श्रद्धा आणि श्रद्धा

आदरांजली : मेघश्याम पुंडलिक रेगे
(२४-१-१९२४ ते २८-१२-२०००)

महाराष्ट्राच्या तत्त्वज्ञानात्मक व वैचारिक क्षेत्रात गतशतकाच्या उत्तरार्धात ज्यांनी आपल्या वैचारिक व्यक्तिमत्वाने ठसा उमटविला, त्यांपैकी प्रा. मे.पुं. रेगे हे एक महत्त्वाचे विचारवंत होते. त्यांच्या जीवनाचे वर्णन करतांना प्रा. रा.भा. पाटणकरांनी लिहिले आहे, “प्रा. रेगे एक तत्त्वज्ञ, प्रबोधनकार आणि सॉक्रेटिक शिक्षक होते. त्यांचे जीवन म्हणजे समाजातील सर्व थरांवर काम करीत करीत मुक्त होण्याचा एक मूर्तिमंत प्रवास होय.”

तर, तत्त्वज्ञ दि.य.देशपांडे यांनी रेग्यांविषयी लिहिले आहे, “या व्यक्तीपुढे आपण सर्व खुजे आहोत हे सतत जाणवते.”

स्वत: ‘आजचा सुधारक’ परिवाराने त्यांच्याविषयी म्हटले आहे, “प्रा. रेगे यांची गणना केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे; तर अखिल भारतीय अग्रगण्य विद्वानांत केली जाते. ही गोष्ट सुपरिचित आहे. त्यांचा पाश्चात्त्य आणि भारतीय दोन्ही तत्त्वज्ञानांचा व्यासंग अतिशय विस्तृत आणि सखोल असून, त्या विषयावरील त्यांचा अधिकार निर्विवाद आहे.”

ते गेले तेव्हा ‘सुधारक’ ने लिहिले, “प्रा. रेग्यांबद्दल ‘आजचा सुधारक’ परिवाराला आदरही फार आणि जिव्हाळा तर त्याहूनही अधिक. ते आमचे लाडके विरोधक आणि टीकाकार होते. ते नेमके मुद्दे मांडून आम्हाला आमच्या भूमिका तपासायला लावत. आमच्या विचारांना दिशा देणारे आणि धार लावणारे हे व्यक्तिमत्व. त्यांचा अभाव आम्हाला पदोपदी जाणवेल.”

प्रा. रेग्यांनी व्रतस्थ निष्ठेने तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला. जर्मन तत्त्वज्ञ इम्यॅनुअल कांटचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता. सुरुवातीला ते ‘कांटवादी’ होते; पण लुडविग व्हिट्गेन्स्टाइन यांचे ‘फिलॉसॉफिकल इनव्हेस्टिगेशन्स’ अभ्यासल्यावर ते ‘कांट-व्हिट्गेन्स्टाइनवादी’ झाले. या भूमिकेतूनच त्यांनी पुरोगामित्व, इहवाद, बुद्धिप्रामाण्यवाद, विवेकवाद, मानवतावाद, श्रद्धा आणि धर्म व विज्ञाननिष्ठा या प्रतिष्ठित विचारांच्या शक्ती व मर्यादा चिकित्सकपणे दाखवून दिल्या.

पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचे अभ्यासक व पौर्वात्य पंडित यांच्यात त्यांनी घडवलेले ‘संवाद’, विविध विषयांवर केलेले निबंधलेखन, विश्वकोश व धर्मकोश यांच्या संपादनाचे कार्य या साऱ्यांतून प्रा. रेगे यांची जी वैचारिक प्रतिमा आपल्यापुढे येते, तशी प्रतिमा निर्माण करणारे तोडीस तोड व्यक्तिमत्व आज महाराष्ट्रात नाही.

आज रेग्यांना जाऊन तेवीस वर्षे होत आहेत.

