जननशील कृत्रिम बुद्धिमत्ता हे प्रश्न सोडवू शकत नाही

बुद्धिमत्ता म्हणजे काय?

अवजारे वापरणे हे बुद्धिमत्ता असण्याचे एक लक्षण मानले जाते. आपण माणसेही ज्या वानरगणाचा भाग आहोत, त्यातले चिंपांझी काडी वापरून मुंग्या पकडून खातात.

माझ्या एका मित्राकडे कुत्रा आहे. काही वर्षांपूर्वी तो मला सांगत होता की त्याच्या कुत्र्याची प्रजाती कुत्र्यांमधली दुसऱ्या क्रमांकाची आहे, हुशारीच्या बाबतीत. मी त्याला म्हणाले, “माझ्याकडे मांजर आहे. तिला कॅल्क्युलस येत नाही; कोडिंग करता येत नाही; तिची भाषा अत्यंत मर्यादित आहे. मला कॅल्क्युलस येतो, कोडिंग येते. त्यामुळे दोघींच्या पोटापाण्याची सोय मला लावता येते. आणि आपल्याला खायला कोण घालते, कुणावर विश्वास ठेवता येतो हे तिला बरोबर समजते. ती अत्यंत समाधानी असावी असा माझा ग्रह आहे. ती मांजर आणि अतिशिक्षित असणारी मी दोघीही बूजी (बूर्ज्वा) आहोत.” माझी मांजर हुशार नसली तरी चालेल. तिला तिचा जीव जगवता आला, आणि तिच्यापरीने तिने माझ्यावर प्रेम केले तरी पुरेसे आहे.

हल्लीच मी एक पुस्तक वाचले, केट क्रॉफर्ड ह्या लेखिकेचे, ‘Atlas of AI’. ती सुरुवातीला एका गणिती घोड्याबद्दल लिहिते. तो घोडा बेरजा-वजाबाक्या करायचा असे वरवर पाहता दिसायचे. पण खरे तर तो गणिताचे उत्तर माहीत असणाऱ्या माणसांचे समोर दिसणारे चेहरे वाचून त्यानुसार उत्तरे द्यायचा. म्हणजे तो घोडा हुशार नव्हता, असे अभ्यास-प्रयोगांमधून ठरवण्यात आले. लेखिका म्हणते, “संगणकशास्त्रातली पहिली चूक झाली ती ही. घोड्याकडे माणसांच्या भावना वाचण्याचे, संवादाचे कौशल्य होते – ज्याला सॉफ्ट स्किल म्हणत हल्ली काहीसे हिणवले जाते – त्याकडे तेव्हा साफच दुर्लक्ष केले. मला तिचे हे मत अगदी पटते.

शिवाजी महाराजांच्या काळात बेरजा-वजाबाक्या, हिशोब वगैरे करायला माणसे ठेवलेली असत. ही कामे बुद्धीची समजली जात असत. आता ह्या गोष्टी आपण शाळकरी वयात शिकतो. मी कॉलेजात होते तेव्हा प्रोग्रॅमेबल कॅल्क्युलेटर नुकतेच बाजारात आले होते; पण ते वापरण्याची सोय नव्हती. मी आता कामाच्या ठिकाणी काही अडले की आधी इंटरनेटवर शोधते; नंतर बरोबरच्या लोकांना विचारते. इंटरनेटवर आणि लोकांना प्रश्न विचारताना भाषा थोडी बदलावी लागते. कमीतकमी कष्टांत ही शोधाशोध करता आली की कोडिंगची भाषा बरोबर समजली, असे मी गृहीत धरते.

आपण माणसे बुद्धिमत्ता वापरण्याबाबतीत पृथ्वीवरची सगळ्यांत प्रगत प्रजाती आहोत. आपण फक्त अवजारेच वापरत नाही, तर ‘बाहेरचे इंधन’ही वापरतो. सुरुवातीला घोडे, बैल वगैरे प्राणी प्रवासासाठी आणि नांगरणीसाठी वापरले जात असत. औद्योगिक क्रांती झाली तेव्हा फक्त प्राण्यांच्या शरीरांमुळे पडणाऱ्या मर्यादा ओलांडायला सुरुवात झाली. मूलभूत गरजांपलीकडच्या आणि किमान काही अंशी चैनीच्या गोष्टी बनवण्यासाठी यंत्रे तयार झाली. विमानप्रवास एकेकाळी चूष या प्रकारात असेल; आता किमान काही लोक तरी विमानप्रवास ही गोष्ट गरज म्हणतील. जशी भौतिक प्रगती होत गेली तशा माणसांच्या गरजा बदलत गेल्या. त्यानुसार बुद्धिमत्ता म्हणजे काय ही व्याख्या बदलली का? काडी वापरून मुंग्या पकडणारे चिंपांझीही बुद्धी वापरतात आणि विपणनाच्या नवनव्या क्लृप्त्या वापरणारी माणसेही! 

