मार्क्सची अर्थमीमांसा : भाग १

जगाच्या इतिहासात जी प्रतिभावंतांची मांदियाळी होऊन गेली, त्यांपैकी मूलगामी विचारवंत म्हणून संपूर्ण जगाला परिचित असलेल्या कार्ल मार्क्सच्या अर्थशास्त्राची अन्वेषणा करण्याचे येथे योजले आहे. ही अन्वेषणा मुख्यत: मार्क्सच्या अर्थशास्त्रीय दृष्टीचा वेध घेण्याचा प्रयत्न करते.

मार्क्सला स्वीकारण्या अथवा नाकारण्याऐवजी त्याला समजून घेण्यात ज्यांना रस आहे, केवळ अशा व्यक्तींच्या दृष्टीनेच ह्या लेखमालेस काही मूल्य असू शकेल.

प्रस्तुत लेखनाचा हेतू हा मार्क्सच्या अर्थशास्त्रीय विश्लेषणाची विद्यमान अर्थशास्त्राशी तुलना करणे आणि मार्क्सच्या अर्थविचारांवर भाष्य करणे, असा आहे. मार्क्सविचारातील क्षमतास्थळे व कमकुवत स्थळे कोणती याची जाणीव करून घेत, अर्थशास्त्राच्या आधुनिक वैचारिक परंपरेच्या प्रकाशात मार्क्सविचाराचा वेध घेणे, हा या लेखनाचा उद्देश आहे.

क्रयवस्तूचे रहस्य 

मार्क्सची अर्थमीमांसा ही ‘राजकीय अर्थशास्त्राची’ मीमांसा होय. मार्क्सपूर्व सनातनवादी अर्थविचारांची आणि त्या अर्थविचारांचा विषय असलेल्या भांडवली उत्पादनाची मीमांसा होय. जगावर साम्राज्यवाद आणि वसाहतवाद लादणाऱ्या औद्योगिक राष्ट्रांच्या आर्थिक चारित्र्याची समीक्षा होय.

आपल्या ह्या समग्र अर्थचिंतनास मार्क्स क्रयवस्तूंच्या (Commodity) विश्लेषणापासून प्रारंभ करतो. त्यामुळे येथे असा प्रश्न विचारता येईल की, मार्क्सने आपल्या चिंतनास जो प्रारंभ केला तो क्रयवस्तूंच्या विश्लेषणापासूनच का केला असावा? 

ह्या प्रश्नाचे उत्तर थोडक्यात देता येईल, ते असे : 

मार्क्सची अर्थमीमांसा ही भांडवलशाही उत्पादनपद्धतीची मीमांसा आहे. 

मार्क्सच्या मते, “भांडवलशाही उत्पादनपद्धतीवर चालणारा जो समाज आहे, त्या समाजातील संपत्तीचे स्वरूप हे ‘विक्रेय वस्तूंचा प्रचंड संचय (साठा)’ ह्या प्रकारचे असते.” 

आता, ज्या समाजात वस्तूला बाजारमूल्य प्राप्त झालेले असते, अर्थात ज्या वस्तूची किंमत पैश्यात व्यक्त करता येते, अशी वस्तू ही केवळ वस्तू न उरता ‘क्रयवस्तू’ बनते. अशा ‘विक्रेय वस्तूंचा प्रचंड साठा’ हे भांडवली समाजातील संपत्तीचे स्वरूप असते. दुसरी गोष्ट अशी की, ह्या संपूर्ण भांडवली उत्पादनपद्धतीचा शेवटचा एकक ही एक क्रयवस्तूच असते. ह्या दोन महत्त्वाच्या कारणांमुळे मार्क्सने क्रयवस्तूंच्या विश्लेषणाने आपल्या संशोधनास प्रारंभ केला आहे.

सनातनवादी अर्थशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या अॅडम स्मिथ ह्यानेसुद्धा ‘राष्ट्रांच्या संपत्ती’चे स्वरूप व तिच्या निर्मितीमागील कारणांची अन्वेषणा केली.