२८ डिसेंबर हा त्यांचा स्मृतीदिन आणि २४ जानेवारी हा जन्मदिन. तत्त्वज्ञानाचा सखोल व सकस अभ्यास करणे, असा अभ्यास साक्षेपीपणे सादर करणे व हा अभ्यास सामाजिक प्रश्नांना प्रस्तुत राहील याचीही काळजी घेणे याचे महत्त्व प्रा. रेगे यांनी आपल्या वैचारिक कारकिर्दीत अधोरेखित केले. हे महत्त्व ओळखून वाटचाल करीत राहणे हीच प्रा. रेगे यांना खरी आदरांजली ठरेल. प्रस्तुत लेख ‘श्रद्धा आणि श्रद्धा’ हा अशाच आदरांजलीचा एक छोटासा प्रयत्न होय.

– श्रीधर सुरोशे
(खालील लेख मे.पुं. संपादित ‘नवभारत’ च्या १९८७ च्या एप्रिल अंकात पूर्वप्रसिद्ध झाला आहे.)

कोणतेही विधान पुराव्याच्या आधारे सत्य किंवा असत्य ठरते. आपल्यासमोर असलेले विधान सत्य आहे हे ठरविणारा पुरावा उपलब्ध असेल तर ते विधान सत्य म्हणून स्वीकारणे योग्य ठरते; ते असत्य आहे हे ठरविणारा पुरावा उपलब्ध असेल तर ते असत्य म्हणून त्याचा अव्हेर करणे योग्य ठरते.

ते सत्य आहे किंवा असत्य आहे असे निश्चित करणारा पुरेसा पुरावा उपलब्ध नसेल तर त्या विधानाची सत्यता अनिश्चित आहे असा निर्णय करणे योग्य ठरेल. ह्या वृत्तीने जो सर्व विधानांकडे पाहतो तो बुद्धिप्रामाण्यवादी असतो. उलट कित्येक विधाने, ती सत्य किंवा असत्य ठरविणारा पुरावा उपलब्ध नसतानाही, सत्य म्हणून जो स्वीकारतो किंवा असत्य म्हणून त्यांचा अव्हेर करतो तो श्रद्धावादी असतो.

असा माणूस काही विधाने श्रद्धेने सत्य म्हणून स्वीकारीत असतो किंवा श्रद्धेने असत्य म्हणून अव्हेरीत असतो.

विधान सत्य किंवा असत्य आहे हे कोणत्या पुराव्याच्या आधारे सिद्ध होते हे त्या विधानाच्या अर्थावरून निश्चित होते. विधानाचा अर्थ जर अस्पष्ट असेल, म्हणजे विधान काय प्रतिपादीत आहे हे जर अस्पष्ट असेल, तर कोणत्या पुराव्याच्या आधारे ते सत्य किंवा असत्य ठरेल हेही अस्पष्ट राहील. ‘हिप्पोपोटॅमस’ ह्या शब्दाचा अर्थ जर मला माहीत नसेल तर ‘हिप्पोपोटॅमस गवताची सुबक घरटी बांधतात’ हे विधान कोणत्या पुराव्याच्या आधारे सत्य किंवा असत्य ठरेल हेही मला समजणार नाही.

अनेकजण ईश्वर आहे असे मानतात. पण ‘ईश्वर आहे’ ह्या विधानाचा अर्थ जर स्पष्ट नसेल तर हे विधान सत्य आहे की नाही हे कोणत्या पुराव्याच्या आधारे सत्य किंवा असत्य ठरेल हेही अस्पष्ट राहील. आणि म्हणून ते सत्य किंवा असत्य आहे हे ठरविताच येणार नाही. आता ‘ईश्वर’‌ ही संकल्पना अस्पष्ट आहे यात शंका नाही. तिचा आशय स्पष्ट करण्यासाठी ‘ईश्वर म्हणजे जगाचा निर्माता’ अशी व्याख्या करूया. मग ‘ईश्वर आहे’ या विधानाचा अर्थ ‘जगाचा निर्माता असा कुणीतरी आहे’ असा होईल.

पण ‘जगाची निर्मिती’ ही संकल्पनाही अस्पष्ट आहे. ‘वस्तू निर्माण करणे’ ही संकल्पना आपल्या परिचयाची आहे. कुंभार मडके बनवितो. ह्यासाठी तो माती घेतो व तिच्यावर वेगवेगळे संस्कार करून एक मडके घडवितो. पण ज्या मातीचे मडके तो घडवितो ती माती त्याने निर्माण केलेली नसते. ती अगोदरच असते. तिचा कच्ची सामग्री म्हणून वापर करून, तिला योग्य तो आकार देऊन तो मडके बनवितो.