बुद्धिमत्ता वापरणे म्हणजे नक्की काय?

तंत्रज्ञान – शाप की वरदान

कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) त्याच विकासाच्या मार्गातला एक टप्पा आहे. साधारणपणे तंत्रज्ञानविषयक लेखनात कृत्रिम बुद्धिमत्ता फारच उपयुक्त अशा प्रकारचा सूर असतो; त्यांतले अनेक मुद्दे योग्यही असतात. दुसऱ्या बाजूला समाजकारणाशी संबंधित प्रकाशनांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आता नव्यानेच आलेली जननशील कृत्रिम बुद्धिमत्ता (Generative AI) यांमुळे जगाचे फक्त वाटोळेच होणार, असा सूर असतो. माझे मत या दोन्हींच्या मध्ये कुठे तरी नाही; मला खास काही मतच नाहीये. पुलंच्या धोंडो भिकाजी जोश्यासारखी, दोन्ही बाजू ऐकून घेऊन मी गोंधळलेलीही नाही.

मी जे काम करते त्याला साधारणपणे विदाविज्ञान (Data Science) असं नाव आहे. बहुतेकसा काळ मी कोडिंग करते, सरासरी वाचकांच्या दृष्टीने सॉफ्टवेअर इंजिनीयर आणि माझ्या रोजच्या कामात फार काही फरक नाही. मीही एक आयटी हमाल आहे. पण क्वचित कधी असा एखादा दिवस येतो, जेव्हा मला म्हणता येते, “आपण ना, थोडे थांबू. आत्ता आपल्याकडे पुरेशी माहिती नाही, तेव्हा पुरेशी माहिती जमा करू आणि मग निष्कर्ष काढू.” नोकरीच्या ठिकाणी लोक माझे हे म्हणणे बहुतेकदा ऐकतात. कधी थोडे पुरावे मागतात. मग मी आकडेमोड करून देते आणि मग ते लोक माझे म्हणणे ऐकतात. हा जो शेवटचा भाग आहे, तो यातला विज्ञानाचा भाग.

औद्योगिक क्रांती झाली तेव्हा नक्की काय प्रकारची जगबुडी येईल, अशी विधाने केली गेली ते मला माहीत नाही. तो माझ्या अभ्यासाचा विषय नाही. अशी विधाने कुणी ना कुणी केली असणारंच असे एक गृहीतक मी मानले आहे. (आपली गृहीतके स्पष्टपणे मांडणे, हाही विज्ञानाचाच भाग.) औद्योगिक क्रांतीमुळे माणसांची शारीरिक क्षमता कमी झाल्याचे दिसत नाही. यंत्रे वापरली म्हणून शारीरिक श्रम कमी झाले, म्हणून माणसांचे शारीरिक आरोग्य ढासळले असे दिसत नाही. गेल्या २५०-२७५ वर्षांपूर्वी औद्योगिक क्रांतीची सुरुवात झाली, तशी संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था सुधारली; आधुनिक वैद्यकाची (ज्याला ॲलोपॅथी म्हणले जाते) सुरुवात गेल्या २०० वर्षांपूर्वीच झाली. यातून माणसांची शारीरिक शक्ती वाढतच गेली.

गेल्या काही दशकांचा विचार करू. विसाव्या शतकात ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा जिंकणाऱ्यांची वये तीसपेक्षा कमीच होती. आता पस्तिशीचे लोकही ग्रँड स्लॅम जिंकताना दिसतात. (हा लेख लिहायला सुरुवात केली तेव्हा ३६ वर्षांचा नोव्हाक जोकोविच फ्रेंच ओपन जिंकत आला होता.) फिटनेस हा मोठा व्यवसायच पाश्चात्त्य देशांत काही दशकांपूर्वी सुरू झाला. त्याची परिणती म्हणून पस्तिशीतल्या लोकांचा अतिफिटनेस कसा राखायचा, याचे आकलन झाले. त्यामुळे ह्या खेळाडूंच्या अनुभवाचा फायदा त्यांना ‘उतार’वयातही घेता येतो.

