परीक्षण – निर्वासित

मूळ पुस्तक : निर्वासित (आत्मकथन), लेखक : उषा रामवाणी,  
उषःकाल पब्लिकेशन, मुंबई १ जून २०२३

निर्वासित म्हणून ओळखले जाणारे सिंधी लोक महाराष्ट्रातील गावागावातून व्यापारी म्हणून स्थिरावले. पण त्या समाजातील मान्यतांपेक्षा निराळ्या आकांक्षा बाळगणाऱ्या मुलीला आईवडिलांच्याच घरात निर्वासित असल्यासारखे वाटले. अशा उपेक्षित मुलीचा संघर्ष किती तीव्र असेल? उषा रामवाणी यांच्या ‘निर्वासित’ या आत्मकथनातून त्यांची शिक्षणासाठी चाललेली धडपड, मायेचा ओलावा मिळण्यासाठी आसुसलेले हळवे मन दिसते. अर्थार्जनासाठी खडतर वाटचाल त्यांनी केली. अथक प्रयत्न केले. मराठी भाषेवर केवळ प्रभुत्व नव्हे तर प्रेम असणाऱ्या या तडफदार स्त्रीची संघर्षगाथा वाचनीय तर आहेच पण डोळ्यात अंजन घालणारीही आहे. 

देशाच्या फाळणीनंतर घरदार, जमीनजुमला सोडून, भारतातील गावागावातून स्थिरावलेले सिंधी लोक, त्यांना अजूनही काही ठिकाणी निर्वासित म्हटले जाते. व्यापारी, दुकानदार म्हणून ते आपल्याला भेटतात. सतत शिवणकाम करणाऱ्या, फार कमी पैसे घेऊन कपडे शिवणार्‍या ह्या बाया आपल्या परिचयाच्या असतात. त्यांच्या घरातील कपड्यांचा पसारा, लहान मुलांचा वावर आपण पाहिलेला असतो. त्या समाजातील एका स्वतंत्र विचारांच्या स्त्रीची कहाणी त्या समाजाचे वास्तव चित्र आपल्याला दाखवते. या व्यापारी समाजात शिक्षणाचे महत्त्व कोणालाच पटलेले नाही असे लेखिकेचे मत.

तिला मात्र खूप शिकावेसे वाटते. तिच्या इच्छा-आकांक्षा, तिच्या कुटुंबाच्या आणि समाजाच्या पठडीत न बसणाऱ्या आहेत. त्यामुळे कुटुंबात आणि समाजात लेखिका निर्वासित ठरली आहे. बगळ्यांमधे राहणाऱ्या राजहंसाची कहाणी येथे सतत आठवत राहते. लेखिकेच्या व्यापारी कुटुंबात शिक्षणाची पार्श्वभूमी नसताना, त्याचे महत्त्व पटलेले नसताना, शिक्षणाची कास तिने धरली. पण पैसा, पद यांच्यासाठी शिक्षण घेतले नाही, त्या पार्श्वभूमीवर विशुद्ध ज्ञान मिळविण्यासाठी चाललेली तिची धडपड खरोखरीच आश्चर्यकारक आहे. तिची ज्ञानाची असोशी, तीक्ष्ण बुद्धिमत्ता, जबरदस्त स्मरणशक्ती या लेखनातून ध्यानात येते. शिक्षणासाठी अपार कष्ट आणि मन:स्ताप उषा रामवाणी यांना सोसावा लागला आहे. 

सगळ्या प्रथा, परंपरा मान्य करीत त्या जगल्या असत्या तर त्यांचे जीवन नक्कीच सुकर झाले असते. पण वेगळी वाट निवडताना स्वतंत्र विचारांच्या प्रामाणिक स्त्रीला किती अडचणी येतात हे त्यांचे आत्मकथन दाखवून देते. 

