मनोगत

सादर निरोप

नंदा खरेंनंतर एका वर्षाच्या आत ‘आजचा सुधारक’ने आणखी दोन खंदे विचारवंत गमावले.

सुनीती देव

लेखिका आणि सामाजिक कार्यकर्ता, विवेकी विचारवंत, आणि ‘आजचा सुधारक’च्या संपादकमंडळात अनेक वर्षे कार्यरत सुनीती देव ह्यांचे २ मे २०२३ ला निधन झाले. अमरावती येथील विदर्भ महाविद्यालयात त्या तत्त्वज्ञान विषयाच्या प्राध्यापिका होत्या. परंतु नागपुरात त्यांची ओळख फार वेगळी होती. सुनीतीताई जगन्मित्र होत्या. त्यांचे सोबत असणे अतिशय आश्वासक वाटे. त्यांचे हास्य केवळ त्यांच्यापुरते नसून संपूर्ण वातावरणात आह्लाद पसरवणारे होते.

‘आजचा सुधारक’च्या अगदी सुरुवातीपासून (तेव्हाचा, नवा सुधारक) त्या संपादकमंडळात तर होत्याच, पण तेव्हा वर्गणीदारांची यादी बनवण्यापासून, पत्ते आणि तिकिटे चिकटवून अंक पोस्टात टाकण्यापर्यंतच्या विविध जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या. 

कुटुंबात, दि.य. देशपांडे, बा.य. देशपांडे, ह्यांसारखे दिग्गज तत्त्वज्ञ असतानाही तत्त्वज्ञानासारख्या विषयात त्यांनी स्वतःचे स्थान निर्माण केले. मे. पु. रेगेंच्या, ‘मी आस्तिक का आहे’, ह्या लेखाचा त्यांनी केलेला प्रतिवाद ह्या निमित्ताने आठवतो.

आजचा सुधारकच्या माध्यमातून अनेक उत्तम नाटकांची आणि चित्रपटांची परीक्षणे त्यांनी लिहिली. त्यावेळच्या वाचकांची अभिरुची घडवण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी केले. 

दिवाकर मोहनी

जुलैच्या अंकाची तयारी शेवटाला आली असतानाच, १९ जून २०२३ रोजी दिवाकर मोहनी उर्फ आमचे प्रिय मोहनी आबा ह्यांचे निधन झाले.

शाळेत न गेलेले, आणि कदाचित त्याच्याचमुळे अनेक विषयांबद्दल कुतूहलातून शिकत जाणारे मोहनी आबा अनेक वर्षे ‘आजचा सुधारक’चे संपादक होते. ज्ञान मिळवण्यासाठी कुठल्याही औपचारिक शिक्षणपद्धतीची गरज नसून ज्या कुटुंबात, समाजात आपण वावरत असतो, तिथूनच आपले ‘शिकणे’ सहजपणे होत असते याचा त्यांनी स्वतः अनुभव तर घेतलाच, पण यातून त्यांनी मिळवलेल्या प्रचंड ज्ञानाचा आणि सखोल विचारसरणीचा अनुभव त्यांच्या परिचयातील सर्वांनाच आला असणार याविषयी दुमत नसावे. आबांमधील कुतूहल सदोदित जागे असायचे. आपल्या ज्ञानाचे ओझे त्यांनी कधीच कुणावरही येऊ दिले नाही.

त्यांनी, खादी, रोजगार, पैसा, स्त्रीमुक्ती, कुटुंबसंस्था, धर्म, विवेकवाद, सृष्टिक्रम अशा विविध विषयांवर विपुल लेखन केले.

व्यवसायाने मुद्रक असणाऱ्या आबांनी आपल्या व्यवसायाला पूरक म्हणून भाषेचा अभ्यास केला आणि नागरीलिपीतील नियम, त्याचे व्याकरण, प्रमाणभाषेचे लिखाणातील महत्त्व आणि शुद्धलेखनामागचे तत्त्वज्ञान यावरील त्यांच्या अभ्यासातून ‘माय मराठी, कशी लिहावी, कशी वाचावी’ आणि ‘शुद्धलेखनाचे तत्त्वज्ञान’ ही त्यांची दोन पुस्तके प्रकाशित झाली.

लोकसान्निध्याची त्यांची लालसा वयाच्या ९१ व्या वर्षीदेखील अबाधित होती आणि हेच त्यांच्या दीर्घ आयुष्याचे गमक असणार. कारण आबा वयाने कधी वृद्ध झालेच नाहीत.