ही एक बाजू आहे. काही दिवसांपूर्वीच बातमी होती की न्यूझीलंडच्या एका विमानकंपनीने जाहीर केले की ते प्रवासाआधी प्रवाश्यांचे वजन तपासणार. (हे पूर्णतया ऐच्छिक होते; ते कुणाचेही वजन दाखवणार नव्हते, की जाहीर करणार नव्हते. त्यांना फक्त दहा हजार प्रवाश्यांच्या वजनाची मोजमापे हवी होती; त्यानुसार विमानात एका वेळेस किती इंधन भरायचे हे ठरवण्यासाठी. नाही, जास्त वजनदार लोक असतील तर जास्त इंधन नाही, तर कमी इंधन भरणार असा तो हिशोब आहे.) गेली अनेक वर्षे विमानकंपन्या विमानातल्या खुर्च्यांचा आकार, दोन रांगांमधली रिकामी जागा कमी करत आहेत आणि माणसांचा आकार वाढत आहे. माणसांचे वाढते आकार आणि वजन याचे कारण वाढता फिटनेस उद्योग नाही, की पीळदार स्नायूंमुळे माणसे जरा तगडी झाली!

मी इंटरनेटवर फक्त शोधले – death malnourishment in india. आणि पहिला दुवा आला तो लॅन्सेट या ख्यातनाम वैद्यकीय नियतकालिकाचा. त्यात प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, २०१७ सालात भारतात झालेल्या ५ वर्षांखालच्या बालमृत्यूंपैकी किमान सहा लाख एकूणसाठ हजार (६,५९,०००) मृत्यू कुपोषणामुळे झालेले आहेत. लॅन्सेटमधल्या आणखी एका संशोधनानुसार, भारतात ११ टक्क्यांपेक्षा अधिक लोकांना मधुमेह आहे.

सध्याचे दिवस ध्रुवीकरणाचे आहेत, म्हणून ही भारतातली टोकाची उदाहरणे. आपले वजन, आणि काही अंशी आहार हा विषय तसा संवेदनशील असला तरी फार राजकीय नाही, म्हणून ते वापरले. 

यंत्रयुग आल्यामुळे माणसांचे शारीरिक कष्ट खूप कमी झाले आणि त्याबदल्यात मिळणाऱ्या सुखसोयी आणि कॅलऱ्या खूप सहजरीत्या मिळायला लागल्या. ढोबळमानाने. मग त्यामुळे माणसांची शारीरिक क्षमता कमी झाली का?

कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे माणसांचा बुद्धीवापर कमी होईल का? माझ्या शाळेतल्या शिक्षकांना विचारले तर ते बहुतेक “मी बुद्धी वापरत नाही,” असे म्हणतील. मला साताचा पाढासुद्धा आता धड आठवत नाही; हा लेख लिहिताना मी ऱ्हस्व-दीर्घासाठी कोश उघडूनच बसले होते. बुद्धिमत्ता म्हणजे नक्की काय, स्मरणशक्ती आणि बुद्धिमत्ता एकच का?

कुणाचा उदारमतवाद खरा?

आता मात्र काही ज्वलनशील विषय आणल्याशिवाय पर्याय दिसत नाही.

अमेरिकेत पहिली घटनादुरुस्ती झाली, त्यानुसार (भरलेल्या सभामंडपात निष्कारण ‘आग, आग’ म्हणून ओरडणे असे जीवघेणे अपवाद वगळता) कुणालाही, कुठेही, काहीही म्हणण्याची मुभा आहे. अमेरिकेचा माजी राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प आणि त्याचे सवंगडी २०२०च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकांपासून म्हणत आहेत की तिथे निवडणुकीत घपले करून ज्यो बायडन निवडून आला. तर असे म्हणण्यावर त्याच्यावर कुणी बंदी आणू शकत नाही.

युरोपात अशा प्रकारचे “बेबंद” अभिव्यक्तीस्वातंत्र्य नाही. उदाहरणार्थ, नाझी, फाशिस्ट, रशियन सैन्याच्या किंवा मुस्लिम कट्टरतावादाशी संबंधित प्रतिमा वापरण्याविरोधात जर्मनीत कायदा वापरला जातो. फ्रान्समध्ये सार्वजनिक ठिकाणी धर्माशी संबंधित ढळढळीत प्रतिमा अंगावर वागवण्यास मनाई आहे. 

