तंत्रज्ञानाचा समाजावरील परिणाम

हल्ली मुले स्मार्टफोनला चिकटून असतात म्हणून जे पालक चिंतित असतात त्यांच्या पालकांना तीसेक वर्षांपूर्वी टीव्हीचीही तशीच भीती वाटत होती. त्याआधीच्या पिढीतील तरुण मुले रेडिओमुळे बिघडतील अशीही भीती त्यांच्या पालकांनी व्यक्त केली होती. तंत्रज्ञानाविषयी लोकांची प्रतिक्रिया कशी बदलते त्याविषयी प्रतिभावंत विज्ञानकथालेखक डग्लस अ‍ॅडम्स यांनी सांगितलेल्या ठोकताळ्यांचा स्वैर अनुवाद काहीसा असा करता येईल: “तुमच्या बालपणापासून प्रचलित असलेले तंत्रज्ञान तुम्हाला स्वाभाविक आणि जीवनावश्यक वाटते. तुमच्या तरुणपणात जे शोध लागतात ते तुम्हाला क्रांतिकारक वाटतात आणि त्यांवर तुम्ही चरितार्थही चालवू शकता. परंतु, तुमच्या म्हातारपणी लागलेले शोध मात्र विकृत असतात, तरुणाईला वाईट नादाला लावून जगबुडी आणणारे असतात.”

“I’ve come up with a set of rules that describe our reactions to technologies:
1. Anything that is in the world when you’re born is normal and ordinary and is just a natural part of the way the world works.
2. Anything that’s invented between when you’re fifteen and thirty-five is new and exciting and revolutionary and you can probably get a career in it.
3. Anything invented after you’re thirty-five is against the natural order of things.”
– Douglas Adams, The Salmon of Doubt (Dirk Gently, #3)

‘विज्ञान: शाप की वरदान?’ या छापाचे निबंध आपण शाळेतही लिहितो. कृत्रिमप्रज्ञा या तंत्रज्ञानाविषयी तशाच प्रश्नांची चर्चा सध्या समाज करत आहे. समाजरचनेत मोठी उलथापालथ करू शकणारे एआय हे काही पहिले तंत्रज्ञान नाही आणि शेवटचेही नसेल. यापुढेही कधी सोपे मानवी क्लोनिंग/जीन एडिटिंग, मनातील विचार वाचणे, व्यक्तीचे मन किंवा वागणूक बदलणे, मृत व्यक्तीला जिवंत करणे, ट्यूरिंग टेस्ट पास करणारे यंत्रमानव बनवणे, कोणताही पासवर्ड क्रॅक करणे, टेलिपोर्टेशन, इ. विज्ञान काल्पनिकांतील काही तंत्रज्ञाने विकसित झाली तर त्यांनीही समाजावर मोठे परिणाम होतीलच. त्यामुळे, चॅटजीपीटीने (किंवा तत्सम सर्जनशील कृत्रिमप्रज्ञेने) निर्माण केलेल्या समस्यांविषयी फार ‘सायकल्स’ घालवण्याऐवजी, त्यानिमित्ताने, एकंदरच तांत्रिक प्रगतीमुळे समाजावर शक्य परिणामांविषयी काही विचार मी मांडत आहे.

वस्तुतः, प्रत्येकच नव्या तंत्रज्ञानाने कोणाचीतरी तुंबडी भरली आहे आणि कोणालातरी भिकेला लावले आहे. “नदीवर पूल बांधला की नावाडी बेरोजगार होतो, मग, पूल बांधायचा नाही का?” असे वि. म. दांडेकरांनी विचारल्याचे स्मरते. चाक, आग, शेती, हत्यारे असे प्रागैतिहासिक शोध असोत, प्राण्यांचा आणि गनपावडरचा वापर करून विस्तारलेली साम्राज्ये असोत, किंवा आधुनिक जगातील औद्योगिक क्रांती, हरित/श्वेतक्रांती/आयटी क्रांती असोत, प्रत्येक संशोधनामुळे विविध व्यवसायांच्या आर्थिक स्थितीत उलथापालथ अपरिहार्यच होती.