सिंधी समाजातील ‘लासी’ या तळागाळातील व संख्येने मूठभर असलेल्या जमातीत उषा रामवाणी यांचा जन्म झाला. उच्चवर्णीय सिंधी लोकांना या जमातीची माहिती देखील नसते असे त्या सांगतात. ‘सुखवस्तू आदिवासी’ म्हणता येईल अशी अप्रगत व विकासाच्या प्राथमिक अवस्थेतील ही जमात असे तिचे वर्णन त्यांनी केले आहे. दारिद्र्य आणि वैचारिक मागासलेपण, रूढीप्रियता अशी वैशिष्ट्ये सांगून त्यांच्या जमातीची नेमकी स्थिती त्या डोळ्यापुढे उभी करतात. या जमातीत हुंडापद्धत नसूनही मुलीचे लग्न ठरलेल्या रिवाजाप्रमाणे करताना आईवडिलांना फार कष्ट सोसावे लागतात. 

शिक्षणाचा अभाव असलेला, कापडविक्री हा पारंपरिक व्यवसाय करणारा हा समाज. त्या समाजात एखादाच डॉक्टर किंवा वकील असतो. सर्वांचा दृष्टिकोन पक्का व्यापारी. गृहिणी असणे हेच स्त्रीचे अंतिम ध्येय. कुटुंबात मुलगा हवाच हा आग्रह. त्यांच्या समाजातील अनेक मुलींची उदाहरणे देऊन शिक्षणाला तेथे अजिबात महत्त्व नाही हे त्या सांगतात. अशा समाजातील ‘काकणभर पुरोगामी’ घरात त्यांचा जन्म झाला. ‘आशा’ या त्यांच्या बहिणीने सामाजिक संघर्षाला तोंड देऊन आंतरजातीय प्रेमविवाह केला. लेखिकेला दहावीनंतर शिकायचे होते पण वडिलांचा तीव्र विरोध होता. अनेकांनी त्यांचे मन वळवण्याचे प्रयत्न केले पण वडिलांनी ऐकले नाही. पाच-सहा दिवस लेखिका जेवल्या नाहीत तरीही काही उपयोग झाला नाही. दोन वर्षे त्यांना शिकता आले नाही. नंतर मात्र वडिलांचे मन पालटले ते त्यांच्या गुरुंच्या सूचनेमुळे. आणि मग लेखिकेला शिक्षणाची परवानगी मिळाली.आजीकडे राहून, स्वयंपाक करून ती अभ्यास करीत असे. या उत्साही, हुशार मुलीचे कॉलेजमध्ये कौतुक झाले. निबंध स्पर्धेमध्ये आणि इतर स्पर्धांमध्ये त्यांनी बक्षिसे मिळवली. राष्ट्रीय युवा व्यक्तिमत्व विकास शिबिरात आठ दिवस सहभाग घेतला. मराठी विषय त्यांच्या आवडीचा. कॉलेजच्या ग्रंथालयातून त्यांनी भरपूर पुस्तके वाचली. शिक्षकांविषयी आलेले अनेक बरे-वाईट अनुभव त्या सविस्तरपणे सांगतात. वडिलांना शिक्षणासाठी खर्च करणे व्यर्थ वाटत होते. त्यामुळे लवकरच त्यांनी नोकरी शोधली. वर्किंग वुमन होस्टेलमध्ये त्या राहू लागल्या. भावाची वृत्ती कर्ज काढून मौज करण्याची होती. त्याला वडिलांनी पैसा दिला. परंतु लेखिकेच्या शिक्षणासाठी खर्च करण्याची वडिलांची तयारी नव्हती. बारावीनंतर पुन्हा वडिलांनी तिच्या लग्नाचा आग्रह धरला. जाड भिंगाचा चष्मा असल्याने त्यांना मुलगा सांगून आला नाही. मुलीला चष्मा असला तर समाज हसेल म्हणून आई-वडिलांनी आरंभी डोळ्यांकडे दुर्लक्ष केले होते. जातवाल्यांसमोर त्यांना चष्मा लावता येत नसे. यावरूनच त्यांच्या कुटुंबातील विचारांची आणि त्यांच्या समाजाची पूर्ण कल्पना येते. घरात संत मंडळींचा सतत राबता असे. त्यांच्यासाठी चहा, नाश्ता करणे हे उषाचे काम असे. घरातील या सत्संगामुळे येणारे नातेवाईक तिच्या लग्नाचा आग्रह धरीत. पण सारे नातेवाईक तिला स्वार्थी, लबाड, ढोंगी, कणाहीन, मिंधे वाटत. शोभा, ज्योती या बहिणींच्या स्वभावाचे बारकावे विस्तृतपणे त्यांनी लिहिले आहेत. ‘ज्योती’ या बहिणीकडेच केवळ मायेचा ओलावा आणि थोडे दिवस स्वातंत्र्य मिळाले. आईला सतत भजने ऐकणं, लिहिणं, ध्यानधारणा करणं आवडत असे. सांसारिक जबाबदारीकडे तिचे लक्ष नव्हते. सर्व बहिणींनी कामे करून तिचा संसार सांभाळला. मुलींच्या जेवणाची देखील तिने कधी चिंता केली नाही असे लेखिका सांगते. आजी, आई, मामा, मावशी, काका, वडील यांच्या स्वभावाबद्दल त्या तपशिलातून माहिती देतात. त्यांच्याविषयीचे आलेले अनुभव नोंदवतात. पेपर, पुस्तक वाचलेले त्यांच्या घरात आवडत नसे. छंद, आवडीनिवडी, हौसमौज यांना स्थान नव्हते. त्यामुळे वेगळा, स्वतंत्र विचार करणाऱ्या उषाची घरात घुसमट होत असे. पण कुटुंबियांच्या मर्यादा उषा समजून घेते. त्यांनी दिलेल्या स्वातंत्र्याबद्दल देखील ती कृतज्ञ आहे. त्यांनी सक्तीने तिचे लग्न केले नाही हीदेखील मोठी गोष्ट असल्याचे ती सांगते. पुढे तर तिचा वेगळेपणा त्यांना कसा बरे कळेल? असाही विचार मांडते. ही प्रगल्भता तिच्यात आली आहे. 