मार्क्सच्या अन्वेषणेचा प्रारंभबिंदूसुद्धा ‘संपत्ती’ हाच आहे; मात्र ही संपत्ती ज्या क्रयवस्तूंच्या रूपात व्यक्त झाली आहे, तिच्या एकक रूपाचा वेध घेण्याचा प्रयत्न मार्क्सने केला आहे. स्मिथ आणि मार्क्स ह्या दोघांचे संपत्तीविषयक आकलन अगदी भिन्न प्रसंगी विरूद्ध स्वरूपाचे आहे. तूर्तास, मार्क्सला अभिप्रेत असलेल्या ‘संपत्ती’पुरते आपले विवेचन मर्यादित ठेवूयात.

सामान्यतः संपत्ती म्हणजे ज्या वस्तूला बाजारमूल्य आहे. अर्थात, जिचे मूल्य पैशात व्यक्त केले जाते व जिची देवाणघेवाण करता येते, अशी कोणतीही वस्तू अर्थशास्त्रात ‘संपत्ती’ म्हणून ओळखली जाते. आता, ह्या वस्तूची देवाणघेवाण वस्तूविनिमयावर आधारलेल्या समाजातील देवाणघेवाणीप्रमाणे असणार नाही, हे उघड आहे.

संपत्तीची काही वैशिष्ट्ये आधुनिक अर्थशास्त्राने मान्य केली आहेत.

संपत्तीला संपत्ती असे तेव्हाच म्हणता येते, जेव्हा तिच्यात १) उपयोगिता, २) दुर्मिळता, ३) विनिमयता आणि ४) मनुष्यबाह्यता हे चार गुण असतात. संपत्तीमध्ये मानवाच्या गरजापूर्तीची जी क्षमता असते, त्यातून संपत्तीचा उपयोगिता हा गुण स्पष्ट होतो. ज्या वस्तूंच्या मागणीच्या तुलनेत पुरवठा दुर्मिळ असेल, ज्या वस्तू सहजासहजी उपलब्ध होत नसतील, अशा वस्तूंना त्यांच्या ‘दुर्मिळता’ ह्या गुणामुळे संपत्ती मानता येईल. ज्या वस्तूंचा विनिमय स्थळ, काळ आणि व्यक्ती यांमध्ये होतो, ती वस्तू संपत्ती असते. आता, संपत्तीचे उपयोगिता, दुर्मिळता आणि विनिमयता हे तीनही गुण स्वीकारण्यात असे अभिप्रेत आहे की, ती वस्तू मनुष्यबाह्य आहे. ती वस्तू मनुष्यबाह्य असत नाही, तोपर्यंत तिला यथार्थपणे ‘संपत्ती’ ही संज्ञा लावता येणार नाही.

उदाहरणार्थ, मानवी शरीरातील रक्तामध्ये उपयोगिता, दुर्मिळता आणि विनिमयता हे तीनही गुण आहेत; पण म्हणून मानवी शरीरातील रक्त हे संपत्ती होऊ शकणार नाही. व्यक्ती जेव्हा ‘रक्तदान’ करते, तेव्हा रक्तपेढीत संचय झालेल्या रक्तालाच ‘संपत्ती’ असे म्हणता येईल. कारण, त्यात उपयोगिता, दुर्मिळता, विनिमयतेबरोबरच मनुष्यबाह्यता हेही गुण आहेत. 

आधुनिक अर्थशास्त्राची संपत्तीची मीमांसा ही अशी आहे.

कार्ल मार्क्सनेसुद्धा क्रयवस्तूंच्या अर्थात संपत्तीच्या वैशिष्ट्याची चर्चा करताना ‘मनुष्यबाह्यता’ आणि ‘उपयोगिता’ ह्या दोन वैशिष्ट्यांवर भर दिला आहे.

मार्क्स लिहितो, “क्रयवस्तूंच्या बाबतीत पहिले वैशिष्ट्य असे असते की ती आपल्यापेक्षा भिन्न असते आणि आपल्या अंगभूत गुणधर्मामुळे ती माणसाची कोणती ना कोणती गरज भागविते.” 

“क्रयवस्तू आपल्यापेक्षा भिन्न आहे”, असे मार्क्स म्हणतो तेव्हा ती ‘मनुष्यबाह्य’ आहे, असेच त्याला म्हणायचे असते आणि “आपल्या अंगभूत गुणधर्मामुळे ती माणसाची कोणती ना कोणती गरज भागविते” ह्यात क्रयवस्तूच्या ‘उपयोगिता’ ह्या गुणधर्माकडे मार्क्स निर्देश करीत आहे. अर्थात, मनुष्यबाह्य अशी उपयोगी क्रयवस्तू माणसाची गरज भागविते, असे मार्क्सला अभिप्रेत असावे.