कृत्रिम निळीच्या स्पर्धेपुढे वनस्पतिज निळीचे भारतातील उत्पादन १८९७ ते १९१४ या केवळ १७ वर्षांत ७००० चौ. किमीवरून १२१० चौ. किमी इथपर्यंत आक्रसले, लाखो मार्क्सची नैसर्गिक नीळ आयात करणारा जर्मनी करोडो मार्क्सची कृत्रिम नीळ निर्यात करू लागला. पुन्हा पहिल्या महायुद्धात बंगालच्या शेतकर्‍यांवर सक्ती करून ३००० चौ. किमीवर नीळ घेण्यात आली, पण पहिले महायुद्ध संपल्यावर लवकरच निळीची शेती संपुष्टात आली. म्हणजे, भारतात निळीच्या व्यवसायावर अवलंबून राहणार्‍या हजारो कुटुंबांना पर्यायी व्यवसाय शोधावा लागलाच.

शिलालेख, ताम्रपट, भूर्जपत्रे किंवा कागदाचा शोध लागला तेव्हा पाठांतर ही गरज उरली नाही, पूर्वी रोजगारयोग्य असलेले पाठांतर हे कौशल्य निरूपयोगी होत गेले. यांत्रिक छपाई तंत्रज्ञान आले आणि ग्रंथांच्या हस्तलिखित प्रती निर्माण करण्याचा व्यवसाय बंद पडला. चालकविरहित, स्वयंचलित वाहनांमुळे भारतातील एक/दीड कोटी व्यावसायिक वाहनचालकांचे रोजगार धोक्यात येतील अशी भीती हल्ली व्यक्त करण्यात येते आहे. सध्या अमेरिकेत Writers Guild of America या पटकथालेखक संघटनेचा संप सुरू आहे आणि संपकर्‍यांची एक भीती “आमच्या नोकर्‍या कमी होतील अशा प्रकारे सर्जनशील कृत्रिमप्रज्ञेचा पटकथालेखनासाठी वापर केला जाईल” अशी आहे. सोबतच, Screen Actors Guild – American Federation of Television and Radio Artists या अभिनेते संघटनेच्या संपातील एक भीतीसुद्धा “आमच्या उपलब्ध प्रतिमा किंवा फुटेज विकत घेऊन, त्यांच्यावर कृत्रिमप्रज्ञेने प्रक्रिया करून नवीन अभिनीत फुटेज निर्माण केले जाईल” अशीच आहे. 

चाळीस-एक वर्षांपूर्वी भारतात संगणकांची संख्या वाढू लागली तेव्हा अनेक कर्मचार्‍यांनी निदर्शने, संप केले होते. भारतात बँक व्यवहारांत प्रचंड वाढ झाली आहे, बँकेच्या सेवा वापरणारे लोकही (स्वेच्छेने किंवा सरकारी रेट्यानेतरी) प्रचंड वाढले आहेत. परंतु, नव्या तंत्रज्ञानामुळे प्रत्येक बँक-कर्मचारी पूर्वीपेक्षा अधिक ग्राहकांची कामे करू शकतो. टेलर, पासबुक हाती अद्ययावत (update) करून देणे, इ. कामे बव्हंशी यंत्रांकडे गेलेली आहेत. अर्थव्यवस्थेत जितकी वाढ झाली त्या प्रमाणात बँक-कर्मचारी मात्र वाढले नाहीत. त्यातही, अधिकारी वाढत गेले, परंतु कारकून आणि कनिष्ठ कर्मचारी मात्र कमीच झाले. आयसीआयसीआय, अ‍ॅक्सिस, एचडीएफसी, इ. खासगी बँकांनीतर ९९ टक्के कर्मचारी हे अधिकारीच दाखवले आहेत (वरिष्ठ अधिकार्‍यांना संपाचा अधिकार नसतो). म्हणजे, संगणकांनी अनेक नोकर्‍या ‘खाल्ल्या’ आणि वाढत्या अर्थव्यवस्थेची फळे समप्रमाणात पसरली नाहीत.(१)

कोणतेही तंत्रज्ञान शिकलेल्या/मालकीत असलेल्या व्यक्तीची उत्पादकता वाढते आणि ती व्यक्ती पूर्वीपेक्षा अधिक लोकांच्या गरजा भागवू शकते. त्यामुळे, (समाजातील एकूण मागणी स्थिर राहिली तर) इतर कोणत्यातरी व्यक्तीचे, जुन्या तंत्राने बनवलेले उत्पादन महाग किंवा कमस्सल ठरून त्या व्यक्तीला बेरोजगारीचा धोका असतोच. कृत्रिमप्रज्ञेने रेडिऑलॉजिस्ट डॉक्टर बेरोजगार होतील असे होणार नाही, पण, कृत्रिमप्रज्ञा वापरून स्वतःची उत्पादकता वाढवणार्‍या रेडिऑलॉजिस्टांमुळे, कृत्रिमप्रज्ञा न वापरणारे रेडिऑलॉजिस्ट बेरोजगार होतील असे भाकित करण्यात आले आहे.

