एकांकिका – सत्य असत्याशी मन केले ग्वाही…

[या एकांकिकेचे कथाबीज, संकल्पना ही लेखकाची आहे. सदर एकांकिका सादर करण्यासाठी लेखकाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. त्याकरिताच लेखकाचा मोबाईल नंबर, पत्ता व ईमेल आयडी सोबत दिलेला आहे. परवानगीशिवाय सदर एकांकिका, एकांकिकेतील कोणताही भाग कोणत्याही माध्यमांमध्ये किंवा माध्यमांद्वारे सादर केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सर्व वादासाठी न्यायालयीन क्षेत्र सांगली राहील.] 

‘जेव्हा एखाद्या माणसाला भ्रम होतो, तेव्हा त्याला मनोविकार म्हणतात आणि जेव्हा बऱ्याच माणसांना भ्रम होतो, तेव्हा त्याला धर्म म्हणतात’
– रॉबर्ट पिर्सिग ( ‘झेन अँड आर्ट ऑफ मोटरसायकल मेंटेनन्स’ चे लेखक)

प्रसंग १ 

(तालुक्यामधील एक सधन घर. जुन्या-नव्या पद्धतीचे मिश्रण. घरात छत्रपती शिवाजी महाराज, सावरकर यांचे फोटो आणि एक पंच्याहत्तरीतील पुरुषाचा फोटो, ज्याला हार घातलेला आहे. हॉलमध्ये एका बाजूला देवघर. एकूण धार्मिक वातावरण. कोणाच्यातरी स्वागताची तयारी दिसते. अश्विन हा घरातील धाकटा मुलगा (वय ४०), त्याची बायको नलिनी (वय ३५) व अश्विनची आई (वय ६८) असे तिघेही आनंदी दिसतात. आईच्या गळ्यात मंगळसूत्र नाही, पण कपाळाला कुंकू आहे. पंच्याहत्तरीतील पुरुषाचा फोटो म्हणजे विनायक आणि अश्विनच्या वडिलांचा. पडदा उघडत असताना अश्विन हॉलमध्ये फोनवर बोलतोय.)

अश्विन : हा, हॅलो दादा, कुठे आलाय म्हणालास? … बरं आता एक काम कर, स्टॅन्डकडून नागोबाच्या देवळाकडे येऊ नकोस. तिथे काम सुरू आहे. तेव्हा तू स्टॅन्डपासून लेफ्ट घे … हा हा तलाठी ऑफिससमोरून येईल कार. (फोन कट) आईsss नलिनीss, दादा-वहिनी दोनच मिनिटात येतील इथे. (नलिनी एव्हाना देव्हाऱ्यापाशी ठेवलेलं आरतीचे ताट तयार ठेवते. सर्वजण आनंदी आहेत. आई दोघांना काहीतरी सूचना देते आहे.) 

आई : नलू, हे बघ, आधी बाहेरच पायावर पाणी घाल तिघांच्या. आणि अश्विन, बॅग लगेच आत घेऊ नकोस. (नलिनीला) तू त्यावर पाणी घाल आणि मगच आत घे बॅग. 

नलिनी : हो आई. 

आई : कुठपर्यंत आलेत ते? 

अश्विन : मघाशी स्टॅन्डच्या पुढे आले होते. इतक्यात येतील. (बाहेर कार येऊन थांबण्याचा आवाज) आई, दादा आला. (तिघेही आनंदात. अश्विन त्यांना रिसिव्ह करायला बाहेर जातो. नलिनी तांब्या-भांडे घेऊन त्याच्या पाठोपाठच बाहेर जाते. आई दारात उभी राहते. बाहेर सर्वांच्या बोलण्याचे आवाज. “बॅगा राहू दे तिथेच… या या… कांचीला का नाही आणलं?… क्लासेसना सुट्टी नाही….” वगैरे. नलिनी पटकन आत येते. आई त्यांना दाराबाहेर थांबायला सांगते.) 

आई : अरे, दोघेच कसे तुम्ही. कांची कुठं आहे? 

विनायक : अगं, तिचे क्लासेस आहेत. 

कविता : दहावीचं वर्ष ना यंदा. 

(नलिनी त्यांचे औक्षण करते. डोळ्याला पाणी लावते. आई सूचना करते आहे.)

आई : अगं, साखर हातावर नाही ठेवायची, भरव त्यांना. (नलिनी तसे करते. सर्वजण आत येतात. विनायक आणि त्याची बायको कविता आईच्या पाया पडतात. अश्विन बाबांच्या फोटोकडे पाहतो आणि विनायकला हाक मारून खुणेने फोटोकडे यायला सांगतो. विनायक आणि कविता बाबांच्या फोटोला नमस्कार करतात. नमस्कार करताना कविता विनायककडे पाहते.) 

आई : विनायक देवाला नमस्कार करा. (आता मात्र कविताच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह! ती विनायककडे पाहत असतानाच तो हसत तिच्या पाठीवर हात ठेवत तिला देव्हाऱ्याकडे घेऊन जातो. तिला हायसे वाटते. दोघे देव्हाऱ्यासमोर उभे राहतात. कविता हात जोडून नमस्कार करू लागते आणि विनायकला पुटपुटते) 

कविता : हात जोड ना प्लीज. (तो जोडत नाही.) अय्या, किती छान केलीय पूजा. 

(मागून नलिनीचे उत्तर)

नलिनी : आईंनी केलीये … म्हणजे त्याच करतात रोज पूजा. सकाळी बागेतील फुलं काढतात … (ती बोलत असताना कविता पुन्हा पुटपुटते) 

कविता : जोड ना हात. (तो तसाच उभा) निदान पुढे तरी घे. (तो हात फक्त पुढे घेतो व एकमेकात धरतो. जेणेकरून तोही नमस्कार करतोय असे मागच्यांना वाटावे, हा कविताचा प्रयत्न. ती पटकन पायात पाहून बोलते.) रांगोळी किती छान काढलीये बघ ना. (तो डोके झुकवून खाली पाहतो, तसे ती स्वतःच डोके वाकवून हातावर कपाळ टेकवते, म्हणजे मागून दोघेही नमस्कार करतात असे दिसावे. दोघे वळतात. हॉलमध्ये बसणार, इतक्यात नलिनी म्हणते) 

नलिनी : वहिनी फ्रेश होऊन या तुम्ही. तोपर्यंत मी चहा ठेवते. (असे म्हणत दोघांना आत नेऊ लागते) दादांसाठी बटाटे घालून पोहे केले आहेत. आवडतात ना त्यांना! (तिच्या हातातील एक बॅग कविता घेते तर नलिनी “असू दे वहिनी” म्हणते. सर्वजण आत जाताना मागे आई व विनायक असतात. विनायकचे हॉलमधील जुन्या लाकडी खुर्चीकडे लक्ष जाते. तो थांबतो. आई हे नोटिस करते.) 

विनायक : आई, बाबांची खुर्ची ना ही?

आई : हो. 

(क्षणभर शांतता. तो खुर्चीकडे पहात असतो. त्याची नजर हळूहळू सावरकरांच्या फोटोकडे जाते. खुर्चीत बसणाऱ्याला सावरकर नजरेत दिसतील हे तो नोटिस करतो. आता तो शिवाजी महाराजांच्या फोटोकडे पाहतो. त्याने त्या आरामखुर्चीला हात लावलेला असल्याने ती हलू लागते. खुर्चीत बसणाऱ्याची पाठ शिवाजी महाराजांच्या फोटोकडे होईल अशी खुर्चीची पोजिशन. तो पुन्हा खुर्चीकडे पहातो व निघून जातो. खुर्ची हलत रहाते.) 

ब्लॅक आऊट 

प्रसंग २ 

(सर्वजण हॉलमध्ये नाश्ता करत गप्पा मारत आहेत. पोहे संपल्यावर नलिनी दोघांना आणखीन घेण्याचा आग्रह करते. दोघे नको म्हणतात. ती पुन्हा आग्रह करते. ते नाही म्हणतात. नलिनी चहा आणायला जाते. दरम्यान यांच्या गप्पा सुरू आहेत. चहा येतो. चहा घेत गप्पा रंगतात. हॉलमधील टीपॉयच्या खाली दोन गिफ्ट केल्यासारख्या कॅरीबॅग्स दिसत आहेत.) 

अश्विन : दादा, पंधरा एक वर्षांपूर्वी तू घर सोडून गेलास. मला, आईला हे सगळं पचवायला आणि पुन्हा रुटीन लागायला बराच वेळ लागला. दुकानामुळे आणि पुढे लग्नानंतर मी मनानं स्थिरावलो. (आईकडे पहात. आई शांत) तू गेल्यानंतर आईचं पूजापाठ, भजनीमंडळ खूपच वाढलं. एका अर्थाने चांगलंच झालं. पण तरीही आता बाबा गेल्यापासून मात्र गेल्या आठ-दहा महिन्यात तुझी उणीव खूप भासली दादा. नशीब, गावात आपल्या ओळखी आहेत. बाबांचं एवढं नाव आहे. त्या काळात तुला तर माहीतच आहे, बॉडी कुटुंबाला न देताच परस्पर जाळत होते. 

आई : जाळत तरी होते की आणखीन काही करत होते परमेश्वरालाच ठाऊक. आपलं दैव बलवत्तर रे बाबा, म्हणून मला, अश्विनला हॉस्पिटलमध्ये जायला मिळत होतं. तिथे गेल्यावर एकेकाच्या डोळ्यात मृत्यू पाहत होते ना रे मी. यांना आयुष्यात कधीही घाबरलेलं पाहिलं नव्हतं मी. पण … (आईला हुंदका दाटून येतो. विनायक उठून आईजवळ येतो) 

विनायक : आई, अगं आय एम सो सॉरी. मी खूप प्रयत्न केला. पण … 

अश्विन : दादा, अरे तूच पॉझिटिव्ह होतास, कसं शक्य होतं? वहिनी आणि कांचीसुद्धा तुला भेटू शकत नव्हते, तिथे तू कसा बाहेर पडणार होतास? 

कविता : यांच्या वॉर्डमधले सहा जण एकाच दिवशी गेले. तेव्हा मात्र माझा कडेलोट झाला. मी यांच्या एका डॉक्टर फ्रेंडला घेऊन हॉस्पिटल गाठलं आणि यांना वेगळं ठेवायला सांगितलं. त्यानंतर किमान त्यांना घरचा डबा तरी पाठवता येत होता. ते खूप म्हणत होते, “आशु तिकडे एकटाच कसा हॅण्डल करत असेल?” म्हणून. 

अश्विन : इट्स ओके वहिनी. तो वाचलाय हे महत्त्वाचं आहे. 

आई : (हात जोडून कपाळाला टेकवत) दत्तगुरुंची कृपा हो. मी रोज पोथी वाचत होते. इकडे हे ॲडमिट आणि तिकडे हा… 

कविता : मी रोज स्वामींचा धावा करत होते. नाम:स्मरण करायचे. एक स्तोत्र सोडलं नाही आई. कांची तर रोज बाबाला भेटायचा हट्ट करत होती. आयुष्यातले ते वीस दिवस मी कधीही विसरणार नाही. 

अश्विन : इथे गावात कडक बंदोबस्त असूनही देशपांडेकाकांमुळे बाबांची बॉडी ताब्यात तरी मिळाली. (आईला पुन्हा हुंदका येतो) समर्थ घाटावर कायमच गर्दी असायची म्हणून देशपांडेकाकांनी सुचवलं की, आता पर्याय नाही. भोई गल्लीच्या पुढे वस्तीमागे जो नवा घाट आहे, तिथं कोणीही फिरकत नाही. मग काय, बाबांना एक ताससुद्धा घरात ठेवलं नाही. 

विनायक : बॉडी घरी आणली होती?

अश्विन : दादा, अरे आईला बाहेर घाटावर नेता येणार नव्हतं. 

विनायक : अरे हो, पण इन्फेक्टेड बॉडी. त्यात घरात लहान मुलं. 

अश्विन : त्यांना देशपांडेकाकांच्या घरी पाठवलं होतं. हातात वेळ नव्हता. तू येऊ शकणार नाहीस म्हटल्यावर अग्नी देण्यापासून पुढे तेराव्यापर्यंत सर्व विधी मलाच करावे लागले. (अत्यंत भावूक होतो) दादा, बाबांना अग्नी देऊन प्रदक्षिणा घालताना मला सारखी तुझी आठवण येत होती. दादा, तू हवा होतास दादा. (विनायक अश्विनच्या जवळ जाऊन त्याला मिठीत घेतो. अश्विनही त्याला कडकडून घट्ट बिलगतो. अश्विनच्या डोळ्यातून पाणी वाहतंय. सर्वांनाच भरून येते.) दादा, थँक्स. (डोळे पुसतोय. विनायक त्याला पाणी देतो) खूप मिस केलं दादा तुला, खूप मिस केलं. पण थँक्स, तू आता एका कॉलवर आलास. 

विनायक : अरे, मी येणारच होतो आशु. मलाही रिकव्हर होऊन कामाला सुरुवात करायची होती. एक पार्टनर कोविडच्या पहिल्याच टप्प्यात गेला आणि दुसरा लॉकडाऊननंतर विड्रॉ झाला. मला सगळं पुन्हा नव्याने पाहावं लागलं. आहे त्या जागेचं भाडं एकट्याला परवडणारं नव्हतं. ती जागा सोडावी लागली. सगळीच नव्याने सुरुवात करायला लागली मला. 

अश्विन : दादा, अरे असू दे. माहितीये मला सगळं. तू प्लीज … 

नलिनी : अहो, प्लीज तुम्ही ते… 

अश्विन : (आठवल्याप्रमाणे) अरे हो … 

(टीपॉयमधील कॅरीबॅग घेतो आणि आनंदाने हसत दादा-वहिनीला देत देत बोलतो) 

विनायक : आता हे काय? 

अश्विन : देशपांडे गुरुजींचा मुलगा उद्या सकाळी पावणे सात वाजता येईल. आपण सकाळी सात वाजता पूजा ठेवलीय. म्हणजे सगळं वेळेत पूर्ण होईल. 

कविता : हो बोलले मला हे. पण आशु भाऊजी, अहो (मध्येच आईकडे पहात) बाबांना जाऊन अजून वर्ष व्हायचंय … म्हणजे वर्षाच्या आत सत्यनारायण घातलं तर चालतं ना? 

अश्विन : हो चालतं वहिनी. काही प्रॉब्लेम नाही. काकांनीच सांगितलं आपल्याला ही पूजा घालायला. (कॅरीबॅग उघडून विनायकाकडे देतो) दादा, तुझ्यासाठी हे सोवळं आणि वहिनी, तुझ्यासाठी ही शाल. (कविताला प्रश्न पडतो) दादा, जानवं आहे ना तुझ्याकडे? (आता मात्र कविताला टेन्शन येते) 

विनायक : नाही रे. का? 

अश्विन : दादा, अरे, तू आणि वहिनीने बसायचंय उद्या पूजेला. 

कविता : काय? अहो पण.. 

विनायक : आशु, अरे तुम्ही दोघे पूजेला बसा ना. आम्ही आहोतच. (विनायक आता पुढे काय बोलणार याचा कविता अंदाज घेत आहे. तिचे टेन्शन वाढले आहे.) 

अश्विन : दादा, आमचं सगळं ठरलं आहे. 

विनायक : अरे पण आता इथे पूजेला बसायचा अधिकार तुम्हां दोघांचा आहे. आणि नलिनीला वाटत नसेल का पूजेला बसावं!

(कविता उसने अवसान आणून विनायकच्या हो मध्ये हो मिळवते.) 