आता कुंभार जसा मातीपासून मडके बनवितो तसा ईश्वर कोणत्यातरी कच्च्या सामग्रीपासून जग बनवितो का?

पण अशी अगोदरच अस्तित्वात असलेली कच्ची सामग्री असेल तर (ईश्वर सोडून) जगात जे जे आहे त्याचा ईश्वर निर्माता आहे असे म्हणता येणार नाही. उलट, ईश्वर जी जगाची निर्मिती करतो ती तो कच्च्या सामग्रीशिवाय करतो असे जर कुणाचे म्हणणे असेल तर ह्या विधानाचा अर्थ समजून घेण्यात अनेक अडचणी उभ्या राहतात.

एक तर, ‘घडविणे’, ‘निर्माण करणे’ ही जी आपल्या परिचयाची संकल्पना आहे ती ‘कशापासूनतरी काहीतरी घडविणे’ ह्या स्वरूपाची आहे. काहीच नसताना काहीतरी निर्माण करणेही आपल्या परिचयाची संकल्पना नव्हे. ‘ईश्वर जगाचा निर्माता आहे’ ह्या विधानाचा आता काय आशय आहे?

हा आशय असा आहे की एकेकाळी ईश्वर म्हणून काहीतरी होते, दुसरे काहीही नव्हते. आणि नंतर जग अस्तित्वात आले आणि ते ईश्‍वराने अस्तित्वात आणले. हे संयुक्‍त विधान सत्य आहे की नाही हे कसे ठरविणार? समजा, ज्याला आपण जग म्हणतो त्याच्याहून वेगळे असलेले असे काहीतरी – ईश्‍वर – एका काळी होते आणि त्या काळी (आणि कधीही पूर्वी) जग नव्हते हे तात्पुरते मान्य केले. आणि मग जग अस्तित्वात आले हेही मान्य केले. तरी ईश्वराने जग निर्माण केले हे कसे ठरते? ह्याचा अर्थ तरी काय होतो? एके काळी फक्त ईश्‍वर आहे आणि नंतर ईश्वरही आहे आणि जगही आहे अशी परिस्थिती आहे. पण ईश्‍वराने जग निर्माण केले असे कशावरून म्हणता येईल? ईश्वर जसा आपोआप होता तसे जगही आपोआप अस्तित्वात आले असे कशावरून नाही? आपल्याला असे काहीतरी मानावे लागेल की ईश्वराला (अमूक स्वरूपाचे) जग असावे अशी इच्छा झाली आणि (तसे) जग अस्तित्वात आले; म्हणून ईश्वर व जग यांच्यामध्ये निर्माता-निर्मिती हा संबंध आहे. पण ह्याने भागणार नाही. कारण ईश्वराला अमूक स्वरूपाचे जग असावे अशी इच्छा झाली आणि नंतर लगेच त्या स्वरूपाचे जग अस्तित्वात आले यावरून त्या इच्छेमुळे ते जग अस्तित्वात आले असे ठरत नाही. समोरच्या झाडाची फांदी मोडावी अशी इच्छा मला झाली आणि दुसर्‍या क्षणी ती मोडली म्हणून मी ती फांदी मोडली असे ठरत नाही. मला काही इच्छा असली आणि ती इच्छा साध्य करण्यासाठी मी कृती केली – उदा. कुर्‍हाडीचे घाव फांदीवर घातले – आणि ह्या कृतीचा पूर्वदृष्ट परिणाम म्हणून माझे इप्सित प्रत्यक्ष अस्तित्वात आले तर माझ्या इच्छेमुळे अमूक एक घडून आले असे म्हणता येईल. ईश्‍वर अशी कृती करतो काय? ‘अमूक माणसाला अमूक एक इच्छा आहे आणि तिला अनुसरून तो कृती करतो’ ह्या विधानाचा अर्थ आपल्याला कळतो. ‘पण ईश्वराला अमूक एक इच्छा होते’, ‘तो अमूक एक कृती करतो’ ह्या विधानांचा अर्थ काय? ईश्वर कृती कशी करतो? की ईश्वराची इच्छा असेल तसे आपोआप घडते? मग ईश्‍वराचे विचार आणि ईश्वराची इच्छा यांच्यात फरक काय?

