तंत्रज्ञान आणि नीतिमूल्य

कृत्रिम बुद्धिमत्ता, म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आणि त्यावर आधारित ChatGPT सारख्या अनेक प्रभावशाली प्रणालींचा गेल्या एक-दोन वर्षांतच माहिती तंत्रज्ञानाच्या विश्वात जोरदार प्रवेश झाला आहे. अशा प्रकारच्या साधनांमुळे व्यवसायक्षेत्रात मोठे बदल होतील. कृत्रिमप्रज्ञेच्या वापरतून जर मानवी बुद्धिमत्तेचा वापर कमी झाला तर त्याचे अनेक फायदे आहेत – त्यातून खर्च कमी होईल, चुका कमी होतील, दिवसातले २४ तासही काम करता येईल आणि आर्थिक वृद्धीला गती मिळेल. म्हणजे उद्योगधंद्यांचा आणि देशाचा फायदा. आज प्रत्येक मोठ्या कंपनीतून कृत्रिमप्रज्ञेचा वापर चालू झाला आहे. पण कृत्रिमप्रज्ञेमुळे अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागतील ही भीती आहे. 

गोल्डमन साक्सच्या एक अहवालात म्हटले आहे की कृत्रिमप्रज्ञेमुळे जगभरातून ३० कोटी पूर्णवेळ नोकऱ्या जाऊ शकतील. अनेक नवीन नोकऱ्याही यात तयार होतील, पण त्या ३० कोटी नक्कीच नसतील. फोर्ब्स मासिकाच्या मते बँकिंग आणि फायनान्स, माध्यम आणि पणन आणि कायदा सेवा या क्षेत्रांत मोठ्या प्रमाणात नोकऱ्या जातील. मे २०२३ मध्ये अमेरिकेत ३९०० नोकऱ्या कृत्रिमप्रज्ञेमुळे गेल्याची बातमी आली. पण वास्तविक यापेक्षा कित्येक पट जास्त नोकरदार घरी बसले असल्याची भीती आहे. कृत्रिमप्रज्ञेमुळे बेरोजगारी किती वाढेल हे निश्चितपणे आज सांगता येणार नाही. कृत्रिमप्रज्ञेच्या वापरतून उद्भवणारी ही समस्या चिंताजनक आहेच पण याचे इतर काही परिणाम अधिक घातक असतील, त्यावर चर्चा करू.

मानवाने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाला कोणतीही दिशा नसते. त्याचा वापर मानवी हितासाठी करता येतो किंवा गुन्हेगारीसाठी. तंत्रज्ञान कसे, कुठे आणि कशासाठी वापरायचे हे मानव स्वतः ठरवीत असतो. इतिहास अशा अनेक घटनांना साक्षी आहे. तंत्रज्ञान विकसित होते एका कारणासाठी, आणि त्याचा वापर दुसऱ्याच कामात केला जातो. अशा परिस्थितीत विकसनप्रक्रियेत असलेल्या नोकरदार वर्गांकडून निषेधही झालेला आहे. याची अनेक उदाहरणे आहेत. मानवी सुखसोयींच्या मागोव्यात विकसित झालेले तंत्रज्ञान युद्धासाठी वापरणे योग्य आहे का? राफेल, लॉकहिड मार्टिन किंवा मॅकडॉनेल डग्लससारख्या कंपन्या तर संरक्षण व्यवसायातच आहेत. परंतु मायक्रोसॉफ्ट, गूगल आणि अ‍ॅमेझॉनसारख्यांनी आपले तंत्रज्ञान युद्धासाठी उपलब्ध करून द्यावे का? यासाठी इथल्या कर्मचाऱ्यांचा आक्षेप असू शकतो का?