अश्विन : दादा, अरे आम्ही नेहमीच बसतो पूजेला. एक तर तू इतक्या वर्षांनी घरी येतोयस. वहिनी तर पहिल्यांदा आली आहे घरी. 

कविता : अश्विन भाऊजी, खरंतर तुम्ही आम्हाला इतकं प्रेम, मान देत आहात की मला तरी काय बोलावं कळतच नाहीये. भाऊजी, ऐका ना प्लीज. आम्हाला खरंच नाही बसता येणार पूजेला. (सगळे प्रश्नार्थक नजरेने पाहत आहेत. कविता उठून नलिनीला बाजूला घेऊन जाते.) अगं काय आहे ना … म्हणजे आमच्या हे ध्यानातच नाही ना की आम्हाला पूजेला बसायचंय… अगं माझी जरा अडचण असल्यामुळे … लक्षात येतंय ना तुझ्या? 

आई : अग्गोबाई… तसं असेल तर मग उद्या … 

विनायक : (आईला तोडत बोलतो) आई, तसं काहीही नाहीये. (कविता टेन्शनमध्ये) 

कविता : विनायक, प्लीज. (तो तिच्याकडे शांतपणे पाहतोय. तिच्या नजरेत ‘कोणताही विषय नको काढूस आता’ असे आवाहन. तो तिला रिलॅक्स राहण्यास खुणावतो.) 

विनायक : आशु, हे बघ, मी देव मानत नाही. त्यामुळे मी पूजेला बसणार नाही. (सगळेच चमकतात. विनायक नेमके काय बोलला ते समजलेच किंवा ऐकूच आले नसल्यासारखे त्याच्याकडे पाहतात) 

आई : काय म्हणतोय हा? (कविता अपराध्यासारखी गप्प उभी. अश्विन, नलिनी एकमेकांकडे पाहत आहेत.) 

विनायक : आई, अगं… मी हे देव-धर्म, पूजा-अर्चा, विधी वगैरे काही मानत नाही आता. (आईला आता मात्र धक्का बसतो) 

अश्विन : दादा, अरे पण तू तर … 

विनायक : अरे, झाली याला पाच सहा वर्षं. म्हणून म्हटलं तुम्ही बसा दोघे पूजेला. (नलिनीलाही काही समजत नाहीये) आशु थँक्स, तुम्ही एवढं सगळं केलं आमच्यासाठी… आणि सॉरी (शांतता) प्लीज, तुम्ही बसा उद्या दोघे. 

(अश्विनच्या डोळ्यात मोठें प्रश्नचिन्ह) 

आई : अरे, सत्यनारायणाच्या प्रसादाला जरी कोणी बोलावलं ना, तरी नाही म्हणू नये. पाप लागतं. आणि तू तर पूजेचा मान … देवा, परमेश्वरा … माफ कर रे आम्हाला. (असे म्हणत सोफ्यावर बसते. कविता आईजवळ येऊन तिच्या पाठीवर हात ठेवते.) 

कविता : (अत्यंत कळकळीने) आई प्लीज, तुम्ही नका ना मनाला लावून घेऊ यांचं बोलणं. अश्विन भाऊजी आणि नलिनी बसतील पूजाला. 

आई : अगं, ते कायमच बसतात. सत्यनारायणाला, दिवाळीत लक्ष्मीपूजनाला. पण हा अचानकच असा देवधर्म नाही मानत म्हणतोय म्हणजे काय? (आई थोडी घाबरलीय) देवा परमेश्वरा … अरे काय लिहून ठेवलेस रे बाबा तू? 

कविता : आई प्लीज तुम्ही नका त्रास करून घेऊ. उद्या छान पूजा पार पडू दे मग आपण … 

आई : अगं पूजेचं एक वेळ ठीक आहे ग. पण हा जर सत्यनारायणाच्या पूजेलाच नाही म्हणतोय, विधी पटत नाहीत म्हणतोय, तर मग हा … (पुढील विचारानेच घाबरून उठते आणि देव्हाऱ्यासमोर जाऊन बोलू लागते) या घरातला एक माणूस हवाच होता तुला, तर मला का नाही नेलंस? हा दिवस बघायला जिवंत ठेवलं आहेस का मला? इतकी वर्षं या घराचं करून, घरातल्या सर्वांचं करून थकले रे मी. काहीही घडलं, जग इकडचं तिकडं झालं तरी तुझं कधीही काही करायला खंड पडू दिला नाही मी. आणि आता एवढं करून माझ्या पोटच्या गोळ्याकडून माझी परीक्षा का घेतोयस बाबा? नाही सहन होत आता मला हे सगळं, नाही सहन होत. 

विनायक : आई, अगं पूजेला बसायला तर नाही म्हणतोय मी… आणि आता वयाप्रमाणे थोडं कमी कर ना हे सगळं. आहेत ना हे दोघं! तू इतकी… 

आई : (त्याला तोडत) तुला नाही बोलत आहे मी काही. तू असतोस का इथं? तुला सांभाळायला लागतो का हा डोलारा? गेलास एकदा निघून, ते फिरकून तरी पाहिलंस का इकडं? यांचा आधार होता … आता तोही गेला. एकाची दोन दुकानं झाली. आशुला दोन्हीकडे पळावं लागतं. ही जॉबला. मग इथलं दुसरं कोण बघणार? तुला या घराचं काही पडलंय का? आई कशी आहे, बाबांचं काय चाललंय, कधी विचारलं आहेस का?

अश्विन : आई, अगं दादा कायमच तुमच्याबद्दल फोनवर … 

विनायक : आई, अगं सगळं माहिती आहे तुला. का त्रागा करतेस? बाबांनीच आपल्या सर्वांच्या पुढे काही पर्याय ठेवला होता का? ते म्हणतील तेच करायचं असेल, तरच घरात राहायचं. आता इतक्या वर्षांत माझं काय चाललंय, लग्न झालं, मुलगी झाली, याबद्दल एकदा तरी बाबांनी विचारलं का? आशुच्या फोनवर मला अंदाज लागायचा …, पण म्हणून मी कुठे असं बोलतो तुम्हाला? 

आई : (अश्विनला) बघ बघ, इतकी वर्षं लोटून गेली तरी गेलेल्या माणसाबद्दलसुद्धा हिशोब ठेवायची सवय काही गेलेली नाहीये बघ त्याची. आणि मी कांचीलाही घेऊन या असा निरोप दिलाच होता आशुकडून. तरी तू मुद्दाम आणलं नाहीस तिला इथे. आता ही दोघं येतील शाळेतून. कांचीला भेटायला इतकी आतुर आहेत माहितीय. आता काय उत्तर द्यायचं त्यांना? 

कविता : आई, तिलाही तुम्हाला बघायची खूप इच्छा आहे. पण तिच्या क्लासेसना सुट्टीच नाहीये. 

आई : सगळं समजतंय ग मला. पण या पुरुषांच्या पुढे काही चालतं का आपलं! 

विनायक : आई, शांत हो बरं. माझं तसं काहीही इंटेन्शन नव्हतं. उद्या छान पूजा झाली ना की एकत्र बसून गप्पा मारू आपण. कविता, चल आपण हे आवरून ठेऊ. (असे म्हणत दोघे चहाचे कप आणि प्लेट्स उचलू लागतात.) 

नलिनी : अहो भाऊजी, काय करताय? मी ठेवते ना. 

विनायक : का? मी फक्त पूजेला बसायचंय का? (हसत) घरातल्या कपबशाही उचलायच्या नाहीत मी? 

आई : होय, नाही उचलायच्या तू कपबशा. (त्याच्यासमोर येऊन उभी राहते.) तुला या घरासाठी, आमच्यासाठी काही करावंसं वाटत असेल ना, या घराच्या आणि तुमच्याही भल्यासाठी हे शेवटचं फक्त एकच कर. (असे म्हणत त्याच्यासमोर हात जोडते. कविता तिचा हात धरते.) 

कविता : आई अहो, काय करताय तुम्ही हे? हे नाही बसणार पूजेला, मला माहिती आहे. 

आई : अगं, पूजेला नको बसू दे ग, पण परवाच्या दिवशी ह्यांच्या … (असे म्हणत अण्णांच्या फोटोसमोर येते व रडू लागते. पुढचे बोलायच्या मन:स्थितीत नाही) 

विनायक : (सौम्यपणे) परवाच्या दिवशी बाबांचं काय आहे आई? अग बोल प्लीज. 

(कविता त्याला खुणेने शांत राहायला सांगते. काही क्षण शांतता. कविता आईजवळ येते. अश्विन आणि नलिनी एकमेकांकडे पाहतायत.) 

अश्विन : दादा, काय झालं माहिती आहे का?… म्हणजे आता मला हे माहीतच नव्हतं की तू हे सगळं मानतच नाहीस. आपलं फोनवर बोलणं व्हायचं, चॅटिंग व्हायचं. पण कधी हा विषय झालाच नाही ना. बाबा अचानक असे लॉकडाऊनमध्ये गेले. तुला तिकडे आयसोलेट केलं होतं. इकडे आहे या परिस्थितीत बाबांचे अंत्यसंस्कार आणि पुढचे विधी करणं भागच पडलं. मग काकांच्या सांगण्यानुसार अग्नी देण्यापासून दिवसांचं सगळं मलाच करावं लागलं दादा… मात्र एक विधी असा असतो तो फक्त थोरल्या मुलानंच करायचा असतो. तू आल्यावर करता येईल असं म्हणून आम्ही मोकळे झालो आणि कामात गुंतलो. पण पुढच्या सहा-आठ महिन्यांतच अशा काही घटना घरी, दुकानात आणि एकूणच आपल्या बाबतीत घडल्या की शेवटी काका म्हणाले, “विनायकला बोलवून घे पटकन्. वर्ष व्हायच्या आत आपण राहिलेले विधी करून घेऊ.” 

कविता : भाऊजी, काय झालं आहे नेमकं? काही काळजी करण्यासारखं नाही ना? 

आई : काळजी करण्यासारखं वाटलं नव्हतं आत्तापर्यंत. पण आता वाटायला लागली आहे काळजी. 

कविता : काय झालं आहे आई?

अश्विन : वहिनी, अगं खरं तर हे आज ना उद्या बोलणारच होतो. सगळं व्यवस्थित सुरू आहे खरं तर. दुकान वाढवलं, नलूची नोकरी उत्तम चाललीय. पण … 

विनायक : आशु, जे काही आहे ते स्पष्ट बोल. 

अश्विन : दादा, अरे सात वर्षं होत आली आपल्या दुसऱ्या दुकानाला. इथल्या दुकानात बाबा बसत होते. आणि मी गावातलं आणि इथलं दोन्ही बघत होतो. कॉम्पिटिशन वाढलेली असली तरी गिऱ्हाईकही चांगलंच वाढलं आपलं. पण बाबा गेल्यानंतर आपल्या इथल्या दुकानात मोठा आर्थिक फटका बसला. चार महिन्यांत जवळपास सहा ट्रक्सचा हिशोब फक्त कागदावरच दाखवला होता. मी एकटाच असल्याने मला समजायला बराच उशीर झाला. तुला बोललो होतो बघ एकदा फोनवर. 

विनायक : हंss 

अश्विन : आणि आता दीड एक महिन्यापूर्वी नलिनी जॉब करते त्या कंपनीत मोठा फ्रॉड झालाय. केलाय त्यातल्या पार्टनरनेच. पण ही अकाऊंटिंग विभागात असल्याने हिची चौकशी झाली. आपल्याला फारसा त्रास दिला नाही त्यांनी. कारण बाबांचं नाव होतंच ना. 

विनायक : पण नलिनी इन्व्हॉल्व नसेल तर त्यात काळजी करण्यासारखं काय होतं? 

आई : अरे, असं कसं म्हणतोयस तू? दोनदा पोलीस स्टेशनला जावं लागलं ना तिला. एकदा तर पोलीस घरात आले चौकशीला. आणि तू म्हणतोयस … 

विनायक : आई, अगं हा प्रोसेसचा भाग आहे त्यांच्या. 

आई : अरे, पण आपल्या घराण्यात कधी कोणीही पोलीस स्टेशनची पायरी नाही चढली आणि ना कधी पोलीस घरी आले होते. (विनायक आश्चर्याने पाहतोय.) 

अश्विन : दादा, या सगळ्यामुळे आईचं बीपी शूट झालं आणि तिला ॲडमिट करावं लागलं होतं. 

विनायक : काय? अश्विन, अरे तू मला हे बोलला का नाहीस एकदाही? आणि आई तू या गोष्टी प्रतिष्ठेच्या का करून घेतल्यास? (आठवून बोलल्यासारखा) आणि आशु, मी तुला मागंही विचारलं होतं, की आपली एक सोडून दोन दुकानं असताना नलिनी बाहेर का नोकरी करतीये म्हणून? एक दुकान सांभाळू शकतेच ना ती? मग ना एका दुकानात हा गोंधळ झाला असता, ना तिच्या कंपनीच्या घटनेची तिचा संबंध आला असता. 

आई : अरे, बाईने गल्ल्यावर बसावं असा व्यवसाय आहे का आपला? बाबांनी तेव्हाच सांगितलं होतं, “तिला दुकानात आणायचं नाही” म्हणून. आपलं तालुका प्लेस. हुमदांडगे पुरुष मेले दिवसभर दुकानात ये-जा करणार. तरी आपल्या घरात ज्याला जे हवंय ते करण्यासाठी स्वातंत्र्य दिलेलं आहे पहिल्यापासूनच. (विनायक आश्चर्याने आईकडे पाहतो. आई त्याची नजर टाळून पुढे बोलते) म्हणूनच बाबांनी तिला नोकरी करायची परवानगी दिली. 

विनायक : लकी आहेस नलिनी, घरात स्वातंत्र्य असूनही परवानगीसुद्धा मिळाली तुला! 

कविता : अहो प्लीज … भाऊजी, तुम्ही काय म्हणत होता? कसले विधी म्हणत होता तुम्ही? 

अश्विन : वहिनी, अगं बाबा गेले आणि दादा तिकडे ॲडमिट होता. सगळं मी केलं पण … 

विनायक : पण काय आशु? 

अश्विन : वडील गेल्यानंतर बाराव्या दिवशी त्यांचा सपिंडीकरण विधी काही कारणानं थोरला मुलगा नाही करू शकला आणि तो मधल्या किंवा धाकट्याने केला, तरीही वर्ष व्हायच्या आत थोरल्या मुलाला तोच विधी पुन्हा करावा लागतो. (हे ऐकल्यावर तर कविताच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो. पण विनायक शांतपणे ऐकतोय.) 

विनायक : बरं मग? 

अश्विन : (सांगायला थोडा कचरातोय) म्हणजे दादा, अरे … बाबा गेल्यानंतर तू येणार हे माहीत होतं. पण मग वर्ष उलटून जायच्या आधी तुला बोलवणंही गरजेचं होतं. (विनायक त्याच्याकडे पाहतोय. त्याला कसे पटवून द्यावे हे अश्विनला समजत नाहीये.) म्हणजे दादा, हे थोरल्या मुलानं वर्षश्राद्धाच्या आत नाही केलं ना, तर घराण्याला पितृदोष लागतो, असं काका म्हणाले. 

आई : (डोळ्यात पाणी आलेले आहे) कावळा नाही शिवला पिंडाला यांच्या. कावळा बनवावा लागला शेवटी. पण म्हणजे यांची इच्छा अपूर्णच राहिली म्हणायची ना! 

विनायक : आता? 

अश्विन : दादा, तू प्लीज … म्हणजे परवा सकाळची वेळ ठरली आहे विधीची. (शांतता. कोणीच काहीही बोलत नाही. हे बघून नलिनी कविताजवळ येते.) 