भारतात समाजमाध्यमांवर गलिच्छ भाषा वापरून काही लिहिल्यास व्यावसायिक आयुष्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता शून्य आहे; अमेरिकेत असे प्रकार केल्यामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्याची उदाहरणे आहेत.

युरोपात अनेक ठिकाणी LGBTQ+ समुदायाला लग्न करणे, दत्तक घेणे, यांवर बंदी नाही. भारतात सध्या सरकार समलैंगिकांच्या हक्कांविरोधात सर्वोच्च न्यायालयात खटला लढत आहे. अनेक आखाती देशांमध्ये समलैंगिकता हा गुन्हा आहे, आणि त्यासाठी देहदंड होऊ शकतो – कायदेशीररीत्या. 

भारतात पहिले वीस आठवडे गर्भपातावर कसलीही बंधने नाहीत; अर्ध्या अमेरिकेत ही परिस्थिती अत्यंत बिकट झालेली आहे.

अशी किती तरी उदाहरणे देता येतील. पॉर्न, गर्भजल वापरून केलेले अर्भकाचे लिंगनिदान, स्त्रियांनी सार्वजनिक ठिकाणी कसे कपडे वापरावेत, वाहनांमधून किती प्रदूषित हवा बाहेर सोडणे चालेल, इत्यादी. असो. मुद्दा लक्षात आला असावा. वेगवेगळ्या देशांत आणि समाजांत अनेक बाबतीत कायदे निरनिराळे आहेत.

यात योग्यायोग्य करणे ह्या लेखाच्या आणि माझ्याही कक्षेबाहेरचे आहे. 

समाजमाध्यमांमुळे जग जोडले गेलेले आहे; हे घासून गुळगुळीत वाक्य इथे पुन्हा लिहिले आहे. कारण कुठल्याश्या देशातले लोक कसे मागास आहेत, किंवा स्वैराचारालाच स्वातंत्र्य समजतात, असे ठरवून टाकण्यासाठी तंत्रज्ञानाची फार गरज नव्हती. माझ्या लहानपणीही पाकिस्तानला मागास समजणे आणि अमेरिकेत हिप्पी संस्कृतीच नांदते, म्हणून स्वैराचारच असतो, असे मानायची पद्धत होतीच; ‘इतरां’ना हिणवण्यासाठी त्यांची फार माहिती असणे महत्त्वाचे नव्हते. पण आता दुसऱ्या समाजांमधले, देशांमधले कायदेकानून, विशेषतः तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्यांवरचे निर्बंध बघून तेच आदर्श आहेत, असे मानायचीही सोय झालेली आहे. आपला समाज अशा प्रकारचे निर्बंध घालण्याएवढा जागरूक, आणि सशक्त आहे का; आपली व्यवस्था (अभि)व्यक्तिस्वातंत्र्याला धार्जिणी आहे का; आपली लोकशाही पुरेशी प्रगत आणि सकस आहे का, असे प्रश्न न विचारण्याचीही सोय झाली आहे. 

चेंज.ऑर्ग (change.org) हे नाव तुम्ही कदाचित ऐकले असेल. उदाहरणार्थ, अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया राज्यात काही कायदेबदल करायचा असेल तर ठरावीक टक्के लोकांच्या स्वाक्षऱ्या घेऊन त्यासाठी याचिका दाखल करता येते. भारतात अशी काहीही तरतूद नाही. तरीही मुंबईतल्या प्रदूषणासंदर्भात, किंवा आणखी काय काय भारतीय प्रश्नांसाठी अधूनमधून चेंज.ऑर्गचे फॉर्म मला फेसबुकवर दिसतात.

मालकी कुणाची: कृत्रिम बुद्धिमत्तेचं काय?

वर स्वास्थ्याचा आणि त्या अनुषंगाने आहाराचा विषय काढला आहे तर, शेतमाल ही शेतकऱ्याच्या मालकीची वस्तू असते. ती न-शेतकऱ्यांसाठी अत्यावश्यक गरजेची असली तरी तिची मूळ मालकी शेतकऱ्यांची असते. आपल्याला खायला घालण्यासाठी काही शेतकरी शेती करत नाहीत. ते त्यांच्या पोटापाण्यासाठी शेती करतात. (आणि त्यामागची इतर गुंतागुंत इथेच सोडून देऊ.)

