांगता, शब्दमर्यादा सांगता आणि काही सेकंदात तुम्हाला हा निबंध लिहून मिळतो. त्यामध्ये अगदी मराठी भाषेचा इतिहास, तिचे वैभव, त्यातील लोकप्रिय रचना यांचा उल्लेख तर होईलच, सोबतच सध्या भेडसावणाऱ्या समस्यादेखील असतील. तुम्हाला तुमचे लिखाण म्हणी आणि वाक्प्रचारांनी सजवायचे असेल तर, तुम्ही अपेक्षित आशय सांगा. काही क्षणात तुमच्यासमोर दोन-तीन म्हणी, वाक्प्रचार उपलब्ध झालेली असतील. एवढेच नाही, तर तुम्ही एखाद्या बाबीचे वर्णन करता तर, त्याला चलचित्राचे दृश्यस्वरूप देण्याचे कामदेखील कृत्रिमप्रज्ञा करते. आजवर गूगलची आपण भरपूर मदत घेतली, मात्र गूगल हे पीएचडीच्या मार्गदर्शकासारखे असते. तुम्हाला अमक्या ठिकाणी माहिती मिळू शकेल असे तिथे सुचवले जाते, आणि नंतर ढीगभर कचऱ्यामधून आपल्याला आवश्यक माहिती मिळवण्याची जबाबदारी आपली असते. कृत्रिमप्रज्ञा मात्र आपली कामे करणाऱ्या आपल्या जीवलग मित्रमैत्रिणीप्रमाणे असेल. हिच्या मदतीने आपल्याला तयार उत्तरे मिळतात. आपल्या मनात काय चालले आहे ते ओळखून “भाई तू रहने दे, मै कर लूंगा/लूंगी” असे म्हणणारा हा साथी आहे. 

चॅटजीपीटीला एखादे छायाचित्र दाखवले आणि त्याचे वर्णन करायला सांगितले तर लगेच त्याचे रसभरीत वर्णन मिळून जाते. तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत खात-पीत, फोटो काढत प्रवास केला तर त्याच रात्री तुमचा प्रवासवर्णनाचा लेख तयार होऊ शकतो. एकाच वर्षात सात-आठ दर्जेदार पुस्तके लिहिणारे साहित्यिक चॅटजीपीटीचा वापर करून आता वीस-पंचवीस पुस्तके लिहू शकतील, दर्जा अर्थात तोच “सुमार पण दे-मार” असेल. काही ठिकाणी ‘चमत्कार’ऐवजी ‘बलात्कार’ झालेला असेल. पण वाचकवर्ग तेवढे तर आजवर निमूटपणे सहन करत आला आहेच की! अमेरिकेतील शाळांमध्ये चॅटजीपीटी वापरायला बंदी घातली आहे. मुलांना आयती उत्तरे मिळाल्यानंतर त्यांच्या कल्पनाशक्तीचा विकास होणार तरी कसा, ही काळजी त्यामागे आहे. आपल्याकडेदेखील जागरूक पालक मुलांना “नवनीत हाती आले हो, अवघड सोपे झाले हो” वापरू देत नव्हते. म्हणजे मागच्या पिढीत तरी! आता तर मुलांना गाईड उघडण्याचीदेखील गरज नसते. यू-ट्युबवर सर्व धडे आणि त्यातील प्रश्नोत्तरे कुणीतरी अपलोड केलेले असतातच. कॉपीपेस्ट मारायचे बस! मात्र अशी, केवळ वहीची पाने भरून काय साध्य होणार? मुलाने स्वतः विषय समजावून घेऊन, त्यावर चिंतन-मनन करून स्वतः प्रश्नाचे उत्तर दिले तरच विषय त्याला पूर्णपणे समजेल ना! इथे उपलब्धता आणि क्षमता या बाबींवर सखोल विचार करायची गरज आहे. 

