ब्राईट्स सोसायटीतर्फे गेली १० वर्षे आपण अनेक उपक्रम राबवतो आहोत. वैज्ञानिक दृष्टिकोनातून समाजाचे शैक्षणिक प्रबोधन करणे, बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिकांमध्ये साहचर्य, सुसंवाद निर्माण करणे, त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे इत्यादी उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी ब्राईट्स सोसायटीची स्थापना करण्यात आली. २०१४ पासून ब्राईट्स सोसायटीने सभा, नास्तिक संमेलने, भाषणे, चर्चासत्रे आणि चर्चा आयोजित केल्या आहेत. या उपक्रमांना उत्तम प्रतिसाद मिळतो. निमंत्रित वक्त्यांमध्ये समाजातील प्रभावशाली व्यक्तिमत्वे, शिक्षणतज्ज्ञ, कलाकार, लेखक, संपादक, स्तंभलेखक, कायदेतज्ज्ञ, राजकारणी, अभ्यासक, शास्त्रज्ञ, सामाजिक कार्यकर्ते इत्यादिंचा समावेश होतो. ब्राईट्स सोसायटीने मराठीत एक पुस्तकही प्रकाशित केलेले आहे.
क्रमश:, व्यक्तिगत भेटीगाठी, नंतर मेळावे, त्यानंतर परिषदा (सोबतच एखादा कृतिकार्यक्रम/ठराव) आणि या प्रक्रियेतून स्थानिक पातळीवर एक समूह तयार होतो. असा ‘नव-चार्वाक समूह’ तयार झाला की थोडे पुढे जाऊन अधिक स्पष्ट आणि काटेकोर उपक्रम आपण घेत असतो. सध्या महाराष्ट्रामध्ये ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर आणि सांगली अश्या ठिकाणी आपले काम उभे करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मोजकीच परंतु वैचारिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या सक्षम असणारी युनिट्स आपण उभारत आहोत. या युनिट्समध्ये तरुण असावेत, वैचारिक बैठक स्पष्ट असणारे अनुभवी सहकरी असावेत असा उद्देश आहे. एकूणच देव-धर्म-जातीपाती अश्या (तुलेनेने) ‘संवेदनशील’ क्षेत्रात तार्किक भूमिका घेणारे सक्षम समूह कार्यरत राहणे समाजाच्या हिताचे आहे.
ह्या वर्षी ब्राईट्स सोसायटीतर्फे सांगली येथे नास्तिक परिषद घेतली. कोल्हापूर, सांगली आणि दक्षिण महाराष्ट्रात प्रबोधनाची मोठी परंपरा आहे. परंतु गेल्या काही वर्षांत सरकारी कार्यालयांमध्ये धार्मिक कर्मकांडे, देवतांचे फोटो लावणे, आरत्या म्हणणे याचे प्रमाण वाढू लागले आहे. तसेच काही कट्टरवादी लोक इतिहासपुरुषांना पुढे करून स्वत:चा धर्मांध अजेंडा राबवू लागले आहेत. यावर स्पष्ट भूमिका घेऊन कृतिशील होण्यासाठी सांगली येथे परिषद घेण्याचे ठरले. आपल्या परिषदेचा आशय आणि गाभा हा ‘मुक्त चिंतन, नास्तिकता आणि विवेक’ ह्याच विचारांचा असला पाहिजे यावर आम्ही लक्ष केंद्रित केले होते. दोन दिवसांच्या ह्या निवासी परिषदेत महाराष्ट्रातून आणि इतर राज्यातून साधारण २५०–३०० जण उपस्थित होते. या परिषदेत खालीलप्रमाणे ठराव पारित झाला.
ठराव (Resolution):
शासनव्यवस्थेची धोरणे तार्किक असणे हा नागरिकांचा एक मूलभूत हक्क आहे आणि धर्मनिरपेक्षता हा तार्किक, न्याय्य शासनव्यवस्थेचा एक अविभाज्य पैलू आहे. शासकीय कारभारात धार्मिक निकषांचा प्रभाव हा धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वाचा भंग आहे. तसेच, त्याने अनेकदा समता आणि स्वातंत्र्य या मूलभूत मानवी हक्कांचेही उल्लंघन होते.