येथे मार्क्सने आणखी एक खुलासा केला आहे.

‘मनुष्यबाह्य उपयोगी’ क्रयवस्तू माणसाची कोणती ना कोणती गरज भागविते, असे आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा ह्या गरजेचे नेमके स्वरूप काय असते? आणि वस्तूचा गरजेशी कशाप्रकारचा संबंध आहे? अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात ह्याची जाण मार्क्सला होती, असे दिसते.

मार्क्स लिहितो, “या गरजेचे स्वरूप काय आहे, उदाहरणार्थ, ती गरज पोटाची आहे की इच्छेची (हौसेची) आहे, ह्याला काहीच महत्त्व नसते.” 

मार्क्सने येथे गरजेच्या स्वरूपाचा – पोटाची गरज आणि हौसेची – हा जो भेद आहे, त्याला गौण ठरवून, ‘क्रयवस्तूत गरजापूर्तीची क्षमता असते.’ ह्या गोष्टीवर जो भर दिला आहे, त्यामागेसुद्धा एक कारण आहे.

निकोलस बारबॉनने आपल्या ‘नवी हलकी नाणी पाडण्यासंबंधी तर्क – लॉक यांच्या टिकेला उत्तर’ ह्या ग्रंथात म्हटले आहे: 

“इच्छा होण्यात गरज अभिप्रेत आहे. ती मनाची भूक असते आणि शरीराच्या भुकेइतकीच नैसर्गिक असते. मनाची भूक भागविण्याच्या गुणामुळे कितीतरी जास्त वस्तूंना मूल्य प्राप्त होते.”

निकोलस बारबॉनने मनाची गरज आणि शरीराची गरज ह्यांत भेद मानला आणि वस्तूंना मुख्यतः जे मूल्य प्राप्त होते, ते त्या वस्तूंमध्ये मनाची गरज पूर्ण करण्याची जी क्षमता आहे, त्यामुळे प्राप्त होते अशी बारबॉनचे एकूण भूमिका आहे. मार्क्सला हा भेद अमान्य होता, असे ह्यावरून सुचवायचे नाही. मात्र, त्या भेदाचा क्रयवस्तूला मूल्य प्राप्त होण्याशी तितकासा संबंध नाही, हे मार्क्सला सूचवायचे होते. मार्क्स म्हणूनच मनाची गरज आणि शरीराची गरज ह्यांतील भेदांत अडकत नाही.

तो म्हणतो की गरजेचे स्वरूप काय आहे हे जास्त महत्त्वाचे नाही, तर वस्तूंत सर्व स्वरूपांतील मानवी गरजांची आपूर्ती करण्याची क्षमता विद्यमान असते, हे जास्त महत्त्वाचे असते. त्यामुळे क्रयवस्तूतील उपयोगिता हा गुणधर्म त्याच्यादृष्टीने महत्त्वाचा आहे. 

दुसरा प्रश्न, वस्तूचा गरजेशी कशाप्रकारचा संबंध आहे? असा आहे. मार्क्स ह्यासंबंधी लिहितो,  “एखादी वस्तू ही गरज प्रत्यक्षपणे म्हणजे जीवनाचे (उदरनिर्वाहाचे) माध्यम म्हणून भागविते की उत्पादनाचे साधन म्हणून अप्रत्यक्षरीत्या पूर्ण करते याच्याशीही आपल्याला सध्या काही कर्तव्य नाही.”

मार्क्सने वस्तूचा गरजेशी कशाप्रकारचा संबंध असू शकतो, ह्यावर विचार केला होता, हे उपर्युक्त विधानावरून स्पष्ट होते. 

काही वस्तूंचा प्रत्यक्षपणे उपभोग घेतला जातो; तर काही वस्तू ह्या उपभोग्य वस्तूंच्या उत्पादनात केवळ सहाय्यक ठरतात. तशाचप्रकारे, काही वस्तू भांडवली अथवा चैनीच्या वस्तूंच्याही उत्पादनास अप्रत्यक्षरीत्या सहाय्यक ठरत असतात. आधुनिक काळात ह्यासंबंधीचे मूलगामी विवेचन प्रा. पिअरो स्त्राफा ह्यांनी आपल्या ‘क्रयवस्तूंच्या साधनांनी क्रयवस्तूंचे उत्पादन’ (Production of commodities by the means of commodities) ह्या ग्रंथात गांभीर्यपूर्वक केले आहे. 

