माकडाच्या हाती कोलीत

जंगलात भटकणाऱ्या आदिमानवाने प्रगती करत विज्ञानात आज एवढी झेप घेतली आहे, की आता त्याने निर्माण केलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे माणसाच्या अस्तित्वालाच धोका उत्पन्न होईल की काय अशी शंका येऊ लागली आहे. संगणकाची निर्मिती झाल्यापासून मानवी जीवनात खूपच उलथापालथ झाली आहे हे मान्य व्हावे. संगणकाच्या सहाय्याने अनेक माणसांचे काम एकच माणूस, आणि तेही बिनचूक करू लागल्याने ते अनेक आस्थापनांना फायदेशीर ठरत आहे. पण त्यामुळे कर्मचारी कपात होऊन बेरोजगार लोकांची संख्या वाढू लागली आहे. हा मानवी समाजाला धोकाच ठरत आहे. एकीकडे लोकसंख्यावाढ आणि दुसरीकडे नोकऱ्यांची संख्या कमी होणे; असा दुहेरी ताण देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडू लागलेला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता ही दुधारी शस्त्रासारखी आहे. आपल्या देशात स्मार्टफोनच्या रूपाने ती घराघरात घुसलेली आहे. पण तिचा वापर करणाऱ्यांना तिच्या तांत्रिक ज्ञानाची ओळख नसल्याने तिचा योग्यप्रकारे वापर करणे शक्य होत नाही, हीच चिंतेची बाब आहे. त्यामुळे ती माकडाच्या हाती कोलीत दिल्यासारखी ठरू शकते. शास्त्रज्ञांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा शोध लावला खरा; पण तो भगवान शंकरांकडून वर प्राप्त झालेल्या भस्मासुरासारखा ठरलेला आहे, असे बोलणे वावगे ठरू नये. या भस्मासुरावर नियंत्रण ठेवण्यासाठी आता शास्त्रज्ञांना भगवान विष्णूसारख्या मोहिनी अस्त्राचा शोध लावणे आवश्यक आहे. विज्ञानाच्या प्रगतीमुळे निर्माण करण्यात आलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने खऱ्याचे खोटे आणि खोट्याचे खरे करण्याची हातचलाखी शक्य होऊ लागली आहे. एखाद्या समूहफोटोत त्याप्रसंगी उपस्थित नसलेल्या व्यक्तीला स्थान देता येऊ शकते, किंवा त्या समूहफोटोत असलेल्या व्यक्तीची छबी काढून टाकणेही शक्य होते. एखाद्या स्त्रीसोबत भलत्याच व्यक्तीची छबी जोडून तिच्या कुटुंबात तिच्याविषयी गैरसमज पसरवणे शक्य झाले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा हा दुरुपयोग समाजाला घातक होऊ शकतो. अलिकडे या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने अनेक सायबर गुन्हे घडू लागलेले आहेत. एखाद्या अनोळखी व्यक्तीकडून आलेला फोन चुकून घेतला गेला तरी आपली वैयक्तिक, अर्थिक माहिती त्या फोन करणाऱ्याला मिळून आपल्या बॅंकखात्यातील रक्कम जाऊ शकते. त्यामुळे ही कृत्रिम बुद्धिमत्ता मानवाच्या प्रगतीला उपकारक असली; तरी समाजकंटकांकडून होणाऱ्या दुरुपयोगामुळे ती तेवढीच हानिकारक ठरू शकते. 

मानवाने विज्ञानक्षेत्रात केलेल्या प्रगतीच्या सहाय्याने लावलेला कृत्रिम बुद्धिमत्तेचा शोध मानवी जीवनात जेवढा क्रांतिकारक आहे, तेवढाच मानवी जीवनाला घातकही आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता ही ‘अल्लाउद्दिनचा जादूचा दिवा’ या गोष्टीतील राक्षसासारखीच म्हणावी लागेल. सांगितलेली कामे भराभर करणाऱ्या राक्षसामुळे अगोदर खूष झालेला तो माणूस राक्षसाला देण्यासाठी काम न राहिल्यामुळे अडचणीत येतो. तो राक्षस शेवटी आपल्या मालकालाच खायला निघतो. दुसरा एक बुद्धिमान, शहाणा माणूस मग त्या माणसाला एक शिडी देतो आणि त्या राक्षसाला शिडीवर चढण्याचे व उतरण्याचे काम देतो. दुसरे कोणते काम सांगेपर्यंत तेच ते काम करत रहायला सांगून हा माणूस राक्षसापासून सुटका करून घेतो. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बाबतीत अशीच काहीतरी क्लृप्ती शोधून काढणे आवश्यक आहे.

टिळक नगर,चेंबूर, मुंबई

अभिप्राय 2

  • तंत्रज्ञान हे न्यूट्रल असते. कुठलेही तंत्रज्ञान हे मा. हा. को. असते. वापरणारा सुष्ट आहे की दुष्ट यानुसार ते ठरेल.

  • मी सहमत आहे. येणाऱ्या दिवसांचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढीची गती आश्चर्यकारक आहे. आणि लेखकाने म्हटल्याप्रमाणे अगदी बरोबर आहे, प्रत्येकजण त्यासाठी तयार असेल असे नाही. हे लहान मुले, तरुण आणि प्रौढांसाठी देखील गैरसोयीचे ठरू शकते. अंमलबजावणीपूर्वी स्पष्ट विचार करणे आवश्यक आहे अन्यथा ते दिशाभूल करणारी माहिती देऊ शकते. उपलब्ध माहितीचा कोणी कसा अर्थ लावतो यावर ते मुख्यतः अवलंबून असते. कृपया जागरूक रहा.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.