काही वर्षांपूर्वी मायक्रोसॉफ्टचे प्रमुख, सत्या नडेला यांना त्यांच्या कर्मचार्‍यांनी या मुद्द्यावरून वेठीस धरले. मायक्रोसॉफ्टने आपले ‘होलो लेन्स’ तंत्रज्ञान लष्करी वापरास देण्याचे ठरविले तेव्हा कर्मचार्‍यांनी नडेला यांना एका पत्राद्वारे कळविले की त्यांचे श्रमदान विध्वंसक कृत्यात वापरले जाऊ नये, युद्धसामग्री विकसित करण्यासाठी त्यांनी मायक्रोसॉफ्टची नोकरी पत्करलेली नाही. गूगलचे ‘प्रोजेक्ट मेव्हन’ तंत्रज्ञान अमेरिकी सैन्याला उपलब्ध करून देऊ नये यासाठी गूगलच्या कर्मचार्‍यांनी स्वाक्षरीमोहीम काढली होती. एकीकडे अमेरिकी सेनेच्या मोठ्या ऑर्डरच्या अपेक्षेत असलेले गूगलचे महत्त्वाकांक्षी व्यवस्थापक आणि दुसरीकडे आपली नैतिकता धरून राहणारे काही कर्मचारी. चार हजार कर्मचार्‍यांनी गूगलच्या सुंदर पिचाईंना पत्राद्वारे कळविले की गूगलने किंवा सहकारी संस्थांनी कधीही त्यांचे तंत्रज्ञान युद्धासाठी वापरता कामा नये, असे त्यांना लेखी हवे आहे. गूगलने लंडनमधील डीप-माइंड टेक्नॉलॉजी कंपनी विकत घेतली तेव्हा त्यांच्या कर्मचार्‍यांनी करारात नमूद केले होते की डीप-माइंड तंत्रज्ञान लष्करी सेवेत कधीही वापरले जाणार नाही. त्यामुळे डीप-माइंड कंपनीमधूनही प्रतिकार झाला. अ‍ॅमेझॉनची परिस्थिती मायक्रोसॉफ्ट आणि गूगलच्या वरताण झाली. त्यांच्या कर्मचार्‍यांनीच नाही तर अमेरिकन सिव्हिल लिबरटीज् युनियन या सामाजिक संस्थेने दीड लाख स्वाक्षर्‍या जमवून अ‍ॅमेझॉनने त्यांचे ‘रेकग्निशन’ तंत्रज्ञान लष्करी वापरास देण्यास विरोध केला. 

इतिहासातही तंत्रज्ञानाचा भीषण वापर झाला आहे. १९१५ साली पहिल्या महायुद्धाच्या सुमारास क्लारा इमरवाहर नावाची जर्मन रसायनशास्त्रज्ञा होऊन गेली. तिचा नवरा फ्रित्झ् हेबर हा विषारी वायूंवर संशोधन करीत होता. युद्ध सुरू होताच त्याने जर्मन सरकारला सुचविले की विषारी वायू वापरून शत्रूला नामशेष करता येईल. क्लाराने या गोष्टीला जबर विरोध केला. फ्रित्झ् हेबरने मानवी विकासासाठी केलेले संशोधन मानवी विनाशासाठी वापरणे याला क्लाराने ‘perversion of science’ म्हणजे ‘शास्त्राचा विकृत वापर’ म्हटले. असे कदापि होऊ नये यासाठी सरकारच्या विरोधात क्लारा उतरली. पण महायुद्ध जुंपले आणि जर्मनीकडून विषारी वायूचा वापर झाला. हे स्वतःचे अपयश मानत क्लारा इमरवाहरने अखेर आत्महत्या केली. अशी अजून अनेक उदाहरणे असतीलही, पण बलाढ्य जागतिक कंपन्यांतून अशा प्रमाणात विरोध होण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असेल.

