चॅटजीपीटी (ChatGPT) आणि नैतिकता

चॅटजीपीटी ही एक संभाषणात्मक एआय प्रणाली आहे, जी प्रदान केलेल्या इनपुटवर आधारित मानवासारखे उत्तर निर्माण करण्यासाठी सखोल शिक्षणतंत्र वापरते. ‘चॅटजीपीटी’ हे नाव ‘चॅट’ आणि ‘जीपीटी’ चा संयोग आहे. GPT म्हणजे जनरेटिव्ह प्री-ट्रेन्ड ट्रान्सफॉर्मर. सर्वमान्य इंटरनेट मोठ्या मजकूर विदेवर प्रशिक्षित केले जाते, जे मानवासारखे उत्तर निर्माण करण्यास अनुमती देते.

चॅटजीपीटी ३० नोव्हेंबर २०२२ रोजी मूळ प्रारूप म्हणून सुरू करण्यात आले. काही दिवसांतच याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. हे ओपनएआयने सुरू केले होते, पण मोठी गोष्ट म्हणजे मायक्रोसॉफ्टसारख्या मोठ्या कंपनीने त्यासाठी $10 बिलियनची गुंतवणूक केली होती. चॅटजीपीटी बाजारात येताच गूगलसारख्या मोठ्या कंपन्यांचाही गोंधळ उडाला. अनेक बड्या तज्ज्ञांनी याला गूगलचे प्रतिस्पर्धी घोषित केले होते.

चॅटजीपीटी ट्रान्सफॉर्मर आर्किटेक्चरचा वापर करते, जे भाषाधारित कार्यांसाठी लोकप्रिय डीप लर्निंग आर्किटेक्चरचा प्रकार आहे. ट्रान्सफॉर्मर आर्किटेक्चरची ओळख वासवानी आणि इतरांनी “अटेन्शन इज ऑल यू नीड” या पेपरमध्ये सादर केली होती (२०१७). फॉर्मर आर्किटेक्चरमागील मुख्य कल्पना म्हणजे इनपुट विदेवर प्रक्रिया करण्यासाठी पारंपरिक रिकरंट न्यूरल नेटवर्क (RNN) किंवा कॉन्व्होल्युशन न्यूरल नेटवर्क (CNNs), लॉंग शॉर्टटर्म मेमरी (LSTM) वापरणे. हे इनपुट विदेमध्ये दीर्घ-अवलंबित्व कॅप्चर करण्यास अनुमती देते, जे भाषाधारित कार्यासाठी योग्य आहे.

चॅटजीपीटी मानवाची जागा कधीच घेऊ शकणार नाही. महत्त्वाचे म्हणजे या चॅटजीपीटीकडून कसे व काय लिहून घ्यायचे यासाठी तरी अभ्यास करावाच लागेल. आपण काय व कोणत्या शब्दांत याला विचारतो त्यावर त्याचे उत्तर अवलंबून आहे.

कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून ‘चॅटजीपीटी’ हा रोबो (यंत्रमानव) ओपनएआय या अमेरिकी कंपनीने गेल्या नोव्हेंबरच्या अखेरीस बाजारात आणला आणि पाच दिवसांत त्याचे कोट्यवधी चाहते झाले. चॅटजीपीटी दीर्घ भाषा प्रारूप म्हणजेच लार्ज लँग्वेज मॉड्युलवर (एलएलएम) आधारित काम करते. कृत्रिम बुद्धिमत्ता ही काही नवीन बाब नाही. माहिती तंत्रज्ञानामुळे आपण अनेक बाबतीत त्याची अनुभूती घेत आहोतच. इंटरनेट वरून खरेदी करणे, गूगलच्या नकाशावरून ईप्सित स्थळी जाणे, स्वयंचलित कार, गेमिंग, घर साफ करणारा रोबोट्, हृदयाचे ठोके सांगणारे घड्याळ ही सारी कृत्रिम बुद्धिमत्तेची उदाहरणे. आता हा चॅटजीपीटी काय करतो, असा प्रश्न पडेल. तो तुम्हाला हवे ते लिहून देणारा आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणारा रोबोट् आहे. कोणत्याही विषयावर निबंध लिहिणे, कविता करणे, संगणकप्रणालीतील चुका शोधणे व दुरुस्त करणे, आपल्या आहाराचे नियोजन करणे, मुलांचा गृहपाठ करून घेणे, नोंदी काढणे, असे बरेच काही तो करून देऊ शकतो.

चॅटजीपीटी हा एक एआय चॅटबॉट आहे जो मानवासारखा संभाषणात्मक संवाद तयार करण्यासाठी नैसर्गिक भाषाप्रक्रियेचा वापर करतो. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून चॅटजीपीटी नावाप्रमाणे तुमच्याशी चॅट म्हणजे संवाद साधत असतो. यात मानवाला जशी भाषा येते तशीच चॅटजीपीटीला कृत्रिमरीत्या शिकवलेली भाषा असते. मिशेल या अमेरिकी संगणक संशोधक सांगतात, “संगणकाची विदेवर प्रक्रिया करण्याची व विदा साठवून ठेवण्याची अफाट शक्ती यात आहे. त्यामुळेच मशीन लर्निंग अल्गोरिदमचा वापर करून संगणकात माणसाच्या मेंदूसारखे काम करणारे न्यूरल नेटवर्क तयार करून माणसाशी माणसाला समजेल अशा भाषेत संवाद करता येऊ शकतो.” यावर बरेच संशोधन चालू आहे. यामध्ये संगणकात मोठ्या प्रमाणात शब्द साठवून त्या प्रत्येक शब्दाला प्रशिक्षण दिलेले असते आणि त्या सूचनांप्रमाणेच संगणक काम करीत असतो.