नलिनी : वहिनी, अगं बाबा असेपर्यंत खरंच कधीच काहीही वेगळं असं नव्हतं घडलं घरात, दुकानात. पण गेल्या सात-आठ महिन्यांत खूप काही गोष्टी घडल्या आहेत. यांनी सगळ्याच नाही सांगितल्या तुम्हाला. आणिक टेन्शन नको म्हणून. (कविता तिला धीर देते. विनायक अश्विनकडे पाहतो.) 

विनायक : आशु, या सगळ्याची तू आधीच फोनवर का कल्पना दिली नाहीस मला? 

आई : हांss म्हणजे “मी आलोच नसतो इकडे”. 

अश्विन : आई प्लीज, तो विचारतोय फक्त. काकांनी वर्षश्राद्ध घालण्याआधी तुला बोलवून हा विधी करायला सांगितला. सगळं ठीक होईल म्हणाले मग. (विनायक काहीतरी विचार करत उभा आहे. तो सहजच त्या विचारात एकदा कविताकडे पाहतो मग अश्विनकडे पहातो. पण याचा अर्थ अश्विन वेगळाच घेतो.) नाही दादा, अरे प्लीज. असं समजू नकोस की आम्ही तुम्हाला फक्त विधीसाठी इथं बोलावलं म्हणून. 

विनायक : इट्स ओके. मी तसं म्हणतच नाहीये. मी वेगळ्याच विचारात आहे. (शांतता) म्हणजे आशु, अरे काय हे? माझ्यापेक्षा कितीतरी जास्त शिकलेला आहेस ना तू? मग…? सत्यनारायण पूजेपर्यंत समजू शकतो मी. पण हे पितृदोष, अपूर्ण इच्छा… हे काय आहे? अरे, डिग्री मिळवलीस तेव्हा काय काय प्लॅन होते तुझे? आणि तू हे सगळं करणार? आणि नलिनी तू…? तू तर शहरात वाढलेली, शिकलेली आहेस ना? तुला हे पटतंय सगळं? प्रश्न नाही पडत तुला? का प्रश्न पडून घ्यायलाही परवानगी लागते? 

आई : ए बाबा, नको बसूस तू विधीला. पण इथल्या गोष्टींमध्ये ढवळाढवळ नको करूस. आमचं जे काही चाल्लंय ते चालू दे. आता असं वाटतंय, आत्तापर्यंत चाललं होतं त्यातच शांतता होती. नको ती शांत. अश्विन, होऊ दे या घराचं काय व्हायचं ते. 

कविता : (हिची अवस्था खूपच अडचणीची झालीय) आई, तुम्ही नका मनाला लावून घेऊ यांचं बोलणं. आणि तुम्ही जरा शांत बसाल का प्लीज? (ती सर्वांसमोर हात जोडून बोलू लागते) मी तुम्हा सर्वांची हात जोडून माफी मागते. खरंच माफ करा आम्हाला. (नलिनी तिचे हात खाली घेते.) 

नलिनी : वहिनी, अगं असं नको बोलूस. 

कविता : अगं, आम्हाला कल्पनाच नव्हती की आम्हाला पूजेला बसायचं आहे. आणि यांना … 

नलिनी: हे आग्रह नाही धरणार दादांकडे विधीला बसण्यासाठी. ओळखते मी यांना. 

आई : चला … म्हणजे आता हे घर कायमचं अशांत राहणार तर. (कविता आईजवळ येऊन बसते. ती आता मात्र काही बोलू शकत नाही. आई पुढे बोलू लागते) एकतर याचं पंधरा वर्षांनी तोंड पाहतेय. इतक्या वर्षांनी आपण सगळे एकत्र येणार म्हणून किती आनंदात होते मी. उद्या पूजा पार पडेल, त्यानंतर दोन-चार दिवस आपण एकत्र घालवू. याच्याशी माहीत नाही, पण तुझ्याशी खूप गप्पा मारायच्या होत्या, बोलायचं होतं गं मला. यांच्या आणि विनायकमधला अबोला कधीतरी संपेल अशी आशा होती मला. हा स्वतःहून कधी आला नाही आणि हेदेखील किती घट्ट बघ… (आईचे डोळे भरून आले) डोळ्यात दिसत होतं यांच्या, पण शेवटपर्यंत नाव नाही घेतलं यांनी विनायकचं. या सगळ्यांत आपली काय कुतरओढ होत असेल, याचा साधा विचारही नाही शिवत या पुरुषांच्या मनाला. आणि नियतीपण कसा खेळ खेळते बघ. यांचा आत्मा शांत व्हायला मात्र विनायकची गरज पडावी का यांना? काय वाढून ठेवलंय परमेश्वरानं आपल्या पुढ्यात काय ठाऊक? आता हा अचानक असा देवधर्म, विधी मानतच नाही म्हटल्यावर धक्का नाही का बसणार मला? (विनायक आईजवळ येतो.) 

विनायक : आई, तू प्लीज शांत हो बघू. उद्या पूजा आहे ना आपल्याकडे. चांगली चार दिवस सुट्टी काढून आलोय. उद्या सगळं झालं की मनसोक्त बोल मला. 

आई : म्हणजे, “मी काही विधी करायला बसणार नाही” होय ना? अरे, देव-धर्म म्हणजे काय खेळणी आहेत का? मन रमत होतं तोपर्यंत मनसोक्त खेळलो. मन भरल्यावर दिली टाकून खेळणी. सगळं करत तर होतास आधी. अगं, किती करायचा माहिती हा? शनिवारी मारुतीला जायचा, मंगळवारी गणपतीला, गुरुवारी दत्ताला, संकष्टीला उपवास करायचा आणि रात्री उपवास सोडायला बागेतल्या गणपतीला प्रसादाचं जेवायला जायचा. हा आणि आशु. आठवतंय तरी का तुला आता? अरे, मग आता अचानकच असं काय झालं? 

विनायक : आई, सगळं सांगतो मी तुला. फक्त उद्याचा कार्यक्रम पार पडू दे. नको वाईट वाटून घेऊस इतकं. 

आई : वाईट कसं वाटून नको घेऊ? (कविताला) सत्यनारायणाला बसतील गं ही दोघं. पण यांचा सपिंडीकरणाचा विधी विनायकलाच करायचा ना? देशपांडे गुरुजी म्हणालेत की हा बसला तर वास्तुदोषही दूर होईल. सगळी संकटं दूर होतील तुमच्यावरची. सगळ्यांचच कल्याण होईल. अरे, तुम्हा दोघांचाही संसार निर्विघ्न चाललेला पाहायला आवडणार नाहीये का मला सांग! माझं काय राहिलंय आता? आयुष्यात माझं काही बरंवाईट होण्याआधी तुम्ही मार्गी लागलेलं पाहिलं, की मी श्रीराम म्हणायला मोकळी झाले. 

कविता : असं नका ना बोलू आई. 

आई : (कविताला) कोणत्या गोष्टीचा राग धरला गं याने देवावर? अगं, नाही होत सगळंच सगळ्यांच्या मनासारखं. 

विनायक : आई, जी गोष्ट अस्तित्वातच नाहीये, त्यावर मी का रागवेन? (कविता त्याला विषय काढू नको असे खुणावत असते.) हे बघ आई, उशिरा का होईना मला ही गोष्ट समजली की देव, धर्म या सगळ्या मानवनिर्मित संकल्पना आहेत. आणि त्या-त्या काळी त्या कशासाठी निर्माण झाल्या हे लक्षात आल्यावर देव वगैरे काहीही अस्तित्वातच नाही हे सत्य मी स्वीकारलं इतकंच. 

आई : अरे काय बोलतोस तू? देवा, परमेश्वरा माफ कर रे याला. कसलं सत्य स्वीकारलं आहेस तू? देव मानत नाहीस इतपत ऐकून घेतलं ना आम्ही. देव अस्तित्वातच नाही आहे, हे कोणत्या अधिकाराने बोलतोयस तू? (कविताची घालमेल. वातावरण आणखीन अशांत होऊ नये म्हणून अश्विन बोलतो) 

अश्विन : असं नको बोलूस अगं. त्याचं व्यक्तिगत मत सांगतोय दादा. तो का बसणार नाही पूजेला म्हणून. 

आई : अरे, म्हणून मग त्याला साधा प्रश्नही विचारायचा अधिकार नसेल मला, तर हा काय फक्त पाहुणा म्हणून राहणार आहे का या घरात? (कविताला बोलते) तू तर कसा संसार करत असशील अशा माणसाबरोबर हे विचारायलाच नको. फक्त एक शेवटचं कर म्हणावं त्याला या घरासाठी. परवा बाबांच्या विधीला बैस म्हणावं त्याला. मग पुन्हा कधीही कुठला आग्रह नाही धरणार आम्ही त्याला. अगं, तुम्हा दोघांचाही संसार आहे, कांचीचं भविष्य आहे. तो मानत नसला तरी नाट लागते गं सगळ्याला. (आईच्या डोळ्यात पाणी भरलेय. शांतता. कविता तिच्या नमस्कारचा हात खाली घेते आणि विनायककडे येते) 

कविता : जेव्हापासून तू हे सगळं मानणं बंद केलं आहेस, तेव्हापासून मी तुला कधीही कशाचाही आग्रह धरला नाहीये. (आईच्या अवस्थेकडे बघत) पण आज पहिल्यांदा रिक्वेस्ट करते तुला. तू परवा प्लीज त्या विधीला बस. (तो शांत) हे बघ तू मानू नको ना काही, नुसता बस. (विनायक तिच्याकडे शांतपणे पाहतोय) अरे, हे कुणालाही नाही समजणार. आपल्या आई- वडिलांसाठी काहीही करण्यामध्ये कसलाही कमीपणा नाही येत. हे बघ, तुझ्या म्हणण्यानुसार हा विधी केल्याने काही होणार असो नसो, पण निदान यांच्या मनाला तरी शांतता मिळेल ना. (विनायक उत्तर देत नाही. तो ठाम दिसतो आहे) अरे, आई काय तुला “तुझं करियर सोडून इथं कायमचं दुकान सांभाळायला ये” असं तर नाही ना म्हणत आहेत. आणि उद्या आपल्याबाबतीतसुद्धा खरंच मनासारखं काही नाही घडलं आयुष्यात, कधी काही बरंवाईट झालं तर, हीच हक्काची माणसं आहेत ना रे आपल्या?

विनायक : कोणत्याही प्रकारच्या भीतीचे दोर तोडायला कधी शिकणार आहोत आपण? 

आई : तोड बाबा एकदाचे… सगळे दोर तोड. घराचे तोड, सगळी नाती तोड. फिरकू नकोस पुन्हा इकडे. नाही बोलणार तुला पुन्हा. (आईला थोडा त्रास होऊ लागलाय. पण ती भावनिक झाली आहे असे सर्वांना वाटते. ती मध्येमध्ये स्वतःचा डावा दंड आणि खांदा दाबते आहे. आता ती दम लागल्यासारखे बोलतेय) नातीचं तोंड बघेन म्हणत होते. आता नाही नशीबात त्याला sss आई गं.. (आईला आणखीन अस्वस्थ वाटू लागतें. कविता, नलिनी तिच्याजवळ येतात. ती सारखा डावा दंड, खांदा दाबतेय हे पाहून विनायक अश्विनला बोलतो) 

विनायक : फॅमिली डॉक्टर कोण आहेत आपले? पटकन कॉल कर त्यांना. 

अश्विन : दादा पण… 

विनायक : प्लीज, पटकन कॉल कर आणि बोलाव त्यांना आत्ताच्या आत्ता. (अश्विन मोबाईल काढून कॉल करत असतो) मी बोलतो वाटलं तर त्यांच्याशी. (आई धाप लागलेल्याच अवस्थेत) 

आई : अश्विन, काही डॉक्टरबिक्टरला कॉल करू नकोस. हे नेहमीचंच आहे. वाटेल बरं मला थोड्या वेळात. (थोड्या कणवेने कविताला बोलते) एवढी काळजी आहे आईची ना, तर त्याला म्हणावं बस परवा तू विधींना. (अश्विन बाजूला जाऊन डॉक्टरांशी बोलतोय. इकडे आईची धाप वाढली आहे. कविता, नलिनी त्यांची काळजी घेतात. वारे घालतात. पाणी प्यायला देतात. विनायक आईच्या त्रासाचा अंदाज घेतो व अश्विनजवळ जाऊन काहीतरी बोलतोय. जणू तो आईचा डावा दंड दुखतोय हे डॉक्टरांना सांग असे अश्विनला सांगतोय व पुन्हा काळजीने आईची अवस्था पहातोय) 

नलिनी : काय होतं आहे आई? (घाबरते) अहो … अहो बघा ना. आईंना खूप त्रास होतोय. (आई आणखीन अस्वस्थ होते. सर्वजण आईजवळ येतात. अश्विन ‘डॉक्टर येत आहेत’ असं म्हणतो. आई देवाचं नाव घेते. व्हेग बडबडतेय. विनायक तिच्या काळजीने तिच्याजवळ बसतोय. सगळे खूप काळजीत. कविता खूप आशेने विनायककडे पाहतेय) 

ब्लॅक आउट 

प्रवेश ३ 

(दुसरा दिवस, म्हणजे सत्यनारायण पूजेचा दिवस. मंगलप्रसंगीचे संगीत सुरू आहे. सत्यनारायण पूजा पार पडलेली आहे. दिवसभर लोक प्रसाद घेऊन गेलेले आहेत. आता दुपार किंवा संध्याकाळची वेळ. देशपांडे गुरुजी हॉलमध्ये बसले आहेत. हॉलमध्ये अश्विन आणि विनायकदेखील आहेत. सत्यनारायण पूजेच्या दिवशी परिधान करावे असे कपडे तिघांच्याही अंगावर. गुरुजींना कालचा विषय समजला आहे आणि ते आता विनायकशी त्या विषयावरती बोलणार आहेत. त्या पूर्वीची शांतता किंवा गुरुजी त्याच्याशी काय बोलायचं, सुरुवात कशी करायची, या विचारात आहेत) 

गुरुजी : हे बघ विनायका मला समजतंय, तुला अण्णाच्या निर्णयामुळे हे घर सोडावं लागलं. तू शहरात गेलास. शहरासारख्या नवख्या ठिकाणी राहून तू अगदी शून्यातून जे काही असेल ते तुझं तुझं विश्व निर्माण केलंस. आता इतकी वर्षं शहरात राहून, त्या शहरी संस्कृतीत आधुनिक पद्धतीत आधुनिकपेक्षाही सोयीची म्हणू आपण, अशी जीवनशैली स्वीकारणं, आत्मसात करणं स्वाभाविक आहे. आठवतंय तुला? तू इथून जाण्यापूर्वी अण्णांबद्दल असलेली भावना माझ्याकडे बोलून दाखवली होतीस. कारण मी अण्णाचा सर्वांत जवळचा मित्र. खूप नाराज होतास तू. कसं आहे, आयुष्यात आपल्याला हवं तसं नाही घडलं, तर कधी कधी माणूस श्रद्धाळू होण्यापेक्षा उलट तो नशिबावर, देवावर नाराज अधिक होतो. देवानं किंवा आपण नशीब म्हणू, आपल्याला त्या सगळ्या गोष्टी नाही दिल्या, ज्यावर आपला अधिकार होता. मग आपल्याला ते मिळत नाही या भावनेतून एखाद्या व्यक्तीची मतं देवा-धर्माच्या, अध्यात्म्याच्या बाबतीत कडवी बनू शकतात. तू असा विचार करणं हे नक्कीच समजू शकतो मी. 