मानवी विकासात जुंपलेल्या तांत्रिक प्रगतीतून प्रत्येक टप्प्यात शस्त्रास्त्रे अधिक भीषण होत गेली आणि युद्धे अधिक विध्वंसक झालीत. वाफेचे संशोधन करणाऱ्या जेम्स वॅटने वाफेच्या इंजिनाचा शोध लावला तो मानवी उपयुक्ततेसाठीच. पण त्याचा वापर करून आपण धातू घडवून तोफा, रणगाडे आणि पाणबुड्या बनवू शकलो. टेलीग्राफच्या शोधाने तार करून जगाच्या पाठीवर क्षणात संपर्क साधता येऊ लागला आणि हेच तंत्रज्ञान पहिल्या महायुद्धाच्या दळणवळणात अत्यंत उपयुक्त ठरले. परम देशभक्त फ्रित्झ् हेबर, क्लाराचा नवरा, याने पहिल्या महायुद्धाची पुकार होताच आपले संशोधनकार्य जर्मन सैन्याच्या वापरात लावले. युद्धात विषारी वायूचा वापर सुचविल्याने हेबरला रासायनिक युद्धाचा जनक अशी पदवी मिळाली. त्याने ‘हेबर सिंथेसिस’ पद्धतीचा शोध लावला, ज्यामुळे अमोनिया वायू तयार करता आला आणि रासायनिक खते बनविली जाऊ लागली. पण या प्रक्रियेत नत्र तयार झाले आणि त्यातून स्फोटक बनले. रासायनिक खतांचे उत्पादन वाढले तशी अन्नसुरक्षा प्राप्त झाली आणि लोकसंख्येचा स्फोट झाला व नत्राने युद्धातील स्फोट घडवून आणले. इतक्या मोठ्या विनाशाचा जनक फ्रित्झ् हेबर, याला १९१८ साली नोबेल पारितोषिक मिळाले. खुद्द आल्फ्रेड नोबेल, नोबेल पारितोषिकाचा प्रवर्तक, यांचे नायट्रोग्लीसरीन बनविण्याचे कारखाने होते. त्यांनी सुरुंगाचा शोध लावला. पण मायक्रोसॉफ्ट, गूगल आणि अ‍ॅमेझॉनकडे आकर्षित होणारे बहुतांश कर्मचारी आपण सुखसोयींसाठी तंत्रज्ञान विकसित करणार या विश्वासाने येतात. त्यांचे श्रम लष्करी कामात लावून त्याची विध्वंसक क्षमता वापरणे म्हणजे केवढा मोठा अनर्थ! 

प्रोजेक्ट मेव्हन, ज्यासाठी गूगल प्रयत्न करीत आहे त्याने बिग डेटा आणि कृत्रिमप्रज्ञेची मेळ घातली जाईल. गूगलच्या प्रवक्त्याने पत्रकार परिषदेत सांगितले की हे तंत्रज्ञान थेट आक्रमणात वापरले जाणार नाही. पण पेन्टागॉन म्हणते की प्रोजेक्ट मेव्हनमुळे ड्रोनच्या चित्रणाचे कृत्रिमप्रज्ञेद्वारा विश्लेषण करून गोष्टी ओळखता येतील. यामुळे हल्ले अधिक अचूक करता येतील. हे तंत्रज्ञान इराक आणि सीरियामध्ये वापरले जाईल असेही पेन्टागॉनने स्पष्ट केले आहे. पण तरीही गूगलचे जेष्ठ मार्गदर्शक आणि इंटरनेटचे एक जनक व्हींट सर्फ म्हणाले की गूगलचे तंत्रज्ञान केवळ स्थानिक माहिती (सिच्युएशनल अवेअरनेस) गोळा करण्यात वापरले जाणार आहे!

अ‍ॅमेझॉनचे ‘रेकग्निशन’ तंत्रज्ञान चेहरा ओळखण्याच्या कार्यात (फेशियल रेकग्निशन) कुशल आहे. मोबाईल फोन, टॅब आणि लॅपटॉपमध्ये याचा वापर, तसेच हरविलेली मुले शोधणे आणि चोरांचे चेहरे तपासणे अशा सामाजिक कार्यातही याचा उपयोग आहे. पण आता अ‍ॅमेझॉन हे तंत्रज्ञान इमिग्रेशन आणि सीमाशुल्क खात्याला विकणार आहे. या गोष्टीला अमेरिकन सिव्हिल लिबरटीज् युनियन, अ‍ॅमेझॉनचे कर्मचारी आणि भागीदारही विरोध करीत आहेत. ट्रम्प सरकारची अलिखित धोरणे बघता विरोधकांच्या मते याचा वापर वांशिक, रंगभेद आणि सामाजिक पडताळणीसाठी (रेशियल प्रोफाईलिंग) केला जाऊ शकतो. तसेच हे तंत्रज्ञान चलचित्रांच्या चित्रीकरणात वापरून जनतेवर टोकाची पाळत ठेवता येईल. या आक्षेपावर तोडगा म्हणून अ‍ॅमेझॉनचे मायकल पुंके यांनी जाहीर केले की आम्ही चेहरा ओळखण्याच्या तंत्रज्ञानाचा गैरवापर होऊ नये यासाठी सरकारला धोरणे आणि नियमावली बनवायचा आग्रह धरला आहे आणि आम्हाला यात मायक्रोसॉफ्टची साथ आहे. मायक्रोसॉफ्टही असे तंत्रज्ञान विकसित करत आहेत. पुंके म्हणाला की नवीन तंत्रज्ञानाचा दुरुपयोग होऊ शकतो या कारणाने त्यावर बंदी घालणे चुकीचे आहे. त्यापेक्षा याच्या लाभार्थींनी एकत्र येऊन गैरवापर होऊ नये यासाठी पावले उचलली पाहिजेत. पुंके यांचा आशावाद प्रत्यक्षात अवतरला तर शस्त्रास्त्रांचा अतिरेक्यांकडून गैरवापर झालाच नसता!