कोणत्याही समाजात काही व्यक्ती उत्पादक आणि काही अनुत्पादक असतात. या अनुत्पादक व्यक्तींना आप्तमित्र किंवा सरकार पोसते. परंतु शेवटी त्या अनुत्पादक व्यक्तींना आवश्यक सेवा आणि माल कोणा उत्पादक व्यक्तीकडूनच आलेला असतो. एक सुलभीकृत आकडेमोड करून पाहू:

समजा, व्यक्ती सरासरी ८० वर्षे जगते, पहिली २० आणि शेवटची २० वर्षे ती अनुत्पादक असते आणि मधली ४० वर्षे काम करते. असे समजू की लोकसंख्या स्थिर आहे, म्हणजे त्या समाजात कायम ५०% लोक उत्पादक वयाचे असतात. लोकसंख्या १००० धरली तर त्या समाजातील ५०० लोक उत्पादक वयाचे असतील. जर बेरोजगारी ०% असेल तर हे ५०० लोक जे उत्पादन/सेवा देतात त्याने त्या समाजातील पूर्ण १००० लोकांच्या सर्व गरजा भागतात, प्रत्येक उत्पादक व्यक्ती स्वतःव्यतिरिक्त एका अनुत्पादक व्यक्तीला पोसते. जर नव्या तंत्रज्ञानाने उत्पादकता ११% वाढली तर त्या समाजातील १००० लोकांच्या गरजा भागवण्यासाठी केवळ ४५० उत्पादक लोक लागतील आणि ५० उत्पादनक्षम लोक ‘बेरोजगार’ होतील, ही ‘१०% बेकारी’ असेल. या ५० उत्पादनक्षम लोकांवर त्या समाजात अजून ५० अनुत्पादक नातेवाईक/मित्र अवलंबून असतील. म्हणजे, त्या समाजात १०० लोकांचा भूकबळी जाईल. परंतु, त्या समाजातील उर्वरित ९०० लोकसंख्येच्या गरजा पुरवण्यासाठी केवळ ४०५ च लोक लागतील (त्रैराशिक: जर १००० ला ४५० तर ९०० ला किती?). म्हणजे, पुन्हा ४५ उत्पादक आणि ४५ अनुत्पादक आप्तमित्र असे ९० लोक त्या समाजात मरतील. हे दुष्टचक्र चालत राहिल्यामुळे तो समाज विलुप्त होईल.

वरील वर्णन reductio ad absurdum प्रकारचे आहे. तसे घडत नाही कारण ते टाळण्यासाठी तीन पर्यायी मार्ग शक्य आहेत:

१. कामाचे तास सर्वांसाठी कमी करता येतील. समाजाची कामसूपणाविषयीची मानसिकता बदलता येईल. विद्यार्थी’दशे’चा काल वाढवता येईल, निवृत्तीचे वयही घटवता येईल. आठवड्याला चाळीसऐवजी बत्तीसच तास काम करणे ‘फॅशनेबल’ ठरवता येईल, त्याची कायदेशीर सक्तीही करता येईल. आज चाळीस/अठ्ठेचाळीस/साठच तास काम करणे सामान्य समजले जाते, ती काही जैविक मर्यादा नाही. पूर्वी लोक बहात्तर, चौर्‍यांशी तासही काम करतच, त्यामुळे कामाचे तास आठवड्याला बत्तीस करण्यातही काही विचित्र नसेल. बर्ट्रांड रसेल यांनी अशा स्वरूपाची सूचना केली होती. अनुत्पादक व्यवधाने ‘फॅशनेबल’ ठरवता येतील. उदा., कला, क्रीडा, छंद, अधिक निगुतीचे पाळीव प्राणी/बालसंगोपन, नोकरीनिमित्तचा दैनंदिन प्रवास, बागकाम, तीर्थयात्रा. अगदी टोकाच्या परिस्थितीत सर्वच कामे स्वयंचलित यंत्रांनी केली तर WALL-E या चित्रपटातील समाजाप्रमाणे, कोणत्याच व्यक्तीला कोणतेच काम करावे लागणार नाही. चॅटजीपीटीच्याच निर्मात्यांनी बनवलेल्या, कल्पनाचित्र बनवणार्‍या कृत्रिमप्रज्ञेचे DALL-E हे नाव, ‘साल्वादोर दाली (Salvador Dalí) या चित्रकारासारखे काम करणारी कृत्रिमप्रज्ञा’ या अर्थाने, WALL-E शी यमक साधूनच, बनवले आहे.