सारांश, ‘ईश्‍वर विश्‍वाचा निर्माता आहे’ ह्या विधानाचा अर्थच अस्पष्ट आहे आणि म्हणून हे विधान सत्य किंवा असत्य आहे हे कोणत्या पुराव्याने सिद्ध होते हेही अस्पष्ट आहे. हे विधान सत्य आहे असे जो म्हणत असेल त्याला आपण कशाला मान्यता देत आहोत ह्याचाच स्पष्ट बोध झालेला नसतो. असे असूनही अनेकजण हे विधान सत्य म्हणून स्वीकारतात. ते अर्थात श्रद्धाळू लोक असतात.

आपले सहा महिन्यांचे मूल कमालीचे बुद्धिमान आहे हे बहुसंख्य आई-बापांना संशयातीतपणे सत्य असल्याचे स्पष्ट असते. बुद्धिप्रामाण्यवादी जोडपी ह्या आईबापांत असत नाहीत. मूल किती बुद्धिमान आहे हे दाखवून देणारा पुरावा उपलब्ध होईपर्यंत ते ह्या विधानाच्या बाबतीत कोणत्याही निर्णयाला येणार नाहीत.

म्हणून बुद्धिप्रामाण्यवादी जेव्हा मंचावर एकत्र येतात तेव्हा त्यांच्या प्रतिष्ठित आणि तर्ककर्कश संगतीत, ईश्‍वराचे अस्तित्व स्वीकारणारा कुणीही श्रद्धाळू सामावू शकणार नाही हे उघड आहे.

पण सर्व श्रद्धाळू बुद्धिप्रामाण्यवादी मंडळींच्या मेळाव्यात सामावत नाहीत असे नाही.

मार्क्सवादी घ्या. मार्क्सवादी ऐतिहासिक भौतिकवाद स्वीकारतात. ह्याचा आशय असा : समाजाची धारणा व्हायची तर जीवनाला आवश्यक असलेल्या वस्तूंचे उत्पादन होत राहिले पाहिजे. हे उत्पादन ज्या भौतिक साधनांच्या आणि प्रक्रियांच्या साहाय्याने होते त्या म्हणजे उत्पादनशक्ती होत. आणि समाजातील व्यक्‍ती एकत्र येऊन उत्पादन करीत असताना त्यांच्यात जे परस्परसंबंध स्थापन झालेले असतात ते उत्पादनसंबंध होत. उदा., जमीन काही व्यक्तींच्या मालकीची असणे आणि इतर काहीजणांनी त्यांची कुळे म्हणून जमिनीवर श्रम करणे हे जे ह्या दोहोतील परस्परसंबंध आहेत ते उत्पादन-संबंध आहेत. कोणत्याही समाजातील असे जे समग्र उत्पादनसंबंध असतात त्याची मिळून त्या समाजाची आर्थिक घडण बनलेली असते. ह्या खऱ्या अधिष्ठानावर त्या समाजाचे सामाजिक, राजकीय आणि बौद्धिक जीवन आधारलेले असते. समाजात प्रचलित असलेले कायदेविषयक, राजकीय, धार्मिक, सौंदर्यात्मक, तत्त्वज्ञानात्मक विचार – थोडक्यात विचारप्रणालीची (ideology) ही विविध रूपे ह्या भौतिक अधिष्ठानाकडून निर्धारित होत असतात.