चॅटजीपीटीची मदत संशोधन निबंध लिहिण्यासाठी करून घेणे योग्य की अयोग्य, त्यातील नैतिकता, वाङ्मयचौर्य आणि सत्यता यावर सध्या चर्चा सुरू आहे. संशोधन म्हणजेच नवीन शोध लावणे. आधी झालेल्या संशोधनावर नवीन प्रयोग करणे त्यातून नवीन संशोधन करणे जे समाजाच्या उपयोगी पडेल आणि ते वाचून पुढील पिढ्या नव्याने ज्ञानात भर टाकतील. यात नैतिकता व प्रामाणिकपणा हे दोन कळीचे मुद्दे आहेत; परंतु चॅटजीपीटी संपूर्ण संशोधन निबंधच लिहून देत असेल आणि तोही आपल्याला हवा तसा(?) तर मग कदाचित गंभीर समस्या निर्माण होतील. उच्चशिक्षणसंस्था व संशोधन करणाऱ्या संस्थांमध्ये संशोधन निबंध लिहिणे संशोधकांना वेगवेगळ्या कारणांसाठी अनिवार्य केले आहेत. त्यामुळे बनावट संशोधन नियतकालिके अस्तित्वात आली. आता चॅटजीपीटीमुळे संशोधन निबंधांच्या प्रकाशनांवर विपरीत परिणाम होतील.

“गूगलच्या पुढे एक पाऊल” असे जीपीटीबाबत बोलले जाते आहे; परंतु गूगल ज्या माहितीस्रोतांतून माहिती देतो त्याचे संदर्भसुद्धा देतो. चॅटजीपीटी मात्र सर्व स्रोतांमधून माहिती गोळा करून, एकत्र करून संदर्भांशिवाय देतो. चॅटजीपीटीला मी एक संशोधन निबंध लिहून मागितला तर त्याने नकार दिला; परंतु त्याऐवजी पेपरचा पूर्ण आराखडा त्याने करून दिला. मी पुन्हा पुन्हा विचारून संदर्भ मागितले तर त्याने कमालच केली. अशी काही पुस्तके व नियतकालिकांमधील पेपर शोधून दिले ज्यात मी विचारलेला शब्द शीर्षकांमध्ये आढळला.

सेल्युलर अँड मॉलेक्युलर बायोइंजिनीअरिंग या नियतकालिकाच्या फेब्रुवारीच्या अंकात मायकेल किंग यांनी संपादकीय म्हणून चॅटजीपीटीबरोबर केलेला संवादच प्रसिद्ध केला आहे. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना ढोबळ उत्तरे त्याने दिली आहेत. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्याने दिलेले संदर्भ अस्तिवात नाहीतच! हे अत्यंत धोकादायक आहे. मूळ संदर्भ व त्यातील विश्वासार्हता याला संशोधन निबंधामध्ये अनन्य मोल आहे. त्यामुळे हे सिद्ध होते की याचा वापर किती अयोग्य आहे. संशोधनात प्रकाशित साहित्याचा सखोल अभ्यास करून (साहित्य इलेक्ट्रॉनिक अथवा ग्रंथालयातील छापील स्वरूपात असेल), प्रयोगशाळेत प्रयोग करून जमा केलेल्या माहितीचे विश्लेषण करून, त्यावर चिंतन, मनन करून संशोधक त्याचे संशोधन प्रसिद्ध करतो. यामध्ये चॅटजीपीटीची क्षमता अत्यंत तोकडी पडते. काही संशोधकांनी कामालच केली आहे. चॅटजीपीटीला त्यांच्या संशोधन निबंधामध्ये चक्क लेखकच बनवले आहे! हाझेम झोनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘जर्नल ऑफ मेडिकल एथिक्स’च्या अंकात अशा कृत्रिम लेखकांबद्दल काळजी व्यक्त केली आहे. त्यातील खरेपणा, नैतिकता व वाङ्मयचौर्य हे कसोशीने तपासले पाहिजे. संशोधन प्रसिद्ध करण्याच्या नियमावलीत बदल करून त्यामध्ये कृत्रिम लेखक असेलेले पेपर्स प्रसिद्ध करण्यास प्रकाशकांनी नाकारले आहे. मात्र, जर काही प्रकाशकांनी असे पेपर्स प्रसिद्ध केले आणि त्यात काही चुकीचे, मानवाला हानिकारक असे छापले गेल्यास त्याची जबाबदारी चॅटजीपीटी नक्कीच घेणार नाही कारण तो कृत्रिम आहे. खरे तर याची जबाबदारी प्रत्येक लेखकाची असते. चॅटजीपीटीचा मालक ही जबाबदारी घेणार का? याची नोंद घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.‍‌‌‌‍