२. प्रत्येक व्यक्तीचे कामाचे तास आठाऐवजी सात करण्यापेक्षा सात ‘फुलटाईम’ व्यक्तींकडून आठ व्यक्तींचे काम करून घेऊन आठव्याला नोकरीतून काढणे कंपनीला स्वस्त पडू शकेल. विशेषीकरण (specialization) वाढते तसे तंत्रशिक्षण देण्याचा खर्च वाढतो. ते शिक्षण अधिक लोकांना देऊन कमी तास काम करून घेण्यापेक्षा कमीच लोकांना शिक्षण द्यावेसे वाटेल. या पर्यायात ५०० उत्पादक उर्वरित ५०० अनुत्पादकांना पोसण्याऐवजी ४५० उत्पादक ५५० अनुत्पादकांना पोसतील (प्रत्येक कामगार व्यक्ती स्वतःव्यतिरिक्त एका अनुत्पादक व्यक्तीसाठी आवश्यक सेवा आणि वस्तू बनवण्याऐवजी, प्रत्येक कामगार व्यक्ती स्वतःव्यतिरिक्त १.२२ अनुत्पादक व्यक्तींसाठी आवश्यक सेवा आणि वस्तू बनवेल). आर्थिकदृष्ट्या प्रभावित व्यक्तींना पोसण्याचे काम विस्तारित आप्तमित्रांवर (माधुकरी लावावी लागेल) किंवा थेटपणे सरकारवर (कर वाढवून रोहयोत खड्डे खणून बुजविणे, बेरोजगारी भत्ता, रेशनचे धान्य, फूड कूपन्स, इ.) पडेल. खाती तोंडे कमी करणे भांडवलशाहीला आवडत नाही कारण त्या खात्या तोंडांसाठी कोणाला ना कोणालातरी मालाची खरेदी करावीच लागेल (म्हणूनच १९८० च्या दशकात कुटंबनियोजनाचे नामकरण कुटुंबकल्याण असे करण्यात आले आणि जनसंख्यानियंत्रण हे ध्येय अडगळीत टाकण्यात आले). ‘बेरोजगारी’ असली की मजुरी कमी द्यावी लागते, त्यामुळेही बेरोजगार लोकांना जिवंत ठेवणे भांडवलशाहीच्या सोयीचे असते. श्रीमंतांची श्रीमंती गरिबांच्या अस्तित्वाशिवाय बरीच निरूपयोगी ठरेल.

३. नवे रोजगार शोधले जातील. घरपोच अन्न पोहोचविणे हा रोजगार दहा वर्षांपूर्वी नव्हता. कला, क्रीडा, रिअ‍ॅलिटी शो बनवता येतील (याने रोजगारही मिळेल आणि प्रेक्षक त्यांना बघतील म्हणजे तितके उत्पादनक्षम तास वायासुद्धा घालवता येतील). अतिरिक्त उत्पादने खपवण्यासाठी ‘युद्ध’ हाही एक मार्ग जॉर्ज ऑर्वेलने कल्पिला होता. त्यामुळे, युद्धाने बेरोजगारी घटू शकते कारण काहींना सैनिक म्हणून रोजगार मिळतो आणि काहींना पुनर्निर्माणात रोजगार मिळतो (जीवितहानीने बेरोजगारीची समस्या सुटत नाही कारण जीवितहानीसोबत उत्पादनाची मागणीसुद्धा घटते, हे वरील हिशोबात दिसतेच).

सध्या तीनही मार्ग थोडेथोडे वापरले जातात.