विनायक : काका, आता असं काहीही नाहीये. तेव्हा होतो मी नाराज बाबांवर. पण आता नाही. आणि तुम्ही म्हणताय तसं मी नशीब आणि देवावरही नाराज नाहीये. कारण मुळात मी हे देवधर्म, नशीब -नियती, प्राक्तन-प्रारब्ध यातलं काहीही मानतच नाही. या सगळ्या काल्पनिक गोष्टी आहेत. जुन्या काळी काही गरजांमधून माणसानेच निर्माण केलेल्या. पण म्हणून आजही आपण त्या मानणं आणि आंधळेपणाने त्याचं पालन करणं मला स्वतःला तरी पटत नाही, इतकंच. (काही क्षण शांतता. गुरुजी विनायकच्या विचारांचा अंदाज बांधतात. आणि अश्विनकडे पाहत नजरेने धीर देतात) 

गुरुजी : ठीक आहे. मान्य आहे मला की आता तुला हे काहीही पटत नाही. पण कसंय विनायका, या विश्वात अशा काही शक्ती आहेत, ज्यांचं अस्तित्व आपल्या आकलनापलीकडे असतं. आपल्याभोवती अनेक गोष्टी, घटना अशा घडत असतात की त्यांचे अर्थ लावणंही आपल्या मानवी बुद्धीच्या बाहेरचं आहे. 

विनायक : काका, पण मुळात.. (गुरुजी त्याला नम्रपणे अडवत बोलू लागतात) 

गुरुजी : बाळा, मला जरा बोलू दे. (असे म्हणत उठतात) 

विनायक : सॉरी काका. 

गुरुजी : तुझ्या वडिलांची, म्हणजे अण्णाची आणि माझी ओळख इथल्या तालुक्यातल्या आठवडी बाजारात झालेली. शाळेत होतो तेव्हा आम्ही. चौथी पाचवीत. काही कळायचं वय नव्हतं, पण परिस्थितीनं शहाणं बनवलं त्या लहान वयातच आम्हाला. इथल्या आणि आसपासच्या आठवडी बाजारात तुझे आजोबा वसंतराव शेतमाल आणि बांधकामाला लागणारी लोखंडी अवजारे रस्त्यावर बसून विकत. का? तर घरची परिस्थिती बेताची. त्यामुळे वसंतरावांना शिकता आलं नाही. त्यांना तीन लहान भावंडं आणि दोन बहिणी. काही वर्षे इथल्या एका मोठ्या व्यापाऱ्याच्या दुकानात कामगार म्हणून त्यांनी काम केलं. ते करत करत त्या व्यवसायातील सर्व व्यवहार, खाच-खळगे असं शिकत पूर्ण व्यापारच समजून घेतला. ज्या व्यापाऱ्याकडे काम करत होते ना तुझे आजोबा, तो स्वामींचा भक्त आणि तुझे आजोबादेखील. आणि हा दोघांमधला समान दुवा. नंतर त्या व्यापाऱ्याकडून बाहेर पडून त्याच्याकडूनच पैसे उचल घेऊन आठवडाभर वेगवेगळ्या गावात हिंडून रस्त्यावर माल लावून चिकाटीने पाच-सहा वर्षं हा व्यवसाय केला आजोबांनी. सुट्टीच्या दिवशी आण्णालाही घेऊन जायचे. पुढे मार्केटमधील, म्हणजे आत्ताची जी चौकातील जागा आहे ना, तिथेच एक छोटीशी जागा घेतली भाड्याने. माझे वडील सतत आण्णाचे उदाहरण द्यायचे मला. पुढे आमच्यात मैत्री वाढली. वसंतरावानंतर अण्णानं हा व्यवसाय तालुक्याच्या बाहेर नेला. अण्णालाही फार शिकायला मिळालं नव्हतं. आणि शिक्षणाशिवाय एवढा डोलारा उभा करता येत असल्यामुळे शिक्षणाचे त्याला कधी फार कौतुक नव्हतं. त्यामुळे पुढे तुम्हालाही दुकानच सांभाळायचं असल्याने त्यांनं तुम्हालाही कधी उच्च शिक्षणासाठी विशेष आग्रह नाही केला. अण्णा मला कायम म्हणायचा, ‘खरं शिक्षण हे शाळेबाहेरच्या जगातच मिळतं, हे मला वडिलांमुळे समजलं. आणि शिकून नोकरी करणारा माणूस ज्या कंपनीत असतो, तिचा कायमचा मिंधा राहतो.’ त्यामुळे विनायका, तू असं कधीही वाटून घेऊ नकोस की अण्णाने तुला दुकान चालवायचे म्हणून शिक्षणासाठी प्रोत्साहन दिलं नाही. अरे, अण्णानं नकळत्या वयात अठराविश्व दारिद्र्य अनुभवलेलं होतं. आणि तेच तुमच्याही वाट्याला कधीही येऊ नये असं त्याला वाटत होतं. तेव्हा प्लीज, हट्ट सोडा हा, राग सोड त्याच्यावरचा आणि उद्या विधींना बैस. 

विनायक : काका, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी तेव्हा पंधराएक वर्षांपूर्वी बोललो होतो तुमच्याजवळ त्यांच्याबद्दल, माझ्या करीअरबद्दल. पण आता तसं काहीही नाहीये. या विधीला न बसण्यामागे माझे बदललेले विचार आहेत, त्यामागची माझी भूमिका आहे. बाबांबद्दल कोणताही राग नाहीच आहे मला. 

गुरुजी : विनायका, अरे अण्णानं तुला त्याचा निर्णय दिल्यानंतर तू जे घर सोडलंस, ते आत्ता त्याच्या मृत्यूनंतरच या घरात पाऊल ठेवलंयस, यातच सारं काही आलं. (विनायक शांत. गुरुजी आत बायकांना ऐकू जात नाही ना याचा अंदाज घेऊन विचारतात त्याला) मग मला सांग, अण्णा जेव्हा गेला तेव्हा जर तुला तिकडून इथे येण्याची संधी असती तर तू आला असतास? 

विनायक : हो नक्कीच. 

गुरुजी : मग तेव्हा तर तुला थोरला मुलगा म्हणून अण्णाला अग्नी द्यावाच लागला असता. मग तू काय केलं असतंस? (अश्विन गंभीरपणे ऐकतोय) 

विनायक : मी नकारच दिला असता. किंबहुना अश्विनने मला पूर्ण टक्कल करायलाही सांगितलं होतं. 

गुरुजी : केशवपन. 

विनायक : हा. केशवपन करायला सांगितलं होतं फोनवरून. पण मी नाही केलं. 

गुरुजी : (त्यांना हवा तोच अर्थ लागल्यासारखे मंद हसतात) एक विचारू? 

विनायक : हा काका. विचारा ना. 

गुरुजी : अण्णा गेल्याचं समजल्यावर रडलास की नाहीस? 

विनायक : नाही. (गुरुजी दीर्घ श्वास घेऊन सोडतात. शांतता) पण माहिती नाही मला… मी काहीतरी मिस करत होतो, असं मला वाटत होतं. म्हणजे त्यानंतर काही काळ… मला कुठेतरी पोकळी जाणवत होती. 

गुरुजी : (अश्विनकडे आश्वासक पहात आहेत) हंsss आहेत म्हणजे तुला अण्णाबद्दल भावना. म्हणूनच म्हणतोय मोकळा हो रे विनायका. आणि सोड हा हट्ट. अण्णाबद्दल मनात कोणतीही गोष्ट, भावना दडपून ठेवू नकोस. त्यामुळेच ही पोकळी जाणवतेय तुला. 

विनायक : तसं नाहीये काका. खूप काही बोलायचं होतं मला बाबांशी. काही प्रश्न विचारायचे होते त्यांना. ज्या प्रश्नाचं स्वरूप फक्त पूर्वीपेक्षा बदललेलं होतं. पण त्यांना कधीही प्रश्न विचारलेले आवडत नसत. आणि मी हेदेखील त्यांना बोलून दाखवत असे. मग चर्चा न करताच ते निर्णय देत. 

गुरुजी : अच्छा. म्हणून इतकी वर्षं तू मनात राग दाबून ठेवलास त्याच्याबद्दल? 

विनायक : अहो काका, सुरुवातीला होता. पण नंतर मला त्यांच्याबद्दल राग वाटला नाही कधीच. एखाद्या देशाचा पंतप्रधान प्रश्नांना सामोरं जावं लागेल, या भीतीने प्रेस कॉन्फरन्सच घेत नाही ना कधी, तसंच बाबांनीही घरात साधी फॅमिली कॉन्फरन्सही घेतली नाही कधी. आणि या साऱ्यात मी आईचे हाल बघत होतो. 

गुरुजी : कसं आहे, देश आणि घर एकत्र टिकवून ठेवण्यासाठी कर्त्या पुरुषाला अशीच भूमिका घ्यावी लागते बाळा. आणि आता गेला तो हे जग सोडून. तेव्हा गेलेल्या माणसाबद्दल पूर्वीपासून असलेली अढी ठेवू नये मनात. अरे, आपल्या संस्कृतीत शत्रूच्या देहाचीदेखील अवहेलना करत नाहीत. म्हणूनच षडरिपुंनी ग्रासलेल्या आत्म्याने देह सोडला की त्या देहाला पार्थिव म्हटलं जातं आपल्याकडे. पार्थिव म्हणजे पवित्र (गुरुजी विनायकच्या खांद्यावर हात ठेवून बोलू लागतात) तुझ्या वडिलांच्या आत्म्याला मोक्ष मिळावा असं वाटत असेल ना, तर तू परवा बसशील या विधीला. या घरातील, कुटुंबातील सगळे दोष दूर होतील. आणि तुला पुण्य लागेल. एवढे कर बाळा. 

विनायक : पण काका, या घराला दोष कशामुळे आणि कसे लागले, हे कसं कळणार? आणि कोण ठरवणार ते? 

गुरुजी : हे बघ, शास्त्रानुसार एखाद्या गेलेल्या व्यक्तीचा थोरला मुलगा जिवंत असतानाही त्याचे विधी करू शकला नाही काही कारणाने, तर त्याच्या आत्म्याला गती मिळत नाही. 

विनायक : आणि काका, हेच सगळं मला पटत नाही. हे कोणी ठरवलं…? आत्मा, गती, मोक्ष. आपण जन्माला येणं आणि मरण पावणं या साध्या नैसर्गिक घटना आहेत. आपलं शरीर रसायनांनी बनलेलंय आणि काही कारणाने आपल्या शरीराची रासायनिक प्रक्रिया काम करायची थांबली की शरीरही थांबतं. थोडक्यात, आपण मरतो. यात आत्माबित्मा कुठून आला? आणि मुळात तुम्ही म्हणालात ना की बाबांना किंवा कुठल्याही कर्त्या पुरुषाला घर एकत्र टिकवावं वाटत असेल तर मृत्यूनंतर तो अतृप्त आत्मा होऊन स्वतःच्याच घरात दोष निर्माण होईल, संकट येतील अशा कृती का करेल? 

गुरुजी :
पुनरपि जननं पुनरपि मरणं, पुनरपि जननी जठरे शयनम्
ईहं संसारे बहुदुस्तारे, कृपयाss पारे पाहि मुरारे ॥ 

विनायका, अगदी योग्य ठिकाणी आलायस. या विश्वात माणूस जन्म घेतो, मृत्यू पावतो. पुन्हा जन्म घेतो आणि पुन्हा मृत्यू पावतो. एक देह सोडून आत्मा दुसऱ्या देहाच्या शोधात असतो. त्याला पुन्हा आईच्या गर्भाशयाची ओढ लागलेली असते. हे विश्वच इतकं सुंदर आहे की तू ते सोडू नकोस. असा या श्लोकाचा अर्थ आहे. आणि आत्म्याला पुन्हा मनुष्ययोनीत जन्म घ्यायचा असेल तर त्याला आधी मोक्ष मिळणं गरजेचं असतं. (गुरुजी अण्णांच्या फोटोपाशी येतात किंवा अण्णांच्या फोटोकडे पाहत बोलतात) मृत्यूनंतर कदाचित अण्णाला तू नास्तिक झाल्याचं समजलं असावं आणि म्हणूनच या घराचं कल्याण व्हावं, तुम्हा सर्वांचं भविष्य उज्वल व्हावं या इच्छेने अण्णाला याच घरात पुन्हा जन्म घ्यावासा वाटतोय कदाचित. आणि म्हणूनच देव-धर्म न मानणाऱ्या तुला त्यानं आज इथं आणून उभं केलंय. त्याचे हे संकेत लक्षात घे विनायका!

विनायक : काका प्लीज … हे फारच इल्लॉजिकल आहे सगळं. (ही चर्चा सुरू असतानाच नलिनी आणि कविता हॉलमध्ये आलेल्या आहेत. आणि आईसुद्धा त्यांच्यानंतर येऊन थांबलेली आहे. सर्वजण त्यांची चर्चा ऐकत आहेत) 

आई : विनायक, अरे निदान एवढ्या मोठ्या माणसाशीतरी वाद नको घालूस रे बाबा. 

गुरुजी : असू दे वहिनी. त्याचा तेवढा हक्क आहे माझ्यावर. हे बघ विनायका, जन्म-मृत्यूच्या पलीकडील विषय समजण्यासाठी लॉजिकची नाही, तर श्रद्धेची गरज असते. 

विनायक : पण श्रद्धेनेतर मनाला फक्त खोटं समाधान मिळतं. उत्तरं मिळतच नाहीत आणि त्यामुळे समजत तर काहीच नाही. 

आई : कशाचं उत्तर हवंय तुला? (तिला थांबवत गुरुजी पुढे बोलू लागतात) 

गुरुजी : बरं. विधी तू करू नकोस एक वेळ. पण मग म्हणणं काय आहे तुझं ते तरी सांग. 

विनायक : काका, रागवू नका. पण या सगळ्या अंधश्रद्धा आहेत. तुम्ही म्हणताय त्या किंवा रुढी-परंपरेने चालत आलेल्या अनेक गोष्टी या अवैज्ञानिक आहेत. त्यात काहीही तथ्य नाहीये. असे मंत्र, जप आणि विधी केल्याने कोणाच्याही आत्म्याला शांती, मोक्ष वगैरे काहीही मिळत नाही. कारण माणूस मृत्यू पावला की शरीराच्या सगळ्या क्रिया थांबतात. त्यातून आत्मा वगैरे असलं काहीही बाहेर पडत नाही. कारण तो अस्तित्वातच नसतो. आत्मा, परमात्मा या निव्वळ धार्मिक, अध्यात्मिक कल्पना आहेत. अतिशय इररॅशनल आणि अवैज्ञानिक आहेत. 

आई : अरे, धर्मकार्यात कुठे विज्ञान आणतोस तू? 

गुरुजी : वहिनी, अगं विज्ञानाला आत्ता आत्ता गोष्टी कळायला लागल्या आहेत. गेल्या दोन-चारशे वर्षात. आणि आपला धर्म हजारो वर्षं जुना आहे. आपल्या धर्मग्रंथांमध्ये हजारो वर्षांपूर्वीच या सृष्टीच्या निर्मितीपासून मानवप्राण्याच्या जन्माचे प्रयोजन आणि त्याचे कार्य लिहून ठेवलेलं आहे. अरे, विज्ञानही जिथे अजून पोहोचू शकलं नाहीये तिथे आपले ग्रंथ, पुराण कधीच पोहोचलेली आहेत. म्हणूनच म्हणतात, ‘जिथे विज्ञान संपतं, तिथून अध्यात्म सुरू होतं.’ आपल्या या परंपरा तू मानण्या-न-मानण्यानं धर्माचं काहीच नुकसान होत नसतं, पण तू मात्र तुझ्याबरोबर तुझ्या बायका मुलांचही नुकसान करून घेतोयस. 