बनावट संशोधन नियतकालिकांमध्ये शोधनिबंध प्रसिद्ध करणाऱ्यांना तर ही पर्वणीच ठरेल; कारण त्यांना लिहिण्याचे कष्ट(?) पडणारच नाहीत. ही नियतकालिके पैशांच्या बदल्यात काहीही प्रसिद्ध करतात. अशा शोधनिबंधांमध्ये व्याकरणाच्या अनेक चुका असतात व त्यावरून पेपरचा दर्जा लक्षात येतो; परंतु चॅटजीपीटीच्या मदतीने तयार केलेल्या पेपरमध्ये व्याकरणाच्या चुका कमी असतील आणि संदर्भ चुकीचे असतील. तर अशा बनावट नियतकालिकांना ओळखणे म्हणजे नवीनच आव्हान उभे राहील. याबाबत संशोधकांमध्ये जागरूकता आणावी लागेल. चॅटजीपीटीचा गैरवापर टाळण्यासाठी अमेरिकेतील प्रिन्स्टन विद्यापीठातील २२ वर्षीय एडवर्ड तिआन याने ‘जीपीटी झीरो’ हा प्रोग्राम तयार केला आहे, ज्यामुळे मशीनद्वारे तयार केलेले मजकूर ओळखता येतात. तिआनच्या मते चॅटजीपीटी एक उत्तम अद्ययावत तंत्रज्ञान आहे; परंतु हे ‘पँडोराच्या बॉक्स’सारखे आहे म्हणूनच त्याचा वापर अतिशय सावधगिरीने केला पाहिजे.

चॅटजीपीटीचे धोके?

चॅटजीपीटीला सगळेच येऊ लागले तर माणसाची गरज एकदमच कमी होईल आणि नोकऱ्यांवर गदा येऊ शकते.

यामुळे लिखाणाची शैलीही बदलू शकते. त्याचवेळी चॅटजीपीटी हे उपलब्ध गोष्टींमधून उत्तर देते. कोणीतरी मूळ काम करून ठेवले आहे, त्याचा संदर्भ देऊन चॅटजीपीटी काम करते.

ती गोष्ट करण्यासाठी संबंधित माणसाने व्यतीत केलेला वेळ, पैसा, ऊर्जा यांच्या गुंतवणुकीचे काय? असा प्रश्नही निर्माण होतो. यातून चौर्यकर्माचाही मुद्दा उपस्थित होऊ शकतो. एखाद्या लेखकाने-कवीने लिहिलेला मजकूर हा त्याचा असतो. चॅटजीपीटीसारखे तंत्रज्ञान सगळ्या मजकुराचे सरसकटीकरण करू शकते. तंत्रज्ञान एकीकडे आपले आयुष्य सुकर करत आहे, आपला वेळ आणि ऊर्जा वाचवत आहे. पण आता माणूस करतो त्या गोष्टीही तंत्रज्ञान करू लागले आहे.

ललित शैलीतलं लिखाण करू शकणारा चॅटबॉट असे याचे वर्णन केले जाऊ शकते. भविष्यात कदाचित मानवाचा सहाय्यक नव्हे तर प्रतिमाणूस म्हणून हा चॅटबॉट वावरू शकतो.

शेवटचा मुद्दा हा, की संशोधन निबंध, कविता, निबंध, ब्लॉग किंवा पत्रकारिता असो, त्यामध्ये भाषेला एक नजाकत असते. प्रत्येकाच्या भावना, अनुभव, निरीक्षण, अभ्यास त्यातून दिसून येतो. प्रत्येक लेखनाची एक शैली असते आणि ती चॅटजीपीटीला कशी समजणार? त्यामुळे चॅटजीपीटी मानवाची जागा कधीच घेऊ शकणार नाही. महत्त्वाचे म्हणजे या चॅटजीपीटीकडून कसे व काय लिहून घ्यायचे यासाठी तरी अभ्यास करावाच लागेल. आपण काय व कोणत्या शब्दांत याला विचारतो त्यावर त्याचे उत्तर अवलंबून आहे. त्याला किती मोठे करायचे हे आपणच ठरवायचे आहे.

निष्कर्ष

चॅटजीपीटी हे एक अत्याधुनिक कृत्रिमप्रज्ञाधारित भाषा निर्माण करत आहे ज्यामध्ये प्रदान केलेल्या इनपुटच्या आधारे मानवासारखे उत्तर देण्याची क्षमता आहे. सर्वार्थाने इंटरनेटवरून मोठ्या मजकूर विदेला प्रशिक्षित केले जाते, ती ऍप्लिकेशन्स विस्तृत श्रेणीमध्ये सत्य आणि संबंधित उत्तर निर्माण करू शकतात. मात्र चॅटजीपीटीमधील, पूर्वग्रह, संदर्भ, आणि सहानुभूती, ह्या मर्यादांचादेखील विचार करणे आवश्यक ठरणार आहे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.