विषमता वाढवू शकणारी परिस्थिती फार पूर्वीपासून उद्भवते आहे. स्वतःची एंट्रॉपी कमी करणे, स्वतःच्या प्रती बनवणे आणि त्यासाठी सभोवतीची उर्जा खर्चणे, सभोवतीची एंट्रॉपी वाढवणे ही सजीवत्वाची मूलभूत व्याख्याच विषमता निर्माण करते, वाढवते. उत्क्रांतीच्या सुरुवातीला सारेच एकपेशीय जीव होते (त्याहीआधी सारेच निर्जीव रसायनांचे समतुल्य, निर्बळ पुंजके होते). परंतु, परिस्थिती/म्यूटेशन यांच्या संयोगाने काहींचे नशीब पालटले, काहींचे वंशज अधिक जटिल दृष्टकेंद्रिक (eukaryotic) झाले, पुढे काहींचे वंशज मानवही झाले. ही विषमता होती, विषमतेतील वाढ होती. होमो सेपिअन सेपिअनचे भाग्य हे निअँडरथलच्या दुर्भाग्यासोबत घडले. जसा उत्क्रांतीचा फायदा सर्वांना असमान झाला तसाच, तंत्रज्ञानामुळेही काही मानवांना इतर मानवांपेक्षा अधिक फायदा होतो. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही सर्व मानवी मूल्ये आहेत, मानवेतर निसर्गात ती फारशी नाहीत. इतकेच नव्हे तर, ती मूल्ये समाजाला जपावीशी वाटतील की नाही तेही समाजाच्या तांत्रिक प्रगतीवर, भौगोलिक परिस्थितीवर, आणि संसाधनांच्या उपलब्धतेनुसार ठरते.

हाडे आणि लाकडी फांद्यांनी एकमेकांवर कुरघोडी करायला कपि (ape) किंवा आदिमानव शिकले असतील तेव्हा त्यांच्या सत्तेची व्याप्ती ती किती असेल? जेव्हा सगळेच भणंग असतील तेव्हा विषमताही कमीच राहील, ‘राजा’सुद्धा इतरांच्या गुहा/झोपडीपेक्षा थोड्याश्याच चांगल्या गुहा/झोपडीत रहात असेल, तशा समाजात एक प्रागैतिहासिक कम्युनिजमच असेल. परंतु, शेतीच्या शोधामुळे मानवांना अतिरिक्त अन्न पिकवता आले, प्राण्यांना माणसाळवल्यामुळे दूरवर प्रवास करता आला, सत्तेची, मालमत्तेची माहिती भूर्जपत्रे, शिलालेख, किंवा कागदावर टिकवून ठेवता आल्यामुळे एक ‘जनमान्यताप्राप्त’ राज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था स्थापता आली, खनिजांपासून अधिक प्रभावी शस्त्रे करता आली. या सर्व तंत्रज्ञानांमुळे विषमता वाढली, काही नशीबवान लोक मोठ्या भूभागावर, मोठ्या जनसमूहावर, मोठ्या संसाधनसाठ्यावर नियंत्रण ठेवू शकू लागले, आणि तीच संसाधने वापरून सत्ता, मालमत्ता टिकवू शकू लागले.

राजेशाहीला जितकी भांडवली विषमता टिकवणे शक्य होते त्याहून अधिक विषमता वाढली तेव्हा भांडवल हाताळण्याची अधिक क्षमता असलेली भांडवलशाही उदयाला आली. भांडवलशाहीची गरज म्हणून कल्याणकारी लोकशाही उदयाला आली, इतिहासात प्रथमच एक सजग, ‘सु’शिक्षित ‘मध्यमवर्ग’ निर्माण झाला, सत्ताधार्‍यांकडून उत्तरदायित्व (accountability) बजावून घेऊ लागला. परंतु, गेल्या काही शतकांच्या इतिहासात तांत्रिक प्रगतीसोबत जी मानवी मूल्ये निर्माण झाली त्याच मूल्यांना भविष्यातील प्रगतीसुद्धा आधार देईल असे नाही. तंत्रज्ञानानुसार मानवी मूल्यांचे स्वरूप बदलण्यासाठी काही वेळ लागतो. आता तंत्रज्ञान इतक्या झपाट्याने बदलते आहे (तंत्रज्ञानाला सुधारू शकणारे तंत्रज्ञानही निर्माण झाले आहे) की, त्याच्याशी सुसंगत मूल्यधारणा होण्याआधीच तंत्रज्ञान अजूनच प्रगत होत आहे. सत्ताधार्‍यांवर वचक ठेवण्यासाठी संघटन आवश्यक असते. यांत्रिकीकरण इतके वाढले की कामगारांची संख्या बरीच कमी झाली आणि त्याचा परिणाम कामगार चळवळीवर झाला. विशेषीकरण वाढत राहिले तशी विषमता वाढतच राहिली. शंभर अकुशल कामगारांना तुटपुंजा पगार देण्याऐवजी एकदोन कुशल कामगारांना अधिक पगार देऊन तेच उत्पादन मिळवणे तांत्रिकदृष्ट्या शक्य झाले तेव्हा कामगारांच्यातील असंतोषही (पगाराच्या व्यस्त प्रमाणात असल्यामुळे) कमी झाला आणि त्यांची संख्या कमी असल्यामुळे त्यांच्या संघटनेचे, मताचे वजन घटले, निषेधाचे मार्ग कमी झाले. मध्यमवर्गातील काहीजण श्रीमंतीकडे (हे स्वतःला उच्च मध्यमवर्ग म्हणवतात) आणि अनेकजण गरिबीकडे (यांना कनिष्ठ मध्यमवर्ग असा युफेमिजम आहे) ढकलले जाऊ लागले.