आज अनेक बाबी सहज उपलब्ध झाल्यामुळे आपल्या क्षमता कमी व्हायला लागल्या आहेत. दैनंदिन बाबींसाठी करावे लागणारे मानवी श्रम कमी झाले आणि स्थूलतेचे प्रमाण वाढले. तीच अवस्था कल्पनाशक्तीबाबत व्हायला नको असे पालकांचे आणि शिक्षकांचे म्हणणे आहे. मोबाईल आले, आणि फोन नंबर पाठ करायची गरज मानवाला उरली नाही.  आज तुम्हाला जास्तीत जास्त दहा-बारा लोकांचे फोन नंबर्स लक्षात राहतात, पूर्वी किमान वीस-पंचवीस किंवा त्याहून काही अधिक लोकांचे असायचे. आजच्या काळात नकाशा लावून पत्ता शोधताना रस्ते लक्षात राहत नाहीत. पूर्वीच्याच ठिकाणी दुसऱ्या वेळी जातानादेखील नकाशा लावूनच जावे लागते. ही तर वाढती समस्या! चॅटजीपीटीमुळे नव्या पिढीची स्मरणशक्ती, कल्पनाशक्ती खुंटेल का? ती खुंटू नये यासाठी किमान अमेरिकेतील पालक तरी आज सजग झालेले दिसतात. 

अर्थात नुकसान असते तसा तंत्रज्ञानाचा फायदादेखील असतोच की! कंटाळवाणी कामे आपण आता सहज टाळू शकतो. किंवा आपण असे म्हणू की कंटाळा ठासून भरलेली मंडळी आता सहजरीत्या कामे टाळू शकतील. पीएचडी करणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांचा दोन संशोधन निबंध लिहिताना जीव मेटाकुटीला येतो, त्यांना या चॅटजीपीटीचा उपयोग होईल. मात्र ही कृत्रिमप्रज्ञा लेखकांना गाळात घालेल का, लेखनकला नामशेष होईल का? तर मला तरी तसे वाटत नाही. चायना गेटमधील जगीरा म्हणतो त्याप्रमाणे “जगीरा से लढने का हौसला तो लाओगे, लेकिन उसके जैसा कमीनापन कहां से सीखोगे.” लेखकाची शैली जर अभिनव असेल तर चॅटजीपीटी कितीदेखील ज्ञानी झाले, तरी शैलीशी अचूक जुळवणी करू शकणार नाही. अर्थात् विकिपीडियावरील माहिती अनुवादित करून मोठमोठी पुस्तके रटाळ भाषेत लिहिणाऱ्या लेखकांना आता स्पर्धेस तोंड द्यावे लागेल हे नक्की! 

कृत्रिमप्रज्ञेचा वापर करत स्मार्टफोन, स्मार्ट वॉचेस आणि इतर साधने, उपकरणेदेखील तुमच्या आयुष्यातील अनेक कामे सोपी करत आहेत.‌ मात्र या सर्व उपकरणांचा वापर करताना तुम्ही तुमच्या खाजगी आयुष्याची किंमत मोजत आहात.‌ कारण या सर्व उपकरणांचे हजारो डोळे तुमच्यावर लक्ष ठेवून असतात. ज्याप्रमाणे महत्त्वाच्या व्यक्तिंना पोलिसांकडून सुरक्षा पुरवली जाते, मात्र त्यामुळे त्यांच्या खाजगी आयुष्यावर गदा येते, त्याच पद्धतीने ही उपकरणे तुमच्या दैनंदिन हालचाली, तुमचे दैनंदिन व्यवहार याच्या नोंदी ठेवत असतात. या नोंदींचा वापर कुणा त्रयस्थ व्यक्तीने करणे इथे शक्य असते. कृत्रिमप्रज्ञेच्या सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांसाठी तुम्ही केवळ एक ग्राहक असता. या कंपन्यांना केवळ स्वतःचा नफा महत्त्वाचा असतो.

