नास्तिकांची मांदियाळी 

नास्तिक्य हा सहसा लोकांच्या फार आवडीचा नसलेला किंवा दुर्लक्षित केलेला विषय. मग नास्तिक म्हणजे स्वतःला जास्त शहाणे समजणारे, दीड शहाणे, आगाऊ, इथपासून ते नास्तिकता म्हणजे टोकाची भूमिका घेणे इथपर्यंत बिरुदांचा वर्षाव केलेला असतो. आणि हे सगळं करताना नास्तिक, नास्तिक्य, बुद्धिप्रामाण्य, विवेक म्हणजे नेमकं काय, हे येतं कुठून, भारतीय तत्त्वज्ञानाच्या इतिहासात नास्तिकांची परंपरा किती मोठी आहे, ह्या सगळ्याचा विचार तर सोडाच पण कित्येकदा गंधही नसतो. तेव्हा नास्तिक परिषद म्हटल्यावर हे नास्तिक एकत्र येऊन करतात काय, ह्यांना परिषद घ्यायची काय गरज पडते, असे प्रश्न पडणे स्वाभाविक आहे.

नास्तिक परिषदेची गरज किंवा उद्दिष्टे ही अतिशय ठळक, स्पष्ट आणि स्वाभाविक आहेत. नास्तिक्य ही बुद्धिप्रामाण्यवादी, विवेकी, वैज्ञानिक दृष्टिकोनातून आकार घेतलेली एक प्रगल्भ विचारधारा आहे. ही विचारधारा पुरोगामी विचारपद्धती आणि जीवनपद्धतीचा पुरस्कार करते. तेव्हा नास्तिक्य आणि बुद्धिप्रामाण्यवाद अधिकाधिक प्रगल्भ, परिपक्व, आणि समाजाभिमुख होण्याकरिता प्रयत्नशील राहणं हे ढोबळमानाने नास्तिक मेळाव्यांचं किंवा परिषदांचं मुख्य उद्दिष्ट म्हणता येईल. फक्त भारतातच नव्हे तर जगात जिथेही बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक संघटना आहेत अशा सर्व ठिकाणी अशा परिषदा किंवा परिसंवाद होत असतात. अशीच एक परिषद नुकतीच सांगली येथे १६ आणि १७ सप्टेंबरला घेण्यात आली, जी ब्राईट्स सोसायटी या संस्थेने आयोजित केली होती. परिषदेचे उद्घाटक तुषार गांधी, प्रमुख पाहुणे जावेद अख्तर, आणि इतर प्रमुख मान्यवर वक्ते कुमार केतकर, ॲड. असीम सरोदे, विश्वंभर चौधरी, शारदा साठे, यांच्या उपस्थितीत ही परिषद पार पडली. ह्याचं निवेदन डॉ. शंतनू अभ्यंकर ह्यांनी केलं. ह्या परिषदेत सर्वांत लहान नास्तिक हा इयत्ता आठवीतील एक चुणचुणीत विद्यार्थी होता ही बाब अतिशय आशादायक आहे. 

या परिषदेच्या निमित्तानं बुद्धिप्रामाण्यवाद आणि नास्तिकता ह्याच्याशी निगडित अनेक विषयांवर मुक्त चिंतन झालं. भाषासंपन्न सरजनशील लेखक, कवी आणि पटकथाकार जावेद अख्तर जे स्वतः बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक आहेत, ज्यांना २०२० चा रिचर्ड डॉकिन्स हा बुद्धिप्रामाण्यवादी विचारधारेचे प्रबोधन आणि प्रचार करणाऱ्या व्यक्तीला देण्यात येणारा पुरस्कार मिळाला आहे, ते स्वतः गेली कित्येक वर्षं अतिशय ठामपणे आणि कमालीच्या वैचारिक स्पष्टतेनं नास्तिकतेची विचारधारा मांडत आहेत.

नास्तिकता म्हणजे काय हे इथे प्रथम समजून घेणं गरजेचं आहे. नास्तिकता म्हणजे देव नाकारणे एवढा संकुचित हा विचार नाही. देव नाकारण्यामागे बुद्धिप्रामाण्यवादी, विवेकी, वैज्ञानिक दृष्टिकोनातून केलेल्या अभ्यासाची, चिंतनाची, मनाची आणि अनुभवांची मोठी प्रक्रिया आहे.

