नास्तिक तितुका मेळवावा, सर्वत्र विवेक वाढवावा

गेली दहा वर्षे मी ज्या दोन मुद्यांवरती बोलतो आहे. तेच दोन मुद्दे मला आणखी सविस्तर, वेगळ्या शैलीमध्ये मांडावे लागतील. एक, परिषदेसारखे हे सगळे उपद्व्याप कशासाठी? आणि दोन, परिषद सांगलीतंच का? तर हे जे दोन बेसिक मुद्दे आहेत त्याच्यावरती मी बोलणार आहे.

आपण गेली दहा वर्षे वेगवेगळे उपक्रम करत आहोत. यावेळी आपला दशकपूर्ती समारंभ आहे. सामाजिक जीवनामध्ये दहा वर्षे हा कालावधी फार मोठा नाही, पण तेवढा छोटापण नाही. काही गणती करण्यासारख्या ज्या गोष्टी आहेत, ज्या आपल्या जमेच्या आहेत, त्या मी नमूद करेन. परंतु त्याआधी मला तुमच्यासमोर काही दुःखद घटनासुद्धा शेअर करायच्या आहेत. गेल्यावर्षी आपले तीन विवेकसाथी आपल्यातून गेले. दिवाकर मोहनी (नागपूर) आपल्यातून गेले. नागपूरचेच नंदा खरे आपल्यामधून गेले आणि सुधीर बेडेकर. ही मंडळी आज आपल्यामध्ये नाहीत. हे सारे आपले विवेकसाथी होते. 

तर आता मुद्द्यावर येतो. हे उपक्रम का व कशासाठी? पहिले एक स्पष्ट समजून घ्यावं लागेल की आपण कोण आहोत? आपण एक अधिकृत, नोंदणीकृत विवेकवादी नास्तिकांचं संघटन आहोत आणि आपण FIRA (Federation of Indian Rational Association) चे सदस्यही आहोत. FIRA ची स्थापन बी. प्रेमानंदांनी केली. माझ्या माहितीप्रमाणे आपल्या देशात अतिशय स्पष्टपणे नास्तिकतेचा, बुद्धिप्रामाण्यवादाचा पुरस्कार करणारी, अधिकृत नोंदणी झालेली, ब्राईट्स सोसायटी ही या शतकातील एकमेव संघटना आहे. अशी संघटना सहजपणे निर्माण होत नाही. दुपारच्या सत्रात उपाध्यक्ष यावर बोलतीलच. कारण ही नोंदणी करताना गेली सहा वर्षे त्यांचे बीपी आणि शुगरसुद्धा वाढली, एवढा त्रास त्यांनी उचलला आहे. आपल्याला एवढं नाकारलं जातं पण आपल्या काही जमेच्या बाजूपण आहेत.

अशा परिषदा घेणं म्हणजे आपलं जे पहिलं उद्दिष्टं आहे ते म्हणजे आपला पाया आपण भक्कम केला पाहिजे. विवेकाचा, चार्वाकाचा, आगरकरांचा हा जो पाया आहे तो सैल सुटू देऊ नका. ही भूमी फक्त वाट्टेल ते बरळणाऱ्यांची नाहीये. ‘गांधीजींचे आजोबा कोण होते’ असे प्रश्न समोर आणणाऱ्या मूर्ख लोकांची ही भूमी नाहीये तर विवेकवादी आणि रॅशनल लोकांची ही भूमी आहे. हा पाया आपल्याला पहिल्यांदा मजबूत, कणखऱ केला पाहिजे. वेगवेगळ्या संकटांना सामोरं गेलं पाहिजे आणि आपली भूमिका पुनपुन्हा नमूद केली पाहिजे. 

दुसरी गोष्ट, इथं सांगलीमध्ये जे आपले सहकारी आहेत, आपण सर्वांनी मिळून ह्यांचं कौतुक करावं लागेल. याआधीचा उपक्रमांचा अनुभव हा मुंबई, पुणे, नाशिक या शहरांमधला होता. सांगलीसारख्या अर्ध शहरी, अर्ध ग्रामीण भागात, अतिशय कमीत कमी रिसोर्सेसमध्ये या मंडळींनी खूप चांगली मेहनत घेतली. या सगळ्यासाठी प्रातिनिधिक म्हणून डॉ. पाटील ह्यांचं प्रथम अभिनंदन करायचं आहे. ज्यांच्याकडे असं टॅलेंट आहे, अशी माणसं आपण शोधली पाहिजेत. संघटनेची ताकद तुम्ही किती संख्येने आहात ह्यावर नाहीये तर तुमच्याकडे क्वालिटी देणारी, तुमच्याकडे चांगलं आयोजन करण्याचं कौशल्य असणारी किती माणसं आहेत ह्यावर आहे. पाटील ह्यांनी या उपक्रमासाठी खूप मेहनत घेतली. आपला हेतूच हा की या परिषदेतून आपल्याला चांगली माणसं मिळाली पाहिजेत.

आणि तिसरं महत्त्वाचं उद्दिष्टं आहे ते म्हणजे पुढची पायरी. आपण सगळे भेटून नेमकं काय करणार आहोत? आपण पहिल्यांदा मेळावे घ्यायचो. हे मेळावे म्हणजे ढोबळमानाने भेटायचं, चहा पाणी, नाष्टा घ्यायचा, इतकंच! त्याच्या पुढची पायरी म्हणजे परिषद. त्याच्यामध्ये आपण अधिक अचूक लेव्हलला गेलो आहोत की ज्यात फक्त आपले सदस्य असतील, आपला जो ठराव आहे, जो आपण उद्या पास करणार आहोत, ज्यात स्टेट किंवा  सेंट्रल स्टेट नावाची व्यवस्था आणि धर्म नावाची व्यवस्था ह्या भिन्न आहेत. दोघांची सरमिसळ होणं हे लोकशाहीसाठी निश्चितच पूरक नाही. आपला जो ठराव आहे तो उद्या आपण मांडणार आहोत त्यात आपण हे अधिक स्पष्ट केलं आहे. 

तर ही जी पुढची पायरी आहे, म्हणजे तुम्ही भेटलात, गप्पा मारल्या, ठीक आहे! पण पुढील लेव्हलला गेलं पाहिजे , कन्स्ट्रक्टिव्ह लेव्हलला कार्यक्रम केला पाहिजे. आपले अध्यक्ष प्रमोद सर हे तुम्हाला ब्राईट्सच्या आवाक्याविषयी अधिक विस्तारानी सांगतील. प्रमोद सरांच्या नेतृत्वाखाली आपण ठाण्यामध्ये नास्तिकांसाठी जी चित्रकला स्पर्धा घेणार आहोत त्यालासुद्धा शेकडोच्या संख्येने प्रतिसाद मिळालेला आहे. अमोल पालेकर त्या कार्यक्रमासाठी आपले अध्यक्ष असतील. तर अशा उपक्रमांतून सांदी-कोपऱ्यात लपलेला जो विवेकवादी, नास्तिक आहे त्याच्यापर्यंत आपल्याला पोहचायचं आहे. सेल्सच्या भाषेमध्ये आपण म्हणतो की this is the best saleable product. फक्त आपले sales executives चांगले पाहिजेत. आपण सगळे, त्याचे वाहक, हा मुद्दा जर का अधिक ताकदीने मांडू शकलो तर आपल्याला चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळतो.

काही छोट्या छोट्या घटना घडत असतात. काल रात्री आम्हांला पोलिस स्टेशनला जावं लागलं. पण आमचा तिथला अनुभव चांगला होता. तिथले अधिकारी आता थोड्या वेळाने आपल्यासोबत लंचला देखील येणार आहे. म्हणजे माझा मुद्दा असा आहे की आपण त्यांच्यापर्यंत पोहचलं पाहिजे आणि आपला विवेकशील विचार चांगल्या पद्धतीने मांडला पाहिजे.

तर ही तीन प्रमुख उद्दिष्ट आहेत. एक की, पाया भक्कम झाला पाहिजे, आपण पाया सैल सोडता कामा नये. दुसरं म्हणजे, गुणवत्ता असणारी माणसं शोधणं, आणि तिसरा जो मुद्दा तो, पुढच्या पायरीवर जाणं. आपली जमेची बाजू अशी आहे की भारतातली मोठी नामांकित मंडळी ब्राईट्स सोसायटीचं नाव ऐकून आपल्याला ॲपॉइंटमेंट देतात, आपल्याशी बोलतात.

जावेद सरांसारखा एक छान माणूस आपल्यासोबत आहे याचा आनंद वाटतो. जावेद सरांचं इथे असणं ही एक मोठी उपलब्धी आहे.

आपण ऑक्टोपस करून घेण्यात काही मुद्दा नाहीये. जसं चार्वाक नावाचा ग्रुप होता, तशा परंपरेने आताच्या परिस्थितीमध्ये आपण भारतात पाच ते सहा स्ट्रॉंग युनिट तयार करत आहोत. त्यात आपलं एक युनिट पुण्यामध्ये आहे, दुसरं ठाण्यामध्ये आहे, तिसरं नाशिकमध्ये. सांगली, नागपूर, हैद्राबाद आणि दिल्ली अशी आपली पाच सहा युनिट्स लवकरच तयार होतील. या युनिट्समध्ये पन्नास शंभरच्या संख्येनं तरुण-तरुणी असतील, विचारवंत असतील आणि आर्थिक परिस्थिती चांगली असणारे लोकसुद्धा असतील. कारण ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला आर्थिक पाठबळ, वैचारिक पाठबळ आणि ग्राउंड सोल्जर असे सगळेच लागतात. अशी स्ट्रॉंग युनिट्स तयार झाली पाहिजेत.

आपण कोण आहोत? आपण काही फक्त व्हॉट्सॲप ग्रुप वगैर नाही आहोत. आपण एक नोंदणीकृत संस्था आहोत. त्यामुळे आपली जबाबदारी वाढली आहे. ती जबाबदारी आपल्याला पेलता आली पाहिजे. हे करत असताना थोड्या तडजोडी कराव्या लागतात, बुद्धीला पटणाऱ्या काही तडजोडी करून आपली ध्येयं आणि उदिष्टं घेऊन वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये प्रचार झाला पाहिजे. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांपर्यंत गेलं पाहिजे. तुम्ही साहित्यामध्ये जा, क्रीडाक्षेत्रात जा, कलेच्या क्षेत्रात जा, प्रत्येक ठिकाणी ह्याचा प्रसार झाला पाहिजे. ज्या ज्या क्षेत्रामध्ये धर्म गेला त्या त्या क्षेत्रामध्ये विवेकवादसुद्धा गेला पाहिजे. देवधर्मासारख्या खुळ्या कल्पनेमुळे मानवी जीवनाच्या ज्या ज्या क्षेत्रात डाग पडले आहेत त्या त्या क्षेत्रातील हे डाग विवेकाच्या stain remover ने स्वच्छ केले पाहिजेत. 

धर्म आणि  ईश्वर या मूर्ख संकल्पनेवर आधारित ज्या शक्ती निर्माण झाल्या आहेत त्यांना तर्काच्या कसोटीवर आणून त्यातील खोटेपणा लोकांसमोर आणावा ह्यासाठी ब्राईट्स सोसायटीच्या सदस्यांनी स्पष्ट भूमिका घ्यावी असं मला वाटतं.

नास्तिक तितुका मेळवावा, सर्वत्र विवेक वाढवावा.

धन्यवाद!

ह्या भाषणाचा व्हिडीओ बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
नास्तिक तितुका मेळवावा, सर्वत्र विवेक वाढवावा

अभिप्राय 1

  • या लेखात श्री. कुमार नागे यांनी आपल्या संस्थेला यथायोग्य मार्गदर्शन करताना आस्तिक लोकांसंबंधात कांहीही अनुदार टीपण्णी केली नाही. धन्यवाद!

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.