कृत्रिमप्रज्ञेचा वापर अशा मार्गाने जाऊ शकेल का? या प्रश्नाचे उत्तर नक्कीच ‘हो’ असे आहे. आज अशा प्रकारचा घातक वापर चालू झालेला आहे. या तंत्रज्ञानाचा वापर ‘deepfake’ म्हणजे फोटो किंवा चलचित्रांमध्ये धादांत खोटेपणा आणण्यासाठी वाढत चालला आहे. कृत्रिमप्रज्ञेमध्ये काम करणारी एक कंपनी “डीपट्रेस” यांनी सप्टेंबर २०१९ मध्ये १५,००० डीपफेक चलचित्रे शोधून काढलीत. यांपैकी ९६ टक्के फोटो अश्लील होते आणि ९९ टक्के फोटोतून महिला सेलिब्रिटींपासून ते पॉर्न स्टार्सपर्यंत सगळ्यांचे चेहरे जोडले होते. जगभरातून डीपफेक तंत्राचा वापर करून “रिव्हेंज पॉर्न” म्हणजे सूडबुद्धीने केलेले अश्लील फोटो बनविले जात आहेत. 

खोटे फोटो, खोटी चलचित्रे आणि खोट्या बातम्या हा एक भाग झाला. पण डीपफेकचा भीषण परिणाम म्हणजे सत्य आणि असत्य वेगळे करू न शकणाऱ्या समाजात विश्वास टिकून तरी कसा राहणार? याचा केवढा घातक फायदा उठवता येईल! गेल्या वर्षी अॅम्नेस्टी इंटरनॅशनलने कॅमेरूनचे सैनिक आपल्याच नागरिकांना फाशी देत असल्याचे चलचित्र प्रसिद्ध झाले. हा क्रूर प्रकार जगासमोर येताच कॅमेरूनच्या दळणवळण मंत्र्यांनी पत्रकारपरिषदेत सांगितले की हे चलचित्र डीपफेक आहे! आता काय खरे काय खोटे हे कसे ठरवणार!

गेल्या मार्च महिन्यात कृत्रिम बुद्धिमत्तेत आणि त्यासंबंधित क्षेत्रात काम करणारे हजारहून जास्त पुढारी आणि संशोधक एकत्र आले आणि खुल्या पत्रावर स्वाक्षरी केली. टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि ट्विटरचे मालक ॲलॉन मस्कही यांत सहभागी होते. पत्रातून त्यांनी इशारा दिला की एआय तंत्रज्ञानाच्या चुकीच्या वापरातून समाज आणि मानवतेवर गंभीर परिणाम होतील. कृत्रिमप्रज्ञेविषयी काम करणाऱ्या मोठ्या कंपन्यांना पत्रातून आव्हान केले की किमान सहा महिन्यांसाठी विकास थांबवावा, जेणेकरून या तंत्रज्ञानातील संभाव्य धोके अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतील. मॉन्ट्रियल विद्यापीठाचे प्राध्यापक आणि कृत्रिमप्रज्ञा संशोधक योशुआ बेंजिओ म्हणाले की, अत्यंत शक्तिशाली कृत्रिमप्रज्ञा प्रणालीमध्ये काय चूक होऊ शकते हे समजून घेण्याची आपली क्षमता आज खूप कमकुवत आहे. त्यामुळे आपण अत्यंत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