सिंधी घरांमध्ये चौरस आहार नसतो. सतत तळणीचे पदार्थ केले जातात असेही त्यांनी सांगितले आहे. उषाला मात्र योग्य पोषणमूल्ये असणारा चौरस आहार आवडतो. तो योग्य पद्धतीने बनवला जावा असे वाटते. कुटुंबात सुती कपडे वापरले जात नसल्याचे सांगते. एकूणच कुटुंबातील सगळ्याच चालीरीतींचा तिने मुळातून विचार केलेला जाणवतो. तिची चिकित्सक वृत्ती ठायी ठायी दिसते. सरधोपटपणे कुठलीही गोष्ट ती स्वीकारायला तयार होत नाही. स्वतंत्र मते जपण्याच्या तिच्या वृत्तीची किंमत अर्थातच तिला चुकवावी लागते. तिची त्यासाठी तयारी आहे, ही फार मोठी बाब. घरात धार्मिक गोष्टींचे अवडंबर फार. उषा मात्र सत्संगाला कधी गेली नाही. त्यासाठी आईवडिलांचा विरोधही पत्करला. धाकटी बहीण ‘हिरा’ अभ्यासात हुशार पण आईवडिलांच्या प्रोत्साहनाने सोळाव्या वर्षीच साध्वी झाली. पुढे उषाला शिक्षणासाठी देखील बराच संघर्ष करावा लागला. मराठी साहित्य विषयात एम.ए. करण्यासाठी तिने मुंबई विद्यापीठात प्रवेश घेतला. तेथील शिक्षकांविषयी आलेल्या अनेक बऱ्या-वाईट अनुभवांबद्दल लेखिका सविस्तर लिहितात. छोट्या-मोठ्या नोकऱ्या करत त्यांनी स्वतःच्या शिक्षणासाठी पैसा उभा केला. त्यावेळी मदत करणाऱ्यांचा त्या कृतज्ञतापूर्वक उल्लेख करतात. कुटुंबियांशी देखील संबंध टिकवून ठेवतात. कॅम्पसमधील राजकारणाचे अनुभव त्या नोंदवतात. लेखिकेची धडाडी येथेही दिसून येते. प्राध्यापकांनी केलेल्या मानसिक छळाबद्दल त्या कुलगुरूंकडे तक्रारअर्ज करतात. सुशिक्षित सुसंस्कृत प्राध्यापकांचे वागणे, नामवंत विद्येच्या पीठातील त्यांचे अनुभव वाचून मन उद्विग्न होते. होस्टेलचे निकृष्ट अन्न, मानसिक ताणतणाव यामुळे लेखिकेला निराशेने घेरले. मृत्यूला कवटाळण्याचा त्यांनी प्रयत्न केला. रूढ परीक्षापद्धत, तेथील चाकोरी त्यांना पटत नव्हती. एम.ए. करणे सोडण्याचेही त्यांनी ठरवले. प्राध्यापकीमध्ये त्यांना रस नव्हता. पण संशोधनाची जाण, आवड असल्याने पीएच.डी.करण्याची इच्छा होती. स्वतःला काय हवे ते उषा रामवाणी यांनी ओळखले होते. पण पीएच.डी. करताना त्यांना अतिशय संघर्ष करावा लागला. एम.ए. उत्तीर्ण नसताना आणि गाईडशिवाय पीएच.