तसेच जी-मेल, गूगल-शोध, फेसबुक, इन्स्टाग्राम (आताचे मेटा), ट्विटर, ॲमेझॉन, यांवर कुणाची मालकी असावी? याचे नियम कुणी, कसे करावेत?

मी हल्ली एक मालिका बघत आहे, ‘ब्लॅकलिस्ट’. छान बिनडोक करमणूक आहे त्या मालिकेत. हेरगिरी, दुष्टांना पकडणे, वगैरे विषय त्यात आहेत. त्यातील एका भागात चेहरा बघून माणूस ओळखण्याचे तंत्र सरकारकडून कुणी तरी चोरते, त्यांचा पाठलाग ते लोक करत असतात. त्यात ते त्या मॉडेलचा कोड चोरण्याबद्दल बोलत असतात. (तरी बरे, त्यात ते मेनफ्रेमबद्दल बोलले नाहीत; अशी मल्लीनाथी माझी!)

कृत्रिम बुद्धिमत्ता (हिला बुद्धिमत्ता म्हणायचे का, हा प्रश्न सध्या बाजूला ठेवू) किंवा यंत्रप्रशिक्षण (मशीन लर्निंग) यात प्रारूपे (मॉडेल्स) बनवली जातात, त्याचे दोन भाग असतात. एक भाग असतो कोडचा, तो सोपा असतो असे नाही. पण त्या विषयाचे शिक्षण घेतलेले चार-सहा(शे) लोक कामाला लावले की तो कोड सहज लिहिता येतो. घोडे अडते ते त्या प्रारूपांना शिकवायचे कसे इथे.

गूगल, ॲमेझॉन, ट्विटर, फेसबुक, हे सगळे लोक आपल्याकडून विदा (data) गोळा करतात; तेव्हा आपल्याला ते माहीत असते का? भारतात जी-मेल आल्यावर अगदी सुरुवातीलाच मी जी-मेलवर खाते उघडले आहे. तिथपासून पुढची किमान १०-१५ वर्षे मी ते फुकट वापरत आहे असे मला वाटत होते. माझ्या ईमेल्समधला मजकूर गूगलचे बॉट्स वाचत होते. त्यातून मला जी-मेल उघडल्यावर जाहिराती दिसायच्या. फायरफॉक्स हा ब्राऊजर आणि त्यावर ॲड-ब्लॉक नावाचे प्लग-इन वापरायला सुरुवात केल्यापासून ईमेलच्या उजव्या बाजूला ह्या जाहिराती दिसणे बंद झाले. पण ह्याचा अर्थ असा नाही की गूगलने माझ्या ईमेल्स वाचून मला कुठल्या जाहिराती दाखवायच्या ते ठरवायचे थांबवले. फक्त त्या जाहिराती माझ्यासाठी उपयुक्त नाहीत असा प्रतिसाद त्याला जात गेल्याने – कारण मला कुठल्याही जाहिरातीवर क्लिक करता येणे बंद झाल्यामुळे मला असलेला मजकूर दिसणे फक्त बंद झाल्याने – माझ्या डोळ्यांचे, मेंदूचे चाळण्याचे काम कमी झाले.

ईमेल, समाजमाध्यमे यांपासून फटकून राहण्याची फार काही सोयही आता राहिलेली नाही. पासपोर्टच्या कामासाठी काही कागदपत्रे पाठवण्यासाठी व्हॉट्सॅप वापरावे लागण्याची शक्यता आहे, असे मला लेख लिहितेवेळी सांगण्यात आले आहे. (अफगाणिस्तानात तालिबानचे सरकारच अख्खे व्हॉट्सॅपवर चालत असावे, अशा अर्थाचा लेख न्यूयॉर्क टाईम्समध्ये आदल्याच दिवशी वाचल्यामुळे मला जरा कमी आश्चर्य वाटलं खरं!)