अश्विन : काका, प्लीज रागवू नका. आम्ही त्याला सांगू शकत नव्हतो म्हणून मग शेवटी … 

गुरुजी : अरे, छे छे. मी रागवत नाहीच आहे त्याच्यावर. अरे आपली एकमेव संस्कृती त्यातील संस्कार इतके उदात्त आणि उदार आहेत की तिच्यामध्ये साऱ्यांनाच सामावून घेण्याची वृत्ती आहे. म्हणूनच आपल्या धर्मात नास्तिक असण्यालादेखील परवानगी आहे. 

विनायक : ठीक आहे मग. आता तर प्रश्नच मिटला. उद्या माझ्या जागी कविता बसू दे ना विधी करायला. अर्थात तिची इच्छा असेल तर. 

अश्विन : दादा, अरे … 

आई : विनायक, आता तू हे मुद्दामून करतोयस. 

गुरुजी : परीक्षा घेतोय तो आपली वहिनी. हे बघ विनायका, समाजात नीतिमत्तेने वावरण्यासाठी, जगण्यासाठी जसे कायदे असतात ना, तसे शास्त्रानुसार धर्मातदेखील काही काटेकोर नियम म्हणजे कायदे असतात. समाजातील कायदा आपण तोडला तर आपण कुठे जातो? सांग ना कुठे जातो? 

विनायक : जेलमध्ये. 

गुरुजी : अगदी बरोब्बर. तसंच शास्त्रातदेखील नियम न पाळल्यास थेट नरकात जागा मिळते. तेव्हा शास्त्राप्रमाणे ज्या गोष्टी ज्यांनी करायच्या आहेत त्या त्यांनीच कराव्या लागतात. समजतंय का तुला? 

विनायक : समजतंय मला काका. एकीकडे आपला धर्म स्त्रीला अर्धांगिनी म्हणतो. आणि दुसरीकडे नवऱ्याच्या ऐवजी किंवा त्याच्या जागी पूजा, विधी करायचा मान मात्र देत नाही. मग धर्म सर्वसमावेशक, महान आणि उदात्त कसा? तो मूलतःच विषमतेने भरलेला आहे काका. किंबहुना पितृसत्तेने तसा बनवलाय. केवळ स्वतःच्या सोयींसाठी. आणि म्हणूनच मला धर्म नव्हे तर संविधान महत्त्वाचं वाटतं. त्यातील सेक्युलरिझम मला जास्त पटतो. कारण तो प्रत्येकालाच आपापला देव-धर्म मानण्याचं, न मानण्याचं, पाळण्याचं, न पाळण्याचं स्वातंत्र्य सांगतो. इथे परवानगी हा शब्द नाही येत काका. ‘नास्तिक असण्याला परवानगी’ – धर्म कोण लागून गेला परवानगी देणारा? मुळात धर्म हीच काल्पनिक गोष्ट आहे. परवानगी हा शब्दच गुलामगिरीची व्यवस्था आणि सांस्कृतिक अहंकार अधोरेखित करतो काका. आणि संविधान हे असलेल्या स्वातंत्र्याची, हक्कांची ओळख करून देतं. डॉक्टर बाबासाहेबांनी म्हटल्याप्रमाणे, ‘गुलामाला त्याच्या गुलाम असण्याची आठवण करून द्या, म्हणजे …’ असो. एखाद्या कंपनीचा मालक वारला तर त्याची पत्नी त्याच्या जागी बसून तो व्यवसाय पुढे चालू ठेवू शकते. नोकरदार असेल किंवा सरकारी नोकरीत असेल तर नवऱ्याच्या जागी तिला नोकरी मिळू शकते. तिची शैक्षणिक आणि बौद्धिक पात्रता असेल तर. आणि अर्थातच हे सगळं नियमानुसार. पण केवळ स्त्री आहे म्हणून तिला नकार मिळत नाही. कारण ही आधुनिक मूल्य स्त्री-पुरुष समानता मानतात. पण आपल्या धर्मातील जीर्ण नियमात याचा समावेश नाही. तुम्ही मघाशी समाजातील कायद्याचे उदाहरण दिलं ना. घटना आणि कायद्यांमध्ये या गोष्टी पारदर्शी असतात काका. पुराव्यानिशी ठरतात. धर्मात ही पारदर्शिता कुठे आहे? अमुक-अमुक विधी का करायचा आहे? तर तसं शास्त्रात लिहिलंय म्हणून. पण तसं कोणी लिहिलं? आणि कोणत्या अधिकाराने लिहिलं किंवा हे सगळे धार्मिक क्रियाकर्म, नियम कशाच्या आधारावर उभे आहेत? तर ते धर्ममार्तंड म्हणविणाऱ्यांनी लिहिले आहेत म्हणून? मुळात कोणी ठरवलं यांना धर्ममार्तंड किंवा धर्माचे ठेकेदार? (खूप वेळ शांतता) 

कविता : विनायक … प्लीज थांबूयात आता आपण. 

विनायक : मी विषय काढलेलाच नाहीये कविता. मी फक्त त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देतोय. पण त्यातूनही काही प्रश्नच पुढे येतायत. आणि हे मी सांगितल्याशिवाय मी देवधर्म का मानत नाही हे समजणारच नाही यांना. 

कविता : अरे, मलाच समजलेलं नाहीये अजून इतक्या वर्षात तुझ्याबरोबर राहूनही. एका दिवसात यांनाही कसं समजेल?

आई : कुठला विषय कुठे नेऊन ठेवला बघ यानं! तेव्हाही असंच करायचा. 

कविता : (हात जोडते) गुरुजी, आई क्षमा करा आम्हाला. आमच्या ध्यानातसुद्धा नव्हतं हो की असं… 

आई : तू नको ग बाई हात जोडूस सारखे. तुझी काय कुचंबणा होत असेल याचा विचारसुद्धा करवत नाहीये मला. सणसमारंभ, पूजा होतच असेल ना गं तिकडे! तेव्हा काय करता गं तुम्ही? (शांतता) कांचीला तरी देवाधर्माचं करू देतोय ना हा? 

विनायक : आई, अगं मी कोण त्यांना अडवणारा! त्यांच्या आवडीच्या गोष्टी करायला त्या स्वतंत्र आहेत. आणि त्या नाकारायला मी स्वतंत्र आहे. 

आई : अरे, काय प्रत्येकजण स्वतंत्र आहे, स्वतंत्र आहे लावलंयस कालपासून. म्हणजे या स्वातंत्र्याच्या नावाखाली कुटुंबप्रमुख म्हणून तू स्वतःच्या जबाबदाऱ्या टाळायला मोकळा. रीतसर विधिवत लग्न केलं आहेस ना हिच्याशी? देवा ब्राह्मणांच्या साक्षीने अग्नीला प्रदक्षिणा घातलेल्या आहेस ना? अरे, सर्व प्रसंगात, मंगलकार्यात, एकमेकांचं सुख-दुःख वाटून घ्यायची साक्ष असते ती विनायक. इतकं सोप्प नाहीये तू समजतोयस तसं.

विनायक : अग, मग ज्यांच्या साक्षीनं लग्न केलं तेच विधींना बसू देत नाहीयेत ना हिला. मग यांच्या साक्षीनं कोणतेही कार्य करण्याला अर्थच काय राहिला? 

आई : अरे काहीही… काय तारतम्य सोडून बोलतोस तू? 

(कविता हतबल होऊन बसली आहे. तिच्याजवळ नलिनी येते. कविता उठून विनायक समोर येते) 

कविता : हे बघ, तू तुझा निर्णय दिल्यानंतर मी ऐकून घेतलं सगळं. ॲडजेस्ट पण करायचा प्रयत्न केला स्वतःला. पण खरं सांगते, आजही नाही झेपत मला तुझं हे देवधर्म न मानणं, मंदिरात न येणं. आलास तरी घुम्यासारखा उभा असतोस नुसता मंदिरात. आरतीच्या वेळी पोहोचलो तर सरळ निघून जातोस बाहेर. माझं एकटीचं तिथे काय होत असेल, मला काय वाटत असेल याचा विचार तरी केला आहेस का कधी तू? आई, आता जावंसंच वाटत नाही मंदिरात मला. का वाटणार सांगा ना! ना कोणाच्या पूजेला जावं वाटतं, ना इतर धार्मिक कार्याला. प्रत्येक वेळेला सगळीकडे मी एकटीनेच जायचं. विचारतात हो सगळीकडे लोक सारखं. गुदमरायला होतं मला. आई, एक नाही, दोन नाही, पाच वर्षे झाली आहेत आमच्या घरात कोणतीही पूजा घालून. गणेशोत्सवात, दुर्गा पूजेला, दिवाळीमध्ये, सणासुदीला छान कपडे, साडी नेसून, नट्टापट्टा करूनसुद्धा … सुतक असल्यासारखं वातावरण असतं घरात. (नलिनी कविताला धीर देते) फॉर्मलिटी म्हणून झब्बा-कुडता घालतो हा. दिवाळीत लक्ष्मीपूजन मी करते आता. कांचीला बसवते शेजारी. तिला शिकवते सगळं. (डोळे भरून आले आहेत) देवासमोर हात जोडताना लाइफ पार्टनरच नसेल शेजारी तर … (हुंदका येतो) असं वाटतं, कोणीतरी आपला एखादा अवयवच कापून टाकलाय कायमचा. 

नलिनी : वहिनी… 

आई : बोलू दे तिला. इतक्या वर्षात आत्ता बोलायला मिळतंय बिचारीला. माहेरी सांगू शकत नाही आपण काही गोष्टी. 

कविता : अगं, लहानपणापासूनच धार्मिक कुटुंबात वाढलीय गं मी. सणासुदीला, मंगलकार्याला गोतावळा असायचा आमच्याकडे. (विनायकला) आपणही आधी सगळं करायचोच नां! आणि तू अचानकच असा देव मानत नाही म्हटल्यावर काय करायचं माझ्यासारख्यांनी? तुला समजून घ्यायचा, तुझ्याबरोबर ॲडजेस्ट करायचा खूप प्रयत्न करतेय मी. पण नाही होत आता माझ्याने. आहे माझी त्या देवावर श्रद्धा. आधार लागतो रे माणसाला कशाचा तरी आयुष्यात. धीर मिळतो अशानं, आशा राहते. तुझ्यासारखं असं नाही तोडता येत मला. एकत्र संसार करण्यासाठी लग्न करतो ना रे आपण! समांतर जगण्यासाठी नाही ना!? 

विनायक : कविता, अगं संसार एकत्रच करतो आहोत ना आपण. हा, आता देवाधर्माचं सोडल्यास मी कुठली प्रापंचिक जबाबदारी टाळतोय का? … बरं मी व्यसनाला किंवा कशाच्या नादाला लागलोय का? की मोठं कर्ज काढून ठेवलंय, जे मला झेपत नसल्यामुळे तुमच्या दारात आता गुंड वसुलीला येतील अशी भीती आहे? की मी एखादी अनैतिक गोष्ट करतोय? 

कविता : अरे, पण मी एका देव मानणाऱ्या माणसाशी लग्न केलं होतं ना! 

अश्विन : दादा, तू वहिनीचा एकदाही विचार केला नाहीस हे सगळं ठरविण्याआधी? आणि परस्पर ठरवून मोकळा झालास? मला हे पटत नाहीये दादा. (शांतता. विनायक काहीसा विचार करून बोलू लागतो) 

विनायक : मला सांगा, कायद्याच्या कोणत्या कलमांतर्गत माझ्यावर गुन्हा दाखल करता येईल? (सगळे न समजल्यासारखे त्याच्याकडे पाहू लागतात) नाही म्हणजे, मी आता देव मानत नाही. आधी मानत होतो आणि आता अचानकच मी देवधर्म, कर्मकांड न मानण्यामुळे तुम्हा सगळ्यांची जी घोर फसवणूक केलीये त्यासाठी कायद्याच्या कोणत्या कलमांतर्गत माझ्यावर गुन्हा दाखल करता येईल? (पुन्हा शांतता) 

नलिनी : मी बोलू का? वहिनी, अगं मला तुझी भावना नक्कीच समजतेय. पण या क्षणाला तरी दादांना असं टार्गेट करायला नको आपण. ते जे सांगू पाहतायत ते पटतंय एका बाजूला मला. 

आई : अगं, काय बोलते आहेस तू? 

नलीनी : अहो आई, पण असा विचार आपण कधीच केलेला नाहीये. त्यामुळे एखाद्या गोष्टीची… विशेष करून धार्मिक गोष्टींकडे बघण्याची अशीही बाजू, आय मीन दृष्टी असू शकते याचा आपण विचारच करत नाही कधी. 

अश्विन : दादा, पण मला एक कळत नाहीये. तू एवढा नास्तिक कसा काय झालास? म्हणजे, ‘देव नाहीच आहे.’ असं तुला का वाटायला लागलं? (शांतता) 

विनायक : विषय वाढत जाईल आशु. 

गुरुजी : नाही विनायका, तू बोल. म्हणजे आम्हाला तरी समजेल की नेमका असा काय साक्षात्कार झाला तुला आणि तू देवधर्म सर्व मानणंच सोडून दिलंस. 

विनायक : काका, आधी काही गोंधळ दूर करू आपण. तुम्ही जो साक्षात्कार म्हणत आहात त्याची गरज देव-धर्म, अध्यात्म किंवा पारलौकिक शक्ती मानणाऱ्यांना असते. म्हणजे जी गोष्ट अस्तित्वातच नाही आहे, जो देव आपल्याला कधीही दिसत नाही, पंचेन्द्रियांना प्रत्यक्ष जाणवत नाही, त्याच्या ओढीने पूजा, प्रार्थना, ध्यान करून सतत स्वतःला सूचना देऊन आपणच एक भारावलेपण आपल्याभोवती झालरीसारखं पांघरून घेतो. आणि या स्वसंमोहनाने आपल्याला साक्षात्कार झाल्याचे, पारलौकिक अनुभव आल्याचे आपण सांगू लागतो. या सगळ्यासाठी कमालीची श्रद्धा असावी लागते. आणि जिथे श्रद्धा असते तिथे चिकित्सेला, शंकेला वाव नसतो. ‘जे काही चाललंय, ते तो करतोय’, ‘ही सारी त्याची किमया’, ‘त्याच्याच मनात होतं, मग आपण तरी काय करणार ना?’ असं म्हणायला आपण मोकळे. त्यामुळे श्रद्धा हीच खरंतर अंधश्रद्धेची पहिली पायरीय. आणि आशु, मी काही ठरवून नास्तिक नाही झालो. इथून बाहेर पडल्यानंतर आतापर्यंतचा प्रवास तुला माहितीच आहे. आता काही घटना, प्रसंग घडले आपल्याबाबतीत की आपण देव, दैव आणि नशिबावर सोडून देतो. तसंच माझंही व्हायचं. तुला माहितीच आहे की. ब्रह्ममुहूर्तावर स्तोत्रपठण वगैरे सगळं करायचो मी. पण एका नादात, तंद्रीत. सततची इनसिक्युरिटी आणि टेन्शनमुळे जे काही वाचतोय त्याचा अर्थच मन मेंदूपर्यंत जाऊ द्यायचा नाही. पण नंतर नंतर विचार करू लागलो, की वाचताना काही गोष्टी खटकतायत आपल्याला. म्हणून मग आणखीन विचार करू लागलो, की आपण सगळीच भिस्त देव आणि दैवावर तर नाही ना टाकत आहोत? प्रश्न सुरू झाले तसा उत्तरांचा शोधही. कधी कधी भीती वाटायची. देवाधर्मावर, हजारो वर्षं चालत आलेल्या शास्त्रावर कसं काय आपण शंका घेऊ शकतो? देवाची भीती वाटत असली तरी हे प्रश्न दोन्ही बाजूने सुरू होतेच. आणि मुळात देवाची भीती का वाटावी? ‘अमुक गोष्ट केली नाही, तर देव रागवेल’, ‘तमुक पठण केलं नाही, विधी केले नाहीत, तर देव कोपेल’ असं का? देवाला करुणेचा सागर म्हणतो ना आपण? तो तर भक्तीचा भुकेला आहे. कर्मकांडांचा, व्रतवैकल्ल्यांचा नाही. आणि हे जर नाही केलं तर तो आपल्याला शिक्षा देणार? उगीचच!! हे म्हणजे थोडक्यात सूड घेणं झालं ना? आणि देव सूड का घेईल? असे एक ना अनेक प्रश्न. यातून एकूणच सर्व प्रकारची पुस्तकं वाचणं झालं. व्याख्यानं अटेंड करणं झालं, युट्युब, सोशल मीडियासारख्या प्लॅटफॉर्मवर अखंड सर्चिंग झालं. बऱ्या-वाईट अनेक गोष्टी समोर येत होत्या. गोंधळ उडत होता नुसता. आणि या सगळ्यात रॅशनॅलिझमची, रॅशनल थॉट्सची ओळख झाली. आता याच्या मागे लागलो. रॅशनल थॉट म्हणजे विवेकवाद किंवा बुद्धिप्रामाण्यवाद. हा आपल्याला प्रत्येक गोष्टीची चिकित्सा करायला भाग पाडतो, प्रत्येक गोष्टीची. ‘नीर-क्षीर विवेक’, दुधातून पाणी बाजूला करण्याची कला शिकवतो हा. आणि ही सगळी प्रोसेस खूप लांब, थकवणारी आणि कंटाळवाणी असते. 