आस्तिकांचा नास्तिकतेपर्यंतचा प्रवास हा सर्वसाधारणपणे काही समान टप्प्यांमधून जातो. म्हणजे असं की आस्तिक असताना आपल्या आयुष्यात पुरोगामी, बुद्धिप्रामाण्यवादी, नास्तिक व्यक्ती, संस्था, संघटना किंवा पुस्तक येतं. त्यांच्यासोबत हा विवेकवादी विचाराचा धागा पकडून आपण अभ्यास, मनन आणि चिंतन करत जातो. आपलं स्वतःचं आणि भोवतालच्या परिस्थितीचं, आपल्या अनुभवांचं, भावविश्वाचं, धार्मिक-आध्यात्मिक संकल्पनांचं अवलोकन तटस्थपणे करू लागतो. ह्या प्रवासात आपल्या श्रद्धा, मान्यता, अवास्तव पारलौकिकाच्या संकल्पना कुठे आणि कधी गळून पडल्या ते जाणवतही नाही. नास्तिकतेपर्यंतचा प्रवास हा व्यक्तिगणिक वेगवेगळा असला तरी त्यात समान दुवा हा असतो की नास्तिक्याकडे वळल्यानंतर बौद्धिक, वैचारिक आणि मानसिक पातळीवर व्यक्ती म्हणून आपण पूर्वीपेक्षा अधिक समृद्ध आणि समाधानी होतो. अगदी लख्ख प्रकाशात सगळं स्पष्ट दिसू लागतं आणि आपण उत्तरोत्तर अधिक जिज्ञासू आणि सत्यशोधक होत जातो. ज्या प्रवासात आपल्याला प्रकाशकिरणांकडे निर्देश करणारी, मागे उल्लेख केल्याप्रमाणे जी माणसं किंवा पुस्तकं भेटतात, यामध्ये बहुतांश पुरोगामी परिवर्तनवादी चळवळींचे प्रणेते, सुधारक, तत्त्वचिंतक किंवा वैज्ञानिक असतात. माझ्या बाबतीत त्या रिचर्ड डॉकिन्स, डॉक्टर दाभोलकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पेरियार अश्या प्रभृती होत्या.

बरं, मनातून आपण अगदी स्पष्टपणे बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक झालो तरी कित्येकांना लगेच तशी उघड कबुली देणंही कठीण असतं. घरी जर कर्मठ आणि कडक वातावरण असेल, मनात दडपण असेल, तर आपल्याला आता पटत नसलेल्या कर्मकांडांमधून किंवा रुढींमधून बाजूला होणं तेवढं सोपं नसतं. आपण घरच्यांना कसं समजावून सांगायचं? आपण एकटे पडू का? आपण विरोध सहन करू शकू का? असे बरेच प्रश्न बऱ्याच जणांना पडतात. इथे जर आपले समविचारी बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक मित्र-मैत्रिणी, संस्था किंवा संघटनेतले साथी असतील तर अशी परिस्थिती हाताळणं हे अधिक सुकर होतं. हा नास्तिक संघटनांचा एक महत्त्वाचा कार्यभाग आहे, किंबहुना असायला हवा. एकमेकांच्या अनुभवातून संवादाची आणि अभिव्यक्तीची निरनिराळी माध्यमे आणि पद्धती आपण पडताळत जातो. 

आणखी एक प्रश्न येतो, तो म्हणजे बुद्धिप्रामाण्यवाद हा एवढा महत्त्वाचा का आहे? आपण बुद्धिप्रामाण्यवादी नसलो म्हणून काय बिघडतं? कोणाचं काही अडतं का? तर हो, अडतं. बुद्धिप्रामाण्यवाद हा जीवनाच्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि दैनंदिन सगळ्याच पैलूंवर किती प्रभाव टाकतो आणि त्याचा अभाव हा किती समस्यांना आमंत्रण देणारा ठरतो यावर घुसळण आणि मंथन करणं हादेखील नास्तिकांच्या चर्चाविषयांपैकी एक महत्त्वपूर्ण विषय ठरला आहे. सध्या सर्वत्र बोकाळलेला धर्मांध हिंसाचार, माध्यमांचा दुरुपयोग करून आक्रमकपणे घराघरात व्हॉट्सॲप आणि गोदी मीडियाकडून पोचवण्यात येणारा दुष्प्रचार, द्वेष या सगळ्याच्या मुळाशी विवेकाचं दमन कशा प्रकारे केलं जातं आणि संपूर्ण राजकारण धर्मकेंद्रित कसं झालं आहे अशा प्रश्नांचा आपण मागोवा घेत गेलो तर शेवटी आपण विवेकवादी, वैज्ञानिक दृष्टिकोनापर्यंतच येऊन पोहोचतो. 