प्रश्न असा की आपल्याला फुकटात, स्वस्तात संवादाची सोय उपलब्ध करून देणाऱ्या कंपन्या तंत्रज्ञान तयार करतात. त्या तंत्रज्ञानात कोड, खूप ऊर्जा, पाणी, खनिज संसाधने वापरणारी विदाकेंद्रे (data centres), त्यासाठी सातत्याने चालणारे संशोधन असे बरेच भाग येतात. या साऱ्यांसाठी ह्या कंपन्या काही अंशी गुंतवणूक करतात; सरकारेही त्यांना बरीच संसाधने स्वस्तात उपलब्ध करून देतात. (कारण त्यातून रोजगार तयार होतो.) शिवाय ह्या कंपन्या आपल्याकडून आपली विदा मिळवतातच. हा आपल्या खाजगीपणाचा भाग असतो. आपला खाजगीपणा कमी करून ह्या कंपन्या नफा मिळवतात. ते योग्य किंवा अयोग्य यात मी आत्ता पडणार नाही. आपल्याला हे माहीत असते का? त्याचे पूर्ण आकलन झालेले असते का? 

त्यापुढचा प्रश्न येतो, त्यावर मालकी कुणाची? माझ्या वतीने कुणी देवाला फूल वाहिले तर त्याचे पुण्य मला मिळते का? माझ्या दारातले फूल कुणी चोरून माझ्या वतीने देवाला वाहिले तर त्याचे पुण्य मला मिळते का? माझ्या दारातले फूल माझ्याकडे दुर्लक्ष करून देवाला वाहिले तरी मला पुण्य मिळते का? 

या तंत्रज्ञान कंपन्या जो नफा मिळवतात, आपली विदा ज्या प्रकारे वापरतात त्या वापरासाठी कायदे करणे, पाळणे आवश्यक असते, असावे. त्यात मला नागरिक म्हणून काही म्हणायची सोय असावी का, ग्राहक म्हणून? ग्राहक आणि नागरिक यांतला फरक स्पष्ट होतो का?

भारतात आता सगळ्यांना फक्त अन्न-वस्त्र-निवारा मिळायला पाहिजे इतकेच म्हणून कुणी थांबत नाहीत. सडक-बिजली-पानी यादेखील गरजा मूलभूत समजण्याकडे आपण पोहोचलो आहोत. आधी माहितीचा विस्फोट, स्मार्टफोनचा वाढता वापर, रोकडविरहित अर्थव्यवस्था, आणि पुढे कोविडकाळात घरून काम करणे, अशा अनेक गोष्टींमुळे इंटरनेट हीसुद्धा पोट भरल्यानंतरही पहिली गरज ठरायला लागली आहे. इंटरनेट वापरातून आपण जी विदा तयार करतो, तिची मालकी कुणाची?

आता गूगल, ॲमेझॉन, मेटा (फेसबुक) वगैरे कंपन्यांची अतिप्रचंड विदाकेंद्रे आहेत; तिथे ते जगभराची विदा गोळा करून ठेवतात. (अगदी शब्दशः नाही. काही देशांतली विदा त्या-त्या देशांतच ठेवावी लागते.) ह्या सगळ्या विदेवर आपल्याला वहिवाटीचा हक्क नाही. गूगल आपली विदा वापरू शकते. आपले सरकार त्यांच्याकडे विदा मागू शकते. पण आपल्या सरकारने त्यांच्याकडे काय विदा मागितली हे आपल्याला समजण्याचा हक्क आहे का? आताच्या गृहमंत्र्यांनी २००९मध्ये एका स्त्रीची विदा बेकायदेशीरपणे गोळा करून तिच्यावर पाळत ठेवली; ही बातमी सध्या माननीय पंतप्रधानांच्या भाषणातल्या चुकीच्या शब्दामुळे पुन्हा फिरायला लागलेली आहेच. 

ही एक बाब. दुसरी अशी की एवढी प्रचंड यंत्रणा उभी करणे किती लोकांना, किती गटांना आता शक्य आहे? या विदेचा वापर जनहितार्थ करण्यासाठी प्रस्ताव लिहिण्याची काही यंत्रणा आहे का? पंधरा वर्षांपूर्वी मी खगोलशास्त्रज्ञ होते. जगभरात अनेक देशांनी आपापल्या बळावर किंवा अनेक देशांनी एकत्र येऊन दुर्बिणी बांधल्या आहेत. या बहुतेक दुर्बिणींची Open Sky Policy आहे. कुणालाही या दुर्बिणींचा वापर करायचा असेल तर वर्षातून ठरावीक कााळात प्रस्ताव मागवले जातात. ह्या दुर्बिणींचा वापर करून आपल्याला काय शिकायचे आहे, संशोधन करायचे आहे, हे लिहून पाठवायचे. त्या-त्या विषयातल्या तज्ज्ञांची समिती ह्या प्रस्तावांचा विचार करते आणि आपली मागणी मान्य झाली तर ठरावीक काळासाठी ती दुर्बीण आकाशाच्या ठरावीक भागाकडे रोखता येते. अवकाशात असणारे हबल स्पेस टेलिस्कोप, जेम्स वेब टेलिस्कोप, नारायणगावाची जीएमआरटी हेही या Open Sky Policy चे पालन करतात.