म्हणून, शासकीय कर्मचाऱ्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयीन कर्तव्यांवर त्यांच्या खासगी धार्मिक धारणांचा प्रभाव असू नये या आमच्या घटनादत्त अपेक्षेचा आम्ही पुनरुच्चार करतो आणि तिच्या पूर्ततेसाठी आम्हीं संबंधित यंत्रणांसोबत सनदशीर मार्गाने पाठपुरावा करू.
यावेळी प्रख्यात पटकथा लेखक, गीतकार आणि कवी जावेद अख्तर आपल्या सोबत होते. जावेद हे नास्तिक आहेत, ते शब्दप्रभू आहेत, ते प्रतिभावंत आहेत! अश्या ग्रेट माणसांना निव्वळ भेटणे आणि परिषदेला आमंत्रित करणे एवढाच आपला हेतू नव्हता तर अशा प्रतिभावंतांसोबत आपल्यासर्वांचा संवाद घडला पाहिजे, तो वारंवार घडत राहिला पाहिजे हाही उद्देश त्यामागे होता. जावेद यांचेसोबत तुषार गांधी, कुमार केतकर, असीम सरोदे, विश्वंभर चौधरी, क्रांती कानडे आणि अन्य मान्यवरदेखील कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रम एकंदरीतच भरगच्च होता.
इथे एक गोष्ट नमूद करू इच्छितो. आपले काही विरोधक आणि सहकारीसुद्धा एक प्रश्न उपस्थित करतात की ‘वक्ते जाहीर आणि बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक आहेत का?’ तर नाही. सर्व वक्ते जाहीर आणि बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक नाहीत. तशी अपेक्षा ठेवणे रास्त नाही. बुद्धीला पटण्याजोगी तडजोड करावी असे मला वाटते. असे केल्याने एक कर्कश कोलाहल होईल ह्याची मला पूर्ण कल्पना आहे. तो इतर वेळीसुद्धा होतो. परंतु ह्या कोलाहलाचे रूपांतर संधीमध्ये कसे करायचे हे आपल्याला पक्के ठाऊक आहे. आज अनेक साहित्यिक, विचारवंत, कलाकार आपले प्रशंसक आहेत. ते आपल्याला खूप मदत करतात. तुलनेने विरोधक सुमार आहेत. आपल्या विरोधात बोलणारे काहीजण दिसतात. पण ते तर्काला धरून आक्षेप घेत नाहीत. पण तार्किक आक्षेप घेणारे आणि आपला विरोध वॉट्सॲपपुरता मर्यादित न राहता मोठ्या व्यासपीठावरती (विधिमंडळ, साहित्यसंमेलने इत्यादी ठिकाणी) झाला तरच खरी मजा येईल. आपल्या एका ज्येष्ठ सहकाऱ्याविषयी हिंदुत्ववाद्यांनी पोलिसांकडे दोन तक्रारी नोंदवल्या आहेत. या सगळ्याचा खूप त्रास झाला आहे, होत असतो. त्यांचे वय पाहता त्यांनी खूप सहन केले. पण हा त्रास सहन करून आपण आता उच्चन्यायालयात जाणार, आपण सर्वोच्च न्यायालयात जाणार आणि ह्या त्रासाचे रूपांतर आपण संधीत करणार. तर, तयारीत राहा!
ह्यापुढेसुद्धा एखादा महंत, एखादा मुल्ला, एखादा फादर आपल्या व्यासपीठावर येईल, त्याचे मत मांडेल, आपण आपले मत मांडू. त्यांचे मत हे आपल्याला मान्य असेलच असे नाही. अंतिमतः, आपला जाहीरनामा, आपली ध्येये, आपली उद्दिष्टे हीच आपल्यासाठी महत्त्वाची आहेत. आपली ध्येये, आपली उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी आपण वेगवेगळ्या मतांच्या विचारांच्या लोकांना बोलवत राहू. जसे आपण त्यांना बोलावतो तसे त्यांनी आपल्याला बोलवावे अशी अपेक्षा ठेवूया. वेगवेगळ्या व्यासपीठांवरती जाऊन आपण बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिकता मांडत राहूया.