आता, गहू ही एक क्रयवस्तू आहे. परंतु ती अंतिम क्रयवस्तू आहे (म्हणजेच ती उपभोगाचा विषय आहे) की उत्पादनास सहाय्यक ठरणार आहे, ह्यावर ती क्रयवस्तू कोणत्या प्रकारची गरज भागवू शकते हे निश्चित होते. गहू दळून आणून त्याच्या पीठापासून पोळी बनवून खाल्ल्यास, तो गहू प्रत्यक्षात जीवनाचे माध्यम (अर्थात उपभोगाचा विषय) बनला असे होईल. त्याऐवजी, त्याच गव्हाचे वाण संकलित करून पुढच्या पेरणीच्या वेळी उत्पादनप्रक्रियेत साधन म्हणून त्याचा वापर केल्यास, तोच गहू शेतकऱ्याची गरज ‘उत्पादनाचे साधन’ म्हणून अप्रत्यक्षरीत्या भागवित आहे, असे होईल.

स्त्राफांचे विवेचन हे दुसऱ्या प्रकारचे आहे.

परंतु, मार्क्सने क्रयवस्तूच्या गरजापूर्तीच्या स्वरूपाविषयीचा हा जो भेद आहे, त्याला क्रयवस्तूंच्या चर्चेत अधिक स्थान दिले नाही. कारण, मार्क्सला इतके ज्ञात होतेच की क्रयवस्तू प्रत्यक्ष उपभोगाचा विषय झाली अथवा अन्य क्रयवस्तूंच्या उत्पादनाचे साधन बनली, तरीही ती मानवी गरजापूर्ती करते आणि तिच्यात उपयोगिता असल्याने ती गरजापूर्ती करू शकते, ह्याला मार्क्सच्या दृष्टीने अधिक महत्त्व होते.

तसेही, स्मिथने आधीच म्हणून ठेवले होते की, “उत्पादनाचे अंतिम ध्येय हे उपभोगच असते.”

त्यामुळे, येथून पुढे उपयोगितायुक्त (उपयुक्त) वस्तूंसंदर्भात मार्क्सचे जे विचार होते, त्यांचे विश्लेषण करूयात.

मार्क्स म्हणतो की, कोणत्याही उपयुक्त वस्तूंचा दोन दृष्टींनी विचार होऊ शकतो: एक गुणात्मक (Qualitative) आणि दुसरा परिमाणात्मक (Quantitative). 

एका वस्तूच्या ठिकाणी अनेक गुणधर्म असल्यामुळे तिचा उपयोग अनेक रीतींनी करता येतो. क्रयवस्तू ही दुर्मिळ असली तरीही ती पर्यायी उपयोगाची असू शकते, असे लिओनेल रॉबिन्ससारख्या अर्थतज्ज्ञाचे मत आहे. क्रयवस्तूंतील ही ‘पर्यायी उपयोगिता’ व्यावहारिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते आणि रॉबिन्सच्या मते तर तो अर्थशास्त्राचा केंद्रीय अभ्यासविषय आहे. परंतु, मार्क्स म्हणतो, “एखाद्या वस्तूत असलेले निरनिराळे गुणधर्म शोधून काढणे हे इतिहासाचे कार्य आहे. तसेच या उपयोगी वस्तूंची मोजणी करण्यासाठी सामाजिक मान्यता पावलेले एकमात्र माप अस्तित्वात आणणे हेही इतिहासाचेच कार्य आहे. ही मापे विविध असतात. त्यांच्या त्या विविधतेचे मूळ काही अंशी मोजावयाच्या वस्तूंतील विविधतेत आणि काही अंशी सामाजिक रूढीत असते.” 