घरपोच अन्न/कुरिअरची खोकी पोहोचविणे, अ‍ॅपने घरगुती कामे मिळवणे, आणि ॲपने गिऱ्हाईक मिळवून टॅक्सी चालवणे, इ. (आयटी तंत्रज्ञानाने निर्माण झालेल्या) नव्या रोजगारांना gig economy म्हणतात. हे लोक कागदोपत्री व्यावसायिक (professional) किंवा एकल कंत्राटदार (independent contractor) असले तरी त्यांचे भवितव्य उज्ज्वल नसल्याची चिंता समाजशास्त्रज्ञ करतात. चाळीसेक वर्षांपूर्वी जे रोजगार उपलब्ध होते त्यांपेक्षा gig economy मधील रोजगार बेभरवशाचे आणि कमी पगाराचे आहेत. हे करोडो लोक असंघटित आहेत, त्यांच्या कामात उन्नतीच्या संधी कमी आहेत, आणि यांत्रिकीकरण आणि कृत्रिमप्रज्ञेने या रोजगारांचे भविष्यही अनिश्चितच आहे.

पूर्वी व्यक्ती सरकारी किंवा खासगी नोकरीत चिकटली की निवृत्तीपर्यंत निश्चिंत राहू शके. आताच्या झपाट्याने बदलत्या तंत्रज्ञानामुळे आणि व्यामिश्र अर्थव्यवस्थेमुळे ती शाश्वती उरलेली नाही. सध्याच्या जगात अप्रत्याशित (unpredictable) प्रकारे मूठभरांना उन्नतीच्या प्रचंड संधी मिळालेल्या दिसल्यामुळे इतर अनेकांच्या मनात असूया आणि वैफल्य निर्माण होण्यास पोषक परिस्थिती आहे. शिवाय, नव्या प्रकारच्या रोजगारांवर जगणारे लोक असंघटित असल्यामुळेही असहाय्य आहेत. सरकारवर लक्ष ठेवणारा सजग वर्ग कमी झाल्यामुळे, कल्याणकारी राज्य ही संकल्पना बाद होते आहे, याची अनेक उदाहरणे दिसतात, सरकारच्याच पैशाने बनलेल्या प्रकल्पांचेही ‘लोकार्पण’ (कुसुमाग्रजांच्या शब्दांत, “मी काय तुला वाहूं?”) करण्यात येते, तुमच्या रेल्वे प्रवासाचा सरासरी ४३% खर्च सरकार करत असल्याची आठवण तुम्हाला करून देण्यात येते. दुसरीकडे, उत्पादकता इतकी वाढली आहे की लोकांना जिवंत पण उपकृत ठेवण्यासाठी आवश्यक इतपत अन्नवस्त्रनिवाराशिक्षणारोग्यरस्तेवीजडेटापॅकपुतळेसेल्फीपॉइंट्सरेवडी यांचा खर्च मामुली झाला आहे. गरिबांना जगवणे सरकारला सहजशक्य झाले आहे. असहाय्य परंतु उपकृत जनतेला नागरिक (citizen) म्हणून वागवण्याऐवजी प्रजा (subject) म्हणून वागवणे शक्य होते आहे. अवकाळी (dystopian) कल्पनाविश्वात दडपशाहीसाठी वापरली जाणारी ड्रोन, सीसीटीव्हीतून चेहेरे ओळखणे, जीपीएस ट्रॅकिंग, बायोमेट्रिक प्रवेश, सोशल मीडियावरील वावरावरून व्यक्तीचा कल ओळखणे, इ. साधने खरोखरीच नियंत्रित करण्यासाठी कृत्रिमप्रज्ञेची मदत होऊ शकेल.