कृत्रिमप्रज्ञेला नीतिमूल्यांचे बंधन आहे का? त्यात त्याची चूक झाल्यास जबाबदार कोण? हा प्रश्न आज वारंवार समोर येत आहे. मायक्रोसॉफ्टने किशोरवयीन मुलाची नक्कल करण्यासाठी बनविलेले एक चॅटबॉट प्रसिद्ध झाल्यानंतर काही तासांतच त्यावरून वर्णद्वेषी संभाषण सुरू झाले. अ‍ॅमेझॉनने कर्मचारी भरतीच्या मदतीसाठी बनविलेल्या प्रणालीत महिला अर्जदारांवर भेदभाव केला जाऊ लागला. अनेक तथाकथित “स्मार्ट” प्रणालींमुळे खोटी अटक झाली आहे, गुन्हेगारांना चुकीचा जामीन दिला गेला आणि अगदी प्राणघातक अपघातदेखील झाले आहेत. अशा घटनांना जबाबदार कोण? यंत्र की मानव? कृत्रिमप्रज्ञेचे लाभार्थी त्याच्या वापराच्या परिणामांपासून सुटका करून घेऊ शकत नाहीत. पण दुर्दैवाने याबाबतीतले कायदेकानूनही नीट विकसित झाले नाहीत. डिजिटल नैतिकता हा एक नवीन विषय आता चर्चेत आला आहे. कृत्रिमप्रज्ञेचा नैतिक वापर होण्यासाठी किमान तीन परस्परसंबंधित गोष्टीं ध्यानात घेणे आवश्यक आहे: कार्यक्षमता, त्यात वापरला जाणारी विदा (आकडेवारी) आणि खुद्द प्रणाली. पण निष्पक्ष आणि अचूक कृत्रिमप्रज्ञाधारित प्रणाली तयार करण्यासाठी आणि राखण्यासाठी अनेक कंपन्या कार्यक्षम नाहीत, किंवा त्यांच्याकडे तसे कौशल्यही नाही. अशा वेळेस काही मोठ्या तज्ज्ञ कंपन्यांची एकाधिकारशाही होण्याची भीती आहे. 

थोडक्यात काय तर कृत्रिमप्रज्ञा विकसित होत आहे, त्याचा उद्योगक्षेत्रात आणि अर्थव्यवस्थेत फायदा होणार आहे. पण याचा चुकीचा वापर होणे सहज शक्य आहे. मुक्त बाजारपेठ व्यवस्थेत तंत्रज्ञानाचा वापर कोणी कसा करावा यावर निर्बंध नसतात. व्यावसायिक स्पर्धा आणि आर्थिक वृद्धीच्या ध्यासाने ग्रासलेल्या सी.ई.ओं.वर संचालकमंडळाचा आणि भागीदारांचा दबाव असतो. भांडवलशाहीच्या अर्थव्यवस्थेत स्वतःची नैतिकता जपून ठेवणे अवघड आहे, पण अशक्य नाही.

लेखक सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट, गोखले इंस्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स पुणे येथे प्राध्यापक आणि संचालक आहेत. इकॉलॉजिकल सोसायटीचे विश्वस्त आणि पुणे इंटरनॅशनल सेंटरचे सीनियर फेलो आहेत.

अभिप्राय 3

  • या लेखात श्री. नूलकर यांनी कृत्रिम प्रज्ञेची सांगड तंत्रज्ञानाशी घालून अशा प्रकारच्या वैज्ञानिक शोधांचा दुरुपयोग मानवाच्या आणि मानवीसमाजाला कसा घातक ठरलेला आहे हे सोधारण स्पष्ट केले आहे. शास्त्रज्ञ मानवाच्या स्वास्थ्यासाठी नवनवीन शोध लावतात; पण नतद्रष्ट लोक त्याचा गैरवापर कसा करतात हे चांगल्या प्रकारे विषद केले आहे. त्यामुळे मानवाची आत्मघातकी मानसिकता बदलल्या शिवाय नवनवीन शोधांचा असाच गैरवापर होत रहाणार.

  • डाॅ. नुलकर यांनी लिहिलेल्या ह्या लेखामुळे नकळत एच. जी. वेल्स सारख्या लेखकांची आठवण झाली. लहानपणी जी पुस्तकं वाचायला गंमत वाटली त्यातील गोष्टी आता खर्या ठरतील का काय असे वाटते. वैज्ञानिक कल्पनारम्य कथा कुठे तरी वास्तविकतेवर आधारित असतात असं ऐकले आहे. पण हा लेख वाचून भिती देखिल वाटते आणि सत्य परिस्थितीची जाणीव ही होते.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.