आता सांख्य तत्त्वज्ञान घ्या. उत्तरवेदकाळापासून हे भारतात सर्वत्र फैलावले होते. हे तत्त्वज्ञानात्मक दर्शन आहे. तेव्हा ते निश्‍चितपणे विचारप्रणालीचे एक रूप आहे. भारतीय समाजाचे जे भौतिक अधिष्ठान असेल त्याच्याकडून सांख्य तत्त्वज्ञान निर्धारित झालेले असणार. आता ह्या भौतिक अधिष्ठानाचे स्वरूप काय होते? उत्पादनसंबंध कोणत्या प्रकारचे होते? ह्याविषयी फारशी माहिती कोणाला नाही. आणि ह्या उत्पादनसंबंधांकडून सांख्यदर्शन कसे काय निर्धारित होत होते? हे कुणीही दाखवून दिलेले नाही. उत्पादनसंबंधांच्या कोणत्या वैशिष्ट्यांमुळे प्रकृती ही चार गुणांची नसून किंवा दोन गुणांची नसून तीन गुणांची बनली आहे असे मानणे भाग पडते? आणि त्यांच्या कोणत्या वेगळ्या वैशिष्ट्यांमुळे एकच पुरुष नसून, अनेक पुरुष आहेत असे मानण्यात येते? आणखी कोणत्या इतर वैशिष्ट्यांमुळे पुरुष हे प्रकृतीहून भिन्न आहेत असे मानले जाते? ज्या काळात सांख्यदर्शन प्रचलित होते त्याच काळात वैशेषिक दर्शनही प्रचलित होते. मग ज्या भौतिक अधिष्ठानातुन सांख्यदर्शन जन्माला आले त्याच अधिष्ठानातून वैशेषिक दर्शनही उद्भवले असणार. एकाच अधिष्ठानाने दोन भिन्न दर्शने निर्धारित झालेली असल्यामुळे आपल्याला असे मानावे लागेल की ह्या दोन दर्शनांची जी समान वैशिष्टये आहेत ती त्यांच्या समान अधिष्ठानाकडून निर्णित झाली आहेत आणि त्यांच्यातील जे भेद आहेत त्यांची कारणे वेगळी आहेत. मग ही समान वैशिष्टये कोणती? आणि जे भेद आहेत त्यांची वेगळी कारणे जर असतील तर ती कोणती? विचारप्रणालीची जी रूपे आहेत त्यांचे निर्धारण समाजाच्या भौतिक अधिष्ठानाहून भिन्न अश्या कोणत्यातरी घटकांकडून होते का? असे असेल तर हे घटक कोणते? भौतिक अधिष्ठान आणि हे भिन्न घटक यांचे संबंध काय असतात? भारतात वेगवेगळ्या कालखंडांत उत्पादनसंबंधांचे स्वरूप बदलत गेले की नाही? गेले असल्यास, ह्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या उत्पादनसंबंधांमुळे सांख्यदर्शनात बदल होत गेले का? कोणते बदल झाले? भारताच्या भिन्न प्रदेशांत उत्पादनसंबंधांत काही भेद होते का? ह्या भेदांना अनुसरून भिन्न प्रदेशांत स्वीकारण्यात आलेल्या सांख्यदर्शनात भेद होते का? उदा., महाराष्ट्रातील सांख्यदर्शन आणि बंगालमधील सांख्यदर्शन यांच्यात भेद होते का?

भारतात होते त्याच प्रकारचे उत्पादनसंबंध भारताशिवायच्या देशांत कधीकाळी होते का? मग त्या समाजात सांख्यदर्शन निर्माण झाले का? सांख्यदर्शनासारखे दर्शन निर्माण झाले का? हे कोणते समाज, ही कोणती दर्शने आणि त्यांच्यात असलेली समान वैशिष्ट्ये कोणती?

ह्या प्रश्नांच्या पूर्वीचा एक प्रश्‍न आहे. ‘समाजाच्या भौतिक अधिष्ठानाकडून समाजातील विचारप्रणाली निर्धारित होते’ हे विधान सृष्टीचा एक मूलभूत नियम व्यक्‍त करते असे मानायचे का? हे विधान कोणत्या पुराव्यावर आधारले आहे? किती समाजांतील आणि किती भिन्न प्रकारच्या समाजांतील किती भिन्न भौतिक अधिष्ठाने तपासली गेली आहेत आणि त्यांतील प्रत्येकाकडून त्या त्या समाजातील विचारप्रणाली निर्धारित झाली आहे असे दाखवून देण्यात आले आहे? ह्या ‘निर्धारणाचे’ स्वरूप तरी काय आहे? जेव्हा आपण एखादा सामान्य नियम सत्य म्हणून स्वीकारतो तेव्हा प्रत्यक्ष पाहिलेले एक जरी उदाहरण त्याच्या विरुद्ध असले तर तो नियम धोक्यात आला आहे असे आपण मानतो. समाजाच्या भौतिक अधिष्ठानाकडून त्याची विचारप्रणाली निर्धारित होते हा नियम असा कधी धोक्यात आला आहे का? असा संभव आहे का? की हा बिनधोक नियम आहे?