अश्विन : अरे पण दादा, आपल्या धर्मात, अध्यात्मात सदसद्विवेक सांगितलेला आहेच की. मग त्यासाठी… 

विनायक : आशु, अरे आपल्या धर्मात आणि आध्यात्मात मानवाला उपकारक अशी अनेक मूल्यं आणि आचरणं सांगितलेली आहेत. ज्याचा समावेश संविधानातदेखील केलेला आहे. पण धर्माचा आणि आध्यात्माचा आधार घेऊन बहुतांश ज्या गोष्टी मांडल्या जातात त्या विज्ञाननिष्ठ आणि तर्कसंगत नसतात. आणि तरीही आपण त्यावर विश्वास ठेवत असू तर तो सदसद्विवेकाच्या नावाखाली भुलभुलैय्याच असतो. बुद्धिप्रामाण्यवाद आणि रॅशनलिझम हा प्रत्येक गोष्टीची, घटनेची, व्यक्तीची विज्ञाननिष्ठ आणि तर्कसंगत मांडणी करायला सांगतो. पण यात एक धोका आहे. (अश्विन, नलिनी कुतूहलाने ऐकू लागतात) किंवा तोटा आहे म्हण. रॅशनलिझम हा सर्वांत आधी स्वतःची चिकित्सा करतो. आणि असं जेव्हा घडतं तेव्हा आपणच आपल्यासमोर अंतर्बाह्य उघडे पडतो. आपल्या सर्व बऱ्या-वाईट विचारधारणांसह. आणि इथे आपली खरी परीक्षा असते. भीती नापास होण्याची नसते आशु. तर हा पेपरच नको, जाऊ पळून आपण असं वाटू लागतं. पण एकदा का आपण ही परीक्षा पार पाडली, की कशाचीही भीती मनाला उरत नाही. ना कोणत्या पारलौकिक शक्तींची, ना देवाची, ना दैवाची. या सगळ्या मानवनिर्मित संकल्पना आहेत हे कळून चुकलेलं असतं आपल्याला. 

अश्विन : अरे पण दादा, यामुळे देवाचं अस्तित्वच नाही आहे, हे कुठे सिद्ध होतंय? 

विनायक : आशु, ‘देवाचं अस्तित्व नाही आहे’ ही गोष्ट सिद्ध करायची नसते, तर ‘देवाचं अस्तित्व आहे’ ही गोष्ट सिद्ध करायची असते. पण अजून एक टप्पा राहिलेला असतो. आपण जर देवधर्मच मानायचं बंद केलं, तर समाजात आपलं स्थान काय राहील? समाज आपल्याला स्वीकारेल का? या भीतीने पुन्हा आहे या प्रवाहात उडी घ्यायची इच्छा होते. मात्र मी प्रवाहात उडी मारली नाही. यु-टर्न घेतला नाही. सुरुवातीला एक पोकळी जाणवत होती की पूर्वी तर आपण देव मानत होतो. काही झालं तर त्याचा धावा करत होतो. आता देवच नसल्याने त्याच्या जागी काय? आपणच विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरांनी तयार झालेली पोकळी. आणि यावर एकदा मात केली की मग आयुष्यात जे काही आपण करू त्याला कारणीभूत मी स्वतः असेन. आणि त्याच्या परिणामांना सामोरं जायची जबाबदारीही माझीच असेल. यासाठी कोणाचाही धावा करायची गरज नाही लागत आशु. 

गुरुजी : मोठ्या चातुर्यांनं युक्तिवाद करतोयस विनायका. चांगलाच तयार झाला आहेस. देव तू मानत नाहीस. आणि तो आहे हे सिद्ध करायची जबाबदारी मात्र आमच्यावर टाकतोयस. शिवाय, श्रद्धा म्हणजे अंधश्रद्धेची पहिली पायरी हेही तूच जाहीर करतोयस? अरे, लोकशाही आणि संविधानाचं उदाहरण देताना एक गोष्ट विसरतोयस की आपल्या आजूबाजूला देव मानणारी, देव आहे हे माहीत असणारी माणसं लाखोंनी आहेत. तेव्हा ‘देव नाही आहे’ हे म्हणणाऱ्यांवरच ‘तो नाही आहे’ हे सिद्ध करायची जबाबदारी आली ना! 

विनायक : लोकशाहीची हीच तर गंमत आहे काका. बहुसंख्येने चुकीची निवड जरी केली, तरी ती सर्वांनाच मान्य असं गृहीत धरलं जातं. पण काका, जी गोष्ट दिसतच नाही, स्पर्श होत नाही ती गोष्ट केवळ मनाच्या खेळावर कशी मान्य करायची? 

गुरुजी : यासाठीच श्रद्धेची गरज आहे विनायका. जी तू गमावून बसलायस. त्यामुळे तुला या मनोवस्थेत तरी तो दिसणार नाही. आणि देव असा सर्वांना दिसायला स्थूल अवस्थेत वावरत नसतो बाळा. या चराचरात तो अतिसूक्ष्म ते अतिविराट रूपात वावरत असतो. पण याची अनुभूती घेण्यासाठी मनात अपरंपार भक्ती असावी लागते. ‘मनी असे भक्ती, त्याचे देव वसे चित्ती।’ 

विनायक : हा पुन्हा मनाचाच खेळ झाला काका. (विनायक कविताला चहा करायला सांगतो. स्वतःही उठतो आणि किचनमध्ये जाऊन दोन्ही हातात पाण्याचे भरलेले पेले आहेत अशा पद्धतीने बाहेर येतो. पण हातात काहीच नसते. हातात नसलेले पाण्याचे पेले तो टीपॉयवर ठेवण्याची ॲक्शन करतो) काका, पाणी घ्या. (समोर पेलाच नसल्याचे आणि विनायक काय सांगू पाहतो हे लक्षात येऊन गुरुजी मंद हास्य करतात. पाणी असल्यासारखेच तो नसलेला पेला घेऊन पाणी पिण्याचे नाटक करतात. आणि तृप्त होऊन पेला खाली ठेवण्याचीही ॲक्शन करतात. आता विनायक काय बोलणार याची वाट पाहतात. अश्विन, आई, नलिनीला काही समजत नाहीये. विनायक अश्विनला बोलवतो) आशु, आता तू पाणी पी. (असं म्हणत शेजारी बोट दाखवतो. अश्विनला हे पटत नाहीये. तो गोंधळलेला आहे. तो दोघांकडेही पाहतोय) काका, तुम्ही त्याला पाणी प्यायला सांगा ना प्लीज. (काका शांत स्मितहास्य करतात) आशु, अरे पाणी आहे ठेवलेलं. विश्वास ठेव आमच्यावर. काका प्यायले आता पाणी. तुझ्या मनात भक्तिभाव असेल, श्रद्धा असेल तर तुलाही नक्की दिसेल हे पाणी. पण मनात शंका असेल तर ते दिसणार नाही. (अश्विन आता मात्र वैतागलेला आहे) देवाधर्माचं असंच आहे आशु. मोठे सांगतायत म्हणून करायचं. इथे तार्किकतेला जागा नाही. तुला पाणी दिसतंय का इथं? (अश्विन नकारात्मक मान हलवतो) देवाच्या बाबतीत माझंही असंच आहे. ज्या गोष्टी केवळ परंपरेने अनेक जणांकडून आणि मोठ्यांकडून आपल्यापर्यंत येतात म्हणून त्यातील तथ्य, सत्य न तपासताच विश्वास ठेवणं आणि त्यांचं पालन करणं हे मला पटत नाही. इथे बहुसंख्याकवाद चालत नाही. इथं बुद्धिप्रामाण्यवादाची गरज आहे. जो मी स्वीकारलाय. 

गुरुजी : (पुन्हा मंद हसतात) बुद्धिप्रामाण्यवाद मलाही मान्य आहे. तर विनायका, तुला देव दिसत नाही म्हणून तू मानत नाहीस ना! मग मला सांग बुद्धी, मन हे तरी आपल्याला कुठे दिसतात? आहेत शरीरात कुठे? विज्ञानानं तरी या दोन्ही गोष्टी प्रत्यक्ष दाखवून दिलेल्या आहेत का आजपर्यंत? त्या सूक्ष्मरूपात आहेत. बुद्धी आणि मन दिसत नसले तरी त्यांचं त्यांचं कार्य दोघेही करत असतात. आपण पाहतो, विचार करतो, समजून घेतो आणि निर्णय घेतो. आणि हे सगळं बुद्धी आणि मनाचं कार्य आहे. पण दोघांचंही अस्तित्व स्थूल रूपात दिसत नाही. तसंच देवाचं आहे विनायका. दाखवू शकशील का तू बुद्धी आणि मन? 

अश्विन : दादा, मला पटतंय काकांचं म्हणणं. 

विनायक : काका, माझ्या म्हणण्याची जवळपास अर्धी बाजू तुम्हीच मांडली. (अश्विनला आता काही समजत नाही) आता उरलेली बाजू मी पूर्ण करतो. मुळात मन आणि बुद्धी हे काही अवयव नाही आहेत. त्यामुळे ते दिसण्याचीही शक्यता नाही. आपल्या मेंदूच्या कार्यप्रणालीचा भाग आहेत हे. आपल्या पंचेन्द्रियांकडून आपल्या मेंदूला संकेत किंवा सूचना जात असतात. स्पर्श, चव, गंध, दृश्य, आवाज. या साऱ्या अस्तित्वात असणाऱ्या गोष्टी आहेत. दूर कुठेतरी आपल्याला धूर दिसला, तर आपण अनुमान करतो की तिथे अग्नी आहे. आणि तसा तो असतो. त्यामुळे आपण जागे आणि जिवंत असण्याचे पुरावे म्हणजेच आपला मेंदू कार्यरत असल्याचे प्रत्यक्ष दाखले विज्ञान देतं आशु. (आशुच्या चेहऱ्यावर मोठा प्रश्नचिन्ह) आयसीयुमध्ये ॲडमिट असणाऱ्या व्यक्तीचा इ.इ.जी. काढला तर मेंदू चेतन असण्याचा म्हणजे जिवंत असण्याचा ग्राफ प्रिंट करून आपल्याला पाहता येतो. आणि हार्टचा ई.सी.जी. मॉनिटरवर प्रत्यक्ष पाहता येतो. आपल्या मेंदूचे चेतन असणं आणि हृदयाची धडधड सुरू असणं विज्ञानाने दाखवून दिलेलं आहे. मेंदूपर्यंत जाणाऱ्या संकेतला, मेंदूने त्या संकेतांना प्रतिक्रिया देऊन आपण विचार करेपर्यंतच्या कार्यप्रणालीलाच आपण बुद्धी आणि मन म्हणतो. बुद्धीचं कार्य हे व्यावहारिक ठरवून आपण मेंदूशी जोडलं आणि मनाला भावनिक ठरवून त्याचा संबंध मात्र हृदयाशी जोडला. प्रत्यक्ष विचारमंथन, निर्णयप्रक्रिया ही कामं फक्त मेंदूच करत असतो. काका, तुम्ही म्हणाल तर गावातल्या इथल्या छोट्या हॉस्पिटलमध्ये मी तुम्हाला हे आत्ता दाखवू शकतो. पण देव असण्याचे असे कोणतेही पुरावे, त्याच्या अस्तित्वाच्या किमान खुणा, चेतना अजून तरी कोणत्याही मॉनिटरवर सिद्ध झालेल्या नाहीयेत. 

अश्विन : दादा, अरे पण विज्ञान सातत्याने प्रगती करत राहतं, शोधाचे नवनवे टप्पे पार करतं. पुढचा टप्पा सापडेपर्यंत किंवा समजेपर्यंत तो नजरेत नसतोच ना रे? म्हणजे विज्ञानालाही माहिती नसतो. मग विज्ञानाच्या मर्यादा हा देवाधर्माचा दोष कसा काय ठरू शकतो?

विनायक : दोष देवाधर्माचा नाहीच आहे आशु. दोष डोळे झाकून कशावरही विश्वास ठेवणाऱ्यांचा आहे. आणि विज्ञानाला मर्यादा असल्या, तरी विज्ञान कोणतेही दावे करत नाही. विज्ञान हवेत बोलत नाही. विज्ञानाला माहीत असतं ते फक्त वास्तव आणि हे वास्तव देखील सतत परिवर्तनीय असतं. या पायावरच विज्ञान उभं असतं. पण आपली तत्त्वे अपरिवर्तनीय मानणाऱ्या धर्माचे आणि विज्ञानाचे मुळापासूनच वावडे. विज्ञान सतत विचारायला उद्युक्त करतं आणि ‘बाबा वाक्यम् प्रमाणम्’चा धर्माचा आग्रह. 

अश्विन : दादा, अरे पण तू असं कसं म्हणतोयस की केवळ वैज्ञानिक कसोटीवर सिद्ध होत नाही, म्हणून आपण आपल्या परंपरा सोडून द्यायच्या? इतकी वर्षं पिढ्यानुपिढ्या लोक करतात याला काहीच अर्थ नाही? अरे, जगभरात भारतीय संस्कृतीचा गौरव केला जातो. आपली संस्कृती आधुनिक म्हणविणारे देशही फॉलो करतायत. मग हे सगळे काय वेडे आहेत का? 