या कंपन्या स्वतःच्या नफ्यासाठी कृत्रिमप्रज्ञेचे नवनवीन आविष्कार विकसित करत असतात. त्यातून मानवाचे जगणे अधिकाधिक सोपे होत जाते. आज कृत्रिमप्रज्ञा पार पाडत असणारी भूमिका दोन शतकांपूर्वी तंत्रज्ञानाने पार पाडली होती. एकेकाळी सर्व कामे मानवाला आपल्या हाताने करावी लागत होती. विहिरीतून पाणी उपसणे असू द्या किंवा डोंगर फोडून रस्ते बनवणे. मात्र तंत्रज्ञानाचा विकास होत गेला आणि ही सर्व कामे सोपी होत गेली. अर्थातच या कामांवर अवलंबून असलेल्या काही लोकांचा रोजगार गेला. मात्र जे काम करण्यासाठी प्रचंड मेहनत लागत होती, ती कामे सोपी होत गेली. काही अभ्यासक असे म्हणतात की अमेरिकेमध्ये गुलामगिरीची प्रथा नष्ट होऊ शकली कारण मधल्या काळामध्ये तंत्रज्ञान विकसित झाले होते. आवश्यक मनुष्यबळाची गरज कमी झाली नसती तर गुलामगिरीची अमानवी प्रथा मोडणे अधिक जड गेले असते.

कारखान्यांचे स्वयंचलन, व्यावसायिक यंत्रप्रणाली आणि मानवी श्रमात बचत करणारी यंत्रे यांचा भडिमार १९५० च्या दशकात झाला. यामुळे लाखो रोजगारांवर आणि व्यवसायांवर गदा आली. मात्र त्याचवेळी उत्पादनात अभूतपूर्व वाढ घडून आली ज्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळून लुप्त पावलेल्या संख्येपेक्षा अधिक रोजगार निर्माण झाले. मानवी हातांनी करायच्या सर्व कामांना वाफेच्या इंजिनाने बाजूला सारले याबद्दल आपण शोक व्यक्त करायचा की, कार्यालयीन टंकलेखक, उत्पादनसाखळीत काम करणारे कामगार, उद्वाहनचालक आणि नवीन तंत्रज्ञानाशी जुळवून घेता न आल्याने ज्यांची जागा तंत्रज्ञानाने गिळंकृत केली, अशा हजारोंबाबत खेद व्यक्त करायचा की, कंटाळवाण्या, धोकादायक आणि शारीरिक पिळवणूक करणाऱ्या कामांपासून ते मुक्त होऊ शकले, म्हणून आपण त्यांना भाग्यवान समजायचे?

तंत्रज्ञान मानवाला सांगत असते, “तुझा जन्म अवजड काम करण्यासाठी नाही तर अधिक सर्जनशील कामांसाठी झालेला आहे.” तंत्रज्ञान वाढले की स्वयंचलनाचे प्रमाण वाढणार आणि त्यातून बेकारी वाढणार, असा ढोबळ संबंध लावत तंत्रज्ञानाला मानवतेचा शत्रू समजले गेले. मात्र आजवर तंत्रज्ञानाच्या साह्याने मानवाने स्वतःची प्रचंड श्रमापासून मुक्तता केलेली आहे. आधुनिक बी-बियाणांचा वापर करून उत्पादन वाढवले आहे आणि भुकेचे कोडेदेखील सोडवले आहे. आजवर अशक्य वाटलेल्या अनेक गोष्टी मानवाला तंत्रज्ञानाच्या साह्याने शक्य करता आल्या आहेत. तंत्रज्ञानाची लाट आपण थांबू शकत नाही. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या हातात हात घालून चालणे हेच मानवासाठी हितकर राहते. 

तंत्रज्ञान आणि कृत्रिमप्रज्ञा यांमध्ये एक अतिशय महत्त्वाचा फरक आहे. तंत्रज्ञानाने काही ठिकाणचा रोजगार खाऊन टाकला असला तरी इतर ठिकाणी अधिक संधी उपलब्ध करून दिली होती. मात्र या नव्या तंत्रज्ञानामध्ये म्हणजेच कृत्रिमप्रज्ञेमध्ये तसे होण्याची शक्यता नाही. इथे रोजगार मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. मात्र कुणी कितीही नाकारले तरी, कृत्रिमप्रज्ञेला आपण नाकारू शकत नाही. यावर उपाय एकच. आपण तंत्रज्ञानाचे गुलाम न बनता तंत्रज्ञानाला आपल्या कामासाठी जुंपण्यास सज्ज असायला हवे. गरज आहे या नव्या तंत्रज्ञानाशी मैत्री करायची. आणि आपण ती करूच.