या दोन्हीं विचारवंतांचा परिचय वाचकांना व्हावा म्हणून त्यांच्याविषयी वृत्तपत्रांत आणि इतरत्र प्रकाशित झालेल्या काही लेखांच्या लिंक्स सोबत देत आहोत. याव्यतिरिक्त अनेक लेखांपर्यंत आम्ही पोहोचू शकलो नसू याची जाणीव आम्हाला आहे.

https://www.aksharnama.com/client/trending_detail/6721

  • प्रवीण बर्दापूरकर

https://www.loksatta.com/sampadkiya/columns/vyaktivedh-diwakar-mohni-consciousness-movement-language-grammar-amy-95-3735960/

  • लोकसत्ता, २१ जून २०२३

https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid0MKDrDTyysnPcS6XABBL7MuPQTHNBxYJYdkwwUpEEQbEFV74d2WBi8Rq3UZZnnLfwl&id=100000109201846&scmts=scwsplos

  • प्रमोद मुनघाटे

https://www.facebook.com/prachi.mahurkar.9/posts/pfbid02QuvSin2EQ5ZxQtPt47eRnd6iuXKX9poVw7NAvQ53B1rQKQz3WRZQCE1pievGy5hUl?notif_id=1687273360566275&notif_t=feedback_reaction_generic&ref=notif

  • प्राची माहूरकर

https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid0VhD18aCAxsV5vW3uhce5duE38SHfWCXF2ZXbSRpgFr6KUAyKmaXQSRsqGvhuXUVhl&id=1434246783&mibextid=Nif5oz

  • प्रणव प्रियदर्शी

https://chauthiduniya.com/sudharak-diwakar-mohni-shraddhanjali-suresh-khairnar/

  • सुरेश खैरनार

https://www.saamana.com/article-thasa-on-diwakar-mohni/

  • सामना, २४ जून २०२३

ह्या अंकाविषयी:

कृत्रिमप्रज्ञेकडे आपण सगळे किती गांभीर्याने पाहात आहोत, याचा अनुभव ह्या अंकासाठी केलेल्या आवाहनाला मिळालेल्या प्रतिसादावरून लक्षात येतो. 

वाचनालयातून पुस्तके आणून, ती वाचून मोठी झालेली एक पिढी संगणक, मोबाईल, समाजमाध्यमे, विनाविलंब संदेशवहन, क्लाऊड कम्प्युटिंग आणि आता कृत्रिमप्रज्ञा एवढा प्रवास आपल्याच आयुष्यकाळात बघते, तेव्हा हा प्रवास जितका विस्मयकारी असतो, तितकाच तो भयावहही वाटू शकतो.

आजवरच्या विकासात बनलेली साधने, उपकरणे, तंत्रज्ञान हे माणसाचे शारीरिक श्रम कमी करून त्याची ऊर्जा आणि त्याचा वेळ वाचवण्यासाठी बनलेली दिसतात. असा फुरसतीचा वेळ मिळाला तर बुद्धी सृजनाचे काम अधिक करते. आज कृत्रिमप्रज्ञेसारख्या शोधाने मात्र माणसाच्या बुद्धीला पूर्णवेळ गुंतवून टाकले आहे, टाकत आहे. म्हणजे शारीरिक श्रम कमी, पण फुरसतीचा वेळच नाही. एवढेच नव्हे तर कृत्रिमप्रज्ञा माणसाच्या विचारांना दिशाही देते आहे. मानवी बुद्धीला काम करण्याची गरज कमी झाली. स्क्रीन-टाईम या एका रोगाचे आपण सर्वच बळी ठरत आहोत.

मानवाच्या उत्क्रांतीचा दीर्घ कालावधी आणि आजच्या तंत्रज्ञानाची भरधाव, वेगवान झेप यांमध्ये आजची पिढी भांबावलेली आहे, तसेच मनात भविष्याविषयीची काळजीही आहे. या अंकातील लेखांमध्ये असेच संमिश्र भाव उमटलेले दिसतील. विकासाच्या प्रत्येक टप्प्यात नैतिकतेची भूमिका किती महत्त्वाची ठरते यावरही अनेक लेखांमधून विशेष भर दिलेला दिसेल.

आपले सहयोगी श्रीधर सुरोशे मार्क्सच्या अर्थमीमांसेवर एक लेखमालिका लिहीत आहेत. याचा पहिला भाग ह्या अंकापासून आपण सुरू करतो आहोत. याचे पुढचे भाग पुढच्या अंकांमधून प्रकाशित करण्यात येतील.

‘आजचा सुधारक’चा हा अंक माहितीपूर्ण आणि विचारप्रवर्तक ठरेल याची आम्हाला खात्री आहे.

प्राजक्ता अतुल
समन्वयक, आजचा सुधारक

अभिप्राय 1

  • अंक खूपच वाचनीय आहे. पण ईमेल तेवढा बघितला जात नाही. मध्यंतरी मोबाईल च्या समस्येमुळे सुधारक चा नंबर बदलल्याचे लक्षात आले नाही. कृपया मला नवीन नंबर मिळू शकेल का?

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.