ह्या प्रश्‍नांची तपशीलवार उत्तरे कुणीही, कधीही, कुठेही दिलेली नाहीत; किंवा अशी उत्तरे द्यायला प्रारंभही केलेला नाही. पण मार्क्सवादी हा सिद्धांत स्वीकारतात. तो ते अर्थात श्रद्धेने स्वीकारतात. ‘ईश्‍वर’ ही संकल्पना गूढ आहे, ह्या गूढाची उकल करायची तत्त्ववेत्त्यांनी खूप खटपट केली आहे. ह्या खटपटीनंतर ईश्‍वर ही श्रद्धेने स्वीकारायची गोष्ट आहे हे स्पष्ट होते. ऐतिहासिक भौतिकतावाद हे दुसरे एक गूढ आहे. त्याची उकल करायची जितकी खटपट करावी तितकी त्याच्यामागची श्रद्धा स्पष्ट होत जाते. तर्काने लाभणारी मती ही नाही.

ईश्वर करुणामय आहे असे श्रद्धाळू माणसे मानतात. जगात किती दु:ख आहे, निरपराध माणसांनाही किती यातना भोगाव्या लागतात हे सर्व त्यांना दिसत असते. किंबहुना, हे दु:ख त्यांपैकी अनेकजण स्वतःही भोगत असतात. ह्या दुःखाला जबाबदार कोण आहे? ईश्‍वर त्याला जबाबदार नसेल तर जगावर ईश्‍वराची सत्ता आहे असे मानता येणार नाही. पण ईश्वर सर्वशक्तिमान आहे आणि जगावर त्याची सर्वंकष अधिसत्ता आहे असेही श्रद्धाळू मानतात. हा विरोध नाही का? परमकारुणिक ईश्‍वर जाणूनबुजून माणसांना दु:ख देतो. पण ह्या व्याघातामुळे श्रद्धाळूंच्या श्रद्धेला बारीकसाही तडा जात नाही. हा व्याघात हेही त्यांच्या दृष्टीने एक गूढच आहे. ईश्वराची लीला अगम्य आहे. (श्रद्धेचे स्वरूपच असे असते की बारीकसा तडा आणि प्रचंड भगदाड ह्यांच्यात काही फरक नसतो.)

ईश्वराप्रमाणे ऐतिहासिक भौतिकतेची लीलाही अगम्य आहे. ज्याच्यात प्रत्येकाचे स्वातंत्र्य ही सर्वांच्या स्वातंत्र्याची अट असेल असा समाज निर्माण करण्याच्या दिशेने अप्रतिहतपणे वाटचाल करणार्‍या ऐतिहासिक प्रक्रियेतून स्टालिनसारखा सत्ताधीश उदयाला येतो. ज्याच्यात सर्वांना समान स्वातंत्र्य आहे, पिळणुकीचा पूर्ण अभाव आहे अशा समाजाची निर्मिती करणार्‍या प्रक्रियेचे अपरिहार्य आणि अमोघ साधन असलेला स्टालिन शेकडो सहकाऱ्यांचे निर्दालन करतो, लक्षावधी माणसांची हत्या करतो, असंख्य माणसांना कॉन्सन्ट्रेशन कॅम्प्समध्ये यातनामय गुलामीचे जीवन जगायला लावतो हा विरोध आहे का? औपचारिक, आकारिक स्वातंत्र्य नव्हे तर खरेखुरे स्वातंत्र्य ज्या समाजात स्थापन झाले आहे तेथे कुणीही सत्ताधार्‍यांविरुद्ध ब्र काढू शकत नाही आणि नवीन सत्ताधाऱ्यांनी आदेश दिल्यावर मोडीत काढण्यात आलेल्या जुन्या सत्ताधार्‍यांविरुद्ध प्रत्येकजण निदान ब्र काढतो हा विरोध आहे का? ही ऐतिहासिक भौतिकतेची लीला आहे.