बेरोजगारी

औद्योगिक क्रांतीला काहीशे वर्षं होऊन गेल्यावर तिचे परिणाम काय होत आहेत, हे आता स्पष्ट दिसत आहे. यंत्रप्रशिक्षणाच्या तंत्रामुळे जी क्रांती होत आहे, तिचे परिणाम काहीशे वर्षांनी काय होतील, हे मला माहीत नाही.

सध्या तरी असे दिसत आहे की बेरोजगारी सध्या तरी वाढीला लागेल.  बेरोजगारी म्हणजे अजिबातच काही काम आणि उत्पन्न नसणे, एवढेच नाही. माणसांची क्षमता नीटपणे वापरून न घेणे, केलेल्या कामसाठी पुरेसा आणि योग्य मोबदला न देणे हीसुद्धा बेरोजगारीच. हे सध्याही मोठ्या तंत्रज्ञान कंपन्या करत आहेतच. फेसबुकवर एखादी पोस्ट रिपोर्ट केली तर त्यावर जी कारवाई होते, त्यासाठी आधी (कदाचित आताही) माणसे काम करत होती (आहेत).

समाजमाध्यमांवर लिहिलेली एखादी गोष्ट आक्षेपार्ह आहे का, हेही यंत्रप्रशिक्षण (कृत्रिम बुद्धिमत्ता) वापरून ठरवता येते; त्यासाठी आधी माणसांना योग्यायोग्य काय याची कोट्यवधी उदाहरणे हाताने तयार करावी लागली. ठरावीक चित्रे, चलचित्रे, लेखन आक्षेपार्ह आहे का, ही विभागणी माणसांनी (किमान) सुरुवातीला हाताने केली. मग मशीन लर्निंग अल्गोरिदम त्यातून शिकली. यासाठी फेसबुकने लोकांना पुरेसा पगार दिला नाही; अत्यंत हिंसक, प्रक्षोभक भाषा, चित्रे वगैरे ह्या लोकांना बघावी लागली, त्यांची योग्य विभागणी करावी लागली; मानेवर दगड ठेवून सतत अशा प्रकारच्या हिंसेला ह्या लोकांना सामोरे जावे लागले; त्यासाठी फेसबुक पुरेसा मोबदला देत नाही. अगदी कमी काळात ठरावीक पोस्ट आक्षेपार्ह आहे का नाही, हे ठरवावे लागले; आणि सतत हिंसेची चित्रे, भाषा बघितल्यामुळे ह्या लोकांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला तरीही फेसबुकने काहीही केले नाही. कारण हे सगळे कंत्राटदार होते; त्यांच्या युनियन नव्हत्या; जिथे कामगार कायदे ढिसाळ होते आणि ताशी मजुरी बरीच कमी द्यावी लागते अशा भारतासारख्या देशांत हे लोक होते. मग चिंता करतो कोण!

ज्या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात विदा रिचवून मोठी प्रारूपे बनवली आहेत, त्या सगळ्याच कंपन्यांबद्दल कमीअधिक फरकाने हेच म्हणता येईल. 

ज्या कामांमध्ये तोचतोचपणा आहे, आणि जिथे माणसांच्या शारीरिक हालचालींची फार गरज नाही, अशी कामे यंत्रांकडून करवून घेण्याचे प्रमाण आता आणखी वाढणार. मी एका प्रकल्पावर काम केले होते, त्यात कॉल सेंटरचे काम कमी करण्यासाठी प्रारूपे बनवली होती. जे लोक त्या कंपनीचे ग्राहक बनण्याची शक्यता खूप कमी आहे, ते ओळखायचे आणि त्यांना फोनच करायचा नाही. इथे यंत्राने काम केले नाही; माणसांचे काम कमी केले.

आता मार्केटिंगचा मजकूर लिहिण्याचे काम चॅटजीपीटी, बार्डसारखी जननशील कृत्रिम बुद्धिमत्ता करू शकते.

बुद्धिमत्ता म्हणजे काय?