विनायक : आशु, अरे आपल्या देशाची संस्कृती महान आहेच. कारण त्यात विविधता आहे. पण म्हणून एकाच संस्कृतीतून आलेले धार्मिक विधी, कर्मकांड, मूल्यं आणि धर्माचे दाखले म्हणजे संपूर्ण भारताची संस्कृती नाही होत. ती हळूहळू लादली गेलेली आहे आपल्या सर्वांवरच. आणि नेमकं यालाच आपण भारतीय संस्कृती समजून बसलोय. तुला गम्मत वाटेल आशु, आपण धार्मिकपेक्षाही धर्मभोळे का असतो माहितीय? (अश्विन विचारात) सांग ना, कधी विचार केलायस याचा? कारण आपण आपले धर्मग्रंथच वाचत नाही, म्हणून. 

अश्विन : दादा, तुला नेमकं काय म्हणायचंय? 

विनायक : गणपतीस्तोत्र, मारुतीस्तोत्र सोडून काही वाचलंयस का कधी? 

अश्विन : नाही. 

विनायक : मग आधी वाच. (देव्हाऱ्याकडे हात करत बोलतो) आपल्या या देव्हाऱ्याच्या पुढ्यातच काही पोथ्या आणि चरित्र आहेत बघ. हळदीकुंकू वाहिलेलं आहे त्याला. कारण पवित्र मानतो आपण त्यांना. त्यांचं पठण करतो, आणि पूजाही. नलिनी त्यातला सगळ्यात वरचा ग्रंथ घे बरं. (नलिनी अश्विनकडे पाहते. अश्विन ‘घे’ असे खुणावतो. ती उचलते) त्यातल्या ३१ व्या अध्यायामध्ये काय लिहिलंय जरा वाच. (ती काढते) त्यातला ४६ वा श्लोक वाच नलिनी. 

नलिनी : 

जरी पाहे बहीद्वारीं | उलूक योनी जन्मे नारी ||
याच प्रकारे निर्धारि | पातिव्रत्य लोपामुद्रेचें || ४६ || 

विनायक : म्हणजे पतिव्रतेने जर बाहेरख्यालीपणा केला तर, ती पुढच्या जन्मी उलुक म्हणजे घुबडयोनीमध्ये जन्म घेते. आता ७६ वा श्लोक वाच.

नलिनी : 

पतीस क्रोधे उत्तर देती | श्वान योनी जन्म पावती |
जंबुक होऊनी भुंकती | ग्रामासन्निध येऊन ||

विनायक : म्हणजे बायकोने नवऱ्याला रागाने उत्तर दिलं किंवा उलट बोलली तर ती पुढच्या जन्मी श्वान म्हणजेच कुत्री होऊन भुंकत फिरेल गावभर. (अश्विनी आणि नलिनी अचंबित होतात. त्यांना जे वाचले त्यावर विश्वासच बसत नाही असा चेहऱ्यावर भाव) नलिनी, आशुवर रागावली असशील ना कधीतरी? (नलिनी उत्तर देत नाही) म्हणजे चुकून उलट बोलणं होतंच ना, का नाही? (ती मानेने ‘हो’ म्हणते) बघ हं नलिनी, आता पुढच्या जन्मी तू… म्हणजे शास्त्रात लिहिलंय तसं. (थांबतो) 

गुरुजी : अरे विनायका, त्या-त्या काळाची गरज होती ती. आता या कलियुगात या सगळ्या गोष्टी मागे पडल्यायत. 

विनायक : (त्यांना तोडत बोलतो) मग तुम्ही जे विधी, पाठ, पूजा करायला सांगताय, ते कोणत्या काळात लिहून ठेवलेले आहेत काका? (काका गप्प) हे जे नलिनीने आत्ता जे वाचलं ते तुला मान्य आहे का आशु? 

आई : अरे, प्रत्येक धर्मात अशा बऱ्यावाईट गोष्टी लिहून ठेवलेल्या होत्या. आता त्यातल्या सगळ्या स्वीकाराच्या असा कुठे नियम आहे का? आणि म्हणून संपूर्ण संस्कृतीला आणि धर्मालाच वाईट ठरवायचं का? 

विनायक : म्हणूनच आई, मी त्या बऱ्यावाईट गोष्टींमधल्या वाईट गोष्टीच नाकारतोय फक्त. (आईला पुन्हा त्रास व्हायला सुरू होतो) मी सर्वांना हात जोडून विनंती करतो. आपण आता थांबूया. तुम्ही सर्वजण देवधर्म मानू नका असं माझं म्हणणंही नाहीये. आणि तसं म्हणण्याचा मला अधिकारही नाही. त्यामुळे तुम्हीदेखील मी देवधर्म मानावा किंवा पाळावा असा आग्रह धरू नका, प्लीज! संविधानानं सांगितल्याप्रमाणे तुमचाही अधिकार अबाधित आहे आणि माझाही. 

गुरुजी : मला एक समजत नाहीये विनायका, की हे संविधान आणि विज्ञानाचं भूत तुझ्या डोक्यावर इतकं स्वार का झालंय? आपल्या प्राचीन संस्कृतीने इतकं काही दिलेलं आहे आपल्याला. हे तू जे विज्ञान-विज्ञान म्हणतोयस ना, या खूप पूर्वीच आपल्याकडे सिद्ध झालेल्या गोष्टी आहेत. संविधान आणि विज्ञान तर आत्ता आत्ता उगवलेत. त्यात हे संविधान तर संपूर्ण परकीय आहे.

विनायक : मग सगळे वैज्ञानिक शोध, तंत्रज्ञान आपण का लावले नाहीत? ज्या काही गोष्टी आहेत त्या केवळ कागदावरच, प्रत्यक्षात मात्र… 

गुरुजी : या अखंड देशाला उदात्त आणि सहिष्णुवृत्ती बाधली विनायका. ‘अतिथी देवो भवः’ म्हणता म्हणता परकीय आक्रमणं ओढवून घेतली आपण. आणि या देशातील दोन मोठी विद्यापीठं या आक्रमणकर्त्यांनी जाळून नष्ट केली. हे ठाऊक आहे का तुला? का? तर आपला देश सर्वश्रेष्ठ शक्ती बनण्याची क्षमता ठेवतो म्हणून. विद्यापीठच नाहीशी झाली म्हटल्यावर पुढच्या पिढ्या कुठून लावणार शोध? 

विनायक : बस इतकंच? पण म्हणून कोणीच तयार होऊ नये इतक्या शतकांमध्ये? निदान आहे या डॉक्युमेंट्सवरून तरी? बरं, ठीक आहे. तुम्ही म्हणताय तसं विज्ञानाच्याही पुढे अध्यात्म असेल. तर आत्ता एका धर्मस्थळावरून वाद चाललाय, ते कोणत्या धर्मियांचं आहे यावरून. आणि दोन्हीकडच्या धर्मगुरुंनी ते आमच्या धर्माचे असल्याचा दावा केलाय. तो सिद्ध करण्यासाठी तिथली एक शिळा कार्बन टेस्टिंगसाठी लॅबला पाठवण्यात आलीय. त्यावरून ती कोणत्या शतकातील आणि कोणत्या धर्माची आहे हे समजू शकेल. तुम्ही म्हणताय तसं विज्ञानाच्या पुढे अध्यात्म असेल तर मग अध्यात्माला विज्ञानाकडे गाडी रिव्हर्स का घ्यावी लागलीय? दोन्ही बाजूच्या धर्मगुरुंना, बाबांना किंवा मौलवींना आपल्या दिव्यदृष्टीतून किरण टाकून त्या शिळेचा काळ का नाही शोधता येतं? यासाठी त्यांना विज्ञानाचा आधार का घ्यावा लागतो आहे? 

गुरुजी : प्रत्येक युगात व्रत घेतल्याप्रमाणे ज्ञानाची साधना करणारे महापुरुष जन्माला येतातच असं नाही. अरे, काळ पुढे सरकतो तसं कलियुगात मनुष्याची साधना तरी भ्रष्ट होत जाते किंवा तो तरी कमी पडत जातो. कोणतीही विद्या आत्मसात करून दिव्यशक्ती प्राप्त करायची असेल तर ब्रह्ममुहूर्तावर उठून साधना करावी लागते, त्याग करावा लागतो. आयुष्यभर व्रतस्थ म्हणून जगावं लागतं. तसं न केल्यास मी-मी म्हणवणाऱ्यांकडेदेखील सामान्य विद्येपलीकडे काही उरत नाही. 

विनायक : काका, किती गोंधळ आहे पहा! मग ही विद्यापीठं उद्ध्वस्त होण्यापूर्वी ज्या कुणी महान विभूती होत्या, जे कोणी ज्योतिषाचार्य होते, त्यांना ती पुढे उद्ध्वस्त होणार आहेत हे आधीच का नाही समजू शकलं त्यांच्या दिव्यशक्तीने? आणि आता ही शक्ती, विद्या कलियुगात तेवढी दिव्य राहिली नसेल, तर मग यातील कुणाकडूनही ही पूजा, उद्याचा विधी करण्यातदेखील काय अर्थ राहतो? या असल्या शक्तीबिक्ती आपल्यात नाहीयेत, हे पूर्वीपासूनच या लोकांना ठाऊक होतं. पण समाजात सर्वोच्च पदावर मिरवत उर्वरित जातीच्या लोकांचे शोषण करता येत होतं. बरं, याच लोकांनी परकीय आक्रमण करण्याऱ्यांच्या दरबारात पिढ्यानुपिढ्या चाकऱ्या केलेल्या आहेत. ‘इंग्रज येण्यापूर्वी मध्ययुगात आणि त्याहीपूर्वी अनेक वर्षं आपल्यावर आक्रमणं होतच राहिली.’ असं म्हणणाऱ्याच या महान विभूतींनी ‘आपल्या देशात किंबहुना संस्कृतीत असणारी अंतर्गत जात आणि वर्णव्यवस्था कशी शाबूत राहील’ याचीच व्यवस्था केली. आणि संविधानाने नेमक्या याच व्यवस्थेचं उच्चाटन करायचा प्रयत्न केलाय. आज संविधानाला ते लोक परकीय म्हणतात, ज्यांच्या रक्तात मात्र हिटलरची मूल्यं वाहतात. (हे ऐकून काका उठतात) 

आई : विनायक, अति होतंय हे. 

विनायक : काका, प्लीज बसा. मला सांगा, संत ज्ञानेश्वरांनी पसायदानात काय म्हटलंय? (शांतता) समस्त विश्वाच्या कल्याणाची प्रार्थना आहे ही. शाळांमध्ये आजही लावली जाते. पण म्हणून मग हीच प्रार्थना अमेरिका, युरोप खंडांमध्ये परकीय ठरली पाहिजे ना? कारण त्यांच्यासाठी ती परक्या देशातील संतांने लिहिली आहे. काका, समस्त विश्वाच्या, मानवाच्या कल्याणाची मूल्यं कधीही परकीय किंवा स्वकीय असत नाहीत. ती साऱ्या विश्वाची असतात. ‘अवघे विश्वची माझे घर’ ही आहे आपल्या बहुविध संस्कृतीतील मानवी संकल्पना. पण सर्वच धर्मांतील संस्कृतींप्रमाणे आपल्याही संस्कृतीला काळी बाजू आहेच. कोणत्याही मानवी समूहाची, देशाची, कोणत्याही धर्माची प्राचीन संस्कृती ही पराकोटीच्या क्रौर्याने, विषमतेने आणि शोषणाने बरबटलेलीच दिसेल. केवळ मंदिरं, केवळ राजवाडे, आयुर्वेद, योग यांचा गौरव किती दिवस करत बसणार आहोत आपण? स्वतःला प्रकांडपंडित म्हणविणारे धर्माच्या आणि देवाच्या नावाखाली शूद्रांच्या आणि स्त्रियांच्या शोषणाची व्यवस्था स्वतःच लिहिणार. ती व्यवस्था अनेक शतकं चालू राहावी म्हणून त्यांना शिक्षणाचा हक्क नाकारणार. ही आहे का आपली प्राचीन संस्कृती? आणि जगाला तोंडात बोट घालायला लावणाऱ्या स्थापत्यशास्त्राचं, मंदिरांचं करायचं काय? जिथे शुद्रांना साधा प्रवेशही नव्हता. मंदिरात प्रवेश केला त्यांनी, तर त्यांच्या डोळ्यात गरम शिसं ओतायची शिक्षा? विज्ञानाचं तर सोडाच काका. एवढंच कशाला, फक्त दीड-दोनशे वर्षं मागे पाहिलं ना तर, माझ्या देशातील माझे बांधव दलित, शूद्र, जे माणूसच होते ना तेव्हा? त्यांनी रस्त्याने चालताना पायात वहाणा घालायच्या नाहीत. पावलांचे ठसे जमिनीवर उमटू नयेत म्हणून त्यांनी कमरेला मागे खराटा बांधून चालायचं. त्यांनी रस्त्यावर थुंकायचं नाही. का? तर रस्ता अपवित्र होतो म्हणून? गळ्यात मातीचं भांडं अडकवायचं, त्यात थुंकायचं आणि तेच घेऊन सगळीकडे वावरायचं. ही कसली महान संस्कृती काका? त्यांची सावली आपल्या अंगावर पडू नये म्हणून आपण येताना त्यांनी खाली बसायचं किंवा वाकून उभं राहायचं. त्यांनी संस्कृत श्लोक ऐकायचे नाहीत. चुकून कानावर पडले, तर ओता त्याच्या कानात गरम शीसं. आपण सारेच जर त्या परमेश्वराची, निराकार निर्गुणाची लेकरं आहोत, तर कोणताही देव, धर्म असं वागायला का सांगेल? आणि जर का हे त्या देवाने सांगितलेलं नसेल, तर मग हे सगळं कोणी ठरवलं? आणि कशाच्या आधारावर ठरवलं? कुठल्या महान संस्कृतीच्या गप्पा मारतोय आपण? आणि फक्त गप्पा नाही मारत, तर ग्लोरीफाय करतोय!! बरं या प्रथा, रुढी, परंपरा ज्यांनी लिहिल्या, त्यांच्यातले किती जण पुढे आले या रूढी झुगारायला? यांच्यावरचा अन्याय दूर करायला? जे आले त्यांना परत वाळीत टाकायची महान परंपरा आहेच आपल्याकडे. हजारो वर्षांच्या या अमानवी रूढी-परंपरांचे डाग पुसण्याचं काम आपल्या संविधानाने केलंय काका. या देशातील सर्वोच्च ते तळागाळातील माणसाला माणूस म्हणून जगण्याचा सामान हक्क, स्वातंत्र्य आणि अधिकार सांगून. परवानगी हा शब्दच नाहीये संविधानात. कारण हे संविधान धर्मग्रंथांसारखं कुण्या एका माणसाने किंवा कुण्या एका घटकानं लिहिलेलं नाहीये. देशभरातल्या अनेक प्रांतातून सर्व जाती-धर्मांचे अनेक प्रतिनिधी निवडले गेले. त्यातून ३०० ते ४०० जणांची समिती स्थापन केली गेली. सर्वांकडून मतं घेण्यात आली. चर्चा, वाद झाले. आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे याच्या कोअर कमिटीमध्ये सर्व गटातील, धर्मातील, जातीतील अगदी भिल्ल, आदिवासींपासून १५ स्त्रिया होत्या. पण आपल्या धर्मात तर स्त्रीला शिक्षणाचाच अधिकार नाकारला गेला. तिथं याच स्त्रियांना आपल्या देशाचं भवितव्य घडवणाऱ्या संविधानाच्या निर्मितीप्रक्रियेत सहभाग घेता आला. आणि एक गोष्ट काका … (हात जोडतो) संविधान परकीय आहे अशी खाजगीतदेखील कमेंट करू नका, प्लीज. कारण संविधानाचा आणि त्यातील मूल्यांचा आदर करणं हे आपलं मूलभूत कर्तव्य आहे. आपल्या सर्वांनाच सदसद्विवेकबुद्धीचं स्वातंत्र्य आणि आपापल्या धर्माचं मुक्त प्रकटीकरण आणि आचरणाचाही अधिकार सांगितलेला आहे याच संविधानात. पण हे सांगण्याआधी विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद, शोधक बुद्धी आणि सुधारणावाद यांचा विकास करणं ही आपली कर्तव्येही सांगितलेली आहेत. आणि मी ती फॉलो करतोय. (पुन्हा सर्वांना हात जोडतो) तेव्हा कृपा करून आता इथून पुढे मला आग्रह करू नका. मी विधीला बसणार नाहीये. (या सगळ्यामुळे आईला त्रास होऊ लागलाय. धाप लागल्यासारखी होतेय. गुरुजी हतबल. शांतपणे आईसमोर येतात. हात जोडतात) 

गुरुजी : क्षमा करा वहिनी मला. मी अण्णासाठी … 

आई : अहो असं काय करताहात भाऊजी? तुमची काय चूक आहे यात? (आईची धाप वाढते हे लक्षात येऊन कविता नलिनी जवळ येते) सूडच उगवायचा ठरवलं एखाद्यानं तर … (आई खांदा आणि दंड जोराने दाबून धरते) आई ग… देवा गुरुराया … हा… हा जर उद्या विधीला नाही ना बसला, तर तुम्ही सगळे माझं मेलेलं तोंड पहाल. (आईला खूपच त्रास होतोय हे पाहून काल डॉक्टरांनी दिलेली गोळी तिला दिली जाते) या घराचं असं काही होईल असं वाटलं नव्हतं कधी. आई गं. 