मग प्रश्‍न असा आहे की बुद्धिप्रामाण्यवाद्यांच्या प्रतिष्ठित, तर्ककर्कश मंचावर श्रद्धाळू मार्क्सवादी कसे आरूढ होतात? हेही एक गूढ आहे का? श्रद्धाळू ईश्‍वरवाद्यांना बुद्धिप्रामाण्यवाद्यांच्या मेळाव्यात स्थान पटकविण्याची आकांक्षा असणे संभवनीय नाही. पण मोह कुणालाही होऊ शकतो. आज बुद्धिप्रामाण्यवादी मंच प्रतिष्ठित आहे. ह्या मेळाव्यात आपल्यालाही प्रवेश असावा अशी इच्छा एखाद्या ईश्वरवाद्याला झाली तर तिचे समाधान करण्याचा मार्ग काय असेल? (श्रीधर सुरोशे: आणि समजा, ‘ईश्वर सत्य आहे’ या गांधीवचनावर श्रद्धा असलेल्या आस्तिक गांधीवाद्यांना या मेळाव्यात प्रवेश घ्यायचा असेल तर त्यांचे समाधान करण्याच्या अटी कोणत्या?)

श्रद्धाळू मार्क्सवादी बुद्धिप्रामाण्यवाद्यांत शोभून दिसतात कारण ते आपले सिद्धांत वैज्ञानिक आहेत असे सांगतात. बुद्धिप्रामाण्यवाद्यांना विज्ञानाची दहशत असते. ह्याचे एक कारण असे की बहुसंख्य बुद्धिप्रामाण्यवाद्यांना विज्ञानाविषयी आणि वैज्ञानिक विचारपद्धतीविषयी गाढ अज्ञान असते. (श्रीधर सुरोशे: बुद्धिप्रामाण्यवाद ज्या वैज्ञानिक मूल्यांवर अधिष्ठित असतो असे समजले जाते, त्या मूल्यांचे प्रामाण्य कशावर आधारलेले असते? याविषयीची चोख दार्शनिक मांडणी करण्याविषयी आणि त्यांमध्ये येणाऱ्या अडचणींविषयी * त्यांच्यात एकप्रकारची अनास्था व उदासीनता आढळते.)

विज्ञानाचे असे म्हणणे आहे की सर्व माणसे समान आहेत आणि साम्यवादी समाज अनिवार्यपणे स्थापन होणार आहे असे त्यांना कुणी ठासून सांगितले की ते मान तुकवितात. (श्रीधर सुरोशे: जन्मतःच ज्यांच्या कानात ‘कम्युनिस्ट मॅनिफेस्टो’ फुंकण्यात आला आहे, तो ‘मॅनिफेस्टो’ जर ते बुद्धिप्रामाण्यवाद्यांच्या कानात फुंकत असतील, वारंवार फुंकत असत असतील आणि विज्ञानाचे – अर्थात ‘Scientific socialism’ मधील ‘Scientific’ ला पूरक विज्ञानाचे असे म्हणणे आहे या नावाने फुंकत असतील, तर कदाचित हे ‘श्रुतीप्रामाण्य’सुद्धा बुद्धिप्रामाण्यवादी मानू लागतील.)

विज्ञानाचे असे म्हणणे आहे की ईश्वर आहे असे त्यांना सांगितले तर तेही ते मानतील. पण ते वारंवार आणि ठासून सांगितले पाहिजे. (श्रीधर सुरोशे: अशाप्रकारे, श्रद्धाळू आस्तिकांचे ‘शब्दप्रामाण्य’ही ते कधीकाळी स्वीकारू लागतील. पण त्यांनीही ‘विज्ञानाचे असे म्हणणे आहे की…’ या सुरात ते पुन:पुन्हा सांगितले पाहिजे. असे घडणार असेल तर, जे घडेल त्या सगळ्याचा अर्थ तरी कसा लावणार?

सर्व विसंगतीतही सुसंगती लावण्याचे काम श्रद्धाळूंची श्रद्धा करीत असते. पण अशी श्रद्धा प्रमाण का मानायची?

हे सर्व बुद्धिप्रामाण्यवादी काय भूमिका घेतील यावर अवलंबून राहील.)