अशा प्रकारे, प्रत्येकच तंत्रज्ञानाचे काही तोटे असतात तसे कृत्रिमप्रज्ञेचेही होतीलच. तरीही, तंत्रज्ञानावर बंदी घालण्याचे किंवा अगदी त्याचे नियंत्रण करण्याचे प्रयत्नही इतिहासात कायमच असफल राहिलेले आहेत. एकतर, बहुतेक नवे शोध लावण्यात अद्वितीय प्रतिभेचा फारसा आविष्कार नसतो. जेम्स वॅटने इंजिन बनवले नसते तरी इतर कोणीतरी बनवलेच असते, प्रत्येक शोध हा त्या समाजातील पूर्वसुरींच्या मदतीवर लागलेला असतो आणि ती त्या समाजातील परिस्थितीची गरजही असते. त्यामुळे, चॅटजीपीटीसोबतच इतरही डझनभर निर्मात्यांनी सर्जनशील कृत्रिमप्रज्ञेची उत्पादने उपलब्ध केली आहेत. विकेंद्रित उद्योगाचे नियमन अशक्य असते, मग तो वेश्याव्यवसाय असो, हातभट्टी असो, पायरेटेड पुस्तके/सिनेमे असोत, की क्रिप्टोकरन्सी. त्यामुळे, कृत्रिमप्रज्ञा हे तंत्रज्ञान बंदी घातल्याने थांबेल असे नाही. दुसरे म्हणजे, चांगल्या समाजांनी कृत्रिमप्रज्ञेवर बंदी घातली तरी वाईट लोक त्यांचा वापर सुरूच ठेवू शकतील. आणि तिसरे म्हणजे, कोणतेही तंत्रज्ञान मानवी प्रगतीला मदतच करते. मानवाचे अवमूल्यन करणारे अनेक प्रसंग इतिहासात येऊन गेले, परंतु, समाज त्यांतून पार पडला म्हणूनच प्रगती शक्य झाली. चाकावरील काही बिंदूंना खाली जावे लागते तेव्हाच ते चाक पुढे जाऊ शकते.