विनायक : आई, या घराचं काहीही वाईट झालेलं नाहीये. तू जरा प्लीज शांत राहून मोठे श्वास घेशील का? 

अश्विन : दादा, प्लीज. एकदा विचार करशील का? तुझं सगळं मान्य आहे आम्हाला … फक्त एकदा डोक्यातून बाजूला ठेवून बघ ना हा विषय. (आईचा त्रास वाढतोय. ती विनायकच्या दिशेने हात पुढे करते, तसा तो आणखी जवळ येतो. आई पटकन् त्याचा हात पकडून स्वतःच्या डोक्यावर ठेवते) 

आई : विनायकss घे शपथ आणि सांग … तू उद्या विधीला बसणार म्हणून. घे शपथ विनायक. (सगळेच भेदरलेले आहेत) विनायक, सांग बसणार की नाही? विनायक, तुला … माझी शपथ… बसणार की नाही बोल. (त्रास अधिकच वाढतोय. छातीत अस्वस्थ होतेय. नलिनी जवळ येते. पण आई तिला दूर करते) 

गुरुजी : विनायका, तळतळाट घेऊ नको रे आई-वडिलांचा. (आईच्या धापा वाढल्या आहेत. छातीत दुखतेय. हात छातीवर दाबू लागते. सगळे घाबरतात) 

विनायक : (आईचा हात घट्ट धरतो) आई, मला तुझ्याबद्दल खूप वाटतं. आई, माझं प्रचंड प्रेम आहे तुझ्यावर. मी तुझ्या भावनांचा, इच्छेचा आदरही करतो. पण मला यांचही वाईट वाटतंय की तू असं माझा हात डोक्यावर घेऊन मला जबरदस्ती शपथ घ्यायला सांगतेयस. पण मी माझ्या विवेकाला मूठमाती देणार नाहीये आई. (आईचा त्रास वाढतोय हे पाहून) अश्विन, आपण आईला आता डॉक्टरांकडे नेऊया पटकन्. तू गाडी काढ. आम्ही आईला बाहेर आणतो. (अश्विन घाबरल्यासारखला एकदा आईकडे व एकदा विनायककडे पाहतो आहे) आशु पटकन्! (अश्विन किल्ली घेऊन बाहेर जाणार, इतक्यात…) 

आई : अश्विन … अश्विन थांब. आई गं, देवा.. 

अश्विन : हा आई बोल. 

आई : (आवाजात विचित्र बदल झालाय) उद्याचा विधी तर विनायक करेलच. पण मला काही बरंवाईट झालं, तर मला अग्नीदेखील विनायकच देईल, फक्त विनायक. माझे सगळे विधी तोच करेल. ऐकतोयस ना आशु? 

अश्विन : हो आई.

आई : तू करायचा नाहीस. आणि त्यानं जर नाही दिला अग्नी मला, तर माझा देह… माझा देह … कुत्र्यामांजरांना खायला टाकून द्या. हीच माझी शेवटची इच्छा सांगतेय मी अश्विन तुला. (छातीतील दुखणे वाढतेय) मला अग्नी फक्त विनायकच देईल. (आईच्या छातीत कळ येत आहे. आईला खूप त्रास होत आहे हे पाहून विनायक कालच्या डॉक्टरांना फोन लावतो)

विनायक : डॉक्टर, आईला खूप त्रास होतोय …, हो हो … लगेच घेऊन येतो डॉक्टर. अश्विन, डॉक्टरांनी आईला घेऊन हॉस्पिटलला बोलावलं आहे आपल्याला. तू गाडी काढ पटकन्, आम्ही आईला घेऊन बाहेर येतो. (अश्विन गाडीची किल्ली घेतो. आईजवळ येतो. आईचा हात घट्ट धरतो आणि ताबडतोब बाहेर पडतो. सर्वजण घाबरलेले आहेत. आई व्हेग बडबडतेय. आईच्या छातीत कळ येऊन आई जाते. गुरुजी, नलिनी आणि कविता रडू लागतात, विनायकच्याही डोळ्यात पाणी आलेले आहे.) 

ब्लॅक आऊट 

प्रसंग ४ 

(आईची बॉडी हॉलमध्ये ठेवली आहे. सर्वजण हॉलमध्ये आहेत. अश्विन, विनायकशेजारी आशेने बसलाय. गुरुजी विनायकसमोर येतात) 

गुरुजी :

अथ चेत्त्वमिमं धर्म्यं सङ्ग्रामं न करिष्यसि | 
ततः स्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापमवाप्स्यसि || 

कुरुक्षेत्रात जेव्हा स्वतःच्या भावंडांशीच आपल्याला युद्ध करावे लागणार, त्यांचा वध करावा लागणार या विचाराने हतबल झालेल्या अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण उपदेश करतात, “पार्था, जेव्हा भावना आणि कर्तव्य यातील एकाची निवड करायची वेळ येते, तेव्हा कर्तव्याला निवडावं. तेंव्हा हे पार्था! भावनेच्या आहारी जाऊन जर तू हे धर्मयुद्ध, जे तुझे कर्तव्य आहे ते केले नाहीस तर स्वतःची कीर्ती गमावून पापाचा धनी होशील.” तेंव्हा विनायका, अग्नी देऊन आईची ही शेवटची इच्छा पूर्ण करून तू तुझं कर्तव्य पार पाडावंस. तुझी जन्मदात्री आहे ती. आता तरी तू तिची इच्छा पूर्ण करशील. 

विनायक : आईला मी अग्नी द्यावा आणि तिची शेवटची इच्छा पूर्ण करावी, असं भावनिक आवाहनच तुम्ही मला करत आहात. आत्ताच तुम्ही मला सांगितलेल्या उपदेशात कर्तव्याला महत्त्व दिलेलं सांगितलंत. तेव्हा माझं समाजाप्रति असलेलं कर्तव्यच मी पार पाडणार आहे. भावनेला महत्त्व देणार नाहीये. (हे ऐकून मात्र अश्विनला रडू कोसळते. तो उठून आईजवळ येऊन बसतो. आता मात्र कविता विनायकचा हात धरून त्याला एका बाजूला नेते. तिच्या डोळ्यात पाणी भरलेलेय, पण तरीही ती निश्चयी दिसतेय) 

कविता : विनायक, आता मला तुझी भीती वाटायला लागली आहे. जी आत्तापर्यंत वाटत नव्हती. पण आता मात्र माझा संयम सुटलाय. काय म्हणाले गुरुजी ऐकलंस ना? अरे तळतळाट लागतो रे जाणाऱ्या माणसाचा. मला आता तू खूप विअर्ड, ॲबनॉर्मल वाटतोयस. तू जर तुझ्या आई-वडिलांचे साधे विधी करायला नाकार देतोयस, तर उद्या आपल्या मुलीचं लग्न, संसार यात तुझी भूमिका काय असणारे? तू यात कुठे असणार आहेस हे स्पष्ट दिसतंय मला विनायक. मला आई-वडील, समाज महत्त्वाचे आहेत. तुला नसतील कदाचित. या सगळ्यांना वगळून आम्हाला आयुष्य वेगळं काढता येत नाही विनायक. (क्षणभर विचार करून दृढनिश्चयाने बोलते) मी जे बोलते आहे ते आता नीट ऐक. मी आणि कांची तुझ्यावर खूप प्रेम करतो. तू हवा आहेस आम्हाला आमच्याबरोबर, आमच्या सगळ्या आवडत्या गोष्टींमध्ये, बऱ्यावाईट सर्व प्रसंगांमध्ये. पण आज मात्र तू विचार करायला भाग पाडलंस मला. (रडू आवरते. डोळे पुसते) आईंना जर तू अग्नी दिला नाहीस, तर मात्र मी वेगळा विचार करेन. (त्याच्या नजरेत खूप वेळ पाहते. तिला रडू कोसळते म्हणून दूर नलिनीपाशी जाऊन उभी राहते. नलिनी तिला धीर देते. विनायक काही क्षण तिथेच शांतपणे उभा. आईने शपथ घालतेवेळी विनायक जेवढा भावनिक झाला होता त्याहून अधिक भावनिक तो आता कविताने अट घातल्यावर झालेला आहे. कोंडीत सापडल्यासारखा. पण तो शांतपणे विचार करतो) 

विनायक : आई मला शपथ आणि अश्विनला अतिशय विचित्र अट घालून निघून गेली. तिच्या या शपथेमागची भावना समजू शकतो मी. मी अश्रद्ध झालोय, देव मानत नाही म्हणून माझंच काहीतरी बरंवाईट होईल हीच भीती तिच्या मनात होती ना! मला पुन्हा श्रद्धेच्या वाटेवर आणावं याच हेतूनं तिनं हे सगळं केलं. आणि मी जर का आईला अग्नी नाही दिला, तर आपल्या सर्वांच्याच आयुष्यात काहीतरी विपरीत घडेल, घराण्याला कायमचे दोष लागतील याची तुम्हा सर्वांना भीती वाटतेय. आईने अशी शपथ घालणं आणि तिच्या शपथेच्या परिणामांच्या भीतीने तुम्ही सर्वांनी माझ्यावर व्यक्तिगत आणि भावनिक दबाव आणणं, हा एकप्रकारे धर्माच्याही पुढे जाऊन केलेला धाकदपटशाच आहे. आईने लादलेल्या शपथेचं ओझं आणि भीती मला बिलकूलच नाहीये, कारण हे सगळं अनैतिक आणि इररॅशनल आहे. त्यामुळे ही भीती हाताळण्याची जबाबदारी आता मीच तुम्हा सर्वांवर टाकतो. आणि कविता, आईला आपलं भलं व्हावं असं वाटत होतं ना! आपलं काही बरंवाईट होऊ नये हीच तिची इच्छा होती. यासाठी तिने शपथेचा आणि धर्माचा मार्ग निवडला. पण मी याहून शाश्वत मार्ग निवडतोय आणि तुम्हा सगळ्यांनाच खात्री देतो, की मी माझी आणि माझ्या कुटुंबाची पूर्ण जबाबदारीने काळजी घेईन. आईची इच्छा पूर्ण करण्याचा हाच विवेकी मार्ग आहे. 

कविता : मला एक गोष्ट लक्षात येतेय. आईच्या इच्छेसाठीसुद्धा त्यांना अग्नी देणं, म्हणजे तुला तुझ्या तत्त्वांचा पराभव वाटतोय विनायक. म्हणूनच अग्नी देत नाही आहेस तू. 

विनायक : असं बिलकुलच नाहीये कविता. स्वतःच्या आईबद्दल मला असं का वाटेल? माझी भूमिकाच मुळात देवधर्म, पूजाअर्चा, कर्मकांड, विधी हे केवळ खाजगीत नाकारण्याची नसून समाजासमोर उघडपणे नाकारण्याची आहे. कारण माझा हा निर्णय समाजाने पाहावा हाच तर माझा हेतू आहे. बहुतांशी लोकांना हा हटवादी किंवा विक्षिप्तपणा वाटेल. पण यातील एका व्यक्तीने जरी तार्किक विचार केला की ‘हा का नाकारतोय देवाधर्माला, कर्मकांडांना? याला भीती व कशी वाटत नाही?’ तर हा विचार त्या व्यक्तीला रॅशनॅलिझमच्या वाटेवर आणून ठेवेल ही एक आशा आहे. मी थेट जगातील कोणत्याही देवाधर्माच्या संकल्पनांना दोष देत नाहीये. तर देवाधर्माच्या नावाखाली पोसल्या जाणाऱ्या कट्टरतेतून बालवयापासूनच आपल्या मनात जो पुरुषी आणि सांस्कृतिक अहंकार तयार केला जातो, तोच अहंकार आपल्या घराघरातून, समाजातून आणि समाजातील सर्व घटकांतून देशाच्या लोकशाहीलाच विळखा घालणाऱ्या पितृसत्ताक राजवटीला बळ देत राहतो. आणि हे सगळं शास्त्र, विधी, कर्मकांड याच पितृसत्ताक संस्कृतीने निर्माण केलेले आहेत. लोकांना कायमस्वरूपी या एकाच संस्कृतीत जखडून ठेवण्यासाठी. तेंव्हा आईला अग्नी देणं हा माझा पराभव नसेल कविता. तर २१व्या शतकातही तुम्ही याच शोषणकारी आणि विषमतेने भरलेल्या संस्कृतीचा पुरस्कार करून तुमची बौद्धिक, वैचारिक गुलामगिरी जगजाहीर करत आहात. आणि हा तुम्हीच तुमच्या ज्ञानाचा केलेला पराभव असेल! 

(कविता, नलिनी, अश्विन आणि गुरुजींच्याही डोळ्यात पाणी आहे. विनायक शांत उभा आहे.) 

पडदा 

[या एकांकिका लेखनात मला अनेक जणांचे मोलाच सहकार्य मिळाले, त्या सर्वांचा मी ऋणी आहे]

संपर्क: ९३७२३७५०८० 
पत्ता: १०१८, सराफ कट्टा, सांगली, महाराष्ट्र, ४१६ ४१६ 
Email : yashodhangadkari@gmail.com 

ह्या एकांकिकेचा व्हिडीओ बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
सत्य असत्याशी मन केले ग्वाही

अभिप्राय 1

  • एकांकिका वाचून नास्तिक माणसाची मानसिकता किती भावनाशुंन्य होते याची प्रचिती आली. होय एखाद्या कुटुंबात वडिलांचा स्वभाव एककल्ली असल्याने मुलांचे त्यांच्याशी पटत नाही. वडिलांशी अबोला असतो. पण वडिलांच्या देहावसनानंतरही नास्तिक असल्याने आईच्या समाधानासाठीही त्यांची मृत्यूसमयीची इच्छा पुरी न करण्याचा अट्टाहास मनाला पटत नाही. त्या अट्टाहासामुळे जन्मदात्या आईचेही देहावसन झाले तरी आपला हेका न सोडणाय्रा मुलाची मानसिकता किती भावनाशुंन्य होते, हे पाहून मन विषण्य झाले.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.