डी. करणे हे एक आगळेवेगळे प्रकरण होते. त्यामुळे त्यांना असंख्य अडचणी आल्या. हा त्यांचा सगळा संघर्ष मुळातूनच वाचायला हवा. अत्यंत जिद्दीने त्यांनी कोणाच्याही मार्गदर्शनाशिवाय संशोधन केले. पीएच.डी. पदवी प्राप्त केली. त्यांचा विषय आव्हानात्मक आहे. त्यात मूलभूत संशोधन त्यांनी केलेले आहे. १८३२ पासूनची वृत्तपत्रे, मासिके हाताळत महत्त्वाच्या विषयावर त्यांनी प्रबंध पूर्ण केला. त्यासाठी अपार कष्ट केले. परंतु आलेल्या अनेक विपरीत अनुभवांनी त्या उमेद हरवून बसल्या. डॉ.छाया दातार, शर्मिला रेगे यांनी त्यांच्या प्रबंधाची प्रशंसा केली. त्यांचा प्रबंध निश्चितच महत्त्वाचा आहे. मात्र त्याचा योग्य तो उपयोग झाला नाही. सिंधी नामवंतांनी पीएच.डी.च्या वाटचालीत मदत केल्याचेही लेखिकेने नमूद केले आहे. त्यांचे सत्कार, मुलाखती अनेक ठिकाणी झाल्या. पण त्यांच्या पीएच.डी. वरही पीएच.डी. होऊ शकते असा त्यांचा संघर्ष. लेखिकेचा पूर्णत्वाचा ध्यास, विशुद्ध समाधान मिळवण्याची आस खरोखरच दाद देण्यासारखी आहे. जगरहाटीपेक्षा निराळी अशी त्यांची मनोभूमिका, वाटचाल सारेच आजच्या काळात दुर्मीळ आहे. “शिक्षण, नोकरी व लग्न या तीन महत्त्वाच्या टप्प्यांवर, नातेवाईक, मित्रमंडळी नि एकूणच समाजाचं खरं रूप उघडं पडतं” असं त्या म्हणतात. स्वतंत्र जगण्याचा प्रयत्न करताना त्या तावूनसुलाखून निघाल्याचे सांगतात. शैक्षणिक व्यवस्थेने त्यांचे खच्चीकरण केले. कुटुंबातील संघर्ष सतत सुरूच राहिला. युजीसीच्या वुमन रिसर्च फेलोशिपकरिता सीनॉप्सिससह अर्ज केला. पण तो न मिळाल्याचे त्यांना अत्यंत बेजबाबदारपणे सांगण्यात आले. सर्वत्र गलथानपणाचा त्यांना आलेला अनुभव वाचून वाचकांचे मन विदीर्ण होते. त्यानंतर त्यांनी काम सतत सुरूच ठेवले. अनेक नामवंत प्रकाशनसंस्थांमध्ये त्यांनी काम केले. त्यातील अनुभव त्या स्पष्टपणे लिहितात. पत्रकारितेच्या क्षेत्रात त्यांनी काम केले. ‘मृण्मयी’ नावाचा दिवाळी अंक काढण्याचा अनुभव त्यांच्या गाठीशी होता. अनेक संस्थांमध्ये त्यांनी संपादन, मुद्रितशोधन केले. तेथील अनुभवदेखील मानवी स्वभावाचे विविध नमुने दाखवणारे आहेत.