गॅरी कास्पारोव्हच्या ‘डीप थिंकींग’ या पुस्तकाचा अनुवाद करताना कृत्रिमप्रज्ञा या विषयाकडे पाहण्याचा अतिशय सकारात्मक दृष्टीकोन मलादेखील मिळाला आहे. गॅरी म्हणतो, “आपण सर्व मैदानात आहोत, आपल्यापैकी सर्वजण खेळाडू आहेत, कोणीही प्रेक्षक नाही. आपण जेवढा मोठा आणि सखोल विचार करू, आपल्याला विजयाची संधी तेवढी जास्त असेल. आपल्याला केवळ तंत्रज्ञानाच्या दोन पावले पुढे चालण्याची महत्त्वाकांक्षा हवी.” याच पुस्तकाचा समारोप करताना गॅरी म्हणतो, “मानवता ही सर्जनशीलतेपेक्षा खूप मोठी गोष्ट आहे. मानवाला लाभलेल्या इतर वैशिष्ट्यांची तुलना यंत्रमानव कधीच करू शकणार नाही. यंत्रमानवांना केवळ आदेशांचे पालन करायचे असते, तर मानवासमोर उद्देश असतो. अगदी स्लीप मोडमध्ये असतील, तरीसुद्धा यंत्रांना स्वप्ने पडत नाहीत. मानव मोठमोठी स्वप्ने पाहू शकतो आणि आपली भव्य स्वप्ने साकार करण्यासाठी आपल्याला यंत्रांचा वापर करावा लागतो. जर आपण मोठमोठी स्वप्ने पाहायचे थांबवले, मोठमोठ्या आव्हानांना गवसणी घालण्याचे थांबवले, तर यंत्रे आणि आपल्यामध्ये काहीही फरक राहणार नाही.”

इथे एक बाब नक्की आहे, तुम्ही कितीही नाकारले तरी अद्ययावत तंत्रज्ञानाचा, कृत्रिमप्रज्ञेचा प्रवेश कोणी थांबवू शकत नाही, लांबवू शकत नाही. गरज आहे बदलाशी मैत्री करण्याची. आपण जर यावर सखोल, गांभीर्याने विचार केला, तर आपण नक्कीच तंत्रज्ञानाकडे सकारात्मक पाहू शकतो. आता हा लेखदेखील गूगलचे ध्वनि-टंकलेखन वापरून एक-दीड तासामध्ये पूर्ण केला आहे. हातांनी टंकलेखन केले असते तर कदाचित मला पाच-सहा तास द्यावे लागले असते. आता वाचवलेले हे चार तास मी कसे घालवतो, माझ्या सर्जनशीलतेला कसे खतपाणी घालतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. अर्थात माझ्या अवतीभवती असलेली कृत्रिमप्रज्ञा माझ्यावर लक्ष ठेऊन आहेच!! 

मोबाईल: ८९५६४४५३५७

अभिप्राय 3

  • कृत्रिमप्रज्ञा आणि सृजनशीलता हा लेख कौस्तुभ सर यांनी अतिशय मार्मिक, माहिती पूर्ण लिहिला आहे. त्यांचे आणि संपादक महोदय यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन. कृत्रिम प्रज्ञा ही झपाट्याने भारतीय देशवासियांच्या जीवनात अविभाज्य भाग बनेल .त्यासाठी नुसती टिकाटिप्पणी उपयोगी नाही तर जगावर आरूढ झालेल्या या तंत्रज्ञानाचा सविस्तर मागोवा आपण लेखमाला स्वरूपात करावा व त्याचे उपयोग याविषयी सविस्तर मार्गदर्शन करावे अशी विनंती आहे.

  • Thought provoking article.
    Congrats Kautubh !

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.