लिव्-इन विथ AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स

२०२२ च्या ऑक्टोबर-नोव्हेंबर पासून AI च्या चर्चा रंगल्यात. चॅटजीपीटीमुळे सर्वांचे लक्ष जणू या एका बिंदूपाशी येऊन थांबले आणि आपण सर्वांनी कळत नकळत या कृत्रिमप्रज्ञेला डेट करायला सुरुवात केली आणि आता साधारण ७-८ महिन्यांनी हे नाते या टप्प्यावर आले आहे की ‘लिव्-इन’मध्ये राहून पाहूयात जरा. 

कारण कृत्रिमप्रज्ञा हा आपल्या आयुष्यातला होऊ घातलेला नवीन जोडीदार आहे यात शंका नाही. पण संसार थाटायच्या आधी जोडीदाराला समजून घेणे गरजेचे आहे.

तर २०२२ च्या किती आधीपासून आपण कृत्रिमप्रज्ञा हे तंत्रज्ञान वापरत आहोत? मग ते गूगलने पुरवलेले नकाशे असूदेत नाहीतर ऑनलाइन चॅट-बॉट्स असूदेत किंवा टायपिंग करताना स्वतःहून दुरुस्त होऊन येणारे शब्द असूदेत. म्हणजे हा जोडीदार आपल्या आयुष्यात कधीचाच आलाय. त्याच्याकडे आपले लक्ष आत्ता गेले आहे. 

माणसाचे लक्ष एखाद्या गोष्टीकडे लगेच आकर्षित होण्यामागे ढोबळमानाने दोन गोष्टी कारणीभूत असतात. एक तर भीती आणि दुसरी जिज्ञासा. आणि चॅटजीपीटीच्या माध्यमातून कृत्रिमप्रज्ञेबाबतीतील कुतूहल आणि भीती दोन्हीं वाढले आहेत. ही उत्क्रांतीची नवीन पायरी आहे आणि उत्क्रांती ही केवळ विकसित होत राहते, थांबत नाही. त्यामुळे  “कृत्रिमप्रज्ञा नकोच रे बाबा” असे म्हणून ते काही थांबणारे नाही. त्याऐवजी आपल्याला कृत्रिमप्रज्ञेचा हात धरून पुढे चालत राहावे लागेल. ते म्हणतात ना, “Change is the only Constant”.

कृत्रिमप्रज्ञेमुळे नोकऱ्या जातील, विषमता वाढेल, पक्षपात होईल, सर्जनशीलता कमी होईल हे सर्व सर्व जरी खरे असले तरी कृत्रिमप्रज्ञा आपल्यासोबत असेलच. जसे प्रेमप्रकरण आणि लग्न यातला मध्य म्हणून लिव्-इन थोड्याफार प्रमाणात स्वीकारले जाते आहे. तसेच तंत्रज्ञान, सर्जनशीलता आणि मेहनत यांचा मध्य ही कृत्रिमप्रज्ञा ठरू शकते. विवेकी विचारांच्या साथीने लिव्-इनमध्ये राहता येऊ शकते; पण अविवेकीपणाचे धोकेही लिव्-इनमध्ये आहेत. तसेच कृत्रिमप्रज्ञेचे. 

तुम्हीं-आम्हीं कृत्रिम बुद्धिमत्तेसोबत कश्या पद्धतीने वागणार यावर हे नाते पूरक किंवा विखारी ठरणार आहे.

मानवी बुद्धिमत्तेला (Human Intelligence) जशी मूलभूत प्रशिक्षणाव्यतिरिक्त सहानुभूती , वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेक, लैंगिकता, मर्यादा या मूल्यांचे शिक्षण गरजेचे आहे त्याचप्रमाणे AI ला गोपनीयता, सामाजिक हक्क आणि मर्यादा गरजेच्या आहेत . पण आपल्यासमोरचा पेच असा आहे की AI तयार करण्याचे काम HI (Human Intelligence) करीत आहे, वापरीत आहे. आता मानवी बुद्धिमत्तेची अनिश्चितता, अवगुण आपल्याला माहिती आहेतच. यामुळेच की काय, मार्च २०२३ मध्ये Future of life या संस्थेने Pause Giant AI Experiments : An Open Letter या शीर्षकाचे एक पत्रक जाहीर केले आणि त्याला युवाल नोव्हा हरारी, ॲलन मस्क, स्टीव्ह वोझ्नियाक, जेफ ऑर्लोस्की-यांग यांसारख्या दिग्गजांनी संमती दर्शवली. यात विचारलेले प्रश्न महत्त्वाचे आहेत. जसे की,