साहित्यक्षेत्रातील नामवंत संस्था, प्रतिष्ठित व्यक्ती यांच्याकडून आलेले अनुभव फार वाईट आहेत. ते वाचून अखेर ‘सगळ्यांचे पाय मातीचे’ असे सतत मनात येते. मराठी भाषेबद्दल देखील खंत वाटते. या क्षेत्रात उत्कृष्ट काम करूनही पुरेसे अर्थार्जन करता येत नाही, सतत खच्चीकरण होत राहते. असे असेल तर तरुण मंडळी मराठी भाषेकडे कशी वळणार?

लेखिकेला योग्य जीवनसाथी मिळताना देखील फार अडचणी आल्या. त्यांच्या समाजात तो मिळणार नाही हे त्या जाणून होत्या. त्यांच्या कुटुंबियांना देखील हे पटले होते. उषा यांनी स्वतः आपला सहचर निवडण्यासाठी प्रयत्न केले. त्या कुणावर अवलंबून राहिल्या नाहीत. त्याविषयी देखील त्या सविस्तर लिहितात. वयाच्या बावन्नाव्या वर्षी त्यांना योग्य असा जोडीदार मिळाला आणि चांगले सहजीवन, कुटुंबजीवन लाभले हे वाचून वाचक म्हणून अतीव समाधान वाटते. अखेरीस त्यांची जीवननौका स्थिरावली असे वाटते. सतत संघर्ष, किती त्रास त्यांनी सोसला. त्यानंतर त्यांना निवांत आयुष्य लाभायला हवेच असे मनात येते. कारण त्यांच्या सगळया प्रवासाशी वाचक एकरूप होतो ही त्यांच्या ओघवत्या भाषेची ताकद आहे. आत्मकथन प्रांजळपणे लिहिलेले असावे ही पहिली अपेक्षा असते. तसे नसेल तर वाचकांच्या ते ताबडतोब ध्यानात येते. उषा रामवाणी यांचा प्रांजळपणा, धीटपणा दाखवणारे अनेक प्रसंग पुस्तकात आहेत. स्वतःचे दोष, केलेल्या चुका त्या कबूल करतात. ते सारे प्रसंग त्यांनी तपशीलवार लिहिले आहेत. त्यामुळे त्यांचा सगळा जीवनपट डोळ्यापुढे स्पष्ट उभा राहतो. पण काही ठिकाणी तपशील अधिक दिलेत असेही वाटते.

पुस्तकात मुद्रणदोष राहून गेले आहेत. काही भाग पुन्हा छापला गेला आहे. वाचताना हे फार खटकते. मागास समाजातील स्वतंत्र व्यक्तिमत्व जपणार्‍या स्त्रीचा संघर्ष, तिने एकटीने दिलेला लढा व त्याची प्रामाणिक अभिव्यक्ती यासाठी हे आत्मकथन उल्लेखनीय आहे. वाचकाला जगण्याचे वेगळे भान देणारे आहे हे निश्चित. 

नागपूर

अभिप्राय 1

  • आजचा सुधारक या अंकामधील परीक्षण – निर्वासित – विनिता हिंगे यांचा लेख वाचला.अतिशय मार्मिक शब्दात स्त्री संघर्षाचा संवेदनशील मनाने घेतलेला ठाव लेखातून व्यक्त झालेला दिसतो.पुस्तकाच्या लेखिकेची स्वतंत्र विचाराने जगण्याची धडपड वाचकाच्या मनात स्पष्टपणे समोर येते.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.