माझी तर इच्छा आहे की ‘जगात ईश्वर नाही’ हे मंदिरे, मशिदी, चर्च, शाळा ह्यांमध्ये, पानाच्या टपरीवर, विधिमंडळात, संसदेत, यत्र-तत्र-सर्वत्र स्पष्टपणे बोलणारे लोक तयार झाले पाहिजेत. त्यांना व्यासपीठ मिळाले पाहिजे.
परिषदेची तयारी सुरू असताना अनेक अडचणी आल्या. त्यातील काही अडचणी नमूद करणे गरजेचे वाटते.
प्रसंग १ : परिषद पुढे ढकलावी अशी परिस्थिती निर्माण झाली होती. आपले बिनीचे शिलेदार आणि उत्साहमूर्ती जगदीश काबरे सरांवर दोन FIR टाकल्या गेल्या. परिषदेच्या तोंडावर महत्त्वाच्या सहकाऱ्याला प्रचंड मानसिक त्रास, आर्थिक ताण निर्माण झाला. संभाव्य धोके नजरेस येऊ लागले. कोअर कमिटीची तातडीची मीटिंग पुण्यात झाली. समांतर सांगलीच्या नियोजनसमितीची सुद्धा बैठक झाली. आणि आश्चर्य म्हणजे दोन्ही ठिकाणी बहुमताने नाही तर ‘एकमता’ने परिषद घ्यायचीच असे ठरले. हम नहीं, तो दूसरा कौन? और अभी नहीं तो कभी नहीं. आम्ही सर्व ठाम होतो.
प्रसंग २ : आम्ही सांगली शहराच्या सीमेत आलो. तेवढ्यात डॉ. प्रदीप पाटील ह्यांचा फोन आला. लवकर या. हॉलमध्ये आलो. बॅग ठेवली. एका रूममध्ये तुषार गांधी, डॉ. पाटील आणि सहकारी जमले होते. थोड्यावेळात कुमार केतकरसुद्धा आले. सांगलीतील एका धर्मांध गटाने जाणीवपूर्वक त्रास देण्यासाठी हॉलमालकाला धमकी दिली होती. आणि हॉलचा मालक भीतीपोटी पोलिसांची परवानगी घेऊन यावी यासाठी आग्रही होता. सर्व पाहुणे आले होते. दुसऱ्या दिवशी परिषद सुरू होणार होती. आम्ही त्वरित निर्णय घेतला आणि थेट पोलिस अधीक्षक यांचे कार्यालय गाठले. चर्चा झाल्या. पोलिसानी आपल्याला पूर्ण सहकार्य देण्याचे वचन दिले. हॉलमालकाला बोलावून घेतले. सर्व प्रकरण मिटले.
याशिवाय काही सहकाऱ्यांच्या व्यक्तिगत जीवनात वाईट प्रसंग उद्भवले होते. ज्याबद्दल ब्राईट्सच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर सविस्तरपणे लिहिले होते. असे दुख:द प्रसंग, वक्ते ऐन वेळेला न येणे, उशिरा येणे, धर्मांध गटांचा त्रास, तांत्रिक अडचणी, व्यक्तिगत अहंता या सर्व शर्यती आपण पार केल्या. या प्रसंगातून एक बाब ठळकपणे नमूद करावीशी वाटते ती म्हणजे “व्यक्तिगत जीवनात येणारे दुःखाचे प्रसंग आणि त्याचवेळी सामाजिक जीवनातील आनंदाचे क्षण किंवा सामाजिक जीवनातील दुःखाचे प्रसंग आणि त्याचवेळी व्यक्तिगत जीवनातील आनंदाचे क्षण या दोन्हीं बाबी समतोल विचाराने, संयमाने घेता आल्या पाहिजेत”.
एवढा सगळा त्रास – शिवाय दोन दिवसीय परिषदेचा खर्चदेखील खूप होतो – मग हे सर्व कशासाठी?