ह्या देशामध्ये भक्तिमार्गाचं प्रमाणापेक्षा जास्त स्तोम माजवलं गेलं असल्यामुळे इथे लोक साहजिकच अंधश्रद्धांना जास्त बळी पडतात. मानवी जीवनाचा आणि नैसर्गिक घडामोडींचा एकूण विचार वैज्ञानिक दृष्टिकोनातून न करता आध्यात्मिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून जास्त केला जातो (उदा. कर्मविपाकाचा सिद्धांत). जगात घडणाऱ्या नैसर्गिक आणि सामाजिक घटनांसाठी त्यामागे असलेली परिस्थितिजन्य कारणे जबाबदार असतात. कुठलीही गोष्ट ही कोणाच्यातरी कर्माचं आध्यात्मिक फळ, ईश्वराचे दैवी संकेत, नवसाचे फळ, नवस न फेडण्याचा कोप असलं काहीही नसून ती घटना ही कार्यकारणभावाने तपासावी लागते. उदाहरणार्थ, दुष्काळ पडणे ह्या परिस्थितीला नैसर्गिक घटक, जसे की तापमान, जलवायूपरिवर्तन, त्या ठिकाणची भौगोलिक परिस्थिती, पर्यावरण, असे घटक कारणीभूत असतात, जे संबंधित परीक्षणे, निरीक्षणे आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून वस्तुनिष्ठपणे आकलन आणि अभ्यास केल्यावर आपल्याला कळू शकतात. तेव्हा दुष्काळ पडण्याला पुराणकथेतल्या कोणाच्यातरी शापाशी, धार्मिक पतनाशी किंवा देवी-देवतांच्या कोपाशी जोडणं हे अतार्किक, अंधश्रद्धात्मक आणि असत्य आहे. हीच गोष्ट मानवी जीवनातील घडामोडींनाही लागू होते. अशाप्रकारे अभ्यास, चिंतन, मनन आणि सरावाने विचारप्रक्रिया अधिकाधिक निर्दोष आणि तर्कशील होत जाते. मग आपण जीवनातील व्याधी, संकटे, यशापयश आणि अपघातांना कुठल्याही पारलौकिक आध्यात्मिक पूर्वग्रहांनी न बघता यथार्थवादी कार्यकारणभाव, संदर्भ, पुरावे, आणि वास्तविक परिघांमध्ये समजू लागतो. अर्ध्याहून अधिक दुःख, कष्ट आणि काल्पनिक भये तर इथेच नेस्तनाबूत होतात. 

तेव्हा बुद्धिप्रामाण्यवाद हा काही मनोरंजन किंवा धाडसाचा खेळ नव्हे की जो कधी एखाद्याला वाटला तर त्याने खेळावा. हा उत्क्रांतीसारखाच मानवी बुद्धी आणि चेतनेचा उत्तरोत्तर विस्तृत होत जाणारा अखंड प्रवास आहे. या प्रवासात परिवर्तनाचे वाटसरू मार्गस्थ झालेले आहेत. इथे डोळे मिटून कशावरही विश्वास किंवा श्रद्धा ठेवायची नाही. डोळे उघडे ठेवून पूर्ण सारासार विचारांशी ज्या गोष्टी तर्कसंगत सदसद्विवेकबुद्धी आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या निकषांवर तपासून योग्य वाटतील त्या अंगीकारत आणि इतर विपरीत टाकाऊ गोष्टी आवरत पुढे जायचं आहे. तर्क न करता केवळ ग्रंथात सांगितलं आहे म्हणून, गुरुने सांगितलं आहे म्हणून, इष्टदेवतेसाठी श्रद्धेनं वर्षानुवर्षं कर्मकांड आणि सोपस्कार करत आलात. तिथे फार प्रश्नही विचारले नाहीत. इथे चिकित्सकबुद्धी पणाला लावून प्रत्येक वळणावर प्रश्न करत पुढे जायचं आहे, अगदी समाधानकारक उत्तर मिळेपर्यंत. ही विवेकाची वाट एकदा चोखाळून पहाच. 

“ज्या देवाने आपल्याला इंद्रिय, तर्क आणि बुद्धी दिली आहे असे आपण समजतो, त्या देवाला ह्या गोष्टींचा मानवाने वापर करू नये असे वाटत असेल, तर ते मी बंधनकारक समजत नाही” – गॅलिलिओ.