येथे मार्क्स क्रयवस्तूच्या दोन अंगांचा विचार करतो. एक, क्रयवस्तू बहुविधगुणयुक्त असल्यास तिच्याच अंतर्गत गुणांमुळे तिच्या मोजमापांची साधने भिन्न भिन्न असतात. दोन, क्रयवस्तू बहुगुणी नसली, तरीही ज्या सामाजिक पर्यावरणात ती उगम पावते वा असते, त्यानुसार तिची अनेक मापे असू शकतात. तेव्हा, वस्तूंतील गुणांचा शोध घेणे व सार्वत्रिक मान्यताप्राप्त एकमेव मोजमापाच्या परिमाणाच्या विकासात समाजाने भूमिका निभावणे, ही दोन कामे मार्क्सने इतिहासाकडे सोपविली आहेत. आधुनिक अर्थशास्त्रज्ञांनी ह्या दोन्ही समस्यांकडे ‘वस्तूविनिमयाकडून आधुनिक अर्थव्यवस्थेकडे होणारी पैशाची उत्क्रांती’ ह्या दृष्टीने पाहिले आहे. त्यामुळे, क्रयवस्तूंतील विविध पर्यायी उपयोगिता (गुणधर्म) व त्यांच्या मापनाचे साधन, हा आजही अर्थव्यवहाराचाच विषय मानला जातो. 

मार्क्सला क्रयवस्तुरूपी संपत्तीचे मूल्य कसे निर्धारित होते ह्यात मुख्यतः रस होता. क्रयवस्तूंचे ‘मूल्य’ कसे निश्चित होते? ह्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी मार्क्स ‘मूल्याचे नेमके स्वरूप काय?’ याचा शोध घ्यायला सुरुवात करतो. सनातनवादी अर्थतज्ज्ञांनी विकसित केलेल्या मूल्यसिद्धांताची समीक्षा करण्यासाठी आणि त्यांच्यापासून आपल्या भूमिकेचे वेगेळेपण अधोरेखित करण्यासाठी, मार्क्सने पुनश्च: क्रयवस्तूंच्या मूल्यनिर्धारणाच्या प्रश्नावर प्रकाश टाकला असला पाहिजे.

पुनश्च म्हणण्याचे कारण असे की मूल्यनिश्चितीच्या प्रश्नाने अर्थशास्त्राचा प्रदीर्घ कालखंड व्यापला आहे. जॉन लॉकने आपल्या ‘व्याजाचा दर कमी होण्याने होणाऱ्या परिणामांचा विचार’ ह्या १६९१ साली प्रसिद्ध झालेल्या ग्रंथात असे प्रतिपादन केले होते की, “कोणत्याही वस्तूचे स्वाभाविक मूल्य, त्या वस्तूत मानवी जीवनाची एखादी गरज भागविण्याची किंवा सुखसोयी पुरी करण्याची क्षमता किती आहे ह्यावरून ठरते.” सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात लॉकसारखा विचारवंत ‘क्रयवस्तूचे मूल्य त्याच्या उपयोगितेवरून ठरते.’ असे सांगत होता. अॅडम स्मिथच्या आधीपासूनच मूल्यनिश्चितीच्या ह्या प्रश्नाला अर्थचिंतनात मध्यवर्ती स्थान प्राप्त झालेले होते आणि त्यावर उलटसुलट चर्चांनाही प्रारंभ झाला होता. सामान्यतः स्विकृत मतांनुसार, क्रयवस्तूंची बाजारपेठेतील किंमत, तिची मागणी व पुरवठा ह्यांवरून ठरत असते. मात्र, अॅडम स्मिथने मूल्यनिश्चितीचा दीर्घकाळाच्या (Long run) संदर्भात विचार केला. आता, दीर्घकालीन क्रयवस्तूच्या उत्पादनाकरिता येणारा जो खर्च आहे – ज्याला ‘उत्पादन-परिव्यय’ (Production cost) म्हणतात – त्याच्याशी क्रयवस्तूंच्या मूल्याचा संबंध असतो. पण हा संबंध अप्रत्यक्ष असतो. कारण, उत्पादनपरिव्ययसुद्धा क्रयवस्तूंच्या उत्पादनासाठी किती श्रम खर्ची पडतात, ह्यांवर अवलंबून असतो. अशाप्रकारचा श्रममापनाधारित मूल्यविचार स्मिथने केलेला होता. या श्रमानुसारी मूल्यनिर्धारण उपपत्तीला डेव्हिड रिकार्डोने तार्किक आधार देत तिचा पाठपुरावा केला आणि ह्याच श्रममूल्यसिद्धांताच्या पार्श्वभूमीवर मार्क्सने आपले मूल्यचिंतन केले. हे करताना त्याने प्रस्थापित मूल्यसिद्धांताची पुनर्मांडणी केली. 