हे समजून घेण्यासाठी आपण कोण हे आधी समजून घेऊया. आपण एक अधिकृत, नोंदणीकृत अशी बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिकांची संघटना आहोत. केवळ सोशल मीडियावरील एक ग्रुप नाही. आपली अकाऊंटेबिलिटी आहे.
आपली ध्येये आणि उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपण वेगवेगळ्या मतांच्या, विचारांच्या व्यक्तींसोबत संवाद साधला पाहिजे. वेगवेगळ्या क्षेत्रांत आपले विचार पसरले पाहिजे, पाझरले पाहिजे. काही तडजोडी आणि आनुषंगिक क्षति होत राहणार. आणि तरीही वेगवेगळ्या व्यासपीठांवरती जाऊन बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिकता आपण मांडत राहायला हवी. माझी तर इच्छा आहे की ‘जगात ईश्वर नाही’ हे मंदिरे, मशिदी, चर्च, शाळा अश्या ठिकाणी, पानाच्या टपरीवर, विधिमंडळात, संसदेत, यत्र-तत्र-सर्वत्र स्पष्टपणे बोलणारे लोक तयार झाले पाहिजेत. त्यांना व्यासपीठ मिळाले पाहिजे. कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, जिथे जिथे जातीपाती-देवधर्म मानवाचा विवेक कुंठित करतो तिथे तिथे आपण Stain Remover ची, ते लांछन दूर करणाऱ्याची भूमिका घेतली पाहिजे. जळमटे दूर झाली पाहिजेत. आपले विचार यत्र, तत्र, सर्वत्र पाझरले पाहिजे.
दक्षिण महाराष्ट्रात सरकारी कार्यालयांमध्ये धार्मिक उपक्रम घेतले जात आहेत. त्याची वारंवारता वाढतच चालली आहे. अश्या ठिकाणी आपल्याला कृतिशील होणे गरजेचे आहे. कोल्हापूर-सांगली ही त्यासाठी मोक्याची ठिकाणे.
नास्तिकपरिषदे मागील उद्दिष्टे :
- महाराष्ट्रातील आणि देशातील वैचारिक-सामाजिक रणभूमीवर आपला हक्क पुन:प्रस्थापित करण्यासाठी.
- हा देश फक्त अतार्किक, निरर्थक, अवैज्ञानिक थापा मारणाऱ्या, तर्कहीन लोकांचा नाही. तो विवेकी, विचारी लोकांचासुद्धा आहे. त्यामुळे “DO NOT LOOSE THE GROUND” हा संदेश देण्यासाठी.
- निव्वळ धर्मांध लोक राज्यात नसून विवेकी जनतासुद्धा आहे, हे ठामपणे सांगण्यासाठी.
- गुणवत्ता किंवा क्षमता, असणारे सहकारी सोबत घेण्यासाठी. सांगलीतल्या आपल्या सहकाऱ्यानी प्रचंड मेहनत घेतली. अनेक कार्यकुशल नेतृत्व इथे आहे, त्यांना सोबत सोबत घेण्यासाठी.
पुढची पायरी: मेळावा, परिषद, अधिवेशन हे ध्येय नाही, ते साधन आहे. स्थानिक पातळीवर एक छानसा गट तयार झाला, तो बौद्धिक, आर्थिक सक्षम असेल, आणि सोबत तरुण, तरुणी, अनुभवी साथी असतील तर काम सोपे होईल. पुढील पायरी अधिक उदिष्टपूर्ण असेल.
आपण ठाण्यात नास्तिकता या विषयावर चित्रकला स्पर्धा घेतली आहे. जेथे जेष्ठ कलाकार अमोल पालेकर प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. भरघोस बक्षिसे होती. याच धर्तीवर आपण साहित्यसंमेलने घेऊ शकतो, ग्रंथनिर्मिती करू शकतो, ऑनलाइन साहित्य निर्माण करू शकतो, संकलित करू शकतो. जे जे रास्त ते ते करूया, हा विश्वास निर्माण होण्यासाठी अशा परिषदांची गरज असते.
आपण करत असलेले कार्यच सर्व भेदभाव मिटवून मानवतावादी धर्म उदयास आणू शकते.