जुडेआ पर्ल नावाचा एक संगणकशास्त्रज्ञ (आणि किंचित तत्त्वज्ञ) आहे. The Book of Why नावाचे त्याचे पुस्तक आहे. त्यात तो कार्यकारणभावाच्या तीन पायऱ्या मांडतो. 

१. Association (संघटन) – यात बघणे, निरीक्षणे येतात. मी अमुक एक बघितले तर तमुक गोष्टीबद्दलचे माझे आकलन कसे  बदलेल? सर्वेक्षणामुळे निवडणुकींच्या निकालांबद्दल, किंवा लक्षणामुळे रोगाबद्दल काय समजेल?

२. Intervention (मध्यस्थी किंवा हस्तक्षेप) – म्हणजे काही कृती करणे. गोळी घेतली तर डोकेदुखी थांबेल का? लोकांची विदा गोळा करताना तिचा उपयोग कसा करावा यावर बंधने कशी आणता येतील?
(जाता जाता नोंद – औषधांवर संशोधन करताना ठरावीक रोग किंवा विकारावर कुठल्या रेणूचा उपयोग होईल, यासाठीही आता यंत्रप्रशिक्षण प्रारूपांचा वापर होतो; त्यातून औषध संशोधनाचा खर्च आणि लागणारा वेळ कमी झाला आहे.)

३. Counterfactuals (प्रतिवाद) – कल्पनाविस्तार, पूर्वानुभवाचा वापर, आकलन. मी अमुक केले असते तर काय झाले असते? ॲस्पिरीन घेतल्यामुळे खरेच माझी डोकेदुखी थांबली का? मराठे पानिपतचे तिसरे युद्ध जिंकले असते तर? (जयंत नारळीकरांची अशी एक कथा आहे.) सोव्हिएत युनियनचे विघटन दहा वर्षांनंतर झाले असते तर आज अमेरिकी, आणि कदाचित चिनी तंत्रकंपन्यांची एकाधिकारशाही एवढी बोकाळली असती का?

आपण आता जननशील बुद्धिमत्ता वापरण्याच्या जमान्यात पोहोचलो आहोत. सोव्हियत युनियनचे विघटन आणखी दहा वर्षांनी झाले असते तर, या प्रश्नाचे एक उत्तर आता कदाचित कृत्रिम बुद्धिमत्ताही देऊ शकेल. मग मनुष्याची बुद्धिमत्ता कशासाठी वापरता येईल? चॅटजीपीटी किंवा गूगलच्या ‘बार्ड’ला चांगले प्रश्न विचारून चांगली कथा-कादंबरी लिहवून घेण्यासाठी बुद्धी वापरावी लागेल. ते लेखन चांगले आहे का, हे माणसांनाच ठरवावे लागेल – गोष्ट ऐकण्याची गरज मानवी आहे, यांत्रिक नाही.

तुम्ही DALL-E वापरलं नसेल तर तेही वापरून चित्रे काढून पाहा. सुरुवातीची काही चित्रे फुकटात काढून मिळतात. 

१००+ वर्षांपूर्वी बर्ट्रांड रसेलनं ‘In Praise of Idleness’ नावाचा निबंध लिहिला होता. त्यात त्याने दिवसातून चारच तास काम करावे, आणि चार तास आपल्या हौशीसाठी काही करावे, असे लिहिले होते. मोठमोठ्या कंपन्यांचे सीईओ, अनेक राष्ट्रप्रमुख फक्त चार तास काम करतात आणि चार तास बागकाम करतात, हाताने लाकडी होडगी बनवतात, आठवड्याला किमान चार पुस्तके वाचतात, कुणी त्या लाकडी होडग्यांत बसून तलावाच्या मधोमध जाऊन जादूचे प्रयोग करून दाखवतात; बॉसच चार तास करतात म्हणल्यावर हाताखालचे सगळे नोकरदारही तेच करणार. दुकानेही दिवसातून चारच तास उघडी असणार. खूप पैसे मिळवायचे, लोकांवर सत्ता गाजवायची, वगैरे इच्छाच राहिल्या नाही तर बहुतेक पर्यावरणाचा ऱ्हासही कमी होईल; असा चमत्कारिक विचार मी केला. या विषयावर बरी कथा लिहून मिळेल का? ह्या अशा जगात चॅटजीपीटी नसेल; पण समाजातले ध्रुवीकरण जरा कमी असेल का?

अभिप्राय 1

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.