अनेक अर्थतज्ज्ञांचे असे मत आहे की, रिकार्डोच्या श्रममूल्य सिद्धांताचे प्रमाणित रूप मार्क्सच्या मूल्यविचारांत प्रतिबिंबित झालेले दिसते.

सनातनवादी अर्थतज्ज्ञ हे मार्क्सचे पूर्वसूरी होते आणि त्यामुळे पूर्वसूरींच्या मतांचा परामर्श घेत असतानाच ग्राह्याग्राह्यविवेक ठेवत मार्क्सने आपल्या मूल्यविचारांची उपपत्ती साकार केली आहे.

सनातनवाद आणि मार्क्सविचारांचे स्वरूप रूपकात्मक भाषेत सांगता येईल , ते असे:

मार्क्सचा अर्थविचार हा सनातनवादी झाडावर करण्यात आलेले कलम होय; पण या कलमाला अशा तऱ्हेची विचित्र फळे आल्याची पाहून सनातनवादी खोडाला आश्चर्य आणि राग आला असला तरी त्याचे पोषण आपला जीवनरस देऊन झालेले आहे, हे त्याला नाकारता येणार नाही.

एकूणच, मार्क्सच्या अर्थचिंतनाला पूर्वसूरींच्या चिंतनाची व्यापक पार्श्वभूमी आहे. ह्याच पार्श्वभूमीवर क्रयवस्तूंच्या मूल्याचे नेमके स्वरूप काय आहे? आणि त्याचे निर्धारण कसे होते? या प्रश्नांच्या उत्तरांचा शोध मार्क्स घेतो. ‘क्रयवस्तूंचे रहस्य’ शोधण्याच्या प्रक्रियेत मार्क्स त्याच्या मूल्यनिर्धारण उपपत्तीपर्यंत येऊन ठेपतो.

क्रयवस्तूंच्या मूल्यनिर्धारणाचा वेध मार्क्स कशाप्रकारे घेतो आणि त्यात ‘श्रम’ हा घटक कसा महत्त्वपूर्ण ठरतो, ह्याचा विचार आपण पुढे करणार आहोत.

( अपूर्ण…)

पारिभाषिक संज्ञा:

१. क्रयवस्तू = Commodity, २. मूल्य = Value, ३. बाजारमूल्य = Market value, ४. विनिमय = Exchange,
५. वस्तूविनिमय = Barter system, ६. उपयोगिता = Utility, ७. दुर्मिळता = Scarcity, ८. उपभोग्य वस्तू = Consumer goods, ९. भांडवली वस्तू = Capital goods, १०. उत्पादन-परिव्यय = Production cost

(एम.ए. अर्थशास्त्र)

अभिप्राय 3

  • लेख माहितीपूर्ण आहे, पुढील भागाबद्दल उत्सुकता वाटते.

  • श्रीधर तू जो हा लेख लिहिला आहे त्याबद्दल तुझे खूप अभिनंदन. लेख माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण आहे. या लेखात तू एखाद्या वस्तूची किंमत कशी ठरते आणि त्याचा पूर्व इतिहास यांचे सखोल विश्लेषण केलेले आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या अर्थतज्ञांची याविषयीची वेगवेगळी भाष्य/मतं /विचार विषयीही तू भाष्य केलेले आहेस.

    येणाऱ्या तुझ्या मुल्य निर्धारणाच्या प्रक्रियेमध्ये श्रमाचा सहभाग या माहितीपूर्ण लेखाची उत्सुकता आहे

  • श्री.श्रीधरराव, आपण मार्क्सच्या अर्थशास्त्र असायला विषय सर्वसामान्य माणसालाही समजेल अशाप्रकारे सोप्या भाषेत विश्लेशित केला आहे. क्रयवस्तू म्हणजे काय, क्रयवस्तुंची किंमत कशी ठरते, या सारखे गहन विषय सोप्या भाषेत विषद केले आहेत. आजून पर्यंत मार्क्स आणि त्याचे अर्थशास्त्र या विषयी ऐकून होतो. पण त्याचा अभ्यास करणे कुवती बाहेरचे होते. पण आपण सोप्या पद्धतीने केलेल्या विश्लेषणामुळे त्याचे आकलन झाले. आता पुढील लेखाबद्दल उत्सुकता आहे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.