  • आपल्या माहितीची दारे उघडण्यासाठी आपण प्रचार आणि अवास्तवता यांचे पूर यंत्रांद्वारे येऊ द्यावेत का?
  • आपल्याला समाधान देणाऱ्या, समृद्ध करणाऱ्या कामांसकट सगळ्याच कामांना स्वयंचलित यंत्रांवर सोपवावे का?
  • संख्येत, गुणवत्तेत, विचारांत, हुशारीत आपल्या वरताण ठरणारे मानवेतर पर्याय आपण विकसित करायला हवे का?
  • सामाजिकीकरणावरील आपले नियंत्रण सुटण्याचा धोका आपण पत्करायचा का?
  • Should we let machines flood our information channels with propaganda and untruth? 
  • Should we automate away all the jobs, including the fulfilling ones? 
  • Should we develop non-human minds that might eventually outnumber, outsmart, obsolete and replace us? 
  • Should we risk the loss of control of our civilization?

आणि यासाठीच कमीत कमी ६ महिने AI च्या जीपीटी-४ च्या पुढचे संशोधन थांबवावे आणि समाजाला कृत्रिमप्रज्ञेसोबत जुळवून घेण्याची संधी द्यावी असे या पत्रकात म्हटले आहे. 

हल्लीच (जून २०२३) चॅटजीपीटी तुम्ही वापरायला गेलात तर तुम्हाला एक विनामूल्य आवृत्ती (free version) आणि एक समूल्य आवृत्ती पाहायला मिळेल. अर्थातच समूल्य आवृत्ती ही अधिक सोयीची असली तरी तिच्यासाठी अधिक किंमत मोजावी लागेल. म्हणजेच अधिक पैसे देऊन उत्तम सेवा मिळवता येईल. बड्या उद्योजकांना हे सहज शक्य होईल. पण कमी सोयीची विनामूल्य आवृत्तीदेखील आहे आणि तिच्यासोबतचे धोकेही आहेतच. 

अन, वस्त्र, निवारा यांपासून ते पाणी, हवा, शिक्षण, इंटरनेटपर्यंत माणसाच्या मूलभूत गरजांची यादी अद्ययावत होत राहिली आहे. भविष्यात त्यात AI ची भर पडली तर नवल नाही. कृत्रिमप्रज्ञा केवळ Computer Screen, Mobile screen पुरती मर्यादित नसेल यात काही शंका नाही; परंतु तिचा वापर करण्यासाठी मोबाईल आणि संगणक ही सर्वांत सोपी माध्यमे होऊ शकतील. यासाठीच कृत्रिमप्रज्ञेच्या ही आधी माणसांच्या मूलभूत गरजांच्या यादीत “Digital Education” असणे आवश्यक आहे.

समाजात जसे समाजसुधारक आवश्यक आहेत तसेच Digital etiquette साठी Digital सुधारक गरजेचे आहेत. टीव्ही असो, यू-ट्युब असो, कुठले चॅनेल बघावे ही निवड आपली असते. जसे लिव्-इनमध्ये कोणासोबत राहावे, समाजमाध्यमांवर काय सहप्रचीत (share) करावे ही निवड आपली असते. आपल्याला भरमसाठ पर्याय देऊन आपली निवड करण्याची क्षमता कमी करण्याचे काम कृत्रिमप्रज्ञा आणि त्यामागचे भांडवलदार करीत आहेत. ‘विचारावाचून कृती’ (आवेगपूर्ण, Impulsive) हे त्यांचे भांडवल आहे. आणि ही निवड करता येण्याचे तंत्रज्ञान म्हणजे ‘विवेकी विचार’.

यामुळेच या होऊ घातलेल्या उत्क्रांतीसाठी आपण सर्वांनी तयार राहणे गरजेचे आहे. कृत्रिमप्रज्ञा वापरण्याच्या कला शिकणे गरजेचे आहे. कृत्रिमप्रज्ञेमुळे अनेक क्षेत्रात क्रांती नक्कीच होऊ शकेल. वैद्यकीयक्षेत्रात सोयी-सुविधा वाढतील, अनेकांचे जगणे सुखकर होईल, मानवी चुकांमुळे (Human error) होणारे नुकसान कमी होईल. अर्थातच या वेगवान उत्क्रांतीत गतीरोधकांची आवश्यकता भासेल आणि ते गतीरोधक बसवण्याचे काम HI (Human Intelligence) चेच आहे. आणि याच नोंदीवर राहत इंदोरी यांच्या प्रसिद्ध शायरीमधील काही ओळी आठवतात:

लगेगी आग तो आएँगे घर कई ज़द में
यहाँ पे सिर्फ़ हमारा मकान थोड़ी है।

मोबाईल: 9967753696

अभिप्राय 2

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.