शेवटी विचारता येईल :

या श्रद्धांपासून सुटका करून घेण्याचा कोणता मार्ग बुद्धिप्रामाण्यवाद्यांपुढे खुला आहे?

* बुद्धिप्रामाण्यवादाची मांडणी करण्यातील अशा निवडक अडचणींचा विचार ‘बुद्धिप्रामाण्यवादाचे स्वरूप’ , जानेवारी २०२३, आजचा सुधारक या माझ्या लेखात आधीच केला आहे.

प्रा. मे.पुं. रेगे ह्यांचे विचारधन

  • हिंदू धार्मिक परंपरा आणि सामाजिक परिवर्तन – प्रकाशक – प्राज्ञपाठशाळा मंडळ, वाई, प्रथमावृत्ती नोव्हेंबर १९९४
  • इहवाद आणि सर्वधर्मसमभाव – प्रकाशक – प्राज्ञपाठशाळा मंडळ, वाई, प्रथमावृत्ती ऑगस्ट १९९६
  • मर्मभेद : प्रा. मे.पुं. रेगे ह्यांचे टिकालेख
  • विवेक आणि न्याय : आधुनिक महाराष्ट्रातील प्रबोधनपर्व
  • विवेकवाद, विज्ञान आणि श्रद्धा
  • स्वातंत्र्य, समता आणि न्याय

अनुवाद

  • तत्त्वज्ञानातील समस्या – मूळ लेखक : बर्ट्रांड रसेल. प्रकाशक : महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई. प्रथमावृत्ती मार्च १९७६
  • पाश्चात्त्य नीतिशास्त्राचा इतिहास – मूळ लेखक : एलेस्डेअर मॅकिन्टायर, प्रकाशक : समाजप्रबोधन संस्था, पुणे (प्रथम लेखमाला, नंतर पुस्तक स्वरूपात), प्रथमावृत्ती जून १९७४

अभिप्राय 2

  • तुम्ही लीहलेला लेख अतुलनीय आहे,आपण जर असेच विशेष लेख लिहत राहाल तर आपली ख्याती जग प्रसिद्ध होईल , व साहित्याच्या क्षेत्रात विशेष कामगिरी होईल अर्थशास्त्र या विषया संबंधी नोबेल पुरस्काराचे ही चुंबन करसाल . ‘ईश्वर संकल्पना’, ईश्वर आहे , किंवा नाही,असेल तर कोणत्या स्वरूपात आहे तर त्यांचे अस्तित्व कसे असणार ?असे प्रश्न पडणे स्वाभाविक आहे ईश्वर हि गुढ आहे असे आपण प्रतीपदान केले आहे ( डी के शांत :पडलेला प्रश्न असा आहे जग हे आपण पृथ्वी या ग्रहाला मानत आहे का पूर्ण अवकाश गंगा नी बनलेले ब्रह्मांड यांना ? मला असे वाटते आपण जे ईश्वराचे अस्तित्व मानतो ते कदाचित नैसर्गिक दैवी असू शकते का ?आपण असेच लेख तुमच्या लेखन स्वरूपात लिहा……

  • सखोलतेस दुरावलेली प्रतिक्रिया.

    प्रस्तुत लेख प्रा. रेगे सरांनी लिहिलेला आहे.
    त्यात काहीशी भर मी घातली आहे, एवढंच !
    तरीही या लेखावर अधिक चिंतन झाले, कुणी आक्षेप नोंदवले तर त्यांचे स्वागत आहे.
    प्रा.रेगे सरांच्या बाजूने मी त्यांचे समाधान करू शकेन.
    पण तत्वज्ञाच्या लेखावर निदान त्यांच्या विचारांना न्याय देऊ शकेल,असे आक्षेप असतील तर असा प्रयत्न करायला काही एक अर्थ राहील.
    प्रतिक्रिया सखोलस अंतरलेली असेल तर मात्र अपेक्षाभंगाशिवाय आणखी काय हाती लागणार?
    विवेकवादी चिंतनास वाहिलेल्या या त्रैमासिकात अशी ‘चिंतनात्मक’ प्रतिक्रिया कधीतरी येईल, अशी आशा बाळगायला हरकत नाही.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.