डावे जीवशास्त्रज्ञ स्टीफन जे गुल्ड यांना खात्री होती की आईनस्टाईनच्या प्रतिभेचे अनेक लोक कापसाच्या मळ्यांमध्ये (गुलाम म्हणून) आणि वेठबिगारीत मेले असतील (“I am, somehow, less interested in the weight and convolutions of Einstein’s brain than in the near certainty that people of equal talent have lived and died in cotton fields and sweatshops.” – Stephen Jay Gould, The Panda’s Thumb). यंत्राने शक्य असलेली हमालीची कामे पूर्वी केरळमध्ये हमालांकडूनच करून घ्यावी लागत, कारण, यंत्राने काम केले तरी जितका रोजगार नष्ट होतो तितके पैसे मजूर संघटना सक्तीने वसूल करत. या ‘नोक्कु कूली’ प्रघातावर गेल्या काही वर्षांत बंदी आली आहे. कृत्रिमप्रज्ञेला शक्य असलेली कामे मानवांना देणे, किंवा, ‘कृत्रिमप्रज्ञेने रोजगार मारण्याची शिक्षा’ म्हणून विशेष कर लावणे, हाही ‘नोक्कु कूली’चाच प्रकार ठरेल. अर्थव्यवस्थेत व्यक्तींचे वस्तूकरण (objectification) होते, व्यवसायाच्या उपयुक्ततेनुसार व्यक्तीचे मूल्यमापन होते. त्यामुळे, यंत्राचे काम व्यक्तीला देणे हे त्या व्यक्तीचे अवमूल्यनच होईल. जे काम यंत्र करू शकते ते मानवांकडून करवून घेण्यात चुका अधिक होतात, वेळ आणि पैसा अधिक खर्च अधिक होतो, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ते काम मानवांकडून करवून घेण्यात त्या व्यक्तीच्या क्षमतांचा विकास खुंटतो, त्या व्यक्तीच्या क्षमतांचा अपव्यय, अपमानही होतो. त्याला श्रमप्रतिष्ठा म्हणू नये, त्यात मानवीपणाची फलश्रुती नाही. इतिहासात नेहमीच, खालची कामे यंत्रांना देऊन मानवांसाठी श्रेष्ठ कामे नेमण्यातूनच समाजाची प्रगती झालेली आहे, मग ते हाती पंखा खेचून इतरांना वारा घालणे असो, मानवांनी इतरांसाठी पालखी/रिक्षा वाहणे असो, गटारे साफ करणे असो, असेंब्ली लाईनमध्ये यंत्रांचे स्क्रू पिळणे असो, की रोजगार हमी योजनेत खड्डे खोदून बुजवणे. यंत्राने जे काम करता येते ते करण्यात मानवांना धन्यता का वाटावी? ते रोजगार नष्टच झाले पाहिजेत. कृत्रिमप्रज्ञेने धोक्यात आलेल्या (ड्रायव्हिंग किंवा कॉपीरायटिंग/कोडिंगसारख्या) रोजगारांनाही हे तत्त्व लागू न धरण्याचे काही कारण नाही. आपल्यापुढील खरी समस्या त्या प्रभावित लोकांसाठी अधिक चांगले, मानवी काम शोधून देणे (किंवा, काम न करणार्‍यांनाही एक किमान दर्जाचे सन्माननीय आयुष्य देणे) ही आहे. या कामासाठीही सरजनशील कृत्रिमप्रज्ञेची मदत घेता आली तर किमान एक काव्यगत न्यायतरी साधता येईल ☺

(१) भारतातील बॅंक कर्मचारी आणि सकल राष्ट्रीय उत्पादन यांचा आढावा

अभिप्राय 8

 • Very well written Nikhil. नवनवीन शोध व तंत्रज्ञान यामुळेच Malthus चे population growth वरचे भाकीत चुकले. आजपर्यंत प्रत्येक stage वर कुणीतरी जास्त लाभ ओढून घेत होते (traders, land owners, royalty, colonizers, industrialists, investers etc). आता यापुढील समाजात हे लाभार्थी बघावे लागतील. तु शेवटी म्हटल्याप्रमाणेच या पुढची खरी समस्या माणसांसाठी चांगले, मानवी काम शोधून देणे व तेवढेच महत्वाचे की काम न करणार्यांना सुध्दा किमान सन्माननीय आयुष्य देणे ही आहे.

  • मलातर ‘लाभार्थी’ हा शब्दच ‘भिकारी’, ‘याचक’ या अर्थाचा वाटतो कारण त्याचा समासविग्रह ‘लाभाची आस असलेला’ असा काहीतरी होतो. Beneficiaryसाठी काहीतरी चांगला प्रतिशब्द पाहिजे.

   • Beneficiary साठी चांगला शब्द हवा हे बरोबर. पण मी म्हटलेले traders, land owners, royalty, colonizers, industrialists, investers etc हे – काही अपवादात्मक सोडले तर – लाभाची आस धरणारेच होते. “Business of business is to make profit” वगैरे! भूतकाळातील प्रत्येक बदलात “अर्थव्यवस्थेची फळे समप्रमाणात पसरली नाहीत”. यापुढील लाभार्थी वेगळे असु शकतील.

    • होय, हे शक्य आहे, पूर्वी वकील दाबून पैसा कमवत, नंतर डॉक्टर, सॉफ्टवेअरवाले, एमबीए असे वेगवेगळे व्यवसाय वेगवेगळ्या काळात वर आले.

   • लाभान्वित हा शब्द ऐकल्यासारखा वाटतो. बहुदा हिन्दी भाषिक वापरतात जास्त.

 • सारे नवे काय घडत आहे हे आपण सांगत आहात , हे नवे बदल विषमता वाढवत नेतील कि काय असे वाटते

 • Real problem is establishing a just society giving equal opportunity to all .Men and women must enjoy and pursue their interests like music .painting ,drawing ,sports , reading ,touring etc work for pleasure and not for l survival or money is a possibility due to technology progress but system of every thing for profit must be changed and that is a human creation and challenge!

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.