अभिप्राय 2

  • “नास्तिकता म्हणजे फक्त देव नाकारणे एवढा संकुचित विचार नाही” हे बरोबर आहे पण मग विचार काय करायचा. आपण नेहमीच्या जीवनात विचार करण्यावाचून थांबू शकत नाही. रोग का होतात, भूकंप का होतो, आपण ज्योतिषावर विश्वास का ठेवतो हे सगळे विचार आपला मेंदू त्याच्या कोत्या बुद्धिनुसार करतो. पण ही बुद्धी फक्त common sense वर आधारित असते.पण common sense हा अपुरा आहे. विज्ञानाचा अभ्यास व ध्यास घेतल्याशिवाय अनेक गोष्टींची कारणे कळत नाहीत. त्या पोकळीत मग छद्मविज्ञान रुजून येते .
    बुध्दिप्रामाण्यवाद हा अचानक हवेतून येत नाही. रुढी- परंपरा- अंधश्रद्धा यांसारख्या गोष्टी नाकारण्यासाठी व सत्याचा आग्रह धरण्यासाठी वैज्ञानिक संस्कृती व परंपरा लागते.तिच्याशिवाय बुद्धिप्रामाण्यवादाला आशय- पाया मिळत नाही. केवळ डोकं सुपीक असून चालत नाही. आदिमानव व आधुनिक मानव यांच्या मेंदूमध्ये मोठा फरक नाही. संस्कृती आपला मेंदू घडवते.वैज्ञानिक संस्कृती आल्याशिवाय बुध्दिप्रामाण्यवाद मूळ धरणे कठीण आहे.
    ग्रंथालय, प्रयोगशाळा आणि वादशाळा ( Debating Society) यांच्या त्रिवेणी संयोगातून विज्ञानाचं संयुग तयार होईल जे बुद्धिप्रामाण्यवादी समाज घडविण्यास आवश्यक घटक आहे.

  • ज्योतीबेटी, तुझ्या लेखाचा परामर्ष घेताना मी लेखाच्या शेवटी तूं जे गलीलिओचे मत उद्घृत केले आहेस त्यापासून करतो. तो म्हणतो की देवाने दिलेल्या इंद्रये, तर्क, बुध्दीचा वापर मानवाने करु नये असे देवालाच वाटत असेल तर ते तो बंधनकारक समजत नाही. पण खरे तर मानव देवाने दिलेल्या या सर्व गोष्टिंचा वापर अनादी काळापासुन करत आला असल्यामुळे तर एवढी प्रगती करू शकला आहे, हे नाकारता येईल का? प्रत्येक माणूस आपापल्या परीने या सर्व गोष्टिंचा वापर करतच असतो. मग नास्तिक त्यांच्या विचाराप्रमाणे देवाचे अस्तित्व नाकारत असतात; तर आस्तिक श्रद्धापूर्वक देवाने दिलेल्या देणगीचे आभार मानत असतात. विवेक रायकर यांनी त्यांच्या अभिप्रायात ज्योतीषशास्त्रावरील विश्वासाचा उल्लेख केला आहे. होय प्रत्येक व्यक्ती तिला आलेल्या अनुभवांनुसार विश्वास ठेवत असते. मला स्वत:ला तसा अनुभव आला आहे. माझ्या वडिलांचे देहावसान मी चारेक वर्षांचा असताना झाले. आईच्या समाचारासाठी आलेल्या तिच्या मैत्रिणीचे पती ज्योतीष जाणत होते. त्यांनी माझ्या आईला सांगितले होते की तिच्या मोठ्या मुलाला त्याच्या बारव्यावर्षी गंडांतर असून ते टाळण्यासाठी शंकराची उपासना करणे आवश्यक आहे. माझ्या आईने माझ्या भावाकडून शवलीलांमृताचा अकरावा अध्याय दर सोमवारी वाचून घेतला व स्वतः ही शंकराची उपासना करू लागली होती. आमच्या गांवात त्या काळात पाण्याची टंचायी असल्यामुळे एप्रिल महिन्यात नदीवर कपडे धुवायला जावे लागत असे. त्या शनिवारी अर्धा दिवस शाळा असल्याने भाऊ दहा वाजता घरी आला होता, आणि हट्ट करून तिच्या सोबत नदीवर गेला होता. त्याला पोहता येत नव्हते. आईने ताकीत दिली असूनही तो पाण्यात उतरला व गटांगळ्या खाऊ लागला.त्यावेळी नदीवर आई एकटीच होती. शंकराचे स्मरण करून तीही पाण्यात उतरली व गटांगळ्या खाऊ लागली. तेवढ्यात कुठून दोन माणसं आली व त्यांनी माझ्या भावाला पाण्यातून बाहेर काढले. आई सुध्दा बाहेर येऊ शकली व भावावर आलेले गंडांतर त्या ज्योतिषाच्या इशाय्रामुळे टळले. ही माझ्या जीवनात घडलेली सत्य घटना आहे. मग ज्योतिषशास्त्र आणि परमेश्वराचे अस्तित्व कसे नाकारता येईल? तुमची श्रध्दा असेल तर या युगातही परमेश्वर या ना त्या रुपाने आपल्याला मदत करत असतो; व मला तसा अनुभव येत असतो. त्यामुळे नास्तिकता जपणाय्रांनी त्यांच्या विचारा प्रमाणे जगावे, पण आस्तिकांच्या जीवनात ढवळाढवळ करु नये असे माझे